मॅरीड बॅचलर - अर्चना सोनाग्रे

 कथेचे नाव - मॅरीड बॅचलर


लेखिका - अर्चना सोनाग्रे 


एकमेकांच्या स्पर्शासाठी आतूर ती दोघं प्रणयक्रिडेत रमलेले असतांनाच त्याचा मोबाईल वाजला. तसा तिचा चेहरा गरगर उतरला. इच्छा नसतांनाही तो तिच्यापासून दूर होऊन मोबाईलवर बोलू लागला,

"काही नाही. खूप दिवसांपासून बरं नव्हतं मामाला. काल सकाळी झोपेतून उठलेच नाहीत ते. मलाही रात्रीच कळलं बाबा कडून. म्हणून मग ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेज करून गाडीत बसलो अन गावाला आलो."

पलीकडील व्यक्ती, "असं होय. वाईट झालं."

"हो ना." काय टाईमपास करतोय हा. पटपट बोल काय हवं ते. या विचारातच त्याने पलीकडील व्यक्तीला विचारलं, "तुम्ही बोला काय झालं? विधी सुरु आहेत ना. बरं नाही वाटत फोनवर बोलत बसणं."

"हो हो, ते मी म्हणत होतो ड्रायव्हर मला घ्यायला आलाच नाही बघ. म्हणून त्रास देतोय तुला." पलीकडील व्यक्ती बोलली.

"हा ठीक आहे बोलतो मी त्यांच्याशी. तुम्ही काही काळजी करू नका." इतकं बोलून त्याने दुसऱ्या व्यक्तीचा नंबर डायल केला.

दुसरीकडे आपल्या निर्वस्त्र शरीरा भोवती ब्लॅंकेट गुंडाळलेली ती मात्र त्याच्या कानाशी, केसांशी खेळून त्याला आणखी उत्तेजित करू लागली.

"अरे ते गाडी घेऊन जा ना साहेबांना घ्यायला. वाट बघताहेत ते." तो आपल्या भावनांना कसंतरी आवरत समोरच्याला बोलला.

"अहो जातोय सर. थोडाही धीर नाही त्यांना बघा." पलीकडील व्यक्ती बोलली, "बाकी ठीक आहे ना घरी सगळे."

"हो हो ठीक आहे. ठेवतो." इतकं बोलून त्याने लगेच कॉल कट करून मोबाईल बेडवर फेकला व तिला आपल्या बाहुत घेऊन तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव तो करू लागला. काही क्षण जात नाही तो परत त्याचा मोबाईल वाजला. तसा तिने डोक्यावर हात मारला. पण त्याला आलेल्या कॉल्सला उत्तर देणेही भाग होतं. कारण तो 'अचानकच आजारी मामा वारले, त्यांच्या मातीवर जातोय गावाला' असे त्याच्या सरांना सांगून दोन दिवसांसाठी तिला भेटायला आलेला.

दुसरं काय करणार बिचारा? तिला खूप एकटं वाटायला लागलं होतं त्याच्याशिवाय. तेव्हा, "या शनिवारी आले नाही तर नाही तर बघ संन्यासच घेते."

अशी धमकी दिली होती तिने याला. आता बोलली म्हणजे ती संन्यास घेणारच असं काही नाही हे त्याला माहीत होतं पण तिच्या भावनांची त्याला कदर होती.

आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांना पूर्ण करण्यासाठी ती दोघेही  वेगवेगळ्या शहरात काम करून 'मॅरीड बॅचलर' सारखे आयुष्य जगत होते. त्याच्या मागे तरी फक्त ऑफिसचं काम होतं. तिच्या मागे तर ऑफिस व घरकाम करून आठ वर्षाच्या मुलाला बघनेही आलं होतं. म्हणून त्याला तिची आणखीनच काळजी वाटायची.

कोरोना बाबा धरतीवर प्रकट होण्याआधी दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदात जगत होते. सकाळी उठून सर्व कामं दोघं मिळून करायची. तो कणिक मळून द्यायचा व ती पोळ्या लाटून शेकून घ्यायची. तो कांदा, मिरची, भाजी चिरून द्यायचा व ती भाजीला फोडणी द्यायची. तो स्वतः सोबतच मुलाचीही आंघोळ करून घ्यायचा, त्याला केसांना, हातापायाला तेल लावून देणे, कपडे घालून देणे, त्याची बॅग भरून देणे, वगैरे तयारी करून द्यायचा व देवासमोर दिवा लावून प्रार्थना म्हणायचा. तेव्हापर्यंत ती, त्या तिघांचेही टिफिन बॅग तयार करून घ्यायची. सकाळची न्याहरी म्हणून गरम गरम ताट वाढून आणायची. तिघेही दोन दोन घास खाऊन झाल्यावर ती मुलाला शेजारच्या पाळणा घरात ठेवून यायची. मग हा तिला ऑफिसला सोडून द्यायचा.

ऑफिस मधून येतानाही हा तिला घ्यायला जायचा. कधीकधी तर दुपारचे जेवणही, तिच्या ऑफिसच्या जवळील एखाद्या हॉटेलमध्ये बसून दोघे सोबतच करायचे. संध्याकाळी घरी आल्यावर, तिघेही धम्माल करायचे. ही घर आवरायची, भांडी घासायची तर तो मेयुनीज सँडविच, स्प्रिंग रोल, भेळ, पुलाव असं काहीतरी झटपट बनवून घ्यायचा. मग तिघेही टीव्हीवर काहीतरी छान बघत, गप्पा टप्पा मारत ते खायची. तिघेही रात्री एकमेकांच्या मिठीत शिरूर दिवस भराचा थकवा दूर करायची. रविवार किंवा इतर कोणताही सुट्टीचा दिवस म्हणजे भटकंतीचा दिवस. सकाळीच, टॉवेल, टूथब्रश-पेस्ट पासून ते एक एक जोडी कपडे सर्व बॅगेत भरून सिंहगड, पन्हाळा, लोणावळा, कडेपठार किंवा ताम्हिणी घाटात दूरवर लॉंग ड्राइव्हला ते जात असत. खास म्हणजे मुलालाही त्यांनी अगदी लहानपणापासून फिरायची सवय लावली होती. छान असं आयुष्य सुरू होतं त्यांचं. कधी कधी छोटे मोठे वाद व्हायचे. पण लवकरच निवळूनही जायचे. कोणालाही त्यांचा हेवा वाटेल असा सुखी संसार सुरू असतानाच कोरोना बाबाचे आगमन झाले. तसे सर्वच घरी बसले. पण दीड महिना झाल्यावर तिला तिच्या सरकारी कार्यालयातून कामावर रुजू होण्याबाबत आदेश आला. ती कामावर जाऊ लागली. तो घरी राहून मुलाची काळजी घेऊ लागला. घरातील होतील ती सर्व कामं करू लागला. संध्याकाळी ही घरी आल्यावर दोघं परत उरलेली कामं उरकून एकत्र पत्ते किंवा मोबाईलवर गेम खेळायची. दोन अडीच महिने सर्व सुरळीत चाललं. पण हळूहळू त्याला खूप निराशा येऊ लागली. तो छोट्या छोट्या कारणांवरून तिच्यावर चिडचिड करू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला. कधी कधी मुलालाही एखादी ठेवून द्यायला तो मागे पुढे बघायचा नाही.

"तुम्ही प्लीज इथून निघून जा. निघून जा कुठेतरी दूर आमच्या आयुष्यातून." एक दिवस ऑफिसला जातांना ती बोलून बसली.

संध्याकाळी घरी आली तेव्हा तो खरंच बॅग भरतांना तिला दिसला. तशी ती त्याला जाऊन बीलगली,

"मला माफ कर बोलून बसली मी तसं. कारण कुठेतरी मनात मला असं वाटलं की तू तर घरी राहून छान खात पीत आहेस. अन मी जीव धोक्यात टाकून, दिवसभर बाहेर काम करून कमवत आहे. तरीही तू माझ्याशी नीट वागत नाहीस, भांडतो माझ्याशी, जळतो माझ्यावर. पण तू घरी आहेस म्हणून मला आपल्या मुलाची चिंता करायची काहीच गरज नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. प्लीज माफ कर मला. विसर मी जे काही बोलली ते."

"नाही गं चिऊ. तुझी काही चुकी नाही. आधी छान वाटलं  पण आता घरात राहून कंटाळात आहे मी. त्यात मित्रही टोमणे मारतात की तुला तर सरकारी नोकरी वाली बायको आहे. त्यामुळे तू घरी बसून खाल्लं तरी चालेल. मी तितकं मनावर नाही घेतलं. पण आता खूप ताण येतोय. असं वाटतंय परत मी कधीच कामावर जाऊ नाही शकणार. मला कोणती छान नोकरी नाही मिळणार. माझे मित्र, नातेवाईक मला असेच चिडवत राहणार. बस त्यांच्या सगळ्यांचा राग तुझ्यावर आणि बाळावर निघतो आपल्या." तो तिला सोफ्यावर बसवत म्हणाला, "म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. मला माझ्या कंपनीने बंगलोरला जायची ऑफर दिली आहे. पगारही दहा टक्क्याने वाढवून देणार म्हणाले. बघ कोरोनात अशी ऑफर कोणाला मिळणार?"

तिचे डोळे भरून आले. तिला रडावं की आपल्या नवऱ्यासाठी आनंदी व्हावं काही कळत नव्हतं.

"अगं ए वेडे रडतेस कशाला?" तो तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेऊन तिला म्हणाला, "परिस्थिती सामान्य झाल्यावर, सरांसोबत बोलून मी परत इकडे येईल तुमच्या सोबत राहायला."

ती कितीतरी वेळ त्याच्या छातीवर डोकं ठेवून तशीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी तो बंगलोरला निघून गेला तो आज दोन वर्ष झाली ती दोघेही कधी, आठ तर कधी पंधरा दिवसातून तर कधी वीस दिवसातून एकदा भेटायची. तेव्हा त्यांची परिस्थिती त्यांनाच माहीत असायची. शरीरांना स्पर्शाची ओढ असायची तर मनांना एकमेकांशी मन मोकळा संवाद करून मानसिक तहान भागवायची इच्छा असायची. पण हा मोबाईल? मोबाईल म्हणजे एक प्रकारे त्याचं चालत फिरतं ऑफिसच म्हणावं. तो क्षणाची उसंत देईल तेव्हा ही दोघं त्यांची तहान भागवतील ना!

"अरे तुम्हा लोकांचे हे असे सारखे फोन येत आहे तर नातेवाईक ओरडत आहेत मला. आलाच कशाला कार्याला? असे म्हणत आहेत." तो पलीकडील व्यक्तीला रागावला.

"अहो साहेब आम्हाला कुठे शौक आहे. पण तुम्ही हे अचानक गेले तर सांभाळणे कठीण होत आहे आम्हाला. या लवकर." पलीकडील माणूस बोलला. तिच्या मनात कसल्याही प्रकारची शंका  येऊ नये व त्यामुळे तिला त्रास होऊ नये म्हणून तो तिच्या सोबत असताना नेहमी फोन स्पीकरवर ठेवून बोलायचा.

"हो हो येतो मी माझं काम पूर्ण झालं की. सांभाळा तेवढं." त्याने फोन स्विच ऑफ करून, बेडवर फेकून, पाठमोऱ्या झोपलेल्या तिच्या खांद्यावर आपले ओठ टेकवले. तोच दारावरची बेल वाजली. आता त्याने डोक्यावर हात मारला. ती काहीच बोलली नाही. सारख्या येणाऱ्या फोनमुळे ती चिडली आहे. हे समजून त्यानेच जाऊन दार उघडले. तिला मात्र थोड्यावेळ आधीचा प्रसंग आठवला. दुपारची जेवणं झाल्यावर मुलाने जेव्हा तिला विचारलं होतं,

"आई मित्र बोलावतोय. मी जाऊ बाहेर खेळायला?"

तसा तिचा चेहरा फुलला होता .

"हो हो जा बाळ. पण जवळच खेळ हं. मी आवाज देताच घरी ये." ती आनंदाने मुलाला म्हणाली होती.

तो मात्र तिचा हेतू न समजून अनावधानाने बोलून गेला होता, "नाही बाळ. अभ्यास पूर्ण कर मॅडमने दिलेला."

"अहो जाऊ द्या ना त्याला थोडावेळ." ती लटक्या रागातच, डोळे दाखवत त्याला म्हणाली तेव्हा त्याचा लाईट लागला होता.

"किती महतप्रयत्नांनी एकांत मिळाला होता आपल्याला. पण याला येणाऱ्या फोननी इतका छान वेळ वाया घालवला. जाऊदे आवरून घेते सर्व. बाळाचा अभ्यास घ्यायला हवा. एक सुट्टीचाच तर दिवस मिळतो मला त्याच्यासोबत घालवायला." या विचारातच तिने बेडवरून उठून अंगावर कपडे चढवले.

"रागावलीस." तो मागून येऊन तिला बिलगला.

"अहो! काय करताय हे? बाळ आहे घरात." ती स्वतःला त्याच्या पासून सोडवायचा प्रयत्न करत बोलली.

"उंहू, बाळ फक्त बॅट घ्यायला आला होता. गेला परत." तो बोलला.

"आपण हे काय करून बसलोय आपल्या सोबत?" ती रडक्या स्वरात बोलली.

"काय झालं तुला?" त्याने तिला बेडवर बसवलं.

"मी खूप मोठी चूक केली ना? ना मी त्या दिवशी तुला तसं बोलले असते, ना तु आम्हाला सोडून बंगलोरला गेला असता." ती रडू लागली.

"अरे मूर्ख आहेस का तु?" तिला मिठीत घेऊन म्हणाला, "तु तसं बोलायच्या आधीच मी त्या ऑफरचा विचार करत होतो. फक्त तुला तसं बोलायची, तुझ्यावर पूर्ण जबाबदारी टाकून जायची हिम्मत नव्हती होत. पण तु बोललीस तेव्हा कळलं कि आता नाही गेलो तर आपल्या दोघांनाही खूप त्रास होईल व त्यात बाळ होरपळून निघेल. म्हणून गेलो मी. आणि बघ गेलो तर फायदाच झाला माझा. माझ्यासाठी स्वप्न असलेली पोस्ट मला मिळाली आहे. माझ्या ध्येय्यपूर्तीच्या समीप मी पोहोचलो आहे. तेव्हा तुही जास्त विचार करू नकोस."

"म्हणजे तु माझ्यावर रागावला नाहीस?" तिने रडक्या आवाजात विचारलं.

"नाही गं माझ्या चिऊ." तो मिठी घट्ट करून म्हणाला.

"मग लवकर लवकर का नाही येत भेटायला?" तिने त्याच्या डोळ्यात बघून त्याला विचारलं.

"मला का वाटत नाही तुला भेटावं, बाळाचे लाड करावे?पण मोठया पोस्ट सोबत मोठी जबाबदारीही येते." तो म्हणाला.

"मग का असंच अर्ध अधुरं आयुष्य जगायचं नेहमीसाठी?" तिने परत विचारलं.

"नाही गं माझ्या राणी. मी काही माणसं तयार करत आहे माझ्या हाताखालची. त्यांना कामं सांभाळता आली कि दर रविवारी येत जाईल तुम्हाला भेटायला किंवा इकडे दिलेल्या मुलाखतींपैकी एखादी पास झालो तर मग इथेच येईल." तो तिच्या केसांमधून हात फिरवत बोलला.

"नक्की?" तिने विचारलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक त्याला दिसून आली.

"नक्की!" तो तिच्या कपाळावर ओठ टेकवून उत्तरला. तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली. तोही हळूच तिच्या कानाशी चाळे करत कुजबुजला, "चल ना, बाळ यायच्या आधी आपण आपलं काम पूर्ण करू."

"हुं!" तिनेही त्याच्या गालावर ओठ टेकवून मुकं सहमती दिली.

समाप्त.

अर्चना सोनाग्रे 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  


Post a Comment

0 Comments