उत्तरदायित्व - ॲड् सौ मीताली कुलदीप सावळेकर

 उत्तरदायित्व

 ॲड् सौ मीताली कुलदीप सावळेकर


"काय मग आज काय विशेष??"...

"कुठे काय नेहमीचंच"...

"बरं ते जाऊ दे कसा गेला आजचा दिवस??"...

"या तुझ्या चाफ्याच्या फुलांसारखा"... माधवराव मालतीबाईंच्या ओंजळीत फुले देत म्हणाले...

"इश्श" म्हणून लाजून मालतीबाई पाठमो-या वळाल्या, ओंजळीत तोंड लपवायला गेल्या -या, पण क्षणभर त्या चाफ्याच्या सुगंधात हरवून गेल्या...भानावर येत खोल श्वासभर तो सुगंध साठवला आणि षोडशवर्षीय यौवनेला लाजवेल या गतीने "आले हं मी तोवर हलू नका इथून" असे म्हणत  अंगणात पळाल्या.

 अरे वाह!! आज बाजारातून आणलेल्या चाफ्याच्या बदल्यात घरचा मोगरा, ओंजळ आणि मन भारून टाकणार असे माधवरावांना वाटत असतानाच, अचानक ओंजळीत बकुळ अवतरताच माधवरावांनी मात्र त्या  बकुळ फुलांना अश्रूंचा अभिषेक घातला...

 मालतीबाईंनी हलकेच त्यांच्या खांद्यावर थोपटले...त्यांना अंगणातल्या झोपाळ्यावर बसवले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्या तश्याच बसून राहिल्या एकटक माधवरावांकडे बघत...

 जरा भावनेचा पूर ओसरल्यावर माधवराव, मालतीबाईंना "मालू Thank You"... एवढंच म्हणाले आणि घरात येणा-याला आल्या आल्या दर्शन देणा-या गणपती बाप्पाच्या मूर्तीला ती बकुळ फुले वाहून, नमस्कार करून माजघरात येऊन विसावले...

 मालतीबाईंनी त्यांच्या पाठोपाठ येऊन TV वर माधवरावांच्या आवडत्या बातम्या लावून त्या चहा करायला स्वयंपाक घरात गेल्या... मस्त आल्याचा वास नाकात शिरून मेंदूला जागेकरेपर्यंत माधवरावांनी सोफ्यावर मागे टेकवलेली मान काही वर केली नव्हती...पण जसा तो कप नाकासमोर आला तसा आधाशीपणे मालतीबाईंच्या हातातून कप अक्षरशः झडप घालून घेत, घोटभर पिताना जीभ भाजून घेत आणि तुझ्या हातचा चहा म्हणजे स्वर्ग सुख अशी दिलखुलास दाद देत ते उर्वरित चहाचा आस्वाद घेऊ लागले...

 नुकत्याच पडून गेलेल्या मुसळधार पावसानंतर लख्ख ऊन पडावं आणि त्या स्वच्छ, नितळ झालेल्या निसर्गाने  सूर्याच्या प्रकाशात उजळून निघावं. मालतीबाईंना माधवराव अगदी तसे वाटले त्याक्षणी. त्यांचे ते रूप डोळ्यात साठवत मालतीबाई त्यांच्या शेजारी चाफ्याचा हार करत बसल्या. एक दोनदा माधवरावांनी त्यांच्याकडे पाहिले पण काही बोलले नाहीत. त्यांना काहीतरी बोलायचय पण का कुणास ठाऊक ते बोलत मात्र नाहीत हे लक्षात आल्यावर मालतीताईंनी हातातलं काम बाजूला ठेवले आणि म्हणाल्या "हं बोला आता, काय मेलं ते सोंग काढलंय, एखाद्याला वाटायचं की काय बाईनी नव-याला मुठीत ठेवलय. बायकोने परवानगी नाही दिली तर जणू हा बोलणारच नाही. नाही का?? बोला हो. बायकोला घाबरायचे दिवस गेले तुमचे..."

"अगं तसं नाही, आज चाफ्याऐवजी बकुळीचा हार घालशील तिच्या फोटोला आणि मी करू हार??"... हे विचारताना डोळ्यात पाण्याबरोबर आणि आवाजातील कंपाबरोबर अपराधीपणा जाणवला मालतीबाईंना... खरंच तसा अपराधीपणा होता की आपल्याला जाणवला?? की तो असावा अशी आपली अपेक्षा आहे?? शेवटचा प्रश्न मनात उमटला आणि त्याच दचकल्या... पण पुढच्याच क्षणी," बरं झालं बाई, आता ही चाफ्याच्या फुलांची वरमाला मी माझ्या राजकुमाराच्या गळ्यात घालते आणि राजकुमाराला बसवते बकुळ फुलांचा हार करायला..."  असे म्हणत, आले रे बकुळफुला!! म्हणत गेल्या देखील...

चांगली टोपलीभर फुलांची लॉटरी लागली होती आज...जणूकाही आज हार होणार आणि तिच्यासाठीच होणार हे विधिलिखित असल्या सारखं...

सुहास्य वदनाने टोपलीभर फुले, सोबत सुई ओवलेला मापाचा दोरा पुढ्यात ठेवत मालतीताई म्हणाल्या," अखेर आज तुमची इच्छा पूर्ण होणार तर...तुमचे चालू दे मी तोवर स्वयंपाकाचे बघते...आणि हारातल्या प्रत्येक फुलागणिक तिच्या आठवणीत रमणा-या माधवरांना त्या आठवणींच्या राज्यात फेरफटका मारायला सोडून देऊन मालतीबाई स्वयंपाक घरात पोहोचल्या आणि त्यांना त्यांची आणि माधवरावांची पहिली भेट आठवली...

"रेवती अगं काय गोड दिसतेयस"...

"काकू दृष्ट काढायला दे बाई तिची लगेच...माझी मेलीचीच दृष्ट लागायची"... समोर गुलाबी रंगाची साडी नेसून त्यावर टपो-या मोत्याची माळ, मोत्याचे टॉप्स, मोत्याच्या बांगड्या, अंगठी, नाजूकशी टिकली असा साजशृंगार केलेल्या रेवतीला पाहून मालती म्हणाली...कारण हे सगळं मूळच्या गो-यापान रेवतीच्या सौंदर्यात भरच घालत होतं...

आताही रेवती जश्शीच्या तश्शी त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली... पण तितक्यात, "मावशी पटकन बाहेर ये...लवकर ये ना गं...मला बाबांना आणि तुला काहीतरी सांगायचय...ये ना गं..." असा बाहेरून एक सारखा हाकारा सुरू झाला आणि हातात गूळ पाणी घेऊन मालतीबाई बाहेर गेल्या.

गुळाचा खडा तोंडात टाकून त्यावर भांड भर पाणी पिऊन झाल्यावर कपाळावर हात मारत अवनी मालतीबाईंच्या गळ्यात पडत म्हणाली,"मावशी, सॉरी सगळा गूळ मी एकटीनेच खाऊन टाकला. अनिशसाठी ठेवलाच नाही"

"अगं सोने माझ्या जावयासाठी मी आणलाय बरं वेगळं गूळपाणी...मी काय आज ओळखते का गं तुला... आणि खरं सांगू का त्याबाबतीत तू थेट आईच्या वळणावर गेली आहेस. अनिश तुम्ही कसे आहात?? आणि असे अवेळी, कळवता वाट वाकडी करून आलात...सगळं ठीक आहे ना... आणि काय गं काहीतरी सांगायच होत ना तुला...सांग पाहू" तिच्या चेहर्यावरून मायेने हात फिरवत मालतीबाई म्हणाल्या...

माधवराव फक्त हे सगळं नजरेत साठवून घेत होते...

"सांगते! सांगते! सांगते!!... लहानपणीसारखे दोन्ही हात कमरेवर ठेवत ठमाकाकू सारखी समोर उभी राहत अवनी म्हणाली," पण आधी तू बाबांच्या शेजारी येऊन बस...आणि हो आज रात्रीचे जेवण आणि आईस्क्रीम फिक्स ते ही रामकृष्ण मध्ये... अनिशकडून पार्टी..."

 "अच्छा म्हणजे तेवढीच खास बातमी आहे म्हणायची..." माधवराव हार करता करता म्हणाले...

 "Yesss, The most memorable day of my life... मला माझ्या ऑफिसमध्ये Best Employee of the Decade... दशकातील सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कार मिळाला आहे..."

 "Hip Hip Hurrey...three cheers for our own beloved Awani" अनिश आणि त्या पाठोपाठ  मालतीबाई आणि माधव यांच्या या जयघोषा नंतर... 

 विजयीविराच्या मुद्रेने त्यांना हाताने आधी अभिवादन आणि लगेचच शांत करत अवनी "आणि सगळ्यात भारी काय आहे माहितीय हा पुरस्कार मला ज्या दिवशी मिळणार आहे त्या दिवशी तुमच्या दोघांची मुलाखत घेणार आहेत...माझ्याविषयी तुम्हा दोघांना बोलायचे आहेच पण तुमचा जीवनप्रवास पण उलगडायचा आहे... कसलं भारी ना...just 10 days to go...be prepared..." असे एका दमात जवळ जवळ चित्कारलीचं...

 "अनिशराव तुम्ही आहात म्हणून आमच्या चाळिशीच्या बाळाचे हे रूप टिकून आहे...चला मालतीबाई तुमचा आवडता दृष्ट काढायचा कार्यक्रम करा आणि मग जाऊ या जेवायला... सोने तुझ्या प्लॅनमध्ये या बापाकडून थोडासा बदल...जेवण माझ्याकडून... आईस्क्रीम अनिशकडून चालेल??...

 यथावकाश दृष्ट काढून झाल्यावर आईच्या फोटोला नमस्कार करायला जाताना माधवरावांनी लेकीच्या हातात बकुळीचा हार देत म्हटलं," काय योग आहे बघ आज...मावशीने वेचलेल्या फुलांचा, मी स्वतः केलेला हा बकुळ फुलांचा हार तू आईच्या फोटोला घालती आहेस आणि तेही या आनंदाच्या वार्तेसह"...

 सगळ्यांनीच पाणावल्या डोळ्यांनी हार घालून फोटोला नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. बातमीचं जोरदार सेलिब्रेशन झालं आणि अवनी आणि अनिश माधवराव मालतीबाईंना घरी सोडून त्यांच्या घरी पोहोचले देखील. दरवाजा उघडून आत आल्यावर मालतीबाई आणि माधवराव दोघे शांत आणि धीर गंभीर होते. मालतीबाई कोंडी फोडत म्हणाल्या," अवनीला पुरस्कार मिळाला हे छानच झालं...पण मला जरा दडपण आलाय थोडसं त्या मुलाखतीचं... अवनी बद्दल काय आपण दोघेही भरभरून बोलू शकतो अगदी तासनतास...अगदी छोट्यातली छोटी गोष्ट ही तिची लख्खपणे आठवते आपल्याला दोघांनाही..." "ह्म्म:... माधवराव म्हणाले...

मालतीबाई पुढे म्हणाल्या..."पण आपला जीवन प्रवास उलगडायचा?? तो तरी कसा?? आणि लोकांना तो पटणार आहे का?? किंवा रूचणार आहे का याचाच विचार करतीये"... "हम्म"...माधवराव परत हुंकारले... "अहो नुसतं हम्म काय करताय, मी काय म्हणते ते लक्षात येते का तुमच्या??...

"हो त्यावरच विचार करतोय... माधवराव गंभीर पणाने म्हणाले..., "मला वाटतं रात्र खूप झालीये आपण झोपूया आणि उद्या सकाळी चाय पे चर्चा करूया...शुभ रात्री... आणि पुढच्या क्षणी ते झोपायला निघूनही गेले...

 मालतीबाई मात्र उशिरापर्यंत या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिल्या... उशिरा केव्हातरी झोप लागली त्यांना... पण आयुष्यातले अनेक प्रसंग तुकड्या तुकड्यातून दिसत राहिले... स्वप्न आणि सत्य यांच्या हिंदोळ्यावर त्या झुलत राहिल्या... त्यात मध्येच छोटी अवनी होती, तिची आई होती, तिचे बाबा होते... मग अचानक तिची मावशी म्हणजेच मालतीबाई होत्या... 

 किती विचार करशील?? झोप आता... सगळं ठीक होईल... असे कोणीतरी म्हणल्याचे त्यांना भासले आणि जणू काही त्या आवाजाने आज्ञा केली असावी अशा त्या झोपेच्या आधिन झाल्या...

 सकाळ खरं तर नेहमीसारखीच प्रसन्न उगवली होती... पण का कुणास ठाऊक मालतीबाईंच्या मनावर कालच्या त्या मुलाखतीच्या प्रसंगाचे सावट होतं... नेहमीच्या सवयीनी घरातली सगळी काम त्यांनी हातावेगळी केली...अगदी चोख काम बजावत होतं त्यांचे शरीर...पण मन मात्र भिरभिरत होतं मुलाखतीतल्या प्रश्नांविषयी आणि त्याला त्यांनी द्यायच्या उत्तरांविषयीही...माधवराव बराच वेळ बघत होते त्यांच्या सराईत हालचाली आणि तरीही त्या हालचालींमध्ये डोकावणारी मनाची तगमग...साधारण मालतीबाईंची सर्व आवरावर झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मालतीबाईंना हाक मारली आणि म्हणाले,"जरा वाळ्याचे सरबत आणतेस का?? आणि माझ्याबरोबर तुही हे घोटभर"... 

 वाळ्याचे सरबत म्हणजे मालतीबाईंचा वीक पॉईंट... माधवरावांना फारसा आवडत नसूनही आज त्यांनी वाळ्याचे सरबत मागितलं आणि आपल्यासाठीही ते घेऊन यायला सांगितलं, म्हणजे आज निश्चित विषयाला तोंड फुटणार हे मालतीबाईंच्या लगेच लक्षात आलं... तरीही त्या वाळ्याच्या सरबताचे दोन ग्लास आणि सोबत बर्फाचे काही तुकडे घेऊन आल्या... हलक्या हाताने बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये सोडत त्यांनी वाळ्याच्या सरबताचा ग्लास माधवरांच्या पुढे केला... माधवरावांनी ग्लास तोंडाला लावत एकाच झटक्यात तो रिकामा करत खाली ठेवला आणि मालतीबाईंना म्हणाले,"माझं झालंय सरबत पिऊन... तू आता मी काय म्हणतो ते ऐक"...असं म्हणून मालतीबाईंनी वाळ्याच्या सरबताचा पहिला घोट घेईपर्यंत त्यांनी वाट पाहिली... 

 पहिल्या घोटासरशी मालतीबाईंच्या चेहऱ्यावर जे समाधान पसरलं तो धागा पकडत माधवराव म्हणाले," तू अशीच छान दिसतेस शांत, समाधानी, हसरी... उगाच तुझा ओढाताण केलेला चेहरा मला पहायला आवडतो, ना अवनीला आणि रेवती असती तर चांगला पाठीत धपाटा घातला असता तिने... तुझं हास्य ही तिची संजीवनी होती हो ना?? आणि आता नको काळजी करूस आपण ज्या ज्या वेळी जे जे निर्णय घेतले ते योग्य विचार करून, परिस्थितीचे संपूर्ण आकलन करून, एकमेकांच्या संमतीने आणि समजून घेतले... मग कशाला एवढं दडपण घ्यायचं?? आपलं रेवतीबाबतचे उत्तरदायित्व आजही आपण प्राणपणाने निभावतोय की नाही मग झालं तर... मी मुलाखतीत सांगेन हो माझी, रेवतीची आणि तुझी ही गोष्ट... अगदी कोणताही आडपडदा ठेवता...तू मुळीच काळजी करू नकोस... विश्वास ठेव माझ्यावर, जसा त्यावेळी ठेवला होतास..." 

 यावर मालतीबाई हसल्या, "तो आहेच म्हणून तर आजवरची वाटचाल आपण यशस्वीरित्या करू शकलो... ते केवळ आपल्या एकमेकांवरच्या आणि रेवतीच्या आपल्यावरच्या विश्वासावरच नाही का?? चला तुम्ही गोष्ट सांगणार म्हणल्यावर माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं... या आनंदात तुमच्या आवडीची भजी करते गरम गरम आणि सोबत फक्कड आलं घातलेला चहा... असं म्हणत मालतीबाई स्वयंपाक घरात गेल्या...

 मी गोष्ट सांगेन आणि तीही कोणताही आड पडदा ठेवता असे आपण म्हणालो खरे..  पण आपल्यासारख्या मुखदुर्बळ, मितभाषी माणसाला हे जमेल का?? पण आता हा पर्यायच नाही आपल्या आयुष्यात...हे आपल्याला जमायलाच हवं... रेवतीसाठी, मालतीसाठी आणि मुख्य म्हणजे अवनीसाठी... या गोष्टी दरम्यान अवनीलाही माहीत नसलेल्या, अर्धवट वयात अर्धवटपणे जाणवलेल्या, काही जाणवलेल्या गोष्टी निश्चितपणे कळणार होत्या पण त्याला आता इलाज नव्हता...

 त्याचबरोबर तिच्या आजवर आपण काही दिलेल्या प्रश्नांची उत्तरेही तिला आपोआप मिळणार होती आणि कदाचित तिच्यासोबत समाजालाही समजणार होती एक नवी संकल्पना, एक नवा दृष्टिकोन... पटेल, रुचेल याची पर्वा करता आपण प्रामाणिकपणे आपली खरी गोष्ट सांगायची हा एकच उद्देश मनाशी बाळगत माधवराव शब्दांची जुळवाजवळ करायला लागले...

 म्हणता म्हणता पुरस्कार सोहळ्याचा दिवस उगवला अवनी अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती...आज तिचा महत्त्वाचा दिवस पण परीक्षा मात्र होती माधवराव आणि मालतीबाईंची...पुरस्काराचे जिथे वितरण होणार होतं तिथे सगळे आले...कंपनी मोठी असल्याने दीड ते दोन हजार जण कार्यक्रमाला उपस्थित होते...अवनी सोबतच इतरही काही जणांना पुरस्कार होते... वेगवेगळ्या विभागाचे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले... त्यामुळे ते पुरस्कारार्थी, त्यांचे आई-वडील, नातेवाईक हेही कार्यक्रमाला उपस्थित होते...मालती माधवची तर मुलाखत होती त्यामुळे त्यांच्या स्वागताला आणि दिमतीला ऑफिसमधल्या काही मंडळींना जोडून दिलं होतं... 

 साधारणतः साडेनऊ वाजता अल्पोपहार आणि चहा याने कार्यक्रमाला सुरुवात होणार होती... दहा ते अकरा कंपनी बद्दलची माहिती, गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास आणि ही कंपनी ज्या जोगळेकरांची होती त्यांचा कौटुंबिक इतिहास... असा एक अर्ध्या तासाचा AV स्वरूपातला कार्यक्रम होता... खरंतर काम प्रचंड होतं पण प्रातिनिधीक स्वरूपात ते अर्ध्या तासात दाखवणं जमवून आणलं होतं... पुढच्या अर्धा तासामध्ये दीपप्रज्वलन, स्वागत, प्रास्ताविक याचं नियोजन होते. 11 ते 12 सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल बारा ते एक अशी मुलाखतीची वेळ होती... त्यानंतर तर एक ते दीड पुरस्कार सोहळा प्रदान होणार होता... अध्यक्षीय भाषण, आभार आणि त्यानंतर भोजनोत्तर कार्यक्रमाची सांगता होणार होती... हॉल मधलं वातावरण रंगीबेरंगी, अल्हाददायक, प्रसन्न आणि चैतन्य पूर्ण होतं... सगळे कमालीचे उत्साही तरीही शिस्तीत वागत होते... अविनाश जोगळेकर वेळेबाबत कमालीचे काटेकोर असल्याने कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि निवेदिकेचे आटोपशीर निवेदन हा एक बोनसच मिळालेला होता... नाहीतर निवेदन हा जणू स्वतंत्र कार्यक्रम असावा असे काही जणांचे निवेदन असते... परंतु आजची निवेदिका ही अत्यंत साध्या परंतु परिणामकारक शब्दात आणि थोडक्यात यथार्थ बोलण्यात पटाईत होती आणि संपूर्ण सभागृहाचे मन तिने जिंकून घेतले होते... प्रास्ताविक पार पडले, चित्रफितही पाहून झाली...सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि मुलाखतीसाठी माधवराव आणि मालती यांना पाचारण करण्यात आले...निवेदिकेने त्यांचा परिचय करून देताना आज आपल्या इथे आपल्या दशकातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मिसेस अवनी अनिश जोगळेकर यांच्या पालकांनी (आई-वडिलांनी हा उल्लेख तिने शिताफिने टाळला होता) मंचावर यावे अशी विनंती केली आणि ती पुढे म्हणाली," मी अवनीची शाळेपासून ची मैत्रीण असल्यामुळे आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की, आज मीही ती मुलाखत ऐकायला खूप उत्सुक आहे. कारण अवनीचे पालक हे सर्वार्थाने वेगळे आहेत आणि असे मी का म्हणते याचा उलगडा तुम्हाला लवकरच होईल... टाळ्यांच्या कडकडाटात अवनीच्या पालकांचं म्हणजे माधवराव आणि मालतीबाई यांचा आगमन झाले... जोडा खरोखरच सुरेख दिसत होता... अगदी लक्ष्मीनारायणासारखा... दोघे येऊन आसनस्थ झाले आणि सगळ्यांच्या असं लक्षात आलं की या दोघांनी आपल्या सोबत एक फोटो फ्रेम आणली आहे आणि ती त्या दोघांच्या मधोमध ठेवली आहे... 

 मुलाखतकर्त्याने मुलाखतीला सुरुवात करताना अवनी संबंधी काही प्रश्न विचारले ज्यावर दोघे भरभरून बोलले... तिचे बालपण, आवडी निवडी, आठवणीतले प्रसंग, तिला आजवर मिळालेली बक्षीसे आणि बरच काही...सोबत त्यांचे तिच्याबरोबर असलेले नाते...आणि मग त्याने या दोघांच्या सहजीवनाविषयी प्रश्नांना सुरुवात करताच माधवराव म्हणाले," जोगळेकर सर आपली आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच परवानगी असेल तर एक विनंती होती मुलाखतीमध्ये प्रश्न उत्तर देत तुकड्या तुकड्यात गोष्ट सांगण्यापेक्षा मला एकसंधपणे संपूर्ण गोष्ट सांगायला आवडेल... जोगळेकरांनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता... प्रेक्षकांनाही ती संकल्पना आवडली आणि टाळ्या वाजवत प्रेक्षकांनी त्याला अनुमोदन दिले... 

 मुलाखतकारही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक असल्याने," मग मी ही खाली श्रोत्यांमध्ये  जाऊन तुमची गोष्ट ऐकतो...आवडेल मला..." असं म्हणून गाली येऊन बसले आणि माधवराव आपली गोष्ट सांगू लागले

 "मी माधव सुरेश आपटे...एका प्रतीथयश कॉलेजमधला प्राध्यापक... मी प्राध्यापक म्हणून नुकताच रुजू झालो होतो आणि माझ्याच वर्गातल्या रेवती इनामदार या मुलीच्या प्रेमात पडलो होतो... अत्यंत सालस, सद्गुणी, देखणी (तुमची अवनी ही थेट माझ्या रेवती सारखी दिसते) तर रेवती इनामदार हिच्या दिसण्यापेक्षा तिच्या बुद्धिमत्तेवर मी भाळलो होतो... तिचं भाषेवरचे प्रभुत्व हे खरोखरच अफाट होतं... एखादा विषय समजून घ्यायची तिची सचोटी आश्चर्यचकित करणारे होती... आणि कवितेतून तिला सापडणारे विविध अर्थ हे कदाचित त्या कवीलाही उमगले नसतील असं वाटावं एवढा विविध अंगी विचार ती करत असे...मी तिच्या प्रेमात पडलोय हे मला कळायलाही सहा ते आठ महिने गेले... त्यानंतर काही महिने आपण आपल्या वयाहून एक वर्षे लहान असलेल्या आणि आपली विद्यार्थिनी असलेल्या मुलीच्या प्रेमात पडून चूक तर करत नाही होत ना या संघर्षात गेले... पण शेवटी मनाने कौल दिला रेवती नाही म्हणाली तर हरकत नाही पण आयुष्यातली आपली सहचरणीची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ती फक्त आणि फक्त रेवती...आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा रेवतीला मी लग्नासाठी विचारलं आणि रेवती हसत हसत म्हणाली," सर आहो मला वाटलं होतं तुम्ही सहा महिन्यापूर्वीच विचाराल... मी वाट पाहत होते तुम्ही कधी विचाराल याची आणि उत्सुकता ही होती कसं विचाराल याची..."

आधीच माझ्यासारखा मुखदुर्बळ, मितभाषी मनुष्य आयुष्यातलं सगळं धैर्य एकवटून विचारू पहात असतानाच या मुलीने मला क्लीन बोल्ड केलं आणि जणू माझ्या निवडीवर शिक्कामोर्तब केला... 

"म्हणजे मी तुझा होकार समजू?" एवढंच मी तिला याच्यावर विचारू शकलो... यावर गडगडाटी हसत ती म्हणाली," सरखरं सांगू का माणसांची पारख आणि हे प्रेमबिम या बाबत ही जरा कच्चीच आहे... आणि मला असं वाटतं याबाबतीत निर्णय हा आई-वडिलांनी घ्यावा..." आता मात्र माझे हातपाय लटपटायला लागले होते...धीर सुटत चालला होता आणि बहुदा आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं लागणार अशा विचारापर्यंत मी आलो होतो... तोच गंभीर होत रेवती पुढे म्हणाली," पण सर, अजून एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू का?? तुमच्या डोळ्यात मला सच्चेपणा दिसतो... तुमच्या वागण्यात मला सच्चेपणा जाणवला... त्यामुळे तुमचं म्हणणं नाकारावं किंवा तुमच्यावर रागवावं... गैरसमज करून घ्यावा असं मला मनापासून वाटत नाही आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय... आई-वडिलांनंतर या जगात माझ्यासाठी कोणी महत्त्वाचे असेल तर ती म्हणजे माझी मैत्रीण मालती... मी उद्या तुमची आणि मालतीची गाठ घालून देईन...तिला माणसांची उत्तम पारख आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे?? हे माझ्या आई-वडिलांनी इतपत तिलाही माहिती आहे... त्यामुळे जर उद्याच्या भेटीनंतर तिचं मत तुमच्याबद्दल अनुकूल असेल तर मी निश्चितपणे तुम्ही मला घातलेल्या मागणीबद्दल आई-बाबांशी बोलेन... अन्यथा आपले मार्ग भिन्न असतील..." 

 हिच्या या निर्णयावर हसावं, रडावं, रागवाव की हिने नकार दिला नाही म्हणून समाधान मानावं हे काय मला त्या दिवशी कळलं नाही... बरं जाता जाता हिने मला अजून एक धक्का दिला थोडंसं पुढे जाऊन परत मागे वळाली आणि म्हणाली," सर उद्यासाठी मनापासून शुभेच्छा बरं का... फक्त एक गंमत तुम्हाला सांगायचीय... माझ्या या मैत्रिणीने स्वतः मात्र आयुष्यभर लग्न करता राहण्याचा ठरवलं आहे... चला येते मी... उद्या भेटूया..." असं म्हणून ती निघून सुद्धा गेली आणि मी मात्र हे तिने मला का सांगितलं असावं आणि नेमकं माझ्यापुढे भविष्यात काय वाढून ठेवल असेल याचा विचार करत जागेवरच उभा... शेवटी आमच्या कॉलेजचा शिपाई शंकर यांनी "साहेब आज घरी जायचं नाही का?? केव्हाचे इथेच उभे आहात??" असं मला गदागदा हलवत विचारलं... तेव्हा भानावर येऊन सगळं आठवत मी घरी गेलो... दुसऱ्या दिवशी रेवतीला भेटेपर्यंत माझ्या काही जीवात जीव नव्हता... समोर गुलाबी रंगाची साडी नेसून त्यावर टपोऱ्या मोत्यांची माळ, मोत्याचे टॉप्स, मोत्याच्या बांगड्या, अंगठी आणि नाजूकशि टिकली अशा रेवतीला पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला... ही नाही म्हणाली तर हीच हेच रूप डोळ्यात साठवत त्या क्षणी तिथे देह ठेवण्याची माझी तयारी होती... रेवतीने माझी आणि मालतीची ओळख करून दिली. मालतीने जवळ जवळ दोन तास मला उलटा पालटा घेतला होता... ज्यात मुख्यत्वे मला लग्न का करायचं आणि ते रेवतीशीच का करायचं यावर सगळा भर होता... मी कोणतेही फिल्मी डायलॉग मारता प्रामाणिकपणे मला जे वाटलं ते मालतीला सांगितले... मालतीला माझ्या बोलण्यात सच्चेपणा जाणवला असावा कारण मालतीने आमचं नातं पुढे न्यायला होकार दिला... त्यादिवशी मालती माझ्यासाठी जणू देवदूत ठरली होती... यथावकाश रेवती आणि मालतीने रेवतीच्या घरी आणि मी माझ्या घरी सांगितल्यानंतर टिपिकल चहा पोहे कार्यक्रम होऊन लवकरच आमचा साखरपुडा आणि पुढच्या सहा महिन्यात आमचं लग्न पार पडले...अगदी फुलपाखरांसारखे स्वच्छंदी दिवस होते ते आमच्यासाठी... माझ्या तर आयुष्यातलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं... माझ्या रेवतीसाठी काय करू आणि काय नको असं मला झालं होतं...लग्न झालं असलं तरी रेवतीचं शिक्षण पूर्ण होणं हे तितकंच महत्त्वाचं होतं आणि ही माझ्या किंवा रेवतीच्या घरच्यांपूर्वीच मालतीने मला घातलेली अट होती... अर्थात रेवती सारख्या हुशार मुलीचे शिक्षण थांबणं हे कुठल्याच अर्थाने योग्य नव्हतं... यथावकाश तिचं शिक्षण पूर्ण झालं... शेवटच्या वर्षी तिला गोल्ड मेडल मिळालं...पुढे जाऊन तिनी बाहेरून एम पी एचडी हेही करायचं ठरवलं आणि तेही यशस्वीरित्या पूर्ण करत ती डॉक्टर झाली... आता मात्र आम्हा दोघांनाही आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याची इच्छा होती... आम्हाला आता आमच्या बाळाची प्रतीक्षा होती... एव्हाना लग्नाला पाच वर्षे झाल्यामुळे आणि रेवतीचे शिक्षणही पूर्ण झाल्यामुळे नातेवाईकांकडूनही आडून आडून सुचवणं सुरू झालं होतं अशातच ती गोड बातमी आली आणि मग काय विचारता?? रेवतीचे जे काही लाड सुरू झाले...सासरी माहेरी दोन्हीकडे तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं... यथावकाश आमच्या आयुष्यात एक छोटीशी परी आली... अवनी नावाची आणि तिनी आमच्या आयुष्याचं नंदनवन करून टाकलं... रेवतीचा सगळा वेळ अवनीच्या अवतीभवती जायचा मी कॉलेजमधनं आलो की पुढचे दोन तास दिवसभर अवनींनी असं केलं, अवनीनी तसं केलं, अवनी कुशीवर वळाली, हसली, माझ्याशी बोलली, हुंकार दिला अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यात रेवतीला खूप आनंद मिळायचा... केवळ अवनीसाठी रेवतीने तिच्या कामातून ब्रेक घेतला होता... तिला तिचं आई पण पुरेपूर अनुभवायचं होतं आणि आमची कोणाचीच त्याला हरकत नव्हती... ती छोट्या अवनीशी सतत वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत राहायची... पहिल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही मुलांना जेवढे भाषा समृद्ध कराल तेवढं आयुष्यभर टिकतं हे माहिती असल्याने ती जास्तीत जास्त शब्दसंपदा अवनीकडे पोहोचवायची आणि अवनी ही त्याला प्रतिसाद द्यायची...अवनी शाळेत जायला लागल्यानंतर मात्र रेवतीने पुन्हा तिच्या कामावर रुजू व्हावं असं ठरलं... त्याप्रमाणे ती रुजू झाली ही आणि अचानक एक दिवशी क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं तशी ती बातमी येऊन धडकली... तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने रेवतीचं तिच्या कामाच्या ठिकाणीच आकस्मिक निधन झालं... पुढचे अनेक तास काय घडतय याची मला कोणतीही शुद्ध नव्हती... आलेल्या बातमीवर विश्वास ठेवायला मन तयारच नव्हतं...असं कसं घडू शकतं हा एकच प्रश्न मनाला वारंवार पडत होता... मेंदूला एक प्रकारची बधिरता आली होती...समोर शांत निजल्यासारख्या वाटलेल्या रेवतीला पाहून कळालेली बातमी खोटीच असणार... आत्ता अवनी शाळेतून आली की रेवती उठून बसेल असंच मन वारंवार सांगत होतं...लोक येत होते, भेटत होते, सांत्वन करत होते... पण माझ्या जाणिवा, संवेदना सगळ्या बधिर झाल्या होत्या... डोळ्यांना दिसत होतं पण मेंदूपर्यंत काहीच पोहोचत नव्हतं... ही घटना जर खरी असेल, माझी रेवती जर या जगात नसेल, तर मग मी अजूनही जिवंत कसा हा एकच प्रश्न मेंदू कुरतडत होता आणि माझी रेवती या जगातून जाऊन सुद्धा जर मी जिवंत असेन तर मला याची लाज वाटली पाहिजे असंच माझं मन मला वारंवार सांगत होतं... थोड्यावेळाने कोणीतरी अवनीला अंत्यदर्शनासाठी घेऊन आलं... त्या चिमुरडीने हंबरडा फोडला," आई उठ ना गं... मला मिळालेली ट्रॉफी बघायला तरी उठ ना... माझी ही पहिली ट्रॉफी मला तुला दाखवायची होती गं... आज मी तुझ्यासारखी एक छोटीशी कविता करायचा प्रयत्न केला होता गं आणि सगळ्यांना ती कविता खूप आवडली गं... त्या कवितेचा विषय होता "आई"... मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुला कविता आधी वाचून नाही दाखवली गं... प्लीज उठ ना... त्या लेकराचा हंबरडा कानापर्यंत पोहोचत होता पण काय करावे, कसं तिला समजवावं, कशी तिची समजूत काढावी हे काही कळत नव्हतं...नंतर समजलं ते असं की मालतीने त्या सगळ्या प्रकरणांमध्ये आपलं दुःख (कारण रेवती ही तिची सगळ्यात जवळची किंबहुना एकमेव सखी होती) बाजूला ठेवत अवनीला, अवनीच्या आजी आजोबांना सांभाळून घेत सगळी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतली होती... 

 जड अंतकरणाने रेवतीचे सगळे विधी करून आम्ही घरी परतलो...पुढचे दोन एक महिने माझा आयुष्यात काय घडत होतं, मी काय करत होतो हे आजही मी सांगू शकणार नाही... माझी नजर सतत दरवाजाकडे असायची असं वाटायचं की आत्ता रेवती येईल, मला हाक मारेल खळखळून असेल आणि म्हणेल बघ कसं फसवलं तुला... तुला खरं वाटलं ना... अरे पण मी इथेच आहे... मी तुला सोडून कुठे गेले नाही...माझ्या या अवस्थेमध्ये अवनीच्या आजी आजोबांनी तीची खूप काळजी घेतली... पण मग कुठेतरी मला यातून बाहेर काढण्यासाठी आणि या छोट्या अवनीला तिच्या आईचं प्रेम परत मिळावे यासाठी माझ्या दुसऱ्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या... माझ्यासाठी हे अशक्य प्राय होतं पण अवनीसाठी मी हे करायला हवं असं सातत्याने माझ्यावर बिंबवण्यात येत होतं...

 पण आपण तिचा चांगला सांभाळ करूया... तुम्ही दोन्हीकडचे आजी आजोबा आहात ना आणि समजा सावत्र आई तिच्याशी नीट नाही वागली तर काय... अशा प्रकारे मला सुचेल तो सुचेल तसा सुचेल तेव्हा मी प्रस्ताव टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश येईना आणि मला दोन्हीकडून पुढच्या महिन्यात आम्ही स्थळ बघायला सुरुवात करतो असं निर्वाणीचा सांगण्यात आलं...

 त्यादिवशी मी रेवतीच्या फोटोसमोर ढसाढसा रडलो आणि यातून तूच काहीतरी मार्ग सुचव असं तिला सांगितलं... अशातच आठवडा गेला आणि एक दिवशी अवनी शाळेतून आली ती रडत रडतच... काय झालंय ते ती कुणालाच सांगेना ना तिच्या आजी-आजोबांना ना मला... मग शेवटी तिच्या आजीने तिच्या मालती मावशीला फोन लावला... मालती मावशी आणि ती खोलीत काहीतरी बोलल्या आणि अवनीच्या चेहऱ्यावरचं सगळं रडू मावळून एक छानस हसू तिच्या चेहऱ्यावर फुललं होतं...आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि त्या क्षणी माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली आणि मी मालतीशी बोलायचं ठरवलं...

 दुसऱ्याच दिवशी मी मालतीशी या कल्पनेबद्दल बोलायचं ठरवलं... खरंतर तिच्याशी हे बोलणं किंवा असा काही प्रस्ताव तिच्यासमोर ठेवणं हे धाडसच होतं... पण रेवतीची एक चांगली मैत्रीण म्हणून ती निश्चितपणे मला समजून घेईल... किमान माझ्या या कल्पनेची चेष्टा निश्चित करणार नाही अशी मला कुठेतरी आतून खात्री वाटत होती...

 दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो खरे पण काय आणि कशी सुरुवात करावी हे समजेना...मग बोलता बोलता तिने अवनीची चौकशी केली आणि तोच धागा पकडत मी बोलायला सुरुवात केली...

 मालती तुला सगळेच माहिती आहे... मला या सगळ्यांची अवनीबद्दलची काळजी समजतेय, पटतेय... अवनीला आईच्या प्रेमाची आवश्यकता आहे हे पण मान्य आहे पण अवनीची आई म्हणून जी कोणी घरी येईल तिच्या माझ्याकडूनही काही अपेक्षा असतीलच ना गं... पण त्या मात्र मी कधीच पूर्ण करू शकणार नाही... मग तो तिच्यावर अन्याय नसेल का?? आणि मग एकाच वेळी मी रेवतीवर आणि तिच्यावरही अन्याय करतोय असं मला सतत वाटत राहील...मधल्या मध्ये यामुळे अवनीचीही फरपट किंवा घुसमट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशी कोणी, का तयार होईल की जिचे फक्त अवनीशी आईचे नाते असेल आणि माझ्याशी मात्र कोणत्याच प्रकारचे कसलेच नाते असणार नाही... तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते... खरंतर एकदा असं वाटलं होतं की तू आणि अवनी ह्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे तर तू अवनीला तुझ्यासोबत घेऊन जाशील का असं विचारावं...पण रेवती नंतर मी कोणासाठी जिवंत असेन तर ती अवनी आहे आणि अवनीपासून दूर राहणं मला शक्य होईल असं वाटत नाही...त्यामुळे यापुढे मी तुला जे विचारणार आहे, त्यामुळे मी तुला जगातील सगळ्यात अत्यंत स्वार्थी आणि आत्मकेंद्री वाटेन, तुझ्या आयुष्यातल्या एका निर्णयाचा गैरफायदा घेतोय... तुझा, तुझ्या मैत्रिणी वरच्या प्रेमाचा ही कुठेतरी गैरवापर करतोय असं वाटेल... पण हे सगळे आरोप मान्य करून तू माझं एकदा शांतपणे ऐकून घ्यावं असं मला वाटतं... 

 यावर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिल्याने मला आश्चर्य वाटलं...पण खरा आश्चर्याचा धक्का तर तिने मला पुढे दिला जेव्हा ती असं म्हणाली की,"तुला काय म्हणायचे ते मला समजलं आणि माझी त्यासाठी तयारी आहे". 

 असे म्हणून तिने माझी अनेक संकटातून सुटका केली होती... तसेच मला माझ्या नजरेतून उतरण्यापासूनही वाचवलं होतं... तिने माझा हात हातात घेतला आणि ती म्हणाली,"मनामध्ये कुठलेही किल्मिष ठेवू नकोस... तुझं आणि रेवतीचं नातं मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुझी घालमेल, तुझ्या आयुष्यात कोणतीही दुसरी स्त्री येऊ नये यासाठीची तुझी धडपड मी निश्चितपणे समजू शकते... त्याच वेळेला अवनीसाठी तळमळत असलेला तुझा जीव मी जाणते आणि त्यातून तू निवडलेला पर्याय हा व्यावहारिक दृष्ट्या अगदीच स्वाभाविकपणे अमलात आणण्यासारखा आहे... ज्यामुळे तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यातल्या कुठल्याच निर्णयाला धक्का लागणार नाही... आपण विधिवत लग्न करू ज्यामुळे या नात्याला समाज मान्यता मिळेल पुढे जाऊन अवनीला अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार नाहीत... परंतु आपल्या दोघांसाठी हे नातं म्हणजे रेवतीचे अवनीसाठीचे असलेले उत्तरदायित्व असेल...हेच अंतिम सत्य असल्यामुळे तू कायमच अवनीचा बाबा असशील आणि मी मात्र कायमच अवनीची मावशी असेन आणि हे भान आपण कायमच जपू या... मी यासाठी तयार झाले त्याला अजून एक कारण आहे... काल अवनी शाळेतून आली तेव्हा दोन गोष्टी एकत्रित आल्या... त्या इवल्यासा जीवाला नहाणं आल्यामुळे ती घाबरून गेली होती आणि त्यातच तिला कोणीतरी आता तुझ्यासाठी नवीन आई येणार आहे असे सांगितल्यामुळे ती आणखीनच रडवेली झाली होती... त्या इवल्याश्या जीवाला ना शारीरिक बदल पचवता आला ना आपल्या आईची जागा कोणीतरी घेणार ह्या कल्पनेचे वादळ...तिच्मा आईला पर्याय हा  विचारच सहन होत नव्हता तिला... मग काल आम्ही खोलीत असताना मी तिला आश्वस्त केलं काहीही झालं तरी तुझ्या आईची जागा कधीच आणि कोणीच घेणार नाही... तुझी ही मावशी ती जागा कोणालाच कधीच घेऊ देणार नाही आणि तुझे बाबा पण तुझ्या आईची जागा कधीच कोणाला देणार नाहीत... बाबा आणि तुझी ही मावशी कायम तुझ्या सोबत असतील...त्यावर ते लेकरू निरागसपणे म्हणालं,"मावशी तू येशील आमच्याकडे राहायला कायमची...आपण दोघी आमच्या खोलीत राहूया चालेल?? "आणि मी तिला हो म्हणाले...

 त्याक्षणी मला मालती पुन्हा एकदा देवदूतासारखी भासली... माझं जितकं रेवती वर प्रेम आहे तितकाच किंबहुना त्याहून कित्येक पटीने मला मालती बद्दल आदर आहे आणि मी हे अभिमानाने सांगू शकतो की आज अवनी वरती जे काही संस्कार झाले आहेत ते केवळ आणि केवळ मालतीने केलेले आहेत...रेवती गेली त्या क्षणापासून मालती ही सर्वार्थाने अवनीची आई झालेली आहे...माय मरो मावशी जगो या म्हणीचा खरा अर्थ मालती आयुष्यभर जगली आहे आणि आणि त्याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे...

आज रेवती देखील जिथे कुठे असेल तिला ही निश्चितपणे आज पुरस्कार मिळवणाऱ्या अवनीचा आणि तिच्यावर संस्कार करणाऱ्या मालतीचा अभिमान वाटत असेल...

 पण हा निर्णय आणि हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता...काही संकटांना, काही ठिकाणी काही प्रश्नांना आम्हाला सामोर जावं लागलंच...चेष्टा, टोमणे मारले गेले. आमच्या हेतूवर शंका घेतली गेली...पण मी, मालती आणि अवनी या आमच्या त्रिकूटाने या सगळ्याचा सामना एकत्रितपणे केला... आणि आमच्यातल्या रेवती वरचं प्रेम ह्या एका समान धाग्यांनी आमच्यातले बंध ना कधी सैल होऊ दिले... ना तूटू दिले... ही होती आमची आमच्या कुटुंबाची एक छोटीशी गोष्ट. असं म्हणून माधवराव खाली बसले...

 अवनीचे सासरे आणि या कंपनीचे मालक असलेले अनिश चे वडील अविनाश जोगळेकर उभे राहिले आणि सद्गतीत स्वरात म्हणाले," तुमच्या या कुटुंबाचा आम्हालाही अभिमान आहे... तुमची गुणी अवनी आमची सून आहे याचा सार्थ अभिमान आहे... यानिमित्ताने मी आज इथे जाहीर करू इच्छितो, या पुरस्कारासोबतच मी अवनी आणि अनिश या दोघांच्या हातात कंपनीची संपूर्ण धुरा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या गुढी पाडव्यापासून ते दोघे संपूर्णपणे या कंपनीची धुरा सांभाळतील"...ही बातमी ऐकून आत्तापर्यंत थोपवून धरलेले अश्रू आनंदाश्रू बनून माधव आणि मालतीच्या डोळ्यातून पाझरू लागले आणि फोटोतली रेवती देखील समाधानाने हसतीय असाच भास सगळ्यांना झाला...आणि पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला...

 सुखान्त

ॲड् सौ मीताली कुलदीप सावळेकर


disclaiimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

 

Post a Comment

0 Comments