पूर्णायन!!!!! गोष्ट अलवार नात्याची.... लव्ह स्टोरी लग्नानंतरची ......
©️®️पूजा केळकर
"पूर्णा, चहा ..... "
अयान च्या हाकेसरशी पूर्णा खडबडून
जागी झाली...
पुण्याच्या उच्चभ्रु वस्तीतील
आलिशान ५ बेडरूम अपार्टमेंट मधल्या टेरेस वर एका कोपऱ्यात पाय मुडपून झोपलेल्या
पूर्णाला एका क्षणात आपण कुठे आहोत काय काही सुचले नाही.
यांत्रिकपणे तिने अयान ने दिलेला
चहाचा कप तोंडाला लावला. एका घोटासरशी तिला एकदम फ्रेश वाटले. तिला आवडतो तसा
आल्याचा चहा पिऊन ओठावर येणार हास्य लगेच कुठेतरी मावळले... आणि हा बदल तिच्याही
नकळत अयान ने टिपला....
पूर्णा आणि अयान!!! वर्षभरापूर्वीच
लग्न झालेले जोडपं....
अयान जहागीरदार .... वीरेंद्र आणि
स्नेहलता ह्यांचं शेंडेफळ.... वीरेंद्र निवृत्त सनदी अधिकारी आणि स्नेहलता ताई
म्हणजे उत्सहाचा झरा!!! त्याही निवृत्त बॉटनी प्रोफेसर....
जहागीरदार फॅमिली म्हणजे सरस्वती
आणि लक्ष्मी चा संगम. ... अभिषेक आणि रेवती अयान चे दादा वहीनी....दोघंही डॉक्टरेट
आणि मोठ्या पादावर कार्यरत..... त्यांचा मुलगा अवनीश असं कुटुंब...
अयान ने मात्र वेगळी वाट निवडत
स्वतःचा बिझिनेस सुरु केला होता आणि अपेक्षेप्रमाणे यश गवसत होत...
पूर्णा... त्यामानाने कुठेच
जहागीरदारांच्या पंगतीला बसणारी न्हवती. आई बाबा नोकरी करणारे, खाऊन पिऊन सुखी. ही
आई बाबांची प्रचंड लाडकी. खूप स्वप्नाळू ... थोडी हट्टी थोडी आळशी, आपल्या
कोशात जाणारी पण अतिशय उत्तम dancer.
MBA करत असताना योगायोगाने च
अयान च्या ऑफिस मध्ये इंटर्न म्हणून लागली आणि तिच्या सौंदर्यावर अयान भाळला.
नुसतं रूप नाही तर तिचा लाघवी
स्वभाव, वावर हे सगळं नकळत तो नोटीस करायला लागला.
कुठल्याशा फेस्टिव्हल ला ध्यानीमनी
नसताना पूर्णाला स्टेजवर नाचताना बघून त्याची पार विकेट उडाली...
कॉमन फ्रेंड्स कडून ओळख काढत
पूर्णाशी वाढवलेली मैत्री, प्रेम आणि लग्न हा असा प्रवास.
पूर्णाचे आई बाबा प्रचंड साशंक
होते.
त्यांनी ते बोलून पण दाखवलं.....
"पूर्णा कुठेच फिट बसणारी नाहीये... आपली बरोबरी नाही. "
पण वीरेंद्र आणि स्नेहलता ताईंनी
"आम्हाला सून हवी आहे कुठलीही candidate नको. आम्ही पूर्णाला सांभाळून
घेऊ." अस सांगत त्यांना आशवस्त केले होते.
नाही म्हणायला अभिषेक ने अयान ला
स्पष्ट कल्पना दिली होती की "पूर्णा थोडी अल्लड वाटते तिला वास्तविकतेचे भान
नाही. तू परत विचार कर." पण अयान पूर्ण पूर्णामय झाला होता.
लग्नाच्या धामधुमीत पूर्णाचे MBA
मागे पडले.
पूर्णाच्या रूपात वीरेंद्र आणि
स्नेहलतांना मुलगी मिळाली अशी काहीशी भावना निर्माण झाली. कारण मोठी सून रेवती
नेहमीच तिचे थिसीस, प्रोजेक्ट, घरकाम आणि अवनीश ह्यात गुंतलेली असायची तिला असा
मोकळा नसायचाच.
ह्यामानाने पूर्णाला आयुष्यात
म्हणावं तसं काहीच रुटीन न्हवत.....
पूर्ण अयान आणि अयान एवढंच काय ते
झालं होत...
काही काळ गेल्यावर हळूहळू खटके
उडायला लागले. "तू वेळ देत नाही" ही नेहमीची सुरुवात झाली.
अयान ने तिला भरपूर ऑपशन्स दिले
होते परत MBA चालू कर .... डान्स मध्ये MA कर असे बरेच.
सुख आणि सुबत्ता माणसाला कधीकधी
आळशी बनवते तसं काहीस पूर्णा च्या बाबतीत होतं...
तिला आपण ह्या घरात कमी पडतो असं
सारखं वाटत राहायचं... तिला तसं कधीच कुणी जाणवू दिल न्हवत तरी....
रेवती महिन्यातून एकदा काही वेळ
पूर्णा सोबत द्यायची... दोघी जावा मस्त मज्जा करायच्या.
पण कुठेतरी आत काहीतरी पूर्णा ला
सतत खात राहायचं ... आई - बाबाना बोलून दाखवलं पण काही उपयोग झाला नाही.
पूर्णा हळूहळू कोशात जायला
लागली.
त्यात भर पडली ती वेदा कर्णिक मुळे
. ....
वेदा आणि अयान शाळेतले
फ्रेंड्स....
पूर्णा दिसायला जरी सुंदर असली तरी
थोडी स्थूल होती..
ह्याउलट वेदा . ... सुडौल आणि
आकर्षक बांधा, शिक्षण, प्रचंड मोठा व्यासंग, जपलेले छंद, गलेलठ्ठ पगार हे सगळं
वेदाच्या मूर्तिमंत सौंदर्यात अजून भर घालायचं....
नकळत पूर्णा च मन तिची आणि वेदाची
तुलना करायला लागले...
आपल्याकडे काय आहे ह्यापेक्षा
आपल्याकडे काय नाही ह्या विचारात सुरु झालेली पूर्णाची फरफट वीरेंद्र आणि स्नेहलता
यांच्या नजरेतून सुटली नाही. गरज पडल्यास बोलायचं असं दोघांचंही ठाम मत होत.
हळूहळू पूर्णा निष्क्रिय आणि घुमी
होत गेली.
अयान जवळ शुल्लक गोष्टींवरून
तक्रार करायला लागली. त्याला नेमकं कळतं न्हवत आपली पूर्णा कुठे आहे.. . हि काही
आपली पूर्णा नाही.....
दिवस जात होते आणि अयान पूर्णा
मध्ये एक अदृश्य अंतर निर्माण होतं होत...
एक दिवस अयान वैतागून घरी आला होता
आणि नेमकं पूर्णाने त्याला वेदावरून टोमणा मारला...
झालं अयान ने सगळ्यांसमोर पूर्णा
ची शाळा घेतली.
त्या दिवशी पूर्णा खूप रडली.
तिने आपले अंथरूण वेगळे घातले तिला
वाटले अयान आपली समजूत काढेल.... आपल्याला बेड वर नेऊन कुशीत घेईल..
पण असे काहीच झाले नाही. उलट
ह्यावरून लहान मुला सारख वागण बंद करून जरा विचार कर आणि स्वतः कडे लक्ष दे असं
अजून एक खाजगीतलं खाजगी मुद्दयांसकट एक lecture पूर्णाला ऐकायला मिळालं.
पूर्ण रात्रभर रडली.
अयान ने दिलेल्या सक्त ताकतीमुळे
दुसऱ्या दिवशी ती खूप नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती पण राहून राहून डोळे भरून
येत होते.
स्नेहलता आणि वीरेन्द्रनी
पूर्णाला लंच ला घेऊन आपली बाजू मांडली. धीर दिला. समजावलं.
पूर्णा माहेरी राहायला गेली. झाला
प्रकार ऐकून आई बाबांनी तिला दुसरीकडे मन गुंतवण्याचा सल्ला दिला.
पुढच्या आठवड्यात अवनीश चा
प्रोजेक्ट होता. त्यासाठी लागणार सामान घेऊन पूर्ण घरी आली.
मोठ्या उत्साहात तिने ते अवनीश ला
दाखवलं पण "तू बॅड काकू आहेस... तू अयान काकाला त्रास देते....तुला माझी आई
आवडत नाही...तुझ्यापेक्षा वेदा भारी आहे....तुला तर गाडी सुद्धा चालवता येत
नाही...."असं काहीबाही अवनीश कडून ऐकून सगळेच जहागीरदार हडबडले. वीरेन्द्रनी
सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतली. सामान आणि अवनीश ला घेऊन ते त्यांच्या रूम मध्ये
गेले.
पूर्णाला मेल्याहून मेल्यासारखं
झालं.
काहीतरी कारण सांगून ती सोसायटी
पार्किंग मध्ये जाऊन मनोसोक्त रडली.
अयान ची ताकीत डोक्यात असल्याने
थातूर मातूर सामान आणायला गेले होते अस सांगून लगोलग स्वयंपाकघरात जाऊन सासूबाई व
रेवती ला मदत करू लागली.
पूर्णाला काही दिवसांसाठी माहेरी
पाठवून काय करायचं ह्यावर वीरेंद्र आणि स्नेहलता नी एक योजना आखली.
मुळात समस्या म्हणायला अशी
न्हवती.
पूर्णाला काही दिवस माहेरी पाठवून
दिल. रेवती आणि अवनीश रेवतीच्या माहेरी आणि अभिषेक तसाही कॉन्फरेन्स ला गेला होता
आणि स्वतः ते दोघे कोकणात फिरायला गेले.
जायच्या आधी पूर्णाला घरी आणलं आणि
जणू काही झालाच नाही असे सगळे वावरत होते.
अवनीश कडून पूर्णाला आवडणार एक
मोठ्ठ चॉकलेट आणि एक गोड पापी मिळाली.
पूर्णा मनातून खुश झाली.
सगळे बाहेर पडले आणि एक विचित्र
शांतता, अयान सोबतचं अवघडलेपण पूर्णाला खायला लागले.....
तनामनाने ती अयान ची वाट बघत
होती...
पण साद कशी घालायची ......
एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी अशी
अंगावर पडली तशी पूर्णा एकदम सरावली.
आपण करू शकतो ही जाणीव तिला आतून
सुखावून गेली.
पण ती आणि अयान???
कधी वाटायचं की धावत जाऊन अयान ला
मिठी मारावी आणि त्याच्या कुशीत मनसोक्त रडावं पण तिचा धीर होत न्हवता.
आजचा तिसरा दिवस.... अयान सकाळीच
ऑफिस ला गेला....
पूर्णा ने आवरून, कूक ला काय
करायचं ते सांगून इतर काम आटपून जेवून घेतलं.
स्नेहलता ताई न चुकता एक कॉल
करायच्या.
आई बाबा फोन करून बोलायचे.
फक्त तिचा अयान बोलत न्हवता.
स्नेहलता ताईंच्या मैत्रणीच्या
सुनेशी बोलून पूर्णा बरीच मोकळी झाली होती. नकळत स्नेहलता ताईंनी पूर्णा च
समुपदेशन करून घेतलं.
विखुरलेले तुकडे मनाशी जोडता जोडता
पूर्णाला कधी झोप लागली तीच तिला कळाल नाही.
इकडे अयान ची मनः स्थिती वेगळी
न्हवती राहून राहून अभि दादाने सांगितलेला मुद्दा डोकं वर काढत होता..... फक्त
शारीरिक आकर्षण !!!! तेवढ्याच साठी पूर्णा? डोकं चालत न्हवत. पण पूर्णा मध्ये असं
काही आहे... काय आहे....
तिच्या सहवासात एक सुकून आहे....
वेदा सोबत तो सुकून नसतो...
वेदा आणि तो जरी एका वेगळ्या लेवल
वर कनेक्ट होत असले तरी तो जसा आहे तसा raw पूर्णा समोर असायचा.
त्याची एक wild बाजू होती ती का कशी
पूर्णा मधे सामावून जायची....
बाकी काहीही असलं तरी पूर्णा
त्याला पूर्णपणे समर्पित झाली होती हे तो नाकारू शकत न्हवता. ह्या समर्पणातून
आलेले अनेक गोडं क्षण...
बाबांनी दिलेला नात्याबाबतचा
सल्ला त्याला कुठेतरी विचार करायला भाग पडत होता....
"तुमच्या नात्यात तुला लीड
करायला लागेल कारण पूर्णा पक्की follower आहे.... आणि मला तरी त्यात काही चुकीचं
वाटत नाही..... प्रश्न तुझा आहे कि तुझी लीड करायची तयारी आहे का...."
फार काम नसल्यामुळे तो घरी लवकर
आला....
त्याच्याकडच्या चावीने त्याने
हलकेच दार उघडलं...
त्याची नजर पूर्णाला शोधतं
होती...
टेरेस मध्ये डोकं टेकून पाय मुडपून
झोपलेली पूर्णा खूपच गोड दिसत होती. एक क्षण आलेला आवेग मागे सारून तो फ्रेश
व्हायला गेला तिला आवडतो तसा चहा करून कप घेऊन तो आला....
आताही चहा पितानाचे तिचे हावभाव तो
टिपत होता.
अचानक खूप काही भारी हातात पडावं
आणि आपली तयारी नसावी कि उडणारा गोंधळ पूर्णाच्या रूपाने समोर बघत होता ...
चहा संपल्यानंतर कप घेताना झालेला
अयान चा ओझरता स्पर्श नकळत तिला सुखावून गेला ती नखशिखांत मोहरली.... ह्याचीच तर
आपण वाट बघत होतो... पण लगेच मागच सगळं आठवून भानावर आली... एक विचित्र शांतता
होती....
तिचं ते मोहरुन जाणं अयानला
कुठेतरी मनोमन सुखावून गेलं.....
कुठेतरी परत सुरुवात झाली
होती....
बाबांचे शब्द डोक्यात घोळत होते...
"तुलाच पुढाकार घ्यायला लागेल... नाहीतर एक सोन्यासारखं फुलणार नातं
फुकट..कायम कोमेजून जाईल..."
अभि दादाने वेदाचा पर्याय
त्याच्यासमोर ठेवल्यानंतर त्याने हे दादासमोर मान्य केलं होत कि त्याला पूर्णाच
आयुष्याचा जोडीदार म्हणून हवी आहे वेदा ती जागा नाही घेऊ शकत...... त्याच आणि
वेदाच ह्या बाबतीत एक मत होत.
पूर्णा उगाचच काहीतरी कामं काढून
अयान समोर जायचं टाळत होती.
अयान एकदम तिच्या समोर आला आणि
म्हणाला "तयार हो..आपल्याला बाहेर जायचंय....जीन्स घाल... Casual मीटिंग
आहे." पूर्णाने मान डोलावली आणि ती तयारीला लागली. जीन्स त्यावर कुर्ता अयान
ची आवड लक्षात घेऊन घातलेली पर्ल ज्वेलरी हलका मेकअप अशी तयार होऊन ती अयान समोर
गेली.
अयान ने बघून न बघितल्यासारख करून
निघाला...
गाडीत बसतांना पूर्णाला कसतरीच
वाटतं होत....
लग्नाआधी ह्याच गाडीत तिने तिच्या
आयुष्यातलं पाहिलं वाहिलं kiss अनुभवलं होत... तिची बडबड सुरु असताना अचानक अयान
ने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन बडबडणाऱ्या ओठांचा तिच्या नकळत कधी ताबा घेतला तिला
कळाल देखील नाही.
संमिश्र भावना डोळ्यातून वाहताना
त्यासुद्धा अयान ने अलगद टिपल्या होत्या नंतर किती तरी वेळ ते दोघे असेच
एकमेकांच्या मिठीत पडून बाहेरचा पाऊस आणि अयान च्या आवडत्या बँड ची गाणी ऐकत
होते....
आज त्या गाडीत बसतांना हे सगळं
आठवून तिला गलबलून आलं... आणि नेमकं त्यावेळी बाबूजी आर्त स्वरात गात होते....
"त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ......"
झालं.... कुठलीही गोष्ट स्वतःला
लावून घेण्याच्या सवयीनुसार पूर्णा ला रडू फुटलं.....
अयान हे सगळं बघून न
बघितल्यासारख करत गाडी चालवत राहिला. मीटिंग आटपून जेवून दोघे घरी परत
आले....
आता पूर्णा आणखी अस्वस्थ
झाली.....
पटकन बेडरूम मध्ये जाऊन दार लॉक
करून कपडे बदलून घेतले आणि अयान साठी ब्लॅक कॉफी करायला ती गेली.
आता मात्र अयान ला
राहवेना...
मागून जाऊन त्याने त्याचे डोके
तिच्या मानेवर टेकवले .....
अयान च्या अनपेक्षित मूव ने पूर्णा
गांगरून गेली....
अयान..... कॉफी.. . एवढे दोनच शब्द
तिच्या तोंडून कसेबसे बाहेर पडले ......
त्याच्याकडे फिरवून अयान ने
पूर्णाच्या ओठांवर त्याचे ओठ अलगद टेकवले.......
कितीतरी महिन्यांची विलगता
स्पर्शातून रोमारोमातून दोघांना जाणवत होती......
पहिला आवेग ओसरल्यावर पूर्णा
बाजूला झाली... तिला आपल्याकडे खेचत अयान परत तिच्या ओठांवर झुकला .....
पूर्णा हळूहळू त्याच्यासमोर विरघळत
गेली.....
पण एका निर्णायक क्षणी ती बाजूला
झाली आणि पळत बेडरूम मध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसून हमसून हमसून रडायला
लागली..
अयान समोर मांडी घालून बसला तिला
मनसोक्त रडायला दिलं . ....
पूर्णा बोलायला लागली.... "
अयान, मी नाहीये न तुला सूट.... वेदाच तुला शोभते ..... मी नाहीच होत फिट तुमच्या
कुटुंबामध्ये..... हो न???.....पण मला आई बाबा, दादा वाहिनी अवनीश सगळे खुप आवडतात
...... तू.....प्लीज मला अंतर देऊ नको.... तू सांगशील ते मी सगळं करेन.... बारीक
होऊन दाखवेन. .. गाडी शिकेन..... इंग्लिश वाचेन. .... वेदा सारखी होऊन दाखवेन पण
मला सोडू नको..... मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...... "
अयान गंभीर झाला ...... आणि तिथून
उठून बाहेर जाऊन बसला .... पूर्णाला धस्स झालं..... नाजूक आणि कातर क्षणी आपण काय
बोलून बसलो असं काहीस झालं आणि ती अयान च्या मागे गेली.....
अयान तिला बघून बोलता झाला.....
" वेदा माझ्या आयुष्यात असताना मला दुसऱ्या वेदाची गरज नाही. वेदा नाही तर
पूर्णा माझं आयुष्य पूर्ण करते. मला तू आहेस तशी हवी आहेस आणि कायम हवी आहेस.....
"
एवढं बोलून अयान कॉफी घेऊन
बेडरूम मध्ये गेला.....
कॉफी संपवून पाठमोरा स्मोक
करणारा अयान बघून पूर्णाला राहवलं नाही धावत जाऊन तिने अयान ला मागून मिठी
मारली.
हातातली सिगरेट फेकत अयान वळला
सॉरी म्हणण्यासाठी विलग झालेल्या पूर्णाच्या ओठांवर त्याने बोट ठेवलं आणि अलगद
तिला बेडवर ठेवलं....
आज गेले कितीतरी महिने धुमसत
असलेले पोकळ वादळ शांत होत होत.....
आज नव्याने पूर्णा परत एकदा अयान
ची झाली कधीही विलग न होण्यासाठी...
चंद्र प्रकाशात तृप्त आणि शांत
पूर्णाचा चेहरा बघून अयान मनोमन सुखावला ......
त्याच्या कुशीत झोपलेली पूर्णा
खूपच मोहक दिसत होती... कपाळावर भुरभुरणारे केस त्याने बाजूला केले परत एकदा चेहरा
कुरवाळला ह्याच सुखाला त्याच्यातला नर इतके दिवस आसुसला होता...
आणि त्याच्यातला माणूस? प्रियकर?
नवरा? .......
तो मनोमन बाबांचे आभार मानत
होता...
योग्य वेळी योग्य सल्ल्याने
त्याच्या हक्काचे सुख त्याला परत मिळाले होते.....
पूर्णाच्या अल्लडपणातून निर्माण
झालेला प्रॉब्लेम आता राहिला न्हवता..... अयान ने तिला आता आणखी जवळ घेतले .....
तीही गाढ झोपेत गोड हसून त्याला आणखी बिलगली.. . .
"मी काय गमावले असते ह्याचा
विचार सुद्धा करवत नाही बाबा.... थँक यु सो मच ..... "
अयान ने रात्री साडेतीन वाजता
पाठवलेला मेसेज वीरेंद्रनीं सकाळी साडेसहा वाजता स्नेहलता ताईंना वाचून दाखवला
.....
दोघं काय समजायचे ते
समजले.....
स्नेहलतांनी फोन करून सगळ्या हाऊस
हेल्प ला सुट्टी दिली.. तसा मेसेज अयान ला करून ठेवला.
अयान आणि पूर्णाच्या एकांतात आज
कुणीच लुडबुड करणार न्हवत....
जहागीरदारांच्या अवकाशात पूर्णायन
नावाचा तारा कधीहि न मावळण्यासाठी उगवत होता.....
©️®️पूजा केळकर
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box