"इये मराठिचिये नगरी"
© Velvet Kavisha
परवा मुलीच्या शाळेत गेले तिला आणायला. शाळा सुटली. एक मुलगा धावतच बाहेर आला. आईला बिलगला. म्हणाला "आई, भाजी किती ग तिखट! इतकं पाणी प्यायलो ना ढसाढसा. सगळं संपलं.."
बाप रे!!!! मलाही वाटलं सगळं संपलच. पटकन त्याच्या आईचा आणि त्याचा हात धरून बाजूला खेचलं.
पाणी गटागटा पितात, ढसाढसा रडतात, घडाबडा लोळतात, विजांचा आणि टाळ्यांचा कडकडाट, ढगांचा आणि हास्याचा गडगडाट, बकाबक ओकतात, भांड्यांचा खडखडाट, नाण्यांचा खणखणाट, पाण्याचा खळखळाट, कडकडा बोटं मोडतात, दणादण पाय आपटतात, खसाखसा घासतात, टराटरा फाडतात, भराभर किंवा तरातरा चालतात, भळाभळा रक्त वाहतं, ...पावसाची रिमझिम. रातकिड्यांची किरकिर. बांगड्यांची किणकिण. पक्षांचा किलबिलाट. पंखांची फडफड. सजीव भेटतात. वस्तू सापडतात. लांबून दिसतं जवळून पाहतो.. साडी नेसतात. ड्रेस घालतात. एका दमात समजावलं. .हुश्श
"माझं पोरगं पाणीच तर प्यायलयं, तेही स्वतःच्या बाटलीतलं. हिला काय फेफरं आलं एकदम" अशा आवेशात पाहत दोघे निघून गेले. आता ती आणि तिचा मुलगा टाळतातच मला..... मी ही कधी कधी अती करते त्याचं हे उदाहरण.🙆♀️
मी ही खेड्यात वाढलेली. शिक्षण तिथेच. एकदा बाईंनी मुकादम म्हणजे काय हे सांगायच्या आधी कोणीतरी 'दम देऊन मुका घेणारा' असं सांगितल्यावर हसलेला वर्ग आठवला. व्याकरणाच्या तासाला श्रुगांरिक अलंकार.. बाईंच वर्णन सुरु. कमलनयन, चाफेकळी नाक इत्यादी इत्यादी..आणि मग सर्दीने गळणाऱ्या नाकाला काय म्हणतात श्रुगांरिक अलंकारात??? असा उध्दट प्रश्न कुठूनतरी. काय होतं भाषेचं ज्ञान?? काहीच नाही...
बारावी नंतर मुंबईत पोटापाण्यासाठी. रत्नागिरीच्या मुंबईस्थित ब्राह्मण कुटुंबात वास्तव्य तीन वर्ष. तिथेच भाषा थोडीशी वृध्दींगत झाली. चिंचेच्या बीला चिंचोका म्हणतात, झाडूला केरसुणी, पाय पुसण्यासाठी पायपुसणं तर हात पुसण्यासाठी हातपुसणं असतं इथेचं कळलं. चहा घेशील ना थोडासा ? आडून तुला चहा नकोच असेल हा अर्थ!!
बाईचं परफेक्ट वय हवं असेल तर तिला डायरेक्ट नाही विचारायचं कधी तर बोलता बोलता किती वर्षे झाली तुमच्या लग्नाला आणि मग कधीतरी कितव्या वर्षी लग्न झालं विचारून बेरीज केली की वय कळतं किंवा मग किती वर्षे झाली नोकरी करतेस?? वयाच्या कितव्या वर्षांपासून करतेस नोकरी?? करा बेरीज मिळालं वय. हे गणित ही तिथलचं. तिरकस बोलणं, टोमणे मारणं हे वाक्प्रचार खरोखर अस्तित्वात असतात ही अनुभूती तिथलीच. साखरपेरणीचा साखरेशी काडीमात्र संबंध नाही हे ही कळलं. कोणत्याही विद्यापीठात असं ज्ञान दुरापास्तच. एकमात्र झालं इथे. भाषेची गोडी वाढली.
पुढे गोडी लागली प्रांतानुसार बदलणाऱ्या भाषेची... थोडं निरिक्षण आणि बोलण्याच्या शैलीवरून लोकांना ओळखता येऊ लागलं थोडफारं.."घे जो, कर जो' किंवा मग 'करून घेशील तेवढं, खाऊन घेशील तेवढं' असं तुम्हाला ऐकू आलं तर तुम्ही खान्देशात.
दिसतयं, होतयं च्या ऐवजी दिसत आहे, करत आहे, बोलत आहे ऐकू आलं की तुम्ही उपराजधानी नागपूरमध्ये किंवा दिसतीयेस, बोलतीयेस, करतीयेस ऐकू आलं की तुम्ही मराठवाड्यात. कृतीच्या शब्दाला "या" इथेच जोडला जातो. उदा. केलं जातं, खाल्लं जातं लिहिताना केल्या , खाल्ल्या, बोलल्या, पाहिल्या जातं.
बोलायलो, करायलो, जायलो, यायलो किंवा गेल्तो, आल्तो.. म्हणजे तुम्ही जिल्हा यवतमाळ. मराठीला कानडी टच म्हणजे सोलापूर. मी ऐवजी स्वतःला आम्ही म्हणजे कोल्हापूर...
रायगडची गोष्टच वेगळी. सगळा 'ळ' आणि 'ल' चा गोंधळ. दोन्ही अक्षर एकमेकांच्या जागी. नळाला नल आणि "हरणाच्या चालीला हरणाची चाळ"..
खाल्लीव, बोल्लीव, केल्लीव म्हणजे संगमेश्वर- रत्नागिरी...
कोकणी भाषा ते तुयां मियां, तुका माका किंवा विषय कसो हा म्हणून बोलण्याला केलेली सुरवात म्हणजे आमचं कोकण.. जिल्हा सिंधुदुर्ग..
हिंदी मिश्रित मराठी फक्त मुंबईत...
पुण्याविषयी काही बोलायचं म्हणजे संस्थापकाला शाळा चालविण्याचं दिलेलं ज्ञानच जणू किंवा समुद्रात गडुभर पाणी ओतायला जाण्यासारखं. गडू आणि तुम्ही दोघेही गायब..
शुद्ध मराठी आणि प्रांतानुसार बदलणाऱ्या मराठी बोलीभाषा दोन्हीही सुंदर, श्रवणीय, हव्याहव्याशा. प्रत्येकीचा स्वतःचा ठसका आणि लहेजा...
मराठीचा कमी होत जाणारा वापर आणि इंग्रजीचा हव्यास यावर वाचणात, ऐकण्यात आलं.. एकदा भारताचे नावाजलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधवांना समोरून ऐकण्याचा योग आला. त्यांचा विषय वेगळा होता. तरीही सफाईदार मराठी म्हणजे काय ते कळलं. ते दादरच्या छबिलदास शाळेचे विद्यार्थी. प्रचंड अभिमान वाटला.
झालं... त्या दिवसापासून थोडी थोडी सुरुवात केली. मुलीची शाळाही तशीच. मस्त. शाळेला माहितीयं की, आपल्या शाळेत मुलांनी प्रवेश घेतलाय पालकांनी नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या पालकसभेत मराठीचा आग्रह. शाळेला मान्य. कारण आम्ही मराठीतून शिकलेले.
रिक्षावाला, भाजीवाला, मार्केटमध्ये सगळीकडे जमेल तेवढं मराठी. Office मध्ये माझ्या मराठीमुळे 'तुम्ही उद्या का नव्ते आले office ला? 'असा धर्मेशभाईंचा प्रश्न. हसू आणि समाधान दोन्ही.
एका ग्रुपवर ठरलं मराठीतच बोलायचं. म्हणजे मालवणीत बोलले तरी चालणार... मराठी फाँट डाउनलोड.... सगळं मस्त. एका सकाळीच ग्रुपवर मेसेज.."mi aaj sakali sakali padalo"..(याने मराठी फाँट डाऊनलोड केलेला नव्हता.).. "अरे सकाळी सकाळी गॅसेस होणं चांगलं नाही हार्ट अॅटॅकही येवू शकतो. उठ आणि पहिला डॉक्टर कडे जा." एकाला फिरकी घेण्याची खोड.
त्याचा वॉईस मेसेज .."तुझा गैरसमज झालाय मी आज सकाळी सकाळी जिन्यातून घसरुन पडलो. आता डॉक्टरकडेच आहे. पायाला प्लॅस्टर घातलयं.. 😂😂
गावी कोकणात जातो किंवा मुंबईत कोणी गाववाले भेटले तर मालवणी. जेव्हा मोठी लेक "काय गे काय करतस?" किंवा मग छोटी लेक "हेंका मार, माकां खेलणी देत नाय" असं बोलतात, तेव्हा ऊर भरून येतो.
बऱ्याच मैत्रिणी आहेत. वेगवेगळ्या प्रांतातल्या.
◆ माझी एक मैत्रीण कळंब, यवतमाळची. विषय एकदा खुप पडलेल्या पावसाचा निघाला.
"अग आमच्याकडे तर तेव्हा ढोपरापर्यंत पाणी आलेले." मी म्हटलं.
"अगं, कबंरेपर्यंत आलेलं म्हणावं.." ती म्हणाली.
" नाही गं, इतकं नाही काही. फक्त ढोपरापर्यंतच आलेलं." मी पुन्हा सांगितले.
तिने मला बाजूला घेतलं. म्हणाली, तु म्हणजे कलाकार आहेस अगदी. तुला कधीपासून सांगते. कंबर म्हण, कंबर म्हण. तरीही चारचौघात ढोपर ढोपर करून बोंबलतेस."
"तुमच्याकडे कंबरेला ढोपर कसं काय म्हणतात ?? " मी विचारलं...
ती म्हणाली, "अग कंबरेला नाही काही; 'ढुं×गणाला' ढोपर म्हणतात."
"अग मग गुडघ्याला काय म्हणतात..??" मी
"गुडघाच.." ती.
कर्म माझं.🤦
"आम्ही गुडघ्याला 'ढोपर' म्हणतो गं. तु शेतकऱ्याचं वर्णन वाचलं असशील ना ?? त्याने 'ढोपरापर्यंत' धोतर नेसलं होतं' वगैरे. ते तुमच्या "ढोपरा"पर्यंत असेल तर तिथेच गुंडाळावं लागेल. आणि मी म्हणते त्या ढोपरापर्यंत नेसून तरी काय उपयोग धोतराचा." मी माझा मुद्दा ढोपरासहीत रेटला...
◆ माझ्या एक जीवलग काकू आहेत खान्देशी. लेकीकडे जायला निघाल्या. म्हटलं, "काकू, पिंकीला मेथीचे लाडू देते ते घेऊन जा. आवडतात तिला."
दुसऱ्या दिवशी पिंकीचा फोन. "वहिनी लाडू मस्त आहेत हो. पण एवढे मोठे दिलेत."
"अग लहानपणापासून शेतीत काम केलेले हात आहेत. छोटे वळायला घेतले तरी मोठेच होतात. काय करणार. तुला आवडले ना मग जाऊ दे." मी.
"नाही हो पण इतके मोठे पाठवलेत" ती.
काहीतरी गडबड आहे. हे "मोठे" वेगळे आहेत.
"पिंकी, मोठे म्हणजे तु shape म्हणतेस की quantity....??"
"वहिनी 'quantity' हो..." ती.
🤦🤦 अरे देवा..!! फोनवर बोलेपर्यंत मी कितीतरी वेळा माझ्या तळहातांकडे पाहून झालेलं होतं. लाडू मोठ्या आकारात वळले म्हणून....
◆ एकदा लहाणपणी बार्शीला गेलेले. चुलत भाऊ आणि त्याच्या कुटुंबासोबत. तीनचार दिवस राहिलो. मी लहान. एक आजी आल्या सोलापुरी टचमध्ये म्हणाल्या; "पोरी, तुला इथे 'गमत' का..?"
"न गमायला काय झालयं. डोळे दिलेत की देवाने.." मी.
आमच्या कोकणात 'दिसणे' म्हणजे 'गमणे'. दिसत नाही का तुला..? असं आम्ही "काय गो तुका गमत नाया..??" असं विचारतो. त्याच बेसवर सांगितलं.
"तसं नाही. पहिल्यांदाच एवढ्या लांब आलीस घरापासून, तर "गमत" का..विचारलं." आजी.
"आजी मला गमतं, गमतं, गमतं.." मी
तेवढ्यात कोणीतरी येऊन बार्शीचं "गमणे" म्हणजे "रमणे" हे ज्ञान देऊन गेलं. म्हणजे मला आजी मला कधीपासून 'मन रमलंय' का इकडे असं विचारत होत्या आणि मी 'डोळ्यांनी दिसतंय' ते सांगत होते. बार्शीच्या आगमनातली गमनाची कथा...
◆ मोठ्या बहिणीच्या सासरी गेलेले. आम्ही मालवणी असलो तरी प्युअर मावलणी नाही. आणि बहिण मालवण तालुक्यातच दिलेली. पाणी आणायला मदत करायला गेले. एक भांड कमरेवर दुसरं हातात. हातातल्या कळशीतून पाणी सांडायचं. तिची सासू दोनतीन वेळा म्हणाली."चेन" करू नको. काही कळलं नाही... बहिणीला विचारलं. ती म्हणाली, "पाणी सांडून चिखल होतोय खाली. तो करू नकोस".
जाऊ दे आता काय करणार. कळेपर्यंत maximum "चेन" करून चैन केली होती मी.
◆ माझी छोटी. एकदा म्हणाली, "मी पप्पांच्या बाईकवर 'मागे' बसणार आहे." मी तिला माझ्यासोबत मागे घेऊन बसले. रडून रडून ढिंगाणा. परतीच्या वाटेवर विचारलं. "तुला मागेच बसवलंय ना. तरी रडतेस कशाला..?
" मला पप्पांच्या मागे बसायचं होतं." ती.
"अग, मग मागेच बसलो होतो ना आपण..??" मी.
ती खाली उतरली. तरातरा जाऊन पेट्रोलच्या टाकीवर हात मारून 'मला इथे बसायचं आहे ' म्हणाली. वरून लूक असा दिला की, काय मम्मी तुला साधं एवढंही कळत नाही.
मग काय तिच्या म्हणण्यानुसार बाईकवर ती मागे आणि मी पुढे बसून आले. नशीब पप्पा मध्येच होता.
◆ आईला कल्याणमध्ये शिफ्ट केलं आणि मी गेले भेटायला. माझी मतिमंद बहिण माझ्याजवळ आली. म्हणाली., "बायो, मी तुका बघूक इलयं."
मी म्हटलं; "अग तू कुठे मीच बघायला आले ना तुम्हांला. तुमच्या घरी."
बाबा म्हणाले, "तिला चहा हवाय. चहा दे."
"अँ?? मग ही अशी का सांगते...?? " मी.
"अग, आई आजारी पडल्यापासून कोणी ना कोणी येत राहतं बघायला. त्यांना चहा देतो ना. म्हणून तुम्ही कोणी आलात की ही सांगते, "तुला बघायला आले." म्हणजे बघायला आलेल्या माणसाला चहा देतो ना. Doctor नी तिला चहा दोन वेळेसच द्या म्हणाले. त्यामुळे सारखा चहा देत नाही तिला. आजही मी आईकडे गेले की, ती मला बघायला येते आणि मी तिला चहा देते.
बाब्बो... किती सांगायचं रावं. भाषा तीच मराठी. काही शब्द इकडचे तिकडे झाले की हशा आणि टाळ्या. हल्ली मोबाईलवर तर टायपो एररचे किती तरी किस्से आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
आपलीच भाषा आहे. येईल तशी बोलूया पण थोडी काळजीने. ज्या प्रांतात राहतो त्याचा प्रभाव असतो भाषेवर. जपुया मराठी थोडी. मुलांनाही लावुया गोडी.
© Velvet Kavisha
वाचकहो वरील निरिक्षण आणि मते दोन्ही माझी आहेत त्यात काही चुकीचे ही असू शकतं तुमच्या द्रुष्टीने... कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाहीयं... मी कोणी मराठी भाषेची तत्ववेत्ती नाही किंवा कोणत्याही पक्षाची पुरस्कर्ती नाही.. मनापासून वाटतं... मराठी जगावी किंबहूना आपण तिला जगवावी.. आपलीच भाषा आहे थोडी शिकावी कधी. करावा तिचाही अभ्यास. माझ्या मताचा तुम्ही आदर करा किंवा करू नका.. पण विचार मात्र नक्की करा.

3 Comments
Chan Mala avadal...
ReplyDeleteFrom @marathwada
Vishay kaso ha..tumi bharuch liwalas
ReplyDeleteभारी लिवलास. ढोपराची गंमत च असा
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box