गार्गी - जयश्री दाणी

गार्गी 
जयश्री दाणी


            बॉबी येतो म्हणाला म्हणून ती छानशी तयार होऊन बसली होती. दुपारची झोप पण झाली होती. जराशी वामकुक्षी घ्यायला ती लोटली पण चांगला तास दीड तास डोळा लागला तिचा. इतके दिवस डोक्यात साचलेला थकवा हलके हलके निघत होता. नाही म्हणायला बापीचा पिळवटलेला तटस्थ चेहरा, माँचा गोंधळलेला चिंताक्रांत चेहरा आणि ठाकू माँचा अश्राप विचारी चेहरा समोर येऊन ती पुन्हा कासावीस व्हायची. वाटायचे द्यावे सोडून बॉबीला आणि करावे लग्न बापी म्हणतात तिथे. पण प्रेमात अडकलेला जीव तसे करू देत नव्हता. 


            आज सात वर्षे झाले होते त्यांच्या प्रेमप्रकरणाला. भेटले तेव्हा जवळपास अठरा वर्षांचे होते ते. पुढच्या महिन्यात पंचविशी उलटणार. मग आता नाहीतर कधी लग्न करणार? बॉबी घरचा व्यवसाय सांभाळणार होता. तिलाही तिथेच शिक्षिकेची नोकरी लागणार होती. एक जात सोडली तर काय वाईट होते या संबंधात? बापी मानायलाच तयार नव्हते. त्यांच्या डोक्यात उच्च पदावर काम करणाऱ्या स्वजातीच्या राजपत्रित अधिकाऱ्याला मुलगी द्यायचे होते. अर्थात त्यांच्याकडच्या सगळ्या उपवर मुलींना असेच स्थळं मिळाल्याने त्यांची इच्छा वावगी नव्हतीच.


त्यांनी तसे सामोपचाराने घेतले असते तर बॉबीच्या स्थळातही तशी काही उणीव नव्हती. 


            बॉबी दिसायला काळाशार होता खरा पण तिच्याचसारखा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला होता. ती बंगाली. गोरीचिट्टी. गुळगुळीत चमकदार चेहऱ्याची. तो जातीबाह्य, मुरमाड चेहऱ्याचा. महाविद्यालयीन जीवनात जुळलेले ते कोवळे प्रेम दोघांच्याही मनातून निघत नव्हते अन् इकडे बापी लग्नासाठी राजीच होत नव्हते. तुला करायचे असेल तर कर आमचे शुभाषिश लाभणार नाही त्यांनी कठोरपणे निक्षून सांगितल्यावर तीही कमालीची दुखावली गेली होती. 


           बापी, कधीच बापीच्या आज्ञेबाहेर न जाणारी माँ आणि नको गं असे बापीच्या मनाविरुद्ध कृत्य करू म्हणून विनवणाऱ्या ठाकू माँच्या पावलांना स्पर्श करून ती जे बॅग घेऊन घराबाहेर पडली ते थेट बॉबीकडेच आली. त्याची अम्मा तयार होती लग्न करून द्यायला. चार दिवसानंतरचा मुहूर्तही निघाला होता.


          तोवर लोकांना बोलायला उगाच विषय नको म्हणून बॉबीच्या अप्पांनी बांधलेल्या नव्या अपार्टमेंटमध्ये तिची रहायची व्यवस्था केली होती. आधी तिला वाटले आपण इथे एकटे कसे राहू? भीती नाही का वाटणार? कारण दहा फ्लॅटच्या त्या इमारतीतील एकही फ्लॅट विकल्या गेला नव्हता. खरेतर सगळे कागदपत्र, सगळे बांधकाम कायदेशीर होते पण यशस्वी बिल्डर असलेल्या बॉबीच्या वडिलांना याच स्कीममधले फ्लॅट विकताना प्रचंड त्रास होत होता. 


          चांगल्या वस्तीत, तसे मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या बिल्डिंगमधले फ्लॅट का विकले जात नाही हेच त्यांना कळत नव्हते. अर्थात त्यांनी व्यवसायात अनेक चढउतार पाहिल्याने आज ना उद्या हेही फ्लॅट खपतील याची त्यांना खात्री होती. 


           तिने साशंकतेने त्या अपार्टमेंटमध्ये पाय ठेवला खरा पण काही क्षणातच तिला तिथे मोकळे, निर्धास्त, शांत वाटायला लागले. बापी-माँला सोडून आल्यामुळे मनात जो अपराधी कोलाहल माजला होता तो बऱ्याचअंशी शमला. ती जागा खूपशी आपली वाटायला लागली. त्यामुळे तिचं व्यवस्थित जेवणखाणं करून जेव्हा बॉबी संध्याकाळी येतो म्हणाला तेव्हा ती अगदी आरामात एकटी रहायला तयार झाली. त्या इमारतीत इतर कुणी कुटुंब नसले तरी आजूबाजूला भक्कम घरे होती. परिसर एकट नव्हताच मग भीती कशाची? ती आनंदाने त्याला जा म्हणाली. 


          सहा वाजता येणार होता तो. सव्वासहा वाजत आले होते. येईलच म्हणून ती इकडेतिकडे वेळ घालवू लागली. छान प्रशस्त फ्लॅट होता. मोठमोठ्या खिडक्या, आकर्षक रंगसंगती. ती पूर्ण इमारत बघायला म्हणून लिफ्टजवळ आली. लिफ्टच्या दाराला कुलूप होते. ती पायऱ्या चढू लागली. 


           पाच मजले होते, दुसऱ्या मजल्यावरच तिचे पाय दुखायला लागले. शारीरिक कष्टाची सवयच राहिली नाही ना? तिसऱ्या मजल्यानंतर तिला विचित्रसा निवांत पैस जाणवू लागला. अनामिक गूढ शांतता. किंवा अनेक मुके बाहुले अथवा विरळ सावल्या आसपास असाव्यात पण तिला दिसू नये,  तरी तिला त्यांचा वावर जाणवावा. निदान तिच्याजवळ तरी तसे काही अनुभवण्याइतपत सजग सहावे इंद्रिय असावे. 


           कुणाचा तरी आपल्याला धक्का लागतोय का? कुणी अगदी खेटून उतरतंय का, कुणी पायऱ्यांवरून लगबगीने पळतंय का असे सारखे तिला वाटत होते नि ती थबकून थबकून पायऱ्या चढत होती. आपल्या चहूबाजू तिला नक्कीच काही हालचाल जाणवत होती. दिसत नव्हते काही पण तरी ती अंग चोरून जिना चढू लागली. पाचव्या मजल्यानंतर मोठ्ठी गच्ची होती. तिला बघायचे होते तिथून मोकळे आकाश. सभोवतालचा भाग. 


          वरच्या फ्लॅटच्या दाराजवळ प्लायवूडचे मोठाले तख्ते ठेवले होते. बांधकाम साहित्यातून उरलेले असावे. अचानक तिला तिथून कुणीतरी लपून पहात असल्यासारखे वाटले. ती जाम दचकली. तिने पुन्हा पाहिले. कुणी होते का तिथे? भास-आभासाचा खेळ. डोळ्यांना काही दिसत नव्हते पण मनाला जाणवत होते तिथे कुणाचे तरी चालतेबोलते अस्तित्व. तिच्या छातीत धडधडले. ती धाव्वतच वर आली. बावरून बावरून बघू लागली. 


           तिने स्वच्छपणे पाहिले होते प्लायवूडच्या तुकड्याला धरून असणाऱ्या एका बुटक्या वयस्क पुरुषाला. तो पुरुष खूपशा अपेक्षेने तिच्याकडेच एकटक बघत होता. तिला त्याचे रंगरूप नीट दिसले होते. अति मध्यम बांधा. हनुवटीवर थोडेसे विरळ खुरटलेले केस. तशीच काळी पांढरी मिशी. अंगात बाहीचे बनियान. खाली पैजामा. पायात साध्या सपाता. नजरेत विलक्षण काहूर, उत्सुकता, दबा धरलेला खोल भाव. 

भास कसे म्हणणार या दिसण्याला? 


           ती विचारात पडली. डोक्यावरचे निळे नभ, शेजारची घरे, झाडे सारे धूसर होऊ लागले तिच्या लेखी आणि आठवत राहिली ती एकच तिला लपून पाहणारी आकृती. भुतंखेतं आहेत का या जागेत म्हणून विकल्या जात नाहीत का हे फ्लॅट? मनात निरनिराळ्या शंका येऊ लागल्या. 

सटारुन ती खालीच आली.


           बॉबी आलाच होता. दोघे मॉलमध्ये गेले. लग्नासाठी आवश्यक ते कापडचोपड त्याने तिला घेऊन दिले. तिने हट्टाने एक हिरव्या काठाची पिवळी नववारी विकत घेतली. सोबत मोत्यांचा आकडा असलेली नथही. बंगाली लोकं नववारी घालतात? त्याने आश्चर्याने विचारलेही. 

नाही, पण मला घ्यावीशी वाटली, ती उत्तरली. 


         रात्री अर्थातचं बॉबीच्या आईने दोन वयस्क स्त्रियांना तिच्याजवळ झोपायला पाठवले. बॉबी घरी निघून गेला. तिला तेव्हढाही विरह सोसवेना. त्याच्यासाठीच तर ती बापीशी शत्रुत्व घेऊन एकटी इथे आली होती. अगदी एका खोलीत जवळ जरी नाही तरी त्याने त्या फ्लॅटमध्येच कुठेतरी झोपावे अशी तिची इच्छा होती.


           रात्री थोडावेळ तिला झोप लागली पण मग एकदम झप्पकन तिचे डोळे उघडले. तिला सोबत म्हणून आलेल्या दोन्ही स्त्रिया चांगल्या घोरत होत्या. ती छातीवर हात ठेवून इकडेतिकडे बघू लागली. बापी, माँ, ठाकू माँ यांची आठवण सतावत होतीच. भिरभिर भिरभिर पाहताना तिची नजर दारातून दिसणाऱ्या समोरच्या खोलीतील खुर्चीवर गेली. 


           ती भयानक दचकली. तिथे तेच गृहस्थ बसले होते जे तिला गच्चीवर जातांना दिसले होते. तसेच टक लावून तिच्याकडे बघत होते. तिने गप्पकन तोंडावर पांघरूण घेतले. घशाला कोरड सुटली तरी तशीच निजून राहिली.


            काल खरेदीच्या नादात ती बॉबीला हे सांगायचे विसरली होती. आज मात्र तिने त्याला आल्याबरोबर सांगितले. 'कुछ भी' तो खूप, खो खो हसत सुटला. आपण बघितलेल्या दृश्याची सत्यता त्याला कशी पटवावी हेच तिला कळेना. दुसरा दिवसही बॉबीच्या सानिध्यात संपत आला. दोनच दिवस उरलेले लग्नाला. विवाह संपन्न झाला की तिला बॉबीच्याच घरी रहायला जायचे होते. तशी ती निडर, धडाकेबाज होती. तिला त्या बिल्डिंगमध्ये रहायची भीती वाटत नव्हती पण तिथे निश्चितच अन्य कुणाचे अस्तित्व असल्याचा तिला दोनतीनदा प्रत्यय आल्याने ती मनातून पुष्कळ घाबरली होती.


           रात्री त्या दोन स्त्रिया बडीशोप, वेलची चघळत बसल्यावर ती लग्नासाठी घेतलेले कपडे घालून बघू लागली. राहून राहून तिला माँची आठवण येत होती. तिच्या लग्नाबद्दलचे भरपूर सुखस्वप्न रंगवले होते माँने. आपण आपल्या आईवडिलांचे किती मन दुखवतोय या जाणिवेने ती गंभीरही झाली होती. नवीन साडी नेसून बघायचा तिचा उत्साह पार मावळला. आरशात एकवार स्वतःला निरखून ती पुन्हा नाईटी चढवायला लागली. आरशात कुणाचेतरी प्रतिबिंब दिसत होते. मागे कोण उभे आहे म्हणून तिने वळून पाहिले. कुणीच नव्हते, ती खोलीत एकटीच होती. तिने भयचकित नजरेने पुन्हा आरशात पाहिले. भालो भाषी, दर्पणात तिच्या जागी अन्य कुणाचा चेहरा दिसत होता. 


          सुबक बांध्याची एक ठेंगणी ठुसकी बाई. पेड गोवलेल्या वेणीचा डोक्यावर वरती तरंगणारा अंबाडा घातलेली तिच्याकडे बघून स्मित करत होती. सारासार विचारशक्तीला छेद देणारं ते समोरचं गोजीरवाणं ध्यान ती स्तिमित होऊन बघतच राहिली. थोड्यावेळाने पुढ्यातल्या आरशातली ती प्रतिमा नष्ट झाली आणि ती सरसरून भानावर आली. काय गौडबंगाल आहे हे? काय रहस्य आहे? आपल्या रूपाच्या जागी ती नटली थटली कोण स्त्री दिसली? ती जागेवर येऊन झोपली पण पापण्या मिटेना.


           सकाळी तिला लवकरच जाग आली. झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत फुलांचा सुवासही तिच्या नाकाजवळ हुळहुळला. खाली फुललेली फुलं बघावी म्हणून ती बेसमेंटमध्ये आली. बॉबीच्या वडिलांनी सुंदर सुंदर फुलझाडं लावली होती. सगळी एकजात फुलून आली होती. झाडांना पाणी देण्यासाठी ती पाईप शोधू लागली. 


          मागच्या बाजूला वॉचमनची खोली होती. सध्या तिथे छोटे मोठे अनावश्यक सामान पडले होते. तिथे पाईप किंवा तांब्या बादली मिळेल म्हणून ती धुळभरले सामान हुडकू लागली. काही जुन्या फोटो फ्रेम्स तिथे पडल्या होत्या. ती उत्सुकतेने न्याहाळू लागली. बघता, बघता तल्लीन झाली. तिला त्या फोटोतल्या व्यक्ती खूप जवळच्या, कुठेतरी पाहिल्यासारख्या, कधीतरी भेटल्यासारख्या  वाटत होत्या. त्यातील नववारी, पाचवारीतील स्त्रिया, डोक्यावर वडा-शेंडी असणारे मुलगे, परकरी मुली...उपनयन संस्काराचे फोटो असावे ते? 


कुणाच्या?


रामभाऊजींच्या!


तिच्याच मनातून उत्तर आले. कोण रामभाऊजी? तिने स्वतःकडे चमत्कारीकपणे पाहिले. पालथा पडलेला पुढचा फोटो उचलल्यावर तर ती अवाकच झाली. त्यात काल आरशात दिसलेली स्त्री व जिन्यात लपलेल्या पुरुषाचे छायाचित्र होते. ती शहारली. एकवार तिने पुन्हा फोटोकडे पाहिले. राजाभाऊ कुलकर्णी-गार्गी कुलकर्णी अशी नामावली होती तिथे. ती फोटो तसाच टाकून भरर्कन बाहेर आली. तिला वरती फ्लॅटमध्येही जायची भीती वाटत होती. न जाणे ते सारे चलचित्र तिचा पाठलाग करत वर आले तर?


              ती लॉनमधल्या बाकावर बसली. रमलीही. लुसलूस वाढलेल्या गवतावर छोटी छोटी मुलं खेळत होती. नुकतेच मौंज झालेले रामभाऊजीही होते त्यात. अरे संध्या कर रे संध्या कर रे म्हणून आतून ओरडणाऱ्या 'ह्यांच्याकडे' म्हणजेच राजाभाऊंकडे भाऊजींचे अजिबात लक्षच नव्हते. तिला त्यांच्या तापट स्वभावाची पूर्णच कल्पना होती. हातोहात जागच्या जागी त्यांना सारे व्यवस्थित लागत असे. अग बाई उपरणे ठेवायचे राहिले न्हाणीच्या बाहेर. ती लगबगीने आत गेली. 


          दिपलक्ष्मी, चिऊबाई, अरुणभावजी एक वस्तू जागेवर ठेवत नाहीत. सगळीकडे लाकडाचे खेळणे, भोवरे, चिंचोके, कवड्या विखुरलेल्या. ती एक एक गोळा करायला लागली. आई वडिलांच्या राज्यात अठराविश्व दारिद्र्य पाहिलेल्या 'ह्यांनी' रात्रंदिवस ढोर मेहनत करून हा वाडा बांधलेला. वाड्यात सुबत्ता आणलेली. आपल्या शिस्तीने, कडक नियम पालनाने आपण हे वैभव मिळवले असे ते साऱ्यांना सांगत. वाड्याच्या कडीकोपऱ्यावरून मायेने हात फिरवताना त्यांचा जीव अभिमानाने उचंबळत. या चौसोपी वाड्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. एकएका वस्तूत मन गुंतले होते. संपूर्ण आयुष्य मनासारखे उपभोगूनही जीव जातांना ते बिछान्यावरून चारही भिंतीकडे गरागरा डोळे फिरवत बघत होते. गालातल्या गालात हसत होते. 


          जणू आपला आत्मा या भिंतीत इथेच जिरून राहणार हे गुपित त्यांना आधीच कळाले होते. देवा नीट मुक्ती मिळू दे रे यांना तिने उदकशांतीला मनोमन प्रार्थना केली होती. बरोबर आहे ना त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्णांशाने जगले. आता भावी पिढीला मनासारखे जगता येण्यासाठी ह्यांनी ह्यांची जागा पूर्णच रीती करावी लागेल. तेच त्यांना उमजत नव्हते. प्राण निघतांनाही अतीव लालसेने घराकडेच बघत होते. त्या अंतिम दुःखद क्षणीही त्यांनी सगळ्या इच्छा आकांक्षासह आपल्या नजरेला मालवून टाकावे असे तिला आतून वाटत होते. नंतर कितीदातरी त्यांचा भास, त्यांचा स्वर तिला भिंतीभिंतीतून झिरपल्यासारखा वाटायचा. ती भ्यायची. तशाच भित्र्या मनोवस्थेत एक दिवस तिनेही देह ठेवला पण इहलोक सोडण्याआधी अति आठवणीने आपले अवघे मन साऱ्या साऱ्या गोष्टींतून आवर्जून काढून टाकले.


            बॉबीचा फोन आला तेव्हा तिची तंद्री तुटली. ब्रेकफास्टला बाहेर जाऊ म्हणाला. घ्यायला येतो म्हणाला म्हणून ती वर आली. प्रचंड शिणल्यासारखे वाटत होते. भूतकाळाचा, गतजन्माचा फेरा करून आल्यामुळे की काय? तिला काहीच कळत नव्हते. ती तशीच बाथरूममध्ये गेली. सचैल धारा अंगावर घेतल्या. ताजेतवाने वाटत होते. त्या दोन स्त्रिया निघून गेल्या होत्या वाटतं. तिला बरेच वाटले. पुरुषभर उंचीच्या मोठ्ठ्या आरशासमोर ती उभी राहिली. बॉबीसोबतच जायचे म्हणजे टॉप जीन्स घातले तरी चालेल. 


तिने नकळत नववारी उचलली.


आज केस मोकळेच सोडावे.


तिने नकळत लांबसडक केसांचा अंबाडा घातला. अगदी सराईतपणे. जशी काही ती नेहमीच घालत असावी. 


छोटी टिकली?


तिने लालजर्द मोठी चंद्रकोर कपाळावर लावली.


गुलाबी टॉप?


तिने हिरवे झांपर अंगात अडकवले.

नववारी लपेटली. अहाss धम्म सोन्यासारखी पिवळी. ह्यांना खूप आवडायची ना?


गळ्यात चिंचपेटी, मंगळसूत्र घातले. हातात भरपूर कांकण. हिरवे. हिरवे. पायात जोडवे, पायपट्टी. नाकात नथ. ती तयारच झाली पूर्ण. मघा तिने दोन सोनचाफ्याचे फुलं आणलेच होते खुडून. ते कानाच्या वर माळले. ओहो रुपदेखणी सजली-धजली नार पुढ्यात उभी ठाकली. तीच हरखली तिला पाहून. 


          घरात कुणीच नव्हते. राजाभाऊ बसलेच होते खुर्चीत. झटकन उठून तिच्याजवळ आले. अहो कुणी येईल ना तिची लटकी आडकाठी. सगळे मळ्यात गेलेत कुणी येणार नाही त्यांची उष्ण श्वासातली कुजबुज. तिची पळापळ. होsss असेच थोडे ना हाती लागायचे यांच्या? त्यांची ओढाओढ. त्यांनी हलकेच पाडले तिला मंचकावर आणि ओणवे झाले तिच्यावर. ती सुखाच्या लहरीत विहरू लागली. अत्युच्च आनंदाचा तो क्षण तिलाही गमवायचा नव्हता म्हणूनच तिच्या कानावर 'गौरी' अशी बॉबीची हाक आल्यावर, ती नापसंत नाराजीने, घाईघाईत मच्छरदाणी किंचित दूर सारत, अर्ध मिटल्या नेत्रात जरा जोरातच पुटपुटली, "गौरी नाही बेटा मी गार्गी. गार्गी राजाभाऊ कुलकर्णी."


बॉबी धक्का बसल्यासारखा दारातच ठेचकाळला. समोरचे दृश्य त्याच्या आकलनापलिकडचे होते. त्याची वागदत्त वधू गौरी विस्कटलेल्या नववारीत पोलक्याच्या गुंड्या उघडलेल्या धुंद अवस्थेत पलंगावर लोळत न दिसणाऱ्या अदृश्य अशा कुणालातरी आवेगाने कुरवाळल्यासारखे हातवारे करत होती. 


तो पुतळ्यासारखा अचलच झाला.


- जयश्री दाणी



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहेया कथेतील आशयविषयमांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहेयातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीया कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेतपरवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments