काय करायचं ह्या बायकांचं.. 🤔🤔

काय करायचं ह्या बायकांचं.. 🤔🤔

© Velvet Kavisha

झालं काय की, माझ्या लेकीच्या शाळेतील मुलांच्या आयां. आता त्यात बऱ्यापैकी भूमीपुत्रांच्या बायका. जमिनी विकून अचानक श्रीमंती आलेली. आधीच्या पिढ्या अशिक्षित असल्या तरी नवीन पिढीला शिकवण्याची धडपड. प्ले ग्रुप दिड तासांचा. मुलं रडतात म्हणून शाळेने पालकांना थोडे दिवस थांबायला सांगितलेलं. त्यामुळे शाळेबाहेरच्या कट्ट्यावर बसायचो सगळ्याजणी. गप्पा त्याच. सासू, नणंद आणि नवरा... 


सारखं एकाच विषयावर बोलून कंटाळा कसा येत नाही. म्हणजे त्यांच्याशिवाय आपलं काही अस्तित्व असू नये का..?? कधी बोलणार स्वतः बद्दल..?? कधी ओळखणार स्वतःला..?? की अशाच मरणार नात्यांचा दुस्वास करत...?? पण त्या तरी काय करणार कदाचित त्यांना माणसंच तशी भेटली असतील... कधी कधी वाईटही वाटतं. आपल्याला चांगली माणसं लाभलीत म्हणून आपल्याला त्यातली तीव्रता कळत नसेल. पण जो ते भोगतो त्याला माहिती त्या व्यथा... जाऊ दे विषय खुप खोल आहे... असो. 


तर्रर्रर्र... व्हॉट्सऍप ग्रुप बनला. आता होतं काय की नविनच कोणाचा नंबर सेव केला की मस्त मस्त फोटो डीपीला ठेवायचा रिवाज असतो. 😉😉 तसंच मग स्टेट्समध्येही हलचल. सुंदर सुंदर फोटो. 😍😍  आपण बुवा सुंदर मनाच्या मैत्रिणींचे फोटो पाहून खुशच होतो. जास्त खोलात जातं नाही. 


एके दिवशी मनिषाने फोटो टाकले स्टेट्सला. ती कोणाच्यातरी लग्नाला गेलेली. लगेच सुषमाचा मला मेसेज... 


" तु मनिषाचे स्टेट्स पाहिलेस का..?? " सुषमा.


"हो. मस्त दिसतेय ना एकदम. भारीच.." मी


"तिच्या गळ्यातलं गंठन पाहिलंस का..?? मागे म्हणत होती ती की अठरा तोळ्यांच आहे..आणि ती साडी आहे ना ती पस्तीस हजारांची पैठणी आहे...मी स्क्रीनशॉट काढून झूम करून पाहिले गं फोटो. आता तशीच पैठणी आणि गंठन घेते की नाही बघ दिवाळीला..." सुषम  


"हो का..?? असेल बाई. मी नाही बघितलं. गंठन ही नाही आणि साडी ही. पण मनिषा खुप सुंदर दिसत होती तेवढं पाहिलं." मी म्हटलं. 


"तू तर वरडोळीच आहेस. आंधळी एक नंबरची. कुठे लक्ष असतं तुझं. तुला साधे साडीचे प्रकार नाही माहिती...!! पाटल्या, तोडे, बांगड्या, कंगन ते ही नाही कळतं तुला. चिंचपेटी, ठुशी, मोहनमाळ, गोफ, चपलाहार, बोरमाळ, लक्ष्मीहार, सर, राणी हार यांच्याशी तरी तुझा दुरवर काही संबंध असेल असं वाटतं नाही मला.. मी तरी तुझ्याशी का बोलतेय..!!" सुषमा वैतागलीच एकदम.  


आता यात माझा काय दोष..?? मी माणसं फक्त पारखून जोडते... खरी खोटी ओळखून. साड्यांच्या बाबतीत म्हणाल तर मी माझ्या लग्नातला सगळ्या साड्या आदिवासी पाड्यावर नेऊन दिलेल्या आहेत.  हजार दोन हजारची साडी म्हणजे लै भारी. शेवटी मांजरपाटातच जायचं आहे. तेव्हा कोणी पैठणी देणार आहे होयं??  किती आवडीची पैठणी आणि व्यक्ती असली म्हणून..!!  


बाकी दागिने पितळेचे, बेनटेक्स किंवा सोन्याचे असोत,  ज्याला घालायचे आहेत तो बघून घेईल. आम्हां काय त्याचे...🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️


जया म्हणजे वेगळंच प्रकरण. सगळ्यांना अगत्याने घरी बोलवणार. चहापाणी झालं की, एक एक वस्तू दाखवायला सुरुवात करणार. आता एखादी वस्तू कोणी आवडीने दाखवली की मी "छानच" म्हणते. आपण का दुखवायचं कोणाला..?? प्रत्येक स्त्री रक्ताचं पाणी करून संसारात भर घालत असते ते काय माहिती नाही होय मला..!! तर जयाच्या कोणत्याही वस्तूला "छान" म्हटलंत ना की,  ती लगेचच त्या वस्तूची किंमत सांगणार. बरं तेवढ्यावरच न थांबता ती कुठून आणली ते ही सांगणार. 


असंच एकदा मी घरी गेलेले. कॉफी बनवून आणली तिने. खरतंर मी चहाप्रेमी पण कोणी प्रेमाने दिलेली कॉफी ही चालवून घेते. पिऊन मग ट्रेमध्ये ठेवला तसं जयाने प्रश्न केला..


"कशी झालीय कॉफी..?? " जया. <


"एकदम जबरदस्तच..!!"  मी.


"है ना...?? माझी कॉफी खुप छानच होते. अग आमच्या यांचा एक मित्र केरळचा आहे. त्याचं फार्म आहे कॉफीचं.. तिकडून एकदम ताजी कॉफी आणून देतो तो..बाजारभावापेक्षा चार पैसे जास्तच देतात हे त्याला...  उगाच नाही इतकी छान लागत.." जया..


"हो का..?? खुप छान गं... मस्तच एकदम ओरिजिनल कॉफी.. " मी


"तुला सांगते एवढी छान कॉफी, तूला कॉफी शॉपमध्ये पण मिळणार नाही.." जया


अशावेळी माझ्या पोटात मळमळतं. मी एकदा जयाकडे, एकदा माझ्या पोटाकडे आणि एकदा रिकाम्या मगकडे पाहिल. पोटात गेलेली कॉफी हिच्या मगात ओकले तर  हिला खुपच वाईट वाटेल. कशाला दुखवायचं उगाच कोणाला म्हणत खुप सुस्वच्छ विचार केला. नेहमीप्रमाणे बळेच हं हं आणि बरं बरं म्हणून कशी बशीत वाचले ते देवालाच माहिती....


तसं हल्ली मी मैत्रिणींच्या घरी जाणंच टाळते. कारण माझं असं ठाम मत आहे की, ज्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी आपण जातो ना ती आपल्याला मैत्रीण म्हणून भेटतंच नाही. तिच्या घरी ती एक आई, एक पत्नी, एक सून आणि त्या घरची नसलेली मालकीण या रुपात भेटते. त्यापेक्षा मस्त कुठेतरी बाहेर भेटावं. छान चहा-कॉफी मागवावी. TTMM करावं. गप्पा माराव्यात आणि मस्त हसत हसत वेळ सार्थकी लावल्याच्या आनंदात घरी निघून यावं. हा आनंद खुप काळ टिकतो. 


एकदा सगळ्या मिळून हेमाच्या घरी गेलेलो. मुलाचा वाढदिवस होता तिच्या. तिचं ड्युप्लेक्स घर. फुल्लं फर्निश्डं. सगळा एकदम तामझाम. ती ही सगळं दाखवतं होती. हे अमुक हे तमुक... आमची रेखा बिथरली. म्हणाली, "आपल्या घरी कधी गं यायचं असं ऐश्वर्य..?? देव देतो त्याला खुप देतो. नाहीतर नाहीच देत एखाद्याला."


अशावेळी मैत्रिणीला समजवावं लागतं. कारण मैत्रीण म्हणून आपली ती नैतिक जबाबदारी असते. तिला म्हटलं.."बाय गं कर्मानुसार प्राणी पडती देशी अथवा विदेशी... जर तुझ्या नशिबात असतं तर तु नीता अंबानींच्या पोटी जन्मली असतीस.. किंवा गल्फ कंट्रीमध्ये ही... पण तसं नाहीये.. जे आहे ते गोड्डं मानून घे.. दुसऱ्याचं घर, नवरा आणि ऐश्वर्य कितीही चांगले असलं तरी ते  सहसा भोगू नये.. शास्त्र असतंय ते..." असो.


आमच्या लहानपणी मोठ्या बंगल्यांच्या फुशारक्या मारणारे आता जेव्हा भुताटकीसारखे राहतात आणि "घर खायला येतं गं" म्हणतात, तेव्हा गलबलतं काळीज. एकटेपणासारखं दुःख नाही दुसरं. असो. 


मागे एकदा ग्रुपमधल्या मैत्रिणींनी "नैनिताल" सहल ठरवली. धास्तावलेली निर्मला म्हणाली, "वर्षा काय गं करायचं..?? कुठून आणायचे गं एवढे पैसे.. खुप फोर्स करताहेत गं सगळ्याजणी. नाही येत म्हटलं तर काय वाटेल त्यांना..तु काय सांगितलंस...?? तुला फोर्स नाही केला का..??"


"काही नाही सांगितलं गं. त्यांना म्हटलं, 'सध्या घरी उंदीर उपाशी मरताहेत माझ्या..... त्यांची काही सोय झाली की मग बघू..." मी समजावून सांगितले. <


सगळी सोंग आणता येतात. पैशाचं कुठून आणायचं.. ??? 


एका मैत्रिणीला बर्थडे गिफ्ट द्यायचं होतं. नवरा म्हणाला "कायमस्वरूपी लक्षात राहिलं असं काही दे!!" अय्यो.. मै दिल सें बहोत अच्छ़ी हुँ पर दिमाग का भरोसा नै ना बाब्बो... आयला कधी सटकलं आणि काही गडबड झाली मैत्रीण तर ते लक्षात राहणारं गिफ्ट बघून रोज दोन वेळा तरी रडेल ती...!! त्यापेक्षा आपल्या लिखित स्वरूपात फेसबुक वर दिलेल्या शुभेच्छा बऱ्या..!! नको असलेली पोस्ट हाईडबिईड करता येते.... 🙆🙆


माझ्या नादी फारसं कोणी लागत नाही. शेत, जमीन जुमला, बंगला गाडी आणि श्रीमंतीच्या कोणी फुशारक्या मारू लागलं की मी सरळ जगाचा नकाशा काढते आणि दाखव बाई तुझी प्रॉपर्टी यावर. बघूनच घेता येईल एकदा.. नाही का..?? जिथे भारत देशच तीन इंच दिसतो तिथे हजार एकर जमिनीला कुठे थारा...🙊🙊 बाकी जैसी जिसकी सोच...।।।


बाब्बो.... किती काय काय लिहून ठेवलं मी.  ह्या तर कथाच झाल्या की मोठेपणाच्या आणि व्यथा झाल्या कोत्या मनाच्या... काय बोलायचं रावं...!!!


तसं माझं गेली दोन वर्षे जरा बरं चाललंय. लिखाणामुळे खुप छान छान मैत्रिणी भेटल्या. काही अगदी जवळच्या झाल्या आहेत. फायनान्स, नवरा, सासू आणि नणंद या गोष्टींवर कोणी बोलत नाही. इथे प्रत्येक मैत्रीण मनाने मनाशी जोडली गेलीय. थोडंस बोलून ही दुःख हलकं होतं. बरं वाटतं त्यांच्यात रमायला. जिथून भेटलो तिथून पुढे.. ना भूतकाळ ना भविष्य. वर्तमानात जगायचं. भारी वाटतं रावं एकदम.... क्युं की मैं आज में जीती हुँ...।।।💞💞  


जिथे जमतं तिथे खुप छान जमतं. सगळ्या मर्यादा गुंडाळून ठेवल्या जातात. बऱ्याचदा मैत्रिणींशी फोनवर बोललं जातं. खुप बोलणाऱ्या मैत्रिणीशी खुप बोलणं होतं... दोघीही बोलत राहतो. ऐकायचं नाव नाही. "हं तु बोल आधी" म्हणत दोघी बोलायच्या थांबतो. "नाही तु बोल गं.." म्हणत पुन्हा दोघी सुरु....तास जातो आणि महत्त्वाचे शेवटी टायपूनच सांगाव लागत...🙆🙆 कहानी हर फ्रेंड की...कहानी फ्रेंडशिप की... 😀😀😀

 


मैत्रिणींनो, तुम्हांला ही अशा मैत्रिणी म्हणवणाऱ्या स्त्रिया नक्की भेटल्या असतीलच. तुम्हाला काय वाटतं तेव्हा..?? किंवा तुम्ही काय करता अशावेळी. तुम्हांलाही प्रश्न पडतो का "काय करायचं या बायकांचं..???" तुमचा अनुभव नक्की शेअर करा. नसेल शेअर करायचा तर सांगू नका, पण असे सिलॅबस बाहेरचे प्रश्न ऑप्शनला नक्की टाका म्हणजे डोक्याचं दही होत नाही....😎😎


सदर साहित्याचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. निनावी किंवा कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावावर खपवलेलं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..


© Velvet Kavisha

Post a Comment

2 Comments

  1. वाह ! काय लिहिलयस ग वर्षा!! तुझ्या खुमासदार शैलीला सलाम.. बाकी अशा मैत्रीणींना तुच समजवू जाणे..माझ्यासाठी हे कायमच out of सिलॅबस .

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box