प्रेमा तुझा रंग कसा - मोहिनी घारपुरे- देशमुख

प्रेमा तुझा रंग कसा?

मोहिनी घारपुरे- देशमुख

 

एका गजबजलेल्या चौकात एका कोपऱ्यात आपली हातगाडी उभी करून रमण काहीसा अदबीनं आपल्या समोर उभ्या असलेल्या ग्राहकांशी बोलत होता. त्याच्या हातगाडीवर कलाकुसरीचं सामान होतं. सुरेखसे टीकोस्टर्स, सुबक गवलेल्या फुलदाण्या, रंगबिरंगी हस्तकलेच्या अन्य चिक्कार छोट्या छोट्या वस्तू ... त्याच्या समोर असलेल्या गर्दीतली माणसं त्याच्याकडल्या वस्तुंच्या किंमतींची चौकशी करता करताच आपापसात कुजबुजत होती.

“ए ... बघ ना काय सुंदर आहे याच्याकडचा माल. अगदी आपल्या घरात शोभून दिसतील अशा सुंदर वस्तू आहेत.” रमा म्हणाली.

“हो ना ... पण बघ ना गं, मला तर या बिचाऱ्या हातगाडीवाल्याला बघून फार फार भरून येतंय गं ... देव पण ना, कधी कधी असं का करतो कळत नाही, इतक्या सुंदर वस्तू ज्याला दिसतच नाहीयेत असा तरूण त्या विकतोय.” रमाची मैत्रीण उद्गारली.

रमाचं लक्ष्य आता कुठे त्या हातगाडीवाल्याच्या डोळ्यांकडे गेलं. इतका देखणा तरूण... त्याला पहाताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तितक्यात कोणीतरी रमणला विचारलं, “ओ भैय्या ... ये कितने का ...?”

रमणनं चाचपडत त्या वस्तूला स्पर्श केला आणि स्पर्शावरून ओळखून त्यानं मोठ्या आत्मविश्वासाने त्या वस्तूची किंमत त्या गिऱ्हाईकाला सांगितली. उपस्थित ग्राहक रमणच्या या कौशल्यावर आणि आत्मविश्वासावर अवाक् होऊन पहात राहिले.

...

रमण माने, वय वर्ष 29

एका अपघातात त्याची दृष्टी गेली. जवळ चांगले शिक्षण असूनही अचानक झालेल्या या आघाताने त्याला जीवन कठीण झाले. तरीही तो हरला नाही. जवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबात तसं चोवीस तास याच्या मागेपुढे करेल असं कोणीही माणूस नाही. नवी नोकरी कुठं मिळेना, मग रोज आपल्या शहरातील एका गजबजलेल्या भागात चौकात उभं राहून तीन चार तास शोभेच्या सुंदर हँडमेड वस्तू विकायच्या असं त्यानं ठरवलं. मित्रांची थोडी मदत झाली आणि तो हळूहळू या कामी रूळला.

...

रमा सोमण, वय वर्ष 25

उच्चभ्रू श्रीमंत कुटुंबातली एकुलती एक मुलगी. परक्या शहरात आपल्या मावशीकडे सुट्टीची म्हणून रहायला आलेली. बाजारात शॉपिंगला जाऊ म्हणून आज मावस बहिणी आणि मैत्रिणीबरोबर त्याच गजबजलेल्या भागात आली जिथे रमण आपली हातगाडी लावत असे. पहाताक्षणी रमाला रमण आवडून गेला. त्या रात्री ती घरी पोचली तो त्याचा विचार मनात घेऊनच. एवढा देखणा उमदा गडी ... पण दैवाने आज त्याच्यावर काय वेळ आली. तिचं मन तळमळत होतं, तिला रमणची एक वेगळीच ओढ लागली. तिच्या डोळ्यांपुढे सतत त्याचीच छबी तरळत होती. असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं.

रमणला पुन्हा भेटायला हवं हे तिला मनोमनी वाटायला लागलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी तिनं पुन्हा विषय काढला आणि कसंबसं आपल्या मावस बहिणीला पुन्हा त्याच भागात फिरायला जाण्याविषयी राजी केलं. संध्याकाळची तीच वेळ, तोच गजबजलेला रस्ता. रमणची गाडी त्या नेहमीच्या जागी उभी. आज त्याच्या गाडीवर फारशी गर्दी नसताना अखेर रमा त्याच्या पुढ्यात जाऊन उभी ठाकली.

“हाय... मी रमा ... रमा सोमण.” रमणनी त्याचा चेहरा आवाजाच्या दिशेनी वळवला. तो तिला बघून छान स्मित करत म्हणाला, “बोला रमा मॅडम ... काय हवंय तुम्हाला? काय पसंत पडलं तुम्हाला माझ्याजवळचं?”

त्याच्या या प्रश्नावर रमा झटक्यात बोलून गेली... “मला तू आवडलास!”

“excuse me ... !” रमण चाचरत म्हणाला.

“Yes, I am serious Mr. Raman, Will you marry me?”

“हे काय भलतंच ... ना ओळख ना पाळख... शिवाय मी हा असा ... दृष्टीहीन ... आणि तरी तुमच्यासारखी मुलगी मला विचारतेय तेही थेट लग्नाचं? बऱ्या आहात ना तुम्ही?” तितक्यात रमाच्या मैत्रिणी तिथे अवतरल्या... एकंदरीतच सगळा अवघडलेला प्रसंग पाहून त्या खिदळायला लागल्या. रमानं चेष्टा केली, काहीतरी भंकस करतेय असं वाटून एकजण बडबडली, “ ए रमा, कशाला गं त्याच्याशी फाल्तूगिरी करतेस ... उगा आपलं काहीतरी ... चल घरी चल ...चांगल्या धोपटवून काढतो बघ तुला आम्ही...”

मात्र रमा एकदम गंभीर होती. तिच्या ह्रदयात त्या क्षणी ज्या भावना होत्या त्या तिनं सच्चेपणाने व्यक्त केल्या होत्या. रमणला अवघडल्यासारखं झालं होतं पण त्याला रमाच्या प्रश्नामागचा खरेपणा केव्हाच तीव्रतेने जाणवून गेला होता.

फक्त, “हे असं कोणी करतं का ...?” यावर त्याचं मन गोंधळलं होतं. शिवाय ही कोण कुठली मुलगी आपल्या प्रेमात कशी पडू शकते यावर त्याला संशय येत होता. तितक्यात रमा तिच्या थेट आणि स्पष्ट स्वभावानुरूप सगळ्यांसमोरच बोलू लागली.

“रमण... मी काल इथे तुमच्या स्टॉलवर येऊन गेले. तुमच्याबद्दल गर्दीत सुरू असलेली कुजबुज माझ्या कानावर पडत होती. मला कळलं की काही वर्षांपूर्वी एका अपघातात तुमची दृष्टी गेली. मला अक्षरशः क्षणभर धक्काच बसला. मी रात्रभर फक्त तुमचाच विचार करत होते. जीवनात एवढा मोठा सेटबॅक बसूनही तुम्ही हा स्टॉल लावून नव्याने सुरुवात केलीत हे तर मी पाहिलंच होतं, आणि तुमच्यातील याच दुर्दम्य आशावादाच्या, आत्मविश्वासाच्या मी अक्षरशः तत्क्षणी प्रेमात पडलेय. तुमची ही जीवन जगण्याची अभिलाषा मला भावली. मला तुम्ही आवडलात. माझा आयुष्याचा जोडीदार होण्यासाठी तुम्हीच योग्य आहात हे मला जाणवलं, म्हणूनच मी ठरवलं की इथून परत आपल्या शहरात जाण्यापूर्वी तुमचा होकार घेऊनच जायचं आणि म्हणून मी वेळ न दवडता आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेऊन इथे तुम्हाला विचारायला आलेय की ... “लग्न कराल माझ्याशी?” सभोवताली गर्दी गोळा झाली होती. सारे लोक आपापसात कुजबुजत होते. रमाच्या मैत्रिणी तिच्याकडे अवाक् होऊन बघत होत्या. आता पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती. तितक्यात रमण बोलायला लागला...

“रमा, मला आवडलीस तू ... तुला न पहाताच मी खरंतर केवळ तुझ्या स्वच्छ भावना पाहून याक्षणी होकार देऊ शकतो, पण तुला वाटतं तितकं माझं जीवन सोपं नाही. पूर्वी मी एका स्टोअरमध्ये मॅनेजर पदावर होतो. एकदा घरी परतत असताना माझा अपघात झाला आणि त्या अपघातात माझी दृष्टी गेली. माझ्या कुटुंबातील मंडळी मला थोडा आधार देऊन पुन्हा आपापल्या कामी लागली. हे जीवन पुढे नेणं ही जबाबदारी पुन्हा माझ्यावर आली, आता काय करावं हा प्रश्नच होता. माझ्या समोर उभं आयुष्य होतं. अशावेळी जवळचे दूर होतात आणि दूरची माणसं आपल्याला साथ देतात. तसंच माझे मित्रमंडळी माझ्या मदतीला आले. जवळपासची सगळी जमापुंजी माझ्या औषधोपचारात खर्च होऊन गेली. नवी नोकरी मिळणंही कठीण झालं. मग शेवटी घराजवळच्या या बाजारात रोज थोडावेळ वस्तू विकून काही पैसा गाठीशी बांधावा हा तुलनेनी सोपासुलभ मार्ग मिळाला. रमा, आज मी माझंच पोट कसंबसं भरतोय गं, मी तुझ्याशी लग्न करून आपल्या संसाराचा भार या खांद्यावर पेलू शकणार नाही. मला माफ कर, तुझ्या भावनांचा मी आदर ठेवतो पण तरीही तू आलीस तशी परत जा. तुला दुसरं कोणीतरी चांगलं मिळेल. एक असा जोडीदार जो सर्वार्थाने तुला साथ देईल.”

 

रमणचं हे उत्तर ऐकताना गर्दीतल्या काही तरूणी तर अक्षरशः मुसमुसत होत्या. काहींचे डोळे भरून आले होते. तितक्यात रमा धिटाईने म्हणाली,

“रमण, अरे वेड्या मी एका क्षणात प्रेमात पडले तुझ्या. प्रेम हे काही अटींवर, शर्तींवर करत नसतात. प्रेम हे मनाच्या खोल खोल तळातून आपसूकच उमलून यावं लागतं. त्यासाठी बाहेरच्या मुलाम्याची काहीच गरज नसते. तू जसा आहेस तसा मला आवडला आहेस. रहाता राहिला उदरनिर्वाहासाठी पैसे कमावण्याचा प्रश्न. तर त्याची तू चिंता करू नकोस. मी माझ्या पायावर उभी आहे. लवकरच मला नोकरीतही प्रमोशन मिळेल आणि मग मी आपल्या संसाराला नक्कीच पूर्णपणे जबाबदारीने सांभाळू शकेन आणि हो, आता तू नवा प्रश्न उपस्थित करण्याआधीच मी स्पष्टपणे बोलते की मी तुझ्यावर दया दाखवत नाहीये. तसं काहीही कदापि वाटू देऊ नको. माझ्या मनातली तुझ्यासाठी उमलून आलेली ही तरल प्रेमभावना शुद्ध आहे. मला वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास...!”

रमणच्या उत्तराकडे आता सगळ्यांचंच लक्ष्य लागून राहीलं होतं. रमणला खरोखरच अवघडल्यासारखं झालं होतं. समाज काय म्हणले, लोक काय म्हणतील, रमाचे कुटुंबीय आपल्याला स्वीकारतील का ...? साऱ्या प्रश्नांचं काहूर त्याच्या मनात दाटलं होतं. त्याला अवधी हवा होता. रमणने दीर्घ श्वास घेतला आणि उत्तरला, “असं घाईघाईत मला काही ठरवता येणार नाही. मला विचार करायला वेळ दे.”

रमा म्हणाली ... “दिला... फक्त आजची रात्र आणि उद्या मला याच वेळी याच ठिकाणी सगळ्यांसमोर तुझं उत्तर हवंय.” एवढं बोलून ती वादळासारखी निघून गेली.

आता गर्दीत शांतता पसरली होती. कोणाला काही कळत नव्हतं आणि उत्सुकता मात्र पराकोटीची लागून राहिली होती. इकडे रमा तरातरा घरात आलेली पाहून रमाच्या आईनं तिला काय झालं हा प्रश्न न केला असता तरच नवल. रमाच्या पाठोपाठ तिच्या बहिणी, मैत्रिणी घरात शिरल्या आणि सगळ्यांनी घडला प्रकार रमाच्या आईला सांगितला. रमाची आई क्षणभर चपापलीच, पण तिला एक गोष्ट चांगलीच माहिती होती की रमा स्वतःच्या भावनांशी किती प्रामाणिक आहे आणि किती खरी आहे. त्यामुळे तिनं केवळ रमाला धीर दिला. श्रीमंत घरची एकुलती एक मुलगी एका हातगाडीवाल्याशी, आणि तो ही ज्याला दृष्टीहीनता आहे अशा मुलाशी लग्न करणार ही बातमी दुसऱ्या दिवशीपर्यंत नातेवाईकांमध्ये पसरली. रमाच्या घरी फोन यायला लागले.

रमाला कोण कोण नातेवाईक ना ना परीनं तू हे लग्न करू नकोस म्हणून समजावू लागले. पण छे... रमानं पूर्ण विचारांती हे पाऊल उचललं होतं. संध्याकाळ झाली तशी रमा तिच्या आईवडील मित्र मैत्रिणी नातेवाईकांसह रमणच्या गाडीवर जाऊन त्याच्यापुढे दत्त म्हणून उभी राहिली.

“हाय रमण, मी आलेय सगळ्यांना सोबत घेऊन तुझं उत्तर ऐकायला!” रमण थोडासा चरकला, कारण मनातून जरी होकार द्यावासा वाटत असला तरीही अचानक हे सगळं घडत असताना त्याला काही नीट उमगतच नव्हतं. त्याच्या सोबत आज त्याचेही मित्र मंडळी स्टॉलवर हजर होते.

रमा म्हणाली, “रमण... तू नकार दिलास तर मला पचवणं कठीण जाईल. याचं कारण आहे मी आजवर थोडेसे घाईघाईत निर्णय घेतलेत आयुष्याचे पण त्यापूर्वी मी नीट पूर्ण विचार केलेला असतो. तू मला कोणत्याही परिस्थितीत आणि कुठेही भेटला असतास तरीही मी तुलाच वरलं असतं कारण माझ्या मनानी मला तो ईशारा दिला आहे. आता तुझं उत्तर.”

इकडे रमणच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. एरवी आपल्याला दृष्टी असती तर आपल्यालाही कदाचित रमासारखी धीट नि स्पष्ट मुलगी आवडून गेलीच असती, आणि आज ती कशी दिसते, कशी आहे हे न कळता केवळ तिच्या स्वच्छ मनाने तिने आपल्याला जिंकलंय हे त्याला मनोमनी केव्हाच कळून चुकलं होतं. एवढं प्रेम आपल्यावर दुसरी कुणी करूच शकणार नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं, पण तरीही एकदा त्याने मित्रांशी कुजबुजत सगळं खरं आहे ना हे विचारून घेतलं. हो, देव न करो पण कोणा टवाळ पोरीनी चेष्टा म्हणून तर आपला उपयोग न करावा एवढीच त्याला भीती त्याक्षणी वाटली.

आता सगळेजण कानात प्राण आणून रमणच्या उत्तराकडे लक्ष लावून होते... आणि अर्थातच रमण उत्तरला ...

“रमा, मी तयार आहे तुझ्याशी लग्नाला... मला खात्री आहे एवढं प्रेम माझ्यावर कुणीच करणार नाही”

गर्दीतून एकदम कोणीतरी चित्कारलं ... “हुर्रे... बजाओ रे, धतड ततड...धतड ततड”

आणि क्षणात रमाच्या गालावर लाजेची लाली आली, तिची नजर लाजेनं झुकली. कालपासून आलेलं अवसान गळालं. आपला प्रियकर आपल्याला एवढ्या लोकांसमोर रूकार देतोय या प्रसंगाने तीही बावरली. तिचा चेहरा लालगुलाबी झाला. रमणनं चाचपडत तिचा हात हाती घेतला. रमाच्या आईवडीलांच्या डोळ्यात आपल्या मुलीबद्दल, तिच्या या जनरीतीहून वेगळ्या पण प्रामाणिक सच्च्या निर्णयाबद्दल अभिमानच झळकत होता. झटकन ते पुढे आले आणि त्यांनी सन्मानाने रमणला आपला जावई म्हणून स्वीकारले. रमा आणि रमण जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापुढे कले. या सुंदर प्रेमाला निश्चितच तत्क्षणी आकाशातून देवांनीही आशीर्वाद दिले असावेत यात कोणालाच शंका नव्हती...

 

....................................समाप्त .................................

- मोहिनी घारपुरे- देशमुख

disclaiimer

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

 

 


Post a Comment

0 Comments