मसाला चिंच
दिलीपकुमार हरी फडके.
“यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकिम्..........”
गुरुजींनी मंत्र म्हटला आणि वडाच्या पूजेची सांगता झाली. सुहासिनीनी वडाला प्रदक्षिणा पूर्ण केलीआणि गुरुजींच्याही पायावर डोकं ठेवलं. समोर दक्षिणा ठेवली. कुणाला सौभाग्यवती भव, कुणाला पुत्रप्राप्ती भव गुरुजींनी भरभरून सर्वाना आशीर्वाद दिले. पारावरची सर्व गर्दी संपत आली. ताराने ही सर्वात शेवटी वडाला एक प्रदक्षिणा केली, हात जोडले आणि ती गुरुजींनाही नमस्कार करण्यासाठी खाली वाकली.
“तारा तू नको नमस्कार करू, तुला माझे सतत आशीर्वाद आहेत. आणि तशीही तुझा नमस्कार घेण्याची लायकी नाही ग माझी”
“अरे ज्या गुरुजींनी पूजा सांगितली त्यांना माझा नमस्कार आहे असं समज हवतर. पण आज गुरुजी समोर ठेवायला दक्षिणा म्हणून काहीच नाही रे, मोठ्या मुश्किलीने एक रुपया बाजूला करून ठेवला होता, तोही आज सकाळी गेला. पण हे बघ, मी तुला वेगळीच दक्षिण आणलीय.’
असं म्हणून तिने पदराला बांधलेली पुरचुंडी सोडली आणि त्यातली छोटी पुडी गणूच्या हातावर दिली.
“पुत्रवती भव” सवयीने शब्द बाहेर पडले. आणि ताराच्या डोळ्यातली दोन गरम आसवं गणूच्या उघड्या पायावर ओघळली.
“अरे बघ तरी पुडी सोडून”
“काय आणल आहेस?”
“पहा तर खरं”
गणूने पुडी सोडली. आत होती एक अमूल्य भेट. मसाला चिंच. चिंच गुळ आणि गोडा मसाला एकत्र कुटून तयार केलेले आंबट गोड मसाला चिंचेचे लाडू. गणूला लहानपणी फार आवडायचे, त्याने पटकन एक गोळा तोंडात टाकला.
गणू ने पारावरील विडे, दक्षिणा, तांदूळ, डाळ, नारळ सर्व एकत्र केलं. एका पिशवीत भरलं आणि साश्रू नयनांनी ती भरलेली पिशवी ताराच्या हातात दिली.
“अरे नको, यावेळी आहे घरी.”
“मला माहित आहे, घे आणि नीघ”
ताराने रडवेलेल्या चेहऱ्याने पिशवी हातात घेतली आणि ती घरचा रस्ता चालू लागली. पायऱ्या उतरणारा तिच्या देहाकृतीकडे गणू पाहत होता. मनात विचार आणि भावनांचा दीर्घ कल्लोळ लोटला होता. चित्रपटातील दृश्या प्रमाणे एक एक चौकट त्याच्या डोळ्यासमोर सरकत होती.
गणूचं हे मामाचं गाव. त्याचं खरं गाव खाली खलाटपट्टीत होतं. एका पापभिरू, सत्पात्री ब्राह्मणाच्या पोटी गणून जन्म घेतला होता, आणि सहा महिन्यातच गणू पोरका झाला होता. या पोरक्या गणूची सर्व जबाबदारी आता मामावरच होती. मामी मोठी मायाळू. तिची स्वतःची कूस मोकळीच होती. तिने गणूला आपला मुलगा म्हणून वाढवला.
मामाची थोडी काजूची झाडं होती, आणि घराखाली थोडीशी शेतजमीन. ती खंडाने दिली होती. येणाऱ्या भातात तिघांचे वर्ष बऱ्यापैकी जायचं. मामाच्या आता वय झालं होतं. त्यातच देवळातल्या भाविणीचा तो नादी होता. मामाने बरीच इस्टेट या भाविणी पायी घालवली होती. घराण्याचा गुण असावा दुसरा काय? मामी मात्र सच्छील, निर्मळ आणि शांत वृत्तीची स्त्री होती. मामाच्या अशा नादापायी तिची कूस रिकामीच राहिली होती. आणि म्हणूनच रामेश्वरांना दिलेला हा प्रसाद म्हणून ती गणूचा सांभाळ करत होती. तिचा गणेश वर जीव होता. अनेक व्याधींनी जर्जर होऊन मामा शेवटी हे जग सोडून गेला. गणू दहा-बारा वर्षाचा असेल. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शेजारच्या गावातील धाक्रस गुरुजींकडे एकपाठी गणू थोडी भिक्षुकी शिकला. कसंतरी दहावीपर्यंत शिक्षण केलं आणि तो गावात भिक्षुकी करू लागला.
मामीकडे भांडी घासण्यासाठी एक म्हातारी पूर्वापार यायची. मामीला ही आता घरातलं सारवण, गाईचं शेण काढणं, दूध काढण्याचे झेपत नसे. म्हातारी ते सर्व सवडी सवडीने करायची. तिचाही नवरा असाच अति दारू पिऊन गेलेला. तीला एक मुलगी होती. गणूच्या वयाची. सावळी पण नाकीडोळी सुरेख. काळेभोर टपोरे डोळे, लांब सडक केस, काहीसे मोठे उंच नाक आणि गुलाबी ओठांची छोटीशी जीवणी. हसली की कुंद जणू कुंदकळ्या चमकायच्या. ती ही शाळेतून आली की मामीकडे म्हातारीच्या मागे मागे असायची. बरेच वेळा….
दोघांचं दुपारचे जेवणही मामीकडेच व्हायचं. गणू आणि ही मुलगी तारका म्हणजे तारा एकत्र खेळायचे, झोपाळ्यावर बसून कविता म्हणायचे. गणू एक-दोन इयत्ता पुढे असावा. गणू तसा लाजरा बुजरा नेमस्त मुलगा. तारा मात्र त्या मनाने खूप खट्याळ आणि खोडकर, अवखळ मुलगी होती. गणू आणि तारा एकत्र खेळत भांडत एकमेकांच्या उरावरही बसत.
दिवस असेच सरकत होते. दोघेही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आले होते आणि कळत नकळत दोघांचे मनात एकमेकांविषयीच्या अनामिक ओढीला नकळत अंकुर फुटू लागले होते. गणू शाळेतून यायचा त्या वेळेला तारा वाटेत उभी असायची. लाजरा बुजरा गणुही तीला मनाने शोधत असायचा. तिने परकरातून आणलेल्या, म्हातारीने केलेल्या मसाला चिंचेचा एक लाडू त्याला हळू द्यायची आणि पसार व्हायची
गणू आता अठरा चा झाला होता. त्याची शाळा संपली. त्याने गावात थोडीफार भिक्षुकी सुरू केली. ताराही आता वयात येऊ लागली होती. एका अवखळ आकर्षणाच रूपांतर आता अबोल प्रितीत होऊ लागलं होतं.
खेड्यातून जातीपातीची वीण मोठी पक्की असते. परजातीशी संबंध अतिशय निशिद्ध मानला जातो. त्यातून गणू तर गावचा गुरुजी झाला होता. त्याचे परजातील मुलींबरोबरचे प्रेम संबंध गावच्या पचनी पडू शकत नव्हते. याची दोघांनाही पूर्ण जाणीव होती. जाती धर्माची अदृश्य पोलादी भिंत आपल्यात उभी आहे याच दोघांनाही भान होतं. पण अमूर्त नैसर्गिक प्रेम भावनेने ती दोघेही एकमेकांकडे ओढली जात होती हे नक्की. या निरर्थक आणि कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रेमाच्या मस्तीत दोघेही झुरत होती. रात्र रात्र त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.
तारा 18 ची झाली तशी तिच्या आईने तिच्या लग्नाची आस धरली. घरात अठरा विश्व दारिद्र्य, वेळेला अन्न नसायचं, घर ही मोडकळीला आलेले. कुणी जोराने लाथ मारली असती तरी समोरचा दरवाजा भिंतीतून निखळून पडला असता, आणि अशा घरात ही उफाड्याची देखणी पोरगी म्हणजे म्हातारीच्या गळ्याला जिवंत फास होता. लग्न करायचं पण कोण पाहणार? कोण धावपळ करणार? लग्न म्हटलं की मंगळसूत्र, दागिने, भांडी हवीत. अशा एकना अनेक प्रश्नांनी म्हातारी खंगत चालली होती. आणि वयात आलेली तारा मात्र झुरत होती. कधी पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रेमात ती कुढत खंगत चालली होती.
गणूची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तो यंत्रवत जगत होता. गावातील लोकांची कार्य लग्न, वास्तुशांती, करत होता आणि उसासे सोडत रात्र रात्र जागत होता. मामी ही आता थकली होती. तिनेही गणूच्या मागे लग्नाचा लकडा लावला होता. लांबच्या नात्यातली एक अशिक्षित मुलगी तिने गणूला योजली, होती पण गणू मात्र यातलं काहीच बोलत नव्हता.
दोघंही एकमेकांच्या विरहाने आतून जळत होती.तारा घरी यायची, गणूशी बोलायची, चेष्टा मस्करी करायची, पण गणू मात्र आता अबोल झाला होता. त्याच्या तोंडून मंत्रोच्चार बाहेर पडत तितकेच. इतर बोलणं जवळजवळ बंद झालं होतं. मामी आता बराच वेळ झोपूनच असायची.
“गणूबाळा मला मारण्यापूर्वी सूनमुख दाखव रे”
हा एकच मंत्र ते घोकत होती आणि गणू मात्र निर्जीव पुतळ्याप्रमाणे वावरत होता, जगत होता.
म्हातारीने गावातच दुसऱ्या वाडीत ताराची सोयरीक, नाखूशिने का होईना, परंतु परिस्थिती नुरूप ठरवली होती. ताराला हो नाही म्हणण्याचा पर्यायाच नव्हता. ती ही हल्ली काहीशी अबोल झाली होती.
एका दिवशी तिन्ही सांजेला तारा गणूच्या घरी आली आणि त्याच्यासमोर मनातलं सगळं बकाबका ओकली. गणू तिला समजावत होता.
“तारू हे व्हायचंच होतं, आपलं प्रेम अधुरच राहणार होत. जातीपातीची भिंत नाही तोडू शकत आपण. नाही तोडू शकत आपण हे जातीपातीचे बंध. आपण दोघेही परिस्थिती समोर विवश आहोत तारा.”
“पण का? आपल्या प्रेमात लोकांना काय अडचण आहे?”
“तसं नसतं तारा, आपण खेड्यात राहतो शहरात नव्हे. खेड्यातले नीतीनियम पाळावे लागतात. आणि माझा हा व्यवसाय, तू जाणतेसच. आता यात काय करू मी?”
“माझ्याशी लग्न कर.”
“नाही तारा, कसं शक्य आहे ते? मला गाव जगायला देईल का? या रूढी परंपरांच्या फेऱ्यात आपण पूर्ण गुरफटत गेलो आहोत, त्यातून सुटका नाही, आणि अंतही नाही.”
“मला त्यातला काही कळत नाही. मला फक्त तू हवा आहेस. माझ्या मनमंदिरात मी केवळ तुझीच पूजा करते रे. त्या मंदिरात बाकी कुणाकुणाला थारा नाही.”
“तारा तू शहाणी आहेस ना? मग परिस्थितीच भान लक्षात घे. माझही खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. माझ्या मनात केवळ तू आणि तूच आहेस. जळी-स्थळी मला तूच दिसतेस तारा. संध्या करताना डोळे मिटले की तूच समोर उभी राहतेस. तुझ्या अतृप्त प्रीतीबंधात मी पूर्ण गुरफटलो आहे ग. पण समाजाला मी हे कसं सांगू? कसं तोंड दाखवू?”
“आपण पळून जाऊ आणि लग्न करू.”
“नाही तारा, मी आई-बापाविना पोरका पोर, त्याचं तोंड सुद्धा मी पाहिलं नाही ग, या मामीने मला लहानाचा मोठा केला. स्वतःची कुस अपूर्ण असूनही तिने मला आईचं प्रेम दिल, माया दिली, एक ओळख दिली. आता या वयात आणि या अवस्थेत तिला कसे टाकू? आणि तुझी म्हातारी? किती जीव आहे तिचा तुझ्यावर. तीच काय करशील? तिला वार्यावर का सोडायचं?”
तारा निशब्द झाली. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
“पण मी प्रेम केलं रे तुझ्यावर. लहानपणापासून मी तुझीच प्रतिमा मनात पूजत आले. आता या प्रतिमेच्या ऐवजी दुसऱ्याची तिथे प्रतिष्ठापना करायला सांगतोस? शक्य आहे का ते?”
“खूप कठीण आहे तारा, पण ते जमवायला हवं.”
“कसं जमवायचं? तुझ्यासाठी मी रात्र रात्र जागून काढते. अन्नाची चवही लागत नाही मला. सारं जीवन नकोसं झालंय. काय करू मी?”
“ऐक तारा, तुला काय वाटतं प्रेम फक्त स्त्रियाच करतात? अगं मी पण प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्या इतकच. पण पुरुषांना त्या प्रेमाला जग व्यवहाराची सांगड घालावी लागते. पुरुष प्रेमात नेहमी झोकून देतो. सर्वस्वाने समरस होतो. आणि हे प्रेम जेव्हा असफल होत ना तेव्हा आपल्या विदर्ण झालेल्या हृदयाने समाजात वावरत असतो. त्याला तुमच्यासारखा मूळ-मूळ रडायचं स्वातंत्र नसतं. स्वातंत्र्य असतं ते फक्त आतल्या आत झुरण्याचं. मनावर भला मोठा दगड ठेवून समाजात उसने हसतमुखाने वावरण्याचं, आणि आपली कर्तव्ये करत राहाण्याच. आणि एक दिवस यातच संपून जाण्याच.”
गणूच्या डोळे डबडबून आले होते.
“मग मी काय करू रे गणू?”
“तू लग्न कर. अगं देवानं आपल प्रेम अपूर्ण ठेवल असेल, पण आपण जन्मभर, याच गावात एकमेकांसमोर राहू. स्पर्शाने नसेल, शरीराने
नसेल पण मनाने आणि नजरेने एकमेकांच्या समोर आयुष्य कंठू. तुझं गावातच लग्न जमवून देवाने आपल्याला ही संधी दिली, असं समज आणि लग्नाला तयार हो.”
डबडबलेल्या डोळ्यानी तारा विजेसारखी पावठणी वरून उठली आणि गणूच्या गळ्यात पडून ओक्साबोक्षी रडू लागली.
“मला समजतं रे राजा तुझ प्रेम समजतं आणि तुझी भाव-विवशता ही समजते. करीन मी लग्न. ठेविन एक भलामोठा दगड मनावर आणि होईण लग्नाला तयार.” दोघे एकमेकांच्या बाहुपाशात परस्परांना अश्रुनी भिजवत होती.
दुसऱ्या दिवशी गणू पहाटे उठला. मामी आज उठलीच नव्हती. तिने अंथरूण धरल होत. गणूने चूल पेटवून दोन कप चहा केला आणि दोन्ही कप घेऊन तो मामीच्या अंथरुणात जाऊन बसला.
“मामी उठतेस ना? चहा केला आहे मी. चहा घे, बर वाटेल.”
मामीने शरीराची निरर्थक चुळबुळ केली. गणूने तिला आधार दिला आणि बसती केली. मोठ्या कष्टाने मामी एक एक अक्षर बोलू लागली.
“गणू,किती शहाणा आहेस रे तू.”
गणूच्या चेहऱ्यावरून ती हात फिरवू लागली.
“गणूबाळा, रात्रीच तुमच बोलणं सगळ ऐकलय रे मी. किती बिकट प्रसंग परमेश्वराने उभा केला आहे रे तुमच्यासमोर. कसा तरशील रे
यातून तू? परमेश्वर तरी असे असफल प्रेमाचे अंकुर मनात का फुलवतो रे?”
“मामी चहा पी अगोदर”
मामीने कसाबसा चहा प्याला.
“गणू तुझं मन काय बोलतय रे? तू ताराला घेऊन हे गाव का सोडत नाहीत? केवळ माझ्या काळजीनेच ना? बाळा नको करू ती काळजी. या दुर्दैवी मामीने स्वतःच्या आयुष्यात जी प्रतारणा भोगली ना तसे भोग तुझ्या आयुष्यात नाही येऊ देणार मी. तू खुशाल ताराला घेऊन निघून जा इथून. माझी काही अडकाठी नाही आणि अडचण ही नाही.”
मामीला धाप लागली. गणू पाणी आणायला आत धावला.
“रामेश्वरा माझ्या पोराच्या पाठीशी राहा रे.”
अस काहीतरी मामी पुटपुटली आणि ती अंथरुणावर कोसळली ती कायमची.
“मामी sssssss”
सर्वार्थाने पोरक्या झालेल्या गणूने हंबरडा फोडला. आई आणि बाप दोघांचेही प्रेम देणारी मामी आज अनंतात विलीन झाली होती. तिचे अखेरचे शब्द मनाशी घोळवत गणूने तिला अखेरचा निरोप दिला.
मामीच्या दिवस कार्यातच ताराच लग्न झालं. गणूला वाटलं चला, ताराच जीवन तरी सार्थकी लागलं, मार्गाला लागलं. पण साडेसाती चा फेरा काही संपत नव्हता. ताराचा नवरा अस्सल बेवडा होता.
घरात आलेली अप्सरा त्याला दिसतच नव्हती. रोज रात्री उशिरा हवी तेव्हढी दारू ढोसून धडपडत घरात येणं आणि तिथेच बाहेरच्या पडवीत पालथा पडणे हा त्याचा दिनक्रम अव्यहतपणे सुरू होता. तारा हतबल झाली होती. परिस्थितीच्या फेर्यात गुरफटत चालली होती. हायवेच्या पुलावर तो कामाला जायचा. दिवसभर दारू पिऊनच असायचा. एक दिवस तो दारूच्या नशेत पुलाच्या गर्डल वरून खाली पडला आणि कायमचा जायबंदी झाला. दोन्ही पाय निकामी झाले. घरात पडून असायचा, ताराला सतत शिवीगाळ करायचा, दिवसातून दोन वेळा त्याला दारू आणून द्यायला लागायची.
ताराच आयुष्य खोल खोल गर्देत बुडत चाललं होतं. घरात दम्याने जर्जर होऊन पडलेला सासरा आणि हा नवऱ्याचा मुडदा. उपासमार चालली होती. नवऱ्याची दोन वेळची दारू मात्र चुकत नव्हती. कॉन्ट्रॅक्टर ने वीस-पंचवीस हजार नुकसान भरपाई म्हणून दिले होते. नवऱ्याने ते दारूत उडडवले. आता ताराच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची वेळ आली. ताराने तेही नवऱ्याच्या दारू पायी विकल. दारू दिली नाही तर त्याचा तमाशा चालायचा, शिव्यांची लाखोली वाहायचा. तारा असहाय्य झाली होती.
काळ पुढे सरकत होता. आता ताराने थोडी उभारी घेतली होती. ती वाडीत कामाला जाऊ लागली. गणू कडेही ती येत असे. बोलताना त्या डोळ्यात त्याला जुनी तारका दिसे. गणू तीला खूप मदत करायचा. गणू घरात एकटा तरीही त्याचे कपडे धु, भांडी घास, अंगण
सारव, धान्य निवडून दे असली बारीक सारिक काम ती करायची. दोन्ही जीव नैसर्गिक प्रेमाच्या फुफाट्यात धगधगत होते मात्र कुणाकडूनच आगळीक झाली नव्हती, होत नव्हती.
अशा विचारांच्या काहुरात गणू घरी कधी पोहोचला त्याला कळलेच नाही. दिवस असेच. चालले होते गणू मात्र दिवसेदिवस खंगत चालला होता आणि तिकडे तारा ही.
एक दिवस सकाळी बातमी आली. ताराचा नवरा गेला.
‘चला सुटली एकदाची पोर’ गणू स्वतःचीच पुटपुटला. लोक रहाटी म्हणून तिच्या घरी जाऊन आला.
काळ असाच सरकत होता. गणूला मार्ग सापडत नव्हता आणि ताराला जीवन नकोसं झालं होतं. एक दिवस गणू असाच पडवीत झोपल्यावर बसला होता. मुक्याने अश्रू ढाळत होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर थाप पडली. त्याने चमकून मागे पाहिलं. तो होता खालच्या आळीतला आंद्या त्याचा वर्गमित्र. गोव्याला क्रूजवर कामाला असायचा.
“कसं काय चाललंय गणूराया?”
“काही नाही रे, आयुष्य कंठतोय कसं तरी.”
“अरे मग लग्न का करीत नाहीस?”
गणू निरुत्तर
“अरे गणू मी विचारतोय लग्न का करीत नाहीस?”
“लग्न? नाही रे आता कुणाशी लग्न करू?”
“ताराशी कर”
आंद्याने एकदम बॉम्ब टाकला आणि गणू चमकून गेला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. पहिला ओघ थोडा ओसरल्यावर आंद्याने परत सुरुवात केली.
“काही उरल नाही रे आता आयुष्यात.”
“गणू, तुला मारायचा आहे का? मग मर ना कोकण रेल्वे खाली जाऊन.”
गणूने आन्द्याला मिठी मारली आणि तो रडू लागला.
“गणू हे बघ, रडून काही होत नसतं. घट्ट हो, कणखर हो आणि जीवनाला सामोरा जा. हे बघ माझ्या आईने मला सर्व काही सांगितलं आहे. तू खरच लग्न कर.”
“लोक काय म्हणतील आंद्या?”
“अरे लोक गेले तेल लावीत. तुम्ही दोघे आपला उभा जन्म असे कुढतच बसणार आहात का?”
“मला भीती वाटते रे.”
“हट्स साल्या गण्या. मग प्रेम कशाला केलंस तिच्यावर?”
“तसं नाही रे, पण ......”
“तेव्हा लाज नाही वाटली ना प्रेम करायला? मग आता लग्न कर.”
“मला गावात राहू देणार नाहीत रे लोक.”
“थूत तुझी गण्या. अरे येव्हढच ना? मी पाहतो काय ते पण तुला लग्न करावंच लागेल.”
पंधरा दिवसांनी आंद्या परत गोव्यातून गावात आला.
“गण्या, संध्याकाळी सात वाजता काळोख पडल्यावर गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात ये. मी वाट पाहतोय.” आंद्याचा निरोप आला.
गणू दिवसभर उलट विचार करून शिणला होता. एकीकडे हे सर्व त्याला पटत नव्हतं, घोर अपराध वाटत होता, आणि दुसरीकडे तारा वरच प्रेम त्याला कुर्तडत होतं. सात वाजता तो मारुतीच्या देवळात हजर झाला. आंद्या अगोदर येऊन कट्ट्यावर बसला होता. गणू गप्पच होता.
“काय गणूराया कसं काय चाललंय?”
“काय चाललंय रे.”
“ते जाऊदे. महत्त्वाचे बोलू. तू काय ठरवल आहेस?”
“मी काय ठरवू रे? परिस्थितीच्या फेऱ्यात मी पूर्ण गुरफटलो आहे. आंद्या. सर्व वाटा बंद झाल्यात, सगळीकडे अंधार दाटला आहे आणि या अंधाराची भूत मला चहू बाजूने वेकुल्या दाखवत आहेत. मी काय करू रे?”
“ताराशी लग्न कर.”
“काय ?”
गणू दचकला. त्याला घाम फुटायला लागला.
“होय गणू, तू ताराशी लग्न कर.”
“कसं शक्य आहे ते?”
“शक्य आहे गणू. या प्रेमाच्या वणव्यात तुम्ही दोन जीव जीवंत जळताना पहावत नाही रे मला. जीव तुटतो माझा गणू, खरंच.”
‘खरंच तू आणि तारा लग्न करा रे’
‘गाव मान्य करेल का ही गोष्ट?”
“अरे गाव गेला खड्ड्यात.”
“असं कसं म्हणून चालेल आंद्या? याच गावाच्या जीवावर जगतो मी.”
“गाव तुला काही फुकट नाही खायला घालत. त्यांची काम करतोस त्याचा मोबदला देतात ते तुला. बस.”
“पण लग्न केलं तर मला गावाबाहेर काढतील रे.”
“बस, इतकच, अरे ते बाहेर काढण्या आधीच आपण गाव सोडू.”
गणू एकदम चमकून आंद्याकडे पाहू लागला.
“होय गणू, तू गोव्यात चल. एका देवळात त्यांना नित्य पूजेसाठी भटजी हवा आहे, शास्त्रार्थ जाणणारा. तुझा पोटाचा प्रश्न आणि राहण्याची व्यवस्था तिथेच होईल. वर खर्चाला तुला गावात खुप काम मिळतील.”
“अरे पण त्यांना हे लग्न?”
“गणू मी सर्व चौकशी करूनच आलो आहे. त्यांची या लग्नाला काहीही हरकत नाही. तुझी बायको कोणत्या जातीची आहे हे सुद्धा कोणी तुला विचारणार नाही.”
गणूच्या डोळ्यात आता थोडी चमक आली होती.
“अरे पण हे सगळं ताराला......”
त्याची तू काळजी करू नको असं म्हणून आंद्याने दोन टाळ्या वाजवल्या. देवळाच्या पाठीमागे अंधारात येरझार्या घालणारी तारा समोर आली.
“हो गणू मला मान्य आहे सगळं. आपण खरंच लग्न करू. खूप भोगलय रे आपण आता नव्याने सुरुवात करू.
गणू च डोक बधीर होऊ लागल होत.
“आपण काय चुकीचं करतोय रे? तू तुझ्या मामीची सेवा केलीस, तिचे शेवट चे शब्द आठव. ते शब्द आता खरे करायची वेळ आली आहे गणू.”
गणू आ वासून तिच्याकडे बघत होता.
“गणू माझा नवरा ही आता या जगात नाही. आता तोही प्रश्न नाही, तोही लोक अपवाद नाही.”
“तारा, पण .....”
“आता पण नको गणू. तुला नवीन आयुष्याच्या चरितार्थाची चिंता असेल, पण खरं सांगू गणू, तू बरोबर असलास ना तर मी नरकातसुद्धा आनंदाने येईल. तिथे सुद्धा आनंदाने संसार करेन, मला फक्त तू हवा आहेस गणू.”
तारा चे डोळे भरून आले, ती मुसमुसून रडू लागली.
“म्हणून आता विचार करू नकोस. मी आज रात्रीच्या ट्रेनने गोव्यात निघालोय. तुम्ही दोघांनी भल्या पहाटे पाच वाजता गाव जागा होण्यापूर्वी तरळा एस टी डेपो गाठा. खाली जाणाऱ्या मुंबई गाड्या असतात त्याने कणकवली रेल्वे स्टेशनला जा. सकाळच्या सातच्या
मडगाव रेल्वेची ही दोन तिकीट आहेत. दहा वाजता गोव्यात याल, तिथे स्टेशनवर मी आहे, पुढचं काय ते मी पाहतो.”
गणू थरथरत होता त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. आंद्याने त्याचा हात पकडला. दुसऱ्या हाताने त्याने ताराचा हात पकडला,
“गण्या, तारा डोळे पुसा. वास्तवात या. ब्रह्मचारी हनुमंतासमोर आंद्याने ताराचा हात गणूच्या हातात दिला.
“तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव ...................”
आकाशवाणी झाली. तारा आणि गणू ने एकमेकांना कडकडून मिठी मारली. आंद्यालाही मिठीत घेतलं. आणि ते दोन जीव तृप्ततेचे अश्रू ढळू लागले. या गडबडीतही ताराने पदराची पुडी लाजत लाजत सोडली आणि गणूच्या आवडत्या मसाला चिंचेचे तीन गोळे बाहेर काढले.
“घ्या.”
आणि दुसऱ्या दिवशी पहाट होऊ लागली. पूर्व क्षितिजावर सुर्य नारायणाच्या आगमनाची वार्ता घेऊन उषेचे पहिले किरण फाकत होते. एक नवा दिवस, नव्या आशा, नवी स्वप्ने घेऊन उगवत होता. आशेच्या पोटात दडलेल्या निराशेचा लोप होत होता. आणि त्या संधी प्रकाशात ते दोन जीव तरळा च्या दिशेने निघाले होते.
दिलीपकुमार हरी फडके.
(निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक)
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा
यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही
सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे
हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव
आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box