फक्त तू - अश्विनी शिंदे

 फक्त तू.....


डॉक्टर, डॉक्टर बघाना सुधाला काय होतंय... अचानक ती शांत झाली आहे... कानात स्टेथेस्कोप घालत डॉक्टरांनी त्याला बाहेर थांबायला सांगितले. डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने सुधाला नजरेआड केलं...

भूतकाळात....

समीर - उंच, गोरा, लांब सडक नाक, पिळदार शरीरयष्टी असलेला 2८ वर्षांचा देखणा तरुण. IT कंपनीमध्ये काम करत असलेला समीर आई-बाबा, लहान बहीण या छोट्या आनंदी कुटुंबासोबत पुण्यात स्थायिक होता. समीरच्या बहिणीचे लग्न अवघ्या काही दिवसांनी होणार होते.

समीरच्या ऑफिसमध्ये जॉब साठी काही जागा निघत होत्या. मुले-मुली इंटरव्यू साठी येत होते. समीरच्या डिपार्टमेंट मध्ये ही एक जागा भरली गेली अशी कुजबूज त्याला ऐकायला मिळाली. सकाळची वेळ - लॉगिन करून प्रत्येकाच्या नजरा आपापल्या स्क्रीनवर होत्या, तोच एक हळुवार आवाज ऐकू आला-Excuse me.. समीरने वळून पाहिले. सड पातळ बांधा, लांब सडक केस, सावळा रंग आणि तरतरीत चेहरा असलेली एक मुलगी आली.मी- सुधा - New joining ओळख करून दिली. सगळ्यांनी तिला वेलकम ही केले. पण समीरची अवस्था आज थोडी वेगळी होती. नेहमी चेष्टा मस्करी करून सर्वांना हसवणारा समीर आज आतून शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता झळकत होती. बहिणीच्या लग्नासाठी समीरने जसे स्टाफला आमंत्रित केले तसे सुधालाही आमंत्रण दिले आणि ती आली ही. लग्न सोहळा आनंदात पार पडला. बहिणीच्या पाठवणुकीची जेव्हा वेळ आली तेव्हा समीर हळवा झाला. तेव्हा सुधाने समीरची अगदी हळुवार शब्दात समजूत घातली, किंबहुना सुधा समीर शी पहिल्यांदा एकांतात तेव्हाच बोलली.

दिवसांमागून दिवस जात होते. ऑफिसचं काम, लंच ब्रेक मध्ये एकत्र जेवणं, टी ब्रेक मध्ये गप्पा मारणे यातून समीर-सुधाचा संवाद वाढला होता. आता त्यांच्यात चांगली मैत्री ही झाली. एकमेकांचे टिफिन शेअर करणे, ऑफिस कामामुळे उशीर झाला तर एकमेकांसाठी थांबणे हेही चालूच होते.

दोघांना एकमेकांचे विचार सवयी तोंडपाठ झाल्या होत्या. समीरचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठीची त्याच्यातील जिद्द सुधाला खूपच आवडत असे. तर सुधा मधील कमालीचा समजूतदारपणा आणि काळजीवाहू स्वभाव त्याला भावला होता. मैत्रीच्या पुढेही काही अंतर सुधाला समीर आवडू लागला आहे हे सुधालाही उमगले होते, पण काही पाहिलेली स्वप्ने आयुष्याच्या उंबऱ्यापर्यंत येतात पण जेव्हा जाग येते तेव्हा ती आपली नसतात याची कुठेतरी जाणीव होऊन ती स्वतःला सावरत होती. एके दिवशी सुधा ऑफिसला आली नाही आणि रजेबद्दल तिने कोणाला काही कळविलेही नाही. बरीच वाट पाहून समीरने सुधाला कॉल, मेसेज केले पण तिचा रिप्लाय आला नाही. समीर खूपच अस्वस्थ झाला होता. अखेरीस न रहावून ऑफिस सुटल्यानंतर तो सुधाच्या घरी जाण्यास निघाला. पायाखालची वाट त्याला सरकता सरकत नव्हती. सुधाच्या घरी तो पोहोचला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. दारावरची बेल त्याने दाबताच सुधाच्या आईने दरवाजा उघडला. ओळख करून घेतल्यानंतर तिने त्याला हॉलमध्ये बसण्यास सांगितले. समीरच्या नजरा सारख्या बेडच्या दिशेने जात होत्या. आईने पाण्याचा ग्लास समीरच्या हातात देत ती दवाखान्यात गेल्याचे सांगितले, तोच समीरच्या प्रश्नांचा नुसता भडीमार चालू झाला- का ? काय झाले तिला? कोणता दवाखाना? तेवढ्यात समीरचा मोबाईल वाजला, स्क्रीन वरती सुधाचे नाव बघून त्याचा उतरलेला चेहरा किंचित फुलला. त्याने फोन उचलताच सुधाचा समोरून रिप्लाय आला- मी ठीक आहे, उद्या ऑफिसमध्ये भेटून बोलू. समीर थोडासा निश्चिंत झाला. दुसऱ्या दिवशी सुधाला समोर बघून तो खूप खुश झाला. मात्र रात्रभर न झोपल्याचा शीन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बहिणीच्या लग्नानंतर समीरच्या लग्नाची इच्छा आई-वडिलांनी त्याला बोलून दाखविली. अनपेक्षित इच्छा ऐकून तो भांबावला, पण लग्न म्हटले की सुधाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. पण सुधाबद्दल नक्की त्याला काय वाटते ते त्यालाच समजत नव्हते. प्रेम की काळजी - की मैत्रीतली काळजी... 

विचारांचा एकच कल्लोळ त्याच्या मनात माजला होता. असह्य होऊन त्याने त्याच्या ऑफिसमधील अगदी जवळच्या मित्राला हे बोलून दाखवले. अर्थात सुधा आल्यापासून समीर मध्ये झालेला बदल ऑफिसमध्ये सर्वांना जाणवत होता. मित्रानेही त्याची प्रामाणिक कबुली दिली. समीर, तू सुधाच्या प्रेमात आहेस. सुधासमोर असली की तू खूप खुश असतोस एवढा की ऑफिस कामाचा ही तुला कंटाळा वाटत नाही. तिच्याशी बोलताना तुझ्या डोळ्यात एक विलक्षण चमक असते. चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. आमचेही सुधा बद्दलचे तर्कवितर्क चुकतात पण तुझा नेम पक्का आहे. प्रत्येक गोष्टीतला तिचा वैचारिक दृष्टिकोन तुला पक्का माहित आहे. तिला ऑफिसला यायला थोडा जरी उशीर झाला तरी तुझी अस्वस्थता तुझा चेहरा सांगतो. तसा तू खुशाल चेंडू आहेस, प्रत्येकाशी जुळवून घेऊन तू आनंदी राहतोस पण मग ती नसेल तर तू एकांत का निवडतोस??? कारण तुझी सुधा मध्ये मानसिक involvement झाली आहे. मित्राशी बोलून झाल्यावर समीरने सुधाशी बोलायचे ठरवले. पण त्याचे धाडस होत नव्हते कदाचित तिचा नकार पचवणे त्याला शक्य नसेल.

घरातून समीरला लग्नाचा तगादा सारखाच लावला जात होता, परंतु समीर सुधाशी ह्या विषयावर अजूनही बोलला नव्हता. सुधा सोबतचा प्रत्येक क्षण तो तेवढ्याच आनंदाने जगत होता. सुधाचा डोकेदुखीचा त्रास अधून मधून चालूच होता. समीर सुधाची काळजी ही घेत होता पण तिला होणारा त्रास त्याला सहन होत नव्हता.. 

न रहावून समीरने सुधाला विचारले ... हा त्रास कसला? कधी संपणार? सुधाने उत्तर देणे टाळले. शेवटी त्याने मैत्रीची शपथ घातली तेव्हा सुधाचे उत्तर आले- 'नको समीर तुला कदाचित नाही झेपणार माझे बोलणे ... समीरने पहिल्यांदा सुधाचा हात हातात घेऊन तिच्या नजरेला नजर भिडवून विचारले काय प्रॉब्लेम आहे ?? सुधाच्या थरथरलेल्या ओठातून शब्द बाहेर पडले- "समीर, मला कॅन्सर आहे- फस्ट स्टेज, माहित नाही मी यातून बरी होईल की नाही". क्षणार्धात समीरचे डोळे डबडबले, हात सैल पडले...

सुधाने हाताची पकड घट्ट करत त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूचेही त्याला भान राहिले नाही .. त्यातच त्याने तिला विचारले- 'सुधा, मी तुला आवडतो ?' विस्फारलेल्या डोळ्यांनी सुधाने समीर कडे बघितले. तोच दुसरा प्रश्न 'लग्न करशील माझ्याशी?' टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले. थरथरलेल्या आवाजात ती बोलली- " मृगजळ आहे हे सारे तू स्वतःला त्यात पाहू नको, मी रान वेदनेच्या निखाऱ्याचे अकारण तू दाहू नको, अश्रूच येतील वाट्याला त्या अश्रूत तू नाहू नको..." समीरने सुधाचा हात परत हातात घेतला नी बोलला-' मी आहे ना'.. त्याच्या डोळ्यातील प्रेम व आत्मविश्वास पाहून सुधाही सावरली. दोघांनीही आपापल्या घरी सांगितले. समीरच्या वडिलांचा विरोध होता अर्थात कारण ही तसेच स्पष्ट होते-

सुधाला असलेला कॅन्सर आईच्या मदतीने समीरने वडिलांची खूप समजूत काढली. शेवटी तेही लग्नासाठी तयार झाले पण ते तेवढे खुश नव्हते. समीर- सुधा, दोघांच्या घरचे, त्यांचा मित्रपरिवार सगळे जोमाने लग्नाच्या तयारीला लागले. अखेरीस तो दिवस उजाडला. सुधा नववधूच्या वेशात स्वतःला पाहून मनोमन सुखावली होती. दोघांनी

पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले होते. समीर - सुधाचे लग्न थाटामाटात पार पडले. दोघांनीही काही दिवसांची सुट्टी काढून पूर्णवेळ एकत्र घालविला. सुधाने तिचं सर्वस्व त्याला अर्पण करून त्यांचं नातं पूर्णत्वास नेलं.

लग्नानंतर काही दिवसांनी दोघेही ऑफिसला जायला लागले. सर्व काही ठीक चालू होते. अचानक एके दिवशी समीरच्या वडिलांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले. त्यांच्या वैयक्तिक व्यवसायात त्यांना झालेला तोटा त्यांना सहन झाला नाही, त्याचे दडपण आल्याने अकस्मात त्यांचे निधन झाले. समीर, समीर च्या आईसाठी हा खूप मोठा धक्का होता, या काळात सुधाने समीरला, आईला खूप आधार दिला. कर्जाचा डोंगर एवढा मोठा होता की त्यांना राहते घरही विकावे लागणार होते. पण आईचा जीव घरात होता, ती वडिलांची पर्यायाने त्या दोघांच्या संसाराची शेवटची सुखद आठवण होती हे सुधा ने जाणले होते. रात्रीची वेळ- समीर बाल्कनीतील खुर्चीत बसून आकाशाकडे एकटक पाहत होता ... वडील गेल्याचे दुःख आणि कर्जाचा मानसिक ताण हे दोन्ही त्याच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसत होते. सुधाने ते बघताच ती बोलली- समीर, मी नोकरी बदलते. थोडे पॅकेज वाढवून मिळाले तर तेवढाच हातभार लागेल.

समीर :- नको तू नको बदलू. तू ह्या जॉब मध्ये स्थिरावली आहेस, उगाच परत नवीन नोकरी तुझीच दगदग होईल त्यापेक्षा मीच बघतो.

दोघे मिळून शोधाशोध चालू करतात. दोन महिन्यानंतर समीरला चांगले पॅकेज वाढवून अमेरिकेमध्ये नोकरी मिळते. आईला आणि पर्यायाने सुधालाही ह्या अवस्थेत सोडून जाण्याची समीरची इच्छा नसते, पण सुधाचा खूप आग्रह असतो. ती त्याची खूप समजूत काढते. (हे बघ समीर अर्धांगिनी या नात्याने आलेल्या प्रत्येक संकटात मी तुझ्या तेवढीच सोबत असेन. तू काळजी नको करू, मी स्वतःची आईची काळजी घेईन. नोकरी सांभाळत मी करेन सगळं मॅनेज. तुझा आहे ना माझ्यावर तेवढा विश्वास??)

समीर अमेरिकेमध्ये नोकरीवर रुजू झाला खरा पण दोघांच्या सगळ्याच बाबतीतील वेळा वेगवेगळ्या असल्याने तसेच जास्त पगाराची नोकरी तर कामही तेवढे जास्त त्यामुळे सुधा - समीर मध्ये संवाद कमी होत असे. दिवसां मागून दिवस जात होते. सुधाची तब्येत पहिल्यासारखी तेवढी बरी नसायची. पण ती तेवढ्याच जोमाने नोकरी, घरचे सर्व काही बघत होती. प्रत्येक वेळी फोनवर समीरची शी तेवढ्याच उत्साहात बोलत असे. समीर बऱ्याचदा भावनिक होऊन बोलायचा - "सुधा प्रेम असूनही आपल्यात हा नेहमीच का दुरावा आहे?" त्यावर सुधाच हेच उत्तर असायचे - "कदाचित हेच प्रेम खरं असावा हा त्याचा पुरावा आहे.".

तीन वर्षानंतर.....

थोडी आर्थिक परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर समीर पुण्यात परतला. समोर सुधाला बघून त्याचे मन सुन्न झाले.. आजारपणाने विरळ झालेले केस, डोळ्याभोवती असलेली वर्तुळे, निस्तेज चेहरा आणि थकलेले शरीर बघताक्षणी त्याने तिला मिठी मारली.. एवढी वर्षे थांबवून ठेवलेल्या अश्रृंना दोघांनीही वाट मोकळी करून दिली...

समीर सुधाची काळजी घेतच होता पण कर्करोगाने सुधाच्या शरीराचा संपूर्ण ताबा घेतला होता. कालांतराने सुधाची मानसिक अवस्था बिघडत चालल्याने डॉक्टरांनी सुधाला घरीच राहण्याचा सल्ला दिला. सतत कामात व्यस्त असणाऱ्या सुधाला असे कामाशिवाय बसण्याचा कंटाळा आला होता. वाढत जाणारी डोकेदुखी त्यात तिच्या मेंदूवरील सुटत चाललेला ताबा यामुळे ती खूप हैराण झाली होती. समीरला आपण काहीच सुख देऊ शकत नाही ही खंत सारखी तिला खात होती. परिणामी तिची खूप चिडचिड होत असे. स्वतःवरही आणि कधी कधी समीरवरही. समीर मात्र तिचा प्रत्येक मूड सांभाळत होता.

एके दिवशी तर सुधाला तिची डोकेदुखी एवढी असह्य झाली की तिने आरडाओरडा सुरू केला. समोर उभ्या समीरचेही तिला भान राहिले नाही, तिने त्याला मिळेल त्या वस्तू फेकून मारण्यास सुरुवात केली.. आता समीरच्या आईलाही सुधाचे असे वागणे असह्य होत होते. शेवटी मातृत्व आड आले आणि तिने समीरला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला.. पण समीरचे सुधावर निस्सिम प्रेम असल्याने सुधा सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनाला शिवतही नव्हता.

अमावस्येची रात्र-

बाल्कनी मध्ये असलेल्या खुर्चीत बसून सुधा गर्द अंधाराकडे एक टक बघत होती. मनोमनी हाच विचार चालू होता.. (या काळ्याकुट्ट अंधारासारखेच माझे जीवन ही अंधकारमय झालेले आहे. आशेची एक लुकलुकणारी चांदणी सुद्धा मला लांब लांब पर्यंत दिसत नाही... त्याचे सावट मला अजून समीरच्या आयुष्यावर पाडायचे नाही..)

स्व विचारात मग्न असलेल्या सुधासमोर समीर कधी येऊन बसला ते तिचे तिलाच समजले नाही. स्ट्रीपमधील औषधांची गोळी काढत तो बोलला 'औषधांची वेळ झाली सुधा '. गोळी हातावर टेकवत त्याने पाण्याचा ग्लास तिला दिला. पाण्याच्या घोटा सोबत दोघांमधील संवाद सुरू झाला-

सुधाः- समीर माझा शेवट मलाही माहित नाही. (तिचे शब्द खोडत)

समीरः- परत तुझे नकारात्मक विचार चालू झाले का.. सुधाः- नकारात्मक असे नाही रे समीर, मला बोलू दे - मी खूप आधीच ही वस्तुस्थिती स्वीकारली होती. तू शांतपणे विचार कर. तुझ्यापुढे तुझं अखंड आयुष्य पडलेलं आहे. तू सावर स्वतःला, तू दुसरा संसार थाट...

समीरः- सुधा, मला आयुष्यात जेवढे क्षण जगायचे आहेत ते फक्त तुझ्यासोबत जगायचे आहेत... जे स्वप्न बघेन ते तुझ्या डोळ्यांनी बघेन...आणि समीर सुधाच्या मांडीवर डोके ठेवून विसावला. दिवस उजाडला, समीर उठला. तरी सुद्धा नीपचित पडलेली होती. आवाज देऊन ही ती उठत नाही हे दिसताच तो घाबरला. त्याने तिला घेऊन दवाखान्याकडे धाव घेतली.

वर्तमान काळ.....

डॉक्टरांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर सुधा शुद्धीवर आली. समीरच्या जीवात जीव आला.. पण डॉक्टरांनी तिला त्यांच्या देखरेखी खाली दवाखान्यातच ठेवण्यास सांगितले. समीरच्या आईने सुधाच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांना विचारले

तेव्हा डॉक्टरांनी सांगितले नक्की किती दिवस सुधाला असं under observation ठेवावे लागेल हे मी ही confirm आत्ताच सांगू शकत नाही.

आता रोज समीर दवाखान्याच्या फेऱ्या मारत आहे... कधी हाफ डे तर कधी फुल डे ऑफिस करून तो तिची पराकोटीची काळजी घेत आहे. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसात ती जास्तीत जास्त कशी आनंदी राहील यासाठी त्याचे सर्व प्रयत्न चालू आहेत. पोटच्या मुलाप्रमाणे तो तिला घास भरवतो, तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा ही स्वतः पाळतो आहे... ऑफिस मधील गमती जमती सांगून तिला हसवतो आहे... त्याची ही होणारी तगमग सुधा उघड्या डोळ्यांनी पाहते, अनुभवते आहे... पण ती काहीच करु शकत नाही..

सकाळची वेळ....

सुधा शांत झोपलेली आहे. समोर बसलेला समीर तिच्या चेहऱ्याकडे एक टक बघत होता.. थोड्यावेळाने सुधाला जाग आली .. समोर समीरला बघून डबडबलेल्या डोळ्यांनी जणू संवाद सुरू झाला...

सुधाः- माझ्या अश्रृंना काहीच अर्थ नाही मला तुझ्या डोळ्यात व्हायचं आहे, अन हसता हसता निरोप घेऊन तुझ्या आयुष्यातून जायचं आहे....

समीरः- साद घालून बघ फक्त एकदाच समोर तुझ्या मी असेन मिटलेल्या पापण्यांच्या पडद्याआड तुला फक्त मीच दिसेन माझ्या शरीरातील आत्मा तू, प्राण माझा, जीवनाचा अर्थ तू तू ... आणि फक्त तू....

- सौ. अश्विनी केदार शिंदे.


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

10 Comments

  1. उत्तम शब्द रचना आणि भावना यांचा सुरेख संगम असलेली कथा, मानाच्या गाभाऱ्याला साद घालणारी शब्दसुमने आणि बरेच काही. तुमच्या लेखणीतून असेच नवीन प्रयोग उदयास येवोत ही इच्छा आणि
    आपल्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    ReplyDelete
  2. सुंदर कथा आहे ,
    भावस्पर्शी

    ReplyDelete
  3. Sunder shabda sangati. Heart touching,

    ReplyDelete
  4. खूप छान

    ReplyDelete
  5. Very heart touching story👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खुप छान कथा👌🏻

    ReplyDelete
  7. सुंदर कथा लिहिली गेली आहे.. नात्यातील भावविश्व छान मांडले गेले आहे.. खूप साऱ्या शुभेच्छा... पुढील असंख्य कथांसाठी बेस्ट wishes.....

    ReplyDelete
  8. Superb writing by writer Ashwini Shinde

    ReplyDelete
  9. भावनिक कथा होती, खूप सूंदर विषयाची मांडणी केली आहे.

    ReplyDelete
  10. Khupach chan, sunder, best luck for future, expected many more....

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box