जीवनसाथी ..
✍©️जया पाटील
आपल्या डोक्यावर दहा-बारा लाकडाच्या मोळ्यांचा भार घेऊन रखमा बाजारात विकायला निघाली . दिवस मावळतीला आला पण तरी तिच्या मोळ्या मात्र फार काही विकल्या गेल्या नाही , निराश होऊन रखमा घराकडे निघाली . आज कसेपण करून शहराकडे जाण्यासाठी नवऱ्याला तयार करायचं असे मनाशी ठरवूनच ती घराकडे जायला निघाली. घरी पोहोचल्याबरोबर माय ...भूक लागली म्हणून तिची मुले तिच्या भोवती गलका करू लागली .
थोड्या वेळाने किसन म्हणजे रखमाचा नवरा पण घरी आला. किसनला रखमा ने पाणी दिले आणि बोलू लागली ....
" मी काय म्हनती धनी .., आपण बी शहराकडे जाऊया ... , चार पैकं बी गावतील .... , पोरास्नी खायाला भी येळेवर गावलं ... , चांगलं शिकाया भेटेल ..., गणू भावोजी सांगत व्हतं.... लयी काम हायती शहराकडे ......"
किसन रखमाला सांगू लागला...... " अगं रखमे .... , शहरातील माणसं लई कोत्या मनाची हायती ... , आपल्या सारख्या साध्या माणसाचा ठाव लागायचा नाही शहरामंधी ....."
किसनचा नकार ऐकून वेगवेगळ्या चार गोष्टी सांगून रखमा त्याला शहराकडे नेण्यासाठी त्याचे मन वळवू लागली. शेवटी रखमाच्या हट्टापुढे किसन ने हात टेकले आणि शहराकडे जाण्यासाठी तो तयार झाला.
किसन ने आपल्या चुलत भावाला म्हणजे गणुला त्यांच्या येण्याबद्दल कळवले. आपल्या झोपडीतील तुटपुंजा सामान आणि आपली दोघी मुले सांभाळत मजल-दरमजल करत ते मुंबईला गणुकडे पोहोचले .
आता हे आपल्या कडेच कायम राहणार की काय अशी शंका मनात आल्याने गणुची बायको पारू त्यांच्यासोबत फार काही बोललीच नाही. दोन-तिन दिवसात गणुने आपल्या मालकासोबत बोलून किसनला काम मिळवून दिले. आपल्या घरातून किसनच्या कुटुंबाचा भार कमी व्हावा म्हणुन पारूने रखमाला चार घरी धुणी-भांड्याची कामे मिळवून दिली. किसनने एक छोटी खोली भाड्याने घेतली. किसन आणि रखमाचा शहरातील नवा संसार सुरु झाला .
किसन आणि रखमा दोघेही आपापल्या कामात प्रामाणिक आणि मेहनती होते. त्यामुळे मालकांना त्यांचे काम आवडू लागले. दरम्यान रखमाला एका मोठ्या साहेबांकडे काम मिळाले. मालकीण बाई रखमाच्या कामावर खूपच खुश होती. कामाव्यतिरिक्त मालकीण बाई रखमाला आपल्या मुलांचे जुने कपडे , खेळणी आणि इतर वस्तु देखील देत होती. जुन्या वस्तुंना पाहूनसुद्धा रखमाची मुले खुश होत होते. दिवसा मागुन दिवस लोटत होते. सगळेच काही अगदी सुरळीत चालले होते.
एक दिवस नेहमीप्रमाणे रखमा काम करण्यासाठी मोठ्या साहेबांकडे गेली. त्या दिवशी मोठ्या साहेबांव्यतिरिक्त घरात कोणीच नव्हते. रखमा नेहमीप्रमाणे साफसफाई करू लागली. साहेबाचे लक्ष मात्र रखमा वरून हटत नव्हते. कमनीय बांध्याची , गव्हाळी , साधी-सुधी रखमा त्याच्या मनात भरली होती. वासनांध नजरेने तो रखमा कडे पाहत होता. रखमाला साहेबाच्या वागण्यात वेगळेपण जाणवले पण तिकडे लक्ष न देता ती आपल्याच कामात गुंग झाली. कामात गुंतलेल्या पाठमोऱ्या रखमाला मोठ्या साहेबाने घट्ट पकडले. त्याच्या त्या राक्षसी पकडीतून सुटका करून घेण्याचा रखमा प्रयत्न करू लागली. खूप प्रयत्न करून रखमा आपली अब्रू वाचवून तिथून पळून जायला यशस्वी झाली.
घरी जाताना तिच्या मनात एकच गोष्ट चालू होती की ती तिच्या सोबत घडलेला प्रसंग किसनला कशी सांगणार अथवा सांगितली तरी धनी आपल्यावर विश्वास ठेवेल का ....? अशा एका ना अनेक शंका तिच्या मनात येऊ लागल्या पण दुसऱ्या कुणाकडून ही गोष्ट किसनला समजण्यापेक्षा आपणच सांगायचं , त्याचा परिणाम काहीही झाला तरी चालेल असे रखमाने मनाशी ठरवले.
घरी पोहोचल्यावर किसन आज रखमाला लवकर घरी परतलेला दिसला ... , त्याला घट्ट मिठी मारून रखमा रडू लागली आणि रडता रडता बोलू लागली ....
" धनी .....मला चुकीची समजु नगा सां...... , पण मोठा सायब लय वंगाळ माणूस हायती ... , आज त्याने माया सोबत जबरदस्ती करू पायली....., पण मायं नशीब थोर म्हणून म्या सुटून पळून आली .....धनी ......"
आणि रखमा धाय मोकलून रडू लागली. सगळ्यात प्रथम किसनने रखमाला शांत केले आणि मोठ्या साहेबाला जाब विचारायचं ठरवले.
दुसऱ्या दिवशी किसन आणि रखमा घडलेली हकीकत मालकीण बाईला सांगण्यासाठी बंगल्यावर गेले. आपल्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मालकिणीला रखमाच्या कोणत्याच गोष्टीचा विश्वास नव्हता. रखमा पैशासाठी हे सगळेच बिनबुडाचे आरोप लावते आहे असे तिचे मानणे होते.
दहा हजारांचे एक नोटांचे बंडल किसनच्या अंगावर फेकून मालकिणीने त्यांना चालते व्हायला सांगितले. ते पैशाचे बंडल परत करत किसन बोलू लागला ...
" मालकीणबाई ....पैका नग सां ...... , माया रखमेच्या अब्रूला असं पैकात तोलू नगा सां ..... , मले तुमचा एक पैका बी नग ..... , असे बोलुन किसन आणि रखमा तिथून निघाले.
कितीही संकटे आली तरीही रखमाला न्याय मिळवून द्यायचाच. आपल्या रखमाच्या विरुद्ध झालेल्या अन्याया विरुद्ध किसनने लढा देण्याचे किसन मनाशी ठरवून टाकले.
मालकीण बाईने केलेला अपमान गिळून किसन आणि रखमा बंगल्यावरून आपल्या खोलीवर जाण्यासाठी निघाले. मोठ्या साहेबाला शिक्षा मिळवून देण्यासाठी किसन करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. मोठ्या साहेबाच्या सांगण्यावरून किसनच्या मालकाने त्याला कामावरून देखील काढून टाकले.
रखमाचे काम तर आधीच बंद झाले होते. गणु आणि पारुने देखील आपल्या कामावर दगा येऊ नये म्हणून किसन आणि रखमाची साथ सोडली होती. मोठ्या साहेबाच्या मोठ्या लोकांसोबत ओळखी होत्या त्यामुळे त्याच्याविरुद्ध बोलायची कोणाचीच हिम्मत नव्हती. किसन हताश झाला होता. रखमाला न्याय मिळायलाच हवा , त्याच्या या निर्णयावर मात्र तो ठाम होता.
एक दिवस त्याची भेट गोदावरी सोबत झाली. गोदावरी म्हणजे पूर्वाश्रमीची किसनच्या गावाची गोदा होती. आईबाबांसोबत शहरात आलेल्या गोदाने लहानपणीच अशा वासनांध साहेबाचा सामना केला होता पण परिस्थिती पुढे न डगमगता ती वकील झाली होती. गोदावरी एक उत्तम वकील होती. स्त्रियांवर झालेल्या अन्याया विरुद्ध लढणे हेच तिच्या जीवनाचे लक्ष होते.
रखमाची केस गोदाने लढायचे ठरवले. सर्वप्रथम तिने महिला दक्षता समितीची मदत घेऊन मोठ्या साहेबाविरुद्ध केस फाईल केली पण त्या साहेबाच्या ओळखी खूप मोठ्या होत्या , परंतु किसन , गोदा आणि रखमा नेटाने सगळ्या प्रसंगांचा सामना करत होते.
साहेबांची पूर्वाश्रमीची माहिती काढतांना त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची माहिती गोदाला मिळाली पण मोठ्या साहेबाविरुद्ध साक्ष द्यायला कोणीही तयार होत नव्हते.
काही जणी घरच्यांना घाबरून गप्पा होत्या. मात्र किसन हरला नाही. त्याने त्या महिलांची भेट घेतली. रखमा आणि तुम्ही सगळ्या महिला जरा अशाच चूप राहिल्या तर नेहमीच अश्या मोठ्या साहेबांचे फावेल.
आपल्या पुढच्या पिढीसाठी , आपल्या लेकी- बाळींच्या भविष्यासाठी तुम्ही मोठ्या साहेबाविरुद्ध साक्ष द्यायलाच हवी असं किसनने त्या पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना समजावलं. त्यांना साक्ष देण्यासाठी तयार करायला त्याने खूप पराकोटीचे प्रयत्न केले. किसनच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. त्या महिला साहेबाविरुद्ध साक्ष देण्यासाठी तयार झाल्या.
गोदानेही महिला दक्षता समितीच्या मदतीने त्या साहेबाच्या चौकशीसाठी पोलिसांवर दबाव आणला. किसनच्या या तक्रारीमुळे अनेक महिलांना हुरूप आला. सगळ्यांच्या साक्षीच्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे विनयभंगाच्या आरोपाखाली त्या साहेबाला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
अखेरीस किसनचा विश्वास जिंकला आणि रखमाला न्याय मिळाला. जेव्हा तिला किसनची साथ मिळाली त्याचवेळेस ती तिची अर्धी लढाई जिंकली होती. कोर्टातील निकाल जाहीर झाल्यांनतर रखमा किसनला धरून रडू लागली ....
" धनी .... म्या नशीबवान म्हणून तुमच्यासारखा धनी गावला , ...... मायावर जीव वोवाळून टाकणारा .... , मायावर इश्वास करणारा .....
तुम्ही बरोबर सांगत व्हतात .... , शहरातील माणसं लई कोत्या मनाची .... , आपल्या सारख्या साध्या माणसाचा ठाव नाही लागायचा शहरामंधी .... चला घरला ....आपल्या गावाकडं ..... "
मैत्रिणींनो शक्यतो अश्या प्रकारच्या गोष्टीत नवरे आणि घरचेच साथ सोडतात अथवा समाज काय म्हणेल म्हणून आपली पत्नी, बहीण ,आई सगळ्यांनाच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत नाही.
आपल्या कथेचा नायक किसन मात्र अशिक्षित असून देखील तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित असल्यासारखा वागला. रखमाला न्याय मिळवून देण्यात गोदा सोबत किसनची साथ देखील खूप महत्वाची होती. किसनच्या साथीमुळेच रखमा खंबीरपणे उभी होती. आपल्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी तो धडपडला, तिची कमजोरी होण्यापेक्षा तो तिचा एक भक्कम आधार झाला. सुख- दुःखात साथ देण्याच्या सातफेऱ्यातील सगळ्या वचनांचा भागीदार झाला....
खऱ्या अर्थाने एक जीवनसाथी झाला .... !
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box