लागी तुझसे लगन
चित्रा अविनाश नानिवडेकर
केदार पालघर स्टेशन वर उतरला. सचिन त्याचा मित्र म्हणाला होता स्टेशन वरून शेअर रिक्षा कर. राम मंदिरा जवळच घर आहे. त्याप्रमाणे तो रिक्षात बसला. दुपारची वेळ असल्यामुळे रिक्षात शेअर साठी जास्त कोणी नव्हतं. केदार रिक्षात बसून हे निम्न शहरी गांव कुतूहलाने न्याहाळीत होता. दुपारची वेळ म्हणून जास्त गर्दी नव्हती. त्याला दोन दिवसांनी पालघर मुख्यालयात जॉईन व्हायचे होते. तो जळगाव ला रहात होता. पाहिलंच पोस्टिंग म्हणून एखाद दिवस लौकरच यावे.तशात त्याला सचिन म्हणाला आधी घरी ये. मग तुझ्या क्वार्टर्स मध्ये शिफ्ट हॊ.तिसऱ्या पेसेंजर ची कितीवेळ वाट पाहणार हा कोणजाणे. आपणच तिसऱ्या चे पैसे भरावे झालं. म्हणून तो रिक्षा वाल्याला हाक देणार
तेवढ्यात समोरून एक देखणी तरुणी येताना दिसली. चंदेरी चुडीदार, हातात मोठी
पर्स. कानात मोत्याचे मोठठे झूमके, हातभर पांढऱ्या मोत्याच्या बांगड्या, केस क्लच
करून बांधले होते तरीही बरेचशे सुटलेले तिच्या चेहऱ्यावर उडत होते.ह्या गावात इतकी
सुंदर मुलगी बघायला मिळेल ही अपेक्षा नसताना त्याला कुठेतरी छान वाटलं. जणू उन्हात
चांदणं पसरलं. मनाशीच मंद हसत त्याने तिच्यावरून नजर हटवली पण नेमकी तिसरी पॅसेंजर
म्हणून तीच तरुणी आली. त्याने सरकून तिला जागा दिली.रिक्षा वाल्याने रिक्षा सुरू
करण्याआधी खिशातून गुटख्याचं पाकीट काढलं. त्या बरोबर ती तरुणी म्हणाली
“दादा…नका गुटखा खाऊ. वाईट सवय.”
तो वरमुन म्हणाला “ताई अख्खा दिवस रिक्षा चालवायची म्हंजे इचाच आधार
असतो…कुटं चाय बिय पिनार?”
“पण दादा त्यातल्या तंबाखू मुळे किती नुकसान होतं ह्याची कल्पना आहे
तुम्हाला. पोरा बाळांची फिकीर करा.”
त्याने पाकीट खिशात टाकलं आणि रिक्षा सुरू केली.
न रहावून केदार ने त्या तरुणीला न्याहाळलं. सोनेरी केसांच्या बटा वाऱ्यावर
संपूर्ण चेहरा झाकत होत्या. एका बाजूने दिसत होती. दुधी गोरा रंग, भरभर चालत
आल्यामुळे गाल नैसर्गिक गुलाबी झाले होते.तापकीरी पाणीदार डोळे. तिच्या डाव्या
दंडाचा हलकासा स्पर्श त्याला झाला आणि अचानक त्याच्या हृदयात नाजूक झंकार उमटला…हे
काहीतरी वेगळंच वाटलं त्याला. तिने ज्या अधिकार वाणीने रिक्षा वाल्याला सुनावले ते
पण आवडून गेलं. हे पाणी वेगळंच दिसतंय.त्याच्या उतरण्याच्या आधीच तिला उतरायचं
होतं.30रुपये रिक्षा वाल्याला देत तिने म्हटलं “10 जास्त दिलेत. कारण तुम्ही गुटखा
न खाता रिक्षा चालवली.बघा गुटख्या चे पैसे वाचवून किती बचत होईल तुमची काय?”
ती उतरताच केदारने तिला न्याहाळलं. खरंच इतकी देखणी दिसत होती. रिक्षा वाला हसत म्हणाला “होय ताई”
दुसरा पॅसेंजर रिक्षा वाल्यावर खेकसून म्हणाला “चलो भाई अब क्या इधर ही रुकना क्या?”
केदार ने नाईलाजाने तिच्या वरची नजर हटवली. काय ग्रेस होती तिच्या
चालण्यात.
सचिन कडे जाईपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर तीच होती.
सचिन वाटच बघत होता. त्याच्या आईने मनापासून स्वागत करत म्हटलं
“त्रास नाही झाला ना येताना.”
“नाही काकू, रिक्षावाला सचिनला ओळखत होता.भाऊराव म्हात्रे म्हणताच बरोबर
आणलं “
“अरे शे दीडशे घराचं आमचं माहीम गांव. एकमेकांना ओळखतो आम्ही. चल फ्रेश हॊ.
जेवण वाढते. ताजी मासळी आणली सचू ने तुझ्यासाठी.”
एकदा त्याला वाटलं सचिन ला तिच्या बद्दल विचारावं. पण काय म्हणून विचारणार?
सचिन आणि तो एकत्र इंजिनियरिंग कॉलेज ला होते. पुढे केदार ने MPSC केलं तर
सचिन सर्व्हिस ला लागला. जेंव्हा केदारला पालघरला पोस्टिंग मिळाली. सचिनने
त्याच्या घरीच यायला पाहिजे अशी गळ घातली.
संध्याकाळी दोघेही केळवे बीच वर फिरायला गेले. केदार ची नजर नकळत पणे
‘तिला’ शोधत होती. पण कुठेही ती नजरेला पडली नाही.
केदार म्हणाला “सचिन मी परवा जॉईन होणारे पण उद्या आपण जिल्हा मुख्यालयात
माझ्या डिपार्टमेंट मध्ये अशीच फेरी मारून यायची का? तूला वेळ आहे?”
“बस काय? तुझ्यासाठी तर सुट्टी घेतलीये. पण परवा पासून आहेच की…कशाला जायचं
आधी? मस्त मुंबई ला जाऊन एखादा पिक्चर टाकू. भटकू जरा”
“ते तर आता प्रत्येक वीक एन्ड ला करूच रे. पण मला उत्सुकता आहे. ऑफिस
बघायची”
त्यावर जोरात हसत सचू म्हणाला “असिस्टंट कमिशनर…पहिलीच पोस्टिंग म्हणून
एवढी एक्सायमेन्ट?”
केदार आणि सचू जिल्हा आयुक्त कार्यालयात पोहोचले तेंव्हा सकाळचे साडेअकरा झाले होते. उद्या पासून ह्या ऑफिसात केदारला यायचे होते. सचिन आणि तो व्हरांड्यातून आतील दालनात निरीक्षण करीत होते. सर्वसामान्य सरकारी ऑफिस सारखेच वातावरण होतं. टेबलावर फायलिंची थप्पी. प्रत्येक टेबलापुढे गरजू लोकांच्या रांगा. टेबला मागचे चेहरे त्याला एवढ्या लांबून दिसत नव्हते. जरा खिडकीकडे डोकावला तेवढ्यात कोपऱ्यातील टेबला वरून तारस्वरात एक जण खडसावून समोरच्याला काही सांगत होती. सगळं ऑफिस तिच्या टेबला कडे पहात होतं.समोर च्या एवढ्या गर्दीत केदारला जास्त दिसत नव्हतं म्हणून जरा आत जात त्याने दरवाज्यात बसलेल्या प्यून ला खुणेने विचारलं “काय?”
हातावर तंबाखू चोळत तो बेफिकीरीने म्हणाला
“रोजचंच हाय…म्याडम एकदम उसूल वाली असतंय. काय तरी झोल केला असणार कस्टम्बर
ने. सायेब तुम्ही काही चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करून बघा…वाघा वाणी गुरकावते.
तिचा बा पण असाच होता…जा बघा जाऊन फुडें”
आता केदारने सचिन ला म्हटलं मी बघतो पुढे जाऊन.त्याला उत्सुकता वाटली. गर्दी मधून हळूच सरकत पुढे सरकला . टेबलवर ‘सावनी सतीश साधना’ पाटी वाचली .
“अरे…!”त्याने नकळत स्वतःशी म्हटलं ‘ही इथे भेटेल असं वाटलंच नव्हतं…वा..
मजा येईल आता काम करायला”
गर्दीत तिला नीट न्याहाळता आलं आज. गुलाबी ड्रेस. आणि चिडल्यामुळे गुलाबी
झालेले गाल, मोठठे मधाळ तापकीरी डोळे..समोर मख्ख बसलेल्या गुंड टाईप माणसांवर
रोखून जोरात फाईल आपटत म्हणाली….
“जाऊन सांगा तुमच्या त्या सुराणा शेठ ला सगळी खरी माहिती भरल्या शिवाय,
इंजिनिअर कडून सगळं डिटेल्स मिळाल्या शिवाय मी तर सही करून तुमचं टेंडर पुढे
पाठवणार नाहीच…आणि उद्या येणाऱ्या साहेबांकडे तुमच्या सुराणा ने वशिला लावला तर मी
पत्रकारांना बोलवायला कमी करणार नाही. प्रत्येक वर्षी रस्त्याच्या टेंडर चे फॉर्म
भरता आणि रस्ते मात्र खड्यातच असतात. आधीच्या ऑफिसर कडून सह्या होत असतील…कशी फाईल
पुढे जाते ते बघतेच मी.”
तिचं बोलणं तोडत निर्लज्ज पणे समोरचा म्हणाला “म्याडम…तुमचं काय असेल ते बोला हॊ उगाच खिटपिट नका करू…”खिशातून लिफाफा काढतोय म्हणताना ती अजूनच चिडली. प्यून कडे पहात म्हणाली “सखाराम…ह्यांना आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग.. हे अति झालं नाहीतर सिक्युरिटी ला बोलाव.”
शेजारच्या टेबल वरचा कर्मचारी उठत त्या माणसाला कोपऱ्यात नेत म्हणाला “अहो हया मॅडम एकदम सरळ मार्गी आहेत.”ना खाऊंगी ना खाने दूंगी टाईप्स…तेंव्हा तुम्ही निघा आणि तुमच्या साहेबांना सांगा. खरी माहिती भरा. काय?”
सचिन त्याच्या मागे उभा राहून पलीकडे पहात हळूच त्याच्या कानात पुटपुटला “चल केदार…नाहीतर गर्दीत तुझ्यावर आफत यायची.”
तिच्या वरची नजर न हटवता तो म्हणाला “कसली गोड आहे रे ही…पण तेवढीच तिखट
बोलतेय”
त्याच्या खांद्यावरून पुढे पहात सचिन म्हणाला “कोण सावनी?... अरे नुसती
तिखट नाही जाळ आहे अरे ती तू वाट्याला जाऊ नकोस तिच्या. भाजून काढेल”
सचिन बरोबर बाहेर पडत तो मनात म्हणाला “काळीज तर कालंच भाजलं राव तिनं” नंतर सहज आवाजात विचारलं
“ओळखतॊस तिला? सावनी सतीश.. ही काय भानगड आहे”
“अरे आमच्या एरियातली लेडी डॉन आहे. आपलं आडनाव लावलं तर जात समजेल आणि त्याचा फायदा घ्यायला लोकं पुढे सरसावतील म्हणून ती आई वडिलांचे नांव लावते. वडिल वारले तेंव्हा ही नुकतीच ग्राज्यूएट झाली होती. अनुकंपा तत्वावर नोकरीं लागलीये तिला. माहीमला राहते.चल कॅन्टीन ला जाऊ. अजून तूझं क्वार्टर पण बघायचं आहे.”
केदारला आता खरंच उद्या कधी जॉईन होतोय असं झालं. डोळ्यसमोर सावनी ची मोहक छबी येत होती.पण तिचं वर्णन सचिन कडून ऐकल्यावर त्याने मनात म्हटलं ‘जरा सबुरीने’
सचिन ने त्याच्या चेहऱ्या वरचे भाव वाचत म्हटलं “ए भाऊ दिल बिल देऊन बसला
नाहीस ना तिला…ह्या बाबतीत ती खतरा आहे. आधीच सावध करतो”
किंचित हसत केदार म्हणाला…”फिकर नॉट दोस्त…हे पाणी थोडं वेगळं आहे…पण खतरो
सें खेलना हमें भी अच्छा लगता हैं l”
त्याला हात जोडत सचिन म्हणाला “हॊ…रे बाबा पोरी तुझ्यावर किती इंप्रेस
असायच्या माहित आहे मला…चल आधी पोटोबा करून घेऊ.”
त्याच्या जॉईन व्हायच्या दिवशी. केदार ने डार्क नेव्ही ब्ल्यू कलर चा शर्ट, क्लीन शेव्ह. आपल्या पोस्ट ला साजेल असा जामानिमा केला. तो येणार ह्याची माहिती स्टाफ ला त्याच्या स्टेनो ने दिल्यामुळे आधीच सगळे स्वागताला हजर होते. त्याने केबीन मध्ये शिरण्यापूर्वीच तिच्या टेबल कडे एक नजर टाकली होती. बाईसाहेब सुद्धा स्वागताला केबीन मध्ये असणार.
हळूच त्याने काचेतून आत पाहिलं कोणीतरी दोघी टेबल वर बुके सजवत होत्या. आज
तिने फिक्कट लेमन रंगाची साडी नेसली होती. कमालीची शोभत होती तिच्या गोऱ्या
रंगला…त्याचे बेईमान डोळे सतत तिला पाहण्याची धडपड करीत असताना निग्रहाने त्याने
नजर हटवली.
प्रेरणा त्याची स्टेनो एकेकाची ओळख करून देत असताना मुद्दाम तो प्रत्येकाशी
शेकहॅन्ड करून दोन चार आपुलकीचे शब्द बोलत होता.
प्रेरणा ने जेंव्हा तिची ओळख सांगायला सुरवात केली त्याने जाणीवपूर्वक
तिच्याकडे दुर्लक्ष करत हेड क्लार्क कडे वळून म्हटलं “पाटील…माझ्याकडे सुराणा शेठ
ची डिटेल्स घेऊन या “
तिच्याशी न बोलता, न बघता सरळ केदार पुढे गेला…आणि तिथेच सावनी चा चेहरा
पडला. आत्ता पर्यंत कोणीच तिला इतकं दुर्लक्षित केलं नव्हतं. प्रेरणाला मात्र
मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ऑफिसचं राजकारण असंच असतं. कोणीतरी कोणावर
उगाच खार खाऊन असतं. केदार सारखा उमदा, देखणा बॉस आपल्याला एवढा भाव देतोय. आणि
ह्या रुपगर्विता सावनीचं धड नांव सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. खूप खूष झाली प्रेरणा.
“ओके…गाईज, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. मला मित्र समजा.आपण टीम आहोत.
कोणाला काहीही प्रॉब्लेम असला अर्ध्या रात्री मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर
तुम्ही प्रेरणा कडून घेऊ शकता. अँड वन थिंग. फक्त कामासाठी फोन. नो गुडमॉर्निंग,
गुड नाईट मेसेज.मित्र असलो तरी बॉस आहे…तुम्ही लोक जाऊ शकता. प्रेरणा तू थांब.”
सावनी आणि जोशी मॅडम केबिनच्या बाहेर पडल्या बरोबर सावनी फणकाऱ्याने म्हणाली “इथे कुणाला हौस आहे तुमच्या केबिन मध्ये बसायची. आणि कोण कशाला ह्यांचा नं. घेऊन गुडमॉर्निंग करत बसेल.तुम्ही बसा त्या प्रेरणाला घेऊन. आम्हाला भरपूर कामं आहेत. मॅडम बघितलं ना कशी लाळघोटेपणा करत होती. मला सांगा आल्या आल्या ह्यांना सुराणा शेठ बद्दल कसं कळलं. मला तर वाटतं हे पण तिच्याच जातकुळीचे असणार.”
“नाही ग…मला नाही वाटत. त्यांचे डोळे पाहिलेस किती निर्मळ आहेत. उमदा पोरगा
आहे. ही प्रेरणाच चंट आहे. त्याला फसवेल.”
तिला फणकारून जाताना पहात होता केदार. मनात त्याच्या गुदगुल्या होत होत्या. पण स्वतःशीच म्हणाला “सबुरी.. केदार सबुरी”
सावनीचा त्या दिवशी मूडच गेला.घरी आली तीच मुळी रागात. त्यातून नेमकं आई ने विचारलं “तुमच्याकडे नविन असिस्टंट कमिशनर आलेत म्हणे. केदार पंडित. खूप हुशार आणि रँक होल्डर आहे म्हणे “
आई वर चिडून ती म्हणाली “नाही माहित ग मला कोण केदार बिदार…मी साधी सुपर व्हायझर आहे. कमिशनर वगैरे मला कसे माहिती असणार. आला असेल.”
आईला तिच्या उत्तरात तिचं आपण शिक्षण थांबवून बाबांच्या जागेवर मामुली पोस्ट वर आहोत ह्याचं दुःख जाणवलं. म्हणून आईने विषय न वाढवता जेवणाची पानं घेतली.
असेच आठ दिवस गेले. त्यांनी कामाचा जो धडाका लावला. बेकायदा बांधकामच्या फाईल्स, अनधिकृत फेरीवाले बसतात त्या जागा, सुराणा सारख्याना त्याने उभे तर केले नाहीच. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू म्हणून सांगितलं.
सावनी सोडून प्रत्येकाला केदार काही ना काही कामानिमित्त केबिन मध्ये
बोलवीत असे.सावनी नकळत केबिन मध्ये टक लावून त्याला समोरच्याशी बोलताना न्याहाळीत
असे. खरंच किती दिलखुलास हसतो हा…साहेब असूनही सगळ्यांना मान देतो. आपल्या पेक्षा
दोन चार वर्षेच मोठा असेल. पण केवढा आत्मविश्वास ठासून भरलाय त्याच्या
व्यक्तिमत्वात. कधी नव्हे ते सावनीला वाटलं…छे उगाच आपण सुपर व्हायझर झालो. स्टेनो
असतो तर प्रेरणा सारखं त्यांच्या नजरेत तरी असतो. आपलं काम फक्त मजूर,
कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्याशी. काही निमित्त काढून जावं तर आपला इगो आणि हॊ…खोटं कशाला
बोलू…लाज आडवी येते. आईला कशी ह्यांची माहिती बरं? त्या दिवशी काहितरी बोलत होती
तर आपण धूडकावलं तिला. आज जेवताना विषय काढू.ती जाण्यासाठी टेबल आवरत असताना
सखाराम काहीतरी सर्क्युलर घेऊन आला.
कॉफी विथ कमिशनर
केदार साहेबांनी प्रत्येक महिन्यात एकेका कर्मचाऱ्यांना कॉफी साठी केबिन
मध्ये औपचारिक गप्पा आणि ओळख म्हणून नविन उपक्रम ठेवला आहे. ह्या शुक्रवारी जोशी
मॅडम त्यांच्या मुख्य अतिथी असतील.
तिच्याही नकळत तिच्या गालावर गुलाबी छटा आली आणि…तेवढयात नेमका केदार केबिन च्या बाहेर आला. त्याने पाहिलं की ती आपलं सर्क्युलर वाचतेय. लक्ष नाही असं दाखवत खाड खाड पावलं टाकीत तो बाहेर पडला. मागोमाग प्रेरणा होतीच. सावनी च्या डोक्यातच गेली ती. टेबल आवरून ती निघाली तेंव्हा त्यांची गाडी दिसेनासी झाली…आणि प्रेरणा मात्र बस स्टॅन्डवर उभी. नकळत सावनीला हसू आलं…म्हणजे हीच सारखी मागेपुढे करते. ते कामापुरते भाव देत असणार.
घरी जेवताना सहज विचारावं तसं तिने आईला विचारलं, “आई मागे तू आमच्या नविन आलेल्या सरांबद्दल विचारलं होतंस नं? तूला कसे माहिती ते?”
“अगं पाटीलकाकू ग सचिन ची आई मंडळात बोलल्या. पण बहुतेक तुमच्या
डिपार्टमेंट मध्ये नसेल मग.”
“केदार पंडित म्हणालीस ना? आमच्याच डिपार्टमेंट मध्ये आहेत. सचूदादा ओळखतो का?”
“हॊ दोघेही एकाच कॉलेजात होते म्हणे.”
आईने विषय संपवला पण सावनी ला प्रकर्षाने आता सचिनकडे जाऊन विषय काढावासा
वाटला. काय बरं बहाणा काढावा..?
तेवढ्यात आई म्हणालीच तूझं उद्या काही नाही ना ग. मला पाटील काकूंनी पापड,
कुरडया वाळवण करायला बोलावलं.”
सावनी चे डोळे चमकले. “अरे वा.. मी पण येईन. तेवढीच काकूंना मदत”
इकडे त्याच संध्याकाळी सचिन आणि केदार मुंबई ला भटकंती करायला गेले असताना सचिन ने केदारला छेडलं.
“मग…!!मछली गळा ला लागतेय की नाही?”
“प्रयत्न चालले आहेत…बघू” हसत केदार म्हणाला.
“प्रकरण हॅन्डल विथ केअर टाईप्स आहे बरं का. फ्लर्ट करण्याचा प्रयत्न
सुद्धा करू नकोस. आमच्या बरोबर जुनियर कॉलेजला होती. एकाला सणसणीत कानाखाली वाजवली
होती”
“काय सांगतोस…पण डिपार्टमेंट मध्ये सगळ्यांशी छान आदबीने वागते. सगळ्यांची
कामं करते.”
“ओहो…इतकी नजर ठेवून आहेस?”
कसला लाजला केदार…घसा खाकरत म्हणाला…
“जस्ट येताजाता दिसते रे. पण सचिन मी सिरीयस आहे तिच्या बाबतीत. खरंच आवडली
मला ती. बघ ना काही प्रयत्न कर. टाइम पास नाही बरं. रियली आय रिस्पेक्ट हर.. मी
सुद्धा काही हालचाली सुरू केल्यात. पण तिच्या कडून काय रिस्पॉन्स मिळेल त्याची तू
जरा माहिती काढ यार. प्लीज.”
त्याच्या गळ्यात हात टाकत सचिन म्हणाला “अरे यार तेरे लिए कुछ भी”
रविवारी सावनी आई बरोबर सचिन कडे आलेली बघून सचिन पण चकित झाला. वाड्याच्या
चौकात सगळं महिला मंडळ पापड, कुरड्या करीत असताना त्याने आतल्या खोलीतून केदारला
फोन लावून घरी ये म्हटलं. तासाभरात केदार सचिन कडे आला. दोघेही रूम मध्ये असताना
मध्येच सचिन ने खास सावनी ला ऐकू जाईल असं आईला ओरडून म्हटलं
“आई रखमाला चहा घेऊन पाठ्वतेस का केदार आलाय.”
“अरे आज रखमी कुठे आली. थांब हॊ मीच करून आणते.”
“काकू मी करते. बसा तुम्ही” म्हणत सावनी तत्परतेन उठली.
“डब्यात शंकरपाळी आणि चिवडा पण आहे तो काढ ग. केदार ला चिवडा आवडतो.”
ट्रे घेऊन ती रूममध्ये आली. केदारने वळून पाहिलं आणि नजर लॅपटॉपवर फिरवली.
सचिन मात्र ट्रे घेत म्हणाला “अरे सावनी तू? तू कशाला त्रास घेतलास? बाय द
वे…ह्याला ओळखतच असशील ना? तुमच्याच डिपार्टमेंट चा हेड…आणि केदार..ही”
त्याचं वाक्य तोडत सरळ तिच्याकडे रोखून पहात केदार म्हणाला
“सावनी सतीश…ह्यांना कोण नाही ओळखणार. आमच्या डिपार्टमेंट च्या झांशी च्या
राणी आहेत. काय खरं ना?”
झक्क लाजली सावनी. हळूच हसत म्हणाली “काहीही हं सर..”
मान मागे टाकून दिलखुलास हसत केदार म्हणाला
“नो सर…सर ऑफिस मध्ये. माय सेल्फ केदार…तुम्ही इथेच राहता का? सचू बसायला
तरी सांग ह्यांना ”
“नाही…नको. काकूंना मदत करायला आले होते. अचानक इथे सचिनदादा कडे तुम्हाला
पाहून आश्चर्य वाटलं. दादा घरी घेऊन ये सरांना ”
“केदार…नांव आहे माझं”
“हॊ..लक्षात आहे. केदार सरांना…पण समोरचा माणूस आपल्याला अहो..जाहो करत
असताना आम्ही काय म्हणून नावाने हाक मारणार?ती हसत ट्रे घेऊन जात म्हणाली.
“केदार…शब्दात पकडलं तूला.”सचिन हसत म्हणाला. केदारने कान पकडत सॉरी
म्हटलं.”
आणि चारच दिवसांनी तिला सचिन च्या आईने तिच्या आईला केदारला ती आवडल्याचं
सांगितलं. ही गोष्ट आईने तिला सांगितली मात्र…सावनी लाजून आईला बोलगली.
म्हणजे ह्यांनी मार्क केले तर आपल्याला. एक नविन पालवी फुटल्या सारखं भारी
वाटलं तिला.
सावनीला जणू अंगा अंगाला पंख फुटल्यागत झालं.
कामावर जाताना तिने कपाट उघडलं नकळत तिची नजर निळ्या ड्रेस वर गेली. केदारचे शर्ट बऱ्याचदा निळ्या रंगाचे असतात.झटकन तयार होऊन रिक्षा करून ती लौकरच ऑफिसला पोहचली. केदार यायच्या आत तिला टेबलवर बसायचं होतं. नंतर त्याचं दर्शन होणं मुश्किल असे.
सव्वा नऊला तिला बघून सखाराम पाणी ठेवता ठेवता म्हणाला सुद्धा “मॅडम आज
लवकर?”
त्याच्या चोम्बडेपणाचा रागच आला. पण ती काही उत्तर देणार एवढ्यात केदार ची
गाडी ऑफिस समोर थांबली. प्यून आधी फायली घेऊन जवळ जवळ त्याच्या मागे धावतच होता.
केदार ची चाल अशीच तडफदार होती. नकळत ती खुर्ची वरून उठत म्हणाली
“गुडमॉर्निंग सर”
एक सेकंद तिला न्याहाळीत थांबला आणि मान तुकवून म्हणाला
“Ohh नाऊ दिस मॉर्निंग इज गुड”
तिला अर्थ कळायच्या आत तो केबिन मध्ये गेला सुद्धा. प्यून ला म्हणाला आज
सावनी मॅडम लौकर कशा बरं?
“सर आज आदिवासी पाडयात मुलांची सहल गेली. त्यांना माहिती नसणार. दर
शुक्रवारी त्या पाड्यात मुलांना इंग्रजी शिकवायला सकाळीच आठ ला जातात आणि डायरेक्ट
ऑफिस ला येतात.”
त्याच्या मनात अजूनच तिच्या बद्दल आदर वाढला. तिला वाटलं त्यांना सांगावं.
पण अजून त्याने डायरेक्ट काही विचारलं नाही.
जोशी मॅडम जेंव्हा पासून केदार सरांबरोबर कॉफी सेलिब्रेट करून आल्या. केदार
बद्दलच सावनी कडे बोलत होत्या. त्याची हुशारी, आदब, जेवढं ऐकू तेव्हढं तिला छान
वाटत होतं. आपला नं कधी लागेल आणि आपण काय बोलणार हया कल्पनेने तिला धडधडत
होतं.
आणि पुढील शुक्रवारी तिचंच नांव आलं. तिने तिचा आवडता मोतीया रंगाचा ड्रेस,
सागरवेणी, मोजकेच दागिने, केसात चमेलीचा गजरा.
जेंव्हा ती आत आली…केदार पुढे येत म्हणाला
“वेलकम मीस सावनी.”
सोफ्यावर बसत तिने थँक्स म्हटलं.
तिच्या समोरच्या सोफ्यावर बसत तो डायरेक्ट म्हणाला
“तूला एक सांगू सावनी? तू हसताना खूप छान दिसतेस.”
बापरे तिने नजर उचलून वरती पाहिलं आणि त्याने तिच्या जवळ येत म्हटलं
“खरं सांगू…हे कॉफी सेशन खास तुझ्या साठी आहे हे माहिती आहे तूला? जोशी
मॅडमना विचार. त्यांच्याशी बोलून आम्ही हा घाट घातला. तू डायरेक्ट अशी माझ्या समोर
येणं शक्यच नव्हतं…कारण तुझे उसूल.. आणि माझ्या भोवती प्रेरणा ताईंचा गराडा.. खरं
ना?”
ती चमकून म्हणाली
“म्हणजे…केदार तुम्हाला मी…”
“पहिल्या दिवसापासून आवडलीस. नव्हे ह्या गावात पहिले दर्शन तुझेच झाले.
रिक्षा वाल्याला गुटखा खाताना हटकणारी ही मुलगी आपल्याला आवडून गेली राव. पण तुझी
भीती वाटत होती. सचिन ने सावध केलं होतं ना…”
“प्लीज ना केदार…!तेंव्हा ची गोष्ट वेगळी होती. कॉलेज ते तत्काळ मजनू आणि
साक्षात तुम्ही…ह्यातला फरक समजतो मला ”
दिलखुलास हसत हळूच तिच्या हातात कॉफी देत तो म्हणाला
“उद्या आई येतेय माझी.. येऊ ना तिला घेऊन तुमच्या घरी?”लाजून लाल झालेले
गाल लपवत मानेने तिने हॊ म्हटलं.
“ओह.. सावनी कसली गोड लाजतेस…रियली आय लव्ह यू.” तिचा हात हातात घेऊन तो
म्हणाला…”एवढी तीन वाक्य बोलायला मला तीन महिने लागले. “
ती लाजून उभी रहात डोळे मोठे करत म्हणाली
“केदार…सर..आपण ऑफिस मध्ये आहोत ”
कान पकडत तो म्हणाला “सॉरी”
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याची रिंग टोन होती ‘लागी तुझसे लगन…लागी
तुझसे लगन’
हे खास तुझ्या आठवणींत बरं सावनी सतीश. हसत ती बाहेर पडली. तिच्या मनात
सुद्धा ही ट्यून झंकारत राहिली.
©®चित्रा अविनाश नानिवडेकर.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

1 Comments
छान
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box