सोनेरी सुरुवात - डॉ. शकील मोमीन

सोनेरी सुरुवात

डॉ. शकील मोमीन


यंदा मुले जरा जास्तच उत्साहात होती. परदेशातून थोरली संपूर्ण कुटुंबासह, तर धाकटी आपल्या

कुटुंबासह पुण्याहून येणार होते. मुलगा सून आणि नातवंडे तर उत्साहात तयारच होते. आणि कारण ही तसेच

होते. आमच्या लग्नाला पन्नास वर्षे होणार आहेत आणि मुलांनी तो दणक्यात साजरा करावयाचा याचा चंग

बांधला होता. आतापर्यंत मुलांचे वाढदिवस, त्यांची लग्ने किंवा नातवंडांचे आनंद सोहळे नेहमी साजरे करीत

राहिलो. स्वतःचे किंवा लग्नाचे वाढदिवस थोडक्यात नावापुरते साजरे करणारे आम्ही, या मोठ्या समारंभाच्या

कल्पनेनेच धास्तावलेले होतो. इतक्या वर्षाच्या कौटुंबिक वाटचालीत स्वतःसाठी कोणता सोहळा आम्ही कधी

कल्पिलाच नव्हता. या नवीन पिढीने आमच्या आचारविचारांचेच नूतनीकरण करावयाचे ठरविल्याने हे प्रकरण

उद्भवले होते.

लग्नाला पन्नास वर्षे, म्हणजे, जरा जास्तच होतात नाही का? पण झालेत खरे! जुळवलेले लग्न म्हणजे

जुळवलेले प्रेम करीत आम्ही हा पन्नास वर्षाचा संसार उभा केला. संसार वेलीला लागलेल्या तीन फळांना

आणखी फळे मिळाली आणि संसार वृक्ष तयार झाला. मुलगा, दोन मुली, दोन जावई, सून आणि नातवंडे मिळून

आम्हा दोघांसहित चौदा जणांचे हे भक्कम कुटुंब उभे राहिले. अर्थात आम्ही सगळे एकत्र येण्याचा, हा पन्नासावा

वाढदिवस, हा कदाचित अद्वितीय प्रसंग ठरेल. नातेवाईक मित्रमंडळी असा बरच गोतावळा या

कार्यक्रमानिमित्य एकत्र येणार होता. त्यासाठी आमची ही नवीन पिढी अतिशय उत्साहात कार्यरत होती.

पन्नास वर्षाच्या या भल्या मोठ्या कालखंडामुळे मला जरासे दडपणच आले. परंतु या निमित्य थोडे

सिंहावलोकन करणे आवश्यक आहे असे वाटू लागले. आणि या समारंभापूर्वी एकदा का होईना पत्नीबरोबर

आपल्या या सहजीवनाबद्दल बोलले पाहिजे असे मला वाटू लागले.

पन्नास वर्षांपूर्वी एम डी पास व्हायच्या अगोदर घरात माझ्या लग्नाचा विचार सुरु झाला. कोणत्यातरी

गाफील क्षणी मीही मान्यता दिली. साग्रसंगीत स्थळांची चौकशी सुरु झाली आणि अस्मादिक सुटी घेऊन मुलगी

पाहणे या कार्यक्रमास हजर झालो. पहिल्याच कार्यक्रमात मुलगी पसंद करून मोकळा झालो. दोन्हीकडील

वडिलधाऱ्यांनी विचार विनिमय करून लग्न ठरविले. माझी मिळणारी शैक्षणिक डिग्री आणि तिचे सौन्दर्य

याशिवाय इतर बाबींचा कोणी विचार केला की नाही कोणास ठाऊक? माझ्या मुलांच्या लग्नाच्या वेळी मी

जेव्हढा विचार किंवा चौकशी केली होती, तेव्हढी माझ्या लग्नाच्या वेळी आमच्या दोन्हीकडील वडिलधाऱ्यांनी

केली नसेल असे मला वाटते. परंतु असो, आमचे लग्न झाले. संपूर्णपणे अनोळखी अशी ही ‘बायको’ माझ्या

जीवनाशी जुडली गेली. लग्नापूर्वी अगदी बघावायच्या कार्यक्रमात देखील एक शब्द न बोललेल्या व्यक्तीशी मी

आयुष्यभरासाठी बांधला गेलो होतो.

प्रचलित काळात आधुनिक समजला जाणारा निर्णय मी घेतला आणि लग्नानंतर तीन दिवसांनी चार

दिवसासाठी मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जाण्याचा निर्णय जाहीर केला. घरच्यांनी ही मान्य केला, मनापासून

की नाईलाज म्हणून माहीत नाही. मधुचंद्राच्या वेळी एकमेकांची चांगली ओळख होईल असा अंदाज होता.

बायकोने मला ओळखले की नाही माहित नाही, परंतु मला तरी तिची तितकीशी माहिती मिळाली नाही. तिला

 

बोलते करण्याच्या नादात मी एकटाच बोलत होतो. ज्याप्रकारचे सामाजिक परिस्थितीत आम्ही दोघे मोठे

झालो होतो, त्यामध्ये अजूनही एकमेकांशी मुक्तपणे बोलणे अवघडच वाटत असे. मधुचंद्रामध्ये शारीरिक मिलन

तर झाले परंतु मानसिक मिलन अजून लांबच होते. आणि एकरूपकता तर क्षितिजापार!

गेल्या पन्नास वर्षाचे आयुष्य जर पाहिले तर संपूर्ण जीवन ‘कर्तव्य’ या एकाच भावनेने व्यापलेले दिसते.

मी आदर्श पती, पिता अशा भूमिका आणि ती आदर्श पत्नी आणि माता या भूमिकांना न्याय देण्यात गर्क होतो.

तत्पूर्वी लग्न झाल्या झाल्या आम्हाला आदर्श मुलगा आणि आदर्श सून या भूमिका निभावणे जास्त गरजेचे होते.

लहानपणापासून आमच्या घरात किंवा एकंदरीतच समाजात लग्नानंतर मुले बायकोच्या ताब्यात जातात आणि

आईबाबांना त्रास देतात असा समाजमान्य प्रघात आहे आहे असे समजले गेलेले असते. आणि आपला मुलगा

त्याला बळी पडू नये म्हणून जमेल तेव्हढे आदर्शपणाचे नियम त्याच्या मनावर कोरले जातात. जवळ जवळ

त्याचे ब्रेन वॉशिंगच केले जाते. त्यामुळे लग्नानंतर बायको बरोबर जास्त वेळ बोलले किंवा घेऊन फिरायला

किंवा चित्रपटाला गेलो तर गैरसमज होईल असेच वाटत राहावयाचे. आदर्श सून पण आपल्या भूमिकेला

चिकटून राहत असे. त्यामुळे प्रणय म्हणजे रोमांस काय असतो याचा अनुभवच आम्ही कधी घेतला नाही.

व्यवस्थित रित्या व्यवसाय करून आर्थिक स्थिरता मिळवणे हा एकच जीवन उद्द्येश समोर ठेऊन मी कार्यरत

होतो, तर, घर व्यवस्थित चालविणे हा उद्द्येश माझ्या बायकोचे जीवन व्यापून राहिला होता. आम्ही

कुटुंबासाठीच आपले सर्व कांही खर्च करीत होतो, परंतु स्वतःसाठी किंवा एकेमेकांसाठी वेळ देणे आमच्या

कार्यक्रम पत्रिकेत नव्हते. कदाचित जन्मपत्रिकेत देखील असेच लिहिलेले असेल.

आमच्या सहजीवनाला सुरुवात अशी झाली. माझे संपूर्ण लक्ष आपली प्रॅक्टिस वाढविणे आणि ती

टिकवणे याकडे केंद्रीभूत झालेले होते. आणि बायकोचे सासुरवाडीत कसलाही क्लेश होऊ न देता संसार

चालविणे याकडे जास्त लक्ष असे. तरीही क्लेशाचे प्रसंग येत होते, परंतु कसेबसे आम्ही त्यातून तावून सुलाखून

बाहेर येऊ शकलो. या कालावधीत एकमेकांशी संवाद हा कामापुरताच होत असे. होय कामापुरताच!

एकेमकांशी संवाद हा कौटुंबिक स्थिरता या व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर होत नसे. एकमेकाला

ओळखणे म्हणजे अंतरंगाची ओळख करून घेणे हे जस जसा काळ पुढे सरकत गेला तसे आपोआप होत गेले.

त्यासाठी वेळ दिला, किंवा विचार केला, असे कांही घडलेच नाही. कर्तव्य हीच भावना सर्व मन व्यापून

राहिल्याने मनातील इतर भावनांना जागाच नसायची.

मुले झाल्यानंतर मुलांच्या साठी वेळ देणे हा दोघांसाठी प्राधान्यक्रम झाला. होय त्यामुळे नक्कीच

आमच्या दोघांमधील संवाद वाढला. मुले ही दोंघांच्या समान स्वारस्याची बाब होती. तत्पूर्वी दोघांना स्वारस्य

असेल किंवा दोघांना रस वाटेल असे विषय आम्हाला फार क्वचितच मिळत असतं. वैद्यकीय व्यवसाय सोडून

माझे कल्पनाविश्व दरिद्री होते आणि कौटुंबिक व्यवस्थापन याच्या बाहेर तिला विचारच करता येण्यासारखी

परिस्थिती नव्हती. मुलांच्या बाळलीला पासून त्यांची वाढ, शिक्षण याकडे लक्ष देणे आम्हां दोघांना आवडत

असे आणि तोच खरे म्हणजे आम्ही एकेमकांच्या जास्त जवळ येण्यासाठी उपयुक्त धागा ठरला. तरीही आमचे

वैष्णव वेगवेगळेच असावयाचे. कधीतरी मुले होण्यापूर्वी आणि नंतर ही मित्रांच्या बरोबर पार्टीसाठी किंवा

सहलीसाठी जाणे आम्ही आवर्जून करीत होतो, परंतु तेही यानंतर बंद पडले. आमची आणि मित्रांची देखील मुले

जसजशी मोठी होऊ लागली तसतसे आम्ही त्यांच्या व्यापात जास्त गुंतू लागलो. थोडी जास्त मोठी झाल्यावर

 

मुले आमच्याबरोबर पार्टी किंवा सहलीला येईनाशी झाली, तेंव्हा कोठे आम्ही दोघे अर्थात मित्रमंडळींच्या

बरोबर सहलीला जाऊ लागलो. अशा पद्धतीने लग्नानंतर वीस एक वर्षांनी आमचे थोडेबहुत सहजीवन सुरु

झाले. नंतर मुलांची लग्ने या विषयावर आमचे गुंतून पडणे क्रमप्राप्त होते. लग्ने झाल्यावर नातवंडे आली, आणि,

आमची जवाबदारी वाढली. एकेमकांबरोबर संवादाला विषय जरी वाढले तरी व्याप ही वाढले आणि

एकमेकाला वेळ देणे परत कमीच झाले.

बायकोच्या वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला कांहीतरी भेटवस्तू देणे आणि

माझ्या वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला मला आवडणारे मिष्ठान्न बनवणे हा आमचा दोघांचा

एकमेकांबद्दल प्रेम दाखवण्याचा राजमार्ग असतो. परवा बागेत नातींबरोबर फिरत असताना एक चांगले फूल

तोडून नातीने माझ्या हातात दिले आणि हे आजीला देऊन तिला 'आय लव्ह यु' म्हणा असा सल्ला दिला.

खरोखर, हल्लीची पिढी खूपच पुढे आहे. पन्नास वर्षाच्या या कालावधीत हे वाक्य मी किंवा माझ्या पत्नीने केंव्हा

उच्चारले असेल, मला आठवत देखील नाही. परंतु हल्लीच्या पिढीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. प्रेम आहे, प्रेम

असेल तर नक्की दाखवा. एक वेळ कोणाबद्दल राग, द्वेष असेल तर तो लपवून ठेवला तरी चालेल, किंबहुना तो

दर्शवू नकाच, परंतु, प्रेम निश्चित दर्शवा. हाच खरा जीवनाचा मूलमंत्र आहे.

स्त्रिया या जात्याच धार्मिक असतात. खरे म्हणजे प्रत्येक धर्म हा पुरुषप्रधान जीवनप्रणाली गृहीत धरून

च अस्तित्वात आलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक धर्मात नकळत असेल किंवा स्पष्ट पणे असेल, परंतु थोडाफार

अन्याय झालेलाच आहे. स्त्री च्या सरंक्षणाच्या नावाखाली स्त्रीचे स्वातंत्र्य बहुतेक धर्मानी मर्यादित ठेवले आहे.

जणू मर्यादेत राहणे ही स्त्रीची नैसर्गिक प्रवृत्ती आहे किंवा असावी अशी धर्माची नैसर्गिक शिकवण आहे. माझी

पत्नी देखील धार्मिक प्रवृत्तीची आहे, आणि, मी थोडासा नास्तिक वाटावा असा! मला धार्मिक शिकवणी बद्दल

फारसे आक्षेप नाहीत, जर ते मानवतेला धरून असतील तर! परंतु धार्मिक कर्मकांडांचा मला तिटकारा वाटतो.

माझ्या मते जर स्वर्ग, नरक हे आपल्या कर्माच्या हिशेबाने आपल्याला मिळणार आहेत तर मग या कर्मकांडाने

काय साध्य होणार आहे? मला वाटते जर माझ्या हातून नकळत पाप घडत असेल किंवा झालेले असेल तर

भक्ती, प्रार्थना वगैरेमुळे त्या पासून होणाऱ्या पुण्यप्राप्तीमुळे माझे पाप धुतले जातील. परंतु जर मी जाणून बुजून

पाप केले असेल तर मला शिक्षा ही मिळालीच पाहिजे, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्मकांड उपयोगी पडता

कामा नये. त्यामुळे मी कर्मकांडाच्या फार भरीस पडत नाही. परंतु पत्नीच्या कोणत्याही श्रद्धेस माझा विरोध

नाही. रमजानच्या पूर्ण महिन्यात ती रोजे करते. दिवसभर म्हणजे जवळजवळ चौदा, पंधरा तास निर्जळी

उपवास करते. त्या परिस्थितीत देखील माझे जेवणखाण व्यवस्थित राहील याची ती काळजी घेते. अप्रक्षपणे

मला रोजे करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न तिने सुरुवातीला केला होता, परंतु, मी कांही लक्ष दिले नाही. तिचे

रोजे मात्र अव्याहतपणे सुरु राहिले. बरीच वर्षे हे सुरु होते, परंतु कालांतराने मला ही गोष्ट अस्वस्थ करू

लागली. स्वतः निर्जळी उपवास करून ती घेत असलेली माझी काळजी मलाच अस्वस्थ करून गेली आणि गेली

वीस पंचवीस वर्षे मी प्रामाणिकपणे रमजान चे रोजे करतो. कदाचित कर्मकांड माझ्या नशिबी लिहिले असतील

परंतु सहजीवनात एव्हढातरी त्याग करणे आवश्यक आहे,. हो, आणि त्यामुळे फिटनेस थोडा चांगला झाला

लाभ पण आहेच!

 

गेली पन्नास वर्षे आमचे हे सहजीवन सुखाने सुरु आहे. कर्तव्याने सुरुवात झालेल्या आमच्या या

नात्याला एकमेकांबद्दल काळजी, आदर आणि विश्वास या गुणांची जोड मिळाली. यालाच प्रेम म्हणावयाचे

काय? प्रेम म्हणजे काय? एकमेकांबद्दल वाटत असलेल्या याच भावना महत्वाच्या आहेत. तारुण्यात असलेली

आसक्ती कदाचित कमी झालेली असेल, परंतु इतर भावना थोड्या जास्त प्रगल्भ झालेल्या असतात. तारुण्यात

असलेल्या शारीरिक आसक्तीचे रूपांतर मानसिक आसक्तीत झाले तर ते प्रेम वयानुसार प्रौढ झाले म्हणावयास

हरकत नाही.

या पन्नास वर्षाच्या कालावधीत आम्ही संसाराला भरपूर वेळ दिला. आमचे पालक, आमची मुले आणि

सर्व समाज यांना वेळ देत, तेच, महत्वाचे मानून आम्ही संसार केला. यानंतर तरी आम्ही एकमेकांसाठी वेळ देणे

आवश्यक आहे असे मला वाटते. खरे म्हणजे आतापर्यंत आम्हाला या सर्वांची गरज होती आणि त्यांना ही

आमची गरज होती. या पुढे आम्हाला आमच्या मुलांची आणि समाजाची गरज भासणारच आहे, परंतु त्यांना

आमची गरज आहे का? कदाचित नाही. किंबहुना आमची गरज असू नये हाच खरा काळाचा न्याय आहे. मात्र

यापुढे आम्हाला मात्र एकमेकांची पूर्ण गरज आहे. आणि प्रेम प्रेम म्हणजे कांही असेल तर ते याच काळात

कार्यरत असले पाहिजे, दृष्टीस पडले पाहिजे किंवा आमच्या जीवनाचा मार्गच असला पाहिजे. या लग्नाच्या

पन्नासाव्या वाढदिवसाला मी पत्नीला ही पन्नास शब्दांची शब्दांजली अर्पण करणार आहे. होय, पन्नास वर्षानंतर

का होईना आमच्या प्रेमाची सोनेरी सुरुवात होणे आवश्यक आहे.

कर्तव्याच्या ओझ्याखाली तारुण्य सारे दबून गेले,

आज उद्याच्या चिंतेत स्व मात्र हरविले.

इतरांना स्पेस देता देता स्वतःची स्पेस हरवली.

खूप झाले जगासाठीचे जगणे,

आता फक्त तू आणि मी असेच हवे जगणे.

आता कांही स्वप्ने नकोत,

नकोत कोणत्या ईच्छा, आकांक्षा.

वर्तमान हा एकच काळ आहे आपला, आणि,

तो आपण मनपूर्वक जगूया.


डॉ. शकील मोमीन


disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments