अव्यक्त - डॉ. शकील मोमीन



अव्यक्त

डॉ. शकील मोमीन

तो सोमवार होता, दिवसभराचे काम संपले, त्यानंतर उद्या ज्या शस्त्रक्रिया ठरलेल्या आहेत त्या रुग्णांना भेट देऊन घरी परतणे हा माझा रोजचा पायंडा असतो. भूलतज्ज्ञ म्हणून शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला भेटणे आणि तपासणे शस्त्रक्रियेच्या होणाऱ्या उपयुक्तेसाठी चांगले असते. डायरी काढून पाहिली तर तीन दिवसानंतर

गुरुवारच्या ठरलेल्या शस्त्रक्रियेचा रुग्ण आज इस्पितळात दाखल होणार होता आणि त्याला मी आज

तपासण्याची नोंद माझ्या डायरीत लिहिलेली होती. त्या रुग्णाची सर्व माहिती आणि सर्व तपासणी अहवाल

वॉट्सअप वर मिळालेले होते. या रुग्णाला स्वादुपिंडाचा कर्क रोग झाला होता आणि त्यासाठीची व्हिपल ही

शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या शस्त्रक्रियेमध्ये स्वादुपिंडाचा रोगग्रस्त भाग आणि त्या बरोबर लहान

आतड्याचा आणि पित्ताशयाच्या कांही भाग काढून टाकावा लागतो. तीन प्रकारच्या जोडण्या कराव्या

लागतात. उरलेले स्वादुपिंड, पित्ताची नलिका आणि जठर पुढील लहान आतड्यास जोडावे लागते. हे बरेच

जिकिरीचे, वेळखाऊ आणि त्रासदायक काम असते. परंतु ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. शस्त्रक्रियेपासून खूप

फायदा होतो असे नव्हे परंतु रुग्णाला होत असलेला त्रास कमी करण्यासाठी हाच जास्त योग्य पर्याय होता

म्हणून शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त होते. मी आज प्रत्यक्षात रुग्णाची भेट घेऊन, तपासून झाल्यावरच सर्जन आणि

मी, रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेचा फायदा आणि त्यातील धोका याची कल्पना देणार होतो.

त्यानंतरच शस्त्रक्रियेचा अंतिम निर्णय होणार होता. म्हणून तीन दिवस अगोदर माझी भेट आवश्यक होती.

रुग्णाचे रिपोर्ट जरी मी पाहिलेले होते तरी नाव वगैरे माझ्या लक्षात नव्हतेच, म्हणजे नावाकडे माझे

लक्षच गेले नव्हते, फक्त रुग्ण, एक वयस्कर स्त्री आहे एवढेच लक्षात होते. रुग्णालयात गेल्यावर सेमी-स्पेशल

रूम मध्ये रुग्ण असल्याची माहिती मिळाली आणि स्त्री रुग्ण असल्याने एका परिचारिकेला सोबत येण्याची

विनंती करून मी तिकडे रवाना झालो.

खोलीत जाऊन रुग्णाकडे एक हसतमुख कटाक्ष टाकून स्वतःची ओळख करून देण्याचा प्रघात मी पाळत

असे. या रुग्ण स्त्री कडे पहिले आणि मी थोडा स्तब्ध झालो. हो, ही ती होती, माझी लहानपणीची वर्गमैत्रिण

“शाबेरा” मला ओळख करून देण्याची गरज नव्हती, मी कांही विचारायच्या अगोदर कसा आहेस? म्हणून

तिनेच मला प्रश्न विचारला. प्रत्यक्षात या आजारपणात तिला खूपच त्रास होत होता, परंतु माझ्याशी बोलताना

तिच्या चेहऱ्यावर त्रास किंवा ताण याचे कांहीही लक्षण नव्हते. रक्तदाब, श्वसनसंस्था वगैरेची सखोल तपासणी

करून, मी तिला आश्वासित केले आणि शस्त्रक्रिया आवश्यक असली तरी मोठी आणि धोक्याची आहे हे रुग्णाला

न घाबरवता सांगितले. तिने फारसा विचार न करता, कितीही धोका असला तरी चालेल, मी शस्त्रक्रियेला

तयार आहे. माझा तुम्हा सर्वांवर ठाम विश्वास आहे, असे छातीठोकपणे सांगितले. तरीही सुस्पष्ट आणि संपूर्ण

कल्पना नातेवाईकांना देण्यासाठी त्यांना मी सर्जनच्या केबिन मध्ये घेऊन गेलो. तिची दोन्ही मुले आणि पती,

अतिशय चिंताग्रस्त भावनेने आमच्याशी बोलत होते. त्यांनी सांगितले की रुग्ण स्वतः, आत्तापर्यंत खूपच

घाबरलेली आणि शस्त्रक्रिया नकोच असा आग्रह धरीत होती, ती अचानक पणे एका पायावर शस्त्रक्रियेला

हसतमुखाने तयार झाली हे अगदी आश्चर्याचे आहे. माझ्याशी बोलताना पहिला प्रश्न तिने विचारला होता, आणि

 

ती मला ओळखत होती हे त्यांच्या लक्षात आले नव्हते, परंतु माझ्याशी बोलल्यावर ती जास्त आश्वस्त झाली हे

त्यांनी कबुल केले. मी ही माझी पूर्वीची ओळख आहे हे कांही आवर्जून सांगितले नाही, परंतु त्या सर्वांचा

माझ्यावर चांगलाच विश्वास बसला, एव्हढे मात्र खरे!

मी चवथीत त्या शाळेत प्रथम गेलो. वडिलांची दर दोन तीन वर्षात बदली होत असल्याने

साताऱ्यातील म्युनिसिपाल्टीच्या सतरा नंबर शाळेत मी चवथीच्या जुलै महिन्यात दाखल झालो. तिथे प्रथम,

शाबेरा माझी वर्गमैत्रिण म्हणा किंवा मैत्रीण झाली. वर्गात हुशार परंतु वयाने आणि शरीराने लहान होतो.

थोराड मुले मला छळण्याचा प्रयत्न करीत असत, तेंव्हा, हीच मध्ये पडून माझा बचाव करीत असे. सुट्टीच्या

वेळी, मुले आणि मुली वेगळे वेगळे खेळत असले तरी तिचे बरेच लक्ष माझ्या कडे असायचे. खेळताना धडपडणे

हा कदाचित माझा स्वभाव धर्म होता, त्यामुळे गुढगे किंवा ढोपरांना खरचटणे हा माझा नित्यक्रम असे. आणि

कशी कोणास ठाऊक या जखमांवर फुंकर मारण्यास आणि हेडमास्तरांच्या खोलीतून लाल औषध आणून

लावण्यास ती सर्वप्रथम हजर असायची. मधल्या सुटीत डबा खाण्यासाठी तर नेहमीच सोबत असे. आपल्या

डब्यातील दोन घास मला भरविण्याची तिला खोड होती. एरव्ही शांत दिसणारी शाबेरा माझ्याशी बोलताना

अघळपघळ बोलत राहवयाची. म्हणजे इतर वेळी शांत समुद्रासारखी गंभीर वाटणारी माझ्याबरोबर मात्र

खळाळत्या झऱ्यासारखी वाटत असे. मी देखील इतर मुलींशी बोटाना मुखदुर्बळ असे परंतु तिच्याशी बोलताना

मात्र खुललेला असायचो. वर्गात आमची गट्टी आहे हे सर्वांना माहित होते, परंतु, या गट्टी ला कोणी कोणते नाव

दिले नव्हते. तारुण्यात असतो तर प्रकरण म्हणून गाजले असते.

नेहमीप्रमाणे मी सातवीमध्ये प्रवेश केला आणि वडिलांची फलटणला बदली झाली. पुनश्च गाव आणि

शाळा बदलणे आले. आतापर्यंत तीन वर्षात मी या शाळेत चांगला रमलो होतो. मित्र मैत्रिणी बरोबर चांगले

जमले होते. तसा लोकप्रिय देखील झालो होतो. त्यामुळे असेल किंवा माहित नाही का, परंतु माझा निरोप

समारंभ आमच्या वर्गाने आयोजित केला होता. या तीन वर्षात पांच दहा तरी विद्यार्थी शाळा सोडून इतरत्र गेले

होते परंतु निरोप समारंभ फक्त माझाच झाला, आणि या सर्वात पुढाकार शाबेराचाच होता. वर्गातर्फे मला जी

भेटवस्तू देण्यात आली, (कांचेचा शोपीस) माझ्याकडे पुढे जवळजवळ, वीस एकवर्षे टिकून होता. पुढे कधीतरी

असेच घर बदलताना नाहीसा झाला. या निरोप समारंभात निग्रहाने आपले अश्रू लपवीत असलेला तिचा चेहरा

कायम, म्हणजे अजूनही माझ्या स्मरणात राहिला.  त्यानंतर कधी भेट होईल न होईल हे नियतीच जाणो!

मी अकरावीत असतानाची गोष्ट आहे. आईच्या आजारपणामुळे तिला महिन्या पंधरा दिवसातून एकदा

मिरजेला घेऊन जावे लागत असे. त्या दिवशी डॉक्टरांची भेट घेऊन एस टी ने परत येण्यासाठी मिरजेच्या स्टॅन्ड

वर पोहोचलो. समोर एस टी दिसली आणि त्यात पुढच्या रांगेत बसलेली ती सुद्द्धा दिसली. क्षणात निर्णय

घेऊन तिच्या पुढील बाकावर दिसलेली मोकळी जागा पटकावण्यास मी अक्षरशः धावलो. आई थांब थांब म्हणे

पर्यंत मी बसलो ही होतो. आई नंतर सावकाश आली. मी तिला किंवा तिने मला तत्काळ ओळखले आणि

कोणतीही औपचारिकता न दाखविता आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. तिच्या बरोबरही तिची आई होती

आणि त्या दोन्ही स्त्रिया एकेमकीशी आणि मी शाबेरा बरोबर प्रवास संपेपर्यंत गप्पा मारीत होतो. माझ्या

अभ्यासाबद्दल तिने चौकशी केली. ती एस एस सी झाल्यावर शिक्षण बंद करणार असे सांगितले, कारण त्यांच्या

घरात कोणीच तिच्या शिक्षणाबद्दल उत्सुक नव्हते, अर्थात तिच्यासहित! मला वाईट वाटले, म्हणून, तिला

 

आणखी शिकण्याचा आग्रह ही मी धरला, परंतु ती या निर्णयावर ठाम होती. एरव्ही कोणत्याही मुलीबरोबर,

अगदी बहिणीच्या मैत्रिणी बरोबर ही न बोलणारा मी एका अनोळखी मुलीबरोबर गप्पा मारतोय हे पाहून

माझी आई आश्चर्यचकित झाली होती. परंतु आम्ही लहानपणी एकत्र शाळेत होतो हे सांगितले तरी आई जराशी

संशयानेच पाहात होती. तसे आम्ही आता तारुण्याकडे झुकू लागलेले होतोच. आमच्या गावाच्या स्टॅन्ड वर एस

टी थांबली आणि आम्ही उतरलो. ती एस टी तुन पुढे गेली. एस टी दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे आणि ती

माझ्याकडे पाहत होतो, आणि, अगदी शेवटी हात हलवीत मी तिला बाय केले. आता पुन्हा केंव्हा भेट होईल

कोणास ठाऊक?

त्यानंतर अनेक वर्षे आमची एकमेकांशी भेट झाली नाही. मी लग्नानंतर मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला

गेलो होतो. सनसेट पॉंईंट वर सनसेटची वाट पाहत पत्नी बरोबर बाकावर बसलो होतो, तेंव्हा अचानक कोठून

ही उगवली माहित नाही. माझ्या पत्नीच्या शेजारी बसून गप्पा मारू लागली. पत्नीला मधुचंद्राला आला आहात

आणि असे इतके लांब लांब काय बसताय म्हणून माझ्या कडे सरकवून अघळपघळ गप्पा मारू लागली. बोलत

माझ्या पत्नीशी होती, परंतु फक्त शब्दांनी. तशी ती माझ्याशी डोळ्यानेच बोलत होती. तेवढ्या दहा पंधरा

मिनिटात माझी माहिती पत्नीकडून तिने काढून घेतलीच. ती तिच्या पती आणि दोन जुळ्या मुलांबरोबर आली

होती. पतीला मुलांबरोबर दुसरीकडे सोडून सूर्यास्त इथून चांगला दिसतो म्हणत आमच्या शेजारची जागा तिने

पटकावलेली होती. आपलीही जुजबी माहिती तिने सांगितली, परंतु आमची असलेली पूर्वीची ओळख तिने

दर्शवली नाही. कदाचित माझ्या मधुचंद्राच्या आनंदात पत्नीच्या मनात संशयाच्या भुंग्याचा गजर तिला

टाळायचा असेल. माझ्या पत्नीला मी तिला ओळखत असें याची शंकाही आली नाही.

त्यानंतर अशीच दोन चार वर्षाने कोठेतरी ती गाठ पडायची. केंव्हाही भेटलो, आणि कितीही बदललो

असलो तरी आम्ही एकमेकाला त्वरित ओळखत असू. बस, रेल्वे शॉपिंग मॉल असे कोठेही आम्ही अचानक गाठ

पडत असू. एकदा बायकोसाठी वाढदिवसाची भेट म्हणून साडी घेण्यासाठी साड्यांच्या दुकानात गेलो. तेंव्हा

अगदी देवासारखी ती भेटली. माझ्या बायकोला कोणती साडी आवडेल आणि शोभून दिसेल हे तिने मला

दाखवून दिले. एका भेटीत तिने माझ्या बायकोला ओळखले होते आणि माझ्यासाठी पसंद ही केले होते. त्यानंतर

तिची भेट ही या रुग्णालयात ती गलितगात्र अवस्थेत असताना पडली. मला खरे म्हणजे गहिवरून आले होते,

परंतु, डॉक्टरकी निभावणे हे प्रथम कर्तव्य असल्याने भावनांवर नियंत्रण ठेवणे मला अत्यंत गरजेचे होते. या

भेटीत रुग्ण म्हणून तिला, माझ्यासमोर पाहणे ही मला दुःखदायक होते, आणि, त्यातून हा आजार अतिशय

दुर्धर होता. सर्व तपासण्यावरून जाणवत होते की यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ही कांही महिन्यापेक्षा जास्त आयुष्य

तिच्याकडे शिल्लक नव्हते आणि उरलेले आयुष्य कमीतकमी दुःखकारक राहण्यासाठी वैद्यकीय मदत ही तिला

बरीच लागणार होती. भूलतज्ज्ञ म्हणून आम्ही क्लेशनिवारक शुश्रूषा म्हणजे Palliative Care याचीही

जबाबदारी घेत असतो. या शस्त्रक्रियेनंतर तिला Palliative Careची खूपच गरज लागणार होती.

मुख्य शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. त्यानंतर ही कांही दिवस सलाईन वर ठेवावे लागणार होते.

वेदनाशामक औषधांची ही खूप गरज होती. मी रोजच तिला भेटत होतो. तसे इतर रुग्णांना इस्पितळाचे

कर्मचारी माझ्या सूचना बरहुकूम उपचार करायचे, परंतु हिला मी स्वतः उपचार देत होतो. साधे सलाईन

बदलावयाचे असेल तर इतरांकडून इंजेक्शन घेण्यास ती नाखूष असायची, हाताची शीर सापडत नाही अशी

 

कर्मचाऱ्यांची तक्रार आली की मला पाचारण केले जायचे. इतर कोणी इंजेक्शन देत असताना कळवळणारी ती,

मी इंजेक्शन देताना चेहऱ्यावरील स्मित मावळू देत नसे. जणू, माझ्या स्पर्शाने तिचे वेदनाशमन होत होते. आठ

दहा दिवसात घरी जाण्याइतपत ठीक झाल्यावर इस्पितळातून तिची सुटका झाली. आजार संपूर्ण बरा झाला

नव्हता, परंतु, थोडाबहुत आटोक्यात आलेला होता. या पुढे आजार वाढू नये म्हणून द्यायची केमोथेरपी एक

दोन महिन्यांनी चालू करावयाची होती. तो पर्यंत वेदनाशमनासाठी ती इस्पितळात येत असे. मी तो सल्ला

शक्य तितक्या वेळा भेटून देत होतो.

केमोथेरपी सोपी नव्हती. एक दोन दिवस इस्पितळात दाखल करून सलाईन मधून औषधे दिली

जायची. हा सगळं त्रासदायक प्रकार ती चुपचाप सहन करीत होती. परंतु लक्षणे चांगली नव्हती आजार म्हणावे

तितका आटोक्यात येत नव्हता. कदाचित आणखी कांही महिनेच शिल्लक दिसत होती. या सहा एक महिन्यात

अगदीच नाही तरी आठवड्यातून दोन तीनदा तरी आम्ही भेटत होतो. नजरेने दिलेला माझा आधार ही तिला

पुरेसा वाटत असे. मला तिचे असणे हेच मानसिक बळ वाटत होते. शेवटी तो दिवस उगवला. ज्योत हळू हळू

विझते तशी ती विझत चालली होती. शेवटचे कांही दिवस ती इस्पितळातच दाखल होती. सर्व नातेवाईक जवळ

होते. मी जवळपास आलो तर ती क्षणभर का होईना उल्हसित दिसायची. नातेवाईकांच्या ही हे लक्षात आले

होते. त्यामुळे मला बोलावण्याचा आग्रह नातेवाईक विशेषतः तिची मुले धरायची आणि मला शक्य असेल तेंव्हा

माझी पावले ही तिच्या खोलीकडे वळायची.

त्या शेवटच्या दिवशी, मला माहीत होते की आता करण्यासारखे कांहीही नाही, आणि फक्त मृत्यूची

वाट पाहणे हेच आमच्या हातात होते. नातेवाईकांना कल्पना दिली होती, परंतु तरीही मी हजर राहावे ही

त्यांची ईच्छा असल्याने मी हजर होतो. पती, मुले, सुना नातवंडे असे सर्वजण हजर होते. मी दूर कॉट च्या

पायथ्याशी शांतपणे हाताची घडी घालून उभा होतो. तिने नजर उचलून माझ्याकडे पाहिले आणि चेहऱ्यावर

एक बारीक स्मित ठेवत हळू हळू तिने प्राण सोडला. सर्वांच्या लक्षात आले आणि खोली आक्रोशाने व्यापली.

मला अश्रू दाखवण्याची, डॉक्टर असल्याने, सोयच नव्हती. गच्च डोळे मिटत तिच्या मुलाच्या खांद्यावर एक हाथ

ठेवला आणि तात्काळ खोलीतून बाहेर पडलो. आता कधीही, कोठेही ती मला भेटणार नव्हती हे सत्य मला

आत्मसात करणे आवश्यक आहे हे मी जाणून आहे.

आमचे नाते काय होते? माहित नाही, परंतु ती गेल्यानंतर आता जाणवतंय की कांही तरी हरवलंय.

माझं नव्हतं आतापर्यंत, पण, आज मात्र कायमचं हरवलंय.

प्रेम म्हणजे नक्की काय असते? माया ममता हा एकतर्फी प्रकार असू शकतो. परंतु, प्रेम कधीही एकतर्फी

असत नाही. एकतर्फी असेल ती फक्त वासना असू शकते. प्रेम कायम दुतर्फ़ाच असावे. प्रेमाला स्पर्शाची गरज

नाही, संवादाची गरज नाही. फक्त अस्तित्वात असण्याची गरज आहे. आणि अस्तित्व संपल्यावर प्रेम ही

संपलेच! खरोखर प्रेम संपेल? नाही तरीही प्रेम अमर आहे, शरीर संपले तरी काय झाले, आत्मा अमर आहे मग

प्रेम ही अमर आहेच!

गुलझार साहेबांची एक रचना आठवते. चित्रपट खामोशी(१९६९).

 

हमने देखी है उन आंखोंकी महकती खुशबू,

हाथ से छू कर इसे रिश्तोंका इल्जाम ना दो।   

सिर्फ अहसास है यह, रूह से महसूस करो,

प्यारको प्यार ही रहने दो कोई नाम ना दो।

खरे आहे, प्रेम ही फक्त भावना (अहसास) आहे. या भावनेचा फक्त अनुभव घ्या. प्रेमाला प्रेमचं राहू द्या

कोणत्या नात्याचे रूप देऊ नका.

डॉ. शकील मोमीन

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

Post a Comment

0 Comments