आकाश तारा
राधा गर्दे
तीन महिने अमेरिकेला मुलांकडे राहून आज भारतात परतले आणि खूप बरं वाटलं. आपलं ते आपलं. आपली कॉलोनी दिसली आणि माहेरी आल्यासारखं वाटलं. टॅक्सीतून सामान काढून लिफ्टमध्ये शिरणार तोच एक गृहस्थ, एका उतारवयाच्या स्त्री बरोबर आत शिरले. ती प्रौढा उगाच माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली
“ माझा नवरा आहे हा आणि मी त्याची बायको.”
मला असं जाणवलं त्या गृहस्थाने हसून वेळ मारून नेली. मी ही,
“ हो का? अरे वाह छान.
“
म्हणत गप्प बसले सातवा मजला आला आणि मी आणि ती दोघं बाहेर पडलो. मी आपल्या घरात आणि ती दोघं त्यांच्या घरात गेले आणि मला आठवलं ती प्रौढा नवतरुणीच्या वेशात होती आणि ते गृहस्थ नवतरुणाच्या. हा काय प्रकार असावा? हा विचार चमकला.
मी इथे नसताना माझ्या समोरच्या घरात भाडेकरू आलेले आहेत वाटतं हा विचार तरळून गेला. दोन चार दिवस घर नीटनीटकं करण्यात गेले.आणि एक दिवस माझ्या घरावर टकटक झाली म्हणून मी दारावरची चेन सैल करत बघितलं तर ती स्त्री हसतच माझ्या दाराशी उभी. कपडे तरुणी सारखेच होते अंगावर. म्हणजे तंग कुर्ता,चूडीदार आणि सिंथेटिक ओढणी गळ्यात. हलकं लिपस्टिक. मी दार उघडलं,
“ मी कशी दिसते आहे?” हा प्रश्न तिने विचारला.
“ मस्त” मी म्हटलं.
“ हो ना? म्हणजे आकाश आज नक्कीच माझं हे रूप पाहून खुश होणार.”
म्हणत तिनं एक गिरकी घेतली स्वतः भोवती आणि ती पडणार असता मी तिला सांभाळलं. तितक्यात ती निघून ही गेली.
मला विचित्र वाटलं. हा काय प्रकार आहे. ह्या वयात ती असे कपडे काय घालते, विचित्रच नटते, घरात येते एक प्रश्न विचारून निघून जाते.
ती दारा बाहेर पडली आणि मी बाहेर डोकावले तर बघते काय? ते गृहस्थ ही तरुणाच्या वेशात, बैचेन होत फोनवर कोणाशी तरी बोलत होते. ती दिसताच ते आनंदाने पुढे झाले आणि त्यांचे हात हातात घेत म्हणाले,
“ तारा! काय सुंदर दिसते आहेस?
“
आणि,
“ हो ना? त्या आंटी ही तेच म्हणत होत्या म्हणून माझ्याकडे बोट दाखवलं.
मी आणि आंटी? माझ्या पेक्षा वीस वर्षाने तरी मोठी असेल ती. मला रागच आला. वेडीच दिसते. म्हणत जोरात रागाच्या भरात दार लावून घेतलं.
पुन्हा एक दिवस ती दोघं म्हणजे तारा आणि आकाश मला माझ्या दारात समोर लिफ्टची वाट बघत असलेले दिसले. तारा लगेच हसत म्हणाली,
“ आम्ही रजिस्टर्ड पध्दतीने लग्न करणार आहोत ना? म्हणून रजिस्ट्रेशनसाठी चाललो आहोत.”
आकाशने तिचा हात हळूच दाबला. त्याचा चेहरा कावरा बावरा झाला होता.
मी ही,
“ छान छान” म्हणत उभी होते. लिफ्ट आली आणि आम्ही त्यात चढलो. एका ही शब्दांची देवाण घेवाण झाली नाही तितक्या वेळात आमच्यात. तारा मात्र हळूच आकाशच्या कानात पुटपुटलेली मी ऐकलं.
“ सांगायचं नव्हतं का?”
जोडपं कॉलोनीत थट्टेचा विषय झाला होता. एकतर त्यांचं अगदीच मध्यम वर्गीय राहणी. त्यांच्याकडे मोठी तर सोडाच पण साधारण नैनो कार ही नसणं. इतक्या मोठ्या वयात तरुणांसारखं राहणं ते ही जुन्या काळातील तरुणांसारखं. ही सर्व कारणं संध्याकाळी चघळायला मजा येऊ लागली.
दोन दिवसाने दाराची बेल वाजली आणि डोकावून बघितलं तर आकाश नावाचे ते गृहस्थ बाहेर उभे होते. आत्ता ते नीटनेटक्या वेशभूषेत होते आणि पहिल्यांदा जाणवलं ते दिसायला चांगले होते.
मी त्यांना आत यायला सांगितलं. ते आत आले, हातातील किल्ली हळूहळू फिरवत, हरवल्या सारखे बसून राहिले. काही वेळाने मीच म्हणाले,
“ पाणी आणते.”
आणि ते एकदम जागे झाल्यासारखे म्हणाले,
“ न नको. तुम्ही बसा. मला जरा बोलायचं आहे. खरं तर तुमच्या घरी असं एकट्यात येणं बरं दिसत नाही पण तारा इथे फक्त तुमच्या बरोबर थोडं बोलते म्हणून मी हे धाडस केलं आणि दुसरं म्हणजे तारा आत्ता झोपली आहे म्हणून ही मी ह्या वेळेस आलो.
“
“ काही हरकत नाही “ म्हणत मी पाण्याचा ग्लास आणून ठेवला.
आकाश काही वेळ नुसतेच बसून होते . मला अवघडल्यासारखं होऊ लागलं. काही क्षणाने ते म्हणाले,
“ मॅडम! तुम्हांला ताराचं वागणं,तिचं राहणं, माझं राहणं हे विचित्र वाटत असेल. सगळ्या कॉलोनीच्या थट्टेचा विषय आम्ही आहोत हे ही कळतंय. तारा माझा डोळा चुकवून अधूनमधून तुम्हांला त्रास द्यायला येतं ते ही कळतं. ह्या सगळ्याला मी जवाबदारी आहे. मी त्या बद्दल माफी मागतो.”
“ अहो! माफी कशाला मागता? पण हो ह्या मागे काय कारण आहे हे कळलं तर सगळ्यांच्या थट्टा थांबतील हे मी सांगू शकते. अर्थात तुम्हांला ते सांगावंसं वाटत असेल तरच.”
क्षण भर गप्प बसून आकाश सांगू लागले.
मी आणि तारा एकाच शाळेत शिकत होतो. आमची घरं ही शेजारी शेजारी होती. आम्ही नववीच्या वर्गात असताना मला तिच्या बद्दल वेगळंच वाटायला लागलं. आश्चर्य म्हणजे सतत माझ्या भोवती घुटमळणारी तारा मला बघून इथे तिथे बघत दूर निघून जायची. मग मला जाणवलं ती मला चोरुन बघत असायची. तरी ही तिचं माझ्या घरी येणं आणि घरच्या लोकांशी बोलणं कमी झालं नव्हतं. मी घरात शिरताच ती निघून जायची. किंवा चुळबुळ करत बसायची.
मला कळत नव्हतं ती असं कां करते? माझ्या तिच्या बद्दलच्या भावना तिला कळल्या की काय? आणि त्यावरून ती रागावली की काय? हे वाटून मी ही तिच्या पासून दूर रहायला लागलो पण तरीही तिच्यावर सतत लक्ष ठेवूनच.
आम्ही बारावी पास झालो. ज्या दिवशी आमचा निकाल लागला त्या दिवशी तारा अनेक वर्षांनंतर माझ्याशी बोलली.
“ अभिनंदन! नेहमी प्रमाणे ९५टक्के नंबर घेऊन शाळेत पहिला आला आणि मी दुसऱ्या नंबर घेऊन तुझ्या मागेच.”
आणि हळूच म्हणाली
“नेहमीच मी तुझ्यामागे यायला तयार आहे.”
पहिल्यांदा मला ती काय म्हणाली ते कळलं नाही ती पुढे निघून गेली होती आणि तिला मला काय म्हणायचंय ते कळलं आणि मी उंच उडी घेत तिच्याकडे अंगठा दाखवला. तिने ही वळून बघत अंगठा वर केला.
त्यानंतर आमच्या गुपचुप भेटी होऊ लागल्या. मी पुढे एम. बी. बी एस.करण्याचं ठरवलं आणि ती बी. एस. सी. करु लागली. वेळ मिळताच आम्ही डोळ्यांच्या खुणांवरून भेटी ठरवायचो आणि वेळ घालवायचो.
तारा बी.एस.सी. झाली आणि तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. आम्ही आता आपल्या प्रेमा बद्दल घरी सांगायचं ठरवलं. माझं शिक्षण व्हायचं होतं. मला नोकरी ही नव्हती तेव्हा घरची मंडळी आम्हांला समजून घेतील की नाही ही शंका होती तरीही हे दिव्य पत्करावं लागणारच होतं.
त्यात एक दिवस ताराचे वडील रागात फणकारतच आमच्या घरात शिरले.
“ काय हो सोमण! तुमचा मुलगा स्वतःला समजतो काय? माझ्या मुली बरोबर बाहेर फिरतो आणि घरी साळसूदपणाचा आव आणतो. अरे माझीच मुलगी मिळाली ह्याला फिरवायला? आपल्या संबंधाचे हेच पांग फेडले ह्याने. वर्षानुवर्षं आपण शेजारी आहोत म्हणून जास्त काही न बोलता, न करता मी त्याला सोडतो आहे पण खबरदार माझ्या मुली बरोबर तो परत दिसला तर. मी आपले जुने संबंध विसरून जाईन.”
आणि कोणाचं काही न ऐकता आले तसे निघून गेले. आई बाबा आणि इतर स्तब्ध बसून होते. क्षणभर त्यांना कळेचना हे काय बोलून गेले.
थोड्या वेळाने बाबांनी मला विचारलं,
“ काय रे! हे काय बोलत होते? ते बोलले ते खरं आहे का?”
“ बाबा! रागवू नका पण मला तारा आणि ताराला मी आवडतो. आम्ही तुम्हाला हे सांगणारच होतो पण आमच्या ह्या पवित्र भावनांचा आदर न करता कोणी उलट सुलट त्यांना सांगितलं ते कळत नाही.”
“ अरे गाढवा! मग हे अगोदरच नाही का सांगायचं. मी आरामात बोललो तरी असतो त्यांच्याशी.” बाबा म्हणाले.
आई म्हणाली,
“ अहो! आकाश कमवता तरी आहे का? काय बोलला असता तुम्ही? त्यांनीच उलट तुम्हाला चार सुनावले असते.”
तरी ही बाबांनी चार दिवसांनंतर ताराच्या वडिलांकडे गोष्टी काढल्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकेना. त्यानंतर ताराला एकटं बाहेर पडण्याची मनाही झाली.
विचित्र अवस्था होती घरात आणि शेजारी. सगळ्यां पर्यंत हे प्रकरण पोहोचलं होतं. हा आता टिंगलचा विषय झाला होता.मला फार वाईट वाटत होतं की आमच्या पवित्र नात्याला इतक्या खालच्या पातळीला का नेत होते सगळे. घरचे माझ्या पाठीशी होते. ताराकडे काय चाललंय ते कळायला मार्ग नव्हता. माझं चित्त शिक्षणात लागेनासं झालं. तरी ही कसं तरी कॉलेज चालू होतं.
सहा महिने झाले असतील आणि एक दिवस ताराचे वडील ताराच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले. चार दिवसाने तिचं लग्न होतं. आई, वडील माझ्याकडे बघत होते मला काही कळतच नव्हतं काय चाललंय. माझी मती कुंठित झाली होती. कसं ही करून ताराला भेटायला हवं पण कसं ते कळत नव्हतं.तारा खरंच मनाने ह्या लग्नाला तयार आहे का? जर तसं असेल तर ठीक. कारण ताराने सुखात रहावं हेच मला वाटतं होतं आणि हीच माझी एकमेव इच्छा होती.
मी काही करू शकलो नाही आणि तारा लग्न होऊन दुसऱ्याची झाली. मी ही एम. बी. बी. एस. झालो पुढे स्पेशलायझेशनसाठी अस्ट्रेलियाला निघून गेलो.
भारतात आल्यावर आई,बाबा बरोबर ह्या शहरात आलो. ते सतत लग्नाच्या मागे लागले होते पण मला ताराला विसरणं शक्य नव्हतं.
वर्षा मागून वर्षं पुढे जात होती. मी स्वतःला कामात खूप गुरफटून घेतलं होतं. तारा सतत माझ्या मनात होती. ती सुखात असू दे ही प्रार्थना मी रोज करत असायचो.
काही वर्षाने कैंसरने आई गेली आणि वर्षाच्या आत बाबा ही गेले. मग मी कामाचा व्याप जास्तच वाढवला. अनेक धर्मादाय संस्थांमध्ये तर अनेक ठिकाणी कॅम्पमध्ये मी काम करायला लागलो.
दोन महिन्यांपूर्वी मी अशाच एका संस्थेत गेलो असता मला तारा दिसली. ती वय झालं असून ही तरुणीच्या वेशभूषेत दूर बघत बसली होती. तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं पण मी लगेच तिला ओळखलं होतं.
तिची विचारपूस केल्यावर कळलं की कुठल्याशा अपघातामुळे तिची स्मृती जरी गेली होती तरी तिला तारुण्यातील गोष्टी तितक्या आठवत होत्या. आणि त्यातही एकच “माझं लग्न होणार” बस. त्यापुढे किंवा मागे ती जातच नव्हती.
अपघात झाल्यावर पोलिस स्टेशनवरून तिला ह्या संस्थेत आणलं गेलं. तिचे फोटो पेपरला, टी.व्ही ला दिले गेले पण कोणीच तिला घ्यायला आलं नाही आता ह्या गोष्टीला ही आठ महिने उलटून गेले होते. तिथल्या लोकांनी सांगितल. ती एकच वाक्य सारखं म्हणते,
“ आता आम्ही लग्न करणार. मग इथून पळून जाणार. मी आणि आकाश.”
हे ऐकताच मी स्तब्ध झालो. म्हणजे तारा मला विसरली नव्हती? तरीही मी तिला न भेटता घरी आलो. रात्रभर बैचेन होतो. काय करावं कळत नव्हतं. तारा, माझं प्रेम माझ्या समोर होतं पण कशा अवस्थेत? दोन दिवस विचार केला. मला कळलं की ह्या कॉलोनीत भाड्याने फ्लैट मिळतो आहे. मग मी संस्थेत जाऊन सगळी विचारपूस करून कायद्याने तारांची जवाबदारी स्वीकारली.
तारा स्वतःला तरुण समजते आणि तिचा समज तसाच रहावा म्हणून मी ही तसाच राहतो. ती माझ्याकडे राहते तरी ही मी तिला अजून स्पर्श केला नाही.
खरंतर मला ती माझ्या बरोबर असल्याचा आनंद आहे. तिला पूर्णपणे आनंदी ठेवण्यात मला सुख मिळतंय. पण तिचा लग्न करण्याचा हट्ट पुरवायला मन धजत नाहीये. तिची स्मृती गेली ह्याचा मी आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतोय का? हा विचार मला नीट झोपू देत नाही. तिला घरात बंद करून हॉस्पिटलमध्ये जाताना मी माझ्या मनाला किती त्रास देतो हे कळतं. रोज डोळ्यात पाणी साठतं पण मला काम करणं गरजीचं आहे ना?
आकाश एक सुस्कारा घेत थांबले होते. मी ही काही क्षण थांबून त्यांना विचारलं.
“ पण तुम्ही आपलं रहातं घर सोडून इथे कां बरं आलात?”
त्यावर आकाश म्हणाले,
“ मला तिथे सगळे ओळखत होते. त्यात ताराला घेऊन मी तिथे राहिलो असतो तर माझ्याबरोबर परत तिच्यावर चिखल फेक तर होणार नाही? हा प्रश्न पडला आणि आम्ही इथे आलो. तसं मी संस्थेत सांगून ठेवलं आहे की कोणी ताराला शोधायला आलं तर मला कळवा.”
काही वेळ बसून ते निघून गेले. आकाश आणि ताराच्या प्रेम कहाणीने माझं मन विव्हळ झालं होतं. प्रेम असं ही असू शकतं? खरंच ह्यालाच उदात्त प्रेम म्हणत असतील का?
आपल्या प्रेमाची सोबत हवी तेव्हा न मिळणं आणि ती मिळाल्यावर कशाची ही आशा न ठेवता वासनांना थारा न देता कोंडल्या सारखं होणं ह्याला नियतीचा कोणता डाव म्हणावा?
अधूनमधून तारा आणि आकाश भेटायचे आणि तारा “आम्ही लग्न करणार म्हणत असायची.”
जवळपास एक वर्ष दोघं आम्हांला भेटत असायचे. आता कॉलोनीत हा थट्टेचा विषय राहिला नव्हता. प्रेमाचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं होतं ज्यात त्यागाने एक वेगळीच उंची गाठून जगा पुढे उदाहरण ठेवलं होतं.
नियतीने आकाशची परीक्षा अजून ही शिल्लक ठेवली होती. तारा बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि बेशुद्ध झाली. लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं पण दोन दिवसाने कळलं ती कोमामध्ये गेली. किती दिवसाला माहित नाही.
आता आकाश सतत तिची काळजी घेत असतात. मात्र ते परत आपल्या घरी रहायला गेले होते. माझ्याकडे फोन नंबर होता म्हणून मी अधूनमधून चौकशी करायचे. आणि एक दिवस आकाशने फोन केला.
“ तारा गेली. कळत नाहीये की बरं झालं की वाईट.कदाचित् पुढल्या जन्मी भेट व्हावी म्हणून ती माझं स्वागत करायला पुढे गेली.तरी ही कष्टातून सुटली आता तिथे तरी सुखात राहील.”
राधा गर्दे, कोल्हापूर
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box