प्रायश्चित
©®सौ.अनला बापट
"वाच हे, अक्षरशः जसे घडते तसे लिहिले आहे मी." रोहनने आपली डायरी त्याच्या मित्रांसमोर, म्हणजे केतनसमोर ठेवत म्हटले.
केतन एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शक, त्याला एक नवीन फिल्म करायची होती त्याकरता गोष्टी शोधत असताना, त्याला रोहनने आपल्या आजीआजोबांच्या प्रेमाविषयी सांगितले. केतनलापण ह्या वेळेस प्रेमकथावरच फिल्म बनवायची असल्याने त्याने लगेच रोहनला ते सगळे कथा स्वरूपे लिहून आण असे सांगितले.
आज रोहन तीच कथा घेऊन त्याच्या ऑफिसात पोहचला होता.
केतनने वाचायला सुरुवात केली,
"आरश्यासमोर तयार होत असलेल्या प्रियाला पाहून अमोल म्हणाला,"पियु, पुरे ग आता किती अजून मेकअप करशील? तू तशीच सुंदर दिसत आहेस."
प्रियाने वाकड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हटले," हो का? चला खोटारडे." आणि ती पुन्हा आरश्याकडे वळली.
अमोल जागेवरून उठून तिच्या मागे उभा राहिला.
आपल्या दोन्ही हातांनी तिच्या दोन्ही बाजूला धरून तिला स्वतःकडे फिरवून, तिच्या हनुवटीला धरून, वर करत म्हणाला ,"बघ माझ्या डोळ्यात. तुला काय वाटते आहे की मी खोटे बोलतो आहे की..."
आता मात्र लाजून चुर झालेली पियू हळूच स्वतःला अमोलच्या बाहूपाशातून सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होती. अमोलच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणे टाळत होती.
अमोल तिच्या त्या सगळ्या प्रकाराला पाहून जोरात हसायला लागला आणि त्याने तिला अजून जवळ ओढत तिच्या गालावर एक प्रदीर्घ चुंबन केले. नंतर तिला उचलून कॉटवर घेऊन आला."
वाचता वाचता मधेच थांबत विचित्र नजरेने रोहनकडे पाहत तो म्हणाला,"अरे, पण तो कॉटवर कसे नेणार तिला तो साठ वर्षाचा आजोबा आहे ना?"
त्यावर रोहन म्हणाला,"हो, तो साठ नाही चौसष्ठ वर्षाचा आहे, पण विसरलास का आर्मीत होते ते. अजूनही रोज व्यायम आणि नीट नेटका आहार आहे त्यामुळे शारिरीक त्यांना काहीच झालेले नाही."
"मग मानसिक झाले आहे का?" केतनने गंमत करत विचारले.
रोहन एकदम उदास होत म्हणाला,"हो रे. आधी फक्त आजीला डीमेन्शिया झाला होता, आजोबा बरे होते. नंतर काही दिवसांपूर्वी आता आजोबांनापण स्मृतिभ्रंश होऊ लागला आहे आणि दोघेही बिचारे शारीरिक सदृढ असूनही काहीवेळा इतके विचित्र वागतात की विचारू नकोस. सुरुवातीला माहित नव्हते तेव्हा खूप राग यायचा, पण आता मात्र आम्ही सगळे समजून गेलो आहे त्यांचा प्रॉब्लेम. त्यामुळे आता एवढे काही वाटत नाही, पण त्यांच्या सोबत कोणाला तरी सतत ठेवावेच लागते. मला कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मी राहिलो त्यांच्या सोबत. खरं सांगायचं तर त्यादिवसांमध्येच मला त्यांचे ते विलक्षण प्रेम दिसले."
"बरं मग तू लिहिले तसे त्यांनी तिला उचलून कॉटवर आणले, असे आपण मानले.मग पुढे?" केतन मनातून अजूनही ह्या एक बाबती करता तयार नाही हे रोहनला त्याचा बोलण्यावरून कळले होते.
तरीही तो "आता पुढचे तू वाचून घे, आवडली तर बनव फिल्म, नाहीतर नको. मी निघतो. हो, तुला जर त्या दोघांना भेटायचे असेल तर माझ्याकडे कधीही येऊ शकतोस तू. फक्त येण्याआधी एक फोन कर म्हणजे मी आईला कळवेन. कारण तसे आम्ही वाटेल त्याला नाही भेटू देत त्यांच्याशी."
केतनने हो म्हणत मान हलवली आणि रोहन त्याच्या हातात आपली डायरी ठेऊन निघून गेला.
केतनच्या डोक्यात नवीन फिल्म अशी बनवायची इच्छा होती ज्यात प्रेम म्हणजे नुसती वासना न दिसता एक समर्पक प्रेमळ भाव दिसून येईल. दोघांमधले प्रेमबंध दिसून येईल. त्याने रोहनची डायरी वाचायचे ठरवले.
जसे जसे तो वाचत गेला, त्याच्या लक्षात येत गेले की हे प्रेम जगावेगळेच आहे.
त्याने त्या दोघांना भेटायचे ठरवले आणि त्याने रोहनला फोन केला.
ठरल्या वेळेप्रमाणे तो रोहनच्या घरी गेला. तिथे रोहन, त्याची आई आणि वडील भेटले. 'आजी, आजोबा बहुतेक आतल्या खोलीत असावेत.' त्याच्या मनात आले.
रोहनची आई चहा नाश्ता घेऊन आली. तिने चहा त्याच्या हातात देत बोलायची सूत्रे सांभाळली.
"हे बघ केतन, ते दोघेही त्यांच्याच विश्वात असतात. आम्ही त्यांच्या विश्वात दखल न देता , त्यांना हवे नको ते बघत असतो. तुला त्यांच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे असे रोहन म्हणाला. तुला आम्ही त्यांच्या जवळ जाऊ देवू पण ते दोघे डिस्टर्ब होतील असे काहीही करायचे नाही. मला तुझ्याकडून हे वचन पाहिजे पाहिले." तिने हात पुढे करत म्हटले.
केतनने रोहनकडे पाहत आपला हात त्याच्या आईच्या हातात देत म्हटले,"काकू मी तुम्हाला वाचन देतो की ते अपसेट होतील, असे मी काहीही वागणार नाही."
नंतर रोहन त्याला घेऊन बंगल्याच्या मागच्या भागात घेऊन गेला. तिथे ते दोघे एका झाडा जवळ उभे होते.
"किती उशीर केलास आज यायला?" रोहनची आजी प्रेमळ स्वरात त्याच्या आजोबांना म्हणत होती. रोहनने त्याला लपून बघ असा इशारा केला.
"अग ते आज मिनुला शाळेत सोडून आलो न, म्हणून उशीर झाला." आजोबा आजीच्या जवळ येत म्हणाले तसे आजीने "चल खोटे च" असे आजोबांकडे पाठ करत म्हटले. तसे आजोबा तिच्या पाठीशी येऊन दोन्ही खंद्यांना धरून तिला आपल्या कडे वळवून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले,"नाही ग, खरंच! बघ माझ्या डोळ्यात दिसते आहे ना . पीयु मी तुझ्याशी खोटे बोलू शकतो का?"
आजी एकदम मस्त लाजत आजोबांच्या मिठीत शिरली. केतनने हळूच रोहनकडे पाहून डोळा मारला आणि मिश्किल हसला. पुन्हा वळून आजोबांकडे पाहतो तर ते चक्क आजीला उचलून जवळ असलेल्या दिवाणावर ठेवत होते.
आता केतनला वाटले की हे आता पुढे काय करतात हे बघायला कदाचित रोहनला आवडणार नाही म्हणून त्याने लगेच म्हटले "चल जाऊया"
त्यावर रोहन म्हणाला,"एवढ्यात ? बघ की अजून."
"शी माझ्याशी नाही बघवले जाणार ते लाईव्ह." केतन म्हणाला.
" अरे गप्प बस. तसले काही होणार नाही. " दोघेही पुन्हा आजी आजोबांच्याकडे पाहू लागले.
दिवाणावर बसल्यावर आजोबांनी आजीचा हात स्वतच्या हातात घेऊन, तिच्या हातावरून आपला हात मृदुपणे फिरवायला लागले. आजी शहाहरत होती आणि लाजून इकडे तिकडे पाहत होती. गोऱ्यापान देखण्या आजीचे लाल झालेले गाल, गुलाबी झालेल्या कान बुट्या पाहून कोणीही समजू शकत होते ही की ती किती प्रेमात रंगली आहे ते.
आजोबांनी मात्र हळू हळू हाथ तिच्या हातावरून मानेकडे वाढवायला सुरुवात केली. केतनने एवढ्या शॉर्ट फिल्म केल्या असून पण त्याला थोडे गुदमरल्यासारखे होऊ लागले.
पण रोहन हट्ट करून तिथेच उभा राहा म्हणत होता.
हळू हळू आजोबांचा हात तिच्या गळ्यापाशी गेला आजोबांनी तिला तसेच जवळ खेचले. ती लगेच जवळ आली. त्यांनी तिच्या कपाळी चुंबन केले. ती पूर्ण तृप्त झाली असे वाटले. तेवढ्यात आजोबांचे लक्ष ह्या दोघांकडे गेले.
त्यांनी दोघांना जवळ बोलावले.
"काय बघत होता?" त्यांनी जोरात विचारले.
"तुमचा रोमान्स", नालायक रोहन नेहमीसारखा चेष्टेने म्हणाला.
"काढ पन्नास रुपये" आजोबा म्हणाले.
"पन्नास रुपये?, कसले?"केतन म्हणाला.
"पन्नास जरा जास्त होत आहेत ,वीस ठीक राहतील." रोहनने आजोबांना म्हटले.
"नाही तुझी माझी पैज लागली होती ना, पन्नासच द्यावे लागतील तुला."आजोबा जरा रागात म्हणाले.
"पण पैज कॉलेजच्या गार्डनची होती, ह्या बागीच्याची नाही." रोहन धीटपणें म्हणाला.
"असे होते का, बरे मग चाळीस रुपये दे. मी तू मला चॅलेंज केल्यासारखे आज पिऊला इथे प्रपोज केले बरे."
केतनकरता हे सगळे नवीन होते.
"हे सगळे काय आहे?" तो चिडत म्हणाला.
रोहनने त्याला सांगितले, "माझ्यात त्यांच्यात कुठलीही पैज लागली नव्हती. ते त्यांच्या कॉलेज काळात फिरत आहेत सध्या . त्यांच्या मित्रांपैकी कोणीतरी त्यांच्या सोबत अशी पैज लावली होती. ती त्यांनी पूर्ण केली होती आणि सध्या ते त्याच आठवणीत अडकले आहेत बस."
"हा कोण आहे?" आजीने रोहनकडे पाहत विचारले.
"अरे दाम्या, ओळखले नाहीस का पीयू ह्याला? दामोदर देशपांडे. आठवला का?" आजोबांनी आजीला सांगितले आणि आजीने ऐकून घेतले.
रोहन आणि केतन एकदुसऱ्याकडे आश्चर्याने बघत राहिले.
तेवढ्यात आजोबांनी केतनकडे पाहून रोहनला विचारले, "दाम्या हा कोण?"
"ओळख तूच." रोहन म्हणाला
"हा वीरेंद्र आहे का?" म्हणत आजोबा केतनच्या जवळ येत म्हणाले,"हो हो हा विरेंद्रच!"
मग आजीकडे पाहून म्हणाले,"बघ म्हटले होते ना तुला तो नक्कीच येईल एक दिवस परत."
केतन आणि रोहनला ह्यातले काहीच कळत नव्हते.तेवढ्यात रोहनच्या आईने रोहनला हाक मारली. रोहन आत गेला. तसे आजोबा हळूच केतन जवळ आले.
म्हणाले ,"थोडे नाटक कर बेटा. मग मी तुला सर्व सांगेन."
केतनला आजोबा एकदम सहज वाटले. म्हणून तो काही विचारणार एवढ्यात आजींनी केतनकडे पाहत म्हटले,"मला तुझा खूप राग आला होता जेव्हा तू मला सोडून गेलास. पण मग तुझ्या तब्येतीबद्दल कळले आणि तुझ्याबद्दल मनात असलेला राग निघून गेला पण मग मला तुझी माफी मागायची राहून गेली होती. ती आज मनापासून मागते वीरेंद्र, मला माफ कर." आजी एवढे बोलून त्याच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या.
केतनने आजोबांकडे पाहिले त्यांनी हळूच डोळ्यांनी इशारा केला, केतनने आजीकडे पाहून नुसती हकारात्मक मान हलवली. आजी एकदम खुश झाल्या आणि आजोबांना म्हणाल्या,"अहो बघा वीरेंद्रने माफ केले मला. आता सगळे ऋणानुबंध मिटले हो."
तेवढ्यात रोहनपण तिथे आला.
आजोबांनी आजींच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले,"हो पियू , आज तुला वीरेंद्रने पण माफ केले बरं. चल आता झोपायची वेळ झाली आहे. आत चलून झोप बघू."
असे म्हणत आजोबांनी आजीचा हात धरला आणि तिला आत नेले. जाता जाता मात्र केतनला,"तू उद्या सकाळी लवकर ये बरं" असे सांगत गेले.
रोहनने ते ऐकले आणि केतनला म्हणाला ,"वा तुला ते मित्र मानू लागले आहेत बहुतेक."
दुसऱ्या दिवशी केतन सकाळी आठलाच रोहनच्या घरी पोहचला. आज रोहनला काहीतरी काम असल्याने तो घरी राहणार नव्हता. रोहनच्या आईने केतनला आजोबांच्या खोलीत नेले, तिथे आजी अजून झोपल्या होत्या पण आजोबा उठून अंघोळ करून बसले होते.
रोहनची आई बाहेर जाताबरोबर आजोबांनी केतनला जवळ बोलावले.
"केतन बेटा, इकडे जवळ ये." आजोबांच्या अशा बोलण्याने केतन उडालाच.
"तुम्ही मला चक्क माझ्या नावाने हाक मारली?" आश्चर्याने त्याने आजोबांना विचारले.
"हो. मला स्मृतिभ्रंश नाही झालाय. मी मात्र त्याचे नाटक करत आहे." आजोबांनी हळूच सांगितले.
"पण का?"
"कारण माझी पियू."
"मी नाही समजलो"
मी सांगतो. माझे आणि पियूचे प्रेमलग्न झाले आहे. पण तिचे लग्न आधी वीरेंद्र सोबत ठरले होते. वीरेंद्रला दुसऱ्या कोणत्यातरी मुली सोबत लग्न करायचे होते, म्हणून तो पियूला सोडून चालला गेला. पियूच्या डोक्यात कुठेतरी असे भरले होते की वीरेंद्र तिच्याशी रागावून तिला सोडून गेला होता. म्हणून काल मी तिच्या डोळ्यातील तो आढा तुला वीरेंद्र बनवून काढवला. असो, तर त्या वेळेस पियू मला आधीच आवडत होती म्हणून मी लगेच माझ्या वडिलांकडून तिला मागणी घालायला सांगितले.आमचे लग्न झाले. पण मग मी माझ्या कामात खूप बिझी झालो. सुरुवातीला जसा वेळ मी तिला देत होतो, तसा वेळ मला नंतर तिला देता येत नव्हता. मग पियू हळू हळू अंतर्मुख व्हायला लागली. त्यादरम्यान रोहनचा बाप जन्माला आला. आता तर आम्हाला एकमेका करता जरापण वेळ मिळत नव्हता. असेच दिवस निघाले तिच्या इच्छा अपेक्षा सगळे मनात ठेऊन ती जगू लागली. बघता बघता रोहनचा बाप मोठा झाला.त्याचे लग्न झाले, आता पियू त्या दोघांना एकत्र बघितले की स्वतःचे दिवस आठवायची आणि दुःखी व्हायची. पण तरीही ते कसे तयार होऊन एकत्र गेले, कसे एकमेका सोबत त्याचे प्रेमळ चाळे चालू आहेत हे सगळे तो मला सांगायची पण हळू हळू करता ती त्या दोघांच्या जागी मला आणि तिला बघू लागली, कारण तिचे ते स्वप्न अधुरेच राहिले होते. नंतर नंतर तर ती प्रेमळ संवाद जोरजोरात बोलू लागली. तिच्या अश्या वागण्याने मुलाने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिला स्मृतिभ्रंश झालाय असे निदान डॉक्टरांनी सांगितले. पण खरंतर ती त्या काळच्या स्मृतींमध्येच अडकून राहत होती बऱ्याचवेळ. लोक तिच्यावर हसायचे. मला फार वाईट वाटायचे. खरसांगू तर तिच्या ह्या अवस्थेकरता मीच जबाबदार होतो. नाहीका? मग मी तिच्या सोबत त्या काळात जाऊ लागलो. त्याने ती आनंदी होते. जर माझ्या तसे वागण्याने ती आनंदी राहत असेल तर स्वत:ला तिच्या त्या काळात नेऊन बसवण्यात मला काही चूक नाही वाटले. फक्त तिला आनंद मिळावा म्हणून मला माहित आहे हे केल्याने तिचे गेलेले दिवस परत येणार नाही पण कमीत कमी तिला थोड्या वेळ का होईना आनंद मिळतोय ना."
"पण आजोबा, हा खूप मोठा त्याग आहे."
"नाहीरे बाळा हे प्रायश्चित आहे, एक स्वप्नाळू मुलीचे स्वप्न तोडून तिला निराश केले त्याकरता. जेव्हा पियू लग्न होऊन आली होती तेव्हा ती मधुबाला सारखी मोठे डोळे करून नेहमी म्हणायची,"आपले प्रेम नेहमी असेच राहायला पाहिजे. वीरेंद्रने मला सोडल्या नंतर तुम्ही नसता तर कदाचित मी जिवंतच राहू शकले नसते, कारण मला एकटे पडायची खूप भीती वाटते. तुम्ही जर मला सोडला तर मी मरूनच जाईन. कधी मला दूर नका करू बरं." मी पण तिला हो म्हणायचो पण काळाच्या ओघात आणि पैसे कमवायच्या नादात, ती मनाची खूप हळवी आहे हे विसरूनच गेलो.. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा बराच उशीर झाला होता."
"म्हणून तुम्ही स्वतःला असे शिक्षा करताय का?" केतनने विचारले.
"नाही रे शिक्षा कसली?. मी फक्त तिची मदत करतोय. तिला हवे तसे वागतोय."
"पण घरच्यांशी का खोटे बोलत आहात?"
"त्याचे एक कारण आहे, जेव्हा मी पियूच्या मनासारखे वागू लागलो तर मुलगा म्हणाला,"ती तर झाली आहे खुळी,तुम्ही पण? तुम्ही तर नीट वागा कमीतकमी." लोकांना मी तिच्या मनासारखे का वागतो हे समजावून देण्याचा मी खूप प्रयत्न केला पण कोणालाच माझे म्हणणे कळत नव्हते, फक्त एक व्यक्तीला सोडून तो व्यक्ती म्हणजे.."
"मी" रोहनची आई आत येत म्हणाली,"मग मीच आजोबांना हा उपाय सुचवला, कारण बाबांच्या शब्द शब्दातून दिसणारे आईंच्या प्रतीचे प्रेम मला कळत होते."
"वा म्हणजे तुम्ही पण सामील आहात ह्या नाटकात?" केतनने रोहनच्या आईकडे पाहत विचारले.
"हो आहे, कारण आई, काही वेगळे नव्हत्या मागत.त्यांना फक्त बाबांचे प्रेम आणि वेळ हवा होता बस."
"आजोबा एक सांगू का ? "
"काय?"
"तुमच्या प्रेमकथेवर छान गोष्ट बनणार हो."
"हो ना,मला खात्रीच आहे म्हणून तर तुला सगळे सांगितले ना"
केतनने त्यांच्या निरोप घेतला आणि बरोबर आणलेली रोहनची डायरी सुद्धा. त्याच्या नवीन फिल्मचा प्लॉट तयार झाला होता. आता स्क्रिप्टवर काम करायचे होते.
©®सौ.अनला बापट
disclaiimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box