जनरेशन गॅप .. !

जनरेशन गॅप ... !

✍©️जया पाटील 



कोकणातील एका गावात लहानाची मोठी झालेली अनघा तिच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी. आईबाबांच्या 'आंखो का तारा' , लाडोबा म्हणजे अनघा. तिच्या आईबाबांनी कधीही मुलगी म्हणुन तिला फार बंधने लादली नाही. अगदीच मुलाप्रमाणे तिला वाढवले. त्यामुळे गावाकडे वाढली असली तरी तिला फार मोकळ्या वातावरणाची ,स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याची सवय होती.  


आईबाबांनी दिलेल्या मोकळ्या वातावरणाचा मात्र अनघाने कधीही गैरफायदा घेतला. ती अतिशय गुणी आणि समजूतदार होती. तालुक्याच्या गावाला तिने आपले ग्रॅजुएशन पूर्ण केले. आता वेळ आली होती वरसंशोधनाची ... !


तिच्या बाबांनी सर्वयोग्य अभिषेक सोबत तिचा विवाह खुप धुमधडाक्यात लावला. अभिषेक देखील खुप गुणी मुलगा. अभि, त्याची आई लता, बाबा विनायकराव साने , लहान बहीण रिया, आजी आणि आजोबा अशा सहा माणसांचा राबता होता त्याच्या घरात. अनघाच्या येण्याने आता त्यांचे सुंदर असे सप्तकोनी कुटुंब झाले होते.


अनघाचे लग्नानंतरचे नव्याचे नवीन दिवस खुप छान गेले परंतु त्यानंतर मात्र तिला लक्षात आलेले की अभिच्या आजी खुप कडक शिस्तीच्या आणि जुन्या विचारांच्या होत्या. सगळ्यांच गोष्टी वेळेवर आणि नियमाप्रमाणे झाल्या पाहिजे असा त्यांचा कडक दंडक होता.  


एक दिवस अनघाला झोपेतून उठायला उशिरा झाला आणि ती अंघोळ न करताच स्वयंपाकघरात गेली तर आजींनी अख्खे घर डोक्यावर घेतले. आजींचा तो अवतार पाहून अनघा घाबरलीच. लताताईंनी तिची बाजूला सावरली. आता हे नेहमीचेच झाले होते. लताताई मात्र तिची बाजू सांभाळून घेत होत्या. त्यांचा अनघाला खुप मोठा आधार होता. लताताई स्वतःदेखील आजींना खुप घाबरत असत. त्यांचा एक शब्द देखील त्या खाली पडू देत नसतं.  


अभि आणि रिया मध्ये पण आजी नेहमीच अभिची बाजू घेत असत त्यामुळे रिया हिरमुसत असे. रियाला बोललेले देखील अनघाला आवडत नसे कारण बऱ्याच वेळा या वादात चुकी अभिची असे.


हळूहळू दिवस पुढे जात होते. अनघाने गोड बातमी दिली. त्यामुळे घरातले सगळेच खुश झाले. लता ताई तिची खुप काळजी घेत होत्या. आता अनघाला सातवा महिना सुरु झाला होता.


त्यांनी तिचे डोहाळेजेवण मोठ्या थाटात केले. 

आता वेळ आली होती ' पेढा येणार की बर्फी येणार ' या खेळाची .... !


रियाने अनघाचे डोळे रुमालाने झाकले आणि अनघाने निवडली बर्फी .... मग काय सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला .


शेजारच्या लेलेकाकू अनघाला बोलल्या ...


अभिनंदन अनघा ... , बर्फी निवडलीस तु ... म्हणजे लक्ष्मीचे आगमन होणार तुमच्या घरी .... !


एकाएकी आजी भडकल्या .... चूप बसायचं हं .. लेलेबाई ... तिने बर्फी काढली असली तरी पहिली मुलगीच होईल कोणी सांगितले तुम्हांला ...?


अनघाने हे सगळे बोलणे ऐकले , तिला वाटले आपल्याला पहिला मुलगा नाही झाला तर आजी खुप चिडतील ...तिला त्याच गोष्टीची भीती वाटत राहिली.


मुलगी होईल की मुलगा या भीतीने अनघा आता खुप शांत राहू लागली. त्या मानसिक ताणामुळे तिला ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला. 


एक दिवस रात्री तिला बाळंतकळा सुरु झाल्या . ताबडतोब लताताई आणि अभि तिला घेऊन हॉस्पिटलला गेले.अनघाची परिस्थिती खुप वाईट होती.  


अनघासमोरच डॉक्टरानी सांगितलं ..... 


आम्ही आई किंवा बाळ दोघांपैकी एकच कोणाला वाचवू शकतो .. कोणाचा जीव वाचवायचा ते तुम्ही सांगा...?


क्षणाचाही विलंब न करता लताताई बोलल्या .


आईचा जीव वाचवा ....


अनघाला ते ऐकून खुप रडू आले आणि लताताईंचा आदर वाटला. 


अनघा सुद्धा एक आई होती म्हणुन मनोमन तिने देवाला प्रार्थना केली .... 


देवा , या जगात येण्यापूर्वी माझ्या बाळाचा जीव नको घेऊस रे ... ! मला त्रास झाला चालेल ..पण माझ्या बाळाचे रक्षण कर.


दैव बलवत्तर म्हणुन अनघा आणि तिचे बाळ दोघांचाही जीव वाचला. अनघाने एका सुंदर परीला जन्म दिला. सगळ्यांना खुप आनंद झाला .


पण अनघाच्या मनात मात्र अजूनही भीती होती.

लताताई तिला भेटायला तिच्या रूम मध्ये गेल्या ... तेव्हा अनघा त्यांना मिठी मारून बोलु लागली ..


थँक्स यू आई ... , तुमच्यासाठी मी इतकी महत्वाची आहे आणि सॉरी आई ..., मी तुम्हाला पहिला नातू नाही देऊ शकली.


आता आपल्या आजी नाराज होणार आणि माझ्यामुळे तुम्हाला देखील त्यांची नाराजी सहन करावी लागणार ..


लताताई बोलु लागल्या ... , 


अगं काय बोलतेस अनघा,  तु तर माझी इतकी गोड मुलगी आहेस. तु महत्वाची असणारचं ना आमच्यासाठी .... !


अग नातू काय आणि नात काय .... ? आजी होण्याचा आनंदच खुप वेगळा असतो.


अगं साक्षात लक्ष्मी आली आहे आपल्या घरात ....


आणि आजींचे म्हणशील तर त्या थोड्या हट्टी आहेत गं बाळा ... पण मनाने खुप चांगल्या आहेत.


तु अजून नवीन आहे. मी जेव्हा नवीन लग्न करून आले तर मला देखील अशीच भीती वाटायची आईंची पण त्यांच्या या कडक शिस्तीत पण माया लपलेली आहे हे हळूहळू जाणवू लागले मलाही बाळ अनघा  ... !


अगं आजीनी शिस्त नसती लावली तर घरात कोणालाच चांगले वळण नसते लागले. मोठ्या माणसांची आदरयुक्त भीती आवश्यक असते गं ... !


आणि आजींच्या रागाचे तु टेन्शन नको घेऊस ....

होईल सगळे नीट ..तु तुझी आणि आपल्या परीची काळजी घे.


अनघा आणि लताताईंचे बोलणे आजी दरवाज्यातून ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तितक्यात नर्स बाळाला घेऊन आली. आजी बाळाला हातात घेऊन अनघा जवळ जात म्हणाल्या....


बाळा परी ..... तुझी आई खुप घाबरते गं मला... मला सांग...  इतकी वाईट आहे का तुझी पणजी आजी ?  हिटलर सारखी दिसते का ...?

सांग पाहू परी ...?


अनघा आणि लता... पोरींनो मला माफ करा.

माझ्या बंधनांमुळे तुम्हाला इतका त्रास होत होता हे मला कधीच जाणवले नाही.  


अगं घरोघरी .. , म्हाताऱ्या माणसांना अडगळ समजतात पण माझ्या घरी सगळेचं माझा किती आदर करतात पण मला मेलीला मात्र माझी शिस्त आणि परंपरा महत्वाच्या होत्या .. तेही माझ्या जवळच्या माणसांपेक्षा जास्त  .... !

काळानुसार आपण बदल स्वीकारायला हवा ..हे मात्र माझ्या लक्षातच आले नाही कधी ... !


दहाव्या वर्षी लग्न करून या घरात आले.. आईचे  प्रेम माहीतच नव्हते. सासूबाई कडक शिस्तीच्या ... त्यामुळे त्यावेळेस पासून शिस्त आणि परंपरा, नियम सगळ्यांची  सवय लागली .. ती आजतागायत... !


लता लग्न करून आली पण पोरगी गुणाची म्हणुन ती सगळेच ऐकत आली माझी ... अनघा पण तशीच ...


पण मी मात्र ऐकून घेणारी माणसं मिळाली म्हणुन  ऐटीतच राहिली नेहमी ... माझी हिटलरगिरी काही थांबली नाही ...!


मला खरेच माफ करा गं पोरींनो ....! 🙏


लता आणि अनघा बोलु लागल्या ..अहो आजी काय बोलताय ..... तुमच्या शिस्तीमुळे आम्ही आज इतके सद्गुणी आहोत.तुम्ही आमची माफी मागुन आम्हाला लाजवू नका ..


आजी परीला सांगु लागल्या... परी बाळा.. , आता जर तुझी पणजी आजी चुकली ना ... तर तु लगेच  शिक्षा करायची हं आजीला ..... !


आणि परीला छातीशी कवटाळून आजी मनमुराद हसल्या ... अनघा आणि लताताई देखील दिलखुलास हसत होत्या.


हे सगळे बोलणे अभि, विनायकराव आणि आजोबा ऐकत होते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 


जनरेशन गॅप की काय म्हणतात ना .....

अहो म्हणजे दोन पिढ्यानंमधली तफावत ... ती मात्र त्यांना दिसतच नव्हती ... सानेंच्या चारही पिढ्या आज दिलखुलास हसताना त्यांना दिसत होत्या. 


या चारही पिढ्यांमधे अंतर कुठेही नव्हते होते ते फक्त निरपेक्ष प्रेम ....! कोणत्याही किंमतीत न मोजता येणारे ..... !


वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा.


फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील








Post a Comment

0 Comments