नकोसे फोन कॉल्स आणि मेसेजेस
© Velvet Kavisha
गेली किती तरी वर्षे ४२ किलो फक्त मेंन्टेन करून. यावर्षी ४ किलो वजन वाढवलयं.... हट्टाने.
लहान दिसयचा कंटाळा आला रावं आणि म्हटलं थोडं मोठ्ठ दिसून बघुया... नाहीतर कुठे जाल तिथे लहान पोरांसोबत बसवायचे मला... त्यामुळे बुद्धी वाढायचं नाव घेईना... पोरांमध्ये राहून बालबुध्दीच राहिली ना..
"बरं बाई भारी मेंन्टेन केलसं हो... कोणी म्हणणार नाही दोन सिझर झालेतं"... हे ऐकून ऐकून कान पिकले.. आता थोड्या दिवसांनी दोन्ही कान गळून पण जातील...
सासूबाई पण म्हणाल्या एकदा... " काय होतं या बायकांना नुसती नजर लावत राहतात पोरीला..." सासुतल्या आईची वेडी माया.. असो!!
एकदा असाच संकल्प केला. वजन वाढवायचं म्हणजे वाढवायचंच !!😜
डॉक्टरोंसे दोस्ती पुरानी...
त्या म्हणाल्या "कशाला हवयं तुला वजन. छान आहेस की मस्त.."
" ते जरा मोठं दिसावं असं वाटतंय खूप दिवसांपासून..." मी.
" ते तोंड उघडलंस की कळतं... दिसण्यावर काही नसतं मोठं दिसणं वगैरे..." डॉक्टर मॅडम.
काय बाई तरी ह्या डॉक्टर मॅडम. यांनी तरी असे नको होतं बोलायला.. पण करता काय मी तोंडाने बदनाम..🙄🙄
"जाऊ दे हो... तीन चार किलो वजन वाढेल असं बघा बाई काय ते... bt only natural way.." मी.
अनैसर्गिक आपल्याला काही चालतचं नाही बुवा. आपलं म्हणजे ते "वेलची खाऊन थंड आणि लवंग खाऊन गरम" असा प्रकार. प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, डाएट आणि मे महिन्यात वजन ४६ किलो. वाह् व्वा... क्या बात है..। मै बहोत खूश..।
पण लोकं ना खुश राहू देत नाहीत हो. लगेच मेसेजेस. हल्ली ना मला मोबाईलवर रोज एक मेसेज येतोच... Loose weight upto 10 kg. अरे काय यार हे....
नवऱ्याला म्हटलं " बघ रे मेसेज! यांना कोणी सांगितलं असेल बरं मी पाच किलो वजन वाढवलं ते... रोज एक मेसेज येतोयं त्यांचा... वैताग आणलाय नुसता. काय सांगू यांना.??"
"अग त्यांना कोणी सांगायची गरज नाही... ते तुझं आजकाल चाललेलं असतं ना status मध्ये... आज फिर खुद पे प्यार आया है आणि आज खुद से दिल्लगी हुई रे बाबा... त्याचाच परिणाम हा.... तुझं मित्रमंडळ पाहतं न स्टेटस..... ते ही तुझ्यासारखेच छत्रधारी... कोणी बिझनेस करत असेल एखाद्या प्रोडक्टचा... तु जाड दिसली असशील म्हणून पाठवतं असेल मेसेज..." हा एकच माणूस याला भंकस भंकसमध्येही भारी सुचतं बाई... 😂😂
मग काय आलेल्या मेसेजला केला रिप्लाय... "I wd like to know about ur product..." त्यांचा डायरेक्ट फोनंच... स्वतःच्या प्रोडक्टची स्तुती वारेमाप स्तुती...
"आमच्या प्रोडक्टमुळे मॅडम तुमचं वजन दहा किलो नक्की कमी होईल." सेल्समन.
"किती दिवसांत..??" मी.
"दोन महिन्यांत डेफिनेटली.." सेल्समन.
"४६ मधून १० गेले की किती उरतील ..???" मी.
"३६" - - सेल्समन.
"३६ किलो वजनाची बाई कशी दिसेलं हो. उद्या साडी नेसले तरी काठीला फडकं गुडाळल्यासारखं दिसेल ना बाब्बो...." मी.
"मॅडम, तुम्ही काय बोललात ते कळलं नाही." सेल्समन
"अरे सर, माझं आताच वजन ४६ किलो. तुमचं प्रोडक्ट वापरून खाऊन १० किलो कमी होणार मग माझं वजन होणार ३६ किलो. ३६ किलोची बाई हाडाचा सापळा नाही दिसणार का..?? तुम्ही रोज रोज दहा किलो वजन कमी करा म्हणून मेसेज करता ते तुमचे मेसेज वाचून वाचूनच दोन किलो वजन कमी झालंय माझं.. त्याला जबाबदार कोण. ?? " मी
"अहो मग तुम्ही प्रोडक्ट बद्दल माहिती का विचारली..??" सेल्समन भडकला.
"तुम्हांला माझं वजन माहिती नसताना मेसेज टाकून झक् मारायला सांगितली कोणी... तुम्ही माती खा आणि रूबाब मला दाखवा.. च्यायला डोकं खातात उगाचच." अर्थातच it's me.
याचा तर बंदोबस्त केला बाई. पण असे बरेच unwanted मेसेजेस, calls, mails येतात...
एक कॉल आला.
"देशपांडे आहेत का..?" समोरचा आवाज.
"Wrong number." मी
दोन दिवसांनी पुन्हा...
"देशपांडे आहेत का..?" समोरचा आवाज.
"Wrong number. काका जरा नंबर चेक करून डायल करा ना" मी.
पुन्हा....
"देशपांडे आहेत का..?" समोरचा आवाज.
"तुम्ही कोण बोलताय...?" मी
"मी अरुण..." समोरून
"तुम्हांला कोण हवंय...??" मी
"रमेश देशपांडे..!" समोरुन.
" अहो काका, हा माझा नंबर आहे. तुम्ही तीनचार वेळा मला फोन लावलात. त्यापेक्षा नंबर चेक करून घ्या ना एकदा." मी समजावलं.
पुन्हा एक दिवसानंतर....
"रमेश देशपांडे आहेत का...?? मी अरूण देशपांडे बोलतोय..." समोरून.
आयला.... आता डोकं गेलं आणि हा देशपांडे पण..
"पावनखिंडीत पाठवलंय त्यांना. हल्ली देशपांडेना फार मस्ती आलीय. बिघडलेत जास्त. म्हटलं "जा पावनखिंडीत. महान बाजीप्रभूंच्या पदस्पर्शाने, रक्ताने पावन झालेल्या पवित्र जागेची धूळ मस्तकाला लावून या. सुधरलात तर सुधरलात." फोन कट्. 🤗🤗
एक कॉल. माझ्या नंबरवर. True caller ID active. नाव आलं. "संगिता सुर्यवंशी". पण समोर पुरूष.
" Hello..!! लक्ष्मण आहे का..??" समोरून.
"Wrong number...!!" मी.
पुन्हा एक दिवसाने
"Hello..!! लक्ष्मण आहे का..?? " समोरुन.
"नाही हो. हा माझा नंबर आहे. तुम्ही नंबर चेक करा ना प्लीज." मी.
पुन्हा चार पाच दिवसांनी... तोच नंबर.
"हे बघा, तुमच्या लक्ष्मणाने हैराण केलयं फार म्हणून त्याला वनवासाला पाठवलंय. आता चौदा वर्षे फोन करू नका.." मी आणि फोन कट्..🤗🤗
उगाचच फोन करून आवाज ऐकणाऱ्यांची आणि मजा घेणाऱ्यांची काही कमी नाही आपल्याकडे.... 🙆♀️🙆♀️
झालं काय की मागच्या महिन्यात एकाच कंपनीच्या तीन ऑपरेटर्सनी कॉल केले वेगवेगळ्या दिवशी. दोघांना सांगितलं समजावून. पण तिसरा काही ऐकायला तयार नाही.
"Ma'am, आपकी गाडी आप हमसें ही एक्स्चेंज करके लिजिए। आपकी जुनी गाडी दे के नयी गाडी ले लिजिए। प्लीज ma'am..।" तो गयावया करत.
आधीच्या दोघांना काय सांगायचं ते सांगून झालेलं. आता याला नीट सांगायला हवं. कारण विषय गाडीचा आहे.
"भाई वो गाडी कौन सी भी चलेगी क्या..??" मी विचारलं.
"हां हां। कौनसी भी चलेगी..। आपके पास कौन सी है..??" त्याने विचारलं.
"वो तो देखना पडेगा ना भाई...!!" मी म्हटलं.
"अरे madam, ऐसी आपके पास कितनी गाडियाँ है..??" त्याने विचारलं.
"एक भी नहीं..।
पर आपको कब से समझा रहीं हुँ तो आप समझ नहीं रहे है। तो सोचा चोरी करके आपको एक कार दे देती हुँ..। फिर उसे एक्सचेंज करके नयी गाडी ले लुँगी। कैसा लगा आयडिया..??" मी विचारलं आणि समोरून फोन कट्.
अगदी हेच एसी सर्विंसींगच्या बाबतीत.... आता "बाईंनू तुमच्याकडे साधा एसी पण नाही??" असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो..😜😜
एका बिल्डरच्या मार्केटिंगचा फोन.
"Hello ma'am.!! आप अगर घर के बारे मे सोच रहें हो तो, हमारे पास अच्छे ऑफर है..। एक करोड़ चार लाख में आपको 3BHK मिलेगा with all amenities." समोरुन.
"नहीं जी। " मी.
"सोचिए ना ma'am एकबार..।" समोरुन आर्जव.
"नहीं रे ma'am. फिलहाल जिस घर में रह रहे हैं, उसमें ही शांती सें रहना चाहती हुँ..। थँक्यू..।" मी.
बाब्बो...!! आज मैं उपर आसमां निचे वाला फील. समोरच्याने आपल्याला करोडपती समजण्यासारखं सुख नाही ना दुसरं...😊😊
आमच्याकडे एक मोबाईल नंबर पंधरा वर्षे जूना आहे. बऱ्याच लोकांकडे, नातेवाईकांकडे हा नंबर आहेत. हल्ली चांगल्या ऑफर मिळतात म्हणून लोक फटाफट ऑपरेटर आणि नंबर बदलतात. त्यामुळे कोण कधी फोन करून "हा माझा नवीन नंबर" असं सांगेल त्याचा नेम नाही. त्यामुळे जुन्या नंबरवर आलेले कॉल घ्यावे लागतात. हा नंबर घरीच असतो. तो फोन सासुबाईंना ही हाताळता यावा म्हणून स्मार्ट नाहीय.
तर या फोनवर आलेला प्रत्येक कॉल मी घरात असताना घेतलाच जातो. अनोळखी नंबर सासुबाई उचलत नाहीत. त्यामुळे मिस्डकॉलला मी घरी आल्यावर call back करते.
बऱ्याचदा लोन, बिल्डर्स, टेलिकॉम, इतर सर्विसेस सारख्यांच्या टेलिमार्केटिंगवाल्यांचे हे फोन असतात. याबद्दल थोडसं माहिती असलेलं सांगते.
Telecalling marketing मध्ये inbound आणि outbound calling असतं. यातले inbound वाले सुखी. उदा. आपण एखाद्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर बरेच सिंगल नंबर दाबल्यावर जी व्यक्ती समोर येते ती. Inbound telecallers मधील एक.
Outbound वाले जरा शापितच. त्यांना कॉल करून, माहिती देऊन कस्टमर तयार करायचे असतात. हे कंपनीला बिझनेस मिळवून देतात. काही एजन्सीज अशी कामे करत असतात.
टेलिकॉलर्सना महिन्याचं कॉल्स् टार्गेट तसंच बिझनेस टार्गेट दिलं जातं. त्यावर त्यांचा पगार अवलंबून असतो. हे टेलिकॉलर्स एका कस्टमरला साधारण दोनतीन वेळा कॉल करतात. ऑपरेटर्स वेगळे असू शकतात दोन्ही वेळेस. हे लोकं सतत फोनवर बोलत असतात. पुढे जाऊन या फिल्डमधल्या मुलांना कमी ऐकू येणं, खुप मोठ्या आवाजात बोलणं किंवा मग गप्प राहिलेले असताना ही त्यांच्या ओठांची बोलत असल्यासारखी हालचाल होत राहते.
अशाच फोन कॉल्समुळे आजवर पाचसहा वेळा मी माझा नंबर प्रीपेड टू पोस्टपेड करून झालाय. असो.
होतं असं की, असे फोन आले की मी त्यांच्याशी नीट बोलते. त्यांच बोलणं समजलं असल्याच सांगते. पण सध्या तशी काही गरज नाही. गरज असल्यास नक्की कळवेन असं सांगून त्यांचा नंबर घेऊन कॉल संपवते. कारण अशा आऊटगोईंग कॉल्सचे ऑटोरेकॉर्डिंग होत असतं त्यांच्याकडे.
कधीकधी स्वतःच्या टार्गेटसाठी समोरच्याला टार्गेट करणाऱ्या या कष्टकरी telecallers च्या बाबतीत मनात थोडासा सॉफ्टकॉर्नर आहे बाब्बो...!
पण काही सेल्स पर्सन जरा अति करतात. मग नाईलाज होतो. आणि मग असे काही किस्से घडतात. क्या करें, हम है तो ऐसें ही..!!
तरीही सगळ्यांनाच कसं धोबीपछाड देत राहणार... वेळ कुठे आहे इतका... सोडून द्यायचं मग...
हे असे मेसेज वाचून आणि शहाणपण शिकवून कमी झालेलं वजन कसं वाढवावं याचा विचार करावा लागेल ना बाब्बो....🤦🤦🤔🤔
copyright @ velvet kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box