मोगरा
फुलला
ऋतुजा कुलकर्णी
पहाटेच्या
सोनकिरणांनी खिडकीच्या त्या एका कोपऱ्यातून घरामध्ये प्रवेश केला.
नेहमीप्रमाणेच देवाजवळ हात जोडून रजनी उभी होती. नुकतेच अंघोळ करून आल्यामुळे
तिच्या ओल्या केसांमधून पाण्याचे ओघळ तिच्या पाठीवर येऊन रेंगाळत होते आणि मुळातचं
श्वेत कांती असलेल्या रजनीचे सौंदर्य त्या हिरव्या साडीमध्ये श्रावणात हिरवा गालीचा
पांघरलेल्या निसर्गाइतकेचं खुलले होते आज.
रजनीने
गॅसच्या मंद आचेवर चहाचे आधण ठेवले आणि ओल्या केसांना टॉवेलने हलकेच पुसून तिने तो
टॉवेल व्यवस्थित वाळतं घातला आणि तिची नजर सवयीप्रमाणे घड्याळावर स्थिरावली.
घड्याळात बरोबर सहा वाजत आले होते. रजनी पुन्हा स्वयंपाकघरात गेली तिने उकळलेला
चहा गाळून घेतला आणि चहाचा कप घेऊन ती घराच्या अंगणात आली आणि स्थिरावली तिथे.
एकीकडे आकाशात सूर्य ढगांआडून नुकतेच डोके वर काढून येऊ पाहंत होता तर दुसरीकडे
पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. रोजचे हे दृश्य पाहंत रजनीने चहाचा शेवटचा घोट घेतला
आणि कप तिथेच ओट्यावर ठेऊन ती उठली. आजही तिची पाऊले त्या मोगऱ्याच्या झाडाजवळ
येऊन थांबली. तिने क्षणभर त्या झाडावरून प्रेमाने हात फिरवला. झाडावर बहरलेला
मोगराही तिच्या त्या स्पर्शाने अधिकच फुलला. सर्व फुले आता एक एक करून रजनीच्या
कुशीत शिरण्याची वाटच पाहंत होती जणू. रजनीने हातांची ओंजळ केली आणि त्या झाडावर
असलेल्या काही फुलांना आपल्या ओंजळीत घेतले आणि त्या फुलांचा गंध स्वतःमध्ये
साठवून घेत ती पुन्हा घरात शिरली. स्वयंपाकघरात चहाचा कप ठेऊन ओंजळीत असलेली फुले
रजनीने टोपलीत ठेवली आणि सराईतपणे कुठलाही आवाज न करता टेबलच्या ड्रॉवर मधून सुई
दोरी काढली. रोज सकाळी सगळे उठायच्या अगोदर तिचा हाच दिनक्रम असायचा. आत्ताही
रजनीने नेहमीप्रमाणेच त्या मोगऱ्याच्या फुलांचा सुंदर असा गजरा तयार केला आणि
स्वतःच्या कमरेपर्यंत रुळत असलेल्या केसांची सैलसर वेणी घालत रजनीने त्यावर गजरा
माळला आणि आरशात जाऊन तिने स्वतःकडे एकवार नजर फिरवली.
"आईsss"
स्वतःला आरशात तिने अजून नीटसे पाहिले ही नव्हते एवढ्यात एक जोरात
आवाज तिच्या कानी आला तशी रजनी गर्रकन मागे वळली. मागे शरद तिचा मुलगा तिच्यावर
डोळे रोखून उभा होता, त्याच्या शेजारी त्याची बायको सायली ही उभी होती आणि त्या
चार डोळ्यांबरोबर आता कित्येक डोळे ही रजनीकडे रोखून पाहंत होते. प्रत्येकाच्या
डोळ्यात रजनीला तिच्या बद्दल राग, सहानुभूती अशा वेगवेगळ्या भावना दिसत होत्या पण
रजनी मात्र अगदी शांत उभी होती या सगळ्यात. शरद आणि त्याची बायको सायली दोघेही
रजनीकडे अगदी आश्चर्याने पाहंत होते.
"
रजनीला नक्कीच मानसिक धक्का बसलायं . अरे शरद ऐक बाबा आपण तिला एखाद्या डॉक्टरकडे
नेऊया. मला तर वाटतयं.. " गर्दीत उभ्या असलेल्या एक वयस्कर काकू काही बोलायला
लागल्या तसे शरदने हातानेच इशारा करून त्यांना थांबायला सांगितले.
"प्लीज
कोणीही काहीही सल्ला देऊ नका. मला माझ्या आईशी बोलायचे आहे. ", असे म्हणतं
शरद रजनीच्या दिशेने चालायला लागला. रजनी जवळ जाऊन त्याने तिचा हात हातात घेतला,
त्याच्या पाठोपाठ सायली ही रजनी जवळ जाऊन उभी राहिली आणि तिने तिच्या खांद्यावर हात
ठेवला.
"आई
मी तुला लहानपणापासून पाहंत आलो आहे केसांत गजरा माळताना. मला माहित आहे गं तुला
गजरा खूप आवडतो ते पण..", शरदने एक आवंढा गिळला, सायलीने डोळ्याने शरदला धीर
दिला तसा तो पुढे बोलायला लागला.
"आई
अगं काय झालं तुला? मला मान्य आहे गं जे झालं ते खूपचं अचानक होतं पण तु इतक्या
कमकुवत मनाची नाहीस की तुला त्याचा मानसिक धक्का बसेल आणि तु कशीही वागशील. आई मी
तुला लहानपणापासून पाहंत आलो आहे गं. बाबा इथे नसताना ही त्यांच्या मागे तु
आपले घर सावरताना पाहिले आहे मी, स्वतः रात्रभर बाबांची काळजी करताना आणि त्याचवेळी
आजी आजोबांना धीर देताना पाहिले आहे मी तुला. बाबांची नोकरी सैन्याची कायम मृत्यू
समोर तरीही तु कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होतीस मगं आता का अशी वागत
आहेस? आई काहीतरी बोल गं. तु कालपासून शांत आहेस आणि आत्ताही काही घडले नाही या
अविर्भावात रोजसारखी तयार झाली आहेस.
आई तुला
कळतयं का या साज शृंगाराचा, हा गजरा माळण्याचा तुला हक्क नाही आता. आई काल बाबा
गेले गं. प्लीज तु अशी नको वागू अजून चोवीस तास ही उलटले नाहीत गं. तुला लक्षात
येत आहे का आई माझे बाबा, तुझा नवरा आता या जगात नाही. ", इतकावेळ महत्प्रयासाने
रोखलेले मनातले दुःख आता शरदच्या डोळ्यातून बाहेर आले तशी सायली पुढे आली आणि तिने
शरदला धीर दिला.
नातेवाईकांची
गर्दी मात्र अजूनही एकदा रजनीकडे तर एकदा शरद आणि सायलीकडे पाहंत उभी होती. रजनीचे
शांत असणे तिथे असलेल्या प्रत्येकासाठी कुतूहलाचा विषय ठरत होता.
रजनी शरद
जवळ आली. तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला तसा शरद तिच्या कुशीत शिरून
रडायला लागला. अगदी चार दिवसांपूर्वीच या घरात रजनी आणि वसंत च्या लग्नाच्या
तीसाव्या लग्नाचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला गेला होता तेव्हा कोणालाही
कल्पना नव्हती की पुढच्या चार दिवसांनी हे घर दुःखात असेल. हदय विकाराचा झटका हे
निमित्त ठरलं आणि अचानक शरदच्या वडिलांनी या जगातून निरोप घेतला. एकतर अचानक
वडील गेले आणि अजून त्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत आईचे असे विलक्षण वागणे
यामुळे शरद गांगरून गेला होता अगदी.
"शरद,
बाळा शांत हो. मला माहित आहे तुझे बाबा या जगात नाहीत ते." रजनीचे हे बोलणे
ऐकून शरद, सायली नाही तर तिथे उभे असलेले सर्व नातेवाईक सुद्धा एकमेकांकडे आ वासून
पहायला लागले. आत्तापर्यंत सगळ्यांना असेच वाटायला लागले होते की रिटायरमेंट
घेतल्यामुळे आत्ता कुठे वसंत रजनीला जरासा निवांत वेळ मिळाला होता एकमेकांसाठी
त्यात नेमके असे काहीतरी घडले. रजनीला नवरा अकस्मात जाण्यामुळेच दुःख झाले असेल
आणि त्यामुळेच ती अशी भान हरपून गेल्यासारखी वागतेय पण रजनीने सगळ्यांना पुन्हा
एकदा कोड्यात टाकले होते.
"आई
तुम्हाला बाबा गेले माहित आहे मगं तरीही तुम्ही हा गजरा, ही साडी.. का??"
सायलीने दबकतच विचारले रजनीला.
रजनीने
मात्र शरदचा हात धरला आणि त्याला घेऊन थेट घराच्या बाहेर आली अंगणात त्या
मोगऱ्याच्या झाडाजवळ. त्यांच्या पाठोपाठ सायली आणि घरातील सर्व नातेवाईक सुद्धा
अंगणात आले होते.
रजनीने
त्या झाडाकडे पाहिले.
"
शरद तुला माहित आहे का हे झाड आपल्या या अंगणात केव्हापासून आहे ते?", रजनीने
हा प्रश्न विचारताच पुन्हा एकदा सगळे गोंधळले.
"आई
मला नाही माहित हे झाड केव्हापासून आपल्या अंगणात आहे ते पण तु आत्ता हे काय
विचारतेय मध्येच सांग ना?", शरदने रजनीला उलट प्रश्न केला.
"
शरद तुला माहित आहे लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा मी केवळ वीस वर्षाची
होते. प्रेम, लग्न, संसार या गोष्टींसोबत अजून नीट ओळख ही झाली नव्हती त्यात तुझे
बाबा सैन्यात त्यामुळे त्यांचा रूबाब, तो भारदस्त आवाज यामुळे मी प्रचंड घाबरले
होते पण अगदी पहिल्या रात्रीपासून तुझ्या बाबांनी मला नवरा आहे याचा धाक न दाखवता
एक मित्र होऊन माझ्या मनाची अवस्था समजून घेतली.
लग्नानंतर
मला तुझ्या बाबांचा स्वभाव लक्षात येईपर्यंत आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची
जाणीव होईपर्यंत तुझे बाबा सैन्यात परत जाण्यासाठी निघाले होते सुट्टी संपवून.
तुमचे लग्न होऊन आता एक वर्ष झाले आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळी
नेमकी माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ते. तुझ्या बाबांना ही माझी तगमग कळत
होती पण त्यांना नात्यांपेक्षा कर्तव्य मोठे होते.
निघायच्या
अगोदर तुझ्या बाबांनी माझ्या हातात मोगऱ्याचे एक रोप दिले होते आणि मला
म्हणाले,
'रजनी
तुझ्या या केसांवर गजरा खूप खुलून दिसतो. तुला लग्नात केसांत गजरा माळलेले पाहिले
तेव्हाच ठरवले की या केसांवर रोज गजरा असायला हवा पण माझ काम हे असं. मी काही रोज
तुझ्यासाठी इतर नवरे आणतात आपल्या बायकोसाठी तसा गजरा नाही आणू शकणार किंवा तुझ्या
केसांत माळू ही नाही शकणार म्हणूनच हे रोप तुला देतोय.
लग्नानंतर
सुरूवातीचे दिवस एकमेकांना देण्याचे असतात पण मी तुला ते सुख देऊ शकत नाही पण मी
सदैव तुझ्या सोबत आहे आणि हे रोप तुला म्हणूनच देतोय. तु रजनी मी वसंत. रजनी
म्हणजेच रात्र आणि हा मोगरा ही रात्रीच्या वेळी वसंतात जास्त फुलतो त्याप्रमाणे मी
सोबत नसलो तरीही आपलं प्रेम कायम फुललेलं असेल या मोगऱ्याच्या फुलासारखं आणि तु
इथून पुढे तु रोज गजरा माळत जा केसांत म्हणजे तुला मी सोबत नसल्याची जाणीव होणार
नाही. ' ", हे बोलताना भूतकाळातील आठवणी रजनीच्या डोळ्यासमोर आजही
उभ्या होत्या लख्ख. तिने डोळ्यातून येऊ पाहणारे अश्रू डोळ्यातच अडवले आणि पुढे
बोलू लागली.
"
शरद तू मगाशी म्हणालास ना की आई मला माहित आहे तूला गजरा आवडतो आणि लहानपणापासून
तू मला गजरा माळताना पाहिले आहेस ते पण शरद मी गजरा माळायचे केसांत ते तुझ्या
बाबांना आवडतो म्हणून. हे तुमच्या सगळ्यांसाठी केवळ एक झाड असेल पण माझ्यासाठी हे
झाड नव्हे तर माझा सोबती आहे तो. जेव्हा या झाडाला फुले नसायची त्यावेळी सुद्धा
माझ्या केसांत मी गजरा माळायचे सोडले नव्हते. मी गजरा विकत आणायची कारण या
मोगऱ्याच्या दरवळात मला तुझ्या बाबांचा भास व्हायचा.
मला माहित
आहे तुम्हा सगळ्यांना माझे वागणे चुकीचे वाटत असेल पण मी मात्र फक्त तुझ्या
बाबांना दिलेला शब्द पाळतेय शरद. "
"
कुठला शब्द दिला होता तु बाबांना? ", रजनीचे बोलणे ऐकून शरद विचारतो.
"
शरद तु माझ्या पोटात वाढत असताना तुझे बाबा सुट्टी घेऊन आले होते त्यावेळी माझी
अवस्था खूपच नाजूक होती. चांगले महिनाभर ते सोबत होते पण निघताना मात्र मी थोडी
हळवी झाले होते त्यावेळी तुझ्या बाबांनी माझ्याकडून एक शब्द घेतला होता. ते मला
म्हणाले,
'रजनी हा
मोगरा बघं किती फुललायं. मी तुला मागच्या वेळी एक रोप दिले होते पण आता त्याचे
झाडात रूपांतर होत आहे हळू हळू अगदी असचं आपलं प्रेम सुद्धा बहरत आहे आणि आपल्या
संसाराच्या पालवीवर आता एक नवा बहर येतोय काही दिवसांत जण माझं काम तूला चांगलचं
ठाऊक आहे म्हणून आज मला एक वचन दे की जर पुढे मागे मला काही झालं तर तु केसांत
गजरा माळायचे सोडणार नाहीस.
रजनी
माझ्यानंतर मला तूला रोज असाच साज शृंगार करताना आणि केसांत गजरा माळताना पहायचे
आहे त्यामुळे मला शब्द दे की तु आपल्या या प्रेमाला कायम बहरत ठेवशील. ', तुझ्या
बाबांनी आर्जवच इतकी प्रेमळ केली होती की मी त्यांना नकार नाही देऊ शकले
त्यावेळी.", एवढे बोलताना रजनीला एक हुंदका दाटून आला तसे शरदने तिला जवळ
घेतले आणि कालपासून तिच्या डोळ्यात साठलेले अश्रू बाहेर आले.
इतकावेळ
रजनीकडे विमनस्क नजरेने पाहणारे नातेवाईक ही एव्हाना हळवे झाले होते. रजनीने
सगळ्या नातेवाईकांकडे पाहिले.
"शरद
तुझे बाबा कायम म्हणायचे की प्रेम हे दुराव्याने अजून वाढते.
तुम्ही आजकालची
मुलं सहवासाला प्रेम समजता. तू मध्ये एक महिना कामासाठी गेला होतास तेव्हा सायलीची
अवस्था मी पाहिली होती जवळून अगदीच.
खरं सांगू
शरद तुझ्या बाबांना आणि मला एकत्र असा सहवास लाभला नाही कधी पण जेवढा वेळ आम्हाला
मिळाला सोबत तो प्रत्येक क्षण आम्ही भरभरून जगलो.. त्या क्षणी एकमेकांवर भरपूर
प्रेम केलं आणि म्हणूनच आजही जेव्हा मला त्यांचा वेळ देण्याचा शब्द देऊनही तुझे
बाबा मला असे अचानक अर्ध्या प्रवासात सोडून गेले आहेत तेव्हाही मी एवढी दुःखी नाही
आहे कारण त्यांचा देह फक्त नष्ट झाला आहे पण तुझे बाबा कायम इथेच आहेत
माझ्यासोबत.
या
केसांवर माळलेला गजरा आणि त्याचा दरवळ मला तुझ्या बाबांची उणीव कधीच भासू देणार
नाही जोपर्यंत माझे श्वास चालू आहेत तोप हा दरवळ मी असाच जपणार आहे. मगं मी विधवा
आहे, मला हे साज शृंगाराचे हक्क आहेत की नाही याचा मला फरक पडत नाही कारण या जगांत
शाश्वत गोष्ट एकच आहे ती म्हणजे प्रेम.
प्रेम अमर
आहे. तुझे बाबा आता या जगांत नाहीत म्हणून आमचे प्रेम नष्ट होणार नाही उलट आमचे
प्रेम अजूनचं बहरत जाणार आहे कारण आता वसंत ऋतु सुरू होतोय लवकरचं आणि माझ्या
प्रेमाचा
मोगरा
फुलणार आहे पुन्हा एकदा. "
खरंच
प्रेम ही आयुष्यात असलेली खूप सुंदर गोष्ट आहे.
एकीकडे
रजनीचा प्रेमाचा नवा प्रवास सुरू होत होता तर दुसरीकडे तिथे असलेल्या सर्वांना
प्रेमाचा एक नवा अर्थ उलगडला होता.
***समाप्त ***
लेखिका :
©®ऋतुजा कुलकर्णी (काव्यऋतु)
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box