#आनंदी_वास्तू 🏠 .. भाग 1
✍©️जया पाटील
विलासराव घाटगे , त्यांचे आईबाबा , त्यांची धर्मपत्नी रमा, मुलगा शेखर आणि मुलगी श्रेया .... अगदी सुखाने भरलेला षष्टकोनी परिवार.
अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा घरात एकमेकांना शेयर करायच्या. आपल्या अडचणी मनात न ठेवता त्या घरातील सगळ्यांसोबत शेयर करून त्या अडचणींवर मार्ग काढायचा ही शिकवण लहानपणापासून विलासरावाना त्यांच्या आईबाबांनी दिली होती. त्यामुळे अर्थातच ते गुण शेखर आणि श्रेया दोघांमध्येही होतेच.
कुठल्याच संकटांनी खचून न जाता सगळे मिळून त्यावर मात करायची हे सगळ्यांनी ठरवलं होते.
घाटगे परिवाराला देखील आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला पण सगळ्यांची सोबत असल्यामुळे त्यांना ती संकटे अगदीच शुल्लक वाटली.
एकमेकांच्या साथीने विलासरावांनी आणि त्यांच्या परिवाराने सगळ्या अडचणींचा धैर्याने आणि नेटाने सामना केला त्यामुळेच ते त्यांच्या वर्तमानकाळात यशस्वी झाले.
कालांतराने वृद्धापकाळाने विलासरावांच्या आईबाबांचा मृत्यू झाला. विलासराव आणि रमाताई थोडेसे एकटे पडले. घरातील मोठी माणसे घराचा भक्कम आधार असतात हे ती दोघेही जाणून होती परंतु निसर्गाचा नियम आहे जो जन्माला आला तो एक दिवस अनंतात विलीन होणारच म्हणुन त्यांनी स्वतःला सावरले.
या पुढचा काळ आपल्याला फक्त आईबाबांच्या आठवणीत व्यतीत करावा लागेल हे त्यांनी जाणले आणि आलेल्या दुखाचा सामना करून विलासरावांनी त्यांच्या आईबाबांच्या चांगल्या शिकवणीच्या , संस्कारांच्या आधारावर पुढे जायचे ठरवले.
काळ पुढे सरकत होता. श्रेया आणि शेखर दोघेही मोठे होत होते. दोघेही आपले शिक्षण पूर्ण करत होते. थोड्याच दिवसांनी श्रेयाचे ग्रॅजुएशन पूर्ण झाले. ती त्याच शहरात चांगल्या नोकरीला लागली. त्यांनतर विलासरावांनी श्रेयासाठी योग्य असा मुलगा शोधायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी श्रेयाचे लग्न अतिशय गुणी, चांगल्या परिवारातील आणि त्याच शहरात नोकरीला असलेल्या अभिजित सोबत लावून दिले.
विलासरावांची एक जबाबदारी तर पूर्ण झाली होती आता शेखरचे दोनाचे चार हात केले म्हणजे आपण मोकळे असे विलासरावांनी मनोमन ठरवूनच टाकले.
शेखर त्याचे उच्चशिक्षण संपवून तो देखील चांगल्या नोकरीत सेटल झाला होता. विलासरावांनी मग शेखर साठी वधूसंशोधन सुरु केले. शेखरला त्याच्याच ऑफिस मधली शुभांगी खूप आवडत होती. त्याने तिला प्रोपोज पण केले होते.
घाबरत घाबरत त्याने विलासरावांना शुभांगी बद्दल सगळे काही सांगितले. मुलाची आवड तिच आपली आवड......शेवटी संसार त्या दोघांनाच करायचा आहे असे समजून विलासराव आणि रमाताईंनी या लग्नाला होकार दिला.
शुभांगी एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी होती. आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती खुप हट्टी होती. त्यामुळे पैश्याची उधळपट्टी करणे , सतत बाहेर फिरायला जाणे , हॉटेल मध्ये जेवायला जाणे अश्या गोष्टी तिच्या फार आवडीच्या होत्या. यात वेळ आणि पैसे दोघांचाही अपव्यय होतो आहे हे तिला समजतच नसे.
शेखर आणि शुभांगीचे लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस सगळे काही छान चालू होते परंतु शुभांगीचा सतत बाहेर जाण्याचा हट्ट करणे , आज ही पार्टी , उद्या ती पार्टी ह्या सगळ्या गोष्टी शेखरलाही पटेनाश्या झाल्या होत्या.
शेखर शुभांगीला सतत समजावत असे की प्रत्येक वेळेस खूप पैसे खर्च करून आनंद मिळतोच असे नाही , आपण आपल्या घरातील लोकांसोबत सुद्धा उत्तम वेळ घालवू शकतो , त्यातच खरा आनंद असतो. ह्या सगळ्या गोष्टी मात्र शुभांगीच्या समजण्या पलीकडच्या होत्या.
शुभांगी घरात देखील रमाताईंना घरकामात फार मदत करत नसे. सगळीकडे तिची मनमानी करत असे. जवळच्या नाईवाईकांकडे कार्यक्रम असला की कार्यक्रमाला जायचे नाही. ऑफिस मधुन उशिरा यायचे आणि स्वयंपाक तयार असताना सुद्धा जबरदस्तीने शेखरला बाहेर जेवायला नेणे असे प्रकार आता नेहमीचेच झाले होते.
विलासराव आणि रमाताईंना हे सगळे काही पटत नसे परंतु आपल्यामुळे आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात वितुष्ट येऊ नये म्हणुन ती दोघेही गप्प बसत. शेखरला देखील बऱ्याच गोष्टी पटत नसत , पण शुभांगीच्या हट्टी स्वभावापुढे त्याचा नाईलाज होत असे.
एक दिवस असेच शुभांगीने ऑफिस मधुन शेखरला फोन केला की तुझे काम आटोपून आपण बाहेर मूवी आणि डिनरला जाऊया . शेखर घरी आला तर रमाताईंची तब्येत खूप जास्तच बिघडलेली होती त्यामुळे त्याने बाहेर जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला. या सगळ्यामुळे शुभांगी चिडून शेखर आणि रमाताईंसोबत भांडु लागली ..
ती रमाताईंना म्हणाली ...
मम्मी , तुम्हाला आमचे फिरणे , एन्जॉय करणे सहनच होत नाही. आज आम्ही कुठेही फिरायला जाऊ नये म्हणुन हे आजारी पडल्याचे सोंग घेऊन बसल्या आहात तुम्ही ...
आपल्यावरचे खोटे आरोप ऐकून रमाताईंना अश्रु अनावर झाले पण त्या काहीही बोलल्या नाहीत.
आईची चुकी नसताना आईवर केलेले आरोप शेखरला सहन झाले नाही म्हणुन त्याने शुभांगीवर हात उगारला परंतु त्याआधीच त्याचा हात विलासरावांनी थांबवला. शुभांगी रागातच आपल्या खोलीत निघुन गेली. सगळीकडे शांतता पसरली.
क्रमश:
पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा👇
शुभांगीचा स्वभाव शेखर बदलू शकेल का ? शुभांगीच्या या वागण्याचा विलासरावांच्या या सुंदर घरावर काय परिणाम होईल हे सगळे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरु नका.
तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box