पोर्ट्रेट - सायली वझे पानसे

पोर्ट्रेट

सायली वझे पानसे

खूप दिवसानंतर सई  जरा खुशीत होती. सकाळी लवकर उठून आवरुन बसली होती.  त्या दिवशी तिच्या शाळेचं गॅदरिंग होतं. सईच्या बाईंनीं  एका डान्स मधे घेतलं होतं तिला. सई, समीर - स्वातीची एकुलती एक मुलगी, वय वर्ष ६ फक्त. कोरोना काळात फक्त ताप यायचं निमित्त झालं आणि आठवडाभरात समीर, स्वाती आणि सईला कायमचा सोडून गेला. समीर, स्वाती दोघांचेही आईवडिल त्यांच्या लहानपणीच गेल्यामुळे त्यांना जवळचे असे कोणी नातेवाईकच नव्हते. त्यामुळे समीर गेल्यावर आता स्वाती आणि सईच होत्या एकमेकींसाठी. सई खरंतर खुप लहान होती पण परिस्थितिने तिला खूप लवकरच मोठं केलं होतं. अजिबात कसलाही हट्ट नाही की त्रास नाही, अगदी शहाण्यासारखं वागायची मात्र खूप गप्प गप्प असायची.स्वाती एका आयटी कंपनीत कामाला होती. सुदैवाने तिला घरून काम करायची परवानगी असल्यामुळे मदतनीस मावशींच्या मदतीने तिला सईचे रुटीन सांभाळून काम करणं शक्य होत होतं. लग्नानंतर काहीच वर्षात समीर गेल्यामुळे तिला नोकरीं करणंच भाग होतं. त्या दिवशी  स्वातीने सुट्टीच घेतली होती.

तर दुसरीकडे अनिरुद्ध आणि त्याची छोटी मुलगी अवनी हेही अगदी एकटे पडले होते. अनिरुद्ध ची पत्नी अश्विनी डॉक्टर होती. कोरोना काळात तिला रोज हॉस्पिटल मधे जावं लागत होतं. कित्येक कोविड पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे काळजी घेऊनही तिला कोविड झाला आणि त्यात ती गेली. अनिरुद्ध चे आईवडील गावी होते. अश्विनी चे आईवडिल तर पार कोलमडून गेले. स्वतःचं दुःख बाजूला ठेऊन अनिरुद्ध ला सासुसासरे आणि जेमतेम ६ वर्षांच्या अवनी साठी उभं राहायचं होतं. अनिरुद्ध एक कसलेला चित्रकार होता. मोठमोठे लोक त्याची चित्र विकत घ्यायचे. जेव्हा जेव्हा त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरायचं, लोकांची तुडुंब गर्दी व्हायची इतकी सुंदर चित्र असायची त्याची. अश्विनी गेल्यापासून मात्र त्याचं मनच लागत नव्हतं.  तो लेकीसाठी चेहेरा हसरा ठेवायचा प्रयत्न करत असे . त्या दिवशी अवनीच्याही शाळेचं गॅदरिंग होतं. अवनीही एका डान्स मधे परफॉर्म करणार होती. अवनीचा थोडाफार मेकअप, केसांचा जूट्टू अनिरुद्ध जसं जमेल तसं करत होता.
" अरे बाबा, हॆ जूट्टू सैल झालंय रे, घट्ट बांध अजून. थांब मी मदत करते तुला.", असं म्हणत अवनीने दातात रबरबँड ताणून धरला. "वयाच्या मानाने किती लहान वयात स्वावलंबी झाली माझी लेक.", अनिरुद्ध च्या मनात आले आणि डोळ्यात हलकेच पाणी आलं त्याच्या. अवनीच्या लक्षात आल्यावर तिनेच तिच्या मऊ मऊ हातांनी बाबाचे डोळे पुसले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. " बाबा, चल लवकर. माझा डान्स पहिल्या तीन मधेच आहे. ", अवनी बाबाला म्हणाली. अनिरुद्ध ने गाडी काढली आणि दोघंही शाळेत पोहोचले.

शाळेत पोहोचले तेव्हा खूप गर्दी होती. भाग घेतलेल्या प्रत्येक मुलामुलीचे आईवडील दोघंही आले होते कौतुक बघायला. सईने जेव्हा हॆ पाहिलं, तिला बाबाची खूप आठवण आली. " आई, फक्त माझेच बाबा नाहीत. ", सई स्वातीला म्हणाली. स्वाती तिला समजावणार इतक्यात मागुन आवाज आला, " आणि माझी आई नाही. हो ना रे बाबा? ", तो अवनीचा आवाज होता. दोघी एकाच डान्स मधे होत्या.

एकाच इयत्तेत असल्या तरी वेगळ्या तुकडीत असल्या कारणाने त्यांची आधी फारशी गट्टी नव्हती पण डान्स प्रॅक्टिस च्या निमित्ताने बराच वेळ एकत्र असल्यामुळे त्या दोघींची आता चांगलीच गट्टी जमली होती. म्हणूनच दोघींना भेटल्यावर खूप आनंद झाला.

" हाय , मी अवनीचा बाबा, अनिरुद्ध कुलकर्णी.", स्वातीकडे बघत अनिरुद्ध म्हणाला. " हॅलो, मी सईची आई, स्वाती नाईक. " स्वातीनेही स्वतःची ओळख करुन दिली.  " मुली खूपच एक्सायटेड आहेत. खूप दिवस झाले प्रॅक्टिस सुरु आहे. छान वाटलं, त्या निमित्ताने आज ओळख झाली आपली. चला बसून घेऊया का आपण? ", अनिरुद्ध स्वातीला म्हणाला. " हो हो, प्लिज तुम्ही रेकॉर्डिंग कराल का तुमच्या फोन मधे? माझ्या फोनच्या कॅमेराचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ", स्वाती म्हणाली. " हो त्यात काय, मी करीन ना रेकॉर्डिंग आणि नंतर पाठवतो तुम्हाला. ", अनिरुद्ध म्हणाला आणि तो स्टेजजवळ जाऊन बसला.

दोघींचा डान्स खूप छान झाला. गॅदरिंग संपल्यावर अनिरुद्धने स्वातीला रेकॉर्डिंग दाखवले आणि स्वातीचा नंबर घेऊन तिला पाठवले. एकमेकांचे निरोप घेऊन ते घरी परतले.

दोघांची घरं इतकीही जवळ नव्हती त्यामुळेच आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा सई आणि अवनी फोनवर एकमेकींशी बोलत होत्या . लेकींमुळे का होईना अनिरुद्ध आणि स्वातीचंही अधेमधे थोडंफार बोलणं होत होतं. दोघांचं कामाचं स्वरुप अगदीच भिन्न असलं तरी 'सिंगल पेरेंट ' हा धागा त्यांना बोलतं करत होता.

गॅदरिंग नंतर लगेचच शनिवार रविवार आल्यामुळे शाळेला सुट्टी होती. फोनवर बोलता बोलता अवनीने सईला जवळच्याच मनोरंजन नगरी मधे बाबांबरोबर जाणार असल्याचं सांगितलं.  कधीनव्हे ते सई स्वातीच्या मागे लागली मनोरंजन नगरीला घेऊन चल म्हणून. सुरुवातीला स्वातीने खूप आढेवेढे घेतले पण नंतर सईच्या लाघवी चेहेऱ्याकडे बघून ती तयार झाली.

शनिवारी संध्याकाळी जरा ऊन उतरल्यावर चौघेही मनोरंजन नगरीच्या दाराशी भेटले. सई आणि अवनी खूप खुश होत्या. स्वाती आणि अनिरुद्ध मात्र जरा अवघडले होते. जायन्ट व्हिल बघून सई आणि अवनी दोघी, त्यात बसायचं म्हणू लागल्या. स्वाती मात्र नाही नाही म्हणू लागली. अनिरुद्ध म्हणाला, " चला हो, का नाही म्हणताय? " स्वातीने सांगितलं, " नाही मला गरगरतं, तुम्ही जा हवं तर. मी इथे बसते. " अनिरुद्धला एक क्षण अश्विनीच बोलतीये असा भास झाला. अश्विनी पण खूप घाबरायची अशा राईड मधे बसायला . स्वातीकडे बघत असतानाच अवनी म्हणाली, " बाबा चल ना रे लवकर. सईपण येतीये आपल्याबरोबर. "  " लेट्स गो गल्स, " अनिरुद्ध दोघींचा हात धरून निघाला. स्वाती त्याच्या पाठमोऱ्या छबीकडे पाहत राहिली. निळी जीन्स, स्काय ब्लु टीशर्ट घातलेल्या अनिरुद्ध कडे बघताना तिला समीर ची खूप आठवण आली.

राईड संपल्यावर अवनी आणि सई उड्या मारत, हसत खिदळत स्वातीपाशी आल्या. मागोमाग अनिरुद्धही आला. आता मुलींना डायनोसर ट्रेन राईड मधे बसायचं होतं. ती राईड फारशी अवघड नसल्याने स्वातीही तयार झाली. सई आणि अवनी एकत्र बसल्या आणि स्वाती आणि अनिरुद्ध. दोघंही थोडेसे संकोचत होते. चढताना अनिरुद्ध ने स्वातीला हात दिला. स्वातीही पटकन त्याच्या आधाराने चढली. दोघांचा हा पहिलाच निसटता स्पर्श. स्वाती शहारली. दोघं एकमेकांशेजारी बसली. राईड सुरु होताना एकदम जर्क बसल्यामुळे स्वातीने घाबरुन अनिरुद्ध चा हात धरला. त्यानेही 'रिलॅक्स' म्हणत तिला सावरलं. तिला तो हात खूप आश्वासक वाटला. काही क्षण एकदम शांततेत गेले. दोघंही एकमेकांकडे बघत होते. तितक्यात राईड सुरु झाली. पुढेच बसलेल्या लेकींच्या आवाजाने दोघं भानावर आले. मुलींनी ही राईडदेखील एन्जॉय केली. पुढच्या काही राईड्स साठी फक्त मुलीच गेल्या. स्वाती आणि अनिरुद्ध तिथल्याच एका बेंच वर बसले. दोघांचं फोनवर बोलणं होतं असलं तरी समीर आणि अश्विनीबद्दल मोघमच माहित होतं.

स्वातीने समीरबद्दल तर अनिरुद्धने अश्विनीबद्दल एकमेकांना सांगितलं. दोघांचेही डोळे आठवणींनी दाटून आले होते. आज कित्येक दिवसानंतर दोघं कोणाशीतरी असं भरभरून बोलत होते. नंतर थोडा वेळ फक्त शांतता होती. न बोलताही दोघं खूप काही बोलत होते. त्या क्षणी अनिरुद्ध च्या कुशीत शिरुन भावनांना वाट करुन द्यावी असं स्वातीला वाटलं. पण मग परत तिचं तिलाच कसंतरी वाटलं. अनिरुद्धने स्वातीचा हात हातात घेत तिला हलकेच थोपटलं. " एकमेकांचे दुःख आपण चांगलंच समजू शकतो. मला तुमचा चांगला मित्रा समजा . मित्राच्या नात्याने सांगतोय मला 'ए अनिरुद्ध ' म्हणा . ", अनिरुद्ध म्हणाला. स्वाती म्हणाली,"  मित्र म्हणतोस ना मग तुही आतापासून मला ' ए स्वाती ' म्हण. "  आता दोघेही बऱ्यापैकी कंफर्टेबल झाले होते.

मुलींचं खेळून झालं तेव्हा साधारण ७ वाजले होते संध्याकाळचे. त्यांना खुप भूक लागली होती. जवळच्याच रेस्टोरंट मधे खाऊन घरी जाऊ असं ठरलं. पावभाजी, डोसा वगैरे खाऊन झाल्यावर  स्वातीने अनिरुद्धकडे बघत " कॉफी? " विचारले. अनिरुद्धने संमतीदर्शक मान हलवताच, ' दोन  कॅफे लाते  ' ऑर्डर दिली. ऑर्डर देताच अनिरुद्धने एकदम आश्चर्याने स्वातीकडे बघितलं. " तुला कसं माहिती मला कॅफे लाते आवडते? ", अनिरुद्ध विचारत असताना स्वातीच्या लक्षात आले,  " अरे आपण चुकून समीर ला आवडायची तिच कॉफी सांगितली. अनिरुद्धलाही हीच कॉफी आवडते." काय झालंय ते दोघांच्याही लक्षात आलं. एक क्षण एकदम शांतता पसरली. नंतर मात्र भरपूर गप्पा मारत, हसत चौघेही तिथून बाहेर पडले. अवनी आणि सईसाठी तर तो दिवस खूप आनंदाचा होता.
पुढच्याच आठवड्यात अश्विनीचे आईवडील घरी आल्याचे अनिरुद्धने स्वातीला कळवले. आजी आजोबा आल्यामुळे अवनीची स्वारी खुश होती. तरीही ती सई आणि स्वातीला खुप मिस करत होती. अवनीने स्वातीला फोन करुन निदान सईला तरी त्यांच्या घरी खेळायला सोडायला सांगितले. स्वाती कामाच्या गडबडीत असल्यामुळे तिने तिच्या मदतनीस मावशींना सईला अवनीकडे सोडायला सांगितले. अवनी तिथे खूप रमली. आजीआजोबांचं प्रेम ती प्रथमच अनुभवत होती. आजीआजोबा आणि अवनी, सई खूप धमाल करत होते. संध्याकाळी ऑफिसचं काम संपवून स्वाती अवनीला आणायला निघाली. कार घेऊन निघणार इतक्यात तिने पाहिलं, कारचं टायर पंक्चर झालं होतं. रिक्षेने अनिरुद्धच्या घरी पोहोचली. अश्विनीचे आईवडील खूपच अगत्याने तिची विचारपूस करत होते. "तुला बघून आम्हाला आशुची खूप आठवण आली. ", असं म्हणत खूप हळवे झाले तेव्हा स्वातीही भावुक झाली.

"सईला आजचा दिवस इथेच राहूदे ना उद्या तसंही सुट्टीच आहे स्कुलला .", अवनी म्हणत होती. अवनीला पण राहायची खूप इच्छा होती. आजीआजोबांनी जोर धरल्यावर स्वातीही तयार झाली. " मी निघते मग. ", असं म्हणत तिने हळूच अनिरुद्ध कडे पाहिले. आजीआजोबांच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट बरोबर हेरली. " एकटी कुठे निघालीस, थांब अनिरुद्ध येईल सोडायला.", आजीआजोबांनी असं म्हणायचा अवकाश अनिरुद्ध गाडी काढून तयार होता. निघताना 'मम्मा' म्हणत सई येऊन चिकटली. स्वातीच्या गालाची पप्पी घेत तिला गुडनाईट केलं. सईच्या मागे उभं राहून अवनी हॆ सगळं बघत होती. स्वातीने तिलाही जवळ घेतलं. तिच्या  गालावर ओठ टेकवले. अवनीचा आनंद तिच्या डोळ्यात वाचता येत होता. ते बघून अनिरुद्धही खुश झाला. अवनीनेही तिला गुडनाईट म्हणलं.

"चला मॅडम निघायचं का? ", अनिरुद्ध म्हणाला. स्वाती गाडीत बसली. गाडी सुरु झाली. अनिरुद्धने तिच्याकडे फक्त बघितलं आणि तिलाही त्याने काही न बोलताच समजलं. " कॉफी राईट? ", तिने विचारलं. " येस. ", अनिरुद्ध म्हणाला. अनिरुद्धने गाडी थांबावली. दोघंही गाडीतून उतरले. जवळच्याच कॉफीशॉप च्या दिशेने चालू लागले. दोघंही शांतपणे चालत होते.अनिरुद्धने स्वातीचा हात हातात घेतला. ती देखील त्याच्या जवळ सरकली. एकमेकांना घट्ट मिठी मारावी असं दोघांनाही वाटत होतं पण दोघांनीही भावना आवरल्या.

" कॅफे लाते वन बाय टू ", अनिरुद्धने ऑर्डर दिली. अनिरुद्धने थेट आता विषयालाच हात घातला. " सी स्वाती, आपण दोघं खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोतच. त्यापुढेही जाऊन मी तुला विचारतोय, विल यू मॅरी मी? माझा आणि अवनीचा स्वीकार करशील?  अवनी तुझ्या सहवासात असताना किती खुश असते हॆ पाहिलंय मी. तिने मनोमन तुला आई मानलंय. मला मान्य आहे आपण दोघंही आपापल्या पार्टनर्स ना इतक्या सहजासहजी नाही विसरु शकणार. आपण त्यांची जागा नक्कीच नाही भरुन काढू शकणार पण त्यांच्यासारखं प्रेम तर नक्कीच देऊ शकतो. त्यांच्या आठवणीत झुरण्यापेक्षा,  आठवणी बरोबर घेऊन पुढे जाणं जास्त योग्य नाही का?
मी सईला माझी मुलगीच समजतो. तुम्हा दोघींना मी खूप प्रेम देईन आणि तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभा राहीन. तुला जर असं वाटत असेल की मी चुकतोय तर बिनधास्त सांग. आपली मैत्री तशीच राहील कायम, निश्चिन्त रहा. "

स्वाती म्हणाली, " खरं सांगू, मलाही असं अजिबात वाटलं नव्हतं, समीर गेल्यावर मी इतर कोणाचा विचार करु शकीन . इतकं मोकळेपणाने कोणाशी बोलीन, पण तू खूप चांगला मित्र आहेस माझा. फक्त एक वाटतंय, मी लग्न केलं तुझ्याशी तर तो माझा स्वार्थीपणा होईल का रे?  अवनी तर तुला बाबाच्या जागीच बघते. माझं म्हणशील तर माझ्यासाठी जशी सई तशीच अवनी. पण तरीही... सईला काय वाटेल? "

" तू एकदा सईशी बोल, शांतपणे विचार कर. अवनीच्या मनात काय चाललंय आहे हॆ मी इंडिरेक्टली तिला विचारलंय. ", अनिरुद्ध तिला म्हणाला.

"तू आणि अवनी बरोबर असताना मी सईला खळखळून हसताना पाहिलंय, नाहीतर अगदीच बिचारं झालं होतं रे माझं लेकरु. सगळं पटतंय मला, तरीही एकदा सईशी बोलायला हवं.", स्वाती म्हणाली.

कॉफी पीत पीत अनिरुद्ध म्हणाला, " आजची कॉफी बोलून गेली खूप काही, नक्की कॉफी स्ट्रॉंग होती की आणखी काही!'". स्वाती लाजरीच हसली.

दोघंही गाडीत येऊन बसले. अनिरुद्ध ने स्वातीच्या कपाळावर रुळलेले केस हलकेच बाजूला केले आणि तिच्या कपाळावर ओठ ठेकवले. स्वाती त्याच्या मिठीत विसावली. तिने विचारलं " अनि, चालेल नं अनि म्हणलेलं, मला सांग तुझ्या आईबाबांना आणि अश्विनीच्या आईबाबांना काय वाटेल रे? "

"आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, अनिच म्हण मला. आता ऐक. माझेच आईबाबा नाही तर आशुचे आईबाबा पण मागे लागले होते माझ्या, लग्न कर म्हणून. त्यांनाही माहितीये गं,  कोणीतरी जवळचं, आपलं हक्काचं माणूस हवंच. त्यांना मी सांगितलं होतं, मी लग्न करीन पण माझ्या लेकीला जी स्वीकारेल तिच्याशीच, आणि तिने  स्वीकारलंय हॆ मला आतून वाटलं पाहिजे. " अनिरुद्ध सांगत असताना स्वातीचे डोळे भरले.

काही वेळातच ते स्वातीच्या घरी पोहोचले. " उद्या सकाळी सईला घरी सोडतो. तेव्हा तिच्याशी बोल. बाय द वे, काहीही निर्णय असला तरी उद्या संध्याकाळी 'कलादालन' ला सईला घेऊन तू येणारेस. मी वाट बघतोय. बाय गुडनाईट ", अनिरुद्ध निघाला.

खूप वेळ विचार करुन, कूस बदलत पहाटे स्वातीला डोळा लागला. तरीही लवकर उठून, आवरुन तिने लॉगिन केलं.त्या दिवशी तिला ऑफिसचं काम लवकर संपवायचं होतं. संध्याकाळी 'कलादालन' ला जायचं होतं.
आजोबांनी सकाळी सईला घरी सोडलं.

काम लवकर संपवून स्वातीने सईला तयार केलं. आजीआजोबा अवनीला घेऊन परस्पर 'कलादालन' ला पोहोचणार होते. समीर गेल्यानंतर  प्रथमच स्वाती छान तयार झाली होती. शिफॉन ची साडी, स्लीवलेस ब्लाउज आणि अगदी हलका मेकअप केला होता तिने. खूप सुंदर दिसत होती. दोघीही अगदी वेळेत पोहोचल्या. अवनी आणि आजीआजोबा थोडं आधीच तिथे पोहोचले होते . स्वाती त्यांच्या दिशेने निघाली तरी तिचे डोळे मात्र अनिला शोधत होते. तितक्यात समोरून अनि येताना दिसला. सई  'बाबा ' म्हणत धावत त्याला जाऊन बिलगली. तर अवनी 'मम्मा ' म्हणत स्वातीला येऊन चिकटली. अनिला उत्तर मिळालं होतं.

'कलादालन' मधे अनिरुद्ध च्या चित्रांचं खूप मोठं प्रदर्शन भरलं होतं. देशविदेशातील लोक जमले होते. सगळे त्याचं खूप कौतुक करत होते, त्याची चित्र विकत घेत होते. आज अनिरुद्धचे आईवडील सुद्धा तिथे आले होते. अनिरुद्धने आईवडील, आशुचे आईवडील, स्वाती आणि सई- अवनीला एका कोपऱ्यात बोलावलं. तिथे एक मोठं पोस्टर होतं. त्यावर पडदा होता. तो पडदा बाजूला सारत अनि म्हणाला, " माझ्या दृष्टीने सगळ्यात सुंदर पोर्ट्रेट हेच आहे. सगळ्यात सुंदर बायको आणि दोन गोड लेकींसाठी सरप्राईज! "

त्या चौघांचं रेस्टोरंट मधे आनंद लुटतानाचं पोर्ट्रेट होतं ते! अचानक बॅकग्राऊंड मधे गाणं सुरु झालं,
इत्ती सी हंसी
इत्ती सी हंसी
इत्ता सा टुकड़ा चाँद का
ख्वाबों के तिनकों से
चल बनाएं आशियाँ.

सायली वझे पानसे
पुणे



disclaimer 
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments