अनोखी गाठ - प्राजक्ता अवसरे

अनोखी गाठ........

 प्राजक्ता अवसरे

 

        नातं निभावलं की नात्याला नाव

        सहज मिळतं आणि कळत नकळत

       "ही अनोखी गाठ"बांधली जाते.......

             मानसी एक मध्यमवर्गीय मुलगी.साधारण २४-२५ वर्षाची.स्वभावसुद्धा शांत,प्रेमळ, मनमिळाऊ.कोणाशी फटकून वागणं तिला माहितचं नव्हतं.लहानपणापासून आपल्याच विश्वात रमणारी.कुटुंबाबद्दल प्रचंड आत्मियता.. संस्कृती, परंपरा जपणारी... आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन केले होते.तिचे वाचन,लेखन, रांगोळी, पाककला सर्वांमध्ये अव्वल स्थान असायचे.असं सर्व चालू असताना 'मुलीचं लग्नाचे वय झाले आहे..लवकर बोलणी सुरू करा'...असं सगळीकडे सुरू होते.तिला मात्र आपलं स्वच्छंदी आयुष्य छान आवडायचं.. त्यामध्ये ती समाधान शोधायची.

         तिला तिच्या जबाबदारीची हळूहळू जाणीव होऊ लागली.तिने घरातील जबाबदारी हसत हसत सांभाळली.अशातच एक दिवस तिला एक चांगल अनुरूप स्थळं आलं.मध्यम उंचीचा दिसायला स्मार्ट, हुशार,समंजस,देखणा होता.तोसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातीलच पण स्वतःच्या हुशारीने, स्वकष्टाने, स्वकर्तुत्वाने त्याने उत्तुंग भरारी घेतली होती.परदेशात तो नोकरीसाठी होता आता त्याचे वय लग्नाच्या योग्य झाल्याने मुलींचे स्थळं बघणे सुरू झाले.त्या मुलांचे नाव होते.... मंदार.... नावाप्रमाणेच शांत, प्रेमळ, सुस्वभावी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी हसत हसत सांभाळली.

          एक दिवस अचानक मानसीच्या घरी मंदार त्याच्या नातेवाईकांसोबत आला.फार मोघम शब्दात त्याने तिला काही विचारले....

        "अबोल प्रिती गेली बोलून

         लोचनातूनी निळ्या अथांग

        दोष नसे हा तुझ्या मनीचा

        ज्या तुझ्या नजरेला सांग......."

अशा प्रकारे एका भेटीत,एका नजरेत ते दोघे एकमेकांच्या मनात उतरले.मानसीला तर आकाश ठेंगणे झाले असे वाटू लागले.तिला मनापासून त्याच्याविषयी प्रेम झाले होते.तिनं आजवर असा विचार कधीच कोणाच्याही बाबतीत केला नव्हता.कॉलेजमध्ये असताना तिला या सगळ्या गोष्टी मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता.हळूहळू त्यांच्यात बोलणं, भेटणं वाढलं.एकमेकांना ते ओळखू लागले.मानसीला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधायला आवडायचे.मंदारला तिच्यातील हाच गुण जास्त आवडला होता.ती आपलं हृदय केव्हाच हरवून बसली होती.त्याचही व्यक्तीमत्व साजेस होते.त्यालाही साधं,सरळ आयुष्य आवडायचं.

       मानसी आणि मंदार यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली.लग्नानंतरत ते दोघं परदेशात जाणार होते.काही वर्ष तिथे राहणार होते मग पुन्हा आपल्या मायभूमी कडे येणार होते.या सगळ्यात मानसी खूपच खुश होती.तिला हे सर्व स्वप्न असल्यासारखे वाटत होतं.साखरपुडा,लग्न यामध्ये जास्त अंतर नव्हते.अपेक्षेपेक्षा सुंदर सगळ्या गोष्टी घडत असल्याने मानसीच्या चेहर्यावर वेगळेच तेज होते.

         ठरल्याप्रमाणे सर्व रितीरिवाज प्रमाणे पार पाडले गेले.निरोपाची वेळ आली.सगळ्याचं मुलींसाठी अवघड असा क्षण.... मनासारखा जोडीदार निवडला तरीही माहेरच्या माणसांना निरोप देताना गहिवरून येतेचं.'दिल्या घरी तू सुखी रहा.'असा साश्रू नयनांनी मानसीची सर्व नातेवाईकांनी पाठवणी केली.जड पावलांनी मानसीने सर्वांना निरोप दिला..... लहानपणापासूनच्या सर्व आठवणी तिच्या मनात दाटून आल्या.तिचे सांत्वन करायला मंदारने अलगद तिला कुशीत घेऊन तिला आपल्या मिठीत शांत केले.तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला आधार दिला..... तिच्यासाठी ही गोष्ट आयुष्यभरासाठी लक्षात राहिली...

          त्यानंतर रितीरिवाज प्रमाणे सर्वांनी त्यांचे स्वागत केले.दोघांचा जोडा अनुरूप होता.अशातच दोन महिने कसे गेले समजलं नाही.. दोघांनाही परदेशात जायचे होते त्या सगळ्या गोष्टींची धावपळ सुरू होती.दोघांनी आपल्या नातेवाईकांसोबत वेळ घालवला.या दोन महिन्यांत मंदारने मानसीला खूप आनंदी ठेवलं.तिने सुद्धा अगदी मुक्तपणे त्यांच्यावर प्रेम केलं तिच्या सर्व इच्छा त्याने पूर्ण केल्या.त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती.अशातच त्यांच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्यांच आगमन झाले.मानसीच्या आयुष्यातील हा सुखद क्षण.आपण एका गोंडस बाळाला जन्म देणार या विचारांनी ती हरखून गेली होती.परंतु या सगळ्यात परदेशात कसं जायचं?काय करायचं? या विषयावर चर्चा झाली.सर्वानी बाळाला  जन्माला नंतर घालायचा सल्ला दिला परंतु मंदार,मानसी यांना हे पटत नव्हते.त्या दोघांच्या प्रेमाचं ते पहिलं प्रतिक होते.त्या एवढ्याशा बाळाचा चेहरा त्यांना समोर येऊ लागला.ते सुख त्यांना गमवायचे नव्हते.कोणतीही प्रार्थना न करता येणार सुख त्यांना नाकारायचे नव्हतं.

          शेवटी अंतिम निर्णय ठरला.‌दोघांनी त्या बाळाला जन्मास घालण्याचा निर्णय घेतला.दोघांसाठी हे खूप कठीण होते कारणं.मंदार दोन वर्षांसाठी परदेशात जाणार होता.त्याचा तसा करार होता. मानसी आपल्या आईवडिलांकडे किंवा तिच्या सासरी राहणार होती.

           जड अंतःकरणाने दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.दोघांनी खूप कमी वेळात एकमेकांना वेळ दिला होता, एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या होत्या.ते दोघं एकमेकांना समजून घेत होते.जिवापाड प्रेम करत होते.दोघांकडे बघून असं वाटायचं की,हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत.

          या दोन वर्षांत मानसी खूप बदलली होती.मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.मंदारची खूप आठवण यायची तिला.त्याचा अलगद होणारा स्पर्श, प्रेमाने मारलेली मिठी, सगळ्या आठवणींनी तिला खूप भरुन यायचं.छोट्या, छोट्या  गोष्टींनी तिला गहिवरून यायचं पण तरी ती खूप संयमाने वागत होती.आपला स्वाभिमान जपत होती.ती आनंदी,खुश राहण्याचा प्रयत्न करायची.तसं फोनवर त्या दोघांचं बोलणं असायचं.पोटातील बाळाशी संवाद साधायची.त्या बाळाच्या  आवडीनिवडी जपायची.इवल्याशा बाळाशी बोलू लागली.पण मन मात्र तिचे मंदारच्या येण्याकडे होते.बाळाच्या जन्माच्या वेळी तरी मंदारने यावे अशी तिची इच्छा होती.त्या बाळाचा पहिला स्पर्श मंदार ने करावा असं तिला खूपदा वाटायचं.

           कधी नऊ महिने होऊन गेले समजलेच नाही अशातच एक दिवस मंदार आला.बाळ्याच्या भेटीसाठी.... दोघांनी त्याच्या स्वागताची तयारी केली होती.ठरलेल्या वेळी बाळाचे स्वागत झाले.त्यानंतर मंदार पुन्हा आपल्या कामासाठी परदेशात गेला.खरं तर त्याला ते बंदिस्त जीवन नाही आवडायचं पण नाईलाजाने जावं लागायचं.जड अंतःकरणाने त्याने मानसीचा, बाळाचा निरोप घेतला.मंदारला आपल्या बाळाची,मानसीची खूप आठवण यायची कधी एकदा हा विरह संपतो असं काहीसं त्यांच्या मनाचं झालं होतं.इकडे मानसीची अवस्था काही वेगळी नव्हती.परंतु दोघंही आपापली जबाबदारी पूर्ण करत होते.आता मानसी सोबत बाळाचा वेळ खूप छान जात होता.ती त्याच्यासोबतच आपला दिवस आनंदात घालवत होती.त्याच्याशी हसण्यात,खेळण्यात ती दंग होऊन जाई.पण....नियतीला ते मान्य नव्हते.... तिच्या मनात वेगळेच काही चालू होते.तिला मानसीच हे हसतखेळत जगणं नको होते तिला त्रास व्हावा म्हणून की काय.... मंदार सोबत नसल्याने तिला कठीण अशी सत्वपरीक्षा द्यावी लागली.तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले.तिच्याच माणसांनी तिला एकटं सोडून दिलं होतं.तिच्या भावनांचा कुस्करा केला गेला.ती खूप दुःखी झाली.मनातून हतबल झाली.आपलं असं काय चुकलं???? स्वप्नात सुद्धा तिने मंदार शिवाय कोणाचा विचार केला नव्हता तिने त्याला आपला देव मानले होते.भक्तीभावाने ती त्याची मनोमन पूजा करत होती.असं असूनही तिच्याच वाट्याला हे दु:ख का यावे.????? मंदारला हे सर्व सांगावे का... त्याच्या कामावरती ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल????  तो विश्वास ठेवेल का.....की सर्व संपवून टाकेल नातं....???? ह्या गोष्टीचा ती खूप विचार करू लागली.मंदारच्या येण्याची ती चातक पक्षासारखी वाट पाहू लागली.तिच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हते.परंतु तिला खात्री होती की, मंदार आल्यावर तो तिच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल.तिला या सगळ्या कडू आठवणींमधून बाहेर काढेल.तिला आपलं जीवन नकोसे वाटत होते पण त्या चिमुकल्या बाळाला पाहून ती स्वतःला सावरत होती.ज्या दिवसाची ती वाट पाहत होती तो दिवस अखेर आला.तिने त्याला सर्व परिस्थिति सांगितली त्याने ती समजून घेतली.त्याचा तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता,तो मनापासून प्रेम करत होता तिच्यावर....तिने लग्नाच्या वेळी आपल्यासोबत सप्तपदी  चालल्या त्यावर त्याचा विश्वास होता.ती चूकीची वागू शकत नाही ह्याची खात्री होती.तिने स्वतःचा आत्मविश्वास गमवला होता.मंदारने  तिच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहायचे ठरवले.तिला योग्य मानसन्मान मिळावा, स्वतःच अस्तित्व तिने पुन्हा मिळवावं यासाठी तो तिला सहकार्य करू लागला.तिच्या स्वप्नांना आकार येऊ लागला.हळूहळू ती स्वतःला बदलत होती.नवीन विषय शिकू लागली.स्वछंदी , आनंदी जीवन जगू लागली.मंदार मानसीच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या जीवनात सोनेरी क्षण आले.आता ती त्याच्याशिवाय श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हती.तिला तिच्या प्रेमाचा, त्याच्यावरील विश्वासाचा अभिमान वाटू लागला.  तिने कधीच विचार केला नव्हता की, आपल्या आयुष्यात एवढा मोठा प्रलय होईल.पण नियती पुढं आपण काहीच करू शकत नाही हेच खरं.संकटे येतात अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात...जीवलगांकडूनच होणारी मानहानी,सतत येणारं अपयश हे पाचवीलाच पुजलेले असते.पण यांतून यशाचा मार्ग काढता येतो.कष्ट, चिकाटी मेहनत, विश्वास ह्या बळावर मोठमोठ्या वादळांना सामोरं जाता येत.आपण ज्यांना  आपलं समजतो त्याच माणसांनी केलेली आपली फसवणूक, अवहेलना मनाला खूप त्रासदायक ठरते.तिला साथ मिळाली ती मंदारची..मंदारसारखा देवदूत ज्यांच्या नशीबी अशा मुली खरंच भाग्यवान.मंदार तिचा आधार बनला.

    कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणार...हात हातात घेऊन शब्दाविना जाणणार.... जीवाला जीव देणारं..... हक्कान रागावणारं....चूक झाली तरं मायेनं सांभाळून घेणारं.... स्वतःच्या दु:खातही समोरच्याच्या मनातील भावना जाणणारा... आयुष्याच्या वाटेवर शेवटपर्यंत साथ देणारं.... हवं असतं जीवनात कुणीतरी....मानसीला मंदार खूप जपत होता.तिची मनापासून काळजी घेत होता.तिच्या मतांचा, तिच्या विचारांचा आदर करत होता.उन्हाच्या चटका त्यालाही सहन कराव्या लागत होत्या पण त्याची झळ तो मानसीला लागू देत नव्हता....चिंता हजारो त्यालाही होत्या पण चेहऱ्यावर सदैव

प्रसन्नतेचे हास्य....न पेलणार ओझही तो सहन करत होता.धीराने, संयमाने सामोरा जात होता.अशाप्रकारे त्यांचा संसार आनंदाने,समाधानाने,सुखाचा सुरू झाला.

 - प्राजक्ता अवसरे



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

Post a Comment

0 Comments