मनातले मोरपिस
शुभांगी पुस्तके
काळचं लवकरच फ्लाईट होतं. सगळं भराभर आवरून विशाखा हॉटेलच्या लाउंज मध्ये येऊन बसली. मोबाईल हातात घेऊन एअरपोर्ट म्हणूनला जायला तिने कॅब बुक केली. तिला तसे दडपणच आले होते. बऱ्याच दिवसांनी एकटीने विमान प्रवास करणार होती. बाकीच्या मैत्रिणी नंतर येणार होत्या. महत्वाचे काम आल्यामुळे ठरलेली ट्रीप अर्धी सोडून विशाखाला मुंबई साठी निघावे लागले. पंधरा-वीस मिनिटात कॅब आली आणि ती एअरपोर्ट कडे निघाली.
सगळे सोपस्कार आटोपून गेट ओपनिंगच्या अनाउन्समेंट ची वाट पाहत ती थोडी निवांत बसली. ब्रेकफास्ट करायला तसा वेळच नव्हता. विशाखा समोरच्या स्टॉलवरून कॉफी आणि सँडविच घेऊन आली. कॉफी घेतल्यावर तिला थोडं ताजतवान वाटलं. सकाळची वेळ असल्यामुळे एअरपोर्टवर प्रचंड गर्दी होती. तिच्या मनात आलं हल्ली एअरपोर्टवर सुद्धा रेल्वेस्टेशन सारखीच गर्दी होते.
थोड्याच वेळात गेट ओपन झालं आणि ती विमानात जाऊन बसली. पॅसेंजर आपलं केबिन लगेज वर ठेवत होते, सामान ठेवताना फटाफट असा त्या झाकणांचा विशिष्ट आवाज येत होता. तो माणूस उभा असेपर्यंत मागच्याला उभे राहावे लागत होते. विंडोसीट वाला त्याच्या जागेवर बसेपर्यंत पहिल्या दोघांना उभे राहावे लागत होते. अशी सगळी कसरत करत सगळे स्थिरस्थावर झाले.
तिची विंडो सीट होती. एकटीने प्रवास आणि विंडो सीट मिळाली. चला आज सुरुवात तर छान झाली. असा मनाशी विचार करत विशाखाने बेल्ट लावायच्या आधी मोबाईल मध्ये बाहेरच्या एअरपोर्टच्या दृश्याचे एक दोन फोटो पण घेतले. तिची सवय होती पुन्हा न जाणो या एअरपोर्टवर येणे होईल की नाही, म्हणून ती प्रत्येक प्रवासात एअरपोर्टचा फोटो घेत असे.
विमानातून दिवसातील वेळेप्रमाणे दिसणारे आकाशाचे विविध रंग. आकाशाची वेगवेगळी रूपे. कधी निळेभोर, कधी सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेचे केशरी पिवळे लाल करडे निळ्या रंगांची उधळण असणारे. कधी पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या ढगांनी आच्छादलेले. विशाखाला या आकाशाचे विलक्षण आकर्षण होते. विमान खाली उतरताना दिसणारे दृश्य तर तिला नेहमीच भुरळ घालत असे. समुद्र, नद्या, वेगवेगळ्या रंगाची जमिन, हिरव्यागार शेताचे चौकोन आयात, तिला नेहमी एखाद्या तुकडे जोडून केलेल्या दुपट्यासारखे वाटत. विशाखा पूर्ण आकाशमय झाली होती. पण हा सगळा दृष्टीसोहळा विंडो सीट मिळाली तरच,आणि दिवसाचा प्रवास असेल तरच बघायला मिळत असे.
विमानाची दारं बंद झाली. एअरहोस्टेस ची लगबग सुरू झाली. आपत्कालीन सुरक्षेसाठी नेहमीप्रमाणे तिच्या हातवारे करून सगळ्या सूचना देऊन झाल्या. विशाखाला या प्रकाराचे नेहमीच आश्चर्य वाटे .खरंच तिने सांगितलेलं लोकांना कळतं का? पण त्या बिचार्यांचा तो व्यवसायाचा भाग आहे. त्यांना नेमून दिलेलं काम करावंच लागतं.
आणि वेगळंच काहीतरी घडलं.
कॅप्टनने त्याची नेहमीची अनाउन्समेंट केली. स्वतःचे नाव आणि जे काही रुटीन त्यांचं सांगायचं असतं ते सांगितलं. नाव सांगितलं तेव्हा विशाखाच्या मनात चलबिचल झाली. पण नंतर तो कॅप्टन चक्क मराठीत बोलला. त्यांनी सर्वांना मराठीत पण शुभेच्छा दिल्या. पहिला आश्चर्याचा धक्का बसला. आणि नंतर आश्चर्याचे धक्केच बसत गेले. चक्क पायलट त्याच्या केबिन मधून बाहेर आला. त्याने सगळ्यांना अभिवादन केले. आणि बोलायला सुरुवात केली. "आज ८ मार्च 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस'! मी गेले अठरा वर्ष प्रत्येक महिला दिनाला विमानातील महिला प्रवाशांसाठी माझी ही कविता वाचून शुभेच्छा देतो. आणि सर्व पुरुष प्रवाशांना त्यांने विनंती केली की सर्वांनी उभे राहून सर्व महिलांसाठी टाळ्या वाजवून शुभेच्छा द्याव्या."
त्याने त्याची कविता म्हटली.
"प्रेम, प्रेरणा, स्नेह, समर्पण...
की मूरत है सारी...
शत शत नमन और प्रणाम तुझे ऐ...
मेरे भारत की नारी.
मैं हूं एक वैमानिक, और हूं..
साधारण-सा व्यक्ति...
गर्व से कहना चाहूं...
जय हो.. जय हो...
नारी - शक्ति."
चक्क सर्व पुरुष उभे राहिले. कविता संपल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी सर्व विमानातील महिलांना शुभेच्छा दिल्या. विशाखाच्या मनातील गोंधळ खूपच वाढला. तिला कॅप्टनला बघायचे होते . आणि तिची सीट मागे असल्यामुळे तिला तो नीट दिसत नव्हता तरीपण ओझरता दिसला. आणि विशाखाला एकदम तिने वाचलेली एक फेसबुक पोस्ट आठवली.
एक पायलट आहे त्याला भारतातल्या १० भाषा येतात. तो त्या त्या प्रांतातल्या प्रवाशांशी त्यांच्या भाषेत संवाद साधतो बोलतो. खूप युनिक पर्सनॅलिटी आहे…. वगैरे वगैरे. आणि खाली कमेंटबॉक्स मध्ये खूप सार्या कॉमेंट्स होत्या. सगळ्यांना त्या पायलट चे खूप कौतुक होते.
विशाखाच्या डोक्यात नुसता गोंधळ उडाला होता. डोक्यात गोंधळ उडण्याचं एकच कारण होतं की चीफ पायलटने आपलं नाव सांगताना 'संग्राम पवार' हे नाव सांगितले. या सगळ्या गोष्टी इतक्या पटापट आणि कमी वेळात घडल्या की कॅप्टन परत केबिनमध्ये गेला विमान सुरू पण झाले. तरी विशाखा तिला बसलेल्या धक्क्यातून बाहेर आली नाही.
"'संग्राम पवार' ती बसलेल्या विमानाचा पायलट".
तिच्या डोक्यातील विचारचक्राने गती घेतली. आणि या वयातही हृदयात अक्षरशः धडधड व्हायला लागली. विमानाची गती वाढत होती. आणि इकडे विशाखाच्या छातीतली धडधड एवढी वाढली की, तिला वाटायला लागलं की आता आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो की काय! काहीच सुचेना. कसेबसे तिने स्वतःला सावरले.
हे सर्व होण्याचं एकच कारण 'संग्राम पवार' हे नाव ऐकताच ती पार चाळीसएक वर्ष मागे गेली. या नावाशी तिचा म्हटलं तर खूप जवळचा आणि म्हटलं तर काहीच नाही असा संबंध. आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर सगळा चित्रपट उभा राहिला.
आयुष्यातला तो विलक्षण दिवस आठवला.
भाऊंनी म्हणजे तिच्या काकांनी, तिच्या हातात 'नंदनचे' पत्र दिले. 'नंदन' तिचा चुलत भाऊ. बाबा काकांचा मुलगा. पुण्यातील 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' मध्ये शिकत होता. तिचा आणि नंदनचा नेहमीच पत्रव्यवहार होत असे. पत्र उघडले पण आत मध्ये नेहमीप्रमाणे नंदनचे इंग्लिश मधील पत्र नव्हते पण एक सुंदर अक्षरात चक्क मराठीमध्ये लिहिलेले पत्र. क्षणभर तिला काही सुचेचना! हा काय प्रकार आहे? तिने ते पत्र दोन-तीन वेळेला वाचले मग थोडा उलगडा झाला. नंदनने आंतरदेशीय पत्रावर तिचा पत्ता लिहीला. पाठीमागे त्याचे नावही लिहिले पण आतला मजकूर न लिहिता तसेच पत्र त्याच्या खिशात ठेवून दिले.
आणि बहुधा ते त्याच्या खिशातून पडले. आणि हे या मुलाला सापडले. आणि त्याने गंमत म्हणून विशाखाला मराठीत पत्र लिहिले.
नंदन, उल्का आणि सुरेश, या आर्मी मध्ये असलेल्या बाबा काकांच्या तिन्ही मुलांशी तिचं छान जमायचं. त्यामुळे पत्रव्यवहार होतच होता. सुरेश आर्मी मध्ये बॉर्डरवर होता. बाबा काकांचे तेव्हा पोस्टिंग अंबाल्याला होते. बहुतेक सुट्टीमध्ये हे सगळेजण यायचे. बाबाकाका वरिष्ठपदावर असल्यामुळे आणि हे दोघे पण सेनादलातच असल्यामुळे घरामध्ये त्यांच्या एकंदर राहणीमानाबद्दल खूप चर्चा व्हायची. लहानपणापासून विशाखा हे ऐकत गेली. त्यामुळे सैन्यदला बद्दल वेगळेच आकर्षण तिच्या मनात उत्पन्न होत गेलं. या सगळ्यात अकल्पितपणे आलेल्या या पत्राची भर पडली.
तिच्या मनात खूप चलबिचल सुरू होती. पत्राला उत्तर द्यावे की नाही. बरोबरच्या बहिणी होत्या. तिने त्यांना विचारलं पेक्षा सरळ सांगितलं की मी आता या पत्राला उत्तर लिहिते. मनाने उचल खाल्ली आणि तिने पत्राला उत्तर पाठवले.
आणि मग एका सुंदर अनुभवविश्वाची सुरुवात झाली.
लिहिणारा पण रसिक आणि भुरळ घालणारा. सुंदर काव्यात्मक पत्रे लिहायचा. अक्षर तर विलक्षण सुंदर. पत्र लिहिण्याची हातोटी पण एकदम छाप पाडणारी. तिच्या सतरा वर्षाच्या वयात हे सगळं वेगळं पण खूप छान असं काही सुरू झालं.
अतिशय आतुरतेने पत्राची वाट बघणं पत्र आल्यावर ताबडतोब उत्तर लिहिणे ते पत्र स्वतः पोस्टात नेऊन टाकणं. काय काय केलं नाही तेव्हा. आत्ता आठवताना खूपच गंमत वाटते आहे की एवढं धारिष्ट्य आपल्यामध्ये कसं आलं? व्हायचा तोच परिणाम झाला ती नाही म्हटलं तरी त्याच्यात गुंतत गेली. पण सगळं पत्रोपत्री सुरू होतं. प्रेमाची देवाणघेवाण वगैरे गोष्टी यात अजिबात नव्हत्या. पण जे काही सुरू होतं ते खूपच वेगळं आणि छान होतं.
तर त्या पत्र लिहिणाऱ्याचे नाव 'संग्राम पवार' होते. त्याचे त्याची नुकतीच भारतीय हवाई दलात 'फायटर पायलट' म्हणून निवड झाली होती.
कलकत्त्याहून जाताना संग्रामने विशाखाच्या घरी यायचे ठरवले त्याप्रमाणे तो जेवायला आला.या सगळ्यांमध्ये एक वेगळीच सहजता होती. त्याला कोणत्याही प्रकारचे कंगोरे नव्हते. सगळं छान स्वच्छ स्पष्ट होतं. सर्वांच्या मध्येच त्यांची भेट झाली दोघे एकटे भेटले नाही. तरीपण विशाखा एका वेगळ्याच मनोव्यापारात गुंतली होती. ती अक्षरशः हवेतच होती. ते वयचं तसे होते. पण एक दिवस त्याने सांगितलं की त्याला एक खूप सुंदर मुलगी आवडली आहे.
हे वाचल्यावर क्षणात विशाखाला सत्य परिस्थितीची जाणीव झाली, मनात किंचित चलबिचल झाली. पण लगेचच ती सावरली. कारण दोघांमधील नातं कोणतेही नाव देण्याइतकं दृढ झालंच नव्हतं. दोघांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण आणाभाका अश्या काही गोष्टी झाल्याच नव्हत्या, म्हणजे गोष्टी तिथपर्यंत पोचल्याच नव्हत्या. त्यामुळे एका मित्राने मैत्रिणीला ज्या मोकळेपणाने सांगावं तोच मोकळेपणा त्याच्या सांगण्यात होता. विशाखा ला त्याचेच खूप अप्रूप वाटले की किती जवळकीच्या नात्याने त्याने ही गोष्ट आपल्याला सांगितली . त्यानेच विशाखा भारावून गेली. पण दुसऱ्याच क्षणी विशाखाला हे पण आठवलं शेवटच्या पत्रात तिने पत्राचा शेवट "अजीब दासता है ये कहा शुरु कहा खतमं या गाण्याने केला होता"
कां बरं या गाण्याने तिने हा शेवट केला असेल? म्हणजे नक्कीच तिच्या मनात संग्राम बद्दल वेगळं काहीतरी होतं
विशाखाच्या वडिलांची बदली दुसऱ्या गावाला झाली. संग्राम चे पोस्टिंग पण दुसरीकडे झाले. तेव्हा फोन सर्रास वापरले जात नव्हते. पत्रांना बरेच दिवस लागायचे. या सर्व बाबींमध्ये पत्रामध्ये खंड पडला. अनपेक्षित सुरू झालेल्या या प्रकरणाचा शेवट तितकाच अनपेक्षित झाला….संवाद जरी तुटला तरी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी 'संग्राम पवार' बसलेला होता हे मात्र खरे.
लग्नानंतरची पंचवीस तीस वर्षे एखाद्या वेळेसच डोकावला तर संग्राम मनात डोकवायचा. पण वर्तमानाच्या भोवऱ्यात जगतांना मनाचा कोपरा तसाच दुर्लक्षित राहीला होता आणि आता इतक्या वर्षांनी, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर, ध्यानीमनीस्वप्नी नसताना अचानक हा 'संग्राम पवार' कसा आणि कुठुन अवतीर्ण झाला?
विशाखाच्या मनातले विचारांचे थैमान काही केल्या थांबत नव्हते.
'नक्की तोच संग्राम आहे कां?'
'पण ही तर प्रायव्हेट एअरलाईन आहे तो तर हवाई दलात गेला होता'.
'छे काही कळत नाही समजणार तरी कसे? इतक्या वर्षांनी फरक पडला आहे पण जो काही दिसला त्यावरून तरी असंच वाटतं आहे'.
'सरळ उठावे आणि जाऊन विचारावे का? पण कोणाला विचारणार? एअरहोस्टेस जवळ चिठ्ठी द्यावी कां, किंवा निरोप द्यावा का की बाबा तोच 'संग्राम पवार' असशील तर हा नंबर आहे माझ्याशी संपर्क कर'
'आता या वयात आणि या रूपात तो तर आपल्याला ओळखणे शक्यच नाही'
सगळ्या शक्यता अशक्यतांचा विचार विशाखा करत होती.
तेवढ्यात अनाउन्समेंट झाली. तापमान किती आहे, आपण किती वेळात मुंबई एअरपोर्टवर वेळात उतरू वगैरे वगैरे, गोष्टींचा तपशील दिल्या गेला. पुन्हा एकदा कॅप्टनने सर्वांचे आभार मानले. धन्यवाद वगैरे म्हणून झाले.
विशाखाच्या मनातली उलाघाल अजूनच वाढली. बरोबर नवरा असता तर कदाचित त्याच्या मदतीने संग्राम पवारच्या नावाचा शहनिशा केला असता. विशाखाने त्याला सांगितलं असतं कां? त्याच्याशी चर्चा केली असती कां? तेवढा मोकळेपणा त्यांच्या नात्यात नक्कीच आहे असं विशाखाला उगीचच वाटून गेलं. त्याने नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता.
विशाखाचे मन तिला सांगत होतं आत्ताच काही केलं तर आलेल्या संधीचा फायदा घेता येईल. नंतर संग्रामला तू कुठे शोधत बसणार? विचारून बघायला काय हरकत आहे नसेल तो संग्राम पवार तर ठीक आहे पण समजा असेल तर एवढी सगळी मेहनत फळाला येईल. मनाला रुखरुख तर लागणार नाही.
विमान हळूहळू धावपट्टीवर उतरू लागलं. पुन्हा फटाफट केबिन लगेज काढण्याचे आवाज सुरू झाले. ज्यांना घाई होती त्यांनी सामान आवरायला सुरुवात केली. विशाखाने मनाशी पक्क ठरवलं सगळ्यांना उतरू द्यायचं सगळ्यात शेवटी आपण उतरू आणि तिथल्या एखाद्या एअरहोस्टेसला सांगू की 'संग्राम पवार' या कॅप्टनशी मला दोन मिनिट बोलायचं आहे. जे होईल ते होईल. पण आपण प्रयत्न केला नाही असं व्हायला नको.
आणि त्या निर्णयानी विशाखा एकदम शांत झाली. तिने सगळ्यांना जाऊ दिलं. बाजूला उभ्या असणाऱ्या एअरहोस्टेसला तिने सांगितलं मला कॅप्टन संग्राम पवारांना दोन मिनिट भेटायचं आहे भेटू शकते का? त्या एअर होस्टेस ने थोडं विचित्र नजरेने विशाखा कडे पाहिलं. एवढी आम्हाला घाई आहे आणि ही बया कॅप्टनला भेटायचं काय म्हणते. तेवढ्यात केबिन मधून खुद्द चीफ कॅप्टन संग्राम पवारच बाहेर आले. त्या क्षणाला विशाखात कुठुन हिंमत आली माहिती नाही, पण ती चक्क त्याला म्हणाली "नमस्कार! तुम्ही मला ओळखणार नाही कदाचित. पण मी आधीची 'नेत्रा तांबे' आताची 'विशाखा —-'. मी तुमचा अजिबात वेळ घेणार नाही पण आपण तेच संग्राम पवार आहात कां? “ आणि विशाखाने त्यांला चाळीसएक वर्षांपूर्वीचा पत्र अदलाबदलीचा संदर्भ दिला.
क्षणात होत्याचे नव्हते झाले तो तोच 'संग्राम पवार' होता. …संग्रामने आपण कुठे आहोत काय करतो आहोत याचा काहीही विचार न करता विशाखाला अत्यानंदाने घट्ट मिठी मारली…
काही क्षणातच विशाखा आणि संग्राम दोघेही भानावर आले. संग्राम ला लगेच दुसरी फ्लाईट होती त्यामुळे त्याला अजिबात वेळ नव्हता जायची घाई होती. विशाखाला पण जाणे भाग होते तिथे उभे राहून काही बोलणे शक्य नव्हते. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. मोबाईलवर पुढचे बोलू असे ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
वेगळ्याच धुंदीमध्ये विशाखा बसमध्ये बसली उतरली, बेल्ट वरून स्वतःची बॅग घेतली, पुन्हा कॅब बुक केली. कॅब मध्ये बसली. सगळं स्वप्नवत वाटावं असं घडलं होतं.
"खरंच संग्राम भेटला त्याने एका क्षणाचाही विचार न आपल्याला मिठी मारली! आणि त्यानंतर काही क्षणातच आपण वेगवेगळ्या दिशांना निघालो! खरंच घडलंय का? यावर विश्वास ठेवावा न ठेवावा या संभ्रमातच ती होती." “आपले आणि संग्रामचे काय योग आहेत काही कळत नाही. संग्राम ची पुन्हा अशी विलक्षणरित्या भेट व्हावी असं विधीलिखितच होतं का?"
"काय नातं आहे आपल्या दोघांचं? मैत्रीचं? मैत्री पलीकडचं अजून काही?"
विशाखा ला एकदम आठवलं संग्रामनेच मागे लिहिलं होतं.
'काही नात्यांना नाव नसतं
जगाला दिसत नसतं
जसं आकस्मिक गवसतं
तसं क्षणात निसटून जातं.'
शुभांगी पुस्तके
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box