मसूर बिर्याणी 😋😋

#मसूर_बिर्याणी 😋😋


✍©️जया पाटील 





प्रत्येक गृहिणीच्या मनातला एकच प्रश्न .. आज जेवायला बनवायचे तरी काय 🤔🤔..... ? 

बरं , घरच्या मंडळीला विचारायचे ठरवले तर प्रत्येकाची एकाहून एक फर्माईश सांगणे सुरु.


अहो ,आम्हा गृहिणींना पण जीव आहे बाबांनो ...! इतके सगळे पदार्थ बनवत दमायला होते....!


सध्या तर लॉकडाउन, त्यामुळे सगळे लोक घरातच ... पण आज मात्र घरच्यांची फर्माईश पूर्ण करायची नाही असं मी ठरवूनच टाकले होते .... पण काय करणार मंडळी ...देवाने पोट दिलेय तर भूक पण तर लागणार ना ... ! मग केला मसूर बिर्याणीचा बेत .. साधा, सोपा, पौष्टिक आणि झटपट होणारा....


बिर्याणी म्हणा किंवा पुलाव पोळ्या करायचा कंटाळा आला की प्रत्येक घरात बनणारा हक्काचा पदार्थ म्हणजेच बिर्याणी किंवा पुलाव ... !


चला तर मग,  आता कृती कडे वळुया ..


सगळ्यात आधी अख्खा मसूर साधारण एक तास तरी पाण्यात भिजवून ठेवला म्हणजे तो मऊ शिजतो.


मग काय, एक- दोन हिरवी मिरची, कोथिंबीर ,कडीपत्ता , पुदिना, लसूण ,जिरे आणि अर्धा टोमॅटो (आमच्या कडे फार टोमॅटो आवडत नाही) यांचे वाटण मिक्सर मध्ये तयार करून घेतले , त्यात थोडे ओले खोबरे घातले तर वाटणाचा स्वाद म्हणजे ..आहा....!  पण माझ्या कडे ओले खोबरे नव्हते मग काय.. आहे त्यात समाधान ... !  म्हणून मग वरील साहित्यात वाटण तयार केले .  


कांदा छान उभा कापून घेतला. कुकर मध्ये छान पैकी तुपाची धार सोडली , आमच्या कडे तूप आवडते तुम्ही मात्र तेल देखील वापरू शकतात. त्यात अगदीच थोडेसे जिरे , तेजपान, चक्रीफुल,  दालचिनीचा एखाद दुसरा तुकडा, दृष्टीला दिसणार नाही इतकेच मिरी, लवंग आणि विलायची घातली.


तुपा मध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि मग मघाशी केलेले वाटण पण कुकरच्या भांड्यात घातले. वाटणाला छान पैकी बऱ्याच वेळ परतून घेतले आणि मग गाजर ,सिमला मिरची , बटाट्याचे काप आणि वाटाणे घालून परतून घेतले ...  


सगळ्या भाज्या नाही घातल्या तरी देखील चालतात पण आज कालच्या मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा ... पण आया पण मागे नाहीतच ..... कसेही करून मुलांना भाज्या खायला घालायच्या असा चंगच बांधलेला असतो प्रत्येक आईने .... मी पण त्यातलीच एक... मग काय दणकून , फ्रीझ मध्ये सापडतील तितक्या भाज्या कापून घालून टाकल्या की कुकर मध्ये ... !


या सगळ्या भाज्या परतून झाल्यावर त्यात थोडीशी हळद , धने पावडर , बिर्याणी मसाला आणि सुंदर कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घालून घेतली. 


बिर्याणी मसाला नसला तरी हरकत नाही,  त्याऐवजी गरम मसाला घातला तरी चालतो. थोडाफार जुगाड प्रत्येक गृहिणीला करावाच लागतो ...! जे असेल ते साहित्य शोधा नाही तर मग त्याऐवजी दुसरा पदार्थ वापरा .... हा सुप्त गुण तर तुमच्या माझ्या सारख्या प्रत्येक महिलेत लपलेला असतो, बरोबर ना मैत्रिणींनो ...?


कुकर मधल्या या सगळ्या मसाल्यांमधे भिजवलेला मसूर घालून घेतला. मोड आणून घेतलेला मसूर वापरला तरी हरकत नाही.

मसूर नंतर तांदूळ स्वच्छ धुवून कुकर मध्ये घातला... सगळे छान पैकी परतून घेऊन त्यात गरम पाणी घालून घेतले. तांदूळ आणि डाळ दोन  वाटी होते तर मग तिन वाटी पाणी घालून घेतले. 

अहो पण ... आपल्या स्वयंपाकाचे सार तर राहिलेच ...ते म्हणजे मीठ ... मग काय चवीप्रमाणे नमक - शमक पण घालून घेतले. 

मोठ्या गॅस फ्लेम वर दोन शिट्ट्या काढून घेतल्या... कुकर ची संपूर्ण वाफ काढून घेतली ... वरून सुंदर कोथिंबीर पसरवली आणि मसूर बिर्याणी तयार ... ! 


छान पैकी बूंदी आणि काकडीच्या रायत्या सोबत सर्व केली .... मग काय.... सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला बिर्याणी वर 😋😋 .... !


मी ही बिर्याणी one pot meal म्हणून केली परंतु तांदूळ वेगळे शिजवून आणि मसूर मसाल्यांमध्ये वेगवेगळे शिजवून लेअर लावून .. चांगला दम देऊन😀 ....( म्हणजेच एक चांगली वाफ काढून ) पण करता येते ही बिर्याणी ... पण काय आहे ना मैत्रिणींनो  ...भांडी स्वच्छ करणाऱ्या पण आपणच ...मग स्वताःचा त्रास वाचवायचा म्हणून हा one pot meal चा प्रपंच ... !


मैत्रिणींनो सगळ्यांनी हेल्दी खा .. आणि  निरोगी रहा ... !


चला तर मग ... तुम्हाला कसा वाटला माझा हा प्रयत्न .... माझी बालमैत्रीण प्राजक्ताच्या सांगण्यावरून हा रेसिपी शेयर करण्याचा प्रयत्न ...


वाचकहो, माझे हे लेखन आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा/लेख शेयर करायचा झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो  - माझ्या फोन गॅलरीतून साभार 



✍©️ जया पाटील 




   



 





Post a Comment

0 Comments