प्रेम - अश्विनी शिरूर

प्रेम

 अश्विनी शिरूर

    निखिल नाव बघून तिच्या छातीत धडधडायला लागलं, अंगावर काटा आणि डोक्यात मुंग्या आल्यासारखं झालं. घाम पुसत तिने फोन घेतला, हे.. सोना, किती वेळ?

गॅलरीत ये नामी आहे खाली ..निखिल म्हणाला. ...काय? असं ओरडत विजू गॅलरीत धावली....तर हा खाली ...त्याच्या कडे बघून तिला नेहमी प्रमाणे हरवून जायला झालं....किती देखणा दिसतो ना अजून...ती ऐट, टापटीप राहणीमान, बेदरकार स्वभाव, अस्सल मर्दानी रुबाब... त्याने तिला खाली यायची खूण केली....ती खाली गेली , कोणी बघत तर नाही ना याची खात्री करून घेत म्हणाली, तू इथे कसा ? घर कसं मिळालं, कोणी तरी बघेल रे.. असा कसा तू

    अरे आपके लिये कुछ भी मेरी जान....इतकी काय घाबरते? सुधीर वैद्य कुठे राहतात असं विचारल्यावर कोणी पत्ता सांगेल असं तूच म्हणाली होतीस ना ? बाकी चांगलाच प्रसिद्ध आहे तुझा नवरा, श्रीमंत, मोठं प्रस्थ आहे वैद्य म्हणजेआता मला घरी पण नेणार की इथे बाहेर उभा करणारअसं म्हणत निखिल ने गाडी लावली. तिने नाईलाजाने त्याला आत बोलावले....घर बघून निखिल चे डोळे विस्फारले....टुमदार बैठा बंगला...पुढे मागे बगीचा, झोपाळा...

    सासूबाई सासरे दोघांची ओळख करून दिली तिने....माझा कॉलेज मधला मित्र...निखिल ने लगेच बोलायला सुरुवात केली... त्याचं शिक्षण, मग वेगवेगळे जॉब, फिरती, त्याचे किस्से चालु झाले...नेहमी प्रमाणे त्याने परिस्थिती ताब्यात घेतली. ती त्याच्यासाठी चहा करायला गेली आणि येई पर्यंत ते तिघे वर्षांवर्ष एकमेकांना ओळखत असल्या प्रमाणे गप्पा मारत होते....निखीलची हीच तर खासियत होती...तो बोलका होता...त्याच्याकडे किस्से रंगवून सांगायची कला होती, गाणी सुंदर म्हणायचा ...निखिल असला की तोच centre of attraction असायचा. मुली तर अश्या चुंबका सारख्या खेचल्या जायच्या त्याच्या कडे,... 

    हसण्याच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली...तर सासूबाई निखिल ला जेवणाच आमंत्रण देत होत्या, निखिलने उद्या नको , - दिवसात नक्की येतो असं सांगितलं आणि तो गेला ...ती रूम मध्ये आली आणि  झोपाळ्यावर बसली ..तिला हे सगळं एकीकडे हवसं पण वाटतं होतं आणि भीती पण वाटतं होती....निखिलच्या झंझावातात पुन्हा अडकण्याची.... भूतकाळातील सावल्या अवतीभवती नाचू लागल्या..

     तिचं कॉलेज शेवटचं वर्ष होतं...धमाल करायची ह्या वर्षी पण असं त्यांच्या ग्रुप ने ठरवलं होतं...स्पोर्ट्स, gathering सगळ्यात भाग घेतला होता तिने, दिसायला तशी सुंदर नव्हती ती पण स्मार्ट होती..हुशार तर होतीच , पण अतिशय active होती...तिला गप्पं बसणं माहितीच नव्हतं, डान्स, गाणे, खेळ , वक्तृत्व, लिखाण सगळ्यात पुढे. शांत स्वभावाची माणसं तिला आवडत नसत....वेग हवा आयुष्याला ...सतत काही तरी घडलं पाहिजे असं वाटायचं तिला...

   त्या दिवशी रात्री गाडी वरून येताना तिची गाडी स्लीप झाली आणि ती पडली, रस्त्यावर कोणीच नव्हतंनिखिल त्यावेळी घरी चालला होता....त्याने तिला मदत केली... तिला लागलं नव्हतं पण गाडी बंद पडली होतीमग त्याने तिला घरी सोडलं ...बघताक्षणी निखिल तिला आवडला होता...त्या पडलेल्या परिस्थितीत सुद्धा तिला त्याचं देखणेपण जाणवून गेलं होतं....love at first sight असं काहीसं झालं...

 त्याने घरी सोडलं आणि तिला स्वतःच्या ऑफिस चा नंबर दिला ...फोन कर मी वाट बघतो असं म्हणाला आणि ती पुरती गारद झाली.

रात्री झोप लागली नाही...slow motion मध्ये सगळं आठवत राहिलं आणि कधी सकाळ होते आणि त्याला फोन करते असं तिला झालं....

    सकाळी घरातले सगळे गेल्यावर तिने त्याला फोन केला....तो वाटच बघत होता...भेटूया असं ठरलं आणि नंतरच तिच्या हातात राहिलं नाही काही.... निखिल चा सहवास म्हणजे वेग होता वेग.... भन्नाट वेगाने गाडी मारणे..गड किल्ले फिरणे..जे मनात येईल ते करायचं आणि करवून घ्यायचं..."आज आहे उद्या कोणी पाहिलाय" असं म्हणायचा...सतत नावीन्य हवं असे त्याला...स्थिरता कशी ती नाही....वर्ष भर ते दोघे फिरत होते ...हे लग्न करणार हे फिक्स होतं..घरात मान्यता होती...फक्त निखिल ची आई तिला नेहमी म्हणे तो असा आहे तर तू त्याला स्थिर कर...संसार कसा करणार तुम्ही? ती हसून गप्प बसे....

   आणि एक दिवस निखिल ने तिला सांगितलं की त्याने जॉब सोडलाय...त्याला 2 महिने हिमालयात जाऊन राहायचं आहे...अनुभव घ्यायचा आहे तिथला...ती अवाक झाली...अरे , आपलं लग्न, माझ्या मनाचा काही विचार?? तर सहज म्हणाला तू पण चल...लग्नाचं बघू नंतर, काय घाई आहे? मला खर तर लग्नात वगेरे अडकायचे नाहीये...छान फिरायच आहे...वेगळे अनुभव घ्यायचे आहेत ...जबाबदारी नकोय मला..तू पण ह्याच विचारांची आहेस असं वाटलं म्हणून पुढे गेलो तुझ्या बरोबर...ती चांगलीच हबकली....घरातले तर नाहीच म्हणाले आणि कसलाही विचार करता निखिल निघून गेला. हे त्याचं प्रेम? मग आपण दोघांनी प्रेम केलं म्हणजे काय केलं? आवडी निवडी सारख्या होत्या , स्वभाव सारखे म्हणून लगेच प्रेम आहे असं समजलो का? ती कोलमडून गेली आणि मानसोपचार तज्ज्ञ सुधीर तिच्या आयुष्यात आला...

   डॉक्टर म्हणून तिने त्याच्या पासून काहीच लपवून ठेवलं नव्हतं...अगदी निखिल सोबत चे शरीर संबंध सुद्धा...

त्याच्या उपचारांनी ती ह्या सगळ्यातून बाहेर आली आणि सुधीर ने तिला लग्नासाठी विचारले...सुधीर ने तिला त्यावेळी सांगितलं होतं की त्याच्या आयुष्यात ही असच घडलं होतं...श्रुती त्याच्या बहिणीची मैत्रीण...अशीच स्वच्छंदी, दंगेखोर, सुंदर...तिने पैज लावली होती म्हणे ह्याला पटवेन अशी, बिनधास्त हे कबूल करून ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि सुधीर खुप serious होता तिच्या बाबतीत , त्यामुळे त्याने हा विषयच डोक्यातून काढून टाकला...पण विजू बोलणं ...तीच्यातले गुण त्याला आवडले...ती बेजबाबदार नव्हती...ती आपल्याला समजून घेईल असं वाटलं त्याला...दोघेही पोळले होते...

  तिच्या बरोबर विरुद्ध स्वभावाचा सुधीर ...शांत, आपलं काम आणि आपण यात रमणारा, बाकी कश्याची आवड नसणारा, साधा....त्याला आपला भूतकाळ माहिती आहे आणि स्थळ म्हणून तो उत्तम आहे असं घरच्यांनी बिंबवल्यामुळे नाईलाजाने तिने लग्नाला होकार दिला. मन सतत निखिल आणि सुधीर ची तुलना करत असे, तिची तारीफ करणं, तिला भेटवस्तू देणं, लाँग ड्राईव्ह, एखाद्या गोष्टीवर चर्चा, त्याचा रांगडा प्रणय हे तिला आठवत राहायचं...सुधीरने तसं वागावं असं तिला वाटायचं...पण तो जात्याच शांत होता...एकमेकांना बदलवण्या पेक्षा आहे तसे एकमेकांना स्वीकारून पुढे जाऊ असं तो म्हणत असे...एकंदर तडजोड मलाच करायची असं म्हणत संसार सुरू झाला होता... 2 वर्ष झाली.. आता मुलांचा विचार करा असं सगळे सुचवू लागले ...तिलाही असं वाटायला लागलं  होतं आताशा .. 

    आणि फेसबुक वर निखिल ने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली..तिने accept केली आणि messenger वर बोलायला लागले दोघे...आयुष्यात काहीतरी नवीन चालु झालं आणि ती जुनी विजू पुन्हा जगायला लागली.आणि आज हा घरी आला, विजू विचारातून जागी झाली...सुधीर आला , जेवणं झाली, ते दोघे नेहमी प्रमाणे बागेत शतपावली करायला बाहेर आले, सुधीरलाच विश्वासात घ्यायचं असं तिने ठरवलं आणि निखिल आल्याचं आणि आपली मनस्थिती द्विधा झाल्याचं सांगितलं ...सुधीर ने तिला एक जगावेगळा सल्ला दिला...तो म्हणाला तू ४दिवस त्याच्या सोबत रहा, आणि तुला वाटलं की तुम्ही एकत्र आयुष्य घालवू शकता तर तू कसलाही विचार करू नको , रहा त्याच्या सोबत... मी सगळं संभाळेन .. मी तुझ्यावर प्रेम केलंय..तुझा आनंद तो माझा आनंद...तिचा विश्वास बसेना, पण सुधीर ठाम होता...

   तिने दुसरे दिवशी निखिल फोन केला आणि मी घरी येतेय म्हणून सांगितलं... त्याने काही चौकशी केली नाही, ती निघाली आणि पाऊस चालू झाला.रिक्षातून उतरून निखिलच्या रूम पर्यंत जाईपर्यंत सुद्धा ती

  चांगलीच भिजली.. पण ती गेल्यानंतर निखिलने तिची काही चौकशी केली नाही डायरेक्ट तिला झटकन जवळ ओढलं ...आणि ओठावर ओठ ठेवून किस घ्यायला लागला... तिला किळस आली एकदम, मी भिजले आहेमी आत्ता कशी काय आलेय त्याची चौकशी तरी कर, अरे माझा मूड तरी बघ , तिच्या बोलण्याकडे निखिलचं लक्षच नव्हतं ,ओलेती तिला बघून तो वेगळ्याच मुड मध्ये गेला होता... तिला निखिलच्या वागण्याचा चांगलाच धक्का बसला, बरोबर तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.. चांगल्या.. वाईट गोष्टी समजण्यासाठी काही वेळा एक गोष्ट..एक क्षण पुरे होतो ... तसं काहीसं झालं ...अरे..सुधीर माझ्या चेहऱ्यावरून मुड ओळखून वागतो...तिने निखिल बाजूला केले...आणि ती आल्या पावली बाहेर पडली, तिला ह्या विचारांनी धक्का बसला होता की काल जेव्हा पासून हे ठरलं तेव्हा पासून आनंदी होण्या ऐवजी तिला वाईट वाटत होतं...मनाची अवस्था कळतच नव्हती ...आणि आत्ता जेव्हा निखिल ने जवळ घेतले तेव्हा सुधीर डोळ्या समोर आला... त्याचं संयत प्रेम, माझ्या मनाचा विचार, अबोल साथ, डोळ्यातून दाखवलेली पसंती, हे सगळं आठवायला लागलं आणि आपलं प्रेम निखिल वर नाही सुधीर वर आहे याचा साक्षात्कार घेऊन ती सुधीर कडे घरी आली. सुधीर च्या मिठीत जाऊन रडायाला लागली...सुधीर ..i love you..I love you... मला तुला सोडून कुठेही जायचं नाहीये ..माफ कर मला ..तू मला त्याच्याकडे जाऊ तरी का दिलं??

   सुधीर ने सावकाश तिला बसवलं पाणी दिलं आणि सांगितलं की तू त्याच्याकडे गेली नसतीस तर तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तुला कसं कळलं असतं?? मला पूर्ण खात्री होती तू येणार परत याची ..पण तुला हे समजणं आवश्यक होतं....म्हणून हा उपचारांचा भाग समज .. शेवटी मी पण एक मानस उपचार तज्ञ आहे मॅडमपण तू आता पूर्णपणे निखिल मधून बाहेर पडलीस.

     सुधीरने तिला हलकेच जवळ घेतले आणि त्याच्या कुशीत ती आश्वस्त झाली...सुधीर म्हणाला,

 एकमेकांना समजावून घेणे म्हणजे प्रेम, एकमेकांसाठी असणे म्हणजे प्रेम, बदलण्यापेक्षा स्वीकारणे म्हणजे प्रेम!

   खरंय सुधीरमी खूप मोठी चूक करत होते ,कारण एकाच माणसात मी सगळ्याच क्वालिटी मिळवु पाहत होते . तुझ्यात मी निखिल ला शोधत होते, त्रास करून घेत होते तू तसा नाहीस म्हणूनम्हणजे तो माणूस आपल्याला पाहिजे तसा नसला तरी त्याच्याकडे काय गुण आहेत आणि जे गुण आहेत त्याचा पण सोनं कसं करायचं हे सुद्धा मी बघायलाच हवं होतं ..शिवाय माझ्यातही काही कमी आहेत ते तू ऍडजेस्टच करून घेतोयस इकडे तर माझं पूर्णतः दुर्लक्ष झालं. तू खूप मोठ्ठं मन करून मला आता एक मोठी संधी दिली आहेस सुधीर, आता मी परत कधीही अशी चूक करणार नाही. आत्ता माझ्या लक्षात येतेय की प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या मनाची काळजी स्वतःच्या मनापेक्षा जास्त घेणे.. जे तू सिद्ध करून दाखवलं. आता तू जा म्हणून म्हटलं तरी सुद्धा तुला सोडून मी कुठेही जाणार नाही सुधीर ... त्याने तिला हलकेच मिठीत घेतले, बाहेर आकाश पूर्ण निरभ्र झालं होतं...

 

 

अश्विनी शिरूर 

 

disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments