प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं .. !
©️जया पाटील
आज सकाळपासूनच रितुचा मुड खूप खराब झाला होता , का....? तर आज निलेश आणि रितुच्या लग्नाचा वाढदिवस , परंतु निलेशला कामाच्या गडबडीत लक्षात आलं नाही आणि तो रितुला कुठलंही सरप्राइज न नेता , अहो साधं विश न करताच कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेला. रितु साठी तर तो किती मोठा गुन्हा होता.
निलेश परत आला कि आता मात्र त्याची खैर नाही असे ठरवूनच रितु तिची मावसबहिण निशा कडे निघून गेली. निलेशला कामाच्या गडबडीत नंतर लक्षात आलं आणि रितुला विश करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी त्याने रितुला फोन केला. रितु मात्र स्वतःच्या हट्टाला पेटली होती. काहीही झालं तरी निलेशला माफ करायचे नाही असे तिने ठरवूनच टाकले होते.
निशा रितुचे वागणं पाहत होती , पण रितुचा आणखी मुड खराब करायला नको म्हणून निशाने तिला त्याबद्दल काहीही विचारले नाही. रितु आणि निलेश मध्ये झालेल्या भांडणाचा निशाने छडा लावायचा ठरवला आणि रितुला न समजता तिनं निलेशला फोन लावून सगळी परिस्थिती समजावून घेतली.
निशाने निलेशला सांगितले की अजुन काहीतरी नवीन काम काढून तु अजुन दोन दिवस बाहेर गावीच रहा , रितुला कसे समजवायचं ते मी ठरवते म्हणून निलेशचा फोन ठेवला.
दोन दिवस उलटून गेले , तिसरा दिवस उजाडला तरीही रितुचा राग काही कमी झाला नाही , निलेश सोबत अजुनही तिनं अबोला धरला होता. रितु निशाला मदत करायला म्हणून किचन मध्ये गेली , निशा कसल्या तरी तयारीत गुंतलेली दिसत होती.
"कसल्या तयारीत गुंतलेली आहेस गं , निशा ताई..? मला पण सांग की , मी पण मदत करते.
निशा: काही नाही गं , रितु...आज अखिल आणि माझ्या लग्नाचा पाचवा वाढदिवस...!
अखिल कामाच्या गडबडीत निघुन गेला आणि मग काय .. मीच त्याला सरप्राइज द्यायचे ठरवले.
त्याच्या आवडीचा सगळा बेत बनवायचा ठरवला आहे मी , जसे की वरणभात त्यावर तुपाची धार , चपाती , पनीरची भाजी , शेंगदाणे चटणी , कुरकुरीत बटाटा भजी , कांदा भजी , गोड शेवया... आणि त्याच्या सगळ्यात आवडती बालुशाही आणि कलाकंद...!
निशाचे बोलणे ऐकुन रितु अगदीचं कोड्यात पडली आणि बोलु लागली....
अगं ताई , जिजुने तुला साधं विश सुद्धा केलं नाही आणि तरी तु त्याच्या साठी इतकी सगळी तयारी करते आहेस , तुला राग नाही आला जिजुचा..?
अगं, राग काय यायचा त्यात..? अखिलला कधीच नाही लक्षात राहत.. माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि इतकंच काय स्वतःचा वाढदिवस दिवस देखील लक्षात राहत नाही गं त्याच्या... कामाच्या गडबडीत असतो बिचारा..., पण जेव्हा लक्षात येते ना की अगदी गुन्हेगार असल्यासारखे वाटते त्याला.., दिवसभर माफी मागत बसेल मग माझी... आज पण लक्षात आलं ना साहेबांना , मग फोन करून माफी मागणे सुरू .. मला फार आवडतो गं त्याचा हा स्वभाव ..
रितु निशाला म्हणाली...
मी नाही हं ताई , तुझ्या इतकी समजुतदार, मी तर लगेच रागवते निलेश वर.. वाढदिवस वगैरे सगळं लक्षात असलंच पाहिजे त्याच्या ...मी नाही का लक्षात ठेवत सगळं..!
निशा - अगं रितु , तुझं-माझं केले हा व्यवहार झाला आणि प्रेमात कधी व्यवहार नसतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून अखिल गुन्हेगार ठरत नाही , लक्षात आल्यानंतर त्याने मागितलेली माफी म्हणजे देखील माझ्यावरचे प्रेमच आहे. आज खूप थकली असशील ना .. आराम कर.. त्याच्या या शब्दात देखील खरं प्रेम दिसते मला.. त्याला सरप्राइजेस देता येत नाही पण प्रत्येक सुखदुःखात त्यानं मला दिलेली साथच खूप मोठे सरप्राइज गिफ्ट आहे माझ्यासाठी .... !
रितुच्या डोळ्यात पाणी होते आणि क्षणभरसुद्धा न थांबता ती निलेशला फोन लावायला निघुन गेली.
प्रेम कुठल्याही स्वरुपात केले जाऊ शकते, त्याला सरप्राइज आणि अजुन कुठली विशेषणे लावुन मर्यादीत केले जाऊ शकत नाही.
काय मगं,तुम्हाला देखील वाटले असणारच नां...
"प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं....."
वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box