सूनाचंच कौतुक फक्त
© Velvet Kavisha ✍️
सुवर्णा ताईंना मोठ्या दोन सूना. अगदी त्यांच्या तोलामोलाच्या. त्यांची एकुलती एक लेक शुभा. तिला पाटलांच्या घरी दिलेली. पाटील मंडळी मोहित्यांपेक्षा सगळ्याच बाबतीत वरचढ होती.
सुवर्णा ताईंचा धाकटा सौरभ आणि उर्मिला एकाच कॉलेजमध्ये. तिथेच ओळख झाली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात सौरभने उर्मिलाला प्रपोज केलं आणि उर्मिलाने "हो" म्हटलं. दोघेही Bsc IT करून नोकरीला लागले. सौरभ शेंडेफळ. त्याने उर्मिलाबद्दल सांगताच सुवर्णाताईंनी तिची माहिती काढून लग्नाला होकार दिला. सौरभबद्दल कळताच उर्मिलाच्या आई वडिलांनी काही आढेवेढे घेतले नाहीत.
मोहित्यांकडे जून्या चालीरीती, रुढी परंपराचा पगडा होता. उर्मिला सहीत तिन्ही सूना सगळं सांभाळत होत्या. मिस्टर वारल्यानंतर सुवर्णाताईंनी एकहाती सगळं सांभाळलं होतं.
तीन मुलगे, तीन सूना आणि पाच नातवंडं यांच्यासहित सुवर्णाताई गुण्यागोविंदाने एकत्र राहत होत्या. घरचा बिझनेस मोठा मुलगा सांभाळत होता. तर मधला आणि सौरभ नोकरी करत होते.
मोठ्या सूनबाईंचं पार्लर होतं आणि दुसऱ्या सूनबाई क्लासेस घ्यायच्या. उर्मिलाने मात्र लग्नाआधीची नोकरी कंटिन्यू केली.
घरात पैशांची आवक चांगली होती. तिन्ही सूना आपापल्यापरीने सगळं सांभाळत होत्या. घरातली कामं वाढू लागली. सगळ्यांचीच धावपळ होतं होती. तशी सुवर्णाताईंनी प्रत्येकाकडून महिन्यांचं समान कॉन्ट्रिब्युशन घेऊन घरातल्या कामासाठी दिवसभर थांबतील अशा दोन मदतनीस ठेवल्या.
तिन्ही सुनांना समोर बसवून त्यांच्या वेळेनुसार कोणाला कोणतं काम जमेल ते विचारून घेतले. त्याप्रमाणे मदतनीस बाईंना ही कामे वाटून दिली. मुलाबाळांच्या शाळा, घरातील एवढ्या माणसांचा स्वयंपाक, वरची कामं, बाजारहाट याची योग्य सांगड घालून दिली होती.
सुवर्णा ताईंची लेक शुभा माहेरपणासाठी आठ दिवस राहायला आली. सुवर्णा ताईंनी सूनांना दिलेली सूट पाहून स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागली. "आपली आई सासू असूनही सुनांसाठी किती करते..!! नाहीतर पाटलांच्या घरी सासूबाईंचा किती तोरा. सगळं मान खाली घालून करावं लागतं. एका निर्णयाचं ही स्वातंत्र्य नाही आपल्याला. किती भाग्यवान आहेत तिन्ही वहिनी. यांना आईसारखी सासू मिळाली. पण काय माहिती, सध्या आई सगळ्यांचं करते म्हणून चांगल्या वागत असतील. उद्या आईच्याने काही होईनासं झालं तर या सांभाळणार आहेत का??"
तिच्या मनात विचार आला.
"आई, तू इतकं करतेस घरासाठी. सुनांना इतकी मोकळीक दिलीस. उद्या तू होईनासं झालं की, या करतील का तुझ्यासाठी सगळं...??" शुभाने सुवर्णा ताईंना विचारलं.
"हे बघ शुभा, सूना शोधताना त्या शिकल्या सवरलेल्या असाव्यात असं आपणच सांगतो ना..?? मग त्यांच्या शिक्षणाला योग्य न्याय नको का मिळायला?? फक्त स्वयंपाक आणि घरकाम करण्यासाठी शिक्षण कशाला हवं होतं?? ते काय मदतनीस ही करतात. आई-वडील किती हौसेने शिकवतात मुलींना. आयुष्याची पंधरा सोळा वर्षे शिक्षणासाठी देतो ना आपण?? त्याचा उपयोग काय?? तिघी आपापल्या व्यवसायात, नोकरीत आनंदात आहेत. चेहऱ्यावर आनंद असतो त्यांच्या. दुसऱ्यांच्या लेकी आपल्या घरात आनंदात आहेत हेच बरोबर नाही का?? मला होतंय तोवर मी करणार आहे. आणि मला खात्री आहे, जेव्हा माझ्याने काही होणार नाही तेव्हा या तिघी हे घर नीट सांभाळतील. माझी ही काळजी घेतील." सुवर्णा ताई खूप विश्वासाने बोलत होत्या.
"आई, तुला फारच कौतुक आहे सुनांचं...!! तू म्हणतेस तसंच होऊ दे गं. मी ही अशी पाटलांची सून. उद्या तुला गरज असेल तेव्हा ही पाहुण्यांसारखीच येईन कदाचित."
" तुझ्या घरात पाहिलं ना तेव्हाच ठरवलं आपल्या सूनांना सासूरवास व्हायला नको आपल्याकडून. दोन पिढ्यांमध्ये असलेल्या अंतरामुळे एखाद्या गोष्टीवर मतभेद होतातच की आमचे ही. पण कधी त्या समजून घेतात तर कधी मी. तुझे भाऊ आज आनंदी दिसताहेत ना.., तो आनंद कशामुळे आहे माहिती आहे का?? कारण या घरातल्या सूना सुखी आहेत. नको काळजी करुस शुभा, माझ्या बाबतीत म्हणशील तर मी चांगलंच पेरलंय तर चांगलंच उगवेल याची पूर्ण खात्री आहे मला." सुवर्णा ताईंनी सांगितलं.
"हो आई...."
आठ दिवस राहून शुभा सासरी गेली.
सुवर्णाताईंनी सूनांच्या संसाराची घडीच बसवली होती जणू. सूना ही खुश होत्या. एकतर त्यांना सगळं त्यांच्या मनासारखं काम करता येत होतं. आणि दुसरं म्हणजे मदतनीस ठेवल्यामुळे घरची कामं बिनदिक्कत होतं होती. स्वयंपाक मात्र तिघी मिळून करत. अगदी आनंदाने, हसत खेळत. सणासुदीला सगळे घरी असत. बायका संतुष्ट त्यामुळे पुरुष ही खुश. घरच्या भांडणाचा ताण नाही. भावाभावांमधलं सख्य तसेच अबाधित राहिलेलं.
मुलाबाळांनी भरलेलं गोकुळ होतं मोहित्यांचं घर. सगळं सुरळीत सुरू असताना एका सकाळी सुवर्णाताईंना हार्ट ॲटॅक आला. एकच गोंधळ आणि धावपळ झाली. मोठ्या मुलाने आईला उचलून घेतलं दुसऱ्याने गाडी काढली. लगेच हॉस्पिटल गाठलं. रितसर रिपोर्ट्स झाले. दोन ब्लाॅकेज. ॲंजोप्लास्टी की ओपन हार्ट सर्जरी?? डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता.
मोठ्या सूनेने आपलं पार्लर एका ब्युटिशियनला चालवायला देऊन घराची जबाबदारी घेतली होती. परीक्षा जवळ असल्याने दुसऱ्या सुनबाईंना क्लासमध्ये जावंच लागत होतं. तरीही सकाळी लवकर उठून आवरून हॉस्पिटलमध्ये डबा पोचवायचा आणि सुवर्णाताईंना खाऊ घालायची जबाबदारी तिने घेतली होती. उर्मिलाने सरळ सुट्टी टाकून मुलांची जबाबदारी घेतली.
कोणत्याही परिस्थितीत सासुबाई घरी आल्यानंतर त्यांना घराचे दशावतार झाले असं वाटता कामा नये यासाठी तिघी झटत होत्या. मोठ्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. काळजी घ्यायला हवी. या घराला गरज आहे त्यांची. आणि आता त्यांना आपली. तिन्ही जावांनी आपापसात ठरवून घेतलं.
ऑपरेशन यशस्वी होऊन सुवर्णाताई दहा दिवसांनी घरी आल्या. घरातील व्यवस्था बघून समाधान पावल्या. तिघींना एकमेकांच्या सल्ल्याने, विचाराने वागताना पाहून बरं वाटलं.
पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा तिघी ही सुवर्णा ताईंच्या बेडरुममध्ये जमल्या. सुवर्णा ताईंना कळतं नव्हतं यांना काय बोलायचं आहे. तसं तर त्या घरी आल्यापासून सगळी व्यवस्था चोख होती.
"काय गं..?? आज अगदी तिघी एकदम आलात?" सुवर्णा ताईंनी विचारलं.
"काही नाही आई, आता आम्ही तिघींनी घर सांभाळायचं ठरवलंय. तुम्हांला आता विश्रांतीची गरज आहे. आजवर तुम्ही सगळं सांभाळून घेतलंय म्हणून आमचे छंद जोपासू शकलो. स्वतःचे काही करू शकलो. पण आता ते समाधान मिळालंय आम्हांला. मुलं ही बऱ्यापैकी मोठी झाली आमची. आम्ही तिघींनी जे काही ठरवलं त्यावर तुमचं मत विचारायला आलोय." मोठ्या सुनबाईंनी सांगितलं तशी बाकीच्या दोघींनी मान डोलावली.
"हं बोला..!! काय ठरवलंय तुम्ही तिघींनी...??" सुवर्णा ताईंनी विचारलं.
" आई, आतापर्यंत तुम्ही सगळं केलंत घर सांभाळलंत म्हणून आम्ही आमची कामं करु शकलो. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. तेव्हा मी ठरवलं की, मी दुपारनंतर दोन तास पार्लरला जाईन. सध्या जी ब्युटिशियन पार्लर सांभाळतेय. तिच्यासोबत अजून एक असिस्टंट देते. तिला पगार देता येईल. थोडे पैसे कमी येतील पण घरात लक्ष देता येईल." मोठ्या सूनेने सांगितलं.
"मी सकाळी सातला जाऊन दोन वाजता घरी येईन. दुपारनंतरच्या बॅचेस माझ्यासोबतच्या दोघी सांभाळतील. मी दुपारनंतर घरी थांबेन. म्हणजे ताई नसतील तेव्हा मी घरी असेन." दुसरीने सांगितले.
"हं.. आणि उर्मिला तुझं काय..??" सुवर्णा ताईंनी विचारलं.
"आई, या दोघींच्या सल्ल्यानुसार मी जॉब कंटिन्यू करेन . मला शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा पुर्ण दोन दिवस मी घराकडे लक्ष देईन. कधी लागलीच तर सुट्टी घेता येईल. मदतनीस ज्या आहेत त्या राहतीलच. माझा पगार जास्त येतोय तर मदतनीस बायांना द्यायच्या कॉन्ट्रीमध्ये माझं पर्सेंटेज पन्नास टक्के राहील. उरलेलं ह्या दोघी देतील." उर्मिलाने सांगितलं.
"आई, आम्ही उर्मिलाला नोकरी सोडू नकोस असं सांगितलं आहे. हे आम्ही ठरवलंय तरी यावर तुमचं मत काय आहे..??" मोठ्या सूनबाईंनी विचारलं.
"आजवर मी तुम्हांला मार्गदर्शन करत आले. तुम्हां तिघींना तुमच्या मनासारखं वागू दिलं. नातेवाईक शेजारीपाजारी सगळ्यांनी म्हटलं, की सूनांना फार सूट देऊ नका. डोक्यावर बसतील. मी जे वागतेय करतेय त्याने मला आनंद, समाधान मिळतं होतं. माझी चिडचिड होतं नव्हती. याचा अर्थ मी योग्य तेच करत होते. मला विश्वास होता. मी जे पेरतेय ते उत्तमच पेरतेय. त्यामुळे उगवेल ते ही उत्तम असेल.आज तुम्ही तिघींनी एक विचाराने सगळं छान ठरवलंत. जसा मी तुमचा विचार केला तसा तुम्ही माझा विचार केलात. खुप भरून पावले. पैशाला महत्त्व न देता व्यक्तीला, माणसाला महत्त्व दिलंत आणि दाखवून दिलंत की माझ्या सूना गुणाच्या आहेत. उगाच नाही कौतूक करत मी त्यांचं..!!" म्हणत सुवर्णा ताईंनी मोठ्या सूनेच्या डोक्यावरून हात फिरवला. बाकीच्या दोघींच्या पाठीवरून हात फिरवला.
"अशाच नांदा सुखाने. एका विचाराने. एक उदाहरण आहोत आपण एकत्र कुटुंबाचं. जसं मला कौतुक आहे तुमचं तसंच सगळ्यांना वाटू दे." सुवर्णा ताई म्हणाल्या.
"आई, तुला फक्त तुझ्या सुनांचंच कौतुक. लेकीचं नाही." हॉस्पिटलमध्ये दोन वेळा येऊन भेटून गेलेली शुभा आईच्या रुममध्ये येत म्हणाली.
"ताईऽ ऽ या ना. अचानक आलात.??" मोठीने विचारलं.
"अगं ती पहायला आलीय न कळवता, आपल्या वहिन्या आईला नीट सांभाळतात की नाही ते...! सुवर्णा ताईंनी म्हटलं तसं सगळ्यांनाच हसू आलं.
"काय आई तू पण" आईला मिठी मारत शुभा म्हणाली.
"शुभा आपल्या माणसांचं कौतुक आपणच करायचं असतं गं..!!" लेकीला मिठीत घेत सुवर्णा ताई म्हणाल्या.
समाप्त
© Velvet Kavisha ✍️
1 Comments
very nice
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box