निर्णय - शैलेश कुलकर्णी

 


निर्णय

लेखक: शैलेश कुलकर्णी, मुंबई


"शिवानी, ये ना माझ्या छत्रीत! जाऊयात दोघे मिळून."

"अरे नको अनय. मी थांबते पाऊस थांबेपर्यंत. तू हो पुढे."

"कम ऑन शिवानी. हा पाऊस थांबेल असं वाटत नाहीये. उगीच रिस्क घेऊ नकोस. माझी छत्री मोठी आहे. भिजणार नाहीस तू."

 शिवानी जरा अनिच्छेनेच अनयच्या छत्रीत आली. एका छत्रीतून असं एकमेकांना चिकटून चालणं तिला टाळायचं होतं. उगीच आजूबाजूचे बघणार आणि कमेंट्स करणार. पण अनय फारच आग्रह करू लागला. शिवाय सगळीकडे पाणी साठलं तर घरी जाणंही अवघड होईल ही भीती होतीच

 तिला अचानक युगची आठवण आली. काय करत असेल तो आत्ता? तरी बरं घरी आईबाबा त्याला बघताहेत म्हणून आपल्याला त्याची काळजी नाही. पण तरीही घरी वेळेवर पोहोचायलाच हवं

 छत्रीतून अनयला खेटून चालताना शिवानीच्या मनात असंख्य विचार येत होते. एका तरूण पुरूषाचा इतका जवळून स्पर्श ती किती वर्षांनंतर अनुभवत होती. अमितशी डिवोर्स घेऊन जवळपास सहा वर्ष झाली होती. युग जेमतेम वर्षाचा होता तेंव्हा. अमितचे विवाहबाह्य संबंध, घरी खोटं बोलणं...शिवानीला असह्य झालं होतं सगळं. एकीकडे छोट्या युगची देखभाल. दुसरीकडे संसाराची अशी वाताहात. अतिशय भयंकर परिस्थितीतून गेली होती शिवानी

 डिवोर्सनंतर पुरती कोलमडली होती ती. तिच्या आईबाबांनी अर्थातच तिला सर्वतोपरी आधार दिला. युगचाही सांभाळ केला. शारिरीक, आर्थिक आणि मानसिक... सर्व स्तरांवर शिवानीला पुन्हा उभी केली आयुष्यात

 युगचा तिसरा वाढदिवस झाल्यावर चार वर्षांपूर्वी शिवानी या ऑफिसात जाॅईन झाली. पोस्ट ग्रॅज्युएट असल्याने तिला चांगली नोकरीही मिळाली. औटघटकेच्या संसारात होरपळून निघाल्यामुळे आता फक्त आपलं आणि युगचं आयुष्य घडवणे आणि आपल्या आईबाबांनाही सांभाळणे, इतकंच मर्यादित ध्येय तिने आपल्याभोवती आखून घेतलं होतं. पुन्हा संसार मांडण्याचा विचारही ती करत नव्हती

 "अगं मी काय विचारतोय शिवानी?" अनयच्या आवाजाने ती भानावर आली. "तुला टॅक्सीने सोडू का घरी?" 

 "नको मी जाते इथून. आता पुढे पाणीही ओसरलंय. थँक्स मला इथपर्यंत कंपनी दिल्याबद्दल."

 "बस्स का? असे कोरडे थँक्स? मला पार्टी पाहिजे उद्या... तुझ्याकडून." अनय हसत म्हणाला

 "बरं बाबा देते. निघू आता?" शिवानी म्हणाली.

 "नो वे. आधी गुडबाय तर कर मला." असं म्हणत अनय तिला जवळजवळ चिकटलाच. एक हलकीशी मिठी मारून, तिच्या कमरेला कवेत घेत अनय म्हणाला

 "पुरे आता. निघते मी. बाऽऽय..." असं म्हणत हसत हसत शिवानी निघाली. कॅब पकडून त्यात बसलीसुद्धा. अनय कितीतरी वेळ तिला बाय करत उभा होता.

 शिवानी अनयबद्दल विचार करू लागली. अंदाजे बत्तिशीचा हा तरूण. जेमतेम एक वर्षापूर्वीच आपल्या ऑफिसात जाॅईन झाला. त्याच्या लाघवी स्वभावाने त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. कामात तर तो एक्स्पर्ट होताच, पण सगळ्यांशीच छान संबंध ठेवून होता. शिवानीशी तर जरा जास्तच... 

 तो आणि शिवानी एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. त्यामुळे दोघे रोजच भेटत. छान मैत्री झाली होती एव्हाना दोघांची. अगदी घरगुती गोष्टी शेअर करण्याइतपत. एरव्ही जरा अलिप्तपणे राहणारी शिवानी अनयशी मात्र मोकळेपणाने बोलायची, हे ऑफिसमधल्या इतरांनीही हेरलं होतं.

 अनय तर येता जाता शिवानीशी संधी साधून गप्पा मारायचा. तिची तारीफ करायचा. एकदा शिवानी नवा टाॅप आणि ट्राऊझर घालून आली होती, तर हा गडी दिवसभर अखंड बघतच राहीला होता तिच्याकडे.

 आताही एका छत्रीतून अनयसोबत चालताना शिवानी काही काळ मोहरली होती. त्याच्या दणकट पुरूषी शरीराचा स्पर्श तिच्या मनाची चलबिचल करत होता. निघताना त्याने मारलेल्या मिठीने तिला इतकं मोकळं आणि हलकं वाटलं, की बस्स

 ...आणि अचानक तिच्या लक्षात आलं की आपण भिजू नये म्हणून अनयने छत्री तिच्या बाजूने धरली होती. यात त्याच्या डाव्या खांद्याकडचा शर्ट पूर्ण भिजला होता

 शिवानी चमकली. हा आपल्यात गुंतत चाललाय का? आपल्यापेक्षा लहान आहे तो दोन वर्षांनी. आणि आपला भूतकाळ माहिती आहे का त्याला? एकदा बोललंच पाहिजे अनयशी.  

****

 एमबीए झालेला अनय वर्षापूर्वीच या कंपनीत जाॅईन झाला होता. त्याच्या प्रोजेक्टमधल्या शिवानीकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं. तिचा सुंदर चेहरा, टापटीपीत राहणं, आकर्षक बांधा यांचा त्याला मोह पडता तरच नवल

 पण त्याला सर्वात आवडला तो तिचा स्वभाव. आपल्या कामाशी काम ठेवण्याचा, उगाच कोणाशी वायफळ बडबड करण्याचा, मॅचुअर्ड स्वभाव. अनय शिवानीकडे अधिकाधिक आकर्षित होत गेला

 हळूहळू अनयची खात्री पटू लागली की शिवानीच त्याची 'सोलमेट' आहे. त्याने तिची माहिती काढायला सुरुवात केली. काही बाबी समजल्यावर त्याला धक्का बसला, पण त्यामुळे खरं तर त्याच्या आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं.

****

 दुसर्या दिवशी ऑफिस सुटताना अनयने शिवानीला आठवण करून दिली. "मॅडम, आठवतंय ना, आपण आज पार्टी देणार आहात!"

 "हो हो माहिती आहे. आणि विसरले तर तू आहेसच आठवण करून द्यायला." शिवानी हसत म्हणाली

 दोघेजण एका रेस्टॉरंटमध्ये काॅर्नर सीटला जाऊन बसले. अनयने ठरवलं त्याचं मन मोकळं करायचं

 "शिवानी, तुला मनापासून सांगतो. तू मला प्रचंड आवडतेस. सुरूवातीला हे नुसतं आकर्षण होतं. पण आता त्याचं प्रेमात रूपांतर झालंय. मला तुझ्याशिवाय राहणं कठीण होत चाललंय. आय लव्ह यू व्हेरी मच. माझ्याशी लग्न करशील?" अनयने एका दमात आपलं मन मोकळं केलं. मग शांत झाला.

 आता शिवानीची पाळी होती. ती म्हणाली, "अनय, मलाही तू आवडतोस. पण तुला माझा भूतकाळ माहिती आहे का? मी तुझ्याहून दोन वर्षांनी मोठी आहे. माझा डिवोर्स झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक सात वर्षांचा मुलगा आहे. मी त्याला आणि माझ्या आईबाबांना अंतर देऊ शकत नाही."

 "मला माहिती आहे सगळं. मी ह्या सर्वांसह तुला स्वीकारायला तयार आहे. बिलीव्ह मी."

 "पण तुला तर एखादी तरूणी सहज मिळू शकते. तु हुशार आहेस, तरुण आहेस, दिसायलाही चांगला आहेस. माझ्याशी लग्न करून तु इतकी सगळी तडजोड का करतोहेस?"

 "बिकाॅज आय लव्ह यू सो मच. तुला खरं सांगू? रात्रंदिवस मी फक्त तुझाच विचार करत असतो. त्यादिवशी तू तो नवा टाॅप घालून आली होतीस, तेंव्हा तर मी रात्रभर तुझंच स्वप्न पाहात होतो. मला तेंव्हाच जणू 

साक्षात्कार झाला की तूच माझी 'सोलमेट' आहेस. तुझ्याशिवाय मला आता लाईफ पार्टनर म्हणून दुसरं कुणीच नकोय. प्लीज, मला नाही म्हणू नकोस."

 "अनय, मला वेळ दे थोडा. मला घरी आईबाबांबरोबर बोलायला हवं. युगचाही विचार करायला हवा. गिव्ह मी सम टाईम."

 "ठीक आहे. तू वेळ घे. पण नाही म्हणू नकोस प्लीज." 

****

 शिवानी घरी आली तेंव्हा सुन्न झाली होती. एकीकडे आपण अनयला आवडतोय याबद्दलची सुखद भावना होती. तिलाही कधीकधी वाटे, आपलाही संसार धड असता तर? आठ वर्षांपूर्वी अमितच्या देखण्या रूपावर ती भाळली होती. त्या चंचल वयात तिच्या दृष्टीने अमित हाच जगातला सर्वोत्तम पुरूष होता. एका वर्षातच युगचा जन्म झाला, आणि त्याचवेळी अमितचा खलनायकी चेहरा उघडकीस आला. त्यानंतर....

 कित्येक वर्षात शिवानीला पुरूषाचा सहवास लाभला नव्हता. एकटी बाई बघून अनेकजण संधी साधायचा प्रयत्न करत. पण शिवानीने सर्वांनाच कटाक्षाने लांब ठेवले होते

 पण अनय मात्र त्याला अपवाद ठरला. शिवानीला त्याच्याबद्दल सुरूवातीला कुतूहल वाटे. त्याच्या बुद्धिचं, काम झपाटून करण्याचं आणि अगदी त्याच्या पुरूषी लुक्सचंही कौतुक वाटे. वयाने लहान असल्याने की काय, पण तो आपल्याकडे 'तसल्या' नजरेनं बघत नसावा, असं तिला उगीचच वाटत होतं. पण शेवटी....

 शिवानी आईबाबांशी बोलली. आश्चर्य म्हणजे दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. शिवानीचं आणि युगचं आयुष्य जर मार्गी लागत असेल तर चांगलंच आहे. मुलगा चांगला असेल तर काहीच हरकत नाही, असं ते म्हणाले

 शिवानी मात्र वेगळाच विचार करत होती. युग अनयला वडील म्हणून स्वीकारेल का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनयही अमितसारखाच निघाला तर? काही काळानंतर त्याचं वेगळंच रूप उघडकीस आलं तर?

  शिवानी हादरली. पुन्हा त्या भयानक अनुभवातून तिला जायचं नव्हतं. तिच्या डोक्याचा भुगा झाला होता. काय निर्णय घ्यावा ते सुचत नव्हतं

 शेवटी तिने ठरवलं. अनयला घरी बोलावून आईबाबा आणि युगशी भेट करून द्यायची. नंतर काय तो निर्णय घेऊ.

****

 दोन दिवसांनी विकेंडला अनय शिवानीच्या घरी आला. पहिल्या भेटीतच युगबरोबर त्याची छान दोस्ती जमली. दोघं मिळून काँप्युटरवर गेम्स खेळले. युगही कित्येक दिवसांनी इतका हसत खेळत असल्याचं बघून शिवानीला बरं वाटलं

 आईबाबांबरोबरही अनयचं ट्यूनिंग छानच जमलं. बोलक्या आणि लाघवी स्वभावाने अनयने त्यांची मनं जिंकली. आता अनय निघणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली

 दार उघडताच शिवानीला धक्काच बसला. दारात अमितचे आईवडील उभे होते. तब्बल सात वर्षांनंतर पाहात होती ती त्यांना. खूप थकलेले दिसत होते दोघेही.

 "आम्ही आत येऊ का?" त्यांनी ज्या व्याकुळ स्वरात विचारलं ते ऐकून शिवानीचा 'नाही' म्हणायचा धीर झाला नाही. दोघे आत आले

 "बेटा, कशी आहेस?" त्यांच्या प्रश्नावर शिवानीला भडभडून आले. हा प्रश्न त्यांनी इतक्या वर्षांनंतर विचारावा?

 "आम्ही हतबल होतो," अमितचे वडील बोलू लागले. "अमितने आम्हाला तुमच्याशी संपर्क ठेवायला मनाई केली होती. तो किती डाॅमिनेटिंग होता ते तुम्हाला सांगायला नकोच."

 "होता म्हणजे?"

 "दीड वर्षापूर्वीच तो कार ॲक्सिडेंटमध्ये वारला. शिवानीला सोडल्यानंतर पुरती वाताहात झाली त्याची. त्याची नोकरी गेली. जिच्यासाठी त्याने शिवानीसारखा हिरा गमावला, तिनेही त्याला सोडलं. पुढची पाचसहा वर्ष खडतर गेली त्याची. मी त्याला अनेकदा म्हणायचो की जाऊन शिवानीची माफी मागून परत समेट कर. पण त्याच्या अहंकारी स्वभावानेच त्याचा घात केला. आम्ही दोघे मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहीलो."

 "शिवानी, तू तुझे आणि आईबाबांचे काँटॅक्ट नंबर्स बदललेस. आम्हाला फोनवर संपर्कही साधता येईना. आणि तुला प्रत्यक्ष भेटण्याची खरं तर हिंमतच होत नव्हती."

 "हा अनय म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा. अमितचं आणि त्याचं कधीच पटलं नाही. पण अमितच्या मृत्यूनंतर अनय नियमितपणे आमच्या घरी येऊन आमची विचारपूस करू लागला. आम्हाला काय हवं नको ते बघत असतो. लाखात एक मुलगा आहे तो."

 "काही दिवसांपूर्वीच त्याने मला शिवानीबद्दल सांगितलं. मी चरकलो. दैव पण कसे खेळ दाखवते! जे प्रकरण कायमचं बंद झालं होतं, तेच पुन्हा उघडायची वेळ आली. पण यावेळेस मी ठरवलं, अनयला सपोर्ट करायचा. शिवानी, तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय तो. आमच्या अमितसारखा अजिबात नाहीये. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. तू नाही म्हणू नकोस."

 "केवळ अनयसाठी आम्ही इथे यायचं धाडस केलं. तुझ्यावर कळत नकळत आमच्याकडूनही अन्याय झाला असेल. त्याचं परिमार्जन करण्याची संधी देशील का आम्हाला शिवानी?"

 त्याक्षणी घरातले बरेच जण आनंदाश्रू पुसत होते.

****

 दोन वर्षांनंतर....

 शिवानीची आजच डिलिव्हरी झाली. तिने एका छोट्या परीला जन्म दिला. अनय आणि युग तर प्रचंड खूष आहेत. आणि शिवानीचे आईवडीलही मनापासून समाधानी आहेत

 अनय आता दुसर्या कंपनीत मोठ्या पोस्टवर जाॅईन झालाय. शिवानी मात्र आधीच्याच ऑफिसात टिकून आहे. घर, संसार आणि नोकरीचा तोल सांभाळते आहे. पण या सर्वांचाच छान आनंद घेत घेत. अनयसारखा 'केअरिंग' नवरा असल्याची भावना तिला सुखावत असते.

 आणि हो... युग त्याच्या नकळतच अनयला 'डॅड' म्हणून हाक मारू लागला आहे

 अनयचं एकतर्फी वाटणारं प्रेम इतकं सच्चं होतं की बघताबघता त्याने शिवानीला आणि तिच्या पूर्ण फॅमिलीला आपलंसं केलं. एक छोटीशी प्रेमकहाणी त्याने सुफळ संपूर्ण केली.

****

 ©️®️ शैलेश कुलकर्णी, मुंबई.

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहेया कथेतील आशयविषयमांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहेयातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीया कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेतपरवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments