रंगली मेहंदी नव्याने रंगली!


भिंतीवर "Pranali weds Shekhar" थर्माकोलच्या दोन हार्ट शेपमध्ये नावं लिहिलेली होती. परवा हळद, काल लग्न झालं आणि आज सत्यनारायणाची पूजा होती. 

मोजकीच मंडळी. तरीही नवीन लग्न झालेलं जोडपं थोडंसं अवघडलेलं होतं. पूजेची वेळ होत आली तरी भटजी काकांचा पत्ता नव्हता. सगळे त्यांचीच वाट बघत होते. 

"आई, इकडे ये जरा." म्हणत शर्वरीने प्रणालीला आत बोलावलं. 

"शरु, आता काय राहिलंय? इतकं नटवलंय तुम्ही की एकदम रेट्रो लुकमधली मुमताज वाटतेय मला मी!" प्रणालीने आत येत हसत म्हटलं. 

"आई, तू शांत रहा. आणि इथे बस. मी फक्त टच अप करतेय." शर्वरीने प्रणालीच्या हाताला धरून टेबलवर बसवत म्हटलं. 

"तुम्ही मुलं ऐकणार आहात का? कर काय करायचं ते!" प्रणाली म्हणाली. 

शर्वरीने हलक्या हाताने कॉम्पॅक्ट आणि साडीला मॅचिंग लाईट आयशॅडो लावला. ब्लश, लिपस्टिक,

 आयलायनर, मस्कारा झाल्यावर पावडर लावून मेकअप सेट केला. 

"किती गोड दिसतेय नवरीबाई माऊडी माझी! आई, आता तूझ्या सुखाला नजर नको लागू देत कुणाची." म्हणत गालावरच्या खळीवर बोट फिरवत शर्वरीने प्रणालीच्या भांगावर हनुवटी टेकवली. मायलेकींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. वातावरणात उगाचच हळवेपणा दाटून आल्याचा भास होत होता. 

तेवढ्यात,

"शरु दिदी, भटजी काका आले गं. या लवकर बाहेर." बेडरुमच्या दिशेने येत ओंकारने शर्वरी आणि प्रणालीला आवाज दिला. 

ओंकारच्या आवाजाने वातावरण सैलावलं थोडं. एकमेकींकडे पाहून चेहऱ्यावर हलकं हसू आणत दोघी बाहेर आल्या. 

"बाबा, तुझं आवरलं तर बाहेर ये लवकर. भटजीकाका आलेत." म्हणत विधी उठून दुसऱ्या बेडरुमकडे गेली आणि येताना शेखरला घेऊनच आली. शेखरला आणून प्रणालीच्या बाजूला उभं केलं. 

"मोठ्यांचा आशिर्वाद घ्या. आईबाबांच्या फोटोला हार घालून नमस्कार करा आणि येऊन पाटावर बसा." भटजींनी दोघांना सांगितले. मान डोलावत नवं दाम्पत्य मोठ्यांना आणि फोटोला नमस्कार करून पाटावर बसले. 

शेखरच्या काकूने पुढे येऊन "उखाणा" घेत प्रणालीच्या पदराची गाठ शेखरच्या उपरण्याला बांधली.

एका बाजूला विधी आणि तिचा होणारा नवरा मनिष तर दुसरीकडे दोन भावंडे ओंकार आणि शर्वरी. चौघेजण काही हवं नको ते पाहत होते. शोधाशोध करून काही मिळालं नाही तर येऊन शेखरला विचारत. बरीच वर्षे एकटा राहिलेला शेखर वस्तूंची अचूक जागा सांगत होता आणि कार्य सिद्धीस जात होतं. घरात चाललेल्या या सगळ्या धावपळीकडे प्रणाली अगदी कौतुकाने पाहत होती. 

"श्री गणेशाय नमः" म्हणत पुजेला सुरुवात झाली. 

"तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा." मंत्र उच्चारतच भटजींनी प्रणालीला सांगितलं. तिने खांद्यावरून पदर घेत पदराचं टोकं डाव्या हाताने पकडलं आणि उजव्या हाताची बोटं शेखरच्या हाताला टेकवली. 

--------------

ही पुर्वाश्रमीची प्रणाली जोशी. वडील प्रेसमध्ये काम करीत. पैशांची फारशी आवक नव्हती तरी बेतास बात चाललं होतं. मोठ्या बहिणीत आणि हिच्यात चार वर्षांचे अंतर. मोठी बहीण मीरा हुशार वगैरे. बारावीनंतर टायपिस्ट म्हणून पोस्टात नोकरी लागली तिला. नोकरी लागून वर्षा दीड वर्षात ती लग्न होऊन सासरी गेली आणि ही दहावी पास होऊन अकरावीत गेली. कॉलेजला जाऊ लागली तशी जणू पंखच फुटले तिला. भिरभिरलेल्या अवस्थेतच अकारावीचं वर्ष संपून बारावीच्या वर्षाची सुरुवात झाली.

अंगापिंडाने छान भरलेली. कृष्णाचं सावळेपण अंगावर पांघरून मुक्त वावरणारी प्रणाली काही कॉलेजकुमारांची क्रश होती. लास्ट इयरला असणारा विद्यार्थी संतोष पवार गेले वर्षभर फिल्डींग लावून होता. पांढरेशुभ्र कपडे, जितेंद्र स्टाईलचे बुट, शाहरुख कटची हेअर स्टाईल, डोळ्यांवर गॉगल आणि यामाहाची बाईक घेऊन हिच्या क्लासबाहेर, वाटेवर, बस स्टॉपवर थांबलेला असायचा. 

संतोष अभ्यासात यथातथाच पण वडिलांची परिस्थिती चांगली होती. गावचे मानकरी घराणे. त्यात संतोष एकुलता एक असल्याने वडिलांच्या जीवावर सगळं चालायचं. याने शहरात येऊन मनाजोगतं राहता येईल, ऐश करता येईल म्हणून हॉस्टेलवर रहायचा निर्णय घेतला. त्याला वडीलांनी परवानगी दिली. 

अचानक काय झालं काय माहिती, संतोषचं ते स्टाईलमध्ये बोलणं, हिरोसारखे केसांमधून हात फिरवणं आणि हा हा करत पहाडी हसणं प्रणालीला आवडू लागलं होतं.

.

.

.

हा कथेचा काही भाग आहे. आवडल्यास पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇

https://shopizen.app.link/vMkRG2DFMxb

हे ईबुक म्हणजेच डिजिटल कादंबरी असून सशुल्क वाचावी लागेल. त्याची किंमत रुपये १००/- इतकी आहे. 

जसे तुम्ही प्रति-लिपी, मॉम्स-प्रेसोसारखे ॲप डाऊनलोड करून वाचता तसेच ही कादंबरी वाचण्यासाठी तुम्हांला shopizen app लागेल. जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

काही अडचण आल्यास शॉपीजेनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे मॅडम यांना सकाळी ११ ते ६ या वेळेत या मोबाईल नंबर 99265 76455 वर संपर्क करु शकता. 

© Velvet Kavisha ✍️


Post a Comment

0 Comments