#तुमसे_मिलके 💞 .. भाग 1
✍©️जया पाटील
महाविद्यालयीन पदवीच्या प्रथम वर्षात शिकणारी नंदिनी ...दिसायला अतिशय सुंदर ,काळेभोर केस , गोर्या गालांवर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत असे. मोहक डोळे ,चाफेकळी नाक ,गुलाबी ओठ ....जशी काय स्वर्गातील अप्सराच जणू.....!
स्वभावाला देखील तितकीच गोड , समजदार , सतत हसणारी नंदिनी तिच्या कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणींची लाडकी होती. लाजरा स्वभाव असल्यामुळे कधी कोणत्या मुलासोबत मैत्री करण्याचा तिने प्रयत्न केला नाही.
मुलांसोबतची मैत्री प्रेमात बदलली तर ....?
मग त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी .....? त्यामुळे मुलांसोबत मैत्री आणि प्रेम वगैरे या भानगडीत कधीच पडायचे नाही असं तिने ठरवूनच टाकले होते. पण ठरवून करता आले असते तर ते प्रेम कसले ....? कोणावरही प्रेम करणे हे आपल्या हातात असते तर सगळ्याच गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या. अश्यातच तिच्या आयुष्यात राजीव आला.
राजीव अतिशय हॅंडसम,राजबिंडा आणि खूप हुशार मुलगा होता. थोडक्यात सांगायचे तर तो ' हर लडकियों की दिल की धडकन ' होता. त्याच्या नोट्स तर अगदी प्राध्यापकांना देखील खूप आवडायच्या. नोट्स मागण्याच्या बहाण्याने अनेक मुली त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे पण राजीव फक्त मदत करून मोकळा होत असे.
मुलांपासून दूर राहायचे ठरवले असल्यामुळे नंदिनीने मात्र त्याच्या कडून कधी मदत घेतली नव्हती पण नंदिनीला पदवीच्या अभ्यासक्रमातील एक विषय अतिशय अवघड जात होता. परीक्षा तोंडावर आली होती. फार काहीही अभ्यास करायला वेळ नव्हता मग मात्र नापास होण्यापेक्षा तिने राजीव कडे नोट्स मागायच्या ठरवल्या.
राजीवला भेटून अगदी घाबरतच तिने त्याच्याकडे नोट्सची मागणी केली. साधी- भोळी, घाबरणारी, लाजरी-बुजरी जणू लावण्यवतीच ती ....!
अशी नंदिनी राजीवला पहिल्या नजरेतच खूप आवडली. पाहताक्षणी प्रेमात पडणे काय असते या गोष्टीचा अनुभव राजीवने नंदिनीला पाहताच घेतला. पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. राजीवला रोजच्या कामात सगळीकडे फक्त नंदिनीच दिसू लागली. नंदिनीचे वागणे बोलणे सगळेच त्याला खूप मनापासून आवडू लागल्या होत्या.
हळूहळू नोट्सच्या निम्मिताने नंदिनी देखील राजीव सोबत बोलू लागली. त्यांची मैत्री वाढीस लागली. राजीवला आपल्या मनातील भावना नंदिनीला सांगायच्या होत्या पण त्यामुळे नंदिनी आपल्यापासून दूर जाईल अशी चिंता त्याला सतावत असे. आपले प्रेम मिळविण्याच्या नादात मी मैत्रीण म्हणुन तर नंदिनीला तर गमावणार नाही ना ...?
अशा एक ना अनेक शंका-कुशंकांमुळे तो कधीच स्वतःच्या भावना तिला सांगू शकत नसे.
एक दिवस राजीव आणि नंदिनी सोबत असतानाच नंदिनीला घरून फोन आला की तिच्या बाबांना हार्ट अटॅक आलाय , तिची आई घरी एकटी होती , ही बातमी ऐकून घाबरून नंदिनी रडू लागली. राजीवने तडक नंदिनीच्या घरी जाऊन तिच्या बाबांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्यांच्या जीवावरच धोका टळला होता. नंदिनीच्या बाबांची त्याने जातीने काळजी घेतली.
या घटनेमुळे नंदिनी राजीवच्या आणखीनच जवळ आली. त्यांची मैत्री अजूनच घट्ट झाली. राजीवचा सहवास तिला आवडत असे. सगळ्यांसाठी नंदिनी असणारी राजीवसाठी मात्र आता त्याची प्रिय मैत्रीण नंदू झाली.
या मैत्रीत कॉलेजची दोन-तिन वर्षे भुर्रकन निघुन गेली पण राजीव मात्र त्याच्या भावना नंदिनीला कधीच सांगू शकला नाही. राजीवचे सगळेच मित्रमैत्रिणी त्याला आग्रह करत होते की तुझ्या भावना तु नंदिनीला सांगून टाक. हो नाही करता करता राजीव या गोष्टीला तयार झाला. आणि मग तो दिवस उजाडला. आज आपल्या भावना नंदिनीला सांगूनच टाकायच्या असं राजीवने ठरवले.
राजीव नंदिनीला भेटायला कॉलेजला गेला. आज बराच उशीर झाला तरी नंदिनी कॉलेजला आली नव्हती. आज पर्यंत फक्त मनात असलेल्या त्याच्या भावना तो नंदिनीला सांगणार होता. राजीवचे हृदय जोरात धडकत होते आणि त्याचवेळी कॉलेजच्या गेट मधुन त्याला नंदिनी येताना दिसली. ती अगदीच खुश दिसत होती. ती धावतच राजीव कडे आली आणि बोलू लागली ....
राजीव ...., मला तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे....! सगळ्यात पहिल्यांदया फक्त तुलाच सांगायचीय ....कारण तू माझा खूप जवळचा मित्र आहेस ना ....!
राजीव :- बोल ना ..नंदू , मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे ...,पण आधी तु सांग पाहू ... लेडीज फर्स्ट .....
नंदिनी लाजून बोलू लागली ...... ,अरे आज अवनीश सोबत लग्न ठरले माझे ......! बाबांच्या ऑफिस मधे नेहेते काकू काम करतात ना. त्यांच्या भावाचा मुलगा ......
मोठा बिझिनेसमॅन आहे. दोन दिवसांपूर्वीच कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. घरचे सगळेच खूप खुश आहेत. सगळेच काही ठरले की सगळ्यात पहिले तुलाच सांगेल असं ठरविले होते मी .....
राजीव जागीच थबकला होता. अंगावर विज कोसळावी असा प्रहार झाला होता त्याच्यावर नंदिनीच्या बोलण्याने ......, तो निशब्द झाला होता. त्याचे पहिले प्रेम अधुरेच राहिले होते.
नंदिनी बोलू लागली ....अरे राजीव .., तु पण काहीतरी सांगणार होतास ना मला ...सांग ना ....
आपल्या डोळ्यातले अश्रु लपवत राजीव म्हणाला ......अग नंदू ..., काहीही विशेष नव्हते. खूप आनंद झाला मला ही गोड बातमी ऐकून .......घरचे सगळेच खुश आहेत असं म्हणतेस नंदू ......पण तु खुश आहेस ना .....?
नंदिनी :- इश्य.......अवनीश सारखा इतका छान नवरा मिळतोय ....मीच काय ....कोणतीही मुलगी खुश होणारच.....! आईबाबांच्या निर्णयाविरुद्ध मी कधी वागले नसतेच राजीव ...पण अवनीशला पाहून सगळे सोपे झाले. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर ' दिल मे कुछ कुछ होता है ' अशी फीलिंग आली रे ...
नंदिनी लाजून बोलत होती.
पहिल्याच भेटीत पहिल्यांदा नंदिनीला पाहून तिच्या प्रेमात पडलेला राजीव मात्र निशब्द झाला होता. नंदिनी सोडून दुसऱ्या कुठल्याही दुसऱ्या मुलीचा विचार सुद्धा तो करू शकत नव्हता. पण नंदिनीचे सुख जर अवनीश सोबत असेल तर मी त्यांच्या आयुष्यातून निघुन गेलेच पाहिजे, असं राजीवने ठरवले.
त्यादिवसांनंतर राजीव ते शहर सोडून त्याच्या नंदूला सोडून , स्वतःच्या अव्यक्त भावना स्वतःसोबत घेऊन कायमचाच निघुन गेला. तिच्या आठवणी , तिचा हट्ट , तासतास चालू असणारी नंदूची बडबड , तिचे रुसवे-फुगवे , तिच्या सगळ्या सुंदर आठवणी आणि त्याबरोबरच तिचे त्याच्यावर नसलेल्या प्रेमाच्या दुःखद भावना सगळेच स्वतःसोबत घेऊन राजीव निघुन गेला होता. नंदिनीने त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो तिच्या आयुष्यात unreachable झाला......तोही कायमचाच....!
क्रमश:
नंदिनीचा अवनीश सोबतचा संसार कसा असेल ? राजीव अचानक कुठे निघुन गेला ..? हे सगळेच जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.
भाग 2 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixel आणि google
✍©️ जया पाटील

1 Comments
Chan kaths
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box