परिवर्तन - तनुजा प्रधान

 ●  परिवर्तन  ●

©तनुजा प्रधान.

नितांत सुंदर होती ती. कोकणातील एका छोट्याशा खेडेगावातून आलेली. बघता क्षणीच कळत होते की अतिशय भोळीभाबडी, निरागस होती. इतकी गोरी की उन्हाने लाल व्हायची तिची काया. निळे, घारे, टपोरे डोळे, लाल चुटुक जीवणी, छोटेसे धारधार नाक, उंचीला साधारण, मात्र चालताना पावले अगदी नाजूकपणे टाकणारी. शहरातील कॉलेजमध्ये येऊन बावचळलेली.

पहिल्या दिवशी बाबा व भाऊ आले होते सोडवायला. आदल्या दिवशीच त्यांनी हॉस्टेलमध्ये तिची व्यवस्थित सोय लावून तिला सेट करून दिले होते. तिला सोडवल्यावर साश्रु नयनांनी परत गेले होते. ते परत गेले म्हणून मुसमुसतच कॉलेजमध्ये प्रवेश केला होता तिने. डोळे पुसत पुसत चालत येत होती प्रवेशद्वारातून. कोणी आपल्याला बघेल, हसेल, हे तिच्या गावीच नव्हते. बरेच जणांनी, "कोण ही रडणारी बावळट मुलगी? कसले साधे कपडे घालून आलीये..." हेच बघितले.

त्यानेही गेटच्या कट्ट्यावर बसून सगळ्या मुलींना न्याहाळता न्याहाळता तिला बघितले. त्याची पारखी नजर नेहमीच नवीन नवीन सावज शोधत असायची. तिच्याकडे बघता क्षणीच त्याला कळले की ही कच्ची कळी आहे. तसा त्याच्यातला जनावर जागृत झाला. "पुढचे टार्गेट ठरले," स्वतःशी पुटपुटला. ताबडतोब उठून तिच्या जवळून चालायला लागला. "आर यू ओके?" त्याचे शब्द ऐकून तिने डोळे पुसत आवाजाच्या दिशेने बघितले. शेजारी तरणा बांड मुलगा होता तिच्या. एकदम गोरापान, पिळदार शरीर, सिल्की काळे केस, काळे टपोरे डोळे, बघता क्षणीच अगदी प्रत्येक मुलीच्या स्वप्नातला राजकुमार वाटावा असा.

असा राजकुमार आपल्याला येऊन विचारतोय आणि त्याचा रुमाल देतोय, हे बघून ती ओशाळली आणि लाजली देखील. डोळे पुसत म्हणाली, "हो हो मी ठीक आहे. बाबा आणि दादा परत गेले म्हणून थोडे रडू आले. आता मी एकटीच आहे ना इकडे." ती सगळे खरे बोलून गेली.

हे ऐकून तो एकदम खुश झाला. मनात म्हणाला, "चला, काम सोप्पे झाले!" तिला लगेच म्हणाला, "कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. मी कायम असेन तुझ्या सोबत. डोन्ट वरी!" त्याचे बोलणे ऐकून तिचा जीव भांड्यात पडला. आपल्यासोबत कोणी आहे, ही भावनाच उभारी देऊन गेली तिला. छानसे हसून म्हणाली, "थँक्स हं. किती चांगला आहेस तू!" आपला बाण योग्य ठिकाणी पोचला हे बघून तो ही खुश होऊन हसला.

मग काय विचारता तिच्या प्रत्येक क्लास मध्ये बसणे, तिला नोट्स काढून देणे, तिला खायला कॅन्टीनमध्ये नेणे, संध्याकाळी तिला होस्टेलवर सोडायला जाणे, तिला काय हवे नोको ते पाहणे, हे सगळे सुरू झाले. त्याची ती गुंतवणूक होती. गुंतवलेले मुद्दल व्याजासकट परत मिळवणार होता तो.

हळूहळू दिवस जात गेले. आधी मैत्री होती. मग एक दिवस तिला छानपैकी एका बागेत नेऊन फुलांचा गुच्छ देऊन तिला, "आय लव्ह यू," म्हणाला. कोकणातील एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या तिला खरेच वाटले त्याचे बोलणे. त्याचा पुष्पगुच्छ स्वीकारून, तिने पण त्याचावर आपले प्रेम असल्याचे कबूल केले. तो अगदीच खुश झाला कारण त्याचे काम अधिकच सोपे झाले.

आणि मग ती जे म्हणाली त्याने तर त्याला त्याचा डाव साधण्याची मोठी संधीच दिली. "पण मला माहित नाही प्रेम करतात म्हणजे काय करतात ते." त्याला अगदी सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळाल्याचा आनंद झाला. त्याने तिला लगेच सांगितले, "मी आहे ना? तू कशाला काळजी करतेस? मी शिकवेन ना तुला प्रेम करायला. येशील ना माझ्या सोबत? मी तुला प्रेमाची परिसीमा काय असते ते नक्की दाखवीन," असे म्हणून तिचा हात धरतो आणि दाबतो. आयुष्यात पहिल्यांदाच असा स्पर्श झालेली ती शरीरभर शहारून निघते आणि लाजतच हो म्हणते.

मग अजून काय हवे असते त्याला? तिला गच्च मिठी मारतो आणि हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवत पुढचा प्लॅन बनवू लागतो. सावज अलगद त्याच्या जाळ्यात अडकलेले असते. त्याचा मूड आत्ताच बनू लागतो; पण तो स्वतःला कसेबसे सावरतो. बरीच जोडपी असतात आजूबाजूला. मग तिला परत होस्टेलवर सोडतो.

रोज मग हळूहळू येता जाता ओझरते हाताचे स्पर्श, येताजाता तिच्या खांद्याला, दंडाला तर कधी पार्श्वभागाला स्पर्श करू लागतो. कधी हळूच तिच्या कमरेभोवती हात घालून तिला चालता चालता जवळ घेणे, पुढे हळूच हात सरकवून तिचे उदर हलकेच दाबणे असे प्रकार चालू होतात. कोणी नाही असे बघून हळूच तिच्या गालावर चुंबन करणे सुद्धा चालू होते. हे सगळे त्याचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून तो करतोय असे समजून ती लाजून जात असते, शरीरभर शहारून जात असते. तिला त्याचा येता जाता होणारा ओझरता स्पर्श सतत हवाहवासा वाटू लागतो. तो दिसला किंवा जवळ येऊ लागला की तिच्या हृदयाची धडधड वाढू लागते. आता तो आपल्याला कुठे कसा स्पर्श करेल आणि अंग अंग कसे शहारून निघेल ह्याची ती आसुसून वाट पाहू लागते.

ही केवळ शारीरिक ओढ आहे, ह्यात त्याचे प्रेम नाही, हे कळण्याइतकी तिच्यात प्रगल्भता आलेली नसते. ती अजूनही अल्लडच असते. आधी कधीच कोणीच तिच्याशी ह्याबद्दल बोललेले नसते. तिने आईला विचारले की आईने सुद्धा, "वेळ आली की समजेल तुला," असेच सांगितलेले असते. तिला बिचारीला, आपली प्रेम समजण्याची वेळ आली आहे म्हणून तर तो आपल्या प्रेमात पडला, असे वाटत असते. तिला काय माहित तिची कोणती वेळ जवळ आलेली असते..

तिला आज तो सरप्राईज ठिकाणी नेणार असतो. "आज तुला मी प्रेम कसे करतात ना ते दाखवतो. कदाचित थोडेसे विचित्र वाटेल; पण मी आहे ना काळजी करू नोकोस. मी सगळे सांभाळून घेईन हां शोना!" असे म्हणून तिच्या गालावरून हलक्या हाताने बोट फिरवतो. त्याचा तो स्पर्श तिला धुंद करतो. पुढे काय होणार याची यत्किंचितही कल्पना नसलेली ती, प्रेमाच्या मिलनाच्या नुसत्या स्वप्नमयी दुनियेत डोळे मिटून, शहारून हरवते. त्याच्या गोड बोलण्याला, त्याच्या त्या वयातल्या हव्याहव्याशा स्पर्शाला भुलते.

तिला माहीत नसते की हीच वाक्ये बोलून त्याच्या सऱ्हाईत हातांनी कितीतरी मुलींना चोळलेले असते. ते ही प्रेमाच्या नावावर. आणि मग इंटरेस्ट संपला की इन्कम्पँटिबिलिटी च्या नावाखाली सोडून दिलेले असते. इतका गोड बोल्या असतो की तो फसवत आहे हे कोणत्याही मुलीला कळले नव्हते. 

बिचारी तीसुद्धा खरेच आपल्यावर प्रेम करत आहे, असे समजून त्याच्या सोबत, तो प्रेम करायला शिकवणार असे म्हटल्यावर, ती जायला तयार होते. तो जितके आपल्यावर प्रेम करतो, तितकेच आपणही त्याला प्रेम देता आले पाहिजे, ह्या भोळ्याभाबड्या विचाराने, तिला त्याला भरभरून प्रेम द्यायचे असते. जगाच्या नियतीबद्दल काहीच माहिती नसणारी ती निःशंक होऊन त्याच्या सोबत निघते.

त्याला काय तेच हवे असते. तिला बाईकवर गच्च पकडून बसायला सांगतो. ती अजूनच त्या स्पर्शाने शहारून जाते आणि तो सुखावून जातो. मुद्दामहून जाता जाता खड्यातून बाईक नेणे, पटकन ब्रेक दाबणे असे प्रकार करत असतो, जेणेकरून ती त्याला अजून घट्ट पकडून बसेल. तिने काही बोलायच्या आतच तिला सांगतो की असे केल्याने प्रेम खूप वाढते आणि प्रेमाचा झरा सहजपणे वाहतो. बिचारी, काहीच कळत नाही तिला त्याच्या म्हणण्याचा खरा अर्थ. त्याच्या कविवर्य स्वप्नवत बोलण्याला भुलते आणि खरेच त्याला अजूनच घट्ट मिठी मारून बसते. त्यामुळे तो चांगलाच मूड मध्ये येतो. कधी एकदा पोचतोय असे होते त्याला.

त्याच्या नेहमीच्या स्पॉटवर घेऊन येतो. एक सुनसान टेकडी असते. खूप मोठाले गवत आणि भरपूर झाडी असते. शहरापासून दूर. शंभर कोसापर्यंत कोण चिठ्ठपाखरू नसते त्या ठिकाणी. तिथे गेल्यावर झाडाजवळ बाईक पार्क करून, तिचा हात हातात घेऊन चालू लागतो. हळूहळू त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती टाकून तिला आपल्या जवळ ओढून चालू लागतो. ती शहारते आणि लाजते. "इश्श, काय करतो आहेस?"

हलकेच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, "प्रेम करायला शिकवतोय." पुन्हा ती शहारून लाजून गप्प होते. पुढे माणूसभर उंच गवतात गेल्यावर हलकेच तिच्या ओठांवर किस करतो. तिचे ओठ थरथरतात. त्याच्या पारखी नजरेला लगेच कळते की तिने अद्याप कधीही किस केले नाही किंवा बघितले ही नाही. तो खूप खुश होता. आपल्याला हिरा सापडला आणि आपण त्याचे पारखी आहोत ह्याचे त्याला स्वतःचेच कौतुक वाटते. तो अजून डीप किस देत तिच्या गालांवरून, कानामागून, गळ्यावरून, मानेवरून, पाठीवरून आपल्या हाताची जादू करायला लागतो. ती तर पूर्णपणे बेधुंद होऊन गेलेली असते. प्रेम किती रोमांचक आहे असेच तिला वाटत असते.

हळूहळू त्याचे हात तिच्या छातीवरून फिरायला लागतात. तशी ती उसासे घ्यायला लागते. तो अजूनच मूडमध्ये येतो. तिला गवतात झोपवतो आणि किस करत करत तिच्या पायावरून हात फिरवू लागतो. हळूहळू त्याचे हात वरवर येऊ लागतात, तरी तिला समजत नाही. तिच्यासाठी हे फक्त प्रेम असल्याने ती त्याचा कोणताही विरोध करत नाही. तिच्या कमरेभोवती, नाभीभोवती, पोटावरुन, छातीवरून सगळीकडे त्याच्या हाताची व बोटांची जादू फिरत असते. ती बेधुंद होऊन त्याच्या प्रत्येक वासनांध स्पर्शाला स्वर्गसुख समजून अगदी तिच्याही नकळतपणे नैसर्गिकरित्या त्याला प्रतिसाद देऊ लागते. मग काय त्याचा मूड अगदी शिखरावर पोचतो. तिला सर्वांगावर किस करत हळूहळू तिचे कपडे उतरवू लागतो आणि आपल्या बोटांना आधी त्यांची जादू करू देतो. ती ही तिच्या नकळत पूर्णपणे मूड मध्ये आलेली असते.

ती स्वतःला त्याला पूर्णपणे स्वाधीन करून असते. त्यांचा संगम होणारच असतो की ती प्रेमाश्रूंनी भरलेल्या नयनांनी त्याला म्हणते, "आज पर्यंत इतक्या प्रेमळ स्पर्शाचा मी कधीच अनुभव घेतला नव्हता. किती प्रेम करतोस तू माझ्यावर. माझेही तुझ्यावर तितकेच प्रेम आहे. आयुष्यात कधीही मी तुला प्रेम कमी पडू देणार नाही. कायम तुझी काळजी घेईन," असे म्हणून त्याच्या कपाळावरून आणि गालांवरून ओंजळ करून प्रेमाने ती त्याला गोंजारते.

आई त्याच्या लहानपणीच वारल्याने असा प्रेमळ स्पर्श कित्येक वर्षात त्याने अनुभवलेला नसतो. तिचा प्रेमळ स्पर्श आणि तिचे बोलणे त्याच्या ऐकून त्याच्या हृदयात चर्रर्र होते. कित्येक वर्षांपासून बंद असलेला एक नाजूक कप्पा उघडतो. आई गेल्यावर सतत तो ह्या प्रेमळ स्पर्शाच्या शोधात असायचा. तो मिळावा म्हणून काय काय खोटे बोलून आपण किती मुलींना फसवले हे एका क्षणात त्याच्या समोरून तरळून जाते. त्याला स्वतःची प्रचंड लाज वाटते.

आणि आज आत्ता तोच प्रेमळ स्पर्श अनुभवून तो जागच्या जागी थिजतो. आपण हिला फसवत असूनही ही इतक्या भोळेपणाने आपल्यावर प्रेम करतेय आणि आपण इतक्या निरागस मुलीचा चोळामोळा करायला निघालो होतो, ह्याचा त्याला पश्चात्ताप व्हायला लागतो. ती आपल्यावर जिवापाड प्रेम करते, इतका विश्वास टाकते आपल्यावर, आपल्या सोबत आयुष्यभर राहायची स्वप्ने बघत आहे आणि हे शुद्ध प्रेम समजून न घेता, आपण ह्या कच्च्या कळीला उमलायच्या आधीच कुस्करून टाकणार होतो...छे छे छे...काय करायला जाणार होतो आपण... ह्या सगळ्या विचारांची गर्दी होते त्याच्या मनात. प्रचंड अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्याच्याही नकळत डोळे भरून येतात त्याचे.

तिच्या गालांवरून अतिशय प्रेमाने हात फिरवत, सद्गदित होऊन तिला म्हणतो, "तुझा तो प्रेमळ, निरागस स्पर्श, तो मायाळू स्पर्श हवाय मला आयुष्यभर... तुझे खरे प्रेम हवे आहे मला आयुष्यभर...तुला काहीही होऊ देणार नाही मी...जिवापाड जपेन मी तुला..आई शप्पथ...आजच्या नंतर चुकूनही तुला दुखावणार नाही," असे म्हणून तो तसाच तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागतो. अगदी लहान मुलाप्रमाणे रडू लागतो. इतकी वर्षे साचलेले दुःख जणू बाहेर पडत असते.

"अरे पण राजा, तू कुठे काय मला दुःख दिलेस? तू तर कायमच मला जपत आला आहेस, अगदी पहिल्या दिवसापासून! मग असे नाही वाटून घ्यायचे बरं! आणि तूच तर मला प्रेम करायला शिकवले की! इतके प्रेम केलेस माझ्यावर आजपर्यंत, म्हणून तर मी ही प्रेम करायला शिकले!" असे म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवून हलकेच थोपटते त्याला. ह्याच प्रेमासाठी आसुसलेला असतो तो. "तू आयुष्यभर अशीच थोपटत रहा मला," असे तिला म्हणतो. ती ही स्वाभाविकपणे त्याच्या कपाळाचा मुका घेते आणि त्याला परत थोपटत राहते.

तो हळूहळू शांत होतो. तसे ती त्याचे डोळे पुसते, उठून बसून त्याचे डोके आपल्या मांडीवर घेते आणि हलकेच त्याच्या सुळसुळीत केसांमधून आपली बोटे फिरवू लागते. "किती निरागस, प्रेमळ स्पर्श आहे तुझा! असेच प्रेम करत राहशील ना माझ्यावर?" तो परत साश्रु नयनांनी तिच्याकडे बघून विचारतो.

ती हसून म्हणते, "कोई शक?!" ह्यावर दोघेही हसतात. तिला खूप बरे वाटते. "हसला माझा राजा एकदाचा! काय झाले होते अचानक तुला? हीच का ती प्रेमाची परिसीमा म्हणतात ती?" तिचा भोळाभाबडा प्रश्न!

तिचे बोलणे ऐकून तो उठून बसतो. तिला आपल्या कुशीत घेतो आणि गच्च मिठी मारतो. ती लाजून जाते अगदी. मग तिला म्हणतो, "आत्ता पुरती हीच आहे प्रेमाची परिसीमा. बाकी तुला लग्नानंतर शिकवतो!" ती लाजून तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवते.

©तनुजा प्रधान.

disclaimer 
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments