टॉम अँड जेरी - राधा गर्दे



टॉम अँड जेरी 

🅒राधा गर्दे

“सकाळ पासून काय खुडबुड सुरू झाली. झोप कशी ह्या माणसाला येतच नाही. स्वतः झोपायचं नाही आणि दुसऱ्याला झोपू द्यायचं नाही.” म्हणत अरुंधतीबाईंनी अंगावरचं पांघरूण बाजूला केलं आणि पलंगावरून उतरू लागल्या.

“थांबा राणी सरकार! आपला सेवक चहा घेऊन हजर आहे.” म्हणत सतीशराव पुढे झाले.

“कसली राणी? झोपू तरी देता का राणीला?” म्हणत खोट्या रागाने त्या उठून बसल्या आणि मस्त आलं घालून केलेला कडक वाफाळलेला चहा भुरके मारून पिऊ लागल्या. 

“काय गं? माझ्या नंतर रोज सकाळी असा चहा कोण पाजणार? तुलाच उठून तो करावा लागणार?”

सतीशरावांनी डोळे मिचकावत विचारताच, एका क्षणाचाही विलंब न लावता अरुंधतीबाई बोलल्या,

“काहीही काय बोलताय? असलं अभद्र बोलू नका सकाळ सकाळी.”

“बरं राहिलं. दुपारी बोलतो.”

“चला. वय वाढलं पण चावटपणा गेला नाही. चला व्हा बाजूला आता मी कामाला लागते” म्हणत अरुंधतीबाई उठल्या. दोघांची अंथरुणं नीट आवरून. चादरींच्या घड्या घातल्या आणि व्यवस्थित कपाटात ठेऊन दिल्या.   त्यांचा व्यवस्थितपणा सतीशरावांना अनेकदा कटकटच वाटायची. सतीशराव आणि अरुंधतीबाईंचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने ठरवलं गेलं होतं म्हणजे कांदेपोहे वगैरे खाऊन. दोन्हीं घरचे सुसंस्कृत होते. देण्या घेण्याचा काही प्रश्नच आला नाही. छान खेळीमेळीच्या वातावरणात लग्न ठरलं होतं. लग्न विधी ही आनंदात पार पडले.

लग्नानंतरचे सगळे विधी झाले, आलेले पाहुणे आपापल्या घरी परतले. अरुंधतीबाई आणि सतीशराव दोघं काही दिवस फिरून आले. देव दर्शन ही झालं. आता सुरळित जीवनाला सुरुवात झाली ‌होती. नवीन असून ‌ही अरुंधती बाई घरात लवकरच मिसळून गेल्या होत्या. एक दिवस सतीशरावांच्या वडिलांच्या ओळखीचे कोणी त्यांना भेटायला आले. नवीन सूनबाई नाश्ता चहा घेऊन गेल्या नंतर जोडी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांच्या पायाशी वाकली. पाहुण्यांचे हात आशिर्वादासाठी वर आले. दोघांना आशीर्वाद देत पाहुणे सतीशरावांच्या वडिलांना म्हणाले,

“दादा! ह्यांचं लग्न पत्रिका जुळवून केलं आहे ना?”

“नाही हो पण असं कां बरं विचारलं?” त्यावर ते म्हणाले,

“विशेष काही नाही पण हे ही खरं की ह्यांचं पुढे पटेल असं दिसत नाही. चेहरे पाहून इतकंच सांगू शकतो.”

ह्या वाक्याचा अरुंधतीबाईंना अतिशय राग आला. त्या मनातल्या मनात पुटपुटल्या.

‘ते मला ही इतक्या दिवसात कळलंय. पण हे असं स्पष्ट बोललेलं मला आवडलं नाही.”

पण हे मनातच. खाली मान घालून त्या तिथून निघून गेल्या. 

काही दिवसांनी दोघं हा प्रसंग विसरून ही गेले. घराची संबंध जवाबदारी अरुंधतीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली. सगळे सणवार येणारे जाणारे सगळं त्या व्यवस्थित करत होत्या. सासू, सासरे, नातेवाईक त्यांच्यावर खुश होते. सगळं व्यवस्थित चालू होतं पण अरूंधतीबाई आणि सतीशरावांमध्ये चकमकी उडतच होत्या. मग चार चार दिवस अबोला. कधीतरी रागाने, वाद घटस्फोटाची भाषा बोलली जायची. पण परत सगळं ठीक चालू व्हायचं.

अरुंधतीबाईंना निळ्या रंगाची साडी आवडली की नेमकी सतीशरावांना गुलाबी रंगाची आवडायची. मग अरुंधती बाई आपली पसंती पटवून देण्याचा प्रयत्न करायच्या आणि सतीशराव आपली. शेवट एक कोणीतरी रागवायचं आणि   धुसमुसत खरेदी व्हायची.

भेंडीची भाजी अरुंधतीबाईंना परमप्रिय पण सतीशरावांना भेंडी अगदीच नको. सासूबाई म्हणायच्या,

“भेंडी नको करूस. तो पानात पडू देणार नाही.”

अरुंधतीबाई माहेरी गेल्या की भेंडीची भाजी मनसोक्त खाऊन यायच्या. 

एकदिवस त्या ही हटून बसल्या आणि भेंडीची भाजी केली. झालं सतीशराव रागावले. सासूबाई रागवल्या पण अरुंधतीबाईंनी पोटभर भेंडीची भाजी खाल्ली.

सतीशरावांना घरी आल्यावर बातम्या बघायच्या असायच्या. आणि दुसरीकडे मालिका बघण्याची वेळ. मग त्यावरून वाद. कधी सतीशराव विजय मिळवायचे तर कधी अरुंधती बाई.

सुट्टी असली आणि बाहेर जायचं झालं तर कुठे जायचं त्यावरून चकमक. वस्तू खरेदी करायला गेलं की ती घेताना चकमक. बरं एकट्याने जाऊन वस्तू खरेदी करावी किंवा बाहेर जाऊन यावं तर ते ही नाही. बरोबर तर जायचं पण वाद घालणं बंद व्हायचं नाही. अधूनमधून दोघांच्या तोंडातून,

“ते पाहुणे बरोबर म्हणाले होतं की आपलं पटणार नाही. खरंच मोठे ज्योतिषी होते. मानलं बुवा त्यांना.”

ही मुक्ताफळं ही पाझरत असायची.

पुढे त्यांना दोन मुलं झाली. आई वडिलांचे दोघं लाडके. मुलं मोठी‌ होत होती. हुशार होती. त्यांच्या समोर ही दोघांच्या चकमकी चालू असायच्या. 

पोरांसाठी कपडे आणायला बाजारात गेले की तिथे ही वाद.

“जरा पोरासाठी चड्या दाखवा हो.” इति सतीशराव.

“त्या होजरीच्या दुकानात मिळतील.” दुकानदार.

आणि,

“अहो! त्यांना हापपॅंन्ट असं म्हणायचं होतं.” इति अरुंधती बाई.

खरेदी झाली की येताना ह्याचं त्या संभाषणा वरून चकमक.

“तू स्वतःला फार हुशार समजते कां?”

“समजत नाही. आहेच.”

“बरं मग जात जा. पुढल्या वेळेपासून एकटीच.”

आणि मुलगा म्हणायचा,

“पण बाबा! त्याला चड्डी नाही हापपॅंटच म्हणतात.”

“बरं कळलं. मी हरलो आई जिंकली मग तर झालं.”

“हं आता कसं” 

म्हणत शेवटी घरी परत येणं व्हायचं. तर कधी सतीशराव बरोबर ठरायचे आणि पोरांना टाळी देत आपला विजय साजरा करायचे.

त्या चकमकी बघत आणि ऐकत मुलं मोठी होत होती. त्यांचा प्रभाव मुलांवर होत नसे. कारण ह्या चकमकी हळूहळू क्षणात घडायच्या आणि क्षणात शांत ही व्हायच्या. मुलं मोठी होता‌होता आपल्या आई वडिलांना टॉम अँड जेरी म्हणून हसायला लागली. एक दिवस अचानक अरुंधतीबाईंच्या पोटात दुखायला लागलं.  त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. सतीशराव खूप घाबरले होते. ते रडायचेच बाकी होते. मुलं त्यांना धीर देत होती. अरुंधतीबाईच्या गॉलब्लेडरमध्ये खडा असल्याने पोटात दुखलं होतं. लागलीच त्याचं ऑपरेशन करावं लागणार होतं. सतीशरावांचे हातपायच गळले पण अरुंधतीबाई खंबीर होत्या आणि त्यांना धीर देत होत्या. ऑपरेशन ही झालं. त्यांचं गॉलब्लेडर काढण्यात आलं आणि पुढल्या तपासण्या सुरु झाल्या पण देव कृपेने सगळं ठीक होतं. मात्र सतीशराव हवालदिल झाले होते. ते दोन तीन दिवस सतत अरुंधतीबाईं जवळून हालले नाही. जेमतेम दोन घास आग्रहाखातर खाल्ले होते. मुलं मजा बघत होती. सतत एकमेकांना सोडचिठ्ठी देणारे आज त्यांच्या त्या बोलण्याला खोटं पाडत होते. अरुंधतीबाई ही,

“अहो! नका काळजी करू. मी बरी होऊन येतेच पुन्हा रागवायला” म्हणत हसत होत्या.

“रागव नाहीतर काहीही कर पण बरी होऊन घरी चल बास.” सतीशराव गयावया करत होते.

अरुंधतीबाई बऱ्या होऊन घरी आल्या. महिनाभरातच परत चकमकी उडू लागल्या.

“त्यापेक्षा तू दवाखान्यातच असायला हवी‌ होती.” इति सतीशराव.

“देवा! कशाला मला बरं केलं. नेलं असतं तर हा माणूस तरी सुखी झाला असता.” इति अरुंधतीबाई.

कालांतराने घरातील सारी लग्न कर्तव्ये पार पडली. वृद्ध आई वडील ही अनंतात विलीन झाले. तरी ही अनेक वादविवाद करता करता आयुष्य पुढे सरकत होतं. लोक म्हणायचे. 

“दोघं आदर्श नवरा बायको आहेत” आणि मुलं एकमेकांना टाळ्या देत पोट धरून हसायचे. 

मुलं शिकून मोठी झाली. नोकऱ्या लागल्या लग्नं झाली. आपापल्या ठिकाणी आनंदाने नांदू लागली. 

आता घरात उरले ते टॉम अँड जेरी. अरुंधतीबाईंना सकाळी लवकर उठायला आवडत नसे आणि सतीशराव उशीरापर्यंत झोपू शकत नव्हते मग हे संभाषण रोजचे झाले. 

रात्री सतीशरावांना हळद घालून दूध लागायचं पण ते कधीच आपल्या हाताने घ्यायचे नाहीत. चकरा मारत रहायचे आणि अरुंधतीबाई ते समजून उठून त्यांना हळदीचं दूध द्यायच्या आणि चिडायच्या,

“झोपायचं असेल आठ वाजताच म्हणजे सकाळी चार पासून खुडबुड करायला बरं.”

असेच दिवस पुढे सरकत होते. दोघांचे दिवस चांगले जात होते. कधी भांडून तर कधी रुसून तर कधी एकमेकांना मनवून आणि अचानक एक दिवस मोठ्या मुलाचा फोन आला,

“परवा घ्यायला येतो आहे. तयार रहा.” आणि फोन लगेच ठेवला ही.

आता‌ दोघं बैचेन झाले. काय झालं असेल? कोणी आजारी तर नसेल? नको नको ते विचार मन पोखरू लागले.

मोठा मुलगा त्यांना घ्यायला आला.  वाटेत एक अक्षर बोलला नाही काय झालंय ते. बस,

“काही वाईट घडलं नाही काळजी करू नका इतकंच सांगतो.”

हेच बोलला.  असं काय घडलं की ज्यामुळे तो इतक्या तडकाफडकी त्यांना घ्यायला आला हे सोडून इतर बोलत राहिला. घरी पोहोचल्यावर तिथे लहान मुलगा आणि त्याचं कुटुंब ही हजर होतं. 

सतीशराव आणि अरुंधतीबाई ह्या दोघांना, काही कळत नव्हतं काय चाललंय ते. रात्रीची जेवणं होई पर्यंत सगळे नार्मल असले तरी ती दोघं विचित्र मनस्थितीत होती. जेवण झाल्यावर मोठा मुलगा म्हणाला,

“आई, बाबा! दोन दिवसांपूर्वी मला पोस्टाने दोन पत्रं मिळाली आणि त्याच दिवशी लहान्याला ही तशीच दोन पत्रं मिळाली. ह्या काळात पत्रं कोणं पाठवतं? हा विचार करतच आम्ही ती पत्र फोडून वाचली. त्यावर बोलायला आपण सगळे एकत्र जमलो आहोत. तर मंडळी आज तीच पत्रं आता आपल्या समोर वाचण्यात येतील.”

लगेच सतीशराव उठून झोपायला जायला लागले. अरुंधतीबाई ही उठल्या. दोघांना जागीच बसवत मोठ्याने पत्र वाचायला सुरुवात केली.

“प्रिय, चि.अरुण,

अनेक आशीर्वाद,

पत्र लिहिण्यास कारण की, आता आम्ही दोघं किती दिवस एकमेकांची साथ देऊ शकतो ते सांगता येणार नाही पण जर उद्या मी अगोदर गेले तर तुला तुझ्या बाबांच्या दोन सवयीं बद्दल सांगते त्या तितक्या जप, हीच शेवटची इच्छा.

एक म्हणजे ते रात्री आठ वाजता झोपतात तेव्हा हळदीचं दूध त्यांना लागतं ते न विसरता देत जा. दुसरं म्हणजे झोपताना त्यांना त्यांच्या आईची शाल जवळ हवी असते. ती अंथरुणात असू देत जा. आणि हो ते लवकर उठले तर रागवू नका हो त्यांच्यावर. काय करणार म्हातारवयात झोप कमी होते ना? 

बरं हे पत्र मी बाबांना न कळू देता लिहलंय. ते त्यांना कळू देऊ नकोस. इतर सर्व ठीक. सूनबाई आणि नातवंडांना आशीर्वाद.

तुझी आई..

टॉम की जेरी ते तुम्ही ठरवा.”

सतीशराव अरुंधतीबाईंकडे बघू लागताच त्यांनी नजर दुसरीकडे वळवली.

आणि आता धाकटा ओरडला,

“थांबा थांबा! मला ही एक पत्र आलं आहे ते वाचतो.”

“मला झोप आली मी झोपायला चाललो” म्हणत सतीशराव उठले पण त्यांना खाली बसवत धाकटा पत्र वाचून लागला,

प्रिय चि. विजय,

अनेक आशीर्वाद,

माझं पत्र तुला आश्चर्यचकित करेल पण कारणच तसं आहे रे! हे बघ आता आमची वयं झालीत कधी एकमेकांचा साथ सुटेल काही सांगता येत नाही. तर सांगायचं म्हणजे जर मी अगोदर गेलो तर तुझ्या आईला काही नवीन सवयी लागल्या आहेत. त्याबद्दल सांगायचं आहे. जन्मभर ती सगळ्यांसाठी घाई गडबडीत उठून कामाला लागायची. आता ती निवांत झोपते आणि बेड टी घेते. गरम आलं घातलेला. तितका तिला मिळावा ही इच्छा पूर्ण करशील ना? आणि दुसरं म्हणजे ती खूप आरामात आंघोळ करते. तर तितका वेळ तिला देत जा. हवं तर सगळ्यात शेवटी तिला आंघोळीला पाठवत जा पण घाई नका करत जाऊ बरं. 

बस इतकं करा रे. पण हो तिला कळू देऊ नको की हे मी तुम्हांला सांगितलंय नाही तर माझी काही खैर नाही.

बाकी सर्व बरं आहे. सूनबाई आणि नातवंडांना खूप खूप आशीर्वाद.

तुझा बाबा.”

 सगळे एकदम ओरडले “क्या बात है टॉम अँड जेरी. कोण ते पाहुणे होते ज्यांनी सांगितलं होतं की तुमचं मुळीच पटणार नाही? नंबर एकचे थापाडे.”

अरुंधतीबाई आणि सतीशराव एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते आणि डोळ्यात पुरेपूर प्रेम साठवत होते.

राधा गर्दे, कोल्हापूर 

Post a Comment

2 Comments

  1. छान कथा राधा मॅडम. आवडली खुप कथा.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box