कंपॅटीबीलिटी - प्राजक्ता राजदेरकर



 ❣️कंपॅटीबीलिटी❣️

प्राजक्ता राजदेरकर


" आजोबा, बसा..थोडं बोलायचं होतं मला.."

" अरे डॉक्टर मला इथे का बोलवलंस, ऑपरेशन सुरू करताय ना, मी अगदी निघालोच होतो तिसऱ्या मजल्यावर जायला. की ऑलरेडी चालू झालंय तिचं ऑपरेशन, मग तर मला जायलाच हवंय वर, मी येतो नंतर बोलायला.."

" आजोबा, आजोबा बसा बरं खाली जरा स्वस्थ, पाणी हवंय का तुम्हाला? आजींना नेलंय ओटी मध्ये पण तरीही मला एकदा तुम्हाला भेटावंस वाटलं. मी डॉक्टर कौस्तुभ आणि मीच ऑपरेशन करणार आहे. पण आजोबा.. खूप मोठी रिस्क आहे, आजी नव्वद वर्षांच्या आहेत.."

" नव्वद नाही रे, आता कुठे एकोणनव्वद आहे ती, अन मी ऐक्यान्नऊ, काही होणार नाही तिला, तू नको घाबरुस.. मी सही केलीये कंसेन्टवर.. घ्या तुम्ही ऑपरेशन करायला.."

असं म्हणून आजोबा हळुवारपणे चालत निघून गेले. ओटीच्या बाहेर जाऊन बसले. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत कुठेही हलणार नव्हते ते. आजींना सिव्हीअर हार्ट ऍटॅक आला होता, आजोबांनी वेळेत धावपळ करत या हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यांना. आजीचं वय आणि ऍटॅकची तीव्रता बघता फारच मोठी रिस्क होती. म्हणून डॉक्टर कौस्तुभला बोलावण्यात आलं होतं. पण त्यांचं या वयात कुठलंही ऑपरेशन करू नये, बॉडी रिस्पॉन्ड करणार नाही असंच वाटत होतं कौस्तुभला, मेडिसीनल थेरपिवर त्यांना स्टेबल करू, शरीराला कुठलेही कष्ट देण्यात काही अर्थ नाही असेच सगळ्या डॉक्टरांचेही मत होते पण आजोबांना समजावणे केवळ अशक्य.

तब्बल बारा तास ऑपरेशन चालले होते, ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती आजींची. आजोबा ठक्क बसले होते ओटी बाहेर, ना त्यांना तहान भूक लागली होती ना पेंग आली होती. हातात जपमाळ घेऊन अखंड नमस्कार चाललं होतं त्यांचं. मध्ये भेटायला आलेला व त्यांच्या घरी काम करणारा रघुनाथ अन सविता आजोबांना खायला घेऊन आले होते, अधे मध्ये फ्लोअर वरच्या मामांनी चहा आणून दिला होता. अजून कोणी येण्याची फारशी शक्यता नव्हती, विरभद्र नगरला एका बंगलो सोसायटीत राहायचे ते अन आसपासच्या घरातही त्याच्यासारखीच सिनिअर सिटीझन मंडळी राहत होती. बहुतांश जणांची मुलं परदेशात स्थायिक होती. आजीआजोबांना मात्र कुणीच नव्हतं.

ओटीचं दार उघडलं आणि आतला डॉक्टरांचा ताफा बाहेर आला,

" बरी आहे ना ती, ऑपरेशन नीट झालं का ?"

" आजोबा या, बोलूयात आपण.."
म्हणत डॉक्टर कौस्तुभने त्यांना भेटायला केबिनमध्ये बोलावलं. 

" काय रे बाबा, काही चिंता नाही ना, मी भेटू का तिला..कधी शुद्धीवर येईल ती.."

" आजोबा, बसा तरी..ऑपरेशन जरा जोखमीचं होतं. झालंय सगळं नीट. आता फक्त आजींना पुढील सहा तासात शुद्ध यायला हवी. म्हणजे काही चिंता नाही.."

आजींना रूममध्ये शिफ्ट केलं, आजोबा येरझाऱ्या घालत राहिले. जसजसे डॉक्टरांनी सांगितलेले सहा तास संपत आले तसतशी आजोबांची अस्वस्थता वाढत होती. चिंता डॉक्टरांना देखील लागली होतीच. आजीचं वय जास्ती असल्याने लवकर शुद्ध येऊन त्यांच्या संपूर्ण शरीराने योग्य प्रतिसाद द्यायला हवा होता. पण जी भीती होती तेच झालं, सहा तासा नंतरही आजींना शुद्ध आली नव्हती, मेंदूने असहकार पुकारला होता. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते अन त्याबरोबरच चालले होते आजोबांचे विशेष प्रयत्न, आजीला शुद्ध यावी म्हणून. त्यांच्यात एवढा धिर, एवढं बळ आलं कुठून होतं देवच जाणे. मात्र त्यांचा विश्वास ठाम होता, ते क्षणभरही डगमगले नव्हते, हारले नव्हते.

" आज मी माझ्या हातची मऊ लुसलुशीत लापशी करून आणली आहे. म्हणजे जरा यू ट्यूबवर रेसिपी बघावी लागली पण केलाय प्रयत्न..तिची नेहमी तक्रार असायची ना की मी तिला माझ्या हातचं काहीही करून खायला घालत नाही. आता तक्रारीला वावच देणार नाहीये, एकदा का ही सुट्टी होऊन घरी आली की मी रोज तिला माझ्याच हातचं करून खायला घालणार आहे. ती स्वतः सुगरण आहे, दोन चारदा माझ्या हातचं खाल्लं की पुन्हा आयुष्यभर तक्रार करणार नाही.."

असं म्हणत आजोबांनी रुममधल्या नर्सला डोळे मिचकावत टाळी दिली होती. आजोबा आजीजवळ बसून पोथी वाचून दाखवायचे, स्तोत्र भजनं म्हणायचे, जसं जमेल तसं. कधी त्यांची आवडती गाणी वाजवायचे, तरूणपणातले किस्से आठवत आजींशी गप्पा मारायचे. हॉस्पिटलमध्ये त्या फ्लोअरवर सगळ्यांना माहिती झाले होते आजोबा. विशेष म्हणजे गमती जमती करत सगळ्यांशी बोलायचे. आजोबांचे हे रूप काही वेगळेच आहे असे रघुनाथ म्हणाला होता. आजी आजारी झाल्या तेंव्हापासून आजोबा फार निवळले आहेत असे त्याचे म्हणणे होते.

" अहो उठा, पेठेतल्या पप्पू हलवाया कडचा तुमचा आवडीचा मोती चुराचा लाडू आणलाय, आणि मोगऱ्याचा गजरा देखील आणलाय मस्त..कोपऱ्यावरच्या फुलवाल्या कडून, उठा बरं आता, घर वाट बघतंय आपलं आणि देवघरातल्या फुलवाती संपल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे ना मला दुसऱ्या कोणाच्या हाताच्या फुलवाती आवडत नाहीत.."

त्या दिवशी आजोबा जरा भावुक झाले होते, ऑपरेशन नंतरचा पाचवा दिवस होता आज. त्याचवेळी डॉक्टर कौस्तुभ व्हिजिटला आले होते.

" आजोबा, तुम्हीच असा धिर सोडून कसं चालेल..उलट सगळे तुमचं केवढं कौतुक करतायेत, तुम्ही किती धिराचे आहात म्हणून..अन थँकफुली त्यांच्या बाकी सगळ्या सिस्टिम्स नीट वर्क करतायेत, मग आपल्या प्रयत्नांना यश मिळणारच ना..."

" हो हो, म्हणजे काय..यश तर मिळणारच..अन तुला एक गम्मत सांगू का डॉक्टर, ती ना बरेचदा मुद्दाम करते असं. मला तिची सवय माहिती आहे ना. माझी बडबड तिला ऐकायची नसली की मुद्दाम झोपेचं नाटक करते..आताही तेच झालंय. पुढच्या महिन्यात सत्तरावा वाढदिवस आहे आमच्या लग्नाचा.. कधीची ही मागे लागली होती, हिऱ्याच्या कुड्या घेऊन द्या म्हणून. डायमंड ज्युबिली करणार आहोत आम्ही, तसा करारच झालाय आमचा. अशी मधेच कोणीतरी कच खाऊन कसं चालेल.."

दुसऱ्या दिवशी आजोबा हॉस्पिटलमध्ये सांगून कुठेतरी बाहेर गेले अन वापस आले तेच हातात काहीतरी घेऊन. एक छोटीशी डबी आजींपुढे उघडत म्हणाले,

" बघा, आवडतायेत का ते..खरंतर आत्ता नव्हतोच देणार..ठरलं होतं ना पंचाहत्तराव्या वाढदिवसाला देईन..पण आता तुम्ही एवढा हट्टच करताय तर..इतकं रुसतं का कोणी..चला उठा आता लवकर.."

आजोबांचा आवाज कातर झाला होता, रूममध्ये राऊंडवर आलेल्या डॉक्टरांना, नर्सला देखील भरून आले होते..आजोबा आजींचा हात हातात धरून भावुक होऊन काहीतरी बोलत होते, त्यांना हाताची पकड जरा घट्ट झाल्याचे जाणवले, आजींच्या डोळ्याची बुबुळं सुद्धा हालत होती, आजोबांनी त्वरित डॉक्टरांना सांगितलं. सगळी धावाधाव झाली..सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आज आजींना शुद्ध आली होती. डॉक्टर कौस्तुभही एका ऑपरेशननंतर भेटायला आले होते, सगळ्या तपासण्या केल्यानंतर आजी आऊट ऑफ डेंजर असल्याचे त्यांनी सांगितले.

" आजी, किती घाबरवलंत सगळ्यांना..म्हणजे आम्हा सगळ्यांना. आजोबा मात्र अजिबात घाबरले नाहीत, त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.."

" कारण मला खात्री होती, मी आधी कधीतरी दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायला म्हणून अशी वागतेय ही. तुला सांगतो डॉक्टर, साधं पित्ताशयाचं ऑपरेशन झालं होतं माझं..हिने मला संपूर्ण वर्षभर पथ्य सांभाळायला लावलं..आता बदला घ्यायची वेळ माझी आहे.."

रुममधले सगळे खळखळून हसले, आजींच्या चेहऱ्यावरही गोड हसू पसरलं. आजी सुट्टी होऊन घरी गेल्या तेंव्हा आजोबांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. आजींची औषधं देणं, त्यांचं पथ्य सांभाळणं, त्यांची वेणी घालून देणं, संध्याकाळी त्यांना जरा दोन फेऱ्या मारायला नेणं सगळं आजोबांनी निगुतीनं केलं. आजींना आजोबांचं इतकं काळजी घेणं बघून अगदी भरून पावल्यासारखं होत होतं. आपल्या आजारपणानंतर ते किती बदलले आहे हे जाणवत होतं आजींना..

" कुठे चाललोय आपण, आणि हा केक, हा बुके कोणासाठी जरा नीट सांगशील? "

" आज मला तुला कोणालातरी भेटवायचं आहे..आज कुठलंही महत्वाचं ऑपरेशन नव्हतं म्हणून हा प्लॅन केलाय. तुला आठवतं साधारण महिन्याभरापूर्वी आपल्या ऍनिव्हर्सरीच्या दिवशी मला अचानक एक ऑपरेशन करायला जावं लागलं..ओपन हार्ट सर्जरी होती.."

" हो आठवलं..तू अनेकदा घरी त्या आजोबांबद्दल बोलला आहेस की, पण अचानक असं त्यांच्या घरी.."

" आज त्यांच्या लग्नाचा सत्तरावा वाढदिवस आहे. इतकं गोड कपल आहे ना..तूही त्यांना भेटावं असं फार वाटतंय मला.."

दारावरची घंटी वाजली, आजोबा काहीतरी गुणगुणत हळुवार दार उघडायला आले. समोर डॉक्टर कौस्तुभला सपत्नीक बघून अतिशय आनंद झाला त्यांना.

" अरे वा, या या..डॉक्टर तू तर मोठं सरप्राईज दिलंस..अहो बघताय का कोण आलंय तुम्हाला भेटायला.."

" आज खास तुम्हा दोघांना शुभेच्छा द्यायला आलोय आजोबा, पण हे काय तुम्ही किचन ऍप्रन घालून काय करताय ? "

" बरंच झालं तुम्ही दोघे आलात ते, तूच बघ आणि सांग मी किती छान करतो सगळं ते..आज मी स्वतः सगळं हिच्या आवडीचं केलं आहे. ठरवल्याप्रमाणे मनीचे सगळे लाड करणं चाललंय.."

यावर दोघेही खळखळून हसले, पत्नीची ओळख करून देत डॉक्टर कौस्तुभ म्हणाले,

" बाय द वे, ही माझी मनी.. केतकी.."

दोघेही एकमेकांना डोळे मिचकावत हसले, केतकी आजोबांच्या पाया पडली, त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. पण कौस्तुभ तिला मनी का म्हणाला होता हे तिला कळलेच नव्हते, तसा लटका राग तिने व्यक्त केला. आजोबा म्हणाले,

" अगं बाळा ती एक गंमतच आहे..आमची ही माझ्या माघारी मला बोका म्हणते, मला ते केंव्हाच कळलंय पण ते तिला माहिती नाही, मग मीही तिला मनी म्हणतो..तसं हाही तुला मनी म्हणतोय. तू नाहीस ना गुरगुरत आमच्या हिच्या सारखी ? "

यावर सगळेच हसले, कौस्तुभला हे आजोबा एवढे का आवडले हे केतकीला आता कळले होते, तिला आता आजींना भेटण्याची उत्सुकता लागली होती.

दवाखान्यात अन ऑपरेशनच्या ओव्हरऑल स्ट्रेसने आजी तेंव्हा फारच कृश दिसत होत्या पण आजचं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज काही औरच होतं. आजोबांनी त्यांची किती काळजी घेतली असावी हे स्पष्ट दिसत होतं त्यांच्याकडे बघून. आजोबा म्हणायचे त्याप्रमाणे आजी दिसायला एकदम लिना चंदावरकर होत्या. आज त्या सुरेख मोतीया कलरची मोरपंखी काठाची चंदेरी सिल्क साडी नेसल्या होत्या. सुपारी एवढ्या छोट्याश्या आंबाड्याला मोगऱ्याचा गजरा माळला होता, कानात त्या दिवशीच्या हिऱ्याच्या कुड्या चमकत होत्या आणि चेहऱ्यावर समाधानी स्मित विलसले होते. ठेंगण्या सुबक शरीरयष्टीच्या गोऱ्यापान आजी खरंतर आजोबांपेक्षा खूपच उजव्या होत्या. आजोबा उंच आणि सावळे होते, जरा धिप्पाड होते. म्हणजे खरंतर विजोड म्हणावी अशी जोडी होती त्यांची पण तरीही कौस्तुभच्या दृष्टीने ते परफेक्ट कपल होते. 

केतकी एकटीच आजींशी बोलत बसली होती, मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिला मिळवायची होती,

" आजी मला खुप काही सांगितलंय कौस्तुभने तुम्हा दोघांबद्दल, त्याच्या मते खरं प्रेम असावं ते तुम्हा दोघांसारखं.. आज तुम्हाला भेटण्याचा योग आला, खूप छान झालं .."

" गोडच आहे छोकरा, तूही खूपच गोड आहेस हो..तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे अगदीच. त्याच्या विद्वत्तेमुळे अन आमच्या ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे मला दुसरा जन्म मिळालाय हो.."

" खरंय आजी, मला कौस्तुभने सगळं काही सांगितलं येतांना. घरीही अनेकदा बोलायचा तो. आजोबांना तर हॅट्स ऑफ. "

" खरंय गं, अगदी खरंय. लहान बाळासारखी काळजी घेतलीये त्यांनी माझी. फार बदलले आहेत गं माझ्या ऑपरेशननंतर. आमचे हे कितीही कडक, रागीट दिसत असले तरी वर करवंटी आत खोबरे असेच आहेत. सगळी सुखं ठेवली त्यांनी माझ्या पायाशी आयुष्यभर. अगदी दृष्ट लागावा असाच संसार होता आमचा, आज सत्तरी झाली बाई लग्नाची. फक्त मुलबाळ नव्हतं आम्हाला, तेवढंच काय एक गालबोट. पण तुला सांगू यांच्या कडक स्वभावामुळे कोणाची टाप नव्हती बोलायची, नाहीतर लोकांनी टोचण्या देऊन देऊन जीव नकोसा केला असता माझा. जेंव्हा तुमच्यासारखे लोक असं भेटायला येतात ना तेंव्हा कोणतीच उणीव राहत नाही गं मनात, खूप आनंद होतो.."

" आजी, सत्तर वर्षे एकत्र म्हणजे किती छान ना, पण कधी तुमची भांडणं नाही झाली? मला कौस्तुभच्या प्रायॉरिटीज माहिती आहेत पण तरीही त्याने मला नीट वेळ दिला नाही की माझी चिडचिड होते, आमची भांडणं होतात..तुम्ही कसं बांधून ठेवलंत इतकी वर्षं? "

" तुला अनारसा आवडतो? "

आजींनी विचारलं, तितक्याच अधीरतेने केतकी म्हणाली,

" खूप.."

" करता येतो का? "

" नाही.."

" मला नेहमी वाटतं आपला संसार हा अनारस्या सारखा असतो, अनारसा कसा सहज जमत नाही, त्याला कौशल्य लागतं...उंडी बरोबर मळावी लागते, हळुवार हाताने तो खसखशीवर थापून तितक्याच अलवारपणे तुपात सोडावा लागतो, तरंच सुरेख अशी गौर येते त्यावर, अर्थात सगळ्यात आधी त्याचं प्रमाणही जमावं लागतं. आपल्या नात्याचंही तसंच असतं बाळा, काही गोष्टी अलवारपणे जपाव्या लागतात. अनेकदा झाकून ठेवावं लागतं, अनेकदा झोकून द्यावं लागतं. रुसवे, फुगवे, भांडणं कोणाला चुकलेत सांग, अगदी देवादीकांनाही नाही. पण या गोष्टी तर हव्यातच ना, खमंग फोडणीसारख्या..परफेक्ट कपल कोणीही नसतं गं, तुम्हाला फक्त ते परफेक्टली हँडल करावं लागतं. मग आपण होतो खरे कंपॅटीबल..हो ना.."

केतकी फक्त ऐकत होती, अगदी मन लावून. तिकडे कौस्तुभ आजोबांना मदत करत होता.

" आजोबा तुमची डायमंड ज्युबिली अगदी धुमधडाक्यात करू हं आपण, आणि तेंव्हा तर मी हॉस्पिटलचा सगळा स्टाफ घेऊन येईल, सगळे आठवण काढतात तुमची.."

" होय म्हणजे काय, मी स्वतःच तेंव्हा तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देईन. तुम्ही सगळ्यांनी हिच्या आजारपणात जी मदत केलीये ना त्याची परतफेड नाही करता येणार मला. "

" छे हो आजोबा, ते तर आमचं कर्तव्य होतं. पण खरा रोल तर तुमचा होता..तुमची मेहनत, तुमची प्रगाढ ईच्छाशक्ती आणि तुमचं प्रेम..केवळ यामुळे तुम्ही आजींना परत आणू शकलात. लकी आहेत आजी.."

" लकी तर मी आहे बाबा, माझ्यासारख्या तिरपट माणसाला तिने विनातक्रार आयुष्यभर झेललं आहे. जमेल तशी, जमेल तितकी सुखं देण्याचा प्रयत्न केलाय मी तिला फक्त एक सुख देऊ शकलो नाही, मातृत्वसुख..माझ्यातील कमतरतेमुळे त्या एका सुखा पासून वंचित राहिली ती.."

" आजोबा तुमच्यातील कमतरतेमुळे काय, आजी कोमा मध्ये होत्या तेंव्हा एकदा त्यांचं फुल्ल बॉडी स्क्रिनिंग केलं होतं आम्ही.. " कौस्तुभ ओघात बोलून गेला..

" शू ssssssss, हे गुपित फक्त तुझ्या माझ्यात राहायला हवंय मला, आयुष्यभर मी ते फार कष्टाने जपलं आहे.."

" प्रॉमिस.."

आज त्याच्या मनातला आजोबांबद्दलचा आदर कितीतरी पटीने वाढला होता.. आजींचे गर्भाशय प्रेग्नन्सी पेलण्याइतके डेव्हलप झालेच नव्हते. पण इतकी वर्षं सगळा दोष स्वतःकडे घेत आजोबांनी त्यांच्यातली ही उणीव झाकून नेली होती, खुद्द आजींनाही त्या गोष्टीची कल्पना नव्हती... किती ते प्रेम...

डॉक्टर कौस्तुभने आणलेला केक कापून, आजोबांनी केलेल्या बेताचा आस्वाद घेत मनसोक्तपणे गप्पा मारत आजी आजोबांच्या लग्नाचा सत्तरावा वाढदिवस छान साजरा झाला होता. या दोघांमुळे आज कंपॅटीबिलिटी या शब्दाचा खरा अर्थ डॉक्टर कौस्तुभ अन केतकीला कळला होता..

प्राजक्ता राजदेरकर

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहेया कथेतील आशयविषयमांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहेयातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीया कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेतपरवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

12 Comments

  1. खूप छान कथा

    ReplyDelete
  2. अप्रतिम.

    ReplyDelete
  3. अप्रतिम!!

    ReplyDelete
  4. खूपच छान

    ReplyDelete
  5. अतिशय हृदयस्पर्शी 🙏🏻

    ReplyDelete
  6. अप्रतिम...अगदी नंबर लायक 👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम

    ReplyDelete
  8. अप्रतिम

    ReplyDelete
  9. काय सांगू.... ज्या नितळ आणि निस्वार्थ प्रेमाची आपण अपेक्षा करतो ना आयुष्यभर.....ते कल्पनेपेक्षा ही पलिकडचे प्रेम, मला ह्या कथेत अनुभवायला मिळालं.....touch wood 👌👌👌

    ReplyDelete
  10. खूप सुंदर..

    ReplyDelete
  11. कमालीची सुंदर कथा

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box