हरवले ते गवसले...
रेश्मा डोळे
"कुठे उलथला होतास रे म्हाताऱ्या. चार फोन केले मी."
" अरे अंडी आणायला गेलो..फोन घरी विसरलो होतो. बोल का एवढा घाई वर आलाय."
"अरे, आज गुरुवार अंडी खातोस की काय आज.. ? "
" मला सगळे दिवस सारखेच... कोंबडी नी हे अंड काल दिलं आहे म्हणजे हे बुधवारच अंड गुरुवारी खाल्ल अस होत...तू कामाचं बोल."
" कसली फालतू लॉजिक आहेत तुझी...बर ऐक.. सुमीला आत्ता आपली गरज आहे.पण मी गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे इथून हलू शकत नाहीये..तू जरा मदत कर...बचपन का प्यार वैगेरे लक्षात घेऊन."
"ह्ममम ...सावरली नाहीये का अजून दिनेशच्या जाण्यानी "
"बहुतेक तसच असावं...फोन वर मोकळी बोलत नाही...आवाजात एक उदासी जाणवते. निर्वाणीच बोलते..आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत डॉक्टर दामले..ते म्हणाले आता त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज आहे."
" तुला कुणी सांगितलं..हे सगळं."
" अरे वसू गेली होती तिला भेटायला. तिचा पण फोन आला होता..पूर्वीची सुमी हरवून गेली आहे...हसणारी , सतत उत्साही, आनंदी. "
" काही करू शकला तर तूच करू शकतोस "
" बरं ..बघतो विचार करू दे."
" कळव मला."
***** ***** ***** *****
दिग्या उर्फ दिगंबर, सत्या उर्फ सतिश..सुमित्रा म्हणजे सुमी आणि वसू म्हणजे वसुंधरा ही बाळपणीची चाळीतील मित्र मैत्रिणी आता साठी ओलांडलेली पण मैत्र जपलेली..सुमी आणि दिग्या सख्खे भाऊ-बहिण आणि दिग्या आणि सत्या सख्खे मित्र... चाळीत बालपण ते वयात येणं .. अडणेड्या वयात येऊन प्रेमात पडणं , खोड्या, अभ्यास, मार सगळ एकत्र अनुभवलं होत..घरातल्यांना न सांगता केलेले उद्योग ,बोलणी खाण,अल्लड प्रेमात एकमेकांना मदत, असफल झालेल्या प्रेमात खांदा देणं....सगळ सगळ चांगल वाईट एकत्र अनुभवल होत.
सत्याला सुमी आपल्याला आवडते हे कळायला खूप वेळ लागला...जेव्हा घरच्यांनी तिला स्थळ बघायला सुरवात केली तेव्हा त्याला कळलं आपण उशीर केलाय...दिग्या काय म्हणेल ? माझ्या बहिणीबरोबर लग्न करायचा विचार कसा केला? यामुळे मैत्री तुटेल का ? हे डोक्यात येऊन सत्या काही बोलला नाही...
वेळ थांबत नसतो कुणासाठी...मुली या पटापट मोठ्या होतात...आणि सुमीच्या घरच्यापेक्षा चाळकरी लोकांना तिच्या लग्नाची घाई झाली होती... आणि सत्याला जे नको होत तेच घडलं पहिल्याच स्थळाकडून सुमीला पसंती आली...गडगंज श्रीमंत स्थळ मुलगा वयाने मोठा पण बाकी सगळं आलबेल...लगेच चाळीत लग्नाचं वार वाहायला लागलं..हा हा म्हणता सुमीच लग्न तोंडावर आले.
एका रात्री सुमी आणि सत्या दोघच गच्चीत होते...सत्याला चार वेळा वाटले एकदा तरी सांगावं का , मला तू आवडत होतीस...
" सुमे ,खुश आहेस ना लग्न ठरलय तर."
" हो आहे रे. का रे असं का विचारलं?"
" सहज ग.."
" तू आणि दिगुदादा पण जरा मनावर घ्या...वसू च पण ठरेल आता ..आपल्यात नंतर कुणी एकट पडायला नको...तुला कशी हवी रे बायको. "
" तुझ्या सारखी..."
"..... म्हणजे.. " सुमी एकदम कावरी बावरी झाली.
" अग मजा करतोय इतकी काय घाबरते..मी आता लग्न नाही करणार ग... करेन कुणी मिळाली तुझ्या सारखी तर नक्की...आपल्याला हवा तसा आपण मनात जोडीदार निवडतो...पण नियती वेगळी असते..मग आयुष्याची गणित बिघडण्या पेक्षा मनातील गणित बिघडली तरी चालतात कारण ती फक्त आपल्याला माहीत असतात. "
" कुणी होती का ,,आहे का अजून मनात...तू हे इतकं जड जड का बोलतोय..."
" मजा करतोय ग वेडाबाई...नंतर भेटणार आहेस का असं तुला छळायला ."
सतिशनी हसून डोळे हळूच पुसलेले सुमित्रा नी बघितले..पण वसू आणि दिगुदादा आले आणि विषय थांबला...
***** ****** ****** ******
दिगू ,सुमित्रा यांची सुद्धा लग्न झाली पण सतिशनी मात्र लग्न केले नाही..काकूंनी देवदेव, नवस उपवास,बुवा बाबा सगळं केलं पण याचं एकच मी कुणा मुलीला सुखी ठेऊ शकणार नाही मी लग्न करणार नाही...शेवटी काकूंनी विषय बंद केला आणि देव देव करत राहिल्या...सत्या खूप शिकला चांगली नोकरी केली आईला सूनमुख दाखवण्या शिवाय सगळी सुख दिली...
***** ****** ****** ******
सुमी लग्नानंतर बदलून गेली...सतत दागिन्यात मढलेली, चेहऱ्यावर एक कड्क इस्त्री चां भाव.. त्यातलं हसू आणि खट्याळपणा कुठे तरी हरवून गेला होता. सुमीचां नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता. फक्त त्याचा वेळ ,प्रेम आणि सहवास हे तिला त्याच्याकडून मिळत नव्हतं . सतत पैसा मिळवण्या मागे तो धावत होता..दिनेश चा जन्म झाला आणि सुमीला जरा वेगळ जग मिळालं पण दिनेश जसा मोठा होत गेला तसा तोही वडिलांच्या पायावर पाय ठेऊन अती महत्वाकांक्षी निघाला...
अधून मधून या मित्र मंडळींची भेट व्हायची पण सुमी कधी कुणाला फार काही बोलायची नाही. दिगंबरदादा ला काही कळलं तर तो दुःखी होईल घरी सांगेल ही भीती तिला मनात वाटायची.
लग्नानंतर तिनी खूप स्वप्न पहिली होती...पण सगळ्याला तडा गेला होता.
****** ****** ****** ******
" सत्या, मी सुमित्राच्या घरी जाणार आहे .तिनी तिकडून तुला फोन केला की मी जे आत्ता तुला सांगतोय ते तू तिला सांग.. आणि फक्त...हो हो म्हण...आणि वसू ला पण हेच सांग. "
" करणार काय आहेस..अंदाज तर दे. "
" माहीत नाही....आत्ता ठोस डोक्यात काही नाहीये..पण बचपन का प्यार भुला नहीं गया रे..."
" मूर्ख माणूस आहेस...तिच्या लग्नात मला सांगतोय मला सुमी खूप आवडायची...वेळ गेली होती तेव्हा.. साल्या मला तू साला म्हणून एक हजार वेळा चालला असतास. "
" बरं ते सोड आता... जुनं ..अजून वेळ गेली नाही....प्रेमाला वय नसतं.."
" ए,बाबा काही तरी अचाट उद्योग करू नको...बस"
" नाही रे...फक्त इतकंच लक्षात ठेव..मला अधून मधुन गोष्टी विसरायला होतात...आणि समोरच्याने जर मला करेक्ट करायचा प्रयत्न केला तर मी आक्रमक होतो.. सुमीनी विचारलं तर याला हो हो म्हणायचं..."
****** ******* ******* *******
बेल वाजली....
सकाळी सात वाजता एवढ्या लवकर कोण आलंय...सुमित्रा मनात विचार करत दार उघडायला आली..
समोर सत्या पाहून...क्षणभर दचकली...स्त्री सुलभ भावनेनं तिनी पदर नीट केला केसांवरून हात फिरवला..
" अरे..तू आत्ता इतक्या सकाळी...अचानक..न कळवता.."
"आत येऊ की सगळ इथून सांगू...एक खुर्ची दे इतकावेळ मला उभ नाही राहता येणार बाहेर..बसून उत्तर देतो."
सुमी ला एकदम मनापासून हसू आलं...तिला जाणवलं किती दिवसांनी इतकं हसलो..
" अग इकडे एक काम होत..ते कॅन्सल झालं ..मग आठवल तू इकडेच राहते..जरा मस्त चहा पोहे..खाऊन जाऊ..."
" आत्ता कसलं काम काढला बाबा..इतक्या सकाळी. "
"... आठवत नाही सांगतो आठवल की."
सुमी आत चहा करायला गेली...सत्या ने हॉलचे पडदे उघडले..इकडे तिकडे पडलेले पेपर नीट लावून ठेवले.. कुषन्स नीट लावून घेतली.सोबत आणलेली सुमी ची आवडती निशिगंधाची फुल समोर एक पॉट होता त्यात ठेवली...बरोबर आणलेले अत्तर भिंतीच्या चार कोपऱ्यात मारले... सुमी ला निळा रंग आवडतो म्हणून सत्या निळा कुडता घालून आला होता..
सोबत सोन चाफ्याची वेणी... मोबाईलवर किशोरी अमोंणकर गात होत्या..अवघा रंग एक झाला....
चहा घेऊन बाहेर येई पर्यंत हॉल एकदम प्रसन्न वाटायला लागला.
"अरे काय रे.. एकदम कायापालट केलास ..."
" जहा हम वहा रुकता नहीं गम " हाहाहाहा सत्या स्वतःच हसला..
चहा झाला....जरा गप्पा झाल्या पण सुमी काही मोकळी होत नव्हती...
" तू,बस आता मी पोहे करतो.."
" नको...मी करते..तू बस गप्पा मार. "
" इतकी वर्ष तू आपल्या संसारासाठी केलस आता मी करतो."
" आपला संसार ??? "
" तू बस गाणी ऐक..."
सुमीला कुणी तरी ऑर्डर देण्यापेक्षा हक्क दाखवतय हे आवडलं...ती डोळे मिटून भजन ऐकत होती...समोर बाळपण ते आजवरचा काळ शून्य मिनिटात पुढे दिसला..लग्न..प्रेम म्हणजे काय हे माहीत नसलेला नवरा...नात्यात फक्त व्यवहार बघणारा, फायदा तोटा बघणारा जोडीदार, पैसा असून तो बायको साठी नसून फक्त स्वत:च्या चैन पुरी करायला वापरायचा का तर तो नवऱ्याच्या मेहनतीचा...मुलगा झाला जगायला बळ मिळेल अस वाटलं तर मुलगा बापाचे सगळे गुण घेऊन आलेला..हेकेखोरपणा, तापटपणा, हव्यास ,पैशाचा लोभ..बाप लेक ना कधी खरं जीवन जगले ना जगू दिले...फक्त व्यवहार जपत राहिले.आपल्याला झाडं, गाणी, फुलं,पुस्तक, किती आवडायचे... सगळं विसरून गेलो...
" पोहे..तय्यार.."
डोळे पुसत ...ती एकदम विचारातून जागी झाली..
" सगळ मिळालं तुला...मस्त झालेत..किती वर्षांनी खाते आहे तुझ्या हातचे. "
" हो ग..कामात मला तुझ्या कडे लक्ष द्यायला ,तुझी आवड जपायला वेळ मिळाला नाही...आज आपण नवीन सुरवात करू.. नाश्ता करू तू फ्रेश हो..मग मस्त आठवडी बाजारात जाऊन भाजी आणू ".
" काय बडबडत आहेस..बरा आहेस ना .सकाळी घेऊन आलास की काय.. "
" तू आवर ग..इतक्या वर्षाचे सगळे काम ,प्रेम ,तुझ्या हक्काचा वेळ पेंडींग आहे. जा जा आटप भाज्या संपतील..मी लिस्ट करतो तोवर. "
सुमी पूर्ण बधीर झाली होती..हे काय रूप आहे सतिशच...
आत जाऊन तिनी आधी दीगूदादाला फोन लावला..
" दादा, अरे सत्या आलाय..आणि आपला संसार..तुला वेळ देतो.. पेंडींग प्रेम वैगेरे बडबडत आहे...बरा आहे ना तो. "
" हो,हो अग त्याला आजार झाला आहे.लग्न न केल्या मुळे एकटे पणाने त्याला असा झटका येतो..घाबरु नको त्रास नाही देणार काही तो..फक्त थोडावेळ त्याच्या मर्जीनुसार वाग..त्याला क्रॉस करू नको नाहीतर तो आक्रमक होतो म्हणे. गेला तो की कर मला फोन."
सुमीनी वसू ला फोन लावला तिचा पण हाच सुर...नाईलाजाने सुमी तयार झाली.
सुमी छान साडी नेसून आली...दोघांनी मिळून भरपूर भाज्या खरेदी केल्या... तिच अस नवऱ्या सोबत नवऱ्याच्या आवडीची भाजीखरेदी करायचं खूप साधं स्वप्न होत..पण नवऱ्याला हे कमीपणाच वाटायचं..
येताना नर्सरी दिसली सत्या थांबला...बऱ्याच कुंड्या आणि झाडं खरेदी झाली... सुमी भरभरून झाडांची खरेदी करत होती...
सत्यानी तिथल्या मुलाला पैसे दिले आणि घरचा पत्ता देऊन सगळ सामान तिथे दुपारच्या आत पोचवायला सांगितलं.
घरी येऊन पुन्हा एक चहाची फेरी झाली.
" सत्या अरे काम आठवल का तुला ..कोणत्या कामाला आला होता सकाळी. "
" काम सुरू आहे माझ तेच. "
'" काय ..म्हणाला..."
" जेवायला काय करू मी करतो..मस्त काहीतरी..आपल्या लग्नात तुला म्हणालो होतो ना मला जेवण बनवायला आवडत. आज करतो..काय करू बोल."
" काहीही.." सुमीला काही टोटल लागत नव्हती..
सत्यानी तिच्या लहान पाणीच्या सगळ्या आवडी आठवून जेवण बनवल होत...आज ती तिच्या घरात पहिल्यांदा राणी सारखी राहत होती...
जेवण होईपर्यंत नर्सरी मधून झाडं, माती, कुंड्या आल्या...
पुन्हा जरा गप्पा झाल्यावर दोघं..झाडांच्या मागे लागले.. तीन तास कसे गेले समजले नाही...आता दोघं दमले होते..जरा विश्रांती झाल्यावर सुमीनी दोघांना चहा केला...
" सुमित्रा, एक विचारू...आपला दिनेश कायमचा परदेशी गेला याचं तुला वाईट वाटत आहे का...एकटेपण आलाय का?"
" आपला...??? अरे नाही रे तो एक ना एक दिवस जाणार हे नक्की होतं..तो पैसा, प्रसिद्धी, दिखावा या दुनियेत खूप अडकला आहे..जाताना तो मला न सांगता गेला..एक चार ओळीची चीठी ठेऊन याच वाईट वाटलं...ना एक फोन ना मेसेज, मी जगले की मेले त्याची पण त्याला काही काळजी नाही..जन्म दिलेली आई आहे रे मी त्याचीं. बाप आपल्या आई ला चप्पल सारखा वागवयचा हे तो बघत वाढला त्याला पण आई कधी आई वाटलीच नाही ती एक कर्तव्य पूर्ण करणारी बाईच वाटली कायम.. बर जाताना एक हे घर आणि माझे थोडे सेविंगज ठेऊन बाकी सगळं परस्पर माझ्या सह्या घेऊन विकून गेला... नशिब हे घर तरी ठेवलं..देवांनी बुध्दी दिली. एक आई आणि एक बाई यांची स्वप्नं या बाप लेकानी वेळोवेळी ठेचली... आता ताण सहन होत नाही....मनात विचारांचा इतका पसारा झालाय की तो आवरावासा वाटत नाही...किती छान जग होत ना साधं आपलं...आणि कुठे येऊन पडले असं झालं...असो, नवरा गेला मुलगा असा पळाला..भावाला भावाचे व्याप,दुखणी मग राहते आता आपल्याच जगात एकटी..अचानक सुमीला ढसाढसा रडू यायला लागलं.
रडण्याचा आवेग ओसरल्यावर..तिच्या खांद्यावर थोपटत सत्या म्हणाला...
"सुमा, मी नाही वेळ देऊ शकलो..पण अजून उशीर झाला नाही.. आपण पुन्हा सुरुवात करू. "
" सत्या खर सांग तू का आलाय. बस आता ही बडबड तुझी."
"घरचा आणि तुझ्या मनाचा पसारा आवरायला...आपला संसार सावरायला.. "
" एक विचारू ...दादाला सकाळी फोन केला होता. त्याने तुझा आजाराबद्दल सांगितलं हे खर आहे की लहान पणी कसे दोघं माझी खेचायचात तस दोघांचा काही कारस्थान आहे. "
"ऐक...मी जे सांगेन ते शांतपणे...एकदम व्यक्त होऊ नकोस..मला तू आधी पासून आवडायची...तुझ्या शी लग्न हे माझं स्वप्न होत..पण मला तुला विचारायला उशीर झाला तोवर तुझं लग्न माझ्या पेक्षा चांगल्या मुलाशी ठरल होत..मला तुला आणि दिगंबरच्या मैत्रीला गमवायच नव्हत....तू मला आवडते हे मी दिग्याला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगितलं पण वेळ दोघांच्या हातून निघून गेली होती..म्हणून मी आजही लग्न केलं नाही..तुझी मनातली जागा मी कुणाला देऊ शकणार नव्हतो.
तू संसारात सुखी आहेस हे समजून आणि तुझ्या नवऱ्याचा स्वभाव श्रीमंतीचा थाट म्हणून तेव्हा आम्ही तुझ्या संपर्कात नव्हतो.तू खुश आहेस इतकंच आम्हाला हवं होत..पण तू खुश असल्याचा दिखावा होता..हे आत्ता कळतय.. मला काही आजार नाहीये..दिनेशच्या जाण्याने तू खूप खचली हे कळलं आणि दिग्यानी ती जबाबदारी माझ्यावर दिली..म्हणून हा सगळा खेळ..तू आज भरभरून जगलीस , हसलीस, रडलीस ,मोकळी झालीस..माझे काम फत्ते झाले."
दहा मिनिटे सुमित्रा फक्त रडत होती...आज खूप वर्षांनी तिचा कुणी तरी विचार केला होता, दखल घेतली होती..
" थ्यांक यू.." पूर्वीचे एक खट्याळ हसू आणून ती म्हणाली.
" आजुन एक बोलू.. "
" ह्ममम..."
" बघ विचार कर अजून पण आपण नवीन सुरवात करू शकू..प्रेमाला वय नाही.आणि मी तर माझे प्रेम चाळीस वर्षा पूर्वी बांधून ठेवलं म्हणजे ते आत्ताशी पंचविशी च आहे..तुझ तू बघ... म्हातारं झालय का ते....आणि माझी नाही ऐकायची पण तयारी आहे तू त्याच टेनशन घेऊ नको..आता या वयात मनाचा पसारा सांभाळणारे हवे असतात..पाठीशी नाही सोबत असणारे हवे असतात...आंजरणारे नाही
गोंजरणारे हवे असतात...मी निघतो...रात्री मस्त जेव. दुपारचे आहे तुझ्या पुरते शिल्लक...विचार करून झाला तर मला उद्या नाश्ता करायला बोलावं. तुझा फोन आला आता सकाळी उद्या तर मी समजेन तुझा होकार आहे आपल्या नवीन नात्याला आणि फोन नाही आला तरी आपली मैत्री अशीच राहील.एकच लक्षात ठेव आता स्वतःसाठी जगून बघ."
****** ****** ******
घरी येऊन सत्यानी दिगंबरला मेसेज केला मिशन डन आणि शांत झोपला..
सकाळी सात वाजता मोबाईलच्या रिंग नी त्याला जाग आली...
" अजून झोपला आहेस...मला वाटलं माझ्या फोन ची वाट पाहत असशील....किती निवांत आहेस ...ये लवकर तुझी आवडती थालीपीठ लोणी बेत आहे नाश्त्याला..."
सुमीचा नेहमीचा उत्साहपूर्ण आवाजात आलेला फोन...लाईफ मिशन आत्ता नवीन जोमाने सुरू होणार होती.
जुन्या प्रेमाला सोबतीची नवी पालवी फुटली होती....प्रेमाला वय नसत...पण योग्यवेळी , गरज असेल तेव्हा योग्य प्रेम मिळणं यासाठी नशीब लागत.
रमा..
रेश्मा डोळे
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box