आणि पाडवा गोड झाला भाग १


आणि पाडवा गोड झाला भाग १

लेखिका - Velvet Kavisha ✍️

भांडण तसं शुल्लक होतं. काय गरज होती एवढी मोठी ऑर्डर घ्यायची? माहिती आहे ना, दिवाळीत गावी जायचं असतं ते? तिला खुप राग आला होता त्याचा आणि त्या घुश्यात ती गावी गेली होती. 


"तो" स्वप्नील निकम आणि "ती" त्याची बायको गौरी. स्वप्नीलचा पॅकेजिंगचा बिझनेस होता. भिवंडीच्या काल्हेरमध्ये २८०० स्वे. फुटांचं स्वतःचं एक लहानसं गोडाऊन होतं. गोडाऊनच्या पोटमाळ्यावर चकाचक ऑफिस होतं बनवलं होतं. चार ऑफिस स्टाफ तर  पंचवीसेक हेल्पर होते. मार्केटिंग तो स्वतः जायचा. मागच्या वर्षी दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ठेवले होते. तेव्हापासून काम वाढलं. गौरी रोज सकाळी दहा ते सहा ऑफिस सांभाळायची. एकंदरीत बिझनेस छान चालला होता. 


दोघंही ऑफिसला गेले की, माई अप्पा मुलांना सांभाळायचे. माई अप्पांना फार काही करावं लागायचं नाही कारण घरी दिवसभरासाठी मदतनीस होती. शिवाय वरच्या कामाला एक वेगळी मदतनीस होती. 


माई अप्पा दरवर्षी गणपतीसाठी गावी जात. गणपती, पितृपक्ष, दसरा, दिवाळी करून मार्गशीर्ष एकादशीची गावची जत्रा उरकूनच पुन्हा ठाण्यात येत. 

सगळ्यांची दिवाळी मात्र श्रीवर्धनलाच साजरी होई.  धनतेरसच्या दिवशी पूजा करून, ऑफिसला पाच दिवसांची सुट्टी देऊन स्वप्नील गौरी आपल्या दोन मुलांसह श्रीवर्धनला पोचत. श्रीवर्धनला पहिली आंघोळ, दिवाळी पाडवा साजरा झाला की, गौरी भाऊबीजेसाठी मुलांना घेऊन खेर्डीला जाई. गौरीचं माहेर खेर्डीचं. तिच्या भावाचा तिथे हॉटेल व्यवसाय आहे. 


यावर्षी एक मोठी ऑर्डर मिळाली स्वप्नीलला अगदी दिवाळीच्या आधी आठ दिवस. ऑर्डरचा आवाका पाहता दोन शिफ्टमध्ये काम केलं तर धनतेरसपर्यंत काम पूर्ण होईल. म्हणजे दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी पूजा करून श्रीवर्धनला जाता येईल. स्वप्नीलने प्लॅनिंग करून कामगारांना समजावून सांगितलं. सगळी कामगार मंडळी आनंदाने तयार झाली.  सणासुदीचे चार पैसे जास्तीचे मिळणार होते त्यांना.  


कामाला युध्दपातळीवर सुरुवात झाली आणि वसूबारसच्या दिवशी त्याच कंपनीची वाढीव ऑर्डर आली. स्वप्नीलने जास्तीचे चार्जेस आकारून ऑर्डर घेतली. गौरीला मात्र राग आला. तिचं म्हणणं होतं की, नवीन ऑर्डर उगाच घेतली. दुसरीकडे स्वप्नीलचं म्हणणं ही बरोबर होतं. कंपनीला आयत्यावेळी दुसरा पॅकेजिंग एजंट मिळणं कठीण होतं. त्यामुळे आलेली ऑर्डर घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी विश्वासहर्तेचा प्रश्न होता तो. 


याच मुद्यावर मतभेद होऊन भांडण झालं होतं. चौदा वर्षांत पहिल्यांदा गौरी मुलांना घेऊन एकटीच श्रीवर्धनला पोचली होती. 


काही मोजके कामगार असल्याने स्वप्नीलला ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी भाऊबीजेचा दिवस उजाडणार होता. यावर्षी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने गडबड झाली. तरीही स्वप्नीलचा प्लॅन ठरला. पहाटे लवकर उठून गोडाऊनला जाऊन ऑर्डर लोड करता येईल. दहा वाजेपर्यंत काम संपलं की सगळ्यांना बोनस, दिवाळीची मिठाई आणि यावर्षी काहीतरी गिफ्ट देऊ. ३१ तारखेपर्यंत सुट्टी दिली की सगळे खुश. आपल्याला ही जरा माई अप्पांसोबत राहता येईल निवांत. मॅडम रागावून गेल्यात त्यांची ही समजूत काढता येईल निवांत. 

---------------------


मंगळवारी रात्री गौरीला झोप येईना. लग्नानंतरचा पहिलाच पाडवा हा असा. स्वप्नील ठाण्यात आणि ती श्रीवर्धनला. भांडून आल्यामुळे तिने श्रीवर्धनला आल्यापासून फोन ही केला नव्हता. मुलं बोलत होती. त्यांच्याकडून कळत होती स्वप्नीलची खुशाली. पण तरीही... उद्या पाडवा आहे. तो सोबत असायला हवा होता. विचारात असतानाच ती झटकन उठून बसली. तो इथे नसला तरी आपण जाऊच शकतो की! 


तिचे डोळे लकाकले. फक्त माई अप्पांना सांगायला हवं. 


मुलांच्या अंगावरची पांघरूणं नीट करून ती माईंच्या खोलीजवळ आली. दारावर हलकीच थाप मारून तिने माईंना हळू आवाजात हाक मारली. नुकताच डोळा लागत असलेल्या माई तिच्या आवाजाने घाबरून उठल्या. त्यांनी दरवाजा उघडला. माईंच्या धडपडीत अप्पांना जाग आली. ते ही मागोमाग दरवाजापाशी आले. 


"गौरी, काय झालं गं? एवढ्या रात्री दरवाजा वाजवलास.‌ ठीक आहे ना सगळं?" माईंनी काळजीने विचारलं. 


"आत येऊ?" 


"हो. हो. ये की आत." 


"माई उद्या पाडवा आहे. लग्नानंतरचा पहिला असा पाडवा जेव्हा मी आणि स्वप्नील वेगवेगळ्या ठिकाणी आहोत." गौरी आत येत खुर्चीवर बसत म्हणाली. 


"हं.... यावेळी त्याला काम आलं ना? " 


"हं.. पण माई मी काय म्हणते, उद्या सकाळी मी ठाण्याला जाते.  सातची एसटी आहे ना एक वाजेपर्यंत ठाण्यात पोचेन. दादाला फोन करून सांगते म्हणजे तो मुलांना घेऊन जाईल. आम्ही येताना दोघे सोबतच येऊ. स्वप्नीलला ड्रायव्हिंगसाठी मदतच होईल माझी." गौरी बोलताना थांबली.


"तो उद्या रात्रीपर्यंत पोचतो म्हणालाय ना? आणि तुझी भाऊबीज आहे त्याचं काय?" अप्पांनी दोघींच्या संभाषणात उडी मारली. 


"इथून सकाळी निघाले की, एक वाजेपर्यंत पोचेन. तिकडून तीन वाजता निघालो की साडेआठ नऊपर्यंत दादाकडे पोहोचू. भाऊबीज करून दोघे इकडे येऊ. मुलांना मामाकडे रहायचंय." गौरीने सांगितलं.


"एकटी जाशील का? की अप्पांना पाठवू सोबत?" माईंनी अप्पांचा मुद्दा बाजूला ठेवून विचारलं.


"नको नको. मी जाईन एकटी. कितीवेळा याआधी गेलेय की माई." गौरीने हसत म्हटलं.


"बरं. आता झोप जा लवकर. सकाळी साडेपाचला तरी उठावं लागेल." माईंनी सांगितलं तशी गौरी स्वतःच्या रुममध्ये गेली पण झोप येईना. स्वप्नील डोळ्यासमोरून जात नव्हता. "उगाच चिडलो इतके. पण त्याला कळायला नको का? वर्षांतून एकदा दिवाळी येते ना! जाऊ दे. कंपनीची रिपीट ऑर्डर आली त्यात त्याचं तरी काय चुकलं म्हणा. हल्ली मुलांचा खर्च वाढलाय, भविष्याची तरतूद करून ठेवायला हवी म्हणून किती कामं घेतो. व्याप बराच वाढलाय कामाचा." स्वतःच्या उलटसुलट विचारांच्या गर्दीत कधीतरी डोळा लागला. पहाटे पाच वाजता मोबाईलमधला अलार्म वाजला. झोप पुरेशी झाली असं वाटत नव्हतं. तिने पटापट आवरलं. तिच्या लग्नात मामाने नेसवलेली साडी खुप आवडायची तिला. आज तीच नेसून तयार होऊन ती एसटी स्टँडवर पोचली. सातची आरामदायी शिवशाही पकडली. तिकीट काढलं आणि  विंडो सीटवर डोळे मिटून मागे डोकं टेकवून बसून राहीली.


इकडे मामा येऊन मुलांना घरी घेऊन गेला. माई अप्पा गौरी पोचल्यावर फोन करेल म्हणून वाट पाहत होते. पण एक वाजला तरी गौरीचा फोन नाही आला. शेवटी न राहवून अप्पांनी तिचा नंबर डायल केला. दोन्ही सिमवर चार पाच वेळा फोन केला तर आऊट ऑफ कव्हरेज एरिया सांगत होता.


स्वप्नीलला फोन न करण्याची विनंती करून गेली‌ होती गौरी. तिला स्वप्नीलला सरप्राइज द्यायचं होतं. अप्पांनी अजून पंधरा मिनिटे वाट पाहून पुन्हा दोन्ही नंबर डायल केले. अजूनही तीच टेप. शेवटी काळजीपोटी त्यांनी स्वप्नीलला फोन लावला. तो सगळा हिशोब करून ऑफिसमधून निघतच होता. अप्पांचा फोन स्पिकरवर टाकून "हॅलो?" म्हणाला. 


"स्वप्नील, गौरीशी काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा? अर्धा तास झाला आम्ही फोन करतोय पण कधी नॉट रिचेबल तर आऊट ऑफ कव्हरेज एरिया येतोय." अप्पा


"माझ्याशी काहीच बोलणं नाही झालेलं तिचं. तुम्ही का फोन करताय? आज भाऊबीज तर खेर्डीला गेली असेल ना? तिचा लागत नाही तर दादाला फोन लावून बघा." स्वप्नीलने ब्युटुथ ऑन करून मोबाईल खिशात ठेवत सांगितलं.


"अरे ती खेर्डीला नाही, सातच्या शिवशाहीने ठाण्याला यायला निघालीय. दिवाळी पाडव्यासाठी." 


"क्काय्य??" अप्पांनी सांगितलं ते ऐकून तो तीन ताड उडालाच...


"अरे हो, म्हणून तर काळजी वाटतेय ना?" अप्पा.


"बरं पाच मिनिटे द्या मला मी काही तरी करतो..." स्वप्नील.


"ए बाबाऽ आम्ही तुला फोन केला ते नको सांगूस तिला.. तुला सरप्राइज द्यायला येतेय ती!" अप्पांनी फोन ठेवता ठेवता सांगितलं. 


"हो..." 


सातची एसटी पकडलीय तर एव्हाना घरी पोचायला हवी होती. अजून आली नाही म्हणजे एसटी लेट झाली की काय?


त्याने खिशातून फोन बाहेर काढला. गुगलवर श्रीवर्धन एसटी डेपोचा नंबर शोधला आणि फोन लावला. सकाळी सातच्या शिवशाहीबद्दल  "कृपा करून जरा माहिती काढून सांगता का?" विचारलं. सुदैवाने ऑपरेटर चांगल्या मुडमध्ये होता. त्याने स्वप्नीलला होल्डवर ठेवून माहिती काढली. 

"साहेब, पेणच्या आधी गाडी पंक्चर झाली होती. त्यामुळे लेट झालीय. आताच पनवेल डेपोतून निघालीय. पाऊण तासात ठाण्यात पोचेल." ऑपरेटरने सांगितलं. 


"हुश्श!!खुप मोठं काम केलं साहेब तुम्ही. तुमचं नाव आणि फोन नंबर द्या. मी उद्या नक्की भेटायला येईन तुम्हांला. काय आणू तुमच्यासाठी मुंबईहून." गौरीच्या शिवशाहीचे लोकेशन कळल्यामुळे स्वप्नील फार आनंदात होता. 


"काही नका आणू साहेब.." 


"बरं मग नंबर तरी द्या.. " 


ऑपरेटरने दिलेला नंबर सेव्ह केला. अप्पांना फोन करून कळवलं. ऑफिसच्या सिक्युरिटी गार्डला ऑफिस बंद करायला सांगितलं आणि स्वप्नील कार घेऊन घरी जायला निघाला. 


काय होईल पुढे?? 

क्रमशः

पुढील भागात...‌‌

भाग २ 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2022/11/blog-post_10.html


लेखिका - Velvet Kavisha ✍️







Post a Comment

0 Comments