"नजर...."
©️®️ दीपाली थेटे-राव
डॉ. सुमंतनी दवाखान्यात आलेल्या पेशंटच्या गर्दीवर नजर टाकली.
त्या गर्दीमध्येच ती ही दिसायची आजकाल.
नव्यानेच जॉईन झाली होती
पेशंटना फिजिओथेरपीची ट्रीटमेंट द्यायची.
तिच्या डोळ्यांत जादू होती...
तेच डोळे..काळेभोर..मोठे मोठे...
काळीज भेदून आरपार नजर रोखणारे..
'हे डोळे...
हे डोळे माझ्या खूप जवळचे आहेत.
या डोळ्यांनीच तर भुरळ पाडली मला.
या नजरेच्या पाशात कायमचा अडकलो..
आता कुठेच थारा नाही...पण कसं शक्यय?'
आजही डॉ. सुमंत पाहत होते.
रीमालाही जाणवत होतं...
ते तिच्याकडेच पाहत असतात बऱ्याचदा.
ती ही मुद्दाम पाठ करून उभी राहायची मग.
ती नजर तरीही पाठलाग करतच रहायची.
तिलाही मग चाळा लागला. मधून मधून त्यांच्याकडे पाहायचा.
'का हे असं होतंय? आपलीही नजर परत परत तिथेच का भिरभिरतीये?'
आपल्याला आवडतात का ते?..त्यांचं बघणं...
झटका बसावा तशी बावरली रीमा.
डॉ. सुमंत..नावाजलेले ऑर्थोपेडिक.
त्यांच्या आणि आपल्या वयातही बरच अंतर..
पण आताही किती हँडसम दिसतात.
इकडे सुमंतही विचार करत होता. डोकं फुटायची पाळी आली होती.
' कसं शक्य आहे? ही नजर..
रेवती तर...'
सुमंतचं मन भूतकाळात शिरलं....
................
डॉ.रेवती..
सुमंतच्या आयुष्यात डोकावलेली
अन् त्याचं जग व्यापून राहिलेली
दिलखुलास जगणारी
तिचं जगणं म्हणजे क्षणाक्षणांची प्रफुल्लित करणारी शृंखला.
काय काय नाही अनुभवलं त्याने तिच्या सहवासात..
छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद...
रसरसलेल्या आयुष्याचा जिवंतपणा...
एकामागोमाग एक आठवणी... संपतच नव्हत्या.
आज त्यालाही त्यातून बाहेर पडावंस वाटत नव्हतं. रेवती कधी आयुष्याचा अनिवार्य भाग होऊन बसली कळलेच नाही.
खरंतर तिने पुढाकार घेतला म्हणून..नाहीतर कधीच विचारू शकलो नसतो तिला...
सगळे डॉक्टर्स एकदा एक दिवासाच्या ट्रीपला गेले होते.
एकदम मोकळंढाकळं वातावरण.
चेष्टा मस्करीला उत आला होता.
आज सगळ्यांनी सुमंतला टार्गेट केलं होतं.
"सांग ना रे आम्हाला पण.
कळू तर देत आम्हाला कोण आहे ती.. तुझ्या मनातली स्वप्न परी, जिच्यासाठी इतकं झुरतोय तू. इतके दिवस थांबून राहिला आहेस. किसीको भी घास नही डाल रहा."
मग सगळे मिळून त्याची खेचत होते.
"अरे सांग की. आज बोल ही दे तू दिल की बात. "
"ऐका ना रे. खरंच असं काहीही नाहीये.
पण हां कशी हवी ते मात्र एकदम क्लियर आहे डोक्यात." सुमंत हसून म्हणाला.
"हो का? बरा सिंगल राहशील तू इतक्या तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या ब्युटी क्वीन्सच्या मैफिलीत. कॉलेजमधे तरी काय कमी होत्या तुझ्या मागे मागे फिरणार्या?"
इतका गोड लाजला तो...
रेवतीला वाटलं असंच जावं आणि घट्ट मिठी मारावी त्याला.
सांगून टाकावं मनातलं बेधडकपणे.
जो होगा देखा जायेगा
पण नाहीच जमलं..
सगळे मनाचे इमले..
"अरे काय छळताय रे त्याला. ते येडं असंच राहणार इतक स्मार्ट असून सुद्धा आणि इथे बघा, हम तो दिल हथेली पे ले के खडे है, लेकिन कोई भाव नही दे रहा है। " रीतेशच्या या वाक्यावर हास्याचा पाऊस पडला.
" एक गप रे ! तुला कोण भाव देणार"
अशाच गप्पा टप्पा चालू राहिल्या....
स्मितानं रेवतीचा हात दाबला आणि हळूच कानात पुटपुटली
" तुझ्यासाठी रस्ता क्लीअर आहे ग. मार तुझ्या प्रेमाची गाडी सुसाट."
दोघीही खसखसून हसल्या.
"सुमंत ! मला सोडशील ना रे घरी जाताना?
मी गाडी नाही आणलीये." स्मिताकडे नजर टाकत रेवतीने विचारले.
"हो त्यात काय एवढं. सोडेन की"
गाडीवर त्याच्यामागे बसताना तिला एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटायला लागलं. मंद वाऱ्याची झुळूक आणि ही शांत संध्याकाळ...सोबतीला हवाहवासा वाटणारा त्याचा सहवास..
तिने हात हलकेच त्याच्या खांद्यावर ठेवला. एक अनामिक हुरहुर जाणवू लागली होती.
"एक विचारू ? तुझ्या मनातली ती...
कशी असावी असं तुला वाटतं?" सुरुवातीला तो काही बोलेचना पण मग तिने त्याच्या मागे लकडाच लावला.
"मला ना एकदम साधी सरळ मुलगी हवी आहे. छान राहणारी..शांत...
सगळ्यांच्या मनात घर करेल अशी..
तिचं मन इतकं मोठं असावं की फक्त मीच नाही माझ्या आजूबाजूचं सगळं जग तिच्या मनात सामावून जावं
ती आली की तिच्या येण्याने माझा मनमोर मुग्ध व्हावा
तिच्या हसण्याने आयुष्याचा श्रावण व्हावा
थोडक्यात काय एकदम नेक्स्ट डोअर गर्ल हवी आहे.
कुठलाही छानछोकीपणा नसलेली एकदम सहज साधी मुलगी मला हवीशी वाटेल"
'खरंतर अगदी तुझ्यासारखी..' पण हे वाक्य प्रत्यक्षात बोलायला जमलंच नाही त्याला.
त्याच्या बोलण्याने ती त्याच्या जास्तच प्रेमात पडली.
तिलाही असाच मुलगा तर नवरा म्हणून हवा होता. आता तिनं पक्कं केलं.
याला सांगायचच पण वेळ घेऊन हळूहळू...
पोहोचू दे या ह्रदयीचे त्या ह्रदयी
शब्दही न बोलता..
आता ती जास्तीतजास्त त्याच्या सहवासात राहून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती.
त्याच्या बरोबर जाणं... कॅन्टीन मध्ये एकत्र जेवणं.. मुद्दामच एखाद्या नाटकाचं, पिकचरचं तिकीट मिळालंय सांगून त्याला बरोबर येण्यासाठी आग्रह करणं...त्याला तर आवडतच होत हे सगळं पण चेहऱ्यावर तसे भाव न दाखवता तो रेवतीच्या मनात ही तेच चालू आहे का याची खात्री करून घेत होता.
आता हळूहळू या भेटीगाठींचं रूपांतर प्रेमात होत होतं.
पहायला गेलं तर त्यांची जोडी फार अनुरूप वगैरे नव्हती.
सुमंत उंच, गोरा..देखणा म्हणावा असा, जरासा अबोल
अन् रेवती..बेताची उंची, सावळा वर्ण पण कमालीचे बोलके सुंदर डोळे काळेभोर ..काळीज भेदणारे..
सुमंत श्रीमंत . माणसांनी भरलेल्या मोठ्या घरात वाढलेला
तर रेवती..लहानपणीच आई आणि वडील वारले.
एक मावशी होती. तीही लग्न न करता एकटीच राहत होती.
रेवतीची जबाबदारी तिने घेतली.
म्हणतात ना...
विजातीय ध्रुवच एकमेकांकडे आकर्षित होतात ..
हॉस्पिटलमधील सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
याला कारण होतं... दोघांमधलीं कमालीची तफावत.
तरीही सगळ्यांना रेवतीला सुमंत नवरा म्हणून मिळाल्याचा फार फार आनंद झाला होता.
कारण रेवती होतीच सगळ्यांची लाडकी.
एखादा खळखळणारा वाहता झरा...
निष्पाप निरागस...
बोलायची तर इतकी मधाळ की पेशंटचा निम्मा आजार रेवतीशी बोलल्यानंतरच बरा होऊन जाई.
त्या आनंदाप्रीत्यर्थ स्टाफची दोघांकडून पार्टीही घेऊन झाली होती.
सुरुवातीला सुमंतच्या घरच्यांचाही याला विरोधच होता.
सुमंत इतका हँडसम गोरापान
तितकीच रेवती सावळेपणाकडे झुकलेली.
तिला आई-बाबा आणि इतर नातेवाईकही नाहीत.
मग तिला घरात इतक्या माणसांची सवय तरी कशी असणार?
कसं जमायचं?
पण जशी जशी रेवतीशी ओळख वाढली तसतसे घरातील सगळ्यांच्याच मनातले किंतु-परंतु दूर होऊ लागले
आता सगळ्यांनाच रेवतीची सवय झाली होती. ती येणार असेल तर घरातलं वातावरण एकदम प्रफुल्लित असायचं.
जास्त इकडे तिकडे न फिरणारे, शक्यतो घरातच राहणारे सुमंतचे आजी-आजोबा देखील रेवतीशी बोलण्यासाठी उत्सुक असत आणि ती आल्यानंतर उत्साहाने बंगल्या भोवताली असलेल्या बागेत फिरायला जात तिच्यासोबत. त्यांच्या पायांचे आणि गुडघ्याचे दुखणे जणू तेवढ्या काळापुरते दूर कुठेतरी पळून जाई...
कधी कधी सुमंत हिरमुसला व्हायचा.
एकदा तिला म्हणाला देखील,
"अगं! तू घरी मला भेटायला येतेस का बाकी सगळ्यांनाच.
माझ्या वाट्याला तर तुझी पाच मिनिटे देखील येत नाहीत"
रेवती हसायची,
"तू तर माझाच आहेस. पण तुझ्यामुळे आई बाबा आजी आजोबा काका काकू किती किती सुंदर नाती नव्याने मिळाली आहेत मला.
आधी त्यांची सरबराई तर करू दे.
मला इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल खरंतर तुझे आभारच मानले पाहिजेत."
सुमंतने तिला जवळ ओढले.
"आभारच मानायचे आहेत तर मी सांगतो ना कसे मानायचे ते."
सुमंतने तिला खोलीत ओढले आणि दार लावून घेतले. ती लाजून बंद दरवाजाला पाठ टेकवून खाली जमिनीकडे बघत उभी होती.
तो आता हळूहळू तिच्याकडे सरकत होता.
एकमेकांचे श्वास आता एकमेकांना जाणवू लागले होते. हृदयाचे ठोके वाढले होते.
मनावर कसल्या तरी अनामिक धुंदीचा अंमल चढला होता आणि शरीराचं मोरपीस झालं होतं.
दोघांचीही मनं.. शरीरं एकमेकांच्या स्पर्शासाठी आतुर झाली होती...
सुमंतने रेवतीचा चेहरा हलकेच हाताच्या ओंजळीत धरला.
पुढील क्षणांच्या कल्पनेने रेवती मोहरली आणि तिने डोळे मिटून घेतले.
सुमंतचा स्पर्श जणू ती मनभर साठवून घेत होती.
सुमंतचीही अवस्था काही निराळी नव्हती.
अधीरतेने तो तिच्या ओठांवर ओठ टेकणार इतक्यात खालून आईची हाक ऐकू आली.
रेवती लाजून पटकन बाहेर पळाली.
सुमंतच्या आईला स्वयंपाक घरात उगाचच काहीतरी मदत करत राहिली.
हळूच तिने वळून सुमंतकडे पाहिलं..
प्रेमाची ओढ तिच्या नजरेत कळून येत होती.
इतकं छान घर.. नाती.. आणि इतकी मनमिळावू, समंजस बायको..स्वर्गसुख म्हणतात ते हेच...
सुमंतही सहेतुक तिच्याकडे बघत होता...
जाताना त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलेच,
"आजचा हा मुहुर्ताचा पहिला वहिला किस उधार राहिला आहे तुझ्यावर.
आज ना उद्या त्याची भरपाई करावीच लागेल बरं. अशीच सोडणार नाही मी तुला."
रेवती बाजूला होत त्याला ठेंगा दाखवत चिडवत घरी निघाली.
पण आज पाय निघत नव्हता. मन फुलपाखरू बनून सुमंतभोवतीच भिरभिरत होतं...
दिवस कसे भराभर पुढे सरकत होते.
लग्नाची तारीख ठरली
रेवतीची मावशीही खूप आनंदात होती.
तिलाही या आई-वडिलांशिवाय वाढलेल्या मुलीची काय हौस करू आणि काय नको असे झाले होते.
दागिन्यांच्या खरेदीसाठी सुमंत आणि रेवती दवाखान्यातून लवकरच बाहेर पडले होते.
सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन दागिन्यांची खरेदी झाली.
बाकी सगळी मंडळी घराकडे परतणार होती आणि ते दोघे मात्र आजची संध्याकाळ एकमेकांबरोबर कुठल्यातरी निवांत ठिकाणी घालवण्याच्या विचारात होते.
गाडीपर्यंत जाण्यासाठी दोघे रस्ता क्रॉस करु लागले.
सिग्नल सुटला आणि वाहनांचा वेगही वाढला.
सिग्नलपाशी खेळणी विकणारा मुलगा उभा होता.
दुरून वेगात येणाऱी बस पाहून त्याचे घाबरल्याने भान हरपले. तो खिळून जागच्या जागी उभा राहिला.
रेवतीच्या हे लक्षात येताच ती त्याला वाचविण्यासाठी धावली.
तो मुलगा वाचला पण...
सुख दारातून आत प्रवेश करण्याआधीच दुःखाने वाट अडवली होती...
सुमंत रेवतीला गमावून बसला होता.
................
सुमन ...
तरूण आणि दिसायला सुंदर.
दोन्ही गोष्टी वरदान असल्या तरी गरीबीचा शाप फार मोठा होता.
गल्लीत एकदम टोकाला राहायची
एका खाजगी कंपनीत काम करायची.
ती आणि तिची अंथरूणाला खिळलेली आई.
दोघीच असायच्या.
नोकरी टिकवण्यासाठी नाईलाजास्तव
बॉसने केलेली "विपरीत" मागणी मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता तिच्याकडे.
परिस्थितीने गांजलेल्या जीवाने स्वतः:ला आणि आणि आजारी आईला जिवंत ठेवण्यासाठी केलेली तडजोड.....
बॉसची गाडी न्यायला यायची..
लोकांच्या नजरेपासून किती दिवस लपून राहणार.
सगळ्यांनी तिला वाळीत टाकल्यासारखंच होतं.
तिच्या घराकडे कोणीही जायचं नाही की तिच्याशी बोलायचं नाही.
गाडीचा ड्रायव्हर मात्र मनोमन खूप प्रेम करायचा तिच्यावर. त्याला नको नकोस व्हायचं तिला असं घेऊन जाताना.
अखेर एक दिवस त्याने विचारलंच.
"कोण आहेस? तुझा भुतकाळ?
...जाणण्याची इच्छा नाही.
प्रेम करतो तुझ्यावर.
हे प्राक्तन इथेच सोडून....
लग्न करून फक्त...फक्त माझीच होशील? "
'पुरूषाचं' हे रूप बघून भांबावलीच ती. अवेळी खुडलेल्या निर्माल्यातल्या कळीला पुन्हा नव्याने देव्हाऱ्यात ठेवू पाहत होता तो.
अन् त्या दिवशी..
फक्त नर आणि मादी एवढीच नाती जाणणार्या पैशांच्या झगमगाटी दुनियेत..
शरीराचा सौदा करणारी ती...मनाचा सौदा करून बसली.
त्यांनी ते गाव सोडलं.
...... बरीच वर्षे सरली.
त्यांची एकुलती एक मुलगी..रीमा.
जन्मापासून दृष्टिहीन..
आई गेली..नवराही गेला अटॅकने.
सुमन लेकीसह पुन्हा एकटी पडली.
लेकीलाही सुमनचेच रंग रूप मिळालेले.
त्यामुळे ती सतत धास्तावलेली असायची.
रूप.. रंग..गरिबी...
जुळून आलं होतं पुन्हा तेच समीकरण.
आणि ही दृष्टिहीनता..
आपल्यासारखेच भोग लेकीच्या वाट्याला नकोत.
आपल्याबरोबर लेकीचे हाल नकोत म्हणून तिला एका अनाथाश्रमात सोडली सुमनने आणि काळजावर दगड ठेवून निघून गेली दूर दूर...ती परतलीच नाही.
.........
रीमा आता मोठी झाली होती.
विविध गुणांमुळे ती बाहेरच्या जगात चमकत होती. लोकांच्या नजरेत येत होती.
फक्त एकच गोष्ट रीमाची बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याला विसंगत होती ती म्हणजे तिची ती विझलेली नजर.
आश्रमातील सगळेच तिच्यावर खूप प्रेम करायचे. ती होतीच तशी प्रत्येकाला जीव लावणारी. मोठ्या ताईंची तर जीव की प्राण.
त्या विधात्याच्या नजरेनं जग बघणारी.
पण 'भगवान के घर दर है, अंधेर नहीं'
काही दिवसांनी आश्रम ताईंनी इतके वर्ष केलेले प्रयत्न फळास आले. देवाची केलेली आराधना आणि रीमाला दृष्टी देणार्या नेत्रदात्याचा पाठपुरावा सफल झाला.
एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात नेत्रदानाने रिमाला डोळे मिळाले.
ऑपरेशन सक्सेसफुल.
आता ती पाहू शकत होती.
आता ती आश्रमातील तिच्या सगळ्या जिवाभावाच्या व्यक्तींना पाहू शकत होती आणि हो स्वतःलाही. किती काळ ती स्वतःला आरशात बघत होती.
आई बाबांची पुन्हा एकदा तीव्रतेने आठवण झाली.आश्रम ताईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं.
या जगातलं तिने स्पर्शाने.. वासाने अनुभवलेलं सौंदर्य ती आता नजरेनं मनात साठवून घेत होती.
महत् प्रयासाने फिजीओथेरपीच्या कोर्सला प्रवेश मिळवला होता तिने.
...........
आज हॉस्पिटलचा वर्धापन दिन..
त्यानिमित्ताने कितीतरी पाहुणे यायचे होते.
पाहुणे..ज्यांनी 'सढळ हातांनी' या कार्याला..हॉस्पिटलच्या वाढत्या व्यापाला आधार दिला होता.
डॉ.सुमंत त्यांच्या आईसह हजर होते.
रिमाला पाहिलं आणि ते त्यांच्याही नकळत परत तिच्याकडे ओढले जाऊ लागले.
त्यांनाही कळेना.
आज रेवती गेल्यानंतर इतक्या दिवसांनी ही अशी ओढ ...ते ही या अनोळखी मुलीबद्दल...
रेवतीनंतर ते कमालीचे एकाकी, अबोल आणि अलिप्त झाले होते.
त्यांनी लग्नही केले नव्हते..
कार्यक्रमात सूत्रसंचालनापासून कितीतरी गोष्टींची जबाबदारी रीमाने उचलली होती.
दृष्ट लागण्यासारखी दिसत होती ती आज.
पाहता क्षणी कोणाच्याही नजरेत भरेल इतकी सुंदर.
राहून राहून सुमंतची नजर रीमाकडेच वळत होती.
आज कितीतरी दिवसांनी सुमंतला असं हसताना बघून वानिताबाईही थोडया सुखावल्या.
त्यांनी कार्यक्रम संपल्यावर पदाधिकाऱ्यांकडे रीमाबद्दल चौकशी केली.
त्यांच्याही मनात भरली होती ती.
तिचा भूतकाळ...तिचे डोळ्यांचे ऑपरेशन... सारं सारं कळलं त्यांना आश्रम ताईंकडून.
तिच्या ऑपरेशनबद्दल ऐकून मात्र त्या चपापल्या.
पुढे त्यांनी खोलात जाऊन चौकशी केली.
त्यांना उत्तर गवसलं होतं.
सुमंतला तिच्याबद्दल वाटणारी ओढ...
काही दिवसातच रेवतीचा वाढदिवस होता...
सुमंतच्या आईने रीमाला घरी बोलावले होते.
गाडीच पाठवली होती.
रीमाला सगळ्या गोष्टींची कल्पना आधीच देण्यात आली होती.
त्यांनी तिला सुमंतबद्दल विचारले होते.
रीमाने नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
तिलाही आवडत होतेच ते..जरी वयात तफावत होती तरीही..
त्यांच्या कर्तृत्वावर आणि बुद्धिमत्तेवर भाळली होती ती.
गाडीचा आवाज आला तशा त्या दरवाजाकडे गेल्या.
रेवतीच्या मावशीलाही बोलावले होते. तिचेही डोळे भरून आले होते.
"रीमा" उंबरा ओलांडून आत आली.
वनिताबाईंनी रेवतीच्या वाढदिवसासाठी आणलेल्या केक ठेवलेल्या टेबलपाशी रीमाला नेलं.
सुमंत भांबावून पहात होता.
मग वनिताबाईंनी सगळ्या गोष्टींचा खुलासा केला.
का सुमंतला रिमाबद्दल आकर्षण वाटत होतं ? उत्तर मिळालं होतं...
"हॅप्पी बर्थडे रेवती..."
रीमाच्या नजरेत नजर मिसळत सुमंत म्हणाला.
त्याच्या डोळ्यांतून रेवतीबद्दलचं प्रेम वहात होतं.
रीमानेही सगळं तितक्याच प्रेमाने स्विकारलं होतं. .
दोन ह्रदयं खरंतर केव्हाच एक झाली होती.
रेवतीने दिलेलं दान...नेत्रदान
रीमाच्या नजरेची जादू त्याला परिचितच तर होती.
कारण ते डोळे त्याच्या प्रिय रेवतीचे होते.
रेवतीच्या वाढदिवसासारखा आनंदाचा क्षण...
पण सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
आणि सुमंत...
आता त्याला तिला पुन्हा गमवायचे नव्हते....
या नजरेच्या पाशात तर तो कधीचाच गुंतला होता...
तो रीमातील *रेवती* ला जपण्याची... जाणण्याची...
आणि नव्याने अनुभवण्याची धडपड करत होता.....
आणि हो त्याला पुन्हा एकदा अनुभवायची होती ही नजरबंदीही....
धन्यवाद.
दीपाली थेटे-राव
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box