नवांकुर - डॉ. यशवंत सुरोशे

 नवांकुर

 डॉयशवंत तुकाराम सुरोशे


शुभ्रा मॅडम, इथे समई ठेवली जाईल. तुम्ही डावीकडून याल. समोर मेन लाईट आहे. बरोबर त्याच्या समोर

तुम्ही पोझ घ्यायची. तुम्ही सेट झाल्यावर मला फक्त डोळ्यांनी इशारा करा. मी समोरच बसलेला असेन.

म्युझिक सुरु झाल्यावर पहिल्यांदा रेड लाईट सुरू होईल......” गुरु स्टेजवर इकडून-तिकडे फिरत, हातवारे करत

युनिटमधल्या सगळ्या सहकाऱ्यांना कोणी काय-काय करायचं हे समजावून सांगत होता. शुभ्राला सूचना

सांगताना तो सलग बोलतच रहायचा. बाकीचे सगळे त्याच्या हालचाली नि बोलणं बघत, ऐकत रहायचे. शुभ्रा

कान टवकारून ऐकायची. ठराविक वेळेनंतर तिच्या लक्षात यायचं की युनिटमधले माधव, प्रसाद, दुर्गा,

श्रीनिवास आपल्याकडे वेगळ्याच नजरेने पहातायत. तेव्हा ती गुरूला थांबवायची. म्हणजे थांबण्याची खूण

करायची. म्हणजे तू काही सांगतोयस, ते मला कळालं आहे, असं सुचवायची. गुरूची नजर शुभ्रावरच असायची.

इतरांची दखल घ्यायला तो त्याचा उरलाच नव्हता.

अरे बाबा! बोलायचा थांबशील की आजच कार्यक्रम करायचा आहे?” प्रसादने टोला हाणलाच.

नाही यार! यंदाच्या अॅन्युयल फंक्शनला आपल्याच युनिटची धूम झाली पाहिजे. या कंपनीत आपण नवीन

असलो तरी आपण सगळे तरुण आहोत. खूप एनर्जी आहे आपल्याकडे!” गुरु पुन्हा हातवारे करून बोलत होता.

चाळीशी ओलांडली तरी तू स्वत:ला तरुणच समजतोयस का?” दुर्गा बोलला.

अरे! त्याचं लग्न झालं नाही म्हणून तो स्वत:ला तरुण समजतोय.” श्रीनिवासने दुर्गाला टाळी देत म्हटलं.

श्रीनिवासच्या जोकवर सगळेजण हसू लागले. खुद्द गुरुही हसला. मात्र क्षणभरच! गुरूचा चेहरा मावळला.

हसण्यासाठी पसरलेले ओठ संकोचले. गुरूच्या छातीतून कळ गेली असावी याची जाणीव शुभ्रालाही झाली

असावी. ती ही हसायची थांबली.

दोस्तानो! दुसऱ्या युनिटमधील सर्व कामगार परमंनट आहेत. त्यांना फक्त नोकरी नि पगाराशी मतलब आहे.

आपण चांगला परफॉर्मन्स करून दाखवला तर कदाचित....” गुरु स्वत:ला सावरत स्टेजच्या एका बाजूला होत

म्हणाला.

खरयं यार! आधी आपण म्हणत होतो, आपल्यात कोणी कलाकार नाही. आता शुभ्रा मॅडम आपल्या युनिटला

जॉईन झाल्या आहेत. आपण सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला तर आपल्या युनिटचा परफॉर्मन्स धमाल होऊ शकतो.”

माधवने विषयाला हात घातला.

माधव तू स्क्रिप्ट लिही. मी आख्खा तबेला स्टेजवर उभा करतो. दहा वर्ष मी राबलोय गोठ्यात! असा अभिनय

करील ना ......” गुरूच्या बोलण्यातून आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.

शुभ्रा! तुम्ही तुमच्या पद्धतीने डान्स करा. तुम्हाला साऊंड आणि म्यूझिकची साथ आपण स्वत: देणार! अरे!

जगण्याच्या धडपडीत सात वर्ष मंडप डेकोरेशनचा धंदा बी अपुन केलाय. तवा मॅडम, तुम्ही फकस्त झ्याक

नाचा नि बेस्ट प्राईज मिळवून द्या आपल्या युनिटला! अनं कसं?” गुरूचा मूड बदलला होता.

गेली अनेक वर्ष त्याच्या मनात राहिलेल्या इच्छांना इथल्या क्लब हाऊसच्या स्टेजमुळे अंकुर फुटले होते.

मनातल्या कल्पनांना धुमारे फुटत होते. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी त्याच्या मनात निर्माण झाली होती.

एका स्वप्नाने त्याला वेड लावले होते. टेंपररी कामगार असलो तरी या कंपनीत नाव कमवायचे, असे त्याच्या

मनाने घेतले होते.

शुभ्रा अगदी आज्ञाधारक मुलीप्रमाणे मान हलवत होकार देत होती. गुरुच्या सूचना ती मनापासून ऐकायची.

चार दिवसापासून रिअर्सल चालू आहेत. गुरु म्हणतो, ‘मला नृत्यातलं फारसं कळत नाही.’ मात्र शुभ्रा नाचताना

कुठे अडखळली की तिला लगेच खूण करतो. इशारा करून थांबवतो. ‘इथं अशी स्टेप असायला हवीअसं

सांगतो, तेव्हा शुभ्राला त्याचं भारी कौतुक वाटतं.

सेंकड शिफ्ट असल्यामुळे सगळेजण पांगले. मॅनेजरने सांगितलं होतं, खरतरं दमच दिला होता की तुम्ही

कोणताही परफॉर्मन्स करा पण प्रॉडक्शनवर त्याचा परिणाम होता कामा नये. क्लब हाऊसची एक खोली

तुम्हाला देतो मात्र ड्युटीवर वेळेला आले पाहिजेत. त्यामुळे सगळेजण आवरायला गेले. कोणी कँटीनमध्ये गेले,

कोणी बाहेर जाऊन वडा, समोसा पोटात ढकलला.

गुरूने आपली सॅक उचलली नि तो क्लब हाऊसच्या मागील हिरवळीकडे गेला. डब्यातला मसाला भात

खायचा, पोटभर पाणी प्यायचं नि ड्युटी जॉईन करायची असा विचार करत तो मनगटावरील घड्याळाकडे

बघत होता. हाताशी अर्धा तास होता. सॅक पाठीवर टाकत तो हिरवळीकडे आला.

गुरु थांब, मी पण आले जेवायला! चपाती आणलेय मी! तू चपाती खा! मला भात आवडतो.” असे म्हणत

शुभ्राही हिरवळीवर येऊन बसली. शुभ्राचा आवाज ऐकून गुरूला आनंद झाला. पण आपल्याला चपाती मिळावी

म्हणून ती आपला मसालाभात खाते हे त्याला आवडत नसे. तो सॅक ठेवून नळावर हात-तोंड धुण्यास गेला.

खरतरं गुरूला या कंपनीत जॉईन होऊन पुरता वर्षसुद्धा झालेले नाही. मोजून सांगायचे म्हटले तर अकरा

महिने, दोन आठवडे नि तीन दिवस झालेत. गाव सोडून शहरात आला तेव्हा मित्राकडे आठवडाभर थांबला. कुठे

कामच मिळेना! तो तर कोणतही काम करण्यास तयार होता. तरी प्रत्येकजण अनुभव विचारायचा. गुरु

म्हणायचा, “शेणगोठा करता येतो, म्हैशी भादरता येतात. दूध काढता येते. गोवऱ्या थापता येतात.”

विचारणारा हसायचा. ‘गावढळचं आहे!’ असे भाव समोरच्याच्या डोळ्यात गुरूला दिसायचे.

मित्राला भार नको म्हणून तो एका हॉटेलमध्ये टेबल पुसत राहिला, उष्टी, खरकटं काढत राहिला. पण आता

गावी जायचं नाही असा त्यानं मनोमन ठरवलं होतं. काय करायचं गावी जाऊन? चार दिवस रोजगार मिळतो

तर पुढचे दहा दिवस बसून राहवं लागतं. मिळालेली मजुरी पोट भरण्यापुरती पुरत नाही. आई-बापआयता

बसून खातो, आयता बसून खातोम्हणून दहावेळा बोलायचे. जन्म देणारे आई-बाप असं म्हटल्यावर शेजारी,

गावातले काय कौतुक करणार आहेत? चार घासासोबत अपमानाचे शब्दही पचवायला शिकला गुरु!

गावतल्या एका चुलत्यानं दुधाळ म्हशी विकायला काढल्या. चुलता पोराच्या शिक्षणासाठी शहरात चालला

होता. त्यानेही विचार केला, पोरगं शांत डोक्याचं आहे. करील दूधदुपत्याचा धंदा! चार पैसे कमी मिळतील,

तरी धंदा घरातच राहील असा मोठेपणाचा विचार करून दोन म्हशी नि एक रेडकू गुरूच्या पदरात टाकून गेला.

गुरूने मेहनत घेतली. धंद्यात जम बसवला. एक-एक जोडत म्हशी वाढवल्या. दूधाचा रतीब वाढला. चार पैसे

हातात येत होते. आई-बाप मात्र गुरूच्या वयाची वर्ष मोजत होते. अठ्ठावीस झाली तरी कोणी मागणी कशी

घालीत नाही, याचं त्यांना वाईट वाटत होतं. पळसवाडीचा पाहुणा वाट वाकडी करून एकदा घरी आला.

म्हणाला, “अरं बाबा! कोण मायचा ल्योक आपल्या लेकीला शेणगोठा कराला धाडीन तुझ्या घरात? पहिल्यांदा

ह्यो धंदा सोड तवा तुझं लगीन जमल.”

गुरु लगेच बिथरला नाही तरी पुढे दोन वर्षात पाहुण्याच्या बोलण्यातील तथ्य त्याला समजलं. सोबत्यांची

लग्न होऊन पोरबाळं त्यांच्या मागं मागं हिंडत होती. लग्न होण्यापेक्षालग्न जमत नाहीया विचाराने तो

रात्ररात्र जागाच राही. डोळे गच्च मिटून स्वप्ने बघत राही. तरी डोळे उघडल्यावर गच्च अंधाराशिवाय त्याला

काहीच दिसत नसे. निळ्या स्वप्नांना तो ही कंटाळला होता. त्याला त्याच्या शरीराचा राग येई. मग मध्यरात्रीच

उठून तो रानोमाळ भटकत राही. घुबडांचा, वटवाघळांचा आवाज ऐकत राही. आपल्यापेक्षा हे प्राणी, पक्षी बरे

असे त्याला वाटू लागले. सुगरणीसारखा आपला एक खोप असावा. त्यात आपलीसुगरणअसावी. शेतातून

राबून आलेलो आपण, चुलीजवळ जाळांमुळे अधिकच उजळून दिसणारी तिची गोरी नवकांती! भाकरीला पाणी

लावता-लावता आपल्या येण्याचा कानोसा घेणारी तिची नजर, दाराकडे बघतांना तिच्या कानातले हलणारे

कुंडल....अशी कितीतरी स्वप्न तो रात्ररात्र मनाशी घोळत राही.

नाईलाजास्तव त्याने बसलेला धंदा मोडला. शेजारच्या गावातल्या जोडीदाराने मंडपाचा धंदा सुरु केला.

त्यात सहा-सात वर्ष रमला. मात्र स्वप्न पडायची बंद झाली नाहीत. मंडपात प्लॅस्टिकच्या बाहुल्या मांडताना,

त्या सजवताना त्याच्या अंगावर शहारा येई. नवरीच्या आगमनाकडे पाहतांना त्याला स्वत:चा हेवा वाटे.

इतरांच्या लग्नाचे मंडप बांधण्यातच आपले आयुष्य जाणार या विचाराने तो प्रंचंड अस्वस्थ होई. अस्वस्थ मनाने

एका भल्या पहाटे कोणाला काही सांगताच, दोन सदरे, दोन विजार, एक टॉवेल, चादर एका पिशवीत कोंबून

शहराकडे आला. शहरात किमान दोन घास निवांतात खाऊन शांत झोपता तरी येईल. किमान गावातल्या

अपमानाच्या शब्दांचा, टोमण्याचा तरी जीवाला त्रास होणार नाही असा विचार त्याने केला. जीवनाची नवीन

सुरुवात म्हणूनच तो शहराची वाट शोधत आला. मित्राच्या वडिलांनी या इथल्या कंपनीचा पत्ता दिला काय नि

इथे त्याची निवड झाली काय! सगळ्याच गोष्टी इतक्या सहज नि पटापट झाल्या , तशा शुभ्राचं त्याच्या

आयुष्यातलं आगमनही असच सहज झालं. शहराच्या एका टोकाला नव्या चाळीत बस्तान बसू पाहत असलेला

गुरु बाईकवरून कंपनीत यायचा. मागच्या सहा महिन्यापासून शुभ्रा त्याच्याच युनिटमध्ये जॉईन झाली होती.

एकदा दोघांची सेंकड शिफ्ट होती. गुरु रस्त्यावरून जात असतांना बसथांब्यावर कोणी एक हात करून

थांबण्याची विंनती करत होते. ‘नको नुसती झंझटं म्हणून लिफ्ट देणं टाळावंअसा विचार करता-करता त्याने

गाडी थांबवली. बघतो तर ती शुभ्रा होती. त्याने हेल्मेट काढून आपला चेहरा दाखवला.

सॉरी सर! माझी नेहमीची बस नुकतीच पुढे गेली आहे. यानंतर इंडस्ट्रीयल इस्टेटकडे जाणारी बस अर्ध्या

तासांनी आहे. म्हणून......” शुभ्रा काकुळतीला येऊन बोलत होती.

अहो! बोलत काय बसलाय? बसा पटकन! मागे गाड्या थांबल्यात.” गुरूने गाडी थोडी रस्त्याच्या कडेला

घेतली. शुभ्रा काही बोलता पटकन बसली. मग हा सिलसिला कायमच सुरु राहिला. सुरुवातीला फक्त

कामाच्या गप्पा व्हायच्या. मग घरातल्यांची चौकशी झाली. मग एकमेकांची वाट पाहणं. ड्युटी अॅडजस्ट 

करणं. डब्यातला पदार्थ शेअर करणं, इथून झालेली सुरुवातशुभ्रा, तू तुझं ग्रॅज्युशन पूर्ण करायला हवं.” तेगुरु!

तू आतापर्यंत खूप सोसलयसं, यापुढे आणखी सोसायचं नाही.” इथपर्यंत कहाणी येऊन ठेपली होती.

अरे बाबा! हात, तोंड धुतोयस की अंघोळ करतोय? चल लवकर मला भूक लागलेय!” शुभ्राच्या आवाजाने गुरु

झपाझप पावले टाकत आला. दोघे भरभर जेवले नि ड्युटीवर गेले.

रात्री साडेबाराला शुभ्रा घरी पोहचली तेव्हा धाकटी बहीण काव्या अजून जागीच होती. खुर्चीत बसून गृहपाठ

लिहित होती. शुभ्राच्या येण्याची चाहूल लागताच पोटाशी पाय दुमडून झोपलेली तिची आई उठली. तिनं तिचं

ताट वाढलं. दोघ्या बहिणीकडे बघत ती देव्हारातल्या जळणाऱ्या दिव्याच्या हलणाऱ्या वातीकडे पाहत होती.

जणू तिची तंद्री लागली होती. वडील अजून आले नव्हते. रात्री एखादं भाडं मिळालं तर दिवसभराची कमाई

मिळत असे. म्हणून दिवसभर हातगाडीवर भाजी विकायची नि रात्रभर भाड्याने रिक्षा चालवायची अशी

उरफोड केल्यावर चार जणांची पोटं भरत. त्यात आपल्या शिक्षणाचा भार नको म्हणून शुभ्रा कामाच्या शोध

घेऊ लागली. कधी झेराक्सच्या दुकानात तर कधी साडीच्या दुकानात काम करत राहिली. आई-वडिलांना चार

पैशाची मदत मिळू लागल्यावर त्यांनीही तिला पुढे शिकण्याचा आग्रह केला नाही. एक काम करत असतानाच

दुसऱ्या कामाचा शोध घेण्याची शुभ्राची सवय उपयोगी पडली. सहा महिन्यापूर्वी या कंपनीचा तिला शोध

लागला. इंटरव्हयू दिला नि दुसऱ्याच दिवशी जॉईन झाली.

कंपनीचा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारीअॅन्युअल फंक्शनहोई. कंपनीचे मालक,

व्यवस्थापक, संचालक मंडळ आवर्जून उपस्थित राहत. कामगारांचे कौतुक करीत. एका युनिटचे नेतृत्व गुरूने

घेतलं नि शुभ्राच्या वाट्याला कथ्थक नृत्य आले.

चार दिवसानंतर क्लबहाऊसच्या भव्य कलामंचावर कामगार कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

कार्यक्रम उत्तररात्रीपर्यंत रंगत गेला. पहाटे कधीतरी परीक्षकांनी निकाल जाहीर केला तेव्हा शुभ्राला नृत्याचे

प्रथम पारितोषिक गुरूला अभिनयाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाले होते.

ड्रेपरीचे साहित्य पिशवीत कोंबत ते दोघे बाहेर आले तर कौतुक करणाऱ्याची ही रांग! दोघांनी एकमेकांचे

अभिनंदन केले.

गुरु! तुझ्यामुळे मला नाचण्याची संधी मिळाली. तू माझं कौतुक केलं नसतं तर मी नाचू शकले नसते.”

हातातली नटरंगाची मूर्ती गुरूच्या हातात देत शुभ्रा अश्रू ढाळत होती.

अगं! मी माझं मन रमावं म्हणून ह्या उचापती करत होतो. तू उत्तम नर्तिका आहेचस! खरतरं तूच स्वत:ला

झाकून ठेवलं होतसं!’ गुरूच्या बोलण्याने शुभ्राच्या अंगावर फुले पडत होती. त्याने फक्त बोलतच राहावे, आपण

फक्त ऐकत राहावे असे तिला वाटत होते.

घरी पोहचली तेव्हा धाकटी शाळेत जायला निघाली होती. शुभ्राने तिला गच्च मिठी मारली. तिला उचलत

गोल फिरवले. आईच्या पाठीमागे जाऊन तिच्या पाठीवर डोके टेकवले. बाबा लवकरच भाजीची गाडी घेऊन

घराबाहेर पडले होते. तरी या घरात कोणीतरी आहे याचा तिला भास होत होता. आपल्या आजूबाजूला गुरु

 आहे. तो आपल्याकडे बघतोय! बघून हसतोय! तो आपल्याला बोलावतोय! जवळ बसण्यास सांगतोय! ती

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपली नजर फिरवतेय. राधेला जसा कृष्ण ठायी-ठायी दिसतो, तसा शुभ्राला गुरु

ठायी-ठायी दिसत होता. त्याच्या बोलण्यातील आश्वासकता, खंबीरता तिला मोहून गेली होती. रात्रभर

जागूनही तिला झोप येत नव्हती. डोळ्यांपुढे स्वप्नातील राजकुमार यायचा. स्पर्श करण्यासाठी हात पुढे

करायचा नि शुभ्रा डोळे उघडायची. राजकुमार दूर जायचा. नाहीसा व्हायचा. तिला हा खेळ नकोसा झाला. ती

दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली.

त्या दिवशी दुर्गाने असे बोलायला नको होते!” शुभ्रा गुरूच्या बाईकवर बसत म्हणाली.

अगं बाई! तो बोलला नसता तर आणखी कोणी बोललं असतं. आणि हे बघ! हे असले विषय पुन्हा उकरून

काढू नकोस. माझ्यासाठी तो विषय संपला आहे.” गुरु थोडा चिडला होता. त्याच्या बाईकचा वेग हळूच वाढला

होता.

सॉरी! पण माझं थोडं ऐकशील का?” शुभ्रानं गुरुचं दुखलेलं मन ओळखलं.

बोल ना! तुझा काही इश्यू आहे का?” गुरूने स्वत;ला सावरत विचारले.

तू कर नां लग्न....” शुभ्रा पुढे झुकत आपली हनुवटी गुरूच्या खांद्यावर टेकवत लडीवाळपणे म्हणाली.

अगं लग्न जमत नाही म्हणून मी इकडे आलोय. पाहिजे तर पळालोय म्हण! आणि माझ्याशी कोण लग्न करणार

टेपरंरी नोकरीवाल्याबरोबर?” गुरु आपल्या बाईकचा वेग कमी करत बोलला.

तू कोणाला विचारलचं नाही तर कसं होणार लग्न?” शुभ्राचा पुन्हा तसाच लडिवाळ स्वर.

आता काय तुला विचारू?” गुरूने खांदा उडवला नि उजव्या हाताची मूठ जोराने पिळली तसा गाडीला

भलताच वेग आला.

विचारून तर बघ!” शुभ्राने स्वत:ला सावरण्यासाठी गुरूला घट्ट धरले.

काय?” गुरूचा उजवा पाय हळूच दाबला गेला. गाडीचा वेग कमी झाला. गाडी एका फुललेल्या

गुलमोहराच्या झाडाखाली येऊन थांबली. लाल-गुलाबी फुलांच्या पाकळ्यांचा सडा रस्त्यावर पसरला होता

तशाच लाल-गुलाबी रंगाच्या प्रेमभावना गुरुच्या हृदयावर पसरल्या. त्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर जणू आख्खा

गुलमोहर उतरला होता.

खरचं!” शुभ्रा हात हातात घेत गुरु म्हणाला.

तू विचारशील तेव्हा ना!” शुभ्राने पुन्हा फिरकी घेतली.

आय लव्ह यू शुभ्रा! तू आवडतेस मला! हवीहवीशी वाटतेस मला! पण........” तेवढ्यात शुभ्राने टाचा उंच करत

गुरूच्या तोंडावर आपल्या उजव्या हाताचा तळवा ठेवला.

 तुझापणइथे आणू नकोस! हवीहवीशी वाटते तर पुढे काय म्हणशील?” शुभ्राने त्याच्या डोळ्यात बघत

विचारले.

तू होशील माझी नवरी?” गुरूने शुभ्राला प्रश्न विचारताच तिच्या गालाच्या पाकळ्या गुलमोहर झाल्या. एका

फांदीवर बसलेला कोकीळ अचानक कुहूकुहू गाऊ लागला. तसा दोघांनी मान वर करून पाहिले तर सूर्य

अस्ताला चालला होता. त्याचाही रंग लाल झाला होता. जणू तो लाजून लाल झाला होता. कोणाच्या नजरेला

हा लाजरा भाव दिसू नये म्हणून तो लवकरच मावळणार होता.

हो!” शुभ्राने वचन दिले.

गुलमोहराच्या फांदीवरचा कोकीळ पुन्हा-पुन्हा गात होता. कोकीळाचे सूर ऐकण्यासाठी माना वर करताना

शुभ्रा नि गुरु एकमेकांच्या नजरेत नजर टाकून एकमेकांना शोधत होते. वाऱ्याच्या झुळकेने चार पाकळ्या

दोघांच्या डोक्यावर पडल्या. दोघे भानावर येत म्हणाले, ‘चल निघायला हवं!” जणू काही दोघांच्या मनाच्या

तारा जुळल्याचे ते लक्षण होते. लग्नाअगोदरच दोघांना आपल्या आपल्या प्रेमाचा शोध लागला होता. या

शोधाच आनंद त्यांच्या गगनात मावत नव्हता.

 

डॉ. यशवंत तुकाराम सुरोशेमुरबाड


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहेया कथेतील आशयविषयमांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहेयातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीया कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेतपरवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments