अबोल ही प्रीत पहा - माधुरी वरुडकर

अबोल ही प्रीत पहा

माधुरी वरुडकर 

        दोन क्षणासाठी अरविंदचा डोळा लागला. एकाकीपणाच्या या निबिड अरण्यात रस्ता सापडणार का? चालता चालता त्याला दम लागला. घाम सुटला. डोळ्यावर ग्लानी येत होती. घ्यावी का विश्रांती? त्याने मनालाच विचारले. वटवृक्षाच्या लोंबणाऱ्या पारंब्या त्याने धरून ठेवल्या. दुरून कुठून तरी उर्मिलेचा चेहरा जवळ आला. अगदी निकट ! तिच्या चेहऱ्याचा स्पर्श, ओठांचा स्पर्श तो खूप सुखावला. अचानक तो चेहरा अंधुक अंधुक होऊ लागला. उषाजींचा चेहरा तरंग जवळ आला आणि त्याला खाडकन जाग आली

          आजकाल हे असंच होतं.अरविंद या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याची अस्वस्थता पार शिगेला पोहोचली होती. विचार करून त्याच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. आपलं काहीतरी चुकलं याची बोच त्याला लागून राहिली होती. आपण उषाजींना हा प्रश्न विचारायला नको होता. त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागलं. झोपेतून उठून त्याने येरझारा घालायला सुरुवात केली. तो गॅलरीत आला. आकाश निरभ्र होते. चंद्र चांदण्यांचा मंद प्रकाश सर्वत्र पडला होता. त्याला उर्मिलेची तीव्रतेने आठवण झाली. अशा कितीतरी सुंदर रात्री त्याने उर्मिलेबरोबर गॅलरीत गप्पा गोष्टी मारत घालवल्या होत्या.
' मला ना, चंद्र चांदण्यांनी भरलेलं आभाळ फार आवडते.' उर्मिला नवीन लग्न झाल्यावर त्याला म्हणाली होती. तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. पण तेव्हापासून तो सुंदर आकाशाकडे पाहू लागला होता. आणि चंद्र चांदण्यांशी बोलू ही लागला होता.

           मनात विचारांच्या वादळाने धिंगाणा घालायला सुरुवात केली. ती गेली आणि सर्व आयुष्य बदललं. त्याच्यासमोर तिची अनंत रूप तरळू लागली. तिने भरभरून दिलेलं सुख  आठवून आत्ताही तो त्यात तासान तास रमत असे. पण नुसत्या आठवणींवर नाही ना जगता येत. एकटेपणाचा विळखा  एकदा बसला की तो सोडता  येत नाही. किती असह्य आहे हे एकटेपण! या एकटेपणाच्या विचाराने त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो शांतपणे उठला .त्याने हळूहळू एक पेग रिचवला .हे ही उर्मिलेमुळे झालं. पेग रिचवल्याशिवाय झोप येत नाही .सवयच लागली आता! पण काय करणार?

              तळमळ तळमळ करत विचारांचा काहूर आठवणींच्या झुल्यावर झुलत राहिलं. डोळे जड झाले .डोळ्यासमोरच आकाश अंधुक झालं. तो कधी बिछानावर जाऊन झोपी गेला, हे त्याचं त्याला समजलं नाही.

               सकाळी तो नेहमीच्याच वेळेला उठला. योगा केला. बंगल्या भोवती लावलेल्या झाडांना पाणी टाकलं. स्नान करून देवपूजा केली. आपल्या हातून झालेल्या चुकीची माफी आज मागायची असे त्याने ठरवलं. आज बँकेत जायचं होतं. बँकेतून आल्यावर त्याने जेवण केलं व अस्वस्थपणे पाच  कधी वाचतात याची वाट तो पाहू लागला.
'देवा , तीन वर्षाची ही मैत्री तुटू नको देऊस. 
'उषाजी ऽऽ.... 'त्यानं  आर्त मनाने साद घातली.
 उषाजींशी आपली खरचं नुसती मैत्री आहे की, आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आहे हे त्याला ठरवता येईना.

         आज मनातलं बोलायला कोणीतरी हवं होतं. पण आपलं म्हणून कोणीच राहिलं नव्हतं. त्याला त्याच्या दोन्ही खास मित्रांची तीव्रतेने आठवण झाली. एक जग सोडून गेला तर दुसरा मुलाकडे राहायला गेला. आपण.मात्र एकटे पडलो. टेबलवर असलेला नील चा फोटो पाहून तो अधिकच व्याकुळ झाला. किती घट्ट बंध होते नीलशी आपले !उर्मिला गेल्यावर तर तो आपली विशेष काळजी घेत असे. अन एक दिवस एम. एस. करायला जर्मनीला गेलेला नील आलाच नाही .सुरुवातीला फोन यायचे. खोटी आश्वासन दिली जायची. आता तर तेही नाही. या एक दीड वर्षात एकही फोन नाही. ग्रीन कार्ड मिळाल्याचा त्याचा  फोन हा शेवटचा फोन होता.  'तेथे राहणं किती आवश्यक आहे .पुढे प्रगतीच्या संधी कशा आहेत  हे तो आनंदाने सांगत होता. आणि आपण दाटलेल्या भावना व  अविरत वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा यांना साक्षी ठेवून सगळं ऐकत होतो. आपल्या  मुलाच्या सुंदर चित्रात  आपण कुठे ही नाही ही वेदना  आजही हृदयात खोलवर जखम करते.

           आणि मग समदु:खी मैत्रीण मिळाली. उषाजींचं  आपल्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. नवरा चाळशीत गेला. मुलीला फुलासारखा जपलं.
 वाढवलं. मनाप्रमाणे  प्रेमविवाह करून दिला. ती नवऱ्याबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. तिला आता इकडे यावसं वाटत नाही म्हणे! तिचे आता फोन येणे ही कमी झाले आहे .आणि फोनवर काय विचारणार ,'आई कशी आहे? काळजी घे. काही लागलं तर सांग.' येथेच आजकाल संभाषण संपते. जेव्हा मुलं आपल्याशी भरभरून बोलत नाहीत तेव्हा समजावं की ती आपल्यापासून दुरावली. त्या एकदा गहिवरल्या आवाजात म्हणाल्या होत्या.तरी ही त्या किती खंबीर आहे  हे जाणवतं होतं.

           मग त्यांचा एक मजबूत सुखद आधार मिळाला. मनातलं बोलायला जागा मिळाली. रोज बागेत येणाऱ्या उषाजींची ओळख झाली. मग गप्पा सुरू झाल्या आणि हळूहळू मैत्रेही झाली. त्यांनी दिलेलं लोणचं ,आणलेलं थालीपीठ, लाडू त्यांच्या हातचं सगळं आवडू  लागलं. घरच्या बागेतल्या फुलांशिवाय मी त्यांना काहीही देऊ शकत नसे. देवासाठी आणलेली ती फुलं पाहून त्या आनंदीत होत.

            पण आजकाल वेगळच घडू लागलं. प्रेमात कसं पडतात हे माहीत नव्हतं . पण उषाजींशी बोलताना प्रसन्न वाटे. शीळ घालावीशी वाटे .पोटात हजारो फुलपाखरं सुरेल गीत गात नाच करत आहे असं वाटत राही. आपण नवथर  नाही हे माहीत असूनही हे घडत राही. उषाजींची  हुशारी, साधेपणा आवडू लागला. त्यांच्या मनमोकळ्या हसण्याकडे सारखं बघत राहावं वाटु लागलं. आणि एक दिवस खूप घालमेल झाली. कसली ही पर्वा न करता  आपण त्यांना  प्रश्न विचार विचारला.  त्या काहीही न बोलता घरी निघून गेल्या. आपण स्तब्ध झालो. अचंबित झालो. त्या फाडफाड बोलल्या असत्या तरीही आपल्याला चाललं असतं. पण तसं घडलं नाही.

               आपण उर्मिलेला विसरलो असच त्यांना वाटलं असणार. खरंच विधुराला प्रेम करण्याचा अधिकार नसतो का? मी हे काही चूक तर करत नाही ना ! मग त्या दोन दिवस बागेत का आल्या नाहीत? आणि आजही आल्या नाहीत तर....अरविंद ची खूप  तगमग होऊ लागली. मन त्यांना भेटायला आतूर झालं. ओढ,  हूरहूर, दडपण या चक्रात तो सापडला.

                 पाचचा ठोका पडला आणि अरविंद बागेत जाण्यासाठी उठला .आज त्याला रस्ता लांब वाटत होता. त्याचे पाय जड जड झाले होते. तो मनाला आणि शरीराला पुढे ढकलत राहिला. लांबूनच त्याला उषाजीं दिसल्या. त्याचे अवघे शरीर चैतन्याने भरून गेले . त्याची चाल बदलली .तो भराभरा चालत उषाजींपाशी आला.
"काय मेलं ते भराभरा चालणं. आपल्या वयाला झेपते तेच कराव माणसांना !" उषाजीं मिश्किलपणे म्हणाल्या. अरविंद हबकला. म्हणजे यांना आपला राग आला नाही ?
"बसा."
"तुम्ही दोन दिवस का आला नाहीत तुमची तब्येत बरी आहे ना?"
"मला काय झालं? मी चांगली ठणठणीत आहे. आणि एवढी काळजी वाटत होती तर, घरी यायचं ना तब्येत बघायला."उषाजींचा मिश्किलपणा सुरूच होता. साठ वर्षाच्या उषाजींनी  गोल्डन कलरची सुंदर साडी नेसली होती. कुरळे भुरभुरणारे केस त्यांना खूपच शोभून दिसत होते. हातात दोन दोन बांगड्या, डाव्या हाताला घड्याळ, पायात बूट अरविंदला वाटलं,  किती सुंदर दिसत आहेत उषाजीं!
"मला वाटलं तुम्हाला माझा राग आला असेल."
"राग येण्यासारखं तुम्ही काही केल्यात का?"
"नाही म्हणजे मी तुम्हाला त्यादिवशी तो प्रश्न विचारायला नको होता."
"तो प्रश्न म्हणजे हेच ना की, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करायचे का?" अरविंद नजर चुकवत खाली पाहु लागला.
"पण या प्रश्नाला फार उशीर झाला आहे ." गंभीर होत उषाजीं म्हणाल्या.
"म्हणजे ?" अरविंदला काही समजेना.
"या आधीच तुम्ही  मला हा प्रश्न विचारायला हवा होता. पण तुम्ही पडले भित्रे! दोन दिवस मी आले नाही तर घरीही आला नाही बघायला." उषाजींना काय म्हणायचे हेच अरविंदला कळेना. 
"आपली मैत्री....."त्याने चाचरत विचारले.
"आपली मैत्री पक्की आहे अरविंदजी. आपण ती नात्यात बदलवू. माझं ही  तुमच्यावर  प्रेम  आहे. .मला तुम्ही आवडता ." उषाजींनी लाजत मान खाली घातली. त्यांचं लाजणं पाहून अरविंद चक्रावला.
आपण हे काय ऐकतो आहे. त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. मनातल्या फुलपाखरांनी केव्हाच भराभरा उडायला सुरुवात केली होती. आनंदाने आपल्याला वेड लागते की काय असे अरविंदला वाटू लागले.
"खरंच उषाजीं."त्यांचा हात हातात घेत तो अत्यानंदाने ओरडला.
"उषाजीं नाही उषा!"लाजेने चूर होतं उषाजीं म्हणाल्या. दोघेही एकमेकांकडे अनिमिष नजरेने पाहत होते.

          इकडे आकाशानं लाल पिवळ्या रंगाची उधळण करायला सुरुवात केली. सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरला .वाऱ्याने  हलकेच शीळ घातली. गुलमोहोरच्या फुलांनी वरून पडत  पायाशी गालीच्या घातला.

                                    माधुरी वरुडकर 


disclaimer 
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments