तेरा साथ है कितना प्यारा

 #तेरा_साथ_है_कितना_प्यारा..

 ©️जया पाटील 



" अग ऐकलं का सुधा.., कोथिंबीर निवडलीस ना तू , मग कोवळ्या काड्या नाही काढल्या तू त्यातल्या. कितीवेळा सांगितलं ग तुला कोथिंबीर निवडताना पानांसोबत कोवळ्या काड्या देखील घ्याव्या. दाटसर हिरवी चटणी होते त्याची. पोषण तत्वं असतात त्यात आणि त्याच बरोबर दोन दिवस भाजीत टाकायला देखील कामात येतात ती. आण मी निवडून देतो. तितकीच तुला मदत होईल. "

सुभाष त्याच्या धर्मपत्नीला म्हणजेच सुधाला समजावणीच्या सुरात सांगत होता.

"पुरे झाला तुमचा बायकीपणा. सतत माझ्या कामातल्या तुमच्या लुडबुडीचा कंटाळा आला मला. शेजारचे राजेश भाऊजी , माझे जिजाजी किशोरदादा यांच्याकडे पहा एकदा. त्यांनी कधीच किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवलं नाही की त्यांच्या बायकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. आणि तुम्ही मात्र सतत हे असंच कर आणि ते तसे करू नकोस म्हणून माझ्या कामात टांग अडवत असतात. माणसाने माणसासारखं वागावं जरा. कितीही वेळा समजून सांगितलं तरीही ही वाईट सवय मात्र जात नाही तुमची.  

सरला चिडून सुभाषला म्हणाली. तिची ही चिडचिड नेहमीचीच होती. तिला शांत करत सुभाष बोलू लागला ..

" अग सरला , तुला मदत व्हावी म्हणून लुडबुड करतो मी किचन मध्ये. बायकोला मदत केली , थोडी काटकसर केली तेव्हाच संसार सुखाचा होतो ग , पण माझी बाजू तू कधीच समजूनच घेत नाही. " 

" समजून घेणार पण नाही , त्यामुळे मला समजवायचा कोणताच प्रयत्न करू नका. मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. " 

एवढं बोलून सरला वैतागून तिथून निघून गेली.

सुभाष गायकवाड तालुक्याच्या ठिकाणी एका छोट्याश्या कंपनीत मार्केटिंगचे काम करणारा साधारण गृहस्थ. सुलक्षणी , गृहकृतदक्ष पत्नी सरला, ध्रुव आणि अन्वी अशी दोन गोंडस मुले आणि सुभाषचे आईबाबा असा त्यांचा सुखी परिवार. पैसे कमी असतील ही पण घरातल्या प्रत्येक सदस्यांचे एकमेकांवर निकोप प्रेम.

एकमेकांच्या सोबतीने , सल्ला मसलत करूनच घरातील प्रत्येक निर्णय घेतले जात असत. प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी एकमेकांची साथ होती. या पेक्षा वेगळं सुख म्हणजेच नेमकं काय असतं ..? घरातील सदस्यांचं प्रेम , आपुलकी , माया हाच खरा स्वर्ग ...!  

सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतांना आपण कुठेही कमी पडू नये असं सुभाषला वाटत असे म्हणून जास्त पैसा कमविण्यासाठी त्याने बाहेर फिरस्तीचा मार्केटिंगचा जॉब पकडला होता.

आठवडाभर घराबाहेर राहून जेव्हा तो एक दिवस घरी येत असे तेव्हा घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची कळी फुलून येत असे.सुभाषचे आईबाबा होते तोवर त्याला सरला आणि मुलांची चिंता नव्हती पण हृदयविकाराच्या झटक्याने सुभाषची आई देवाघरी गेली. त्यांच्या अचानक जाण्याचा ताण त्याचे बाबा सहन करू शकले नाही आणि एक वर्षातच तेही स्वर्गवासी झाले. आईबाबांविना सुभाष पोरका झाला.

सुभाषचे बाबा सरकारी नोकरीत होते त्यामुळे त्यांना थोडीफार पेन्शन मिळायची. त्यामुळे थोडा का असेना सुभाषला थोडा आधार मिळत होता. पण बाबा गेले आणि सुभाषच्या तुटपुंज्या पगारात भागेनासं झालं.

काही काळानंतर सुभाषला जवळच्या मोठ्या शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या नोकरीची संधी चालून आली. सुभाष ध्रुव ,अन्वी आणि सरलाला घेऊन नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झाला. शहरामध्ये स्वतःचे बस्तान बसवतांना सुभाषला अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र त्याच्या मेहनतीमुळे आणि पैश्यांच्या काटकसरीमुळे तो यशस्वी झाला. पैशाची काटकसर म्हणण्यापेक्षा पैश्याचा योग्य वापर करणं यालाच काटकसर म्हणणं जास्त योग्य ठरतं असं माझं वैयक्तिक मत आहे.

सुभाष शहरात आला तरीही त्याचा साधेपणा कायम तसाच राहिला पण सरला मात्र बदलली. शहरातील शानशौकीने तिला बदललं. तिला अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या. त्यात तिची शेजारीण मेघा आणि सरलाची चुलत बहिण नेहा दोघीही तिच्या खास होत्या. त्या दोघींच्या प्रत्येक गोष्टीचा, लाईफस्टाईलचा सरलाला हेवा होता पण सरलाचा प्रत्येक हट्ट पुरवणं सुभाषला अशक्य होतं.

मेघा आणि नेहाच्या किट्टी पार्टीज , वेगवेगळ्या पार्टीज नेहमी सुरु असायच्या त्यात त्या सरलाला देखील इन्व्हाईट करायच्या. त्यांच्या या वरवर दिसणाऱ्या सुखाचा सरलाला मात्र खूप हेवा वाटायचा.

एक दिवस नेहा सहजच सरलाच्या घरी आली. त्यावेळेस सुभाष देखील घरीच होता. भाजीपाला घेऊन नुकताच तो घरी आला होता. भाजीपाल्याची स्वच्छता करण्यात आणि भाजीपाला निवडण्यात सुभाष नेहमीप्रमाणे  सरलाची मदत करत होता. नेहाने सगळं पाहिलं. सरला आणि नेहा दोघीही गप्पा मारण्यासाठी किचन मध्ये निघून गेल्या. अगदी गंभीर आवाजात नेहा सरलाला म्हणाली ..

" बापरे जिजू , घरातील बायकांची कामे पण करतात ..? आश्चर्यच आहे बाई ..! माझे हे तर अशा गोष्टी ढुंकून बघायला सुद्धा येत नाही. त्यांना वेळ पण नसतो अग ऑफिसच्या कामामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालायला. पुरुष माणसांनी अश्या बायकी गोष्टीत लक्ष घालूच नये मुळी..." 

नेहाच्या अशा बोलण्याचं सरलाला वाईट वाटलं. ती स्वतःची बाजू सावरत म्हणाली..

" अग नेहा , यांना पण नाही आवडत अशी कामे करायला पण मला मदत होते तितकीच आणि कामाचा भार हलका होतो थोडा त्यामुळे मीच त्यांना मदत करायला सांगते थोडीफार. असंपण यांनाही वेळ नसतोच त्यांच्या ऑफिसच्या कामातून. " 

" हो का ..? अग पण जिजू तुझं ऐकतात तरी. माझे हे तर अश्या बाबतीत माझं ऐकून घेणारच नाही. अर्थातच घरातल्या बाकी सगळ्या गोष्टी माझ्या मर्जीनुसारच होतात. " 

नेहा सरलाला प्रतिउत्तर करत म्हणाली.  

त्यावेळेस सरलाने सुभाषची बाजू सावरली पण त्याने केलेली मदत मात्र आता सरलाला खटकू लागली. सुभाषच्या चांगुलपणामुळेच सरला आणि सुभाषच्या नात्यात खटके उडू लागले. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. सरलाचं सुभाषसोबतचं तिरसट वागणं मात्र कमी होत नव्हतं.

काही दिवसातच सुभाषला बढती मिळाली. पगारात पण बऱ्यापैकी वाढ मिळाली. सरला आणि सुभाष खूप खुश झाले. बढती बरोबरच सुभाषच्या कामाच्या जबाबदाऱ्या देखील वाढीस लागल्या. सुभाषला एक आठवडा कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी जावं लागणार होतं पण त्याला सरला आणि मुलांना घरी एकटं कसं सोडावं याची चिंता होती.  

सुभाषने त्याची चिंता सरलाला सांगितली. सरलाने आठवडाभर नेहाकडे जायचा तिचा विचार बोलून दाखवला. सुभाषची चिंता मिटली. सरलाने नेहाला फोन करूनच तिच्या येण्याबद्दल कळवलं. नेहाने लगेचच होकार कळवला. नेहासोबत खूप गप्पा करता येतील म्हणून सरला खुश झाली आणि नेहा मावशीच्या मुलांसोबत खूप दंगामस्ती करता येईल म्हणून ध्रुव आणि अन्वी दोघेही खुश झाले.

ठरलेल्या दिवशी सुभाष सरला आणि मुलांना नेहाच्या घराजवळ ड्रॉप करून तिथूनच ऑफिसला निघून गेला. तिथून त्याच्या बॉस सोबतच तो टूरला जायला निघणार होता. मुलांना घेऊन सरला नेहाच्या घरी पोहोचली. बराच वेळ सरला बेल वाजवत होती. खूप उशिराने नेहाच्या नवऱ्याने दरवाजा उघडला. तो झोपेतच होता. सरलाने त्याला नेहा कुठे आहे..? म्हणून विचारणा  केली. त्याने नेहा बेडरूम मध्ये झोपली आहे म्हणून सांगितलं.

सरला नेहाच्या रूममध्ये गेली. नेहा खूप गाढ झोपली होती. तिला उठवण्यासाठी सरलाने तिला हात लावला तर सरलाला जोरात चटका लागला. नेहाचं अंग फणफणात तापलं होतं. सरलाने नेहाला उठून बसवलं. तिच्याकडून उठलं जात नव्हतं. 

" नेहा , अग अंग किती तापलंय. डॉक्टरकडे जाऊन आली की नाही ..? " 

सरला नेहाला काळजीच्या सुरात म्हणाली.

" अग नाही , माझ्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून औषधं विचारली मी. यांना फोन पण केला होता काल रात्री ऑफिस मधून येतांना औषधं आणा म्हणून पण ते विसरले असतील. कामाने थकले असतील म्हणून मीच सकाळी उठवलं नाही त्यांना." नेहा

" अग काय उठवलं नाहीस...?   एखाद्या दिवशी झोप झाली नाही तर काही बिघडत नाही. चल दाखव प्रिस्क्रिप्शन. मी जिजुंना सांगते औषधं आणायला. तोवर मी काहीतरी खायला बनवते तुला. खाऊन घे, मग औषधं घे आणि आराम कर. आता आठवडाभर मी आहे तर स्वयंपाकाची काळजी करू नकोस. "  

सरला नेहाला समजावणीच्या सुरात म्हणाली. सरला प्रिस्क्रिप्शन घेऊन नेहाच्या नवर्याकडे जाणार तितक्याच नेहानं तिला अडवलं आणि म्हणाली..

" सरला ,अग नको. त्यांना औषधं आणायला नको पाठवू. रात्री नाईटशिफ्ट आहे आज त्यांची. झोप अपूर्ण राहिली तर उगाचच चिडचिड करतील ते. राहू दे औषधं आणायची. थोडा आराम केला की बरं वाटेल मला. "  

" अग पण त्यांच्या झोपेपेक्षा तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे ना नेहा. काही होत नाही एक दिवस झोप नाही झाली तर." सरला चिडून नेहाला म्हणाली.

" नाही नको ग सरला. प्लीज हट्ट करू नकोस. तुझ्यासमोर ते काहीच बोलणार नाहीत पण नंतर मात्र मला बोलणं खावं लागेल. तू नको काळजी करू. थोडा आराम केला की मी होईल बरी. " 

नेहा गंभीरपणे सरलाला म्हणाली.

तिच्या बोलण्यामुळे सरला थोडी विचलित झाली पण लगेचच स्वतःला सावरत ती नेहाला म्हणाली..

" ठीक आहे , मी जिजुंना नाही सांगत. मी स्वतःच जाते आणि तुझी औषधं आणते. आता मात्र मला अडवू नकोस. मी पटकन औषधं आणते. लगेच काहीतरी खायला बनवते. तू फक्त आराम कर. "  

एवढं बोलून सरला निघून गेली पण जाताना मात्र तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सुभाषने तिची केलेली काळजी , ती आजारी असताना तर तो रात्रभर तिच्या उशाशी बसून असायचा, रोजच्या कामात देखील तिची मदत करायचा. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून पुढे जात होत्या.  

आपण दिखाव्याच्या प्रेमाला प्रेम समजून सुभाषच्या निर्मळ प्रेमाचा ,त्याच्या खऱ्या भावनांचा अपमान केला याचं सरलाला खूप जास्त वाईट वाटत होतं. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. 

विचार करत करत ती मेडिकल मध्ये पोहोचली. तिने औषधं घेतली. घरी येऊन स्वयंपाक केला. नेहा औषध घेऊन झोपली. तीन दिवस नेहाची सरलाने खूप काळजी घेतली. पण या परिस्थितीतही नेहाच्या नवऱ्याने मात्र तिची फारशी चौकशी केली नाही. नेहा ठणठणीत बरी झाली. सुभाषचं काम देखील संपत आलं. तो घरी येणार म्हणून सरला घरी जायला निघाली. जाताना नेहाला म्हणाली..

" नेहा , तुला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज गैरसमज करू नकोस आणि माझा रागही मानू नकोस. पण एक दिवस ध्रुवच्या बाबांना तू बोलली होतीस की ते बायकी कामे करतात पण ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम होतं. त्यावेळेस मी तुझ्या बोलण्यात येऊन त्यांचा अपमान केला पण मी खूप चुकीची होती. एखाद्याच्या बाह्य स्वरूपावर कोणालाही जज करणं खूप चुकीचं आहे. "  

ऐवढ बोलून सरला निघून गेली. त्यावेळेस नेहाच्या  देखील डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. सरला घरी आली. तिने घर आवरून स्वच्छ केले. छान स्वयंपाक केला. सगळे पदार्थ सुभाषच्या आवडीचे होते. सुभाषला यायला उशीर होणार होता म्हणून मुले जेवण करून झोपी गेली.  

सरला मात्र सुभाषसाठी जेवायची थांबली. सुभाष घरी आला. दोघांनीही सोबत जेवण केले आणि जेवण्याच्या सगळ्या सामानाची आवराआवर करायला सुभाष सरलाला मदत करू लागला. सरलाने सुभाषकडे पाहिलं, तो थांबला आणि बोलू लागला..

" आय एम सॉरी सरला, माझी तुझ्या कामात केलेली लुडबुड तुला आवडत नाही ना सॉरी.., पण तुला एकटीला काम करतांना पाहिलं की मला राहवत नाही. "  

सुभाषकडे पाहून स्मितहास्य करत सरला बोलू लागली...

" कोण म्हणतं तुमची माझ्या कामात केलेली लुडबुड मला आवडत नाही ..? मला तर तुमची ती माझ्याविषयीची काळजी ,प्रेम सगळं काही खूप आवडतं. " 

" मला माफ करा , माझं चुकलं. तुमच्या माझ्याविषयीच्या प्रेमाला मी लुडबुड समजले. लोकांच्या दिखाव्याच्या प्रेमाला भुलून मी तुम्हाला चुकीचं ठरवलं. खरंच मी तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाहीये. "  

इतकं बोलून सरला रडू लागली. सुभाष तिला सावरत म्हणाला ...

" अग तुझं प्रेम होतं माझ्यावर म्हणूनच तर हक्काने रागवायची तू मला. मला तुझा कधीच राग आला नाही त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच कुठे येतो ..? रडूबाई...मला तुला असं रडताना बघायचं नाही. चल हस पाहू मस्त पैकी...स्माईल प्लिज ..." 

सुभाषच्या बोलण्यावर सरला त्याला जाऊन बिलगली. दोघंही एकमेकांच्या मिठीत सामावले होते आणि मनातल्या भावना फक्त एकच गाणं गुणगुणत होत्या...

" तेरा साथ है कितना प्यारा ..

  कम लगता है जीवन सारा...

  तेरे मिलन की लगन मे...

  हमे आना पडेगा दुनिया मे दोबारा...! " 

समाप्त...!

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google/Pinterest 






 










Post a Comment

0 Comments