गुपित
©️दीप्ती जोशी
ती लेकीच्या घरून निघाली, साडेचार वाजले होते.जानेवारी चा शेवटचा आठवडा म्हणजे नाशिकमध्ये सकाळी बऱ्यापैकी थंडी, अगदी स्वेटर घालून बाहेर पडावं अशी तर दुपारी टळटळीत ऊन, असं काहीसं वातावरण. त्या कॉर्नरवर ती आली, समोरचा चार रस्त्याचा चौफुला ओलांडला की तिची बिल्डिंग. चौफुल्याच्या अलीकडे झाडाखाली एक उसाच्या रसाची गाडी उभी असते, अतिशय स्वच्छ, बाजूलाच रस काढलेली चिपाडं भरायला एक पांढरी ज्यूट ची बॅग. दोघं नवरा बायको गाडीच्या बाजूला स्टूल टाकून बसलेली असतात. नायलॉनची झुळझुळीत साडी, स्वच्छ पांढरा ब्लाऊज, कपाळावरचं रेखीव कुंकू, ऊंच घातलेला अंबाडा त्यावर खोचलेले एखादा फुल, काळा सावळा रंग, चेहऱ्यावर अपार समाधान आणि शांतता, कृष्णा तिचं नाव, सहज गप्पातून समजलेलं! तर पांढरा सदरा, किरमीजी विजार, रापलेला काळा रंग आणि रांगडेपणा मिरवणारा गडी, तिचा नवरा! दोघांच्याही साध्याश्या कपड्यांची स्वच्छ झळाळी डोळ्यात भरणारी.
ती गाडी जवळ आली की हमखास थांबायची, खरंतर शिवरात्रीनंतरच रस प्यायला सुरुवात करायची असा नियम पूर्वीपासूनच, पण दुपारच्या त्या रणरणत्या ऊन्हात रस प्यायचा मोह आवरायचा नाही. आताही तिने बिन बर्फाच्या एक ग्लासची ऑर्डर दिली. तेवढ्यात कॉलेजची चार मुलं आलीत, त्यांनीही बर्फा सहित रसाची ऑर्डर दिली. कृष्णा उठली, स्टीलच्या पातेल्याला पांढरीशुभ्र गाळणी लावली, चरकात ऊस घातला आणि दांडा फिरवायला घेतला मात्र तिचा नवरा इतक्या मोठ्याने तिच्या अंगावर खेकसला...
'कृष्णे, भैताड आहेस काय तू? बिनडोक नुसती.सकाळपासून चरक फिरवूनशान दमलीया, रातच्याला परत बोंबलत बसशील कंबर दुखतीया म्हून, मग कितीबी वरडलीस तरी मी न्हाय दाबून देणार, वाईच बैस की जरा', उन्हाने तारवटलेले लाल झालेले डोळे आणि रांगड्या आवाजातलं भीती वाटावी असं वस्सकन अंगावर ओरडणं ऐकून ती आणि कॉलेजची मुलं एकदम दचकलेच. तिला तर संतापच आला, किती मोठ्याने ओरडतो आहे हा माणूस, चांगलं रागवायला हवं याला. त्या चार मुलांमध्ये एकाला तर राहवलचं नाही,तो म्हणाला' ओ काका किती जोरात ओरडताय तुम्ही मावशींवर, जरा प्रेमाने बोला की'. त्या सगळ्यांना वाटलं आता या ओरडण्याने ती रडायला सुरुवात करणार आणि त्या दोघांच्या भांडणात त्यांना रस काही मिळणार नाही बहुतेक. कृष्णाच्या दमलेल्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं, उन्हाने घामेजलेला चेहरा, कपाळावर खाली ओघळून आलेलं कुंकू, घट्ट बांधलेल्या अंबाड्यातून वेणीचं शेपूट सुटून खांद्यावर लोंबत होतं. ती गोडसं हसून म्हणाली, 'ए पोरांनो काका काय माझ्यावर वरडत नाहीये, माझ्या पिरमा पोटीच बोलत हायेती ते आवाज वाईच मोठाच हाये पर पोटात लई माया हाय त्येंच्या'.
हे असं ओरडून, कमालीचं रागावून बोलणं आणि त्या मागचं रांगडं प्रेम समजून घेणाऱ्या कृष्णेच्या समाधानी चेहऱ्याकडे बघताना तिला गंमतच वाटली. गोड रस पिऊन मन शांत झालं होतं. घरी येऊन तिने रेकॉर्ड प्लेयर वर' 'ललत' लावला..
"प्रीतम दरस दिखाओ
तुम बिन रो रो रैन बिताई
भोर भयी घर आवो
सगरी रैनके जगते नैना
बाट तकत अब हारे
बोलो कब तक आस लगाये
खडी रहूँ मे द्वारे
और न अब तरसाओ
प्रीतम दरस दिखाओ"
घरात पारिजातक आणि रातराणी चा सुवास दरवळत होता. त्याला पारिजातक आवडायचा तिला रातराणी. तो प्रकाशावर प्रेम करणारा तीची अंधाराशी मैत्री. त्याचं जगणं म्हणजे नुसता उत्साहाचा धबधबा. 'ऐ जिंदगी गले लगा ले' असं म्हणत मृत्यूलाही त्याच्या जगण्याचा हेवा वाटावा असा कलंदर, तर ती थोडीशी गुढ, अंधारावर प्रेम करणारी, तो तिला गमतीत 'रातकी रानी' म्हणायचा.
त्याच्या आठवणीने तिचं मन व्याकुळ झालं. दोन महिने झालेत सौदी अरेबियाला प्रोजेक्टसाठी गेलाय आता चार महिन्यात परत येईन, पण हे चार महिने काढणं अवघड झालं होतं तिच्यासाठी. त्याला फोन करायला हवा असं म्हणत तिने घड्याळात बघितलं तर साडेआठ झाले होते. अकरा पर्यंत फोन करूया त्यावेळेस तिकडे साडेआठ वाजले असतील, नक्कीच घरी आलेला असणार. तिच्याकडे अडीच तास होते... रेकॉर्डप्लेयर वर 'ललत' संपून ' आनंदीकल्याण' सुरू झाला होता, परत ती त्याच्या आठवणीत हरवली.
त्यादिवशी, आदल्या रात्री तिने साईचं विरजण बाहेर काढून ठेवलं. सकाळी आंघोळ करून ती ताक घुसळत होती. तो मॉर्निंग वॉकला गेला होता. आला की एकत्रच चहा घ्यायचा ठरवलं. ताक घुसळताना मनात विचारांचे मंथन सुरू होतं... लोणी काढणं किती मस्त असतं... तो फुलांच्या आकाराचा लाकडी गोल त्यावरची लांबट काठी, ती एकदा उजवीकडे एकदा डावीकडे फिरवायची. मन-बुद्धी-चित्त सगळे एकत्र होतात आणि मग हळूहळू लोण्याचा गोळ्या वर येतो. आताही ताज्या ताकाकडे बघून तिच्या मनात विचार डोकावला, 'अरे, आज पालक हवा होता, मस्त पालकाची, ताकातली, लसुण, हिंग,लाल तिखट, लाल सुकी मिरचीची खमखमीत फोडणी केलेली भाजी, ठेचा, गरम ज्वारीची भाकरी त्यावर ताजा लोण्याचा गोळा, काय बहार आली असती, पण जाऊ दे पालक नाहीये घरात आता हा बेत उद्याच करूया असं मनाशी म्हणत ती बाहेर हॉलमध्ये आली तर मॉर्निंग वॉकला गेलेला तो लॅच कीने दरवाजा उघडून घरात येत होता, हातात कोवळा हिरवागार पालक, 'रातकी रानी, आज लसणाची फोडणी घातलेला ताकातला पालक कर ग, पिशवी नव्हती पण आणला हातातच', ती अविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. मग रविवारची दुपार आणखीनच खुमासदार झाली.
त्यादिवशी त्याने मित्राच्या फार्म हाऊस वरून वाईन रंगाची मोठी द्राक्ष आणली होती. रात्री जेवण झाल्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन तिने दोन बाऊल भरून घेतले. टेरेस मध्ये खुर्च्या टाकून, आभाळातल्या तारका मोजत ते द्राक्ष एन्जॉय करत होते. तिच्या बाऊल मधली द्राक्ष संपलीत आणि मनात विचार डोकावला,' अजून अर्धा बाउल द्राक्ष सहज खाऊ शकतो आपण' त्याच वेळेस हातातला अर्धा राहिलेला बाऊल तिच्या हातात देत तो म्हणाला, तुला आवडतात ना, मग घे माझ्यातली, ती द्राक्ष खातांना त्यांना अमृतची अविट गोडी आली होती.
तिच्या मनात चाफ्याचा गंध दरवळावा आणि ऑफिसमधून येऊन त्याने तिच्या हातात ओंजळभर चाफ्याची फुलं द्यावी, 'रातकी रानी' ये तुम्हारे लिये खास, असं म्हणत. ये हृदयीचे ते हृदयी पेरताना मनाची ओंजळ सुगंधित होऊन जायची.
त्याच्या आठवणीत रमलेल्या तिने घड्याळात बघितलं तर अकरा वाजले होते आता त्याचं जेवण झालं असेल फोन करूया त्याला आणि चांगलं रागवायचं, 'बास झाले बाबा तुझे प्रोजेक्ट, ये घरी परतून आता नाही राहवत तुझ्याशिवाय'. तिने फोन करायला मोबाईल हातात घेतला, बघितलं तर त्याचाच मोबाईल होता. ती चकितच झाली. अरे हा तर सौदीला आहे मग याचा मोबाईल इथे कसा? क्षणभर ती पाठीमागे वळली. त्याच्या आवडत्या टेबलवर त्याचा फोटो आणि त्याला वाहिलेली, प्राजक्ताची आणि रातराणीची फुलं सुगंधाची लयलूट करत होती. आणि एका क्षणात ती भानावर आली..... तो 'बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड चा सेरेमनी' दुसऱ्या दिवशीचं भारतात परतून येण्याचे विमान आणि एअरपोर्टवर येताना आलेला कार्डियाक अरेस्टचा, सगळं संपवणारा जीवघेणा अटॅक!! लग्नाला अवघी चार वर्षे झालेली.
कंपनीतले मित्रभेटायला आलेत. सैरभैर होऊन ती फोटोसमोर बसलेली, पार थिजलेली! त्याच्या मित्राने पारिजातक आणि रातराणीची फुलं त्याच्या फोटोला वाहिलीत. तो सुगंध तिच्या रंध्रा-रंध्रात भिनला आणि मनातला आकांत, कल्लोळ अश्रूंच्या रूपाने तिच्या डोळ्यात प्रकटला, डोळ्यातून अश्रू ओघळणारच होते....आणि सुगंधाच्या मंद झुळुकीबरोबर तो हळुवारपणे तिच्या कानात सांगत होता, ए 'रातकी रानी', मी आहे ग तुझ्याजवळ, तुला माहितीये तुझ्या डोळ्यातल्या अश्रूत मी आहे. क्षणभर ती थरथरली, डोळ्यातल्या अश्रुंना तीने पार परतवून हृदयात अगदी आत आत बंदिस्त केलं आणि ती खुदकन हसली!! तिला असं हसताना बघून सगळे तिच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होते, बहुतेक डोक्यावर परिणाम झाला असावा हिच्या असं समजून.
आता ती तिच्या अश्रूंना जपून ठेवणार होती तिचं आणि त्याचं ते गुपित होतं. रेकॉर्ड प्लेयर वर ' ललत' संपून ' आनंदी कल्याण सुरू झाला होता.
"तू जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया साथ होगा"
तिच्या कृष्ण सख्याचं मोरपीस हलकेच कानावर फिरवणारा ' आनंदी कल्याण'!!. तिने तिच्या नेणिवेतल्या सख्याला साद घातली, त्याच्या प्रतिमेलाच जीवनसंचित वाहिले. त्याच्या पाऊलखुणा तिने अश्रूत जपून ठेवल्या... त्या दोघांचंही खास गुपित होते ते. आता कुठल्याही आनंदाच्या, दुःखाच्या क्षणात डोळ्यात अश्रू आले की ती मनापासून हसते. कारण तो आला असतो तिला भेटायला!
©️दीप्ती जोशी
नाशिक
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box