रसिकता


 

#रसिकता...

© Velvet Kavisha

काल जरा खुप दिवसांनी चालायला गेले आणि माझी ओळखीची मैत्रीण विणा भेटली. रस्त्याने चालत चालतच गप्पा सुरू झाल्या. "किती दिवसांनी भेटलो आपण?? पासून आज अगदी योगायोगानेच भेटलो नाही..!!" अशा आश्चर्य मिश्रीत वाक्यांनी गप्पा रंगल्याच होत्या. गप्पांमध्येच कळलं,  विणा महिनाभर इकडे नव्हतीच. माहेरी  आईकडे गेलेली. चार दिवसांपुर्वीच आली होती.  माहेरी जाऊन आल्याचंं सुख चेहऱ्यावर, बोलण्यातून ओसंडून वाहत होतं.  खुप आनंदात होती. खुप काही सांगत होती. बोलण्यात उत्साहाचा धबधबा वाहत होता. आई, बाबा, भाऊ, वहिनी, भाचे कंपनी, शाळा-काॅलेजच्या भेटलेल्या मैत्रिणी. बेस्ट फ्रेंड सोबत आईच्या घरी नाईट आऊट...‌खुप धमाल आणि आठवणी....

हसता हसता पटकन सेंटी झाली.

म्हणाली "आईकडे खुप छान आयुष्य होतं. आमचं नागपूर म्हणजे आ हा हा हा.  मस्त निवांतपणा. मोठी घरं. या मुंबईसारखं धकाधकीचं जीवन नाही. एकदम सुटसुटीत. इकडे मोठी घरं पण १००० स्वे फुटांची. आमच्या बंगल्याच्या किमतीत इथे फ्लॅट येतात...‌"

आता हल्ली फेसबुकवर बऱ्याच मैत्रिणी आहेत औरंगाबाद, नागपूर, विदर्भाच्या. छान आहेत सगळ्या. लिहितातही अफलातून. औरंगाबाद, नागपूरची लौकिकता त्यांच्या लिखाणातूनच कळली मला. नाहीतर नागपूर म्हणजे संत्री आणि ४० च्या वरचा पारा इतकचं माहिती मला. त्यामुळे हल्ली राजधानीसोबत पाठोपाठ उपराजधानीचाही अभिमान वाटतो...!!

पण आज मैत्रीणीची काही टोटल लागेना. एकदम मुंबईच्या विरुद्ध बंडच पुकारलेलं तिने.  वाटलं, हिला किती त्रास होतोय मुंबईचा..!! काय तरी करायला हवं हिच्यासाठी ते गुजरातवाले तर कधीचीच मुंबई घ्यायला टपलेत त्यांना सपोर्ट करावा की काय असं वाटून गेलं.   मैत्रीसाठी हो... नाहीतर मी पक्की महाराष्ट्रीयन... मराठी बाणा ठासून भरलेला आहे अंगात. तुम्ही फट् जरी म्हटलंत तरी मी फस्सकन् फणा काढणारच..

मी महाराषवट्रीयन असले तरी विचार भारतीय माझे. सर्वधर्म समभाव.  जातपात, धर्म, वर्ण, प्रांत याचा काही फरक पडत नाही.  बावीस वर्षे मुंबईत राहतेय तरीही पुणेकर vs मुंबईकर वाद वर्ज्य.

आपण महाराष्ट्रात राहतो तेव्हा जिल्हा, तालुका यात अडकतो. महाराष्ट्रातून बाहेर जातो तेव्हा महाराष्ट्रीयन. आणि देशाच्या बाहेर जातो तेव्हा भारतीय. आणि सरतेशेवटी ही भारतीयच. जगाच्या पाठीवर जी ओळख तीच मुख्य ओळख. माझं मत हो हे....

बरं कोणी फार श्रीमंतीचा, जमीनजाग्याचा माज करत असेल तर जगाच्या नकाशात दाखवं बाबा तुझी इस्टेट. तु तोंडी सांगून काही कळायचं नाही बुवा आपल्याला. नकाशात दाखवलीस की मलाही अंदाज येईल ना तुझ्या श्रीमंतीचा.  इतकं आपण सगळ्यांना समान लेखतो. मनाची श्रीमंती लाखमोलाची... असो.

नागपुरात असं नागपुरात तसं. आज विणा वाजतचं होती.... अशावेळी माझं डोकं सटकतं.

"अग मग नागपुरात का नाही केलसं लग्न. मुंबईचं इतकं वावडं आहे तर. नाहीतर ज्याच्यासाठी जीवाची मुंबई केलीस त्याला घेऊन जा नागपुरात. नोकरी काय जो मेहनत करणार त्याला कुठेही मिळणार..." मी फणकारलेच.

"कसं नेणार यांच्या दोन पिढ्या मुंबईत राहिल्यात.... यांना मुंबई प्यारी..." विणा तणतणली.

" मग या लग्नात शुध्द फसवणूक झाली की ग तुझी..." मी

"नाही ग त्यांनी आधी सांगितलेलं ते खुप वर्षे मुंबईत राहिलेत"... ती

आयला काय लोकं आहेत रावं. लग्न करताना नवरा मुंबईचा चालला मग त्याच्यासहीत मुंबईत राहायला काय problem असेल बुवा..

नंतर लक्षात आलं. मुंबईचा वेग, धावपळ आणि "जान हथेली पर लेके" राहणं सगळ्यांनाच नाही झेपतं.... शांत निवांत राहणाऱ्यांना तर नाहीच.  म्हणून आमच्या गावी बरीच म्हातारी माणसे एकटी एकटी राहतात पण मुंबईत येत नाहीत राहायला...

देवा!!! ही विणा अजून वाजतेचं आहे रे.  नागपूर - मुंबई फरक स्पष्ट करा असं सांगितल्यासारखी. आता आम्ही मैत्रिणी मैत्रिणींना सावरण्यात एक नंबर आहोंत. म्हणजे एखादी खुप डोकं दुखतंय म्हणून बोंबलत असेल तर आम्ही तिला पोट सांभाळलं नाही तर काय काय आजार होऊ शकतात हे सांगतो. म्हणजे होतं काय की, डोकं बाजूला ठेवून ती पोटाचा विचार करू लागते आणि तिची डोकेदुखी गायब होते. 🤪🤪🤪

तसंच आता हिला केव्हापासून मुंबई बद्दल सांगतेय पण बाई काही ऐकायला तयार नाही. बरं ही मैत्रीण आहे त्यामुळे तिला नीट समजावायला हवं. नाहीतर माझं मेलीचं हल्ली वेगळचं होतं काही.  कोणाला समजावायला गेले की गैरसमज आणि गैरसमजच.. काय करावं कळतं नाही रावं...

आता काहीतरी असं सांगायला हवं की बाजू पलटी झाली पाहिजे. नागपूरच्या बाजूने काही बोलायला हवं नाही तर आज मैत्रीचा घटस्फोट व्हायचा. पण काय बोलणार?? मला कुठे नागपूरबद्दल काही माहिती आहे..??

काही तरी सांगावं म्हणून तोंड उघडलं.

"होईल की सवय हळूहळू मुंबईची. नाही झाली तरी करूनच घे... कारण दुसरा पर्याय कुठेयं तुझ्याकडे?? नवरा हवा तर मुंबई सोसायला शिक.."

"आणि तुला खरं सांगू का विणा, तुम्ही विदर्भातील लोकं किती चांगले आहात गं. कडाक्याची थंडी सहन करता तसा चाळीस पंचेचाळीसचा पारा झेलता. पाऊस कधी असतो कधी नसतो. तरीही कुरकूर नाही तुमची. विदर्भाचा किती अभिमान बाळगता. एक वेगळाच बाज आहे गं तुमचा... तुला नक्की जमेल मुंबई.. !!" मी मस्का मोकळ्या हाताने वापरला.

विणाची कळी खुलली.

आणि एक सांगू का..?? तुम्ही नागपूरकर एकदम रसिक हो. रसिकता तर नसानसांत भरलेली. किती वेळ काढता स्वतःसाठी. नाहीतर आम्ही मुंबईतले  एका हातात पोळीचा रोल घेऊन रिक्षात बसतो. कसेबसे उठून आवरून ट्रेन पकडतो. अंगात ड्रेस तेवढा नीट घातलेला असतो. बाकी केस विंचरण्यापासून सगळी तयारी ट्रेनमध्येच. ती पण ट्रेन कल्याणहून सुटणारी असेल तर.  "रसिकता म्हणजे काय रे भाऊ???" असं विचारावं इतके गुरफटून गेलोय जीवनाच्या रहाटगाडग्यात.... कधी ती रसिकता कुरवाळायची.. " 🙆‍♀️🙆‍♀️

मी म्हटलं आणि तीचा चेहरा खुलला...

कदाचित तिला माझं खरं वाटलं नसावं.  माझ्यावर शंका घेत म्हणाली... " तु कधी गेलीस नागपुरात?? रसिकता पाहायला..!!  उगाच आपल्या टेपा नको लावूस. म्हणे रसिकता & all....." ती जरा साशंकच.

"अग जायला कशाला हवं.  मैत्रिणी आहेत की माझ्या. म्हणजे भेटले नाही कधी पण बोलते ना सगळ्यांशी. कळतं त्यावरून. आता फेसबुकवर आहेस ना तर तुझे, तुझ्या नागपुरातल्या मैत्रिणींचे फोटो बघ आणि सांग बरं एकीची तरी मान सरळ आहे का फोटोत... ?? ती तिरपी मान म्हणजेच रसिकता ग.... "

कोणीतरी म्हटलंय," फोटोत मान तिरपी असणं हे रसिकतेचं लक्षण आहे. आता मुंबईतल्या मैत्रिणींचे फोटो बघ. सगळ्या ताठ मानेत दिसतील. आहे की नाही गंम्मत... "

" हो का??? माझ्या नाही लक्षात आलं कधी... आता घरी जाऊन बघते...इथे नेट नाहीयं " ती.

बाब्बो...!!! हिला समजावून सांगायच्या नादात भलतंच काही ही सांगून पाठवलंय. आता ही घरी जाऊन फोटो बघेल आणि मग सावकाशीने मलाही बघून घेईल बहुतेक.

"फोटोत मान तिरपी असणं हे रसिकतेचं लक्षण आहे" हे फक्त मीच म्हटलंय हो बाकी कोणी नाही.

तुम्हाला काय वाटतं. हिला ब्लॉक करून ठेवू काय थोडे दिवस. नाहीतर घरी येऊन मारेल हो...लै घाबरलेय मी..

© Velvet Kavisha

सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत...

Post a Comment

0 Comments