एक Valentine असाही .. !

एक Valentine असाही .. !

✍©️जया पाटील 



अरे अनिकेत , किती वेळ आहे अजून , तीन-चार वेळा फोन केला मी ...पाचच मिनिटात निघतो असे सांगतोय .., कधी निघणार ऑफिसातून ? खूप उशीर झालाय , वीजा कडकडताय .. पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे , निघ लवकर , मला काळजी वाटतेय रे ... अवनी अनिकेतला फोन वर आर्जव करून सांगत होती.


गप्प बस ग अवनी , काय सारखे सारखे फोन करतेय , माहिती आहे ना .. मी कामात आहे म्हणून.. , तुला घरी बसून सांगायला काय जातेय ...येईल मी घरी माझे काम संपले की ..आता पुन्हा पुन्हा फोन करून मला डिस्टर्ब करू नकोस ... अनिकेतने अवनीचा फोन रागात कट केला.


अनिकेत आणि अवनी दोघांचाही प्रेमविवाह. अनिकेत आणि अवनी एकच कंपनीत जॉबला होते. तिथूनच मैत्रीची सुरुवात झाली आणि कालांतराने ती मैत्री प्रेमात बदलली. 

अवनी इतकी सुंदर , शिकलेली , सर्वगुणसंपन्न , independent  त्यामुळे अनिकेतच्या आईबाबांचा तिला नकार देण्याच्या प्रश्नच उदभवत नव्हता.


अवनीच्या आईबाबांना देखील पहिल्याच भेटीत अनिकेत अगदी मनापासून आवडला. अवनी आणि अनिकेत दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे , त्यामुळे आपल्या अवनीला तो खूप सुखात ठेवेल हे जाणून अवनीच्या आईबाबांनी देखील अनिकेत आणि अवनी दोघांच्याही लग्नाला होकार दिला. 


अवनी आणि अनिकेत दोघांचाही शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. माप ओलांडून अवनी देखमुखांच्या घराची सून झाली. लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या अवनीच्या येण्यामुळे अनिकेत  आणि त्याचे आईबाबा सगळे आनंदून गेले. अवनी होतीच मुळात इतकी गोड की सगळेच तिच्या प्रेमात पडतील.  


लग्नानंतरचे काही दिवस मन मोहून टाकणारे जादुई दिवस असतात. अवनी आणि अनिकेतचे पण तसेच काहीसे झाले होते. एकेमकांच्या सोबतीत ते खूप आनंदात होते. अवनीच्या आपुलकी आणि प्रेमाने वागण्यामुळे अनिकेतचे आईबाबा देखील खूप आनंदी होते. सारेच काही आलबेल होते. तशातच अवनीने गोड बातमी दिली. लवकरच मांडीवर नात-नातू खेळवता येईल हा विचार करूनच अनिकेतच्या आईबाबांना आभाळ ठेंगणे झाले होते.  


गर्भारपणात देखील अवनी ऑफिसचे काम सांभाळत होती परंतु शेवटी शेवटी तिच्या प्रेग्नसी मध्ये कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे तिने काही महिने रजा घेतली. अनिकेत आणि अवनी दोघांचीही संसारवेल फुलून आली. त्यांना एक गोड मुलगा झाला. त्याचे नाव अमोघ ...! 


अवनी आणि अमोघच्या प्रकृतीची मात्र डॉक्टरांनी खूप काळजी घेण्यासाठी सांगितली कारण दोघांचीही तब्येत थोडीशी नाजूक होती. अमोघच्या काळजीने अवनीने नोकरीचा राजीनामा दिला. अवनी अमोघच्या बाललीलांमध्ये हरवली. त्याच्या खोड्या ,त्याचे बोबडे बोल, त्याची मस्ती या सगळ्यात तिला संपुर्ण दिवस अपुरा पडू लागला. अनिकेत , त्याचे आईबाबा ,अमोघ सगळ्यांची खूप काळजी घेणारी अवनी आता खऱ्या अर्थाने पुर्णपणे संसारात रमली.  


या दरम्यान अनिकेत त्याच्या करियर मध्ये प्रगती करत होता. अवनी मात्र घरसंसारात रमली होती त्यामुळे अनिकेत स्वतःवर जास्त proud फील करत होता. अवनी काय घरीच तर असते असे समजून तिला गृहीत धरू लागला होता. अवनीचा स्वभाव मुळातच समजूतदार त्यामुळे अनिकेत टेन्शन मध्ये असतो , त्याच्यावर ऑफिसचा ताण असतो त्यामुळे ती त्याचा राग सहन करत असे त्यामुळे अनिकेतचे अवनीला गृहीत धरणे खूप जास्त वाढले होते. दोघेही एकमेकांपासून मनाने दुरावले होते.


आजदेखील अवनीवर चिडून अनिकेत बाहेर  जायला निघाला त्यावेळेस अनिकेतला त्याचे बाबा म्हणाले .. 


अनिकेत अरे मित्राकडे जात होतास ना.. जाता जाता साने काकांकडे डबा नेऊन देतोस का ? अरे काकूंची तब्येत खराब आहे त्यामुळे ... अवनीचा स्वयंपाक होण्यात आला आहे. डबा पॅक झाला की तु लगेच निघ. 


डबा घेऊन अनिकेत साने काकांकडे जायला निघाला. साने काका म्हणजे अनिकेतच्या बाबांचे जिवलग मित्र. साने काकांचा मुलगा अमेरिकेत होता त्यामुळे वेळोवेळी अनिकेतचे आईबाबा त्यांना मदत करत असत. अनिकेत साने काकांकडे पोहोचला तेव्हा काका किचन मध्ये काकूंसाठी सूप बनवत होते.  


अनिकेतला पाहून काका म्हणाले ..


अरे ये अनिकेत , अवनीचा फोन होता आज , तुझ्या काकूची तब्येत बरी नाही म्हटल्यावर मीच डबा पाठवते असा हट्टच धरला तिने ... फार गुणी आहे ती .... मी तिला नाही म्हणत होतो तरी सुद्धा ऐकले नाही तिने .. शेवटी मला हार मानावी लागली तिच्या हट्टापुढे ....


अवनीला काय काम आहे ? घरीच तर असते आणि अशी रिकामे काम करत बसते. अनिकेत मनोमन विचार करत होता.


बस अनिकेत , तुला गरमागरम चहा बनवतो आणि तुझ्या काकूला सूप देऊन येतो. आजदेखील किचन मध्ये यायची तयारी होती तिची पण अगदीच दमदाटी करून आराम करायला लावला आहे तिला .. सानेकाका म्हणाले.


अहो काका , हे सगळे तुम्ही का करताय पण ? सर्व्हन्टला सांगायचे होते ना ..? त्यांनी केले असते सगळे... अनिकेत बोलत होता.


अरे बाळा अनिकेत , आपल्या हाताची चव आणि प्रेम सर्व्हन्टच्या हाताला नसणार कधीच ..!

अरे मी जेव्हाही आजारी पडतो तर रात्रभर तुझी काकू माझ्या उशाशी बसून असते. आजारी मी असतो पण अर्धा त्रास तर तिलाच होत असतो. मला हवे नको ते सगळे पाहण्यात तर तिने तिचे संपुर्ण आयुष्य वेचले आहे. त्याच्याबदल्यात मी तिच्यासाठी जे काही करतोय ते तर अगदीच शुल्लक आहे.  


तुम्ही मुले ऑनलाईनच्या जगात जन्माला आली त्यामुळे आपण सगळे काही विकत घेऊ शकतो असा तुमचा समज झाला आहे ..पण विचार कर अनिकेत,  अवनी जे तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने करते ते प्रेम , ती आपुलकी तु विकत घेऊ शकतोस ..? कधीच नाही ...


आमचे लग्न झाले त्यावेळेस घरात इतकी माणसे असायची की एकमेकांकडे नजर वरती करून बघायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. आम्हाला ही वाटायचे हे मोरपंखी क्षण आम्ही पण जगावे पण आम्ही नाराज व्हायचो नाही. त्यावेळेस असे स्मार्टफोन वगैरे काही नव्हते , तुमचा असतो ना Valentine day ... तसेदेखील काहीच नव्हते.


भाजीबाजार, देवदर्शन अश्या वेगवेगळ्या निम्मिताने आम्ही एकमेकांना वेळ द्यायचो तोच आमच्यासाठी Valentine day असायचा 

पण थोड्यावेळासाठी का असेना आम्ही सोबत घालवलेले ते क्षण , आम्ही सेलेब्रेट केलेला तो Valentine day आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जात असे.


आता तुझ्या काकूचे आजारपण देखील मी आजार म्हणून नाही तर मला तिच्यासाठी काहीतरी मायेने करता येणार आहे असे समजून हे क्षण देखील एन्जॉय करणार आहे. आयुष्यभर आपली बायको आपली आईच्या मायेने , बहिणीच्या प्रेमाने , अर्धांगिनी म्हणून आपली सेवा करत असते , एका परक्या माणसाला सर्वस्व मानून त्याच्यासाठी झटत असते ..तिला आपण काही क्षण सुखाचे नाही देऊ शकत... ?


आपण नवरे नेहमीच त्यांना गृहीत धरतो पण त्यांना देखील आपल्याकडून काही अपेक्षा असतात हेच आपण साफ विसरतो.

फार अल्पसंतुष्ट असतात रे या बायका ...दोन प्रेमाचे शब्द , थोडा आपण दिलेला वेळ पुरेसा असतो त्यांना आनंदी राहण्यासाठी ...


अनिकेत माझा एक प्रेमळ सल्ला ऐकशील ... एक  Valentine day ......दिवस कोणताही असो पण अवनी सोबत एकदा नक्की सेलेब्रेट करशील तुला तो एक दिवस वर्षभर पुरेल इतकी आनंदाची एनर्जी देऊन जाईल आणि आयुष्यभर पुरणारा सुखाचा ठेवा देऊन जाईल ....!


अनिकेत सानेकाकांकडून घरी जायला निघाला पण त्याच्या मनात मात्र तो फक्त अवनीचाच विचार करत होता. आपण किती चुकलो , अवनी नेहमी आपल्या सुखासाठी झटली आणि मी मात्र तिला कायमच गृहीत धरले या गोष्टीचा त्याला मनोमन खूप पश्चाताप होत होता. 


सानेकाकांच्या सांगण्यावरून अनिकेतने मनात निश्चित केले की दिवस कोणताही असो पण अवनीसाठी तो त्याला Valentine day सारखा special day म्हणून अवनीसोबत सेलेब्रेट करेल असे त्याने मनोमन ठरवले. येणारा रविवारचा संपूर्ण दिवस मी फक्त अवनीसोबत व्यतीत करेल त्याने ठरवले.


शनिवारी रात्रीच अवनीने लावलेला पहाटेचा अलार्म अनिकेतने बंद करून टाकला. सकाळी लवकर उठून त्याने आईच्या मदतीने  ब्रेकफास्ट तयार केला. आज संपूर्ण दिवस अवनीला वेळ देणार असल्याचे त्याने आईबाबांना देखील सांगितले. अनिकेतचा प्लॅन ऐकून आईबाबा देखील खुश झाले. आम्ही अमोघला घेऊन सानेकाकांकडे जातो. तु आणि अवनी दोघेही एन्जॉय करा असे सांगून आईबाबा निघुन गेले.


अलार्म बंद असल्यामुळे अवनीला उशिराने जाग आली. उठल्यावर टेबलवर अनिकेतने ठेवलेला फुलांचा गुच्छ पाहून अवनी खूप खुश झाली. बाजूलाच एक चिट्ठी होती. चिट्ठी ओपन करून अवनी वाचू लागली.


प्रिय अवनी ,


आज पर्यंत तुला गृहीत ठरले , तुझ्याही काही इच्छा असतील असे कधी जाणून घेतले नाही त्याबद्दल खूप खूप मनापासून sorry.......

पण आजचा दिवस फक्त तुझा असणार आहे. आजचा दिवस आपण दोघेही Valentine day म्हणून साजरा करणार आहोत ...तु रेडी आहेस ना ..?


Will u be my Valentine ..dear Avni ...?


अवनीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. अनिकेत तिचा हात हातात घेऊन म्हणाला ..अवनी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे ...please tell me ...


अवनी लाजुन म्हणाली ..yes...


अनिकेतने बनवलेला ब्रेकफास्ट करून दोघेही एक छान मूवी पाहायला गेले. अनिकेतने आज मुद्दाम कॉर्नर सीट बुक केले होते त्यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या सोनेरी क्षणांची आठवण त्याला अवनीला करून द्यायची होती. अवनीच्या डोळ्यात आज फक्त आनंदीआनंद दिसत होता. तिच्या डोळ्यातील उत्साह आणि प्रेम पाहून अनिकेतला खूप समाधानी वाटत होते. 

दुपारी त्यांच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी लंच करून ते लॉंग ड्राईव्ह वर गेले. अवनीच्या गप्पा त्यादिवशी संपतच नव्हत्या.  


लॉंगड्राइवहून येताना अवनी त्याला मंदिरात घेऊन गेली आणि म्हणाली ...देवा ..., माझ्या अनिकेतला असेच सुखात ठेव. आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत असेच सोबत ठेव ...  


अनिकेतला आज खऱ्या अर्थाने अवनीच्या मनातल्या भावना उमगत होत्या. कुठलीही अपेक्षा न करता खरे प्रेम कसे करतात हे आज अवनीकडे पाहून त्याला जाणवत होते. "युगायुगांचे नाते आपुले ,नको दुरावा. सहवासाची ओढ निरंतर, दुरावा नको " या शब्दांचे मोल अनिकेतला खऱ्या अर्थाने उमगत होते.


रात्रीचा डिनर बाहेर करून दोघेही घरी गेले. अनिकेतने अवनीसोबत डान्स करायची इच्छा व्यक्त केली. दोघेही हातात हात घेऊन डान्स करत होते. एकमेकांच्या डोळ्यात दोघेही हरवले होते .बाजूला सुरेल गाण्याचे सुर ऐकू येत होते. 


जब कोई बात बिघड जाये , 

जब कोई मुश्किल पड जाये ..

तुम देना साथ मेरा ...

ओ ..हम नवाब ..

ना कोई है ना कोई था .

जिंदगी मे तुम्हारे सिवा 

तुम देना साथ मेरा ओ हम नवाब...


हा दिवस आणि ही वेळ कधी सरूच नये असे दोघांनाही वाटत होते. एकमेकांच्या डोळ्यात हरवताना ते दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले होते. जीवनातली ही घडी अशीच राहू दे ... या ओळी दोघांच्याही मनात गुणगुणत होत्या. आपण दोघेही एकमेकांना हवेहवेसे आहोत ही जाणीव दोघांनाही नवीन जगण्याची उभारी देत होती. अनिकेत आणि अवनी दोघांनाही कळून चुकले होते की त्यांच्या दोघांचेही एकमेकांसोबत असणे किती गरजेचे होते. दोघांनाही एकमेकांच्या भावना शब्दात मांडता येत नव्हत्या पण रेडिओने त्यांचे काम सोपे केले होते. एका सुंदर गाण्याचे बोल आपसूकच दोघांच्याही मनातील भावना व्यक्त करत होते.


शब्दाविना ओठांतले कळले मला , कळले तुला 

शब्दाविना कळले मला 

ओठांतले कळले मला 


डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला ,कळले तुला 

डोळ्यांतुनी कळले मला 

हृदयातले कळले मला 


जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे 

रात्रंदिनी ध्यानी मनी मूर्ती तुझी हसरी दिसे

घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला 

झुलतो झुला स्वप्नातला 

स्वप्नातला झुलतो झुला 


तु छेडियल्या तारांतुनी जन्मास या स्वर लाभले

माझ्या - तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले 

दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला 

आनंद या जगण्यातला 

कळले मला , कळले तुला 

 

काय मग .... तुम्ही देखील सेलेब्रेट करणार ना असाच एखादा special दिवस तुमच्या जिवलगासोबत .... ?


अनिकेत आणि अवनी दोघांचाही हा Valentine day कसा वाटला जरूर कळवा. वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇




फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील









Post a Comment

0 Comments