गुपित सुखी संसाराचं...

 गुपित सुखी संसाराचं...

©️जया पाटील


" अनुराग , किती वेळा सांगितलं आहे तुला ,  अंघोळ केल्यावर ओला टॉवेल बेडवर ठेवत जाऊ नकोस. बेडशीट ओलसर होते , रूम मध्ये पण कुदट वास येतो पण तुझं मात्र नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी असतं."

"तू ऑफिसला जातोस तर मी पण ऑफिसला जातेच ना. घरी येऊन तुला आयतं जेवायला तरी मिळतं पण मला तर तितकाही आराम नाही. त्यात तुझा असा बेशिस्तपणा. खूप राग येतो मला तुझा. स्वतःची एक गोष्ट कधी जागेवर ठेवत नाही."

"सकाळचा चहा ,नाश्ता ,ऑफिसचा डबा ,रात्रीचं जेवण ,निहालची कामं , त्यात ऑफिसची कामं , डेडलाईन्स. किती लोड असतो माझ्यावर पण तुला त्याचं काहीच नाही. तुला कधीही मला समजून घ्यायचं नसतं त्यामुळेच असा वागतोस तू नेहमीचं. "

"माझी कलीग प्रीतीचा नवरा किती मदत करतो तिला. नेहमीचं कौतुक करत असते ती त्याचं.
 

कामवाली बाई आली नाही तर सगळं काम तोच स्वतः करतो आणि प्रितीला आराम देतो. इथे मात्र तू आणि निहाल दोघांनीही मिळून फक्त त्रास द्यायचा ठरवलं आहे मला.ऑफिसला गेले की तिथलं टेन्शन आणि घरी आली की इथलं टेन्शन. कुठेच शांतता नाही. असं वाटत कुठंतरी निघून जावं जिथं मनशांती मिळेल मला..."
 

भाग्यश्रीची नेहमीप्रमाणे अनुरागवर चिडचिड सुरु होती. त्यातल्या त्यात नेहमीसारखंच अनुराग तिला प्रतिउत्तर करत नव्हता त्यामुळे ती आणखीनचं चिडली.

"आता मी इतकं बोलते आहे त्यावर काही उत्तर देणार आहेस की नाही..? फक्त एकटीनेच बडबड करायला मी मूर्ख आहे का..? तुला काही बोलून कसला उपयोगच नाही. मला ऑफिसला ड्रॉप करतोस की जाऊ मी...? "
 

" अग भाग्यश्री , तू काही बोलू देशील तर बोलेन ना मी ..! आज मला क्लायंट कॉल आहे बाहेर , तर ऑफिसला उशिराने जाईल मी. त्यामुळे प्लीज आजच्या दिवस तुझी तू जा ना. नाहीतर माझ्यामुळे तुला उगाचचं उशीर होईल." 

अनुराग चाचरत भाग्यश्रीला म्हणाला आणि तिला ऑफिसला सोडायला अनुरागने दिलेला नकार ऐकून तिला आणखीनच राग आला आणि तावातावात ती तिथून निघून गेली.
 

भाग्यश्री देशमाने - एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी ,अतिशय फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी. एका मोठ्या कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारी ...

करियर बाबतीत अतिशय फोकस्ड आणि करियर ओरिएंटेड असल्यामुळे प्रोमोशनच्या स्वरूपात ती तिच्या करियर मध्ये सतत यशस्वी होत होती. 

तीचं स्वप्न म्हणजे सतत पुढं जाण्याचं , यशाचं नवीन क्षितिज गाठण्याचं ...!

त्यातच तिची भेट तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या अनुराग सोबत झाली. प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने भेटी वाढल्या. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाचा विषय सुरु होता. भाग्यश्री आणि अनुरागने आपापल्या घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. दोघांच्याही कुटुंबियांनी एकमेकांची भेट घेतली.

दोघेही समवयस्क, हुशार त्यामुळेच घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेचच होकार मिळाला. दोघांचंही लग्न थाटामाटात पार पडलं. माप ओलांडून भाग्यश्री अनुरागच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतांनाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. अनुराग आणि भाग्यश्रीचा संसार अगदी सुखात सुरु होता. लग्नानंतरचे मोहरलेले दिवस आनंदात संपत होते. रात्र संपूच नये असे दोघांनाही वाटत होतं.
 

लग्नानंतर काही काळ अनुराग आणि भाग्यश्री  दोघांचंही ऑफिस अगदी सुरळीत चालू होतं. त्याच वेळेस भाग्यश्रीने गोड बातमी दिली. भाग्यश्री आई होणार होती. त्यामुळे ती खूप खुश होती. एक वेगळंच तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. ऑफिस आणि घरची कामे सगळं अगदीच व्यवस्थित मॅनेज केले होतं भाग्यश्रीने.... !

भाग्यश्रीला नऊवा महिना सुरु झाला. तिचं डोहाळेजेवण देखील खूप थाटामाटात पार पडलं. पूर्ण दिवस भरले आणि एक दिवस तिला बाळंतकळा सुरु झाल्या. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
 

गोविंद घ्या अन गोपाळ घ्या असं म्हणत सगळ्या सवाष्णींनी झोपाळा झुलवला. बाळाच्या आत्याने त्याच्या कानात " निहाल "  म्हटलं आणि हुर्रर्र ....असं करून त्याचे कान फुंकले. 

निहालच्या येण्याने भाग्यश्री आणि अनुरागचा संसार पूर्ण झाला होता. छोट्या निहालच्या बाललीलांमुळे भाग्यश्रीचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासं झालं. त्याचं गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात  खेळण्यांच्या पसारा करणं, कारणाशिवाय त्याचं  रुसुन बसणं या सगळ्यात भाग्यश्रीचा वेळ कुठं जात असे ते तिलादेखील समजत नसे.

नोकरी करून छोट्या निहालचा सांभाळ देखील ती उत्तम प्रकारे करत होती पण काही दिवसातच तिला प्रमोशन मिळालं आणि तिच्या जबाबदाऱ्या वाढीस लागल्या. अनुरागनेही जॉब चेंज केला आणि त्यालाही कंपनीच्या कामानिमित्त बरेचदा बाहेरगावी जावे लागत असे. अनुरागच्या आईबाबांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनाही निहालचा सांभाळ करण्यासाठी शहरात येणं शक्य नव्हतं.

कामाच्या या व्यापामुळे भाग्यश्रीची चिडचिड वाढली. अनुरागसोबत तिची रोजच कुरबुर होऊ लागली. अनुराग आणि भाग्यश्रीचा खरं तर प्रेमविवाह. दोघंही आधीपासूनच एकमेकांना ओळखून होते पण दोघांच्याही स्वभावात मात्र जमीन आसमानाचा फरक होता. 

भाग्यश्री प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी धडपडणारी ,अत्यंत महत्वाकांक्षी , अनुरागवर खूप प्रेम करणारी आणि तितकीच रागावणारी ,चिडणारी.कधी कधी छोट्याश्या गोष्टीसाठी हट्टाला पेटणारी....!

त्याउलट अनुरागचा स्वभाव अगदी शांत ,निर्मळ आणि कधीही कुठल्याच कारणासाठी न चिडणारा. कोणावरही राग न करणारा असा. त्याचा ह्या शांत स्वभावाचा भाग्यश्रीला नेहमीचं राग यायचा. ऑफिस आणि इतर कोणाचाही राग आला की तो सगळा राग ती अनुरागवर काढायची पण नेहमीप्रमाणे अनुराग ऐकून घ्यायचा आणि वादाला पूर्णविराम मिळायचा.
q

आजही बेडवर ओला टॉवेल ठेवण्याचं निम्मित होऊन भाग्यश्री अनुरागवर चिडून ऑफिसला निघून गेली. ती ऑफिसला पोहोचली पण तिला नेमका थोडा उशीर झाला. आज तिच्या बॉसचा मूड पण थोडा उखडलेलाच होता. तिला उशीरा आलेलं पाहून त्याने तिला लगेचच कॅबिन मध्ये बोलावलं. आज आपली खैर नाही म्हणून भाग्यश्री कॅबिन मध्ये गेली.

" मे आय कम इन सर ..? "
 

" येस " 

" तुम्ही बोलावलं सर ..? काही काम होतं का ..? 

" येस , मिसेस भाग्यश्री.. ऑफिसला उशिरा येण्याबद्दल तुमचा सत्कार करावा असा विचार करत होतो मी. छान कल्पना आहे नाही..? " 

" आय एम रियली व्हेरी व्हेरी सॉरी सर. मला यायला उशीर झाला त्याबद्दल. माझा मुलगा लहान आहे त्यामुळे थोडा उशीर झाला सर.. "
 

" ओह , मग ऑफिसला यायचंच कशाला ..? मुलाला सांभाळत घरी बसायचं मिसेस भाग्यश्री. महिन्यात तिसऱ्यांदा उशीरा आल्या आहेत तुम्ही. कंपनी तुम्हाला काम करण्याचा पगार देते. कामचुकारपणा करण्याचा नाही.  " 

" सर , खरंच चूक झाली यापुढे काळजी घेईल. " 

" हो आणि तुम्ही काळजी घेतली नाहीतर तरी यापुढे उशीर झाला तर तुम्हाला डिसमिस करण्याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ हे मात्र नक्की. "

" मेहता ग्रुपच्या प्रोजेक्टवर आपण जे काम करतो आहे त्याचे प्रेझेंटेशन आहे परवा. ते रेडी आहे का..? प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स दाखवा मला आताच्या आता..." 

"बट सर ,मेहताग्रुप सोबतची मिटिंग तर पुढच्या आठवड्यात लैंडअप होती ना ...? अचानक एक वीक प्रिपॉन्ड कशी झाली..? "

" बॉस कोण आहे मिसेस भाग्यश्री ..? मी की तुम्ही..? "

" तुम्ही सर ..आय एम सॉरी..."
 

" मग मी विचारलं तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. प्रेझेंटेशन रेडी आहे की नाही..? "

" नाही सर .. आय मिन मीटिंग प्रिपॉन्ड झाली याबद्दल मला माहिती नव्हतं. मी लगेच रेडी करते सर प्रेझेंटेशन.... " 

"दॅट्स बेटर. नाहीतर आज कितीही उशीर झाला तरी तुम्हाला ऑफिस मधून काम संपल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही. आजचं सगळ्या डेडलाईन्स पूर्ण व्हायला हव्या."
 

बॉसच्या केबिनमधून भाग्यश्री बाहेर आली. बॉसने तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं त्यामुळे तिची चिडचिड होत होती पण बोलणार तरी कोणाला आणि चिडणार तरी कोणावर? म्हणून ती कामाला लागली.
 

कामाचा खूप लोड होता पण आजच्या आज ते पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून भाग्यश्रीने काम करायला सुरुवात केली.  लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी ती धडपडत होती या सगळ्यात तिला दुपारचं जेवण ,चहा कसलीच आठवण राहिली नाही.

तिला दुपारपासून अनुरागचा दोनदा तीनदा फोन आला पण तिने रिसिव्ह केला नाही. तिचं काम संपत आलं आणि त्याचवेळेस अनुरागचा पुन्हा फोन आला. परत परत अनुरागचे फोन पाहून भाग्यश्रीची आणखीच चिडचिड झाली. फोन उचलून अनुराग काही बोलायच्या आतच ती चिडून अनुरागला म्हणाली...

"काय लावलं आहे अनुराग , सारखा सारखा फोन करतो आहेस. मी ऑफिसला आहे. कामात असणार तरीही परत परत फोन येतोय तुझा. बिझी असेल इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुला ..? "
 

"अग पण भाग्यश्री , आज नेहमीपेक्षा खूप उशीर झाला तरीही तू घरी आली नाहीस म्हणून फोन केला...." 

"हो मग कामात होती मी. चल ठेव आता फोन. बॉसला काम सबमिट करते आणि निघते मी." 

एवढं बोलून चिडून भाग्यश्रीने फोन ठेवला. सगळं काम संपवून ती घरी जायला निघाली. अनुराग आधीच घरी पोहोचला होता. भाग्यश्री घरी आली. तिच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता. येताच तिला अनुरागने पाणी आणलं.

"खूप थकली का ग भाग्यश्री...? थांब मी तुला मस्त पैकी कडक चहा करून आणतो. आणि हो निहाल जेवण करून झोपला आहे. शेजारच्या काकूंनी साधी खिचडी दिली होती. त्याला खिचडी खाऊ घालून झोपवलं आहे मी. आपल्यासाठी पण डिनर बाहेरूनच मागवलं आहे. येईलच पार्सल इतक्यात. मग सोबतचं जेवायला बसू. तू फ्रेश हो. मी तितक्याच चहा आणतो. "
 

इतकं सांगून अनुराग चहा बनवायला निघून गेला. किचन मध्ये चहा बनवत उभ्या असलेल्या पाठमोर्या अनुरागकडे भाग्यश्री पाहत होती. दुपारचं बॉसचं बोलणं तिच्या डोळ्यासमोरून सरकत होतं. बॉस आपल्याला इतका बोलला तरीही आपण त्याला प्रतिउत्तर देऊ शकलो नाही आणि अनुराग , तो तर किती प्रेम करतो आपल्यावर. तरी मी नेहमीच चिडचिड करते त्याच्यावर. आज भाग्यश्रीला स्वतःच्या वागण्याचा खूप राग येत होता. तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. तितक्यात अनुराग चहा घेऊन बाहेर आला. भाग्यश्रीचे पाणावलेले डोळे पाहून तो व्यथित झाला आणि बोलू लागला ..

" काय झालं भाग्यश्री.. ? अग रडते का आहेस..? काही टेन्शन आहे का ..? सांग मला..." 

अनुरागचं बोलणं ऐकून भाग्यश्रीला आणखीनच रडू आलं. तिने अनुरागच्या जवळ जात त्याला घट्ट मिठी मारली आणि बोलू लागली...

" आय एम सॉरी अनुराग. मी खूप वाईट बायको आहे ना..? नेहमी तुझ्यावर ओरडते , चिडचिड करते , तुझ्यावर राग काढते. पण तू , तू मात्र सगळं शांतपणे सहन करतोस. आज जेव्हा बॉस मला ओरडत होता तेव्हा मला त्याचा खूप राग येत होता , पण मी त्याला काहीच बोलू शकले नाही.
मला खूप वाईट वाटलं. मी तर तुझ्यासोबत नेहमीच असं वागते. तुला किती वाईट वाटत असेल ना ..? तुला खूप राग येत असेल ना माझा.. ? प्लीज माफ कर मला. आय एम रियली सॉरी. " 

हे सगळं बोलतांना भाग्यश्रीला आणखीनच रडू कोसळलं. अनुराग तिच्या पाठीवर हात थोपटत तिला म्हणाला...

" ऐ वेडाबाई , रडतेस का ..? अग आपण ज्या माणसावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याच्यावरचं सगळ्यात जास्त राग करतो कारण ती व्यक्ती आपल्या हक्काची असते. आपली जवळची असते. तुझ्या वागण्याचा मला कधीच राग येत नाही. संसारात पतिपत्नी मध्ये छोटेमोठे वाद होतात पण एकाने माघार घेतली ना की मग ती नाती टिकतात , फुलतात. दोघांनीही संसारात टोकाची भूमिका घेतली तर नाती तुटतात. त्यामुळे संसारात एकाला राग आला तर एकाने माघार घ्यायलाच हवी. त्यामुळे तर संसार सुखाचा होतो. तेच तर गुपित आहे सुखी संसाराचं.....! जे प्रत्येक जोडप्यानं अमलात आणायला हवं तरच सगळे संसार आनंदाने उभे राहतील.  

समाप्त...!

✍©️ जया पाटील

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

Post a Comment

0 Comments