हळवी प्रीत
अवंती कोटे
"नीलू..सोड ना.."
"अहो..थांबा ना..अं.. आ!"
.. नीलाचे ते अधीर हुंकार अन् प्रचंड ओढ निशिकांतला थोपवता येत नव्हती..तिच्या आतुर सादेला प्रतिसाद देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता तो..ती मात्र पुरत्या भरात आलेली..तिचे ओठ त्याच्या शरीरावर अक्षरशः रुतत होते..तिच्या नखांनी तर त्याची पाठ केव्हाच ओरबाडून काढली होती इतकी ती फुलून आली होती..तिचं हे फुलून येणं त्यालाही मोहरुन टाकत होतं..पण तिच्या तप्त झालेल्या शरीराला शीतलता देण्यासाठी त्याची शक्ती मात्र अपुरी पडत होती..तिला लागलेली त्याच्या शरीराची ओढ भागवण्यासाठी तो उसनं अवसान आणत पेटून उठू लागलेला...त्याच्या चेहऱ्यावर एका मागून एक चुंबनाचा वर्षाव करीत असलेली ती जसजशी त्याचा शरीराचा ताबा घेत खाली जाऊ लागली तसा तो प्रचंड अस्वस्थ होऊ लागला..इतका वेळ ओढून ताणून आणलेलं अवसान गळून पडलं अन् तिला शांत करण्याचं बळ आपल्यात नाही..कितीही इच्छा असली तरी सगळे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत हे उमगलं अन् त्याने आहे त्या शक्तिनिशी तिला जोरात खाली ढकलून दिलं!
एका वेगळ्याच भरामधे असलेली ती त्याच्या या अचानक झालेल्या प्रहाराने आधी तर प्रचंड संतापली पण तिची नजर त्याच्या पायांच्या दिशेने जाताच ती एकदम भानावर आली..बाजूला असलेल्या खुर्चीचा पाय तिच्या पायाला रुतला होता म्हणून की उरातील जखम भळभळून वर आली म्हणून..नेमक्या कुठल्या कारणाने कुणास ठाऊक पण तिच्या तोंडातून एक चित्कार बाहेर पडला आणि पुढच्या क्षणी डोळयातून खळखळ पाणी वाहू लागलेलं!
"नीलू.. प्लिज.."
बेडवरूनच तिच्यावर नजर टाकत निशिकांत एकदम कळवळून म्हणाला!
..त्याचा बेचैन स्वर अन् नजरेतील प्रचंड व्याकुळता पाहून तिला स्वतःचाच राग आला अन् खजील होत तशीच दुखापत झालेल्या पायाने तिने धावत बाथरूम गाठली!
.तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच त्याने बसल्या जागी बेडवरच जोरात मूठ आदळली!
"हे देवा का अशी परीक्षा घेत आहेस?हे मी काय केलं?माझ्या नीलूला दुखावलं..रती सुखासाठी आसुसलेल्या माझ्याच बायकोची अवहेलना केली..पण मी तरी काय करणार?जे माझ्यातच नाहीये ते मी तिला कुठून देऊ?आपल्या बायकोच्या इतर गरजा पूर्ण करताना तिला हे परमोच्च सुख देणं हेही माझं कर्तव्यच आहे पण मी ते कधीच पूर्ण करू शकणार नाही..कधीच नाही!"
..बेडवर जोरजोरात हात आपटत स्वतः वरच चिडत असताना त्याच लक्ष बाजूला उभ्या केलेल्या खुर्ची कडे गेलं ज्या खुर्चीवर मघाशी नीलाच पाय ठेचकाळला होता..त्याने अगतिकतेने एक हुंकार भरला..तो एकदा त्या व्हील चेअर कडे तर एकदा कंबरेपासून खाली लुळ्या पडलेल्या स्वतःच्या शरीराकडे असहाय्यपणे पाहू लागला.. बाथरुम मधुन ऐकू येणारे हुंदक्यांचे दबके स्वर त्याचा जीव अजूनच व्याकूळ करत होते!
"हे काय अजून नाश्ता केला नाही का तुम्ही?आवरा पटकन..मीटिंग आहे ना आज..अहो.."
..दुसऱ्या दिवशी सकाळी बेडरूम मध्ये आपल्याच नादात विचार करत असलेल्या निशिकांतला नीलाने आवाज दिला..भानावर येत त्याने तिच्या कडे पाहिलं पण चटकन नजर फिरवत ती त्याला घाई करू लागली..
"..आज बाहेरही आला नाही तुम्ही..इथेच नाश्ता मागवला..अन् आता फॅक्टरीत जायची वेळ झाली तरी आवरत नाहीये..मी खाऊ घालू का?"
..चेहऱ्यावर हसू आणत ती चेष्टेने म्हणाली खरी पण त्या ओढून ताणून आणलेल्या हास्यात मनातले भाव लपविण्याचा प्रयत्न त्याला कळून चुकलाच!
"..बघत काय बसलाय..नाश्ता करा लवकर.. मी सुरेश काकांना गाडी काढायला सांगते"
..त्याची नजर टाळत ती तिथून जाऊ लागली तसं त्याने तिला आवाज दिला..
"नीलू..हे असं टाळून प्रश्न सुटणार आहे का?"
..त्याने हळुवार स्वरात विचारताच तिने घशाशी आलेला आवंढा गिळला!डोळे टचकन भरून आले अन् चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले..ते पाहून तो अजूनच अस्वस्थ झाला..तिचा हात हातात घेत त्याने हळूच म्हटल..
".. प्लिज तू स्वतःला दोष देऊ नकोस ना..काल रात्री जे झालं ते अत्यंत साहजिक होतं ग..त्यात तुझी काहीच चूक नाहीये..जो काही दोष असेल तो माझाच..मीच तुला सुख देऊ शकत नाही..मी.."
..तो गहीवरल्या सुरात बोलू लागला तसं तिने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला..तिची नजर दाराकडे गेली..कुणी नोकर चाकर आसपास नाही ना याची खात्री करून घेत ती त्याच्या व्हील चेअर जवळ बसली..
"असं म्हणून मला लाजवू नका हो..मीच कपाळ करंटी आहे.. पदरात एवढं सुख पडलं असताना नको त्या गोष्टी मनात घेऊन बसतेय..माझ्या मनाला अन् सोबत या शरीरालाच काही चाड राहिली नाही..त्याला शांत करण्याचा मी प्रयत्न करते पण मधूनच काय होतं कुणास ठाऊक..ही शरीराची आग नको नको करून टाकते मला.."
..तिचा आर्त स्वर त्याला अक्षरशः टोचत होता..तिने पटकन आपल्या भावनांना आवर घालत म्हटल..
".. असं पुन्हा होणार नाही हो..मी तुम्हाला त्रास देणार नाही..आज पासून आईंनी सांगितलेला उपाय करते..रोज झोपण्या आधी तो अंगारा लावला की शरीर शांत होतं म्हणे..त्यांनी आणून दिलाय पण राहूनच गेलं हो..आज करून बघतेच..शेवटी प्रयत्न करून पाहिला तर कुठे बिघडणार आहे ना..झाला तर फायदाच होईल.."
..ती त्याला सांगत होती की स्वतःला पटवून देत होती कुणास ठाऊक पण ते ऐकून तो मात्र अगतिक झाला!
"नको करुस प्रयत्न..आई काहीतरी अघोरी उपाय सांगणार अन् तू तिचं ऐकत शरीराला त्रास देणार हे मी अजिबात खपवून घेणार नाही..उगी हे कसलेही उपाय करण्याची काही एक गरज नाही तुला..त्यापेक्षा मी जे सांगितलं आहे ते ऐकलं तर जास्त चांगलं आहे हे लक्षात येतं नाही का तुझ्या?"
..तो तावातावाने सांगत होता..त्याने शेवटचं वाक्य उच्चारताच तिला एकदम कसंतरीच झालं..
"तुम्ही जे सांगताय त्यात अघोरीपणा नाहीये का?बायको आहे ना मी तुमची?देवा ब्राह्मणांच्या साक्षीने हे मंगळसूत्र बांधलं आहे ना तुम्ही..तरी हे असलं काहीतरी कसं सुचू शकत हो तुम्हाला?..तुमच्या मुळे मागेही या असल्या भलत्या सलत्या मार्गाला जाऊ पाहत होते मी पण वेळीच देवाने बुध्दी दिली म्हणून हे पाप माझ्या कडून झालं नाही.. नवरा असून हे पातक करण्याचं बळ तुमच्यात असेल माझ्यात नाहीये.."
..तीही तिरीमिरित बोलू लागली.
"काय उपयोग या नवरेपणाचा..आपल्या बायकोला तृप्त करू शकत नसेल..सुखाचे दोन क्षण देऊ शकत नसेल तर नवरा म्हणण्यात काय अर्थ आहे सांग?"
"कोण म्हटल मी सुखी नाही?खूप खूप सुखात आहे मी..एवढा मोठा बंगला,गाडी,दागदागिने,खाण्यापि ण्याची चंगळ,नोकर चाकर,हवं ते करा हवं तिथे जा..कशाची कमी नाहीये मला..अहो स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती असं ऐश्वर्य माझ्या पायाशी लोळण घेत असताना मी का म्हणून दुःखी असेन?"
..हे सांगताना तिचा आवाज कातर झालेला..त्यातील फोलपणा त्यालाही जाणवला म्हणा!
"..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माझ्यावर भरभरून प्रेम करणारा..माझ्या साठी काहीही करणारा माझा समंजस नवरा असताना मी दुःखात असायचं कारणच नाहीये!निशिकांत..अहो लग्न झाल्यापासून किती जपलं आहे तुम्ही मला..माझ्या लहान मोठ्या इच्छा पुऱ्या केल्या आहेत..माझी सगळी अगदी सगळी स्वप्नं पूर्ण केली आहेत तुम्ही..खरचं तुमच्या सारखा प्रेमळ नवरा मिळायला भाग्य लागतं!"
ती त्याच्या कडे पाहत अतीव प्रेमाने म्हणाली.तिच्या या सांगण्यात मात्र प्रामाणिक भाव होते..हे बोलताना तिचा चेहरा खुलून आला होता..त्याच्यावर असलेलं निस्सीम प्रेम तिच्या शब्दा शब्दातून पाझरत होतं!गहिवरून जात त्याने पटकन तिला जवळ बसवून घेतलं..
"नीलू,अग खरा भाग्यवान तर मी आहे!तुझ्या सारखी पत्नी मिळणं हे माझं सुदैव..माझ्या साठी तू काय काय केलं आहेस हे फक्त मलाच माहीत!..माझ्या या लुळ्या शरीरात केवळ तुझ्या अन् तुझ्या मुळेच तर चेतना निर्माण झाली ना..तुझ्या जागी जर दुसरं कुणी असतं तर केव्हाच मला सोडून.."
..तो सद्गदित होत बोलू लागला तसं तिने त्याला मधेच थांबवलं.
"झालं का तुमचं सुरू?तुमच्या जागी मी असते तर मला सोडलं असतं का तुम्ही?उगी आपलं कौतुक करत बसत असता तुम्ही..काही जगावेगळं केलं नाहीये मी..उठा आवरा पाहू पटकन..आई मंदिरातून आल्या असतील.."
..आपले डोळे पुसत ती लगबगीने बाहेर गेली अन् तो मात्र तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत मनातच विचार करू लागला..मन पाच वर्षां मागे गेलं..
एका नातेवाईकांच्या लग्नात निशिकांतने नीलाला पाहिलं अन् तो तिच्या प्रेमात पडला.वडिलांच्या माघारी बुडायला लागलेला बिझनेस उभा करण्यात वयाची बत्तीशी आलेली..स्वतःची कंपनी,बंगला गाडी पैसा अडका सर्वच बाबतीत स्थैर्य प्राप्त झालेलं..आईचा लग्नासाठी तगादा सुरू होता अन् अशात त्याने नीलुचा विषय काढताच आईनेही मुलाच्या सुखाचा विचार करत कसलाही विरोध न करता मध्यमवर्गीय नीलूला स्वतःहुन निशिकांत साठी मागणी घातली.दोघांत तसं दहा वर्षाचं अंतर पण तो प्रेमात अन् तिच्या घरच्यांनी श्रीमंत स्थळ पाहून याकडे डोळेझाक केली..निशिकांत अन् नीलाच धूमधडाक्यात लग्न झालं आणि लग्नानंतर देव दर्शनाला जाताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला..निलू थोडक्यात बचावली आणि निशिकांतचे प्राण वाचले पण कंबरेपासून खालचा भाग जायबंदी झाला..कसल्याच संवेदना उरल्या नाही.. सगळंच बधीर..जीव वाचला असला तरी नवरा म्हणून नीलूला तो कुठलंही सुख देऊ शकणार नाही आणि पर्यायाने घराण्याला वारसही मिळू शकणार नाही हे सत्य डॉक्टरांनी सांगितल्यावर दोघेही हबकून गेले होते..त्याच्या आईला तर प्रचंड धक्का बसला..अपघातात त्याने फक्त पाय गमावले आहेत अस लोकांना खोटं सांगितलं पण सत्य कधी ना कधी उघडकीला येणार ही भीतीही वाटत होती...ते कुणाला कळू नये..तो बाप होऊ शकत नाही हे जाणून कुणी नातेवाईक संपत्ती वर टपून बसू नये म्हणून आई त्या दोघांना घेऊन महाबळेश्वरच्या बंगल्यात राहायला आली..
तोही कोलमडून पडला होता पण नीलूने त्याला संजीवनी दिली..तिची खंबीर साथ मिळाली अन् तो व्हील चेअर वरून का होईना पुन्हा काम करू लागला..इथली फॅक्टरी मोठ्या जोमाने चालवू लागला..पण रात्री होणारी तिची तगमग पाहून मात्र त्याचा जीव तुटायचा..मनावर दगड ठेवून त्याने तिला शरीराची भूक शांत करण्याचे इतर मार्ग सुचवले..आधी आडून सांगून पाहिलं अन् नंतर तर सरळ तो स्वतः तिला घेऊन तशा ठिकाणी गेलेला पण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तिला ते सगळं पटलंच नाही..त्यामुळे शरीराची मागणी मनातच दाबून टाकत ती स्वतःला शांत ठेवू पाहत होती पण कधी ना कधी सगळंच असह्य व्हायचं अन् ती त्या सुखासाठी आतुर होत असे!
इकडे त्याची आई मात्र घराण्याला वारस मिळावा म्हणून अनाथ आश्रमातून गुपचूप मुल आणून ते या दोघांचं आहे हे लोकांना,नातेवाईकांना भासविण्याच्या तयारीत असल्याचे पाहून त्याने आईला प्रचंड विरोध केला.मुल घरात आलं की नीलाही त्यात गुंतून पडेल अन् तिच्या इच्छा आपोआप कमी होतील अस सांगून आईने त्याला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा पण त्याला तेच नको होतं!ज्या नीलूने त्याला नैराश्यातून बाहेर काढत जगायला शिकवलं..त्याच्या अपंग शरीरावर निखळ प्रेम केलं तिची अशी उपेक्षा करणं त्याच्या मनाला पटू शकलं नाही..त्यामुळेच तिची ही तहान भागवण्याचं आणि तिला आई होण्याचं सुख दोन्ही गोष्टी द्यायच्या हे त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं..ती मात्र दत्तक मुल घेऊ असं म्हणत होती..एकदा दत्तक मुल घेतलं की ती आणि आईही दुसऱ्या पर्यायाला तयार होणार नाही हे त्याला पक्क माहीत होतं..त्याच्या अट्टाहासापुढे त्याच्या आईने माघार घेतली पण नीलूची मात्र मानसिक तयारी होत नव्हती.तिचं हळवं मन या असल्या अनैतिक गोष्टींना थारा देत नव्हतं.
बाकीचे पर्याय बाजूला पडले तसं त्याने आईला हाताशी घेत चक्क त्याच्या एका मावस भावाला घरी बोलावून घेतलं.साकेत..नीलूच्याच वयाचा..रुबाबदार,कुणालाही भुरळ पाडणारा त्याचा भाऊ अन् नीलूला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले..सहवासाने किंवा आकर्षणाने का होईना दोघे शरीराने तरी एकत्र येतील म्हणून आईच्या मदतीने त्याने नको नको ते प्लॅन्स केले..अगदी त्या दोघांच्या नकळत!पण दोघांत नातं आडवं आलंच..मैत्री शिवाय दुसरी कुठली भावना त्यांच्यात निर्माण झाली नाही.
साकेत निघून गेला पण या सगळ्यात नीलूचा संयम पाहून तर निशिकांतच्या मनात तिच्या विषयी अजूनच प्रेम वाढलं आणि त्यासोबत त्याने घेतलेला निर्णयही ठाम होत गेला!
.. आठवणींचा पट डोळ्या समोर येताच निशिकांत एकदम भावूक झाला!
नीलू..तुला माहित नसेल ग पण खूप काही सोसत आहेस तू!तू म्हणालीस तसं त्या अपघातात माझ्या ऐवजी तू अशी जायबंदी झाली असती तर मला शंका आहे मीही असा तुझ्या सारखा वागू शकलो असतो का?तुझ्या प्रमाणे जीव उधळून,स्वतःच्या सर्व इच्छा मारून एका लुळया पांगळ्या देहाची मरेपर्यंत सेवा करायचं व्रत मला अंगिकारता आलं असतं का?नाही ग..आणि जरी मी तुझ्या सारखं वागायचं ठरवलं असतं तर आईने मला तसं वागू दिलं नसतं याची खात्री आहे मला!तिला नीलूचा कळवळा आहे पण आपल्या मुलाचं वैगुण्य उघड पडू नये ही भावना जास्त आहे त्यात!म्हणून तर तिने मला साथ दिली ना..हेच जर नीलू माझ्या जागी असती तर दुसरं लग्न करायला भाग पाडलं असतं तिने किंवा मग अनैतिक उपाय शोधला असता!अशा प्रकारे जन्माला घातलेलं माझं मुल घराण्याचा वारसा होऊ शकतं तर आता नीलुच मुल का चालू नये अस आईला विचारल्यावर ती उगी नको ते उदाहरणं देऊ लागली होती पण मी ठाम आहे हे कळल्यावर तिनेही आढेवेढे घ्यायचं बंद केलं.. साकेतला इथे आणण्याचं तिचंच डोकं होतं म्हणा..तो प्लॅन नीलूच्या हळव्या स्वभावाने यशस्वी झाला नाही पण आता मात्र मी जे ठरवलं आहे ते व्हायलाच पाहिजे..
..मनात ठाम निर्णय घेत असताना निशिकांतच्या समोर सकाळी फॅक्टरीत इंटरव्ह्यू साठी आलेल्या तरुणाचा चेहरा आला अन् त्याने आनंदाने टाळी वाजविली!
"नाही नाही काहीही काय? ही कसली अट आहे?तुम्ही काय समजलं आहे मला?असले धंदे करत नाही मी..तुमच्या श्रीमंत लोकांत ही थेरं चालत असतील..मी तसला माणूस नाहीये.. ओ म्हणजे म्हणून तुम्ही माझ्या मेडिकल टेस्ट करून घेतल्या तर?शी..इतक्या खालच्या पातळीवर कुणी कसं जाऊ शकतं?"
"मिस्टर साने..मी तुमच्या भावना समजू शकतो पण माझा नाईलाज आहे म्हणून मला ही अशी मागणी करावी लागत आहे... प्लिज मला समजून घ्या"
..निशिकांत समोर उभ्या असलेल्या तरुणाला पोटतिडकीने सांगू लागला..त्याने आपला मनसुबा त्याला सांगितल्यावर तो तरुण रागारागाने त्याला दूषणं देऊ लागला होता.
"हे बघा सर तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका..मला नोकरीची गरज आहे पण म्हणून काही मी असलं काम करणार नाही..तुमची कीव येतेय मला..कुणा परक्या पुरुषाला आपल्याच बायको सोबत असं काही करायला लावू शकतं याची कल्पनाच करवत नाही मला..आणि इतकी गरज असेल तर धंदा करणाऱ्या बायकांसारखे पुरुषही मिळत असतील की..तिथे घेऊन जावा तुमच्या बायकोला!"
..तो ताडताड बोलत होता.
"तोंड सांभाळून बोला मिस्टर ..आणि अट मान्य नसेल तर कुणी अडवलं नाही तुम्हाला..तुम्ही जाऊ शकता!
निशिकांत त्याची फाईल भिरकावत रागातच म्हणाला!त्यातील त्याचे सर्टिफिकेट इतस्ततः विखुरले गेले..डोळयात अंगार फुललेल साने चिडतच ते कागद उचलू लागला.. निशिकांतच्या पाया जवळ पडलेला कागद उचलताना त्याच लक्ष त्याच्या व्हील चेअर कडे गेलं अन् तो स्तब्ध झाला!
त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले भाग पाहून निशिकांतही शांत झाला..
"लग्न झाल्यावर तिसऱ्याच दिवशी एका अपघातात मी सगळंच गमावून बसलो..नावाला जीव उरला आहे पण स्वतःच्या बायकोला रात्री अपरात्री आतल्या आत तीळ तीळ जळताना पाहवत नाही हो मला.."
..तो अगतिक स्वरात सानेला सांगू लागला..
"..ती फार हळवी आहे.. माझ्या जागी ती असती तर पुरुष म्हणून मी जे मार्ग सहज अवलंबिले असते ते तिच्या मनाला पटणं शक्यच नाहीये आणि म्हणूनच तुमच्यापुढे मला ही अशी अट ठेवावी लागली..नोकरी तुम्हालाच मिळेल पण या कामाचा वेगळा मोबदलाही देईल मी.."
.. एकीकडे व्यवहार तर एकीकडे नीलूचा विचार दोन्हीची सांगड घालत त्याने साने समोर प्रस्ताव ठेवला आणि सानेच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलू लागले!
हे देवा या कुठल्या धर्म संकटात टाकलं आहेस तू मला?या नोकरीची गरज तर खूप आहे म्हणून तर गाव सोडून इतक्या लांब आलो ना मी..ताईच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज,बाबांचं ऑपरेशन,सर्वच प्रश्न आहेत पण म्हणून या सरांची असली अट मान्य करायची का?काय हरकत आहे..आपण काही मौज मस्ती तर करणार नाही ना..त्यांचं शरीर लुळं पडलंय म्हणून ते हतबल झालेत अन् पैसे मिळावे म्हणून मी!किती विचित्र स्थिती आहे ही!
..निशिकांतची असहाय्य स्थिती पाहून मनातल्या मनात साने स्वतःची अगतिकताही चाचपडून पाहू लागलेला! नकळत त्याच्या डोळ्या समोर एक नाजूक चेहरा आला अन् त्याची स्थिती पुन्हा दोलायमान झाली!पण भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत त्याने तो चेहरा महत्प्रयासाने बाजूला सारला अन् अगतिक स्वरात निशिकांतला म्हणाला..
"ठीक आहे मी तयार आहे..काय करायचं आहे मला?"
..त्याचा होकार मिळताच निशिकांत मोठ्या उत्साहाने त्याला आपला प्लॅन सांगायला पुढे सरसावला!!
हे देवा..काय वाढून ठेवलंय तू माझ्या समोर?निशिकांतही एवढ्या हट्टाला पेटले आहेत?मी नको म्हणताना त्यांनी मला शपथ घालत हे नको ते काम करायला भाग पाडलंच!
...मनात विचार करतच नीला आपल्या रूम मधे इकडून तिकडे येरझाऱ्या घालू लागली.तिचं तिच्याच भावनांशी जणू युद्ध सुरू होतं!
..मीच जबाबदार आहे याला..हे शरीराचं बंड थोपवून धरता येत नाही म्हणून तर त्यांनी माझा विचार करत हा निर्णय घेतला ना..मी तरी काय करू..गेली पाच वर्षे मी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती अजूनच वाढत आहे!पण म्हणून मी असं कुणालाही आपलंसं नाही करू शकत..मागेही त्यांनी प्रयत्न केले होते..साकेतला इथे आणून ठेवण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला होताच की..आईंनीही त्यांना साथ दिली हे पाहून मात्र मला धक्काच बसला होता..आपल्या मुलाचं वैगुण्य झाकण्यासाठी एक आई आपल्या सुनेचा व्यभिचारही सहन करु शकते?
..त्या प्रश्नाने ती कासावीस झाली होतीच पण तो शब्द तिच्या मनाला टोचू लागला..
ही तगमग सहन होत नाही या कारणाने कुणालाही हे शरीर देऊ शकत नाही ना मी..मलाही भावना आहेत..मनाने एकरूप झाल्याशिवाय ती आंतरिक ओढ जाणवल्याशिवाय शरीर तरी एकरूप होतील का?निशिकांतनी तडजोड म्हणून याकडे बघ अस म्हटलं आहे पण भावनाच नसतील तर काय उपयोग?केवळ शरीराची भूक भागविण्यासाठी हे पाऊल कसं उचलणार मी?..आज निशिकांत कुणाला भेटायला सांगत आहेस कुणास ठाऊक.. मी अवघडून जाऊ नये म्हणून आईंनाही मुद्दाम यात्रेला पाठवून दिलं..आपल्या मुलाचं गुपित लोकांसमोर येऊ नये म्हणून त्याही गेल्या..कसंही करुन त्यांना वारस हवा आहे..त्यासाठी सुनेला दुसऱ्या....
..मनात विचार करतानाच तिची नजर आरशात गेली अन् ती लग्ना आधीच्या पहिल्या वहिल्या प्रेमाच्या,नचिकेतच्या आठवणीने एकदम हळवी झाली!
काय नशीब असेल ना माझं..देवही प्रत्येक वेळी तडजोड करण्याची वेळ माझ्यावरच आणतोय..ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं,ज्याच्या सोबत त्या हळुवार भावना फुलवण्याची स्वप्नं पाहिली तीही मनातच दाबून टाकावी लागली होती मला..निशिकांत सारखं श्रीमंत स्थळ स्वतः हुन चालून आल्यावर बाबांनी मला हे लग्न करायला भाग पाडलं..नचिकेतचाही काहीच पत्ता नव्हता त्यामुळे माझाही नाईलाज झालेला..त्याला मनाच्या तळाशी कोंडून आयुष्याला नव्याने सामोरं जाण्याचं ठरवलं पण तिथेही नशीब आडवं आलंच..त्या अपघाताने जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली..निशिकांत म्हणतात मी त्यांना सावरलं..त्यांना आधार दिला पण कधी कधी सगळंच असह्य होतं आणि वाटतं त्यांच्या ऐवजी मीच पांगळी झाले असते तर कित्ती कित्ती बरं झालं असतं ना..नाही पण माझं नशीब असं सुखासुखी कसं जगू देईल मला?माझी परीक्षा बघण्याचा चंग बांधला आहे ना त्याने..
..मनात विचार करताना तिची नजर आरशात पडलेल्या छबी वर गेली अन् ती ताडकन उठली.. दारात उभी असलेली व्यक्तीही अशाच चकित नजरेने तिच्याकडे पाहत होती!
"नचिकेत?? तू इथे??"
.. नीलाला काय बोलावं तेही सुचेना..त्याची स्थितीही वेगळी नव्हती!
"..म्हणजे तो तू आहेस?निशिकांतने तुला भेटायला बोलवलं आहे?म्हणजे त्यांनी मुद्दाम तुला इथे बोलावलं आहे का?त्यांना आपल्या विषयी कसं समजलं..मी तर इतक्या वर्षात तुझं नावही काढलं नाही..मग त्यांना कुणी सांगितलं..तू?मिस्टर नचिकेत साने तुम्ही या थराला जाताल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला..माझ्या नवऱ्याच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेत आहेस का?जेव्हा वेळ आली तेव्हा तर पाठ फिरवली होतीस ना..तू इतके दिवस होतास कुठे?"
..ती वेड्या सारखी त्याला प्रश्न विचारत होती..एका क्षणात मन कुठून कुठे पोहचलं होतं!
"एक मिनिट..नीला..अग तुझा काहीतरी गैरसमज होतोय..तुला पाहून मीही गोंधळून गेलोय..मला नव्हतं माहीत तू मिसेस निशिकांत पाटील आहेस!!"
..तिला पाहून हबकून गेलेला नचिकेत भानावर येत स्पष्ट करू लागला.
"..आणि सरांना आपल्या प्रेमा विषयी सांगण्याचा प्रश्नच नाहीये..मी तर नोकरी साठी गेलो होतो त्यांच्याकडे पण त्यांनीच मला ही ऑफर दिली.. खरं सांगतो तू त्यांची बायको आहेस याची मला कल्पनाच नव्हती ग नाहीतर.."
..तो नकळत बोलून गेला अन् नीलाचा चेहरा रागाने अक्षरशः लालबुंद झाला.
"ओ म्हणजे माहीत असतं तर त्यांची ऑफर स्वीकारली नसती ना का तू?आपल्याच प्रेयसी सोबत.. तिच्या नवऱ्याच्या संमतीने.. तू हे असं काही.."
..रागाच्या भरात तिला नीट बोलताही येत नव्हतं पण तिचा मुद्दा नचिकेतला कळला अन् मनाला चांगलाच झोंबलाही!
"हे बघ नीला..मी असं काही करण्याचा विचारही करू शकत नव्हतो पण परिस्थितीने मला हा नको तो मार्ग अवलंबायला भाग पाडलं..अग तुझ्याशी लग्न करून आपल्या संसाराची गोड स्वप्नं पाहत होतो मी..वास्तवाने मात्र वेगळेच चटके द्यायला सुरुवात केली..त्यातूनही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत होतो मी..ताईच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज वाढत होतं..नोकरी मिळत नव्हती..मग मुंबईला गेलो..पण बाबांना अटॅक आला अन् त्यामुळे घरी आल्यावर तुझं लग्न झाल्याचं समजलं..आधीच प्रचंड अस्वस्थ..तुलाही गमावून बसलो अन् उमेदच उरली नाही..पण जबाबदारीने मनातल्या भावना बाजूला ठेवाव्या लागल्या..काहीही झालं तरी आता तू माझी होऊ शकत नाही हे मनाने स्वीकारलं..नोकरी साठी इथे आलो पण सरांनी ही अशी अट ठेवली..कर्जाचे हफ्ते, बाबांचं ऑपरेशन यामुळे मीही नाईलाजाने..."
..ते सांगताना तो अगदी अगतिक झालेला!त्याच बोलणं ऐकल्यावर नीला काहीशी शांत झाली.
"..मला नाही वाटतं सरांना आपल्या प्रेमाविषयी काही कल्पना असेल..पण नीला...हे सगळं काय आहे?तू असं??"
..निशिकांतने त्याच्या समोर ठेवलेला पर्याय नीलाने कसा काय स्वीकारला हे समजून घ्यायला त्यालाही जरा वेळ लागलाच!तिचा हतबल चेहरा पाहून मात्र सगळी कोडी उलगडली!
"..सरांची अशी अवस्था कशी झाली?तुझं लग्न झालं तेव्हा तर ते चांगले होते ना..तू सुखाने संसार करत आहेस असच समजून होतो मी.."
..जरा थांबून त्याने विचारलं अन् इतके दिवस मनातले वादळ मनातच दाबून ठेवणाऱ्या नीलाचा बांध फुटला..
"काय सांगू रे नचिकेत..माझ्याच नशिबाचे भोग आहेत रे हे..आताही बघ त्या नियतीने तुला माझ्या समोर आणून ठेवावं?का?कशासाठी?"
..ती धाय मोकलून रडु लागली अन् नकळत नचिकेतने तिला आधार दिला..
इतके दिवस नीलाने निशिकांतला धीर देत पुन्हा नव्याने उभं राहायला आधार देत,त्याला खंबीर साथ देत आपल्या भावना मनातच दाबून टाकल्या होत्या..पण आज मात्र नचिकेतला पाहून त्या भावना उफाळून वर आल्या आणि त्याच्या मिठीत शिरत ती आपलं मन मोकळं करू लागली..!
परिस्थिती स्वीकारत ज्या पहिल्या प्रेमाला दोघांनी मनाच्या कोपऱ्यात ढकलून दिलं होतं त्याचं प्रेमाला नियतीने अशा तऱ्हेनं समोर उभं केलं होतं!प्रेमाच्या भरात एकमेंकाविषयी ज्या हळुवार भावना फुलल्या होत्या.. नकळत झालेल्या साध्या स्पर्शाने मनासोबत शरीरही मोहरुन आलं होतं त्या नाजुक भावनांना नियती अशा प्रकारे पूर्णत्व देऊ पाहत होती!!
सहा वर्षांनी...
"बाबा कॅच पकडा"
"हे बघ आता तू घे.."
"बाबा..आज फॅक्टरीत घेऊन जायचं कबूल केलं आहे तुम्ही"
"हो रे लक्षात आहे माझ्या..तुझ्या आईची परमिशन काढलीस का?"
"तुम्हीच सांगा ना तिला.. माझं ऐकत नाही ती...ते बघा आली ती.."
..चार वर्षांचा श्रीकांत आपल्या बाबांसोबत खेळत असतानाच नीला तिथे आली.
"सावकाश ना बाळा..चहा आहे ना ..आणि खेळ पुरे आता..बाबांना नाश्ता करू दे पाहू..त्रास देऊ नकोस त्यांना"
..नीला हातातील ट्रे सांभाळत श्रीवर ओरडली तसं त्याने ओठ काढत आपल्या बाबांकडे पाहिलं.
"आमच्या श्रीमुळे कधी त्रास होईल का मला?तो आयुष्यात आल्याने तर आपल्या नात्याला नवा अर्थ मिळाला ना ग नीलू!"
..निशिकांतने अगदी सहज म्हटल अन् नीलाने चमकून त्याच्याकडे पाहिलं..तो हे कुठल्या अर्थाने म्हणत आहे हे तिला क्षणभर कळलंच नाही!त्याने मात्र डोळ्यांची उघडझाप करत अत्यंत प्रेमाने तिच्या हातावर हात ठेवला आणि मग तीही समाधानाने फुलून आली!
"बरं आज आम्ही फॅक्टरीत जाणार आहोत हं "
त्याने श्रीला जवळ घेत लाडिक स्वरात सांगितलं अन् नीलाने डोळे मोठे करत दोघा बाप लेकाकडे पाहिलं.
"हो का आणि अभ्यास कोण करणार?"
"आई आल्यावर करतो ना..प्रॉमिस!"
..श्री तिच्या गळ्यात हात गुंफत लडिवाळ हसत म्हणाला.
"असू दे ना नीलू..एवढासा आहे तो..असा किती अभ्यास असणार त्याचा..येऊ दे त्याला आज"
"तुम्ही लाडावून ठेवलं आहे त्याला!"
"अरे मग त्याचे लाड कोण करणार?"
"हो ना..आजीही गावी गेली आहे..ती असली की मज्जा असते माझी!"
त्याने तोंड बारीक करत म्हटल अन् नीलू आणि निशिकांत हसू लागले.
"चला निघायचं ना छोटे साहेब"
श्रीने नीलू कडे पाहताच तिने डोळे मिचकावत होकार दिला तसा तो उत्साहाने बाबा जवळ गेला..
"बाबा..चला आज मी तुम्हाला घेऊन जातो!"
त्याने अस म्हणताच निशिकांतचे डोळे भरून आले.. नीलूही भावूक झाली..दोघांनी अबोलपणे एकमेकांच्या नजरेतील भावना समजून घेतल्या!
श्रीकांत निशिकांतची व्हील चेअर ढकलत गाडीच्या दिशेने जाऊ लागला अन् तृप्त मनाने नीला दोघांकडे पाहू लागली!!
"कित्ती मोठी फॅक्टरी आहे आपली..बाबा..मीही मोठा झाल्यावर तुमच्या सारखा होणार..यापेक्षा मोठी फॅक्टरी काढणार!"
..केबिन मध्ये येत आपल्या बाबांशी बोलत लहानगा श्री स्वप्न रंगवू लागला..निशिकांतने कौतुकाने त्याच्याकडे मागे वळून पाहिलं!
"हो रे राजा..तू माझ्यापेक्षा मोठा हो ह"
श्रीने निशिकांतची व्हील चेअर ढकलत त्याला त्याच्या टेबल जवळ नेलं आणि स्वतः तिथल्या वस्तू पाहू लागला.त्याच्यावर प्रेमळ नजर टाकत निशिकांतला एकदम नचिकेतची आठवण आली..त्याने आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्याची फाईल बाहेर काढली..त्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून मनात ठेवलेली गोष्टही नकळत बाहेर आली!
सहा वर्षा पूर्वी इंटरव्ह्यूला आलेल्या नचिकेतच्या डॉक्युमेंट्स मधे शहराच,कॉलेजच नाव अन् डिग्रीच वर्ष पाहून निशिकांत चकित झालेला.. नीलाच्या माहेरचा माणूस पाहून निशिकांतने त्याला सहज नीलाची ओळख आहे का हे विचारलं..ती आपली बायको आहे हे न सांगता!..तिचं नाव काढताच नचिकेत थोडा बावरला पण त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून निशिकांत काय समजायचं ते समजला!त्या सरशी त्याच्या डोक्यात एक विचार आला..नीलाच्या जिवलग मैत्रिणीला विश्वासात घेऊन त्याने चौकशी केली आणि त्याला नीलाच्या पहिल्या प्रेमा विषयी कळलं..हाच धागा पकडत आपल्या इच्छा मनातच दाबून ठेवणारी,आपण सांगितलेला पर्याय डावलानारी ती कदाचित नचिकेत सोबत मोकळी होईल हा अंदाज बांधत त्याने त्याच्या समोर तो प्रस्ताव ठेवला!
भूतकाळ आठवताना निशिकांत स्वतःशीच विचार करू लागला..
मोठ्या प्रयत्नाने मी नीला अन् नचिकेतला समोरासमोर आणलं..परिस्थितीने पोळून निघालेले,दुरावलेले दोघेही आपलं पहिलं प्रेम असं समोर येताच सुरुवातीला जरा भांबावून गेले होते..माझ्या अंदाजा प्रमाणे नीला त्याच्या जवळ मनाने मोकळी तर झाली पण शरीराने एकत्र यायला दोघांनी बराच वेळ घेतला..तेही माझी सहमती असताना!कदाचित त्याच गोष्टीचं प्रेशर घेतलं असावं त्यांनी!नीलूने लग्ना आधीच्या त्यांच्या प्रेमा विषयी मला सांगण्याचा प्रयत्न केला पण तिला आणि नचिकेतलाही एक अवघडलेपण आलं असावं..मीही मनातलं गुपित मनातच ठेवलं आणि त्यांना त्यांचा वेळ दिला..सहवास म्हणा किंवा मुळातच असलेली आंतरिक ओढ दोघे हळूहळू जवळ आले..मला अन् आईला जे हवं होतं तेही झालं..नीला प्रेग्नंट झाली!
मग मात्र नचिकेतने लांब जाण्याचा निर्णय घेतला..ते साहजिक होतं म्हणा..जिच्यावर प्रेम केलं तिच्या कुशीत आपलं बाळ वाढणार पण त्याला जवळ घेता येणार नाही, आपलं नाव देता येणार नाही ही भावना बाप म्हणून त्याच्या साठी क्लेशदायकच तर होती!तो काळ तसा आम्हा तिघांची परीक्षा घेणारा..माझ्या मनात तर नीलाला गमावून तर बसणारा नाही ना हीच भीती! ..पण एकमेंकावर विश्वास ठेवून,भावनांचा आदर करत कसलाही गुंता न होऊ देता आम्ही ती परिस्थिती हाताळली!नीलानेही नचिकेतला मोकळ्या मनाने जाऊ दिलं..आज तो त्याच्या आयुष्यात स्थिर स्थावर झाला असला तरी मला दिलेला शब्द तो अजूनही पाळतो..नीला सैरभैर झालेली दिसताच माझ्या एका मेसेज वर तो येतो!नीलाला शांत करतो,डोळे भरून दुरूनच आपल्या मुलावर नजर टाकतो अन् मोकळ्या मनाने निघून जातो!नचिकेत...खरचं मी तुझा खूप ऋणी आहे रे..माझ्या आयुष्यात तू इतकं सुख देऊन गेलास!
..आपल्याच नादात खेळणाऱ्या श्रीकांतकडे प्रेमाने पाहत निशिकांतने निःश्वास सोडला!
खरचं कोण श्रेष्ठ होतं या तिघांत?आपल्या अधू झालेल्या नवऱ्याची निखळ मनाने सेवा करत संधी मिळूनही त्याच्या प्रेमाचा गैरफायदा न घेणारी नीला मोठी की आपल्याच बायकोच्या सुखाचा विचार करत तिला अन् तिच्या प्रियकराला एकत्र आणणारा निशिकांत मोठा की आपल्या रक्तामासाच्या गोळ्यावरचा हक्क सोडणारा,अजूनही दिलेला शब्द पाळत म्हणा किंवा प्रेमा खातिर म्हणा एका हाकेने धावून येत नीलाला तृप्त करणारा नचिकेत मोठा?
पाप पुण्य,नैतिक अनैतिक पलिकडचा बंध आयुष्यभरासाठी जपणारे हे तिघे..ना कुणाला दोष देता येत नव्हता की कुणाला जबाबदार धरता येणार होतं..कुणी किती त्याग केला याचं मोजमाप तरी कुठे करता येणार होतं ना?.. खरंतर कुणीच मोठं नव्हतं.. मोठं होतं ते तिघांचं प्रेम..जे जितकं आगळं वेगळं होतं तितकंच हळवं सुद्धा होतं!!
समाप्त
©®अवंती कोटे
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box