#आणि_सत्यवानाने_सावित्रीला_परत_आणलं...
©️ जया पाटील
"जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा...जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा...
अगर न मिलते इस जीवन में लेते जनम दुबारा..
जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा.... "
मोहम्मद रफींच्या आवाजातील हे सुंदर गाणं रेडिओवर वाजत होतं. तीचं हे सगळयात आवडतं सुंदर गाणं ऐकत अनुराधा आरश्यासमोर उभी होती. तिने भांगात लालचुटुक सिंदूर भरला आणि तिचा शृंगार पूर्ण झाला.
लाल रंगाची पैठणी , त्यावर फुलवलेले मोर , साडीला मॅचिंग सुंदर वर्कचं काठाचं ब्लॉउज , हातात हिरवा चुडा,त्याच्या बाजूला मोत्याचे तोडे , गळ्यात चंद्रमणी ठुशी, लांब तन्मणी, ठसकेदार मंगळसूत्र, नाकात नथ, गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी, केसांचा छानसा अंबाडा त्यावर सजलेला निशिगंधाचा गजरा हा सगळा साज तिच्यावर खूप सुंदर दिसत होता. कपाळावर सजलेली चंद्रकोर तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होती. विलक्षण सौंदर्य ते नक्षत्रासारखे अनुपम..कोणालाही भुरळ पाडेल असे...!
तिने स्वतःला आरश्यात एकदा निरखून पाहिलं, ती हलकेच लाजली आणि स्वतःशीच हसली. तितक्याच दरवाज्याची बेल वाजली.
लगबगीत अनुराधा दरवाजा उघडायला गेली. तिची ऑफिसची सहकारी निहारिका आली होती. आज अनुराधाने ऑफिसला सुट्टी घेतली होती पण काही महत्वाच्या फाईल तिला ऑफिस मध्ये पाठवायच्या होत्या. तिची सहकारी निहारिका जवळच राहत असल्यामुळे अनुराधाने तिला ऑफिसला जातांना फाईल घेण्यासाठी घरी बोलावलं. त्यानिमित्ताने निहारिकाला तिचं घरही पहायला मिळेल आणि फाईल पण ऑफिस मध्ये हातोहात जातील असा अनुराधाचा हेतू होता.
अनुराधाने दरवाजा उघडला. समोर निहारिका उभी होती. अनुराधाचा शृंगार पाहून ती पाच मिनिटं तिच्याकडे पाहत दरवाज्यातच उभी राहिली.
" अग निहारिका , आत ये ना, अशी बाहेर का उभी आहेस..? "
" अग हो अनुराधा, किती सुंदर दिसतेय तू .....
दृष्ट काढून घे स्वतःची, नाहीतर माझीच दृष्ट लागायची तुला. ऐ पण आज काही स्पेशल आहे का ..? म्हणजे तू इतकी छान नटूनथटून तयार झाली आहेस म्हणून विचारलं. ऑफिसला सुट्टी पण घेतली आहेस. काही कार्यक्रम वगैरे आहे का..? "
" कार्यक्रम वगैरे नाही ग निहारिका. आज वटपौर्णिमा ना, मग माझा पूर्ण दिवस कडक उपवास असतो आणि मग पूजा पण करायची असते. आपण घरची गृहलक्ष्मी मग पूजा करण्यासाठी तयार तर व्हायलाच हवं ना. सगळी पूजा व्यवस्थित करता यावी म्हणून आज सुट्टीच घेतली कारण ऑफिसच्या गडबडीत खूप धावपळ होते माझी.."
" अरे वा, खूपच प्रेम दिसतंय तुझं तुझ्या पतिराजांवर. आजकाल वटपौर्णिमेचा उपवास , सारसंगीत पूजा वगैरे करायला कुठे वेळ असतो. माझ्याने नाही होत इतकं नीटनेटकं आणि आपणच का ग करायचे नवर्यासाठी उपवास वगैरे ? ते कुठे काय करतात आपल्यासाठी कधी उपवास. एनी वेज तुझा नवरा स्पेशल असेल तुझ्यासाठी म्हणून इतकं प्रेम करतेस त्याच्यावर ..."
" अगदी बरोबर बोलली निहारिका , ऋषिकेश खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तो होता म्हणून आज मी हे आयुष्य सुखाने जगते आहे. त्याची सोबत लाभावी म्हणून मी रोज उपवास करायला तयार आहे निहारिका..."
" असं काय स्पेशल केले आहे जिजुंनी तुझ्यासाठी. जरा मला पण सांग तुमची स्टोरी. मला ऐकायला आवडेल.."
निहारिकाच्या प्रश्नावर अनुराधा बोलती झाली. तिची आणि ऋषिकेशची कहाणी सांगताना ती तिच्या भूतकाळात रमली. तिच्या मनाचा प्रवास तिला तिच्या भूतकाळात घेऊन गेला.
अनुराधा आणि ऋषिकेश एक मध्यमवर्गीय जोडपं. सहा वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात अनुराधाला ऋषिकेशच्या आईने पाहिलं.
पहिल्याच नजरेत त्यांनी तिला सून म्हणून पसंत केली. नातेवाईकांकडून अनुराधाची सगळी माहिती घेऊन ऋषिकेशची आई आणि त्याचे बाबा दोघांनीही अनुराधाला त्यांच्या मुलासाठी अर्थातच ऋषिकेश साठी मागणी घातली.
रितसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. ऋषिकेश आणि अनुराधाची नजरानजर झाली. ऋषिकेशला पाहून पहिल्या नजरेतच अनुराधा त्याच्या प्रेमात पडली. ऋषिकेशची अवस्था देखील वेगळी नव्हती. अनुराधा अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली, तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे पाहतच राहिला.जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास ऋषिकेशला झाला.
अनुराधा तिच्या गोर्या कांतीवर सुंदर निळ्या रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज , गळ्यात एक नाजूकशी मोत्याची सिंगलसरी लड , हातात नाजूक कडे , कपाळावर नाजूक टिकली , लांबसडक केसांची दोन पुडी घातलेली सैलसर वेणी हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली तेव्हा ऋषिकेश पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला. हा सगळा सौंदर्यसाज अनुराधावर खूपच शोभून दिसत होता. मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज. तिच्या सौंदर्याची शोभा वाढवत होता.
अनुराधा आणि ऋषिकेश दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारायचं ठरवलं. दोघांचाही विवाह संपूर्ण परिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात पार पडला. अनुराधा आता ऋषिकेशच्या घराची गृहमंत्री झाली होती. ऋषिकेश आणि अनुराधाचे दोघांचेही लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नांनी सजलेले, आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते.
नोकरीनिम्मित ऋषिकेश आणि अनुराधा शहरात स्थायिक झाले होते पण आपले गावच छान म्हणून ऋषिकेशचे आईबाबा गावीच राहत. अधूनमधून ऋषिकेश आणि अनुराधाला भेटण्यासाठी येऊन जाऊन असत. सगळं काही खूप छान सुरु होतं पण कधीतरी आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते तसंच ऋषिकेश आणि अनुराधाच्या आयुष्यात घडलं आणि तो काळा दिवस ऋषिकेश आणि अनुराधाचे आयुष्य बदलून टाकणारा ठरला.
अनुराधाला मिळालेल्या एका महत्वाच्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन असल्यामुळे त्यादिवशी तिला काम करत ऑफिस मध्ये बराच उशीर झाला. खूप वेळ झाला होता. ऑफिसच्या बाहेर ती बराच वेळ रिक्षाची वाट पाहत होती. एक रिक्षा आली. त्यात एकच सीट शिल्लक होतं पण बाकीच्या प्रवाशांना पण त्याच रस्त्याला जायचं होतं म्हणून अनुराधाने तिला रिक्षात येऊ देण्याची विनंती केली. त्यांनी देखील हो म्हटलं.
रात्रीची नऊ वाजेची वेळ होती. कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकाने थोडासा वेग वाढवला आणि तितक्यात सामान भरून घेऊन येणारं ट्रॅक्टर रिक्षाच्या अचानक समोर आलं आणि रिक्षाचालकाचा ताबा सुटला. रिक्षाने तीनदा पलटी खाल्ली आणि रिक्षा ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. रिक्षाचालकासोबत सगळे प्रवासी जबरदस्त जखमी झाले. घटनास्थळी लगेचच अंब्युलन्स दाखल झाली. सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं.
पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. ऋषिकेश पुन्हा पुन्हा अनुराधाच्या फोनवर फोन करत होता. तिला ऑफ़िसमधून घरी यायला उशीर झाला म्हणून त्याला काळजी वाटत होती. अनुराधाचा फोन पोलिसांनी उचलला. त्यावेळी पोलिसांनी घडलेल्या घटनेची त्याला माहिती दिली. अनुराधाच्या अपघाताची बातमी ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याने ताबडतोब हॉस्पिटलला धाव घेतली.
अनुराधाच्या मणक्यांना जबरदस्त मार लागला होता. ती बेशुद्ध अवस्थेत होती. अनुराधाची अवस्था पाहून ऋषिकेश खूप व्यथित झाला. अनुराधा आणि ऋषिकेशचं संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलला पोहोचलं. दोन दिवस अनुराधा शुद्धीतच आली नाही. ऋषिकेश तिच्या उशाशी रात्रंदिवस बसलेला होता.
अनुराधा वाचू शकेल की नाही याबद्दल काहीच सांगता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. अनुराधाच्या आयुष्यासाठी ऋषिकेश सतत देवाच्या धावा करत होता. दोन दिवसांनी अनुराधाला शुद्ध आली पण तिच्या मणक्यांना जबरदस्त मार लागला असल्यामुळे तिला कुठलीच हालचाल करता येत नव्हती.
डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट सुरु केली. ऋषिकेशला बोलावून अनुराधाचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असं त्याला सांगितलं. ऋषिकेश ऑपरेशनसाठी लगेचच तयार झाला. मात्र या ऑपरेशन मध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत त्यामुळे जर ऑपरेशन सक्सेस झालं नाही तर अनुराधा स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही असं ऋषिकेशला डॉक्टरांनी सांगितलं. देवावर विश्वास आणि हृदयावर दगड ठेऊन ऑपरेशनच्या फॉर्मवर ऋषिकेशने सही केली.
अनुराधाला ऑपरेशन थेटर मध्ये घेतलं. सलग पाच तास ऑपरेशन चाललं. डॉक्टर बाहेर आले. त्यांनी अनुराधाला चोवीस तास ऑब्झरव्हेशन मध्ये ठेऊ. तिला शुद्ध आल्यावरच खरी परिस्थिती समजेल असं त्यांनी ऋषिकेशला सांगितलं. ऋषिकेश संपूर्ण चोवीस तास हॉस्पिटलमधल्या गणपतीच्या मूर्तीसमोर बसून होता. चोवीस तासांनी अनुराधाला शुद्ध आली. देवाच्या कृपेने ऑपरेशन सक्सेस झालं होतं. तरीही वर्षभर अनुराधा चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. दहा दिवसांनी अनुराधाला डिस्चार्ज मिळाला.
काही दिवस अनुराधा आणि ऋषिकेशचे आईबाबा सोबत होते पण शहरातील वातावरण त्यांना मानवत नसल्याने त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांची ट्रीटमेंट करून ऋषिकेशने त्यांना गावी जायला सांगितलं. सुरुवातीला ते अनुराधाला अशा अवस्थेत सोडून जायला तयार नव्हते पण ऋषिकेशने त्यांची समजूत काढली. तो अनुराधाची संपूर्ण काळजी घेईल याची त्यांना खात्री दिली तेव्हा ते गावी जायला तयार झाले.
सगळे गावी गेल्यावर अनुराधाची अंघोळ घालून तिची वेणी घालणं, तिला जेवू घालणं, तिची औषधं वेळेवर देणं, घरातील सगळी कामं ऋषिकेश स्वतः करत होता. ऑपरेशननंतर तीन महिन्यांनी अनुराधा थोडी हालचाल करू लागली होती. त्यानंतर ऋषिकेशने फिझिओथेरपीस्टचा सल्ला घेऊन अनुराधाला व्यायाम देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर बाकी ट्रीटमेंट देखील सुरु होत्या.
ऋषिकेशने अनुराधाच्या तब्येतीसाठी घरून काम करण्याची परवानगी मागितली होती त्यामुळे तो ऑफिस सांभाळून अनुराधाची काळजी घेत होता. एक वर्ष अनुराधा चालावी म्हणून त्याने खूप कष्ट केले, खूपच तपस्या केली आणि एका वर्षाने अनुराधा स्वतःच्या पायावर थोडं थोडं चालू लागली. हळूहळू तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. तिला संपूर्ण बरं होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला.
आपल्या भूतकाळातील ही घटना निहारिकाला सांगतांना अनुराधाला अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली. निहारिकाने तिला सावरलं. अनुराधा पुढे बोलू लागली...
" ऋषिकेशने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलं आहे. आज मी स्वतःच्या पायावर चालू शकते आहे फक्त आणि फक्त माझ्या ऋषिकेशमुळे. त्याच्या जागी दुसरा कुणी असता तर अशा अपंग बायकोला सोडून निघून गेला असता पण त्याने अगदी शेवटपर्यंत माझी साथ सोडली नाही."
"लग्नात सातफेरे घेतांना आपण एकमेकांना वचन देतो की कायम प्रत्येक सुखदुःखात एकमेकांची साथ देऊ. त्या दोन वर्षात मी ऋषिकेशला कुठलंच सुख देऊ शकली नाही आणि भविष्यात पण देऊ शकली असती का नाही हे देखील माहिती नव्हते पण त्याने मात्र सातफेर्यात मला दिलेल्या प्रत्येक वचनाला निभावलं. "
" आपण नेहमीच म्हणतो स्त्री आपल्या नवर्याच्या उदंड आयुष्यासाठी वटपौर्णिमेचा, हरितालिकेचा उपवास करते. त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करते. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या चातुर्याने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळविले म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करतो. माझ्याबाबतीत मात्र सगळं वेगळंच आहे."
" माझा अपघात आणि माझी अवस्था पाहून प्रत्येक जण हेच म्हणायचा की माझा जीव वाचणार नाही आणि मी वाचली तरीही मी स्वतःच्या पायावर कधीही चालू शकणार नाही पण हे सगळं शक्य झालं ते माझ्या ऋषिकेशच्या प्रेमामुळे. त्याच्यामुळेच मी मरणाच्या दारातून परत आली. आपण बरेचदा बोलतो की स्त्रियांनीच का उपवास करायचा आपल्या पतीच्या आयुष्यासाठी पण ऋषिकेशसारखा जोडीदार प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर असा उपवास करायला तयार आहे. कारण मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या सत्यवानानेच मला म्हणजे त्याच्या सावित्रीला मृत्यूच्या दारातून परत आणलं आहे......! "
समाप्त...!
✍©️ जया पाटील
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google/Pinterest
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box