कथेचे शीर्षक: "दोन बोटं प्रेम"
"शेखर साहेब... शेखर साहेब..."
सगळी शेवटची शक्ती एकवटून,
हात पांघरुणातून बाहेर काढून, भरल्या डोळ्यांनी, अंथरुणावर आडव्या पडलेल्या पायलने,
तिच्या खोलीच्या दरवाजातून जाणाऱ्या इन्स्पेक्टर शेखरला हाक मारली.
"साहेब एकदा बघा तरी..."
शेखरने मागे वळून बघितले. आणि
तो बघतच राहिला. त्याच्या अंगावर रोमांच उठला. जीव कासावीस झाला. छाती जड झाली.
शेखर आता फक्त पायलच्या नजरेत
नजर रोखून स्तब्ध उभा होता. दोघांच्याही डोळ्यातून धारा वाहत होत्या. काळ थांबला नव्हता,
जरा घुटमळत होता, दोघांच्या नजरेत आणि आठवर्णीत!
एका लहानशा गावात लहानगा शेखर
राहत होता. समोरच्या घरात पल्लवी रहात होती. दोघांचे वडील ग्रामपंचायत शाळेत शिक्षक
होते. शेखर आणि पल्लवी एकत्र खेळत, एकत्र शाळेला जात, एकत्र अभ्यास करत. बाहुला बाहुलीची
भातुकली ही खेळत.
एक दिवशी शेखर म्हणाला,
"मला नाही आता भातुकली खेळायची. तुला माहिती, मी पोलिसात जाणार आहे. मग बघ मी
गुन्हेगारांना कसा पकडून आणतो! पल्ले, तुला पण व्हायचंय का पोलीस?"
चुणचुणीत आणि दिसायला देखणी
पल्लवी मोठेपणाचा आव आणत म्हणाली, "नाही रे! माझी आई म्हणते हाताची सगळी बोटं
सारखी नसतात. प्रत्येक जण वेगळा असतो. मी वेगळं काहीतरी करेन. आणि काहीच नाही जमलं
तर तुझं घर सांभाळेन!" दोघांची अगदी घट्ट मैत्री होती.
गावात अंधश्रद्धेचे काही प्रकार
प्रचलित होते. शेखर आणि पल्लवीचे वडील गावकऱ्यांना जमेल तसे जागरुक करत आणि शिकवण्याचा
प्रामाणिक प्रयत्न करत.
एका रात्री पल्लवी तिच्या घरातून
अचानक गायब झाली. गावात दुसऱ्या दिवशी बुवाबजी आणि जादूटोणा या सगळ्याचे प्रचारक लोक
आक्रमक होऊन सांगू लागले. "फाजील काही केलं की हे असं होतं बघा! झाली ना काळी
जादू!" "बसा आता तसेच! लोकहो बघा, जादू टोण्याचा कोप झाला!"
हताश झालेले पल्लवीचे वडील
तरीही ओरडून म्हणत होते, "अहो वाटेल ते बोलू नका. ही काही जादू नाही। माझ्य मुलीला
कोणीतरी पळवले आहे!"
"होय का, मग ती झोपली
होती तिथे जाऊन बघाच एकदा। ती पळवली नाही गेली. जादू टोण्याने गायब झाली आहे, म्हणून
तर..... पल्लवीचे वडील तिथे जाऊन पाहतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! त्यांनी
तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. पल्लवीच्या आईला या घटनेनंतर
अस्वस्थ वाटू लागलं आणि काही दिवसातच तिने डोळे मिटले. पाठोपाठ वडीलही परिस्थितीशी
भांडून वेडसर झाले.
हाताची पाची बोटं जशी सारखी
नसतात तशीच झाडावरच्या सगळ्या कळ्यांची नशिबेही सारखी नसतात. काही कळ्या देवाच्या पूजेची
फुलं होतात तर काही राणीच्या गळ्यात सजतात. काही निर्माल्य होतात तर काही पायदळी तुडवल्या
जातात. आणि सगळ्यात कमनशिबी कळ्या बाजारात विकायला ठेवल्या जाताता
त्या रात्री गावातून उचललेली,
हाताला पट्टी बांधलेली, एक वेणी घातलेली, सुंदर सोज्ज्वळ, काहीशी गंगीत, काहीशी तंदीत
असलेली पल्लवी एका गल्लीत पोचती झाली. तिने हळूच डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला अंधार
होता. ती झोपलेली होती पण स्वस्थ नव्हती. अतराचा वास होता पण प्रसन्न वाटत नव्हतं.
ती एकटी नव्हती पण एकटी झाली होती. तिला कळून चुकले होते की ही रात्र होती आणि या रात्रीची
आता सकाळ होणार नव्हती।
दुसऱ्या दिवशी ती आरशासमोर
उभी राहिली स्वतःला आरशात बघितले. हाताला पट्टी तशीच होती. केस विस्कळीत होते. कपडे
सैल होते. चेहन्यावर डाग होते. अंगाला वास होता. अंथरुणाला सळ होती. पायात कंप होता.
शरीरात वेदना होत्या. डोळ्यात संततधार होती. आणि मनात मात्र फक्त शेखर होता।
वर्षा मागून वर्षे जाऊ लागली.
तिने तिथून पळून जाण्याचे अनेक प्रयत्न करुन झाले होते. पण या सगळ्यात मोठमोठ्या सत्ताधारकांचे
आणि अधिकान्यांचे हात आहेत हे तिला समजले आणि नशिबाशी खूप न झगडता तिने परिस्थिती स्वीकारली.
जुन्या नवीन बायकांशी तिने जुळवून घेतले.
पल्लवी आता या बाजाराला सरावली
होती. तिला स्वतः शौच प्रश्न पडायचा. मी इतके दिवस जिवंत कशी राहिले. तिला आपलेच उत्तर
मिळायचे, शेखर शेखर कधीतरी भेटेल, तो तिला इथून बाहेर काढेल, तिच्याशी लग्न करेल, त्यांचा
सुखी संसार होईल, प्रेमाच्या या निखळ आशेवर ती जगात होती!
"प्रेम, ते फकस्त प्यीक्चर
मधी असतं. ही दुनिया स्वार्थी आहे पोरी, कोनी कोनाचा नाही लक्षात ठेव बघा" रझिया
काकू तिला सतत सांगत असे. "अगं ए देवदासची चंद्रमुखी! परवा लगीन झालेला वाध्या
काल माझ्याकडे येऊन गेला हाय, आणि ही खुली इस वर्षापूर्वीच्याला घेऊन बसली हाया"
असं म्हणत जुलिया आणि संगीता मावशी पण तिला सारख्या हसायच्या. पण या सगळ्यात पल्लवी
ठाम होती. सगळ्या जणी जितक्या तिला हसायच्या तितके तिचे प्रेम आणखी घट्ट होत गेले.
आणि एक दिवस...
एक दिवस तिच्या खोलीचे दार
अचानक वाजले. तिने पदर सावरत दार उघडले आणि एक तडफदार, उंचाप्रा, स्वाबदार पोलीसवाला
उभा असलेला दिसला. तिला अंदाज आला. ती लगेच म्हणाली, "वीस मिनिट द्या साहेब, गिन्हाईक
आहे.'
"ए गप्प, मी त्यासाठी
नाही आलो इये. काल रात्री तुझ्याकडे आलेला कुठे गेला गपगुमान सांग
"माहीत नाही साहेब",
पल्लवी ने घाबरत उत्तर दिले.
पोलिसाने एका हाताने तिचे केस
धरले, दुसऱ्या हाताने तिचा गळा धरला आणि ओरडून विचारले, "सांगतेस की
आत टाका साली नालायका
"आं!!! सोडा मला! खरंच
माहीत नाही साहेबा", अश्रू सावरत पल्लवी म्हणाली. पोलिसाने तिला भिंतीवर ढकलले
आणि दरवाजा आपटून निघून गेला।
त्या दिवसानंतर पल्लवी आनंदून
गेली! तिच्या मनाला उभारी आली. तिच्या मैत्रिणींना वाटले की त्या पोलिसावर ती भाळून
गेली की काय. पण पल्लवी खरंतर वेगळ्याच गोष्टीवर भाळली होती. त्याच्या शर्टावर तिने
नाव वाचले होते, "शेखर जाधव"।
पल्लवीने मोठ्या युक्तीने तिच्याकडे
आदल्या दिवशी आलेल्या माणसाला जाळ्यात अडकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
"अ.. थैंक्यू आणि सॉरी..".
नजर चुकवून शेखर तिला म्हणून गेला होता.
पल्लवी पुन्हा एकदा स्वप्नांच्या
आकाशात उडू लागली. पण तिच्या मैत्रिणी तिला जमिनीवर आणायच्या. "वेडे, तू बघ आणि
तो बघा असेल तो तुझा लहानपणीचा मित्र, पण कशावरून तू त्याला आठवत असशीला आणि आठवली
जरी तरी तो काय तुझ्याशी लग्न करणार! तवायफों की तकदीर में शौहर नाही होते. विसरलीस
का?"
पुढच्या वेळी जेव्हा तिला शेखर
दिसला तेव्हा तिने विचारून टाकलं, 'साहेब तुमचं लग्न झालंय?" शेखरने तिच्याकडे
बघितलं आणि तिला दूर झटकून, "हो बायको घरी वाट पाहले आहे. ही बघ अंगठी।"
असं म्हणत बोटातली अंगठी दाखवली होती.
पल्लवीला ज्याची भीती होती
तेच झाले होते. तिची हे ऐकण्याची तयारी होती. पण आता तिला दुःख अनावर झाले. तिचे स्वप्न
पूर्णत्वाच्या इतक्या जवळ येऊन पुन्हा फिस्कटले होते. "हाताची पाची बोटं सारखी
नसत्यात बाळे, प्रत्येकाचं नशीब येगळं अस्तिया", तिला सावरताना रझियाकाकू डोक्यावरुन
हात फिरवत म्हणाली. पल्लवीने स्वतःचा हात बघितला आणि काकूच्या मांडीवर डोके ठेवून रडत
बसली.
पल्लवी आता मात्र पूर्ण हरली
होती आलेला दिवस ढकलत होती. एकदा ती अचानक बेशुद्ध झाली. रक्त तपासणी झाली आणि तिला
एच आय व्ही पॉझिटिव्हचे निदान झाला हळूहळू तिची तब्येत खालावली आणि आता ती अंथरुणाला
खिळली. तिने फक्त एकदा शेखरला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली आणि...
शेखर पायलकडे नजरेत नजर रोखून
स्तब्ध उभा होता! पांघरुणातून बाहेर आलेला पायलचा हात शेखरने बघितला आणि त्याने 'पल्लवी
!!!" अशी मोठ्याने हाक मारली.
धावत जाऊन तिच्या उशाशी बसला.
तिचा हात हातात घेतला.
पल्लवी थकलेल्या आवाजात एक
एक शब्द बोलू लागली, 'त्या.रात्री मला पळवलं. दोन बोटं कापली.... नंतर... इथे... आले...
पायल... झाले..." ऐकताना शेखरचा जीव अस्वस्थ होत होता. पल्लवी पुढे बोलली,
"माझं तुझ्यावर खूप प्रेम. पण तू वहिनीला... नमस्कार..."
बस्सा शेवटचे शब्द म्हणून पल्लवीने
शेखरच्या मिठीत तिचा अखेरचा श्वास घेतला!
पल्लवीचा अंतिम दाह करून शेखर
घरी आला खुचर्चीवर बसला, टेबलावर असलेली थंडगार काचेची डबी हातात घेतली. त्याच्या बायकोच्या
बोटातील अंगठीकडे बघत त्याला अश्रू अनावर झाले. त्याने इबी पुन्हा जागेवर ठेवली. त्यामागे
पल्लवीचा फोटो ठेवला आणि त्या फोटोला मंगळसूत्र घातले.
- सुमेध रानडे
disclaimer :
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
.jpg)
6 Comments
Well written Sumedh! Keep it up!! All the best 👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसुंदर मांडणी
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box