अधुरी एक कहाणी.....
रेश्मा डोळे
नंदामाई कोट आणून कधी अंगावर चढवतात याची वाट बघत अण्णा उभे होते..
नंदामाई कोट आणून अण्णांच्या अंगावर चाढवायच्या , कपाळावर स्वामींचा अंगारा लावायच्या,
मग अण्णा मुक्ता आणि विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोला हार घालायचे छोट्या मुक्तीसाठी स्वतः
केलेला मोगऱ्याचा गजरा माई कडे द्यायचे आणि मगच ते नाश्ता करायला खाली उतरायचे.
***** -*****- -******
अण्णा, अर्जुन नाश्त्याला आले...नंदामाई नी दोघांना वाढून त्या पण
नाश्ता करायला बसल्या...त्यांचे ही बचत गट, स्त्री जागृती समिती असे छोटे मोठे व्याप
होतेच...अण्णांचे एकीकडे फोन घेत घेत नाश्ता चालू होता..
अण्णा जहागीरदार फार मोठं,कामात व्यग्र, तितकच शालीन , सालस
व्यक्तिमत्व...अण्णांनी खूप मेहनतीने अनेक व्यवसाय उभे केले होते ,प्रामाणिकपणे वाढवले
होते, "सचोटी चा व्यवहार म्हणजे अण्णा जहागीरदार " हे गावाचं ब्रीदवाक्य
होतं. जुन्या नव्या विचारांचा संगम म्हणजे अण्णा होते.
व्यवसायातून त्यांनी गावात हॉस्पिटल ,कॉलेज उभे करायला, गावाला रोजगार
द्यायला भरभरून मदत केली होती...गावावर त्यांचे अतोनात प्रेम ...आणि गावकऱ्यांचे सुद्धा
त्यांच्या कुटुंबावर..कोणीही कोणत्याही वेळी संकटात असेल त्याने यावं अण्णांच्या वाड्याचा
दरवाजा वाजवावा आणि मदत घेऊन जावी ही काळया दगडावरची रेष...या सगळ्यात
नंदा माई कायम सोबत असायच्या....
अर्जुन अण्णांचा एकुलता एक वारसदार तो सुध्दा आता अण्णांच्या पावलावर
पाऊल ठेऊन व्यवसाय वाढवत होता. नव नवीन तंत्रज्ञान वापरून प्रयोग करून व्यवसाय फैलावत
होता... आख्या पंचक्रोशीत जहागीरदार घराण्याचे नाव खूप आदराने घेतले जायचे...
नाश्ता करताना अण्णांना एकदम आठवून अर्जुनला ते म्हणाले,
" अरजा, आज मला आपल्या कालीजात बोलवलं आहे प्रमुख पाहुन्याचा
सत्कार कराया..तीत चित्रांच मोठं प्रदर्शन केलंय... पार शहरातून मुल मुली येनार आहेत..पण
मला ऐन टायमाला दूध कमिटीच्या मीटिंगला जावं लागतंय..तिथे किती येळ लागलं म्हाईत न्हाही..पाहून्यांचा
खोळंबा नग माझ्या पाई..जाशील का तेवढं"
" जातो अण्णा..किती वाजता जायचं आहे."
" तो काय तुमचा सबुद मोडत न्हाय माहीत आहे तुम्हाला. लेकरू
गुनाच हाय माझं." नंदामाई नी बोटं ओवाळून कानाजवळ मोडली.
***** ***** ***** *****
अर्जुन कॉलेज मध्ये पोहोचला..गाडी लावली आणि निघाला पोहोचायच्या
आधी त्याने प्रिन्सिपॉल ला कळवल होत माझा मी येईन मला घ्यायला, स्वागताला कुणाला पाठवू
नका..मला ते आवडत नाही .अर्जुन जरा आधीच पोहोचला होता . आपले कॉलेजचे जुने दिवस आठवत
तो जात होता इतक्यात धाडकन कुणाला तरी धडकला...
काय घडलं हे कळायला काही सेकंद गेली..
" ओ मिस्टर काय बागेत फिरताय का...लक्ष कुठेय? "
" सॉरी... माझं खरच लक्ष नव्हतं. मी जरा घाईत होतो. "
"अहो ! सॉरी म्हणुन कुठे निघालात...हे कोण उचलून देणार.
" एक खट्याळ हसू आणून ती मुलगी बोलत होती.
अर्जुन नी पाहिलं तर आजू बाजूला पेपर पडले होते..काहींवर अतिशय सुंदर
चित्र पेन्सिल स्केच होती..
" मी ...देऊ? उचलून ?."
" हो, मग पाडली तुम्ही पण ना...मला प्रदर्शनाला आधीच
उशीर झालाय...द्या.. द्या पटकन मदत करा मला हे उचलायला."
मोठे मोठे डोळे करत बोलणारी, एक खट्याळ हसू असणारी ती मुलगी त्याला
पहिल्या भेटीतच एकदम आवडून गेली...
***** ****** ******
प्रदर्शनाचे उद्घाटन झाले ...पाहुण्यांचे सत्कार झाले.
अर्जुन चे छोटे खानी भाषण झाले... खर तर अर्जुन सत्कार करून निघून
येणार होता पण त्या मोठया डोळे वालीच नाव आणि चित्र पाहण्याचा मोह त्याला झाला होता..
अतिशय सुंदर चित्र मुला मुलींनी काढली होती .शेवटी त्याला ती चित्रवाली
दिसली... सुरेख पेन्सिल स्केचेस.विठू रखुमाई...गावातली देवळ, गावातली देऊळ , नदीवर
पाणी भरणाऱ्या बायका, शेतात काम करणारे गडी...अप्रतिम होत सगळ..प्रत्येक चित्रात साधेपणा...एक
आपले पणाची ओढ...सहज समजणारी चित्र.....
मुक्ता...प्रत्येक चित्रा खाली लफ्फेदार सही....नाव तर समजलं मुक्ता...त्याच्या
मनात पहिल्यांदाच वेगळ्या अनामिक भावना निर्माण होत होत्या...कुणी तरी आवडलं अस वाटत
होत.
मुक्ताच्या चित्रां जवळ अर्जुन येताच तिच्या छातीत धडधड वाढू लागली..सकाळी
आपण कुणाशी पंगा घेतला हे तिला जाणवले...अर्जुन जवळ येताच ती हळूच काना पाशी जाऊन म्हणली,"
माफ करा हा..मी दुपारी ओळखले नाही तुम्हाला."
" ओळखले असते तर भांडला नसता का.?"
तिची भंबेरी उडालेली पाहून त्याला एकदम मजा वाटली.
तिच्या चित्रांच कौतुक करून अर्जुन पहुण्यासोबत पुढच्या टेबलवर गेला...
***** ***** ******
" अरजा काल बोलायला जमलं नाही,नीट लागली ना सगळी व्यवस्था काल
?".
" चांगला झाला अण्णा.. कार्यक्रम."
" हा..तसा प्रिंसिपल सायबांचा फोन अलता मला...अर्जुन साहेब
छान बोलले.. जातीन लक्ष दिलं सगळी कडं असाच साधा राहून मोठा हो पोरा...सोबत शेवट पर्यंत
फकस्त मानस राहत्यात..पैसा पर्शिद्धी नाय."
" हो, अण्णा.."
प्रदर्शनाचा विषय निघताच अर्जुनला कालच्या घटना आठवायला लागल्या...
मुक्ताची झालेली धडक, तिची अप्रतिम साधी चित्र...आपण कोण आहोत हे समजल्यावर तिचा उडालेला
गोंधळ ...ते मान झुकवून माफी मागण....
" अरे ! नाश्ता कर..लक्ष कुट हाय ?" नंदा माईच्या आवाजाने
अर्जुन दचकला.
***** ***** *****
प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार होत...त्यात चित्रांची विक्री सुद्धा
होणार होती .
अर्जुन आज पण वेळ काढून प्रदर्शनाला आला....आजू बाजूच्या शहरातून
आणि जिल्ह्यांमधून अनेक जण प्रदर्शनाला भेट देत होते...मुक्ता त्यात बिझी होती..अर्जुन
तिच्या टेबल जवळ आला...
" नमस्कार.. "
" पण मी कालच तुम्हाला सॉरी म्हणाले होते, आज का आलात परत तुम्ही.मी
परत काही चुकले का ?".
मुक्ताच्या याच साधे पणाच्या अर्जुन प्रेमात पडायला लागला होता.
जे असेल ते सरळ सोप्प...कुठे बोलण्यात खोट नाही.
"अहो..ते सॉरी प्रकरण मी विसरून पण गेलो...मी काल तुमच्या इथे
एक सुंदर विठू रखमाई च स्केचं पाहिलं होत ते घ्यायचं होत म्हणून आलो होतो. तर तुम्ही
मला जाबच विचारू लागलात परत का आलात म्हणून."
" सॉरी सर...मला तस म्हणायचं नव्हतं. "
" अर्जुन जहागीरदार नाव आहे माझं ..सर वैगरे नको."
"अर्जुन सर, ते चित्र कालच गेलं विकल दुसरं कोणत बघता का.?"
" दोन गोष्टी मला नुसतं अर्जुन म्हणा आणि मला तेच चित्र हवं
होत."
" मी बनवून देते दुसरे चालेल. ?"
मुक्ता नी ते चालेल इतकं मोहकपणें विचारलं की अर्जुन अजून खलास झाला...
" ओके मी उद्या येतो.."
" नाही सर...म्हणजे नाही अर्जुन सर..म्हणजे नुसतं अर्जुन....लगेच
नाही होणार...वेळ देऊन करावं लागणारं काम आहे..प्रदर्शन संपल की देते."
अर्जुन उगाच बाकी चित्र बघत बसला ..तिच्या टेबलवर खुप गर्दी झाल्यावर
तिला मदतीला थांबला..
***** ****** *******
मुक्ता अर्जुनचा विचार करत बेड वर पडली होती...इतका मोठा माणूस पण
किती साधेपणा...अशी माणसं अजून आहेत ???...चार दिवसात किती छान मैत्री झाली आपली..मला
त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जाणवतंय पण त्यात वासना, लालसा ,लोभ नाहीये ती नजर
निर्मळ आहेत..त्यांचे आई वडील पण खूप साधे असतील....असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं...आपण
कधी जोडीदार कसा हवा याचा विचारच केला नाही...कारण तो हक्कच देवाने आपल्याला दिला नाही
..असो , जे प्रारब्ध समोर ते स्वीकारावे....डोळ्यातून ओघळणारे पाणी पुसत मुक्ता औषध
घ्यायला उठली.
***** -****** ******
"उद्या प्रदर्शन संपणार, तू रोज येऊन मला खूप मदत केली."
" मुक्ता मला तुझ्या या चित्रांच्या दुनियेत खूप छान वाटायचं..तुझी
चित्र खूप बोलकी आहेत. उद्या पासून हा हॉल पुन्हा निर्जीव होऊन जाईल. चार पाच दिवस
त्याने पण रंगीबिरंगी दुनिया अनुभवली. "
" माझ्या आयुष्यासारखी ..काही दिवसांची ..." मुक्ता पाणावलेल्या
डोळ्यांनी म्हणाली.
" म्हणजे????"
"काही नाही, ऐक ना मला एक मदत हवी होती अर्जुन..मला या गावात
राहून काही स्केच करायची आहेत.माझी कुठे सोय होईल का काही दिवस राहायची. "
" अग कुठे कशाला आमच्या वाड्यावर ये की..." अर्जुन ला
आनंदाने काय करू न काय नको असे झाले .मुक्ता वाड्यात आली तर अण्णा आणि नंदामाई ची पसंती
घेणं सहज शक्य होत... अण्णा माईंनी एकदा त्यांच्या अनुभवी नजरेतून स्वीकारलं
की मग तो तिला लग्नाची मागणी घालणार होता...तसही उद्या पासून ती भेटणार नाही म्हणून
त्याचाही जीव खट्टू होत होता..
" आधी तू घरी विचार मग आपण पुढचं ठरवू. "
****** ******* ******
" अरे अर्जू तुला कधी पासून मैतरणी झाल्या र...बर कोण कुठची
विचारलं हाय का? " अण्णांच्या अनुभवी नजरेतून अर्जुनच्या डोळ्यात दिसणार प्रेम
सुटलं नाही.
" येऊ दे की , सून म्हनून आनतोय की त्या पोरीला मदत म्हनून
सांग मला " नंदा माईंनी हळूच गालावर चापटी मारत विचारलं.
आई वडिलांची अनुभवी नजर पाहून अर्जुन कावरा बावरा झाला..
माई आणि अण्णा गालात हसत होते.
****** *****
मुक्ता साठी खोली साफ झाली...साधी कॉटन ची साडी नेसलेली..मुक्ता
आल्या आल्या अण्णा माईंच्या पाया पडली..
"कुन्या गावाची पाहुनी तू ?"
" शेलारवडीच्या देशमुखांची... शिकायला शहरात होते."
" अरे शेलारवडीचे देशमुख लई सज्जन मानस...रहा रहा निवांत रहा.."
या सालस ,साडीत आलेल्या मुलीला पाहून माई पण निर्धास्त झाल्या..शहरातली
मुलगी वाड्यात कशी राहील ही त्यांना चिंता होती.
मुक्ता आली आणि वाड्याची झाली..दुधात साखर विरघळून जावी इतकी सहज
घरात मिसळून गेली.
****** ****** ******
आता नाश्त्याला चार जण जमू लागले..कधी मुक्ता नाश्ता बनवून घेऊन
यायची , कधी माई... टेबल वर आता नव नवीन विषयांवर गप्पा रंगू लागल्या होत्या.
मुक्ताची चित्रकला आणि अर्जुन चा व्यवसाय दोघंही दुर्लक्ष
करत नव्हते. त्यामुळे अण्णा माईंची पण काही तक्रार नव्हती.
रात्री जेवण झाल्यावर रोज दोघं पारावर गप्पा मारत काही वेळ बसायचे...
गप्पांमधून एकमेकांच्या अवडी निवडी समजत गेल्या...संध्याकाळी अर्जुन
दमलेला दिसला तर रात्री भेटायच्या वेळी मुक्ता गरम हळद दूध जायफळ घालून घेऊन यायची
जे अर्जुन ला खूप आवडायचे..
मुक्ता कधी थकलेली दिसली की अर्जुन मोगरी च्या वाफ्या पाशी खुर्च्या
टाकून गप्पा मारायला बसायचा.
अव्यक्त प्रेम हळू हळू फुलत होत...पण कुणी बोलत नव्हत किंवा कुणी
मर्यादा सोडून वागत नव्हत..या प्रेमात अपेक्षा नव्हत्या तर होता एक निरपेक्ष शुद्धपणा...केवळ
सोबतीची ओढ...
मुक्ता खूप सावरून व्यक्त व्हायची काही म्हणता काही होऊन बसलं तर
आपण मोडून पडू आणि जे नशिबी नाही त्याची स्वप्न तरी का पहावी..तिची ती स्वतःला समजावत
असे..अर्जुनला तीच हे अलिप्तपणे व्यक्त होणं काही वेळा खटकायच...
स्वयंपाक घरात एकदा मुक्ता आणि माई जेवणाची तयारी करत होत्या
...तेव्हा माईंनी विचारलं
" मुक्ते, कसा नवरा हवा ग तुला..?"
अनपेक्षित या प्रश्नाने ती एकदम गडबडली.
" नाही विचार केला. "
" आमचा ल्योक कसा वाटतो. ?"
"........"
" अग , सांग लाजू नग. "
"नाही माई ते खूप चांगले आहेत ..पण मी नाही तसा विचार करू शकत."
" का ग...? कुणी हेरला आहे की काय दुसरा. ?? हे बघ तस असल तर
तू वेळेत त्याच्या पासून लांब हो...तो जादा हळवा हाय "
कुणी काहीच बोललं नाही.विषय तिथेच थांबला.
***** ***** *****
त्या रात्री मुक्ता पारावर यायला उतरली नाही...अर्जुन वाट पाहून
निघून गेला..दोन तीन वेळा त्याला तिने टाळलं...मग अर्जुंचे कामात लक्ष लागेना.
रात्री त्याने भामाबाई ला मुक्ता ला बोलवायला पाठवले.
मोगरी पाशी तो येऊन बसला होता...
" काय झालं तुला ,कुणी काही बोललं का...काय एकदम येईनाशी झाली.
"
मुक्ता खाली मान खालून रडू लागली...आणि मानेने फक्त नाही नाही म्हणत
होती.
"अग बोलल्या शिवाय मला कसे कळेल..काय झाले. "
" अर्जुन..मी काय बोलते ते नीट शांतपणे ऐक.
मला तुझ्या डोळ्यात पहिल्या पासून प्रेम दिसत होत..आणि मला ते आवडत
होत..त्यात खूप निस्वार्थीपण होत.. माझं रूप, माझी घरची शेती पैसा काही तुला कधीच महत्वाचं
वाटलं नव्हत...सुरवातीची मैत्री आपली प्रेम याच भावनेने होती ..इंग्लिश मध्ये म्हणतात
तस लव एट फर्स्ट साईट... तस...आपण एकमेकांची आवड जपायला लागलो ते काही उगाच नाही, सोबत
मिळावी म्हणून वेळात वेळ काढू लागलो ते उगाच नाही..तुझ्या वाड्यात मी यायला लगेच तयार
झाले कारण माझ्या मनात पण तुझ्या बद्दल एक अनामिक भावना निर्माण झाल्या आहेत.पण आपलं
हे नातं पुढे नाही रे जाऊ शकणार..." मुक्ताच्या डोळ्यातली पाणी थांबत नव्हत.
" अग का नाही नेऊ शकत आपण आपलं नातं पुढे ? बरं झालं तूच विषय
काढला, मला तुझा साधेपणा पहिल्या भेटीतच आवडला होता...अग प्रेम म्हणजे वस्तू देणं
,मिठ्या मारणं ,हातात हात घालून फिरणं ,सतत माझं प्रेम आहे प्रेम आहे म्हणणं हे माझ
स्वप्न कधीच नव्हत...मी माई, अण्णाच प्रेम बघितलं आहे.. अण्णा थकलेत , नाराज आहेत हे
त्यांनी शब्दांनी कधीच माईला सांगितलं नाही...माई ते बरोबर ओळखायची. आजही असे काही
झाले की ती अण्णांच्या आवडीचा बेत जेवणात करते..त्यांना त्रास होईल असे विषय शक्यतो
काढत नाही...रात्री पायाला तेल लावून बोलता बोलता त्यांच्या मनातली सल काढून घेते..
अण्णांची पण तीच पद्धत माई चां चेहरा कधी उतरलेला दिसला की येताना एक सोंनचाफ्याची
वेणी ते माई ला घेऊन येतात...किंवा जेवणात तिला सांडग्याची भाजी आणि दही मिरची खूप
आवडते मग ते खूप दिवसात सांडगा खाला नाही करा बर रात्री अस सांगून जातात...अण्णा ना
जेव्हा धंद्यात तोट बसली माईनी न सांगता सगळे दागिने समोर आणून ठेवले त्यांच्या...अग
दिखव्या पेक्षा हे निशब्द प्रेम फार बोलून जात ग "...
" हो रे मला पण हाच साधेपणा आवडतो पण... पण अर्जुन मला सेरेब्रल
ॲमिलॉइड अँजिओपॅथी हा आजार आहे याला इलाज नाही .एका टप्प्यावर वर हा आजार माणसाला स्मृतीभ्रांशा
कडे पोचवतो..किंवा एका क्षणी मुक्त पण करतो..म्हणून तर मी भरभरून स्केचिंग करून ठेवते...उद्या
मी सगळं विसरले तर मला कदाचित या चित्रांच जग नका साथ देईल... मला माझ्या मामा मामी
नी वाढवलं आई बापाला मी पाहिलं नाही...यांनीच भरभरून प्रेम दिलंय . त्यांना पण हे अजून
सांगितलेलं नाही.गेल्या वर्षी याची लक्षण दिसू लागली मी हॉस्टेल वर होते तेव्हापासून.त्या
भाबड्या लोकांना कळणार पण नाही हा आजार खूप दुःख सोसले आहे त्यांनी ..म्हणून म्हणते..माझ्यात
गुंतू नको.."
एक भयाण निशब्द शांतता....फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या फांद्याचा
आवाज बराच वेळ जाणवत होता..कुणी काही बोलत नव्हते....
अर्जुननी शांतपणे विचारलं .".किती वेळ आहे तुझ्या कडे...".
"अर्जुन अरे..."
"मी विचारले किती वेळ आहे तुझ्या कडे.? "
" माहीत नाही...एक महिना दोन महिने किंवा वर्ष सुध्धा.."
"उद्याच अण्णा माई शी बोलतो आपण लवकर लग्न करतोय....जेवढा वेळ
आहे तेवढा ...एकत्र प्रेम करत एकमेकांची काळजी घेत जगू..कदाचित या प्रेमा मुळे
तुझा आजार लांब पळेल..आणि जरी तुला स्मृती भ्रंश
झाला तु मला ,आपलं जग विसरलीस तरी मी तुला कायम जपेन हा माझा शब्द
आहे.."
मुक्ता नी आवेगाने अर्जुन ला मिठी मारली , भरपूर रडून घेतलं...कधी
नव्हे ते तिला आज मोकळं वाटत होत...
अर्जुन शांतपणे तिला थोपटत राहिला....आज मोगरी आनंदाने डोलत होती..,
***** ****** ******
अण्णा माईंनी या निर्णयात खूप मोलाची साथ अर्जुन ला दिली..साधे सोपे
कुणासाठी नव्हते पण एकमेकांच्या प्रेमासाठी एकमेकांसोबत सगळे उभे राहिले...
अर्जुन मुक्ता चे लग्न झाले..तीन वर्ष त्यांनी एकमेकांसोबत सुखात
काढली ....मुक्ता जाताना एक छोटी मुक्ता घराला देऊन गेली..प्रेमाची आठवण म्हणून...
****** ****** ******
प्रत्येक प्रेमकथा सारखी नसते एखादी अशीही अव्यक्त, अधुऱ्या प्रेमाची
आणि जगावेगळी प्रेमाचा खरा अर्थ शिकवणारी असू शकते.
रमा.....
रेश्मा डोळे (८८०६१९३३७७).
पुणे.
disclaimer

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box