सारिका - अपूर्वा परांजपे- वैजापूरकर

सारिका

अपूर्वा परांजपे- वैजापूरकर


       “सारिकासारिकाच ना?” आवाज आल्यावर तिने चमकून मागे पाहिलं. या गावात मला ओळखणारा आणि मराठी बोलणारा हा कोणाचा आवाज? हिमाचल प्रदेशातल्या एका छोट्या गावात सहलीसाठी आलेल्या सारिकाला जरा आश्चर्यच वाटलं. नेहमीचं सिमला-कुलू-मनाली सोडून हिमाचलमधल्या जरा हटके गावांची ती सहल होती. सारिकाची त्या गृपमधे कोणाशीच आधीपासून ओळख नव्हती. पण तिला आवडायचं असं फिरायला. नेहमीच्या रुटीनमधून आणि नेहमीच्या माणसांमधूनही ब्रेक घ्यायला. तर अशा ठिकाणी आपल्याला ओळखणारं कोण असेल हा विचार करत तिने मागे पाहिलं आणि शाळेत तिच्या वर्गात असणारा आणि तिच्या मागच्याच बाकावर बसणारा अर्णव तिला दिसला. चटकन ओळखलंही नाही तिने त्याला. कारण शाळेत अगदी गबाळा राहणारा, कोणाशी फारसं न बोलणारा, फारसा लक्षातही राहणार नाही कोणाच्या, असा होता अर्णव. आणि आता मात्र एकदम व्यवस्थित, टापटीप कपडे, आणि चेहेऱ्यावर आत्मविश्वासही! त्याला तसं पाहताच का कोणास ठाऊक पण तिच्या मनात क्षणभर एक लहर उमटून गेली. “अरे अर्णव! हो, मी सारिकाच. पण तू इथे कसा काय? मी तर विचारच केला नव्हता कधी की असं या आडगावात कोणी भेटेल वगैरे मला. आणि तू तर गायबच झालास की शाळेनंतर. आपल्या वर्गाच्या WhatsApp गृपवर सुद्धा नाहीयेस तू.” नेहमीप्रमाणे भराभरा सगळं बोलून सारिका रिकामी झाली. “अगं हो हो, सांगतो की. पण हे इथे वाटेतच बोलायचंय का?” सारिकाला खुद्कन हसू आलं स्वतःच्याच वेंधळेपणाचं. “आजची संध्याकाळ रिकामी आहे माझी. गृपचा काही प्लॅन नाहीये. कॅाफीला भेटायचं का कॅफे मधे?” आजकालच्या शहरातल्या कॅाफीशॅाप्सच्या जमान्यात हा सगळ्यात सुटसुटीत पर्याय तिने पुढे ठेवला. “मॅडम, तुमचं पुणे नाही हे गाव म्हणजे. फार काही ॲाप्शन नाहीयेत इकडे असे. तू सरळ घरीच ये ना माझ्या. मस्त कॅाफी करतो, बाल्कनीत बसून तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही देतो.” फोन नंबरची देवघेव करून मग दोघे आपापल्या वाटेला लागले. 

        पुढच्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाकडे सारिकाचं लक्षच नव्हतं. “इतक्या वर्षांनी आपल्याला हा अर्णव इथे कसा भेटला? हा काय योगायोग आहे? शाळेत इतका साधा, कमी बोलणारा हा आता इतका confident कसा काय झाला असेल? काय करत असेल तो आता? हॅंडसम पण दिसतो ना आता?“ ह्या विचाराने तीच चमकली, आणि मनात गुदगुल्याही झाल्या तिच्या. “सरळ घरी ये म्हणाला हा? हां पण बाल्कनीत बसून कॅाफी पिऊ म्हणाला, मग ठीक आहे. आणि अजूनही कोणी असूच शकेल की घरी. लग्न झालं असेल का त्याचं? असेल तर? नाही नसेल! अरेच्चा! झालेलं नसूदेत असं का वाटतंय मला“ डोक्यातल्या विचारांना थांबवणं आता अशक्य झालं तिला. मग त्या दिवशीच्या उरलेल्या प्लॅनला काट मारून सारिका सरळ रूमवर आली. आपल्याला आताचा अर्णव आवडलाय हे एव्हाना तिने मनात मान्य केलं होतं. पण आता हे विचारांचं घोडं जरा आवरतं घेतलं पाहिजे. कोणास ठाऊक इथे त्याने संसारच थाटला असेल! ती आता उठलीच जागची. शॅावर घेऊन ताजीतवानी झाली. सुंदर कुडता ,हलका मेकअप, मॅचिंग ज्वेलरी अशी छान तयार झाली. रूमवरच चहा मागवला आणि वेळेच्या आधीच निघाली अर्णवकडे जायला. जाता जाता जवळच्या एका दुकानातून गोड मिठाईही घेतली. 

            ईकडे अर्णव आनंदी झाला असला तरी सैरभैर नव्हता झाला. पण तोही आतुरतेने वाट पाहातच होता सारिकाची. शाळेत असतानाच बिनधास्त आणि बडबड्या सारिकाची त्याला भुरळ पडली होती. पण त्याच्याकडे नव्हताच तेव्हा कसलाही आत्मविश्वास. आणि वर्गात इतकी smart मुलं असताना सारिका काय कुठलीच मुलगी आपल्याला भाव देणार नाही असंच वाटायचं त्याला. घरी आईवडिलांचे सतत एकमेकांशी होणारे वादविवाद, त्यांचा त्याच्या वाट्याला कधीच न येणारा वेळ, इतर मुलं किती खूष असतात आपल्या आई बाबांबरोबर हे पाहून त्याला प्रचंड न्यूनगंड वाटायचा. शाळा संपली तसा बाहेरच पडला तो घराच्या. आजी आजोबांच्या गावातल्या कॅालेजमधे ॲडमिशन घेऊन हॅास्टेलवरच राहायला गेला. आजीआजोबा लोकल गार्डीअन असल्यामुळे आईबाबांनीही बिनधास्त जाऊ दिलं त्याला. तिथे मात्र त्याला जिवाभावाचे मित्र मिळाले. आजूबाजूचं वातावरण बदलल्यामुळे त्याचे विचार खुलू लागले. कॅालेजची नाटकं, इतर सांस्कृतिक कार्यक्रम, सहली सगळ्यात तो भाग घेऊ लागला. त्यातूनच हळूहळू त्याला भारतातल्या प्राचीन वास्तूंविषयी वाटणारी ओढ लक्षात आली. मग त्याने पुरातत्त्वीय उत्खनन या विषयात प्रावीण्य आणि पदवी दोन्ही मिळवलं आणि Archeological Survey Of India मधे नोकरी देखील. मधल्या काळात आईबाबांचा घटस्फोट होऊन ते वेगळे राहू लागले होते. तोही जे झालं ते बरंच झालं असं समजून घेऊन दोघांशीही नीट वागत होता. पण जाण्याची ओढ वाटावी असं घर मात्र त्याला पारखं झालं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या शहरातले प्रकल्प आणि त्या ओघाने होणाऱ्या बदल्या त्याला छान वाटत होत्या. आता मात्र आपलं हक्काचे कोणी माणूस हवं असं त्याला मनापासून वाटू लागलं होतं आणि नेमकी सारिका आज भेटली. तिचं लग्न झालं असेल तर प्रश्नच मिटला. पण नसेल झालं तर तिचा कल पाहून ठरवू पुढचं पाऊल उचलायचं का. त्याचे मनातले विचारही त्याच्यासारखे समंजस आणि शांत होते. 

          सारिका आली आणि तिचं सौंदर्य पाहून मात्र त्याच्या मनात सतार वाजली. त्याच्या नजरेला नजर मिळवून एकदा पाहिलं आणि सारिका लाजलीच. मग अर्णवने कडक कॅाफी बनवेपर्यंत कोणीच कोणाशी काही बोललं नाही. कॅाफीचे कप घेऊन दोघे बाल्कनीत आल्यावर सारिका म्हणाली “आता सांगशील का की तू इथे कसा? का नुसतीच कॅाफी पिऊ आणि जाऊ मी आता? “ दोघेही खळखळून हसले आणि मग त्याने इथपासून इतिपर्यंत सगळी कहाणी तिला सांगितली. सारिका भावुक झाली. “शाळेत तुला चिडवताना यातलं काहीच माहित नव्हतं रे. किती त्रास दिलाय आम्ही तुला. No wonder तुला आमच्या कोणाच्या संपर्कात नाही राहावंसं वाटलं.” सारिका म्हणाली. “अगं तसं काही नाही. आपण सगळेच अल्लड वयात होतो तेव्हा. मला काही राग नाही तुमच्या कोणाबद्दल. पण मग काळाच्या ओघात मागे पडलं तिकडचं सगळंच. ओढही कमी झाली त्या शहराची. तोंडदेखलं WhatsApp Group मधे वगैरे असायला नाही आवडत मला. आज तू प्रत्यक्ष भेटलीस ते फार छान वाटतंय पण” सारिकाच्या चेहेऱ्यावर मोठं हसू पसरलं. अर्णव अधिकच आवडू लागला तिला. पण पहिल्याच भेटीत हुरळून नको जायला म्हणून काही बोलली नाही ती. तिचं बिनधास्त मन म्हणत होतं की विचार ना त्याला की लग्न वगैरे करायचा विचार केलायस का, पण आईबाबांच्या अनुभवामुळे याने लग्नच नको वगैरे ठरवलं असेल तर मैत्रीसुद्धा तुटायची म्हणून गप्प राहिली ती. रात्री ८ च्या सुमारास मग अर्णवने तिला हॅाटेलवर सोडलं.

          २ दिवसांनी सारिका सहल संपवून घरी परतली. तेव्हापासून phone आणि message वर गप्पा मात्र सुरू झाल्या त्यांच्या. छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना सांगणं, एकमेकांच्या message ची आतुरतेने वाट पाहाणं सगळं सुरू झालं. “घरचे आता लग्न कर म्हणून मागे लागलेत रे” एक दिवस message मधे मुद्दामच ती त्याला म्हणाली. त्याने message वाचला पण काहीच प्रत्त्युत्तर दिलं नाही. बराच वेळ त्याचा message आला नाही तसे सारिकाचे विचार पुन्हा धावू लागले. “ज्याची भिती वाटत होती तेच झालं. आता एक चांगला मित्र गमावणार का आपण. पण आता फक्त मित्र नाही राहिलाय तो. मला आवडतो तो. सांगून टाकावं का त्याला सरळ? पण त्याने बोलणंच सोडलं तर?” तिने message वर फक्त एक प्रश्नचिन्ह टाकलं, पुन्हा त्याचा काहीच reply नाही. आता मात्र तिने वेळ देण्याचं ठरवलं त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ॲाफिसला गेली ती. लक्ष लागत नव्हतंच तिचं. सतत त्याचा काही message आलाय का हे पाहातच होती ती. संध्याकाळी ॲाफिस संपत आलं तसं तिला घरी जावंसंच वाटेना. पण नाईलाजाने पर्स उचलून निघाली ती. खाली मान घालून ॲाफिसच्या बाहेर आली आणि पार्क केलेल्या गाडीच्या दिशेने जाऊ लागणार इतक्यात “सारिकासारिकाच ना?” असा आवाज आला तिला. ती चमकली. भासच असेल. आपल्याला हिमाचल मधे अर्णवने  जशी हाक मारली होती त्याचा भास होतोय मला. ती पुढे चालायला लागली. “अगं! सारिका!” पुन्हा हाक आली आणि मग तिने दचकूनच मागे पाहिलं. अर्णव उभा होता. तिने डोळे चोळून पाहिलं तरी होताच. तिच्या चेहऱ्यावर हास्याचं चांदणं पसरलं. आणि त्याच्याही! ती धावत येऊन त्याला बिलगली. त्यानेही काही क्षण तसेच जाऊ दिले आणि मग म्हणाला “हे इथे वाटेतच बोलायचंय का?” खळखळून हसली ती. मग दोघेही जवळच्या कॅाफी शॅाप मधे जाऊन बसले. 

             अर्णवनेच बोलायला सुरुवात केली. “ लग्नाचा विषय निघणार लवकरच असा अंदाज होताच मला. पण मी टाळत होतो गं शक्य तेवढं. मलाही आवडतेस तू. पण लग्न या प्रकाराचीच भीती बसलेय गं मनात. आणि तुझं सगळं आयुष्य या शहरात स्थिरस्थावर झालंय, पण मला इथे फार यायलाही नको वाटतं गं. आणि माझ्या या हट्टापायी तुला तुझं सगळं सोडायला लावायचं हेही मला कुठेतरी नको वाटतं. तुझा सहवास मला हवाय, लग्नगाठही बांधेन मी तू म्हणत असशील तर. पण तू येशील का गं सगळं सोडून माझ्यासोबत दूरदूरच्या गावी?” त्याने हात पुढे केला. किती सारासार विचार केलाय याने सगळ्याचा. सारिकाच्या मनातला अर्णव विषयीचा आदर दुणावलाच. “होऽऽऽऽ तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे मी. तुझ्याशिवाय आयुष्याचा मी आता विचारच नाही रे करु शकत. आणि खरं सांगू? तुझं हे कामानिमित्त वेगळ्याच छोट्या छोट्या गावांत जाऊन राहाणं फारच exciting वाटतं मला. मला खूप आवडेल. आणि माझं करिअर आहे IT मधलं. हल्ली रिमोट वर्कींगचे खूप जॅाब मिळतात. मी शोधेन काहीतरी. आईबाबा, मित्रमैत्रिणी यांना भेटायला अधूनमधून येईन ईकडे. मला खात्री आहे तूही माझ्यासोबत येऊ लागशील पुन्हा इथे. आपण नवीन सुखद आठवणी निर्माण करू. पण Live-in वगैरे नको हं. लग्न रजिस्टर करू आपण. माझ्या नावात तुझं नाव add करून घ्यायचंय मला आता. मी नाही तुझी साथ सोडणार कधीच.” तिने त्याचा हात अधिकच घट्ट धरला. “अरे वा! सगळा विचार करून ठेवलायस की तू” अर्णवलाही बरं वाटलं. तिच्या या सगळं मनमोकळं बोलण्यावरच तर भाळला होता तो. “चला मॅडम. तुमच्या घरी तर तुम्ही सगळं सांगितलंच असेल. आता रीतसर मागणी घालायलाच येतो.” अर्णव म्हणाला. “ए तुला कसं कळलं माझ्या घरी माहितीय की तू मला आवडतोस? मी तर कधी व्यक्तही नाही झाले तुझ्याजवळ.” सारिका आश्चर्याने म्हणाली. “आपल्या पोटात राहणारे का मॅडम आईबाबांना सांगितल्याशिवाय? लग्नासाठी मागे लागलेत वगैरे थापा मारल्यास हे मला कळलं नाही असं वाटतंय का तुला अजूनही? इतकं तर ओळखलंय मी तुला आता!” अर्णवच्या या वाक्यावर सारिकाने जीभ चावली आणि डोळ्यात नवी स्वप्न घेऊन, हातात हात घालून दोघे सारिकाच्या घरी जायला निघाले. 

-अपूर्वा परांजपे- वैजापूरकर


disclaiimer

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.



Post a Comment

0 Comments