तुमने मुझे देखा - सौ. नेहा उजाळे



तुमने मुझे देखा - सौ. नेहा उजाळे

                  ' तुमने मुझे देखा, होकर मेहरबां, रुक गई ये जमीं, थम गया आसमां, जानेमन जानेजां ' रेडिओवर ' तिसरी मंजिल ' चित्रपटातील गाणे चालू झाले. तसंही हे गाणे उर्वशीला खूप आवडायचे; पण आता जरा अधिकच ते आवडू लागले होते. त्याला कारणही तसेच होते. तिच्या आयुष्याशी तंतोतंत निगडित असे ते गाणे होते. गाणे ऐकता ऐकता उर्वशी भूतकाळात गेली. 

               एक लहान बाळ कोणीतरी कचऱ्याच्या कुंडीपाशी ठेवले होते. एक व्यक्ती सकाळी चालायला म्हणून निघाली असता त्या व्यक्तीला ते छोटेसे बाळ एका फडक्यात गुंडाळलेले दिसले. त्याने ते बाळ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि मग पोलिसांनी त्या बाळाची एका अनाथाश्रमात रवानगी केली. गोरीपान, नाजूकशी जीवणी, टपोरे बोलके डोळे, कुरळे केस यामुळेच तिचे नाव तिथल्या व्यवस्थापकांनी उर्वशी ठेवले. इतकं सुंदर बाळ अशारीतीने कोणी सोडलं असेल ह्याचा विचार आश्रमातल्या लोकांना पडायचा. उर्वशीवर सगळ्यांचा खूप जीव जडला होता कारण उर्वशी लहानपणापासूनच अतिशय गुणी होती. भूक लागली तरी ती कधी रडली नाही. एकटीच खेळत बसायची.

               उर्वशी जशी मोठी होत होती तसतशी ती अधिकाधिक सुंदर दिसू लागली. सौन्दर्याबरोबर तिची बुद्धी देखील तितकीच तल्लख होती. शाळेत पहिला क्रमांक तिने कधीच सोडला नव्हता. दहावीला तब्बल ९८% तिने मार्क्स मिळवले. तिला साहित्याची आवड होती म्हणून तिने आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तिच्या आयुष्यात अनपेक्षितपणे शशी आला.

                 शशी त्याच्या मम्मासोबत उर्वशीच्या आश्रमातील लहान मुलांना फळे, मिठाई देण्यासाठी म्हणून गेला होता. शशी ' भोसले अँड कंपनी ' चा एकुलता एक वारस होता. त्यांच्या कापडगिरण्या होत्या. त्यांचा माल परदेशात देखील जात असे. शशीच्या वडिलांच्या पश्चात त्याच्या मम्माने व्यवसायाची धुरा सांभाळली होती. आता शशीने मोठे झाल्यावर व्यवसायाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली होती. शशीची मम्मा दीपिकाताई  समाजसुधारक होत्या. त्या अनेक अनाथआश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन पैशांची किंवा वस्तूंची देणगी देत असत. शशीच्या सत्तावीसाव्या वाढदिवसानिमित्त त्या  शशीला घेऊन उर्वशीच्या अनाथाश्रमात गेल्या. तिथे त्यांनी लहान मुलांना शशीसोबत खाऊ वाटायला सुरुवात केली. उर्वशी तिथे काही मुलांना गणित शिकवत होती. उर्वशीचे रूप पाहून शशी मंत्रमुग्ध झाला होता. 

              " शशी ! लक्ष कुठे आहे तुझं ? मुलांना वाटायचा आहे ना खाऊ ?" दीपिकाताई कडाडल्या.

              " हो मम्मा." इतकं बोलून शशीने पुन्हा लहान मुलांना खाऊ वाटायला सुरुवात केली.

                 आश्रमातील लहान मुले खाऊ मिळण्यासाठी गोंधळ करत करत होती म्हणून उर्वशीने मुलांना शिस्तीत रांगेत उभे केले आणि ती तिथून निघून गेली.

                 आश्रमातल्या सगळ्या मुलांना खाऊ वाटून झाला. आश्रमातल्या संस्थापकांनी त्या मायलेकांना चहापाणी दिले. बराच वेळ शशीची नजर उर्वशीला शोधत होती; पण ती कुठेही दिसली नाही म्हणून शेवटी त्याचा हिरमोड होऊन तो घरी जाण्यास निघाला. 

                 घरी गेल्यानंतर देखील शशीच्या डोळ्यांसमोर उर्वशीचा चेहरा येत होता. ' कोण असेल ती इतकी सुंदर मुलगी ? कुठे राहत असेल ? तिचं नाव काय असेल ? आयुष्यात इतकी सुंदर मुलगी मी कुठेच पाहिली नव्हती. ज्या मुलीचा चेहरा मी स्वप्नात पाहत होतो ती तीच आहे.' सारखा सतत तोच चेहरा डोळ्यांसमोर येत असल्याने शशी बेचैन झाला होता. आपण त्या मुलीचा शोध घ्यायचा असे त्याने मनाशी पक्के ठरवले.

                 दोन तीन दिवसांत पुन्हा तो उर्वशीच्या आश्रमात गेला. तिथे ऑफिसमध्ये उर्वशी एका फाईलमध्ये काहीतरी बघत असताना त्याला दिसली. तिला समोर पाहून त्याला आनंद झाला. काहीतरी विचारायचे म्हणून त्याने तिला विचारले, " मॅडम ! मला डोनेशन द्यायचे आहे तर त्याची प्रोसेस काय आहे ?" 

                 उर्वशीने शशीला लगेच ओळखले होते की, ' हाच तो परवा आलेला मुलगा. हा पुन्हा इथे का आला ?' 

                 उर्वशीने नम्रपणे शशीला उत्तर दिले, " सर ! तिथे मॅनेजरकाका आहेत त्यांना जाऊन भेटा. ते तुम्हाला या संदर्भात मदत करतील." असे म्हणून उर्वशी तिथून निघून गेली. तिच्या नम्र बोलण्याने आणि मंजुळ आवाजाने शशी पुरता घायाळ झाला होता.

                   शशी तिथल्या मॅनेजरना भेटला. त्याने डोनेशनची रिसीट फाडली. उर्वशी तिथून जी गेली ती पुन्हा तिथे आली नाही. शेवटी शशीने त्या मॅनेजरना विचारले, "मॅनेजर साहेब! आता एक मुलगी इथे होती तिचं नाव काय आहे? ती कुठे राहते ?" 

                   " हे बघा सर ! आम्ही आमच्या आश्रमातील मुलांची माहिती बाहेरच्यांना देत नाही." मॅनेजर म्हणाले.

                    " पण साहेब ! जर मला त्या मुलीशी लग्न करायचे असेल तर?" शशी म्हणाला. 

                     " सर ! तुम्ही खानदानी लोकं. तुम्ही का म्हणून एका अनाथ मुलीशी लग्न कराल? तुम्हाला त्या मुलीबद्दल काही माहिती नाही आणि लगेच लग्न कसे करायला निघालात? तुमच्या घरच्या तसेच तुमच्या समाजातील लोकांना हे लग्न मान्य होणार नाही. उगीच तुमच्या डोक्यात आलेलं खूळ काढून टाका आणि तुमच्या तोलामोलाच स्थळ पाहून लग्न करा. उगीचच एखाद्या गरीबाला आशा लावू नका."  मॅनेजर म्हणाले.

                    " नाही मॅनेजर साहेब, मी आशा लावत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा मला खरंच त्या मुलीशी लग्न करायचे आहे. मला माझ्या घरातील लोकांशी आणि समाजाशी काही एक घेणेदेणे नाही. हा माझ्या आयुष्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या मनात एक माझ्या बायकोची जी प्रतिमा होती त्यात ती एकदम फिट बसली आहे. त्यामुळे मी लग्न करेन तर तिच्याशीच; पण त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागणार आहे. तुम्हाला तिच्याशी माझी गाठभेट घालून द्यावी लागेल." शशी विनम्रपणे म्हणाला.

                    " तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेऊ हेच मला समजत नाही. तुमचं तरुण वय आहे म्हणून चुकीचा विचार करू नका असे माझे मत आहे कारण तुम्ही जो मार्ग निवडता आहात त्या मार्गावर चालताना तुम्हाला त्रास भोगावा लागेल. जरा कठोरपणे बोलतो की तुम्ही तुमच्या मार्गाने जा. आमच्यासारख्या गरिबांना मोठी स्वप्ने नका दाखवू." मॅनेजर म्हणाले.

                   " मॅनेजर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिच्या प्रेमात पडलो आहे. मी निश्चय केला आहे की मी लग्न करेन तर तिच्याशीच. मी माझ्या शब्दाला जागेन. कुठलीही फसवणूक माझ्याकडून होणार नाही." शशी म्हणाला.

                    " असे असेल तर ठीक आहे सर, तुम्ही दोन दिवसांनी पुन्हा या. मी उर्वशीशी बोलून ठेवतो आणि तुमच्या दोघांची भेट घडवतो." मॅनेजर म्हणाले.

                     " थॅंक्यु मॅनेजर साहेब, बोलता बोलता तुम्ही तिचे नाव मात्र सांगितलेत." हसत हसत शशी आश्रमाबाहेर पडला. मॅनेजरसाहेबांनी डोक्यावर हात मारून स्वतःची जीभ चावली. आता मॅनेजरसाहेबांसमोर एक मोठे आव्हान होते ते म्हणजे उर्वशीला शशीला भेटण्यासाठी तयार करायचे. मॅनेजर साहेबांना शशी उर्वशीला लग्नासाठी विचारणार होता याचा खूप आनंद झाला होता कारण शशी भोसले हा मोठ्या प्रतिष्ठित खानदानातील होता. आपल्या आश्रमातील मुलगी एका चांगल्या घराण्यात लग्न करून गेली तर तिच्या आयुष्याचे भले होईल. तिला एक घर मिळेल, तिच्यावर प्रेम करणारा नवरा तसेच एक कुटुंब मिळेल ह्या विचाराने मॅनेजरसाहेबांना भरून आले होते.

                      आश्रमाबाहेर पडल्यावर शशी गाडी चालवताना विचार करत होता की, ' उर्वशी माझ्याबरोबर बोलेल ना ? ती माझ्याशी लग्न करायला तयार होईल ना ? बघू दोन दिवसांनी ती भेटल्यावर पुढे काय होणार आहे. मम्माला इतक्यात काही सांगायला नको. पहिलं तर उर्वशीचे मत जाणून घ्यायला हवे.' विचार करत करत तो घराजवळ केव्हा पोहचला हे त्याचे त्यालाच समजले नाही.

                      शशी आश्रमातून बाहेर पडल्यावर मॅनेजरकाकांनी उर्वशीला हाक मारली. उर्वशीला त्यांच्यामध्ये आणि शशीमध्ये काय बोलणे झाले ते तिला सविस्तर सांगितले. उर्वशी मॅनेजर काकांना काहीच बोलली नाही कारण मॅनेजरकाका शशीबद्दल भरभरून बोलत होते त्यामुळे त्यांचं मन तिला मोडवेना; पण तिने शशीला भेटण्याची संमती दर्शवली. शशीसोबत काय बोलायचे हे तिने मनोमन ठरवले होते.

                 आज पुन्हा शशी उर्वशीच्या आश्रमात जाण्यास निघाला. दोन दिवस त्याला दोन वर्षांसारखे वाटले होते. उर्वशीसोबत कसे बोलायचे ह्याचे मनोमन आराखडे त्याने बांधलेले होते. आता प्रत्यक्षात काय बोलणे होईल ते ठाऊक नव्हते. शशी आश्रमात पोहचला. मॅनेजरकाका आश्रमाच्या ऑफिसमध्ये त्याची वाट पाहतच होते. शशी आल्यावर त्यांनी उर्वशीला ऑफिसमध्ये येण्याबद्दल निरोप पाठवला.

                   शशीला समोरून उर्वशी येताना दिसली. तिने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता त्या रंगामुळे तिचं सौन्दर्य अधिकच खुलले होते. शशी तिच्याकडे भान हरपून पाहत होता. 

                   " या या सर, ही आमची उर्वशी. मी बाहेर जातो म्हणजे तुम्हा दोघांना मनमोकळेपणाने बोलता येईल." मॅनेजरकाका ऑफिसबाहेर पडले.

                   "उर्वशी ! मी शशी भोसले. मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. सॉरी, माझ्याविषयी गैरसमज करू नकोस. खरं सांगायचं तर मी तुला लग्नाची मागणी घालायला आलो आहे." शशीने एका दमात उर्वशीकडे आपले मन मोकळे केले खरे पण तो मनातून खूप घाबरला होता. तिच्याकडे बोलल्याबरोबर तो घटाघटा पाणी प्यायला.

                     " सर ! मी तुमच्या भावनांचा आदर करते; पण मी तुम्हाला नीट ओळखत नाही किंवा तुम्ही मला नीट ओळखत नाहीत. मला केवळ एकदा पाहून तुम्ही माझ्याशी लग्न करायला निघालात. माझ्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही तसेच मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. मी एक अनाथ मुलगी आहे. माझं खानदान कुठलं, माझे आईवडील कोण आहेत हे मला माहित नाही. तुमचं प्रतिष्ठित घराणं. तुमच्या आईवडिलांना तुमच्या लग्नाची किती स्वप्ने असतील. एक अनाथ मुलगी सून म्हणून त्यांना कशी पसंत पडेल? तुम्हाला तुमच्या योग्यतेची चांगल्या घराण्यातील मुलगी मिळेल. तुम्हाला मी आवडले म्हणजे केवळ एक आकर्षण म्हणून असेल. तुम्ही माझा विचार न करणेच योग्य ठरेल." उर्वशी म्हणाली.

                    " तू म्हणतेस ते शब्द नी शब्द बरोबर आहे; पण उर्वशी जरी मी तुला एकदाचं पाहिले असले तरी माझ्या डोळ्यांपुढे मी माझ्या बायकोची प्रतिमा तयार केली आहे ना तू अगदी तशीच आहेस. तुला पाहिल्याबरोबर मला जाणवले की ती तूच मुलगी आहेस जिचा चेहरा माझ्या स्वप्नात कायम माझ्या डोळ्यांपुढे यायचा. तुला खोटं वाटेल उर्वशी, त्या दिवशी मम्माबरोबर काहीशा अनिच्छेनेच आश्रमात आलो होतो. सरतेशेवटी मी मम्माला तिच्याबरोबर येतो असे सांगितले होते म्हणजे बघ ना जसं काही कुठले ऋणानुबंध असतील तुझी भेट घडण्यासाठी म्हणून मला देवाने इथपर्यंत येण्याची बुद्धी दिली. मला काही फरक पडत नाही की तू अनाथ आहेस. तू देखील एक मनुष्यच आहेस ना? मग तुला देखील चांगलं जगण्याचा हक्क आहे. मला खानदान, समाज ह्याची देखील काही फिकीर नाही. मला तू आवडली आहेस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे." शशी म्हणाला.

                  " मी तुम्हाला माझ्याकडून सध्या काही उत्तर देऊ शकत नाही कारण तुमच्या घरातल्यांना माझ्याशी लग्न झालेलं कितपत पटेल हे माहीत नाही. तुमच्या घरच्यांची जर संमती मिळाली तरंच मी लग्नासाठी होकार देईन. माझ्यामुळे मला तुमच्या घरात वादळ आलेले चालणार नाही आणि तुमच्या घरातून जर संमती नाही मिळाली तर प्लिज मला विसरून जा." उर्वशी म्हणाली. सुनंदा मावशींना शशीला चहा द्यायला सांगून उर्वशी तिथून तिच्या रूममध्ये गेली. 

                     शशी मॅनेजरकाकांना भेटून घरी जाण्यास निघाला. त्याच्या मम्माची आता त्याला उर्वशीबरोबर लग्न करण्यासाठी संमती मिळवायची होती. शशी आश्रमातून बाहेर पडला; पण उगीचच उर्वशीच्या मनाला रुखरुख लागली होती. शशीसारखा सुंदर, कर्तबगार मुलगा नवरा म्हणून कोणाला आवडणार नाही? शशीच्या श्रीमंतीपेक्षा त्याचे वागणे, नम्र बोलणे उर्वशीला आवडून गेले होते; पण इथे संपूर्ण चित्रच वेगळे होते. उर्वशी जरी सुंदर, प्रेमळ, संस्कारी, बुद्धिमान असली तरी ती शेवटी शशीच्या योग्यतेची नाही हे तिला माहीत होते. आज पहिल्यांदा तिच्या मनाने आक्रोश केला की, ' मी अनाथ का आहे? माझे आईवडील असते तर माझे मानसन्मानाने शशी सोबत लग्न झाले असते.'

                     शशी घरी आला तर त्याची मम्मा त्याची वाट पाहत होती. एका धनाढ्य उद्योगपतींच्या मुलीचे स्थळ त्याला सांगून आले होते. 

                     " शशी, हा स्वामिनीचा फोटो बघ. किती सुंदर, शिकलेली आणि घरंदाज आहे. नाशिकमध्ये त्यांचे मोठे प्रस्थ आहे. ते लोकं बोलणी करायला पुढच्या रविवारी आपल्या घरी येणार आहेत. मला तर स्वामिनी कधी एकदा आपल्या घरी सून म्हणून येते आहे असे झाले आहे." दीपिकाताई म्हणाल्या.

                     मम्माच्या बोलण्यामुळे शशी स्तंभित झाला आणि म्हणाला, " मम्मा, मी तुझ्याशी ह्याच विषयावर बोलणार होतो. मम्मा मला एक मुलगी आवडू लागली आहे. मला तिच्याशीच लग्न करायचे आहे." शशीने इत्यंभूत उर्वशीबद्दल सगळी माहिती मम्माला दिली.

                    " शशी! तू वेडा बिडा झालास का रे? एक अनाथ मुलगी जिला तिचं घराणं ठाऊक नाही, आईवडील ठाऊक नाहीत अशा मुलीला मी सून म्हणून घरी आणू? ती आपल्या योग्यतेची तरी आहे का? अजिबात नाही. मी असे होऊ देणार नाही. स्वामिनी मला सून म्हणून आवडली आहे आणि तीच या घरची सून होणार. आता हा विषय इथेच थांबवायचा आणि स्वामिनीबरोबर लग्न करायला तयार हो. तू जर माझं ऐकणार नसशील तर माझ्याइतकं वाईट कोणीच नसेल." दीपिकाताई थरथर कापत होत्या. 

                "मम्मा ! तुझा जसा हट्ट आहे तसाच माझा हट्ट आहे. मला उर्वशी बरोबरच लग्न करायचे आहे. तिच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाशीच लग्न करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे समज. मग भले माझे लग्न नाही झाले तरी चालेल. उर्वशी एक अनाथ आहे, आपल्या योग्यतेची नाही असे तू म्हणतेस पण ती एक माणूसचं आहे ना ? तिला देखील चांगलं जगण्याचा अधिकार आहे ना? जर माझं लग्न उर्वशी सोबत झाले नाही तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरणार नाही मग मी जर सुखी नसेल तर तू तरी सुखी राहू शकशील? मी दुसऱ्या मुलीला जर बायकोचा दर्जा दिला नाही तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद होण्यास तूच कारणीभूत ठरशील. तुझ्या हट्टामुळे तीन आयुष्य बरबाद होतील हे चालेल तुला?" शशी म्हणाला.

                  दीपिकाताई तेव्हा एकदम गप्प बसल्या. त्यांच्या कानात शशीचे शब्द घुमत होते. काय करावे त्यांना सुचत नव्हते. अनेक दिवस विचार करून सरतेशेवटी लेकावरच्या प्रेमाने त्यांनी माघार घेतली आणि उर्वशीला सून म्हणून आणण्याची शशीला संमती दिली. आश्रमात सगळ्यांनी मिळून उर्वशीच्या लग्नासाठी सोहळा साजरा केला. उर्वशीला सुंदर मेहंदी काढली गेली, तिला हळद लावली. सगळ्यांनी पैसे काढून उर्वशीसाठी दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन केली. स्वतःच्या मुलीप्रमाणे उर्वशीची पाठवणी केली. 

                      शशी खूप खुश होता; पण दीपिकाताई तेवढ्याच नाखूष होत्या. उर्वशीला माहिती होते की, मम्मांना ती सून म्हणून आलेली आवडलेलं नाही त्यामुळे तिने शशीला अट घातली की, जोपर्यंत मम्मा मला स्वीकारत नाहीत तोपर्यंत आपण एकत्र यायचे नाही. शशीने उर्वशीची अट मान्य केली कारण त्याच्या स्वप्नातील मुलगी त्याची पत्नी झाली होती. उर्वशीच्या प्रेमळ स्वभावाने हळूहळू ती दीपिकाताईंचे मन जिंकू लागली होती. मम्मांची काळजी घेणे, त्यांना औषधपाणी वेळेवर देणे ह्या गोष्टींमुळे दीपिकाताईंना उर्वशीबद्दल प्रेम वाटू लागले होते. 

                    आता आपल्या मम्माने उर्वशीला स्वीकारले असल्याने शशीने हनिमूनसाठी काश्मीरला जायचे ठरवले. शशी आणि उर्वशी दोघेही खूप खुश होते. त्यांच्या प्रेमाचे रूपांतर मिलनात होणार होते. दहा दिवसांनी त्यांची फ्लाइट होती. एका नामांकित ट्रॅव्हल्स तर्फे ते दोघे फिरायला जाणार होते.

                   म्हणतात ना, सगळं सुख असलं तर त्यामागून काहीतरी दुःख यायला पाहिजे अगदी तसेच झाले. एके दिवशी संध्याकाळी शशी ऑफिसमधून घरी आला तोच ताप घेऊन. नॉर्मल ताप असेल असे वाटून त्याने क्रोसिनची गोळी घेतली तरीदेखील ताप कमी होईना. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी उर्वशीने फॅमिली डॉक्टरांना बोलावले असता त्यांनी शशीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले. हॉस्पिटलमध्ये शशीच्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या आणि एक भयंकर रिपोर्ट समोर आला तो म्हणजे शशीला कर्करोग झाला होता. 

                    उर्वशीच्या तसेच दिपीकाताईंच्या पायाखालची जमीन सरकली होती. उर्वशी शशीसाठी अहोरात्र हॉस्पिटलमध्ये थांबायची. त्याची सेवा करायची. डॉक्टरांनी शशीकडे जास्त दिवस राहिले नाहीत हे सांगितल्यावर मात्र उर्वशी आतून पूर्णपणे तुटली. तरीदेखील खंबीरपणे उभी राहून ती शशीच्या इच्छेखातर शशीला काश्मीरला घेऊन गेली. दोघे एकमेकांमध्ये एकरूप झाले. शशीला देखील आपला अंत जवळ आला आहे हे ठाऊक झाले होते. त्याला उर्वशीची भयंकर काळजी वाटत होती. त्याने त्याच्या पश्चात उर्वशीने चांगला मुलगा पाहून दुसरे लग्न करावे असे तिच्याकडून वचन घेतले. उर्वशी दाखवत नसली तरी तिच्या मनात आक्रोश चालला होता. देवाने आता कुठे सुख दिले होते आणि लगेच सुख हिरावून घेतो आहे म्हणून ती नशिबाला दोष देत होती.

                 चार महिन्याच्या आत शशी सगळ्यांना सोडून गेला. दीपिकाताई, उर्वशी पार वेड्यापिश्या झाल्या. दीपिकाताई उर्वशीला रोजच्या रोज वाटेल तशा घालूनपाडून बोलू लागल्या त्यामुळे उर्वशी डिप्रेशनमध्ये गेली. आश्रमातील लोकं उर्वशीला आश्रमात घेऊन आले. उर्वशीची एका प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निशांत कर्वे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू झाली. भरीस भर म्हणजे उर्वशी गरोदर राहिली होती. उर्वशीची कहाणी ऐकून डॉक्टरांचे हृदय द्रवले. डॉक्टर निशांत यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, औषधोपचाराने उर्वशीला डिप्रेशनमधून बाहेर आणले. उर्वशीला तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी वाटू लागली होती. आता केवळ शशीच्या प्रेमाच्या प्रतीकासाठी जगायला हवे असा उर्वशीने निश्चय केला.

                  उर्वशीने एका सुंदर, गोंडस मुलाला जन्म दिला. ते छोटं बाळ अगदी शशीचे रूप घेऊन आले होते. त्या बाळाला पाहून उर्वशी ढसाढसा रडली. सगळ्यांचे हृदय हेलावले. डॉक्टर निशांत उर्वशीला आश्रमात एक महिन्यांनी भेटायला गेले असता त्यांना पाहून उर्वशीचा बांध फुटला. निशांतने उर्वशीचा हात हातात घेतला आणि तिला विचारले, "माझ्याशी लग्न करशील?"

                  निशांतच्या प्रस्तावाने उर्वशी चपापली आणि म्हणाली, "डॉक्टर ! माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीशी तुम्ही लग्नाचा विचार नका करू. माझ्या नशिबात कौटुंबिक सुख नाही. मला माझे आईवडील माहीत नाहीत. एक प्रेमळ नवरा लाभलेला तो देखील काळाने हिरावून नेला. तुम्हाला माझ्यामुळे कुठलंही दुःख झालेले मला चालणार नाही. तुम्हाला खूप चांगली कुमारिका मुलगी मिळेल. माझ्यासारख्या एक मूल असलेल्या अभागी विधवेचा विचार सोडून द्या."

                   " उर्वशी अग पण नेहमीच नशीब वाईट नसतं. शशीच आयुष्यच तेवढं असेल. तू स्वतःला कमी का लेखतेस? आणि बाळाला मी माझं नाव लावेन. तुला वाटत नाही का की तुझ्या बाळाला एक चांगलं घर, शिक्षण मिळावं? सगळा विचार करून मला तुझा निर्णय सांग. मी तुझ्यावर कुठलीही सक्ती करत नाही किंवा तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाही. माझं प्रेम जडलं आहे तुझ्यावर." एवढे बोलून निशांत तिथून निघून गेला. 

 

                     आश्रमातील उर्वशीच्या हितचिंतकांनी उर्वशीला डॉक्टरांच्या प्रस्तावावर विचार करायला सांगितला. उर्वशीला शशीला विसरणे शक्य नव्हते. सगळ्यांनी उर्वशीला खूप समजावले. खूप विचारांती शेवटी उर्वशीने निशांतना होकार दिला. आज उर्वशी अतिशय समाधानी होती. तिला निशांतसारखा प्रेमळ पती मिळाला होता आणि रियांशला हक्काचा बाबा लाभला होता.

                "मम्मा, ए मम्मा"  रियांशने उर्वशीला हाक मारल्यामुळे उर्वशी भूतकाळातून बाहेर आली आणि  रेडिओवर समर्पक गाणे चालू झाले, ' आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे.' 

 ( समाप्त )

 लेखिकेचे नाव - सौ. नेहा उजाळे ( ठाणे )

 disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 


Post a Comment

4 Comments

  1. खुप छान

    ReplyDelete
  2. अप्रतिम मनाला भिडणारी कथा.. well done Neha.👍💗

    ReplyDelete
  3. काळजाला भिडणारी कथा खूप सुंदर

    ReplyDelete
  4. संतोष उदमलेApril 26, 2024 at 12:25 PM

    खूप सुंदर कथा

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box