‘ प्रेम म्हणजे नक्की काय असतं ‘
स्मिता भोस्कर चिद्रवार
आय.सी.सी.यू.च्या बाहेर अगदी शांतता होती. कारण हॉस्पिटलचां अतिदक्षता विभाग होता तो , पण मनाचं काय? मनातली अशांतता फक्त मनालाच कळते.
रागिणी शरीराने मृत्यूशी झुंझत होती आणि किशोर , मिरा सुद्धा तिच्यासोबत मनाने लढत होते . तिला धीर देत लवकर बरी हो म्हणून विनवत होते .
“राणी,राणी उठ ना लवकर.किती त्रास देशील?बघ ना मिरा आलीय.आपल्याला जायचयं ना तिच्याबरोबर?आणि तुला माहितीये का आपल्यासाठी काय सरप्राइज आहे ते?”
“बाबा,थांबा.मी सांगणार.मम्मा,मी एक गोष्ट पसंत केली आहे.ओळख बघू.अग तुला जावई पसंत केला आहे मी.आणि तू बरी हो ना ग लगेच मग त्यालाही बोलावते आणि तू होकार दिलास ना तरच लग्न करणार आम्ही.नाहीतर नाही.”मीरा म्हणाली तसा रागिणीचा तिच्या हातात असलेला हात हलल्याचं जाणवलं आणि ती ओरडली...
तिच्या आवाजाने डॉक्टर,नर्स धावत आले.अगदी चमत्कार झाल्यासारखी रागिणी कोमातून बाहेर आली.काही दिवसातच तिची तब्येत सुधारू लागली.
“बाबा,आईला उद्या डिस्चार्ज मिळणार.किती त्रास दिलास ग.आता पटकन घरी जाऊन माझे लाड पुरव.”मीरा रागिणीच्या कुशीत शिरली.
“ए वेडाबाई.हो ग तुझे लाड पुरवणार पण तुझ्यापेक्षा जास्त आमच्या जावयाचे.आणि काय ग जावई म्हणजे गोष्ट आहे का?काय हे बोलणं तुझ्यासाठी गोष्ट पसंत केलीय म्हणे.दाखव बरं आधी मला माझा होणारा जावई.आणि सगळं सांग त्याच्या बद्दल.”
“अग कोमात होतीस ना तू?तरीही माझ्या चुकाच काढ तू.”मीराने हसत हसत राकेश बद्दल तिला सगळं सांगितलं.
रागिणी घरी गेली आणि थोड्याच दिवसात एकदम ठणठणीत बरी झाली.राकेश आला आणि सगळ्यांनी एकमताने त्याला पसंत केलं.दिवस भुर्रकन उडून गेले आणि मिरा आणि राकेश लंडनला परत जायला निघाले.रागिणी आणि किशोरची लगबग सुरू होती.
“आई,बाबा अहो किती कराल माझ्यासाठी?आणि काळजी घ्या एकमेकांची.आमच्यासोबत चला म्हणतेय पण ऐकत नाही तुम्ही.सहा महिने देतेय तुम्हाला काय कामं करायची ती करून घ्या आणि मग आमच्याकडे चला.मी तुमची खरी मुलगी नसले तरी तुम्ही मात्र माझे आई बाबाच आहात.”मीराच्या डोळ्यात पाणी आलं.
“गप्प बस.म्हणे खरी मुलगी नाही.मुलगी ती मुलगी असते.त्यात खरी खोटी काय?आणि पुन्हा असं बोललीस तर कोमात जाईन हा परत.आता लग्नाचा मुहूर्त काढू आणि मस्त थाटामाटात बार उडवून देवू तुमच्या लग्नाचा.मग आम्हीही मोकळे होऊ.नीट राहा काळजी करू नका आमची.”रागिणी म्हणाली आणि मायलेकी आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत.किशोर सुद्धा हळूच आपले डोळे पुसत होता.
“अरे बाप रे.आता तुम्हा दोघांना स्विमिंग करत जावं लागणार बहुतेक.पुर आणलाय दोघींनी.राकेशराव लवकर बोटीची व्यवस्था करा.”किशोर म्हणाला आणि सगळे हसले.
किशोर दोघांना सोडायला गेला आणि रागिणी भूतकाळात हरवली.
रागिणी लहानपणापासून हुशार आणि साधारण परिस्थितीमुळे सोशिक आणि संमंजस होती.चार भावंडं आणि अत्यंत गरिबीत कसंबसं शिक्षण पूर्ण केलं आणि विश्वनाथरावांशी तिचं लग्न झालं.गोड गुलाबी स्वप्न रंगवत तिने नवीन घरात प्रवेश केला .ती मनाने आणि शरीराने तिथली झाली पण घराने आणि घरातल्या माणसांनी तिला कायमच उपऱ्याची वागणूक दिली.घरात ‘हक्काची बिनपगारी मोलकरीण’ अशीच तिची अवस्था होती.नवऱ्याने आपल्या बेफिकीर वृत्तीने विस्कटलेली संसाराची घडी बसवण्यात रागिणी आपल्या परीने आटोकाट प्रयत्न करत होती.सकाळी जवळच्या बालवाडीत मुलांना शिकवायला ती जाऊ लागली.त्या निरागस मुलांमध्ये तिचा जीव रमायचा.नाहीतर घरी तिची अवस्था एखाद्या अडगळीत टाकलेल्या वस्तुसारखी होती.
लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही तिची कुस उजवली नव्हती.त्यामुळे तिचा अधिकच उद्धार होत होता.ती आई होण्यासाठी असमर्थ आहे हे कळल्यावर तर सासूबाईंनी मुलाच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.तिने सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. नवऱ्यासमोर भिक मागितली.रडली ,चिडली,देवाचा हवाला दिला.पण कश्याचाही काहीच परिणाम झाला नाही.माहेरची परिस्थिती बेताची.त्यात आई वडिलांचं वय झालेलं,त्यामुळे माहेरी परत जायचं नाही असा तिने निश्चय केला.कोणाचाच आधार नव्हता.शिक्षण नव्हतं,एकटीने राहण्याचे धडासही नव्हते. आत्म्हत्येशिवाय दुसरा काही पर्याय समोर दिसत नव्हता.
ती गच्चीवर गेली. उडी मारणार इतक्यात मागून कोणीतरी पकडलं.तो तिचा नवरा विश्वनाथ होता.
“हे काय करतेस तू?माझी काहीच काळजी नाही का तुला? माझं तुझ्यावर प्रेम आहे पण घराला वारस तर हवाच ना?आईची इच्छा मी मोडू शकत नाही.तिने माझ्याकडुन वचन घेतलं आहे त्यामुळे मला हे दुसरं लग्न करावच लागेल.पण मी तुला कधीही अंतर देणार नाही.पण तू मात्र आत्मघाताचा विचार करणार नाही असं वचन मला दे.”
रागिणीला दुसरं काय हवं होतं? नवऱ्याच आपल्यावर प्रेम आहे ही भावना तिला सुखावून गेली आणि तिने तसं वचन विश्वनाथला दिलं.
सासूबाईंच्या नात्यातली मुलगी सुरेखा तिच्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळून लग्नाला तयार झाली होती. मंगळ असल्यामुळे तिचं लग्न काही जमत नव्हतं.कुठलाही गाजावाजा न करता गुपचूप लग्न उरकून देण्याचा डाव मायलेकरानी रचला.रागिणीबद्दल सुरेखाच्या घरी खोटं सांगितलं गेलं.विश्वनाथची पहिली बायको लग्नाच्या दिवशीच वारली असं सांगितल्यामुळे ती लग्नाला तयार झाली होती.सावत्र आई असल्यामुळे फारशी चौकशी न करताच तिकडचे लोक लग्नाला तयार झाले.
सुरेखा गृहप्रवेश करून आली.रागिणीची ओळख ‘विश्वनाथच्या लांबच्या नातलगांची मुलगी ,तिची परिस्थिती चांगली नाही म्हणून इथे आली आहे ‘ अशी करून देण्यात आली.हे ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकली.तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला. सुरेखाला
सगळं सांगितलं तशी ती सुद्धा खूप भडकली.’ या घरात ती राहील किंवा मी ‘ अशी धमकी दिली.मायलेक घाबरले.
विश्वनाथने एकांतात सुरेखाला “तू फक्त माझी आहेस.ही अवदसा घरात राहिली तर सगळी कामं करेल.आणि बाहेरही काम करून पैसे आणेल.तू राणीसारखी राहा.थोडे दिवस कोणाला काही सांगू नकोस.मग मी तिची व्यवस्था करतो.” असं सांगून पटवल.आणि मग गुपचूप जाऊन रागिणीला गोड बोलून समजावलं. दोघिंपैकी कोणी पोलिसात कंप्लेंट केली तर आपण जेल मध्ये जाऊ अशी भीती विश्वनाथला वाटली.
सुरेखा तोऱ्यात राहू लागली.रागिणीचे खूप हाल व्हायला लागले.प्रेम काय असतं हेच ती विसरून गेली.दिवसभर मर मर मरायचं आणि एका कोपऱ्यात पडून आपल्याच नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर बघायचं हे तिला असह्य होऊ लागलं होतं.ती एका मोठ्या घरी स्वयंपाकाचं काम करायची.ते लोक खूप चांगले होते.गीता वहिनी आणि तिची मुलं राज आणि रिया ह्यांना रागिणीने खूप लळा लावला होता.पोटच्या मुलांसारखे ती त्यांना जपायची. मुलंसुध्दा रागिणीशिवाय राहत नव्हती.अचानक ते बदली होऊन दुसऱ्या गावी जाणार असं कळलं.रागिणी आतून गहीवरली. गीतावहिनी आणि पूर्ण इनामदार परिवार रागिणीला अगदी घरच्या सारखे वागवयाचे त्यामुळे आता रागिणी आपल्याबरोबर असणारं नाही म्हणून त्यांनाही वाईट वाटलं.
“वहिनी,मला पण घेऊन जाल का तुमच्यासोबत?”रागिणीने गीतावहिनींना विचारलं.त्यांना खूप आनंद झाला.मुलांना सांभाळणं,स्वयंपाक करणं हे सगळं रागिणी खूप छान करायची.तिच्यावर मुलांना सोडून गीता वहिनी निर्धास्त असायच्या.आतापर्यंत लपवून ठेवलेली आपली परिस्थिती तिने उघड केली.त्यामुळे रागिणी आपल्यासोबत सुखरूप राहील याची काळजी पूर्ण परिवाराने घेतली.
काही दिवसांतच रागिणी गुपचूप त्यांच्यासोबत नवीन गावी निघून गेली.तिने घरी कोणालाही काहीच सांगितलं नाही पण एक पत्र लिहून ठेवलं.तिच्या जाण्याने कोणाला तसा काहीच फरक पडणार नव्हता .सुरेखाने आपले रंग दाखवायला सुरू केले होते.सगळी कामं ती सासुकडून करून घ्यायची.विश्वनाथ तिच्यावर हुरळून गेला होता याचा फायदा उठवून तिने त्याला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं.म्हातारीचे हाल होऊ लागले.तिला एकटीला सोडून दोघेही वेगळे राहायला गेले.
रागिणीचं आयुष्य खूपच बदलून गेलं होतं. इनामदारांकडे सगळे तिला प्रेमाने आणि आदराने वागवत होते.मुलं मोठी झाली तसं तिने शिवणकाम शिकलं आणि आपली वेगळी खोली घेऊन राहू लागली.गीता वहिनींनी हट्टाने तिला पुढे शिकायला लावलं.सकाळ संध्याकाळ इनामदारांकडे स्वयंपाक मात्र तिने सोडला नाही.दुपारी एका शाळेत लहान मुलांना शिकवू लागली.लवकरच एक प्रगल्भ स्त्री म्हणून ती विचार करू लागली.
काही वर्षांनी इनामदारांकडे कोणीही राहिलं नाही.मुलं मोठी होऊन परदेशी गेली.लग्न करून आई बाबांनाहीं सोबत घेऊन गेली.रागिणीला मात्र त्यांनी कधीच अंतर दिलं नाही.राज आणि रिया तिला ‘ यशोदा आई ‘ म्हणायचे.तिकडूनही तिची चौकशी करायचे आणि हक्काने पैसे सुद्धा पाठवायचे.
रागिणीला त्यांच्या प्रेमाने गहिवरून यायचं. स्वतःची हक्काची माणसे तिच्यावर प्रेम करत नसत पण ही परकी माणसं तिला जीव लावायची.ती आता चांगली कमावत होती.शाळेची मुख्याध्यापिका म्हणून समाजात मान मिळत होता.राज आणि रिया कडून येणारा पैसा ती समाज कल्याणासाठी वापरत होती.तिच्यासारख्या कितीतरी अबला मुली तिला दुवा देत होत्या.
एक दिवस एका कार्यक्रमात तिची ओळख किशोर साने यांच्याशी झाली.एक अगदी छान कोणालाही भुरळ पाडेल असं व्यक्तिमत्त्व.घरचे प्रतिष्ठित,श्रीमंत.आपल्या आजारी बायकोची सेवा मनापासून करणारे.त्यांची दत्तक मुलगी मीरा परदेशी शिक्षण पूर्ण करत होती.
दोघांची मैत्री वाढत होती.अधून मधून रागिणी सुमनला,किशोर सानेच्यां पत्नीला भेटायला जायची.एक गोड,प्रेमळ स्त्री असाध्य रोगामुळे मृत्यूशी झुंजत होती.तिची जगण्याची अशा नसूनही जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा बघून रागिणीला भरून यायचं.रस्त्यावर सापडलेल्या लहानग्या मीराला दत्तक घेऊन त्या दोघांनी पुण्यकर्म केलं होतं.तीसुद्धा आई बाबांसाठी अगदी सगळं करत होती.आपल्या आईला बरं वाटावं म्हणून वाट्टेल ते करण्याची तिची तयारी होती.
जुने पाश रागिणीने कधीच तोडले होते.नाही म्हणायला विश्वनाथ,सुरेखा आणि तिच्या सासूबाईंच्या अपघाती निधनाच्या बातमीमुळे तिला वाईट वाटलं होतं पण ती खऱ्या अर्थाने सुटली होती.
किशोर, रागिणीच्या मैत्रीचा आनंद सुमनला वाटत होता.आपल्या नंतर किशोरला कोण सांभाळणार याचं उत्तर तिच्या मानाने तिला दिलं होतं.ती स्वतः दोघांची जवळीक कशी वाढेल याचा प्रयत्न करत होती.
एक दिवस तिने दोघांनाही जवळ बोलावलं.”किशोर ,रागिणी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही मला देवाचे बोलावणे कधीही येईल त्यामुळे तुम्ही तयार रहा.आणि मला एक वचन द्या.मला खूप त्रास होतो आहे.तेव्हा मला जाऊ द्या.माझी एक इच्छा पूर्ण कराल ना?”
“हे काय बोलतेय तू? सुमा तू अशी कशी जाऊ शकतेस आपला संसार अर्ध्यावर सोडून?खूप जगायचं तुला.तू फक्त सांग तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन.”किशोर आपले अश्रू थांबवू शकला नाही.
सुमनने किशोर आणि रागिणीचां हात हातात घेतला आणि एकमेकांच्या हातात दिला.मीरा आईच्या जवळ बसून होती.
“तुम्ही दोघं माझं संसाराच स्वप्न पूर्ण करा.अगदी छान संसार करा.मीराला पण तिची ही नवीन आई खूप आवडते.तुम्ही तिघे मिळून पुन्हा हे घर आनंदाने भरून टाका. मीराच्या पोटी मी पुन्हा जन्म घेईन.लवकर मला वचन द्या.माझ्याकडे वेळ नाही आता.”सुमनची अवस्था बघून दोघांनीही कुठलाही विलंब न करता होकार दिला आणि सुमनची प्राणज्योत मावळली.शेवटच्या क्षणी तिच्या चेहेऱ्यावर आनंद होता.
सुमनच जाणं स्वीकारणं किशोर आणि मीरासाठी खूप अवघड होतं.रागिणी सतत दोघांना धीर देत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती.सुमनची शेवटची इच्छा म्हणून किशोर आणि रागिणीने साधेपणाने लग्न केलं.हळूहळू सगळेच सावरले. मीरासुद्धा नवीन आई बरोबर खुश होती.रागिणीने घराची आणि किशोरची सगळी जवाबदारी अगदी छान उचलली.तिला आता लेकीची काळजी लागून राहिली होती.सुमनच्या आजारपणात आपलं शिक्षण अर्धवट सोडून पोर कुठलाही विचार न करता निघून आली होती.
“मीरा बाळा,अग आता तू परत जा बरं.आणि तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण कर. तुझ्या मम्माला किती त्रास होत असेल तुझ्या अश्या वागण्याने?तिला वचन दिलं आहेस ना तू?आणि मी आहे ना आता बाबाजवळ.मग कशाला काळजी करतेस?मी सुद्धा माझं वचन पूर्ण करणार आहे आणि बाबासुद्धा.चल बरं तयारीला लाग.”बाबाला सावरलेल बघून मीरासुद्धा शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार झाली. किशोरसुद्धा आनंदला.मीरा निघून गेली आणि किशोर, रागिणीचा संसार सुरू झाला.दोघेही एकमेकांशी अगदी प्रेमाने वागायचे.किशोर रागिणीचा खूप आदर,सन्मान करायचा.त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही.खऱ्या अर्थाने ते एकरूप झाले आणि प्रेम म्हणजे नक्की काय असतं याची प्रचिती रागिणीला आली.हक्काचं घर, हक्काचा नवरा ,लाडाची लेक अशी सगळी सुखे परमेश्वराने तिच्या झोळीत टाकली.
अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे तिचे मन सतत आनंदी राहू लागले.
किशोरला फिरायची खूप आवड होती.त्याच्यामुळे रागिणीपण नवीन नवीन ठिकाणी जायला उत्सुक असायची. मीराच शिक्षण पूर्ण होऊन तिला जॉब मिळाला होता.आता दोघांनीही परदेशात तिच्याबरोबर राहावं अशी तिची इच्छा होती.
मीरा येणार म्हणून तिच्यासाठी शॉपिंग करण्यात किशोर आणि रागिणी रमले होते.सगळं घेऊन झालं पण तिच्या आवडीचे आईस्क्रीम बनवायचे त्याच समान राहिलं होतं.किशोरने रस्त्यावर गाडी थांबवली आणि ‘ मी पटकन समोरच्या दुकानातून समान घेऊन येते म्हणून रागिणी रस्ता क्रॉस करायला गेली आणि काळाने घाव घातला.त्यांच्या गोड संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने रागिणीला उडवले.
किशोरच्या ‘ राणी , राणी” अश्या हाका पुसाटश्या ऐकत तिची शुद्ध हरपली.रस्त्यावरचे लोक मदतीला आले आणि किशोरने तिला हॉस्पिटमध्ये नेलं.डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि हसणारी रागिणी कोमात गेली.जवळ जवळ पंधरा दिवस मृत्यूशी झुंझत शेवटी किशोर आणि मीराच्या प्रेमाने ती शुध्दीवर आली.डॉक्टर चे अथक परिश्रम फळाला आले आणि देवाच्या दयेने ती पहिल्यासारखी ठणठणीत झाली.
किशोरच्या गाडीच्या हॉर्न ने रागिणी भानावर आली.
“काय मग सासूबाई खुश ना?”किशोर तिला मिठीत घेत म्हणाला.
“मग काय अगदी खुश.सासरे बुवा तुम्ही पण तयारीला लागा आता.आणि इथलं बस्तान हलवायचीही तयारी करा.फक्त सहा महिने दिलेत लेकीने.”दोघेही हसत हसत नवीन स्वप्ने बघू लागले.
दोन वर्ष कशी गेली ते कोणालाही कळलं नाही.आज पुन्हा एकदा किशोर हॉस्पिटलमध्ये अस्वस्थ पणे बसला होता.पण आज सोबतीला राकेश आणि रागिणी होते. मीरा लेबर रूम मध्ये होती.तितक्यात नर्सने एक इवलसं गोड बाळ आणून दिलं.
“सुमा परत आली,आपली सुमा परत आली.”किशोरने आपल्या नातीला हातात घेऊन आनंदाने देवाचे आभार मानले.
प्रेम म्हणजे प्रेम असतं कधी लवकर , कधी कोणाला आयुष्यात खूप उशीरा ते मिळतं.ते अनुभवायला मात्र खरंच भाग्य लागतं. असं भाग्य रागिणीला उशिरा का होईना लाभलं आणि तिच्या आयुष्यात ते वाढतच गेलं.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box