निर्णय
परवीन कौसर
" अगं आई झोपली नाही का ग अजून? बघ किती वेळ झाला आहे.झोप येत नाही का तुला? काय झाले? काही दुखतंय का गं? थांब तुझे पाय चेपून देते नंतर तळव्यावर तेल लावते म्हणजे छान झोप येईल तुला." असे म्हणत शलाका ने आपल्या आईचे पाय चेपायला सुरुवात केली.
" नाही रे बाळा माझे पाय दुखत नाहीत." असे म्हणत आईने आपले पाय ओढून घेतले.
" मग का जागी अजून तू ? बघ रात्रीचे दोन वाजले आहेत.माझे प्रोजेक्ट वर्क सुरू आहे म्हणून मी स्टडी रुम मध्ये बसले होते तुझी झोपमोड होऊ नये म्हणून.पण तरीसुद्धा तू जागीच.अशाने तब्येत बिघडते गं." काळजीच्या स्वरात शलाका म्हणाली.
" अगं बाळे किती काळजी करशील माझी.जरा स्वतः ची काळजी घे स्वतःचा विचार कर.माझ काय गं पिकलं पान.आज न उद्या गळून पडणार.मी माझे आयुष्य जगले गं.पण मला तुझीच काळजी आहे गं." असे म्हणत आईने शलाकाच्या डोक्यावर हात फिरवला.
" मला काय झाले आहे.माझी मी मस्त मजेत आहे.तुम्ही दोघांनी मला इतके शिकवले की आज मी माझ्या पायावर उभी आहे.तुझा आणि बाबांचा सपोर्ट नसता तर आज मी एव्हढ्या मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत नसते आई.आज माझ्या जवळ काय नाही हे सांग.सगळे काही आहे.आपण कधी कोणासमोर हात पसरावयाचा नाही ही शिकवण तुझी आणि बाबांची.स्वावलंबनाचे धडे शिकवले तुम्ही.स्वताच्या सुखसुविधावर आवडीनिवडी वर तुम्ही आम्हा भावंडासाठी आमच्या भविष्यासाठी तिलांजली दिली हे काय मला माहित नाही का आई." शलाका म्हणाली.
" अगं हे सगळं ठिक आहे गं पण." आई पुढे काय बोलणार हे शलाकाला ठाऊक होते म्हणून तिने तिचे बोलणे मध्येच थांबवत म्हटले," पण बीन काही नाही.बघ दादा शिकून परदेशी नोकरी करत तिथेच स्थायिक झाला . तुझी मोठी सून आणि दोन गोंडस नातवंडे तिथे सुखात आहेत.ताईपण आपल्या संसारात रममाण आहे.एकच खंत म्हणजे बाबा आपल्याला सोडून लवकर गेले गं." असे म्हणत शलाका ने आपले पाणावलेले डोळे पुसत म्हटले ," आई तू झोप मी थोडे काम आहे ते पूर्ण करुन येते.सकाळी मला कोणत्याही परिस्थितीत हे प्रोजेक्ट पूर्ण करुन न्यायचे आहे." असे म्हणत शलाका ने बेडरुमची लाईट बंद करुन आपल्या स्टडी रुम मध्ये गेली.
आईला काही केल्या झोप येत नव्हती.ती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. तिच्या कानात आजची शेजारच्या बायकांची कुजबूज ऐकू येत होती. "शलाका चे वय वाढत गेलं तरीही तिच्या आईच्या डोळ्यात दिसत नाही का ? आपल्या स्वार्थापोटी तिचे लग्न करून दिले नाही . मुलगा अमेरिकेत आहे त्याच्याजवळ जाऊन रहायचे न." " छे हो सुने बरोबर कुठे पटत असेल यांचे.रोजची भांडणे नकोत म्हणून तर मुलगा पळाला अमेरिकेत." " लेकीचा गडगंज पैसा आहे राज्य करते ही ." ...
' नाही मी स्वार्थी नाही.मी तर शलाकाला लग्न कर म्हणून अजूनही सांगते पण ती ऐकत नाही.' असे मनात म्हणत आईने आपल्या कानावर हात ठेवले आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत ती आपल्या भुतकाळात गेली.
सुनील आणि सुशिला यांचे छोटेसे पण आनंदी कुटुंब.यांना तीन अपत्ये.एक मुलगा आणि दोन मुली.मुलगा श्रीकांत मुली शशी आणि शलाका.शलाका सर्वात लहान.सुनिल एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते तर सुशिला गृहिणी होती.सुनिलचा पगार तसा पाहिला तर कमीच होता पण खाऊन पिऊन सुखी परिवार होता. तिघा मुलांना चांगले संस्कार देत सुशिला ने वाढविले होते. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. श्रीकांतने इंजिनियरींग पूर्ण केले.त्याचे कॅम्पस प्लेसमेंट झाले.शशीने बी.कॉम पूर्ण केले तर शलाका ने बी.कॉम नंतर एम.बी.ए.ची डीग्री घेतली. तिघे मुले आपापल्या पायावर उभी राहिली.श्रीकांतसाठी काही मुलींची स्थळे येऊ लागली.यामध्येच नेहा नावाची मुलगी श्रीकांतसाठी पसंत करुन यांचे लग्न थाटामाटात पार पाडले. नेहापण इंजिनिअर होती.श्रीकांतच्या लग्नानंतर लगेचच शशीचेही चांगल्या घरात सरकारी नोकरी करत असलेल्या दिवाकर बरोबर लग्न झाले.
श्रीकांतचे लग्न झाले तेव्हा नवे नवे शशी सर्वांबरोबर नीट वागायची .पण नंतर मात्र तिने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली.अगदी शुल्लक कारणावरून वाद निर्माण करायची.शलाकाला घालून पाडून बोलायची.तेव्हा आई नेहाला काही बोलली तर शलाका आईलाच शांत बसवायची.एकेदिवशी काही कारण नसताना भांडण उरकून काढून नेहा आपल्या माहेरी निघून गेली.श्रीकांतने तिला घरी ये असे सांगितले तर ती म्हणाली मी परत त्या घरी पाऊल टाकणार नाही.तू दुसरे घर घे तेव्हाच मी येईन.पण श्रीकांतच्या मनाला ही गोष्ट पटली नाही.मग त्याने अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचे निर्णय घेतला.आणि तो अमेरिकेला नेहाला घेऊन निघून गेला.
आता घरी आईबाबा आणि शलाका तिघेच राहिले.शशी आधी मधी येऊन जायची. शलाका चे वय लग्नाचे झाले होते.तिच्यासाठी स्थळे येऊ लागली. " शलाका हे बघ हा फोटो बघ बर." आईने शलाका आॅफिसवरुन घरी आली तेव्हा तिच्या समोर एक मुलाचा फोटो ठेवला.
" आई मी लग्न करणार नाही.परत मला कोणाही मुलाचा फोटो दाखवू नकोस." शलाका म्हणाली. " अगं लग्न करणार नाही म्हणजे काय हे ." आई म्हणाली. " मी लग्न करून दुसऱ्या घरी गेले तर तुमचा सांभाळ कोण करणार.दादा तर अमेरिकेत आणि ताई आपल्या घरी." शलाका म्हणाली. " अगं आम्ही आहोत एकमेकांना." आई म्हणाली.
आता हे रोजच घडत असायचे.रविवारी सकाळी बाबा वॉकिंगला जाण्यासाठी तयार होत होते आणि त्यांना न जाणो कसे काय चक्कर आली आणि ते धाडकन जमिनीवर पडले. त्यांचा पडायच्या आवाजाने शलाका बाहेर पळतच आली. बघते तर बाबा जमीनीवर पडले होते.तिने बाबा असे जोरात ओरडले पण तिच्या बाबा या हाकेला प्रतिउत्तर आले नाही.
श्रीकांत बाबांचे बारा दिवस करून अमेरिकेला परत जाणार होता तेव्हा त्याने आपल्या आईला आपल्या बरोबर चल मी घेऊन जातो तुला असे म्हटले.पण आईने नकार दिला.श्रीकांत परत अमेरिकेत निघून गेला.बाबा गेल्यावर आई आता काहीशी अबोलच झाली.शलाका आपल्या आईला अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपू लागली.श्रीकांत आणि शशी आपापल्या संसारात रममाण होते.दोघांच्याही संसार वेलीवर दोन दोन फुले लागली होती.शलाका पण आपल्या कामात व्यस्त होती. तिच्या हुशारीने आणि प्रामाणिकपणाने काम करण्यामुळे तिला प्रमोशन मिळत गेले.ती मोठ्या हुद्द्यावर गेली.तिने मोठ्या सोसायटीत मोठा फ्लॅट घेतला.घरकामासाठी बाई कामाला ठेवली.सर्व काही छान सुरू होते.पण आईला मात्र एकच चिंता खात होती ती म्हणजे शलाका चे लग्न.आपण जिवंत आहोत तोपर्यंत तिचे लग्न झाले तर बरे होईल असे तिला वाटत होते पण शलाका मात्र लग्न करून घेण्यासाठी तयार नव्हती.तिला एकच काळजी होती ती म्हणजे आपल्या आईची.आई नेहमी तिला समजावयाची की मी काही तुला आयुष्यभर साथ देणार नाही. देवाघरून बोलावणे आले की मी जाणार तेव्हा तू एकटीच रहाशील.लग्न करून घे.एकदा का तुझा सुखाचा संसार बघितला की डोळे मिटायला मी मोकळी.पण शलाका काही केल्या ऐकायची नाही.आता तर शेजारीपाजारी पण टोमणे मारत होते.कधी कधी तर हे देखील म्हणायचे की आता हिला नवरा मिळाला तर एक तर विधूर किंवा ज्याने बायकोला घटस्फोट दिला आहे असेच मिळणार.या वयात कोण कोरा कुमार मिळेल.हे ऐकून आई खूप खचून जायची.
गणेशोत्सव सुरू झाला आणि त्यादिवशी आईला घेऊन शलाका गणपती दर्शनासाठी गणपती मंदिरात गेली. आईचा हात धरून तिने हळूहळू मंदिरात जाऊन दर्शन घेतले.आईने मनोमनी गणपती जवळ शलाकाच्या लग्नाचे बोलून घेतले.या दोघी दर्शन घेऊन परत फिरल्या इतक्यात," वहिनी अहो सुशिला वहिनी ." अशी जोराची हाक मारत एक महिला पळत पळत आली. या दोघी तिथेच थांबल्या." बरं झालं तुम्ही इथेच भेटलात.मी येणारच होते घरी तुमच्या .कशा आहात वहिनी तुम्ही?" असे म्हणत ती या दोघी मायलेकी समोर येऊन उभारली.
" कोण शिल्पा ? अगं कशी आहेस गं तू.किती दिवसांनी नाही तर वर्षांनी भेटतेस तू." आईने आनंदाने म्हटले." शलाका ओळखलेस का तू शिल्पाला.आपल्या जुन्या घराशेजारी होती ही रहायला." आई म्हणाली.
" वहिनी जरा तिथे बसुया का ? काही महत्त्वाचे बोलायचे आहे." शिल्पा म्हणाली. " हो हो चल तिथे समोर झाडाखाली सावलीत बसून बोलू." असे म्हणत सुशीला शलाकाचा हात धरून हळूहळू चालत जाऊन झाडाखाली सावलीत जाऊन बसली. " वहिनी मी सरळ विषयावरच बोलते.तुम्हाला माझी चुलत बहीण संजना आठवते का ? सुट्टी मध्ये आमच्या घरी येऊन राहायची. तुमच्या घरातील मोगऱ्याच्या झाडांची फुले न्यायची .आठवते का ?" शिल्पाने विचारले. " हो ग आठवते न. का गं आहे न ती बरी ?" सुशीला म्हणाली. " हो ती मस्त मजेत आहे.तिची मोठी नणंद वैष्णवी जी दिल्ली मध्ये आहे तिचा मोठा मुलगा नंदन लग्नाचा आहे. वैष्णवीला तीन मुले.एक मुलगा दोन मुली.दोघा मुलींची लग्ने झाली आहेत. तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा पासून ती थोडीशी अबोलच झाली आहे.जास्त कुणीकडे बाहेर जात नाही घरातच असते.कोणाबरोबर जास्त बोलत नाही आपल्या खोलीत असते.तसे पहायला गडगंज संपत्ती असलेले हे कुटुंब पण अगदी साधी राहणी आहे हो. यांचा स्वतःचा मोठा बिझनेस आहे.वडिलांच्या मृत्यू नंतर सर्व जवाबदारी नंदनने आपल्या वर घेतली. तो आपला फॅमिली बीझनेस सांभाळतो याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो आपल्या आईला अगदीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो.आता तसे बघायला त्याचे वय वाढत गेलं पण त्याने आपल्या आईसाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.त्याच्या बहिणींनी खूप समजावले पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता.आता काही दिवसांपूर्वी मी दिल्लीला गेले होते तेव्हा म्हटले वैष्णवी ताईंना भेटून यावे.तर त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला आपल्या नंदन साठी योग्य अशी मुलगी आहे का .मला याचीच काळजी आहे.यांच्या अचानक जाण्याने मी खूप खचले पण नंदन ने मात्र सर्व धुरा सांभाळली.माझी काळजी करतो अगदी लहान बाळासारखे जपतो तो मला.पण लग्न करून घेण्यासाठी तयार नाही. तू समजावून बघ त्याला.आणि एक मुलगी बघ ." असे म्हणत त्यांनी आपले थरथरणारे हात माझ्या हातावर ठेवले.ते हात खूप काही सांगून गेले. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर शलाकाच आली. मी लगेचच तिथून निघून नंदन जवळ गेले.त्याला शलाका बद्दल सांगितले.जसा तू आपल्या आईसाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तसाच तिनेही घेतला आहे.बघ विचार कर.हे ऐकून तो शलाकाला भेटायला तयार झाला आहे.पुढच्या आठवड्यात तो येईल इकडे.तेव्हा हे दोघे भेटू दे मग बघु ." शिल्पा म्हणाली.शिल्पाचे बोलणे ऐकून सुशिलाच्या डोळ्यात पाणी आले.तिने डबडबलेल्या डोळ्यांनी शलाकाला बघितले.
शिल्पाने म्हटल्याप्रमाणे नंदन शलाकाला भेटायला रविवारी आला.दोघेही एका रेस्टॉरंट मध्ये भेटायला गेले.नदंन दिसायला रुबाबदार कोणावरही छाप पडेल असे व्यक्तिमत्व.दोघांच्याही मनात फक्त आणि फक्त आपल्या आईसाठी विचार होता.नदंनने लग्नानंतर सुशिलाला आपल्या बरोबर दिल्लीला घेऊन जाऊ.दोघीही एकत्र राहतील.मी जावयीपेक्षा त्यांचा मुलगा म्हणून त्यांची काळजी घेईन असे म्हटले. हे ऐकून शलाकाचे डोळे पाणावले.पण याला आपली आई तयार होणार नाही असे म्हटले.नदंनने हे काम माझ्यावर सोपव मी आईंना तयार करतो असे म्हणत एक छानशी स्माईल दिली.त्यानंतर नंदन शलाकाच्या घरी आला.त्याने सुशिला समोर एक अट ठेवली की मी शलाका बरोबर लग्न करेन पण तुम्ही तिच्या बरोबर दिल्लीला आमच्या घरी येऊन राहायचे. सुशिला या अटीवर काहीशी गोंधळून गेली.तिला काहीच कळत नव्हते की काय करु.पण शेवटी तिला ही अट आपल्या लेकीसाठी मान्य करावी लागली.नदंनच्या रुपात तिला तिचा मुलगा मिळाला आणि वैष्णवीला एक जीवाभावाची मैत्रीण सुशिला मिळाली.
©® परवीन कौसर
बेंगलोर
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box